अस्वस्थ मनाचा ‘ताप’

Submitted by कुमार१ on 31 October, 2022 - 08:05

ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे (https://www.maayboli.com/node/77038).
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना मायबोलीकर मानव पृथ्वीकर यांनी नुकतीच केली. त्यानुसार हा लघुलेख लिहीत आहे.

मनस्थितीजन्य ताप म्हणजे काय ?
काही व्यक्ती जेव्हा मानसिक ताणतणाव, भीती किंवा भावनिक आंदोलनांना सामोऱ्या जातात तेव्हा त्यांना अचानक ताप येतो. या तापाची काही अंगभूत वैशिष्ट्ये अशी:

• व्यक्तीच्या शरीरात कुठलाही जंतुसंसर्ग नसतो. तसेच शारीरिक तपासणी केली असता कोणताही ‘शारीरिक’ बिघाड सापडत नाही.
• काहींना उच्च पातळीचा ताप येतो (105-106 F) व तो लवकर ओसरतो.
• तर काहींच्या बाबतीत ताप सौम्य ते मध्यम असतो (100- 101 F). परंतु तो दीर्घकाळ टिकतो.
• या प्रकारच्या ताप-उपचारात नेहमीच्या तापविरोधी औषधांचा (क्रोसिन वगैरे) उपयोग होत नाही.
• पौगंडावस्थेतील मुलांत या तापाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.

ताप येण्याची जैविक प्रक्रिया
जंतुसंसर्गाने येणारा ताप आणि मानसिक अस्वास्थ्यातून येणारा ताप यांच्या मूलभूत प्रक्रिया भिन्न आहेत.
जंतुसंसर्गामध्ये खालील घटना घडतात:

संसर्ग >>> दाहप्रक्रिया >>> Prostaglandins आणि अन्य रसायनांमधली वाढ >>> मेंदूच्या हायपोथालामस भागातील विशिष्ट केंद्रावर परिणाम >>> ताप.

मात्र मनस्थितीजन्य तापाची प्रक्रिया यापेक्षा भिन्न आहे. ती समजून घेण्यासाठी आधी शरीरातील मेदसाठ्यांबाबत काही माहिती देतो.

आपल्या शरीरात दोन प्रकारचे मेदसाठे असतात:
१. खूप मोठ्या प्रमाणावरील मेदाला आपण ‘पिवळा’ मेद असे म्हणतो. हा त्वचेखाली सर्वत्र आणि उदर पोकळीत असतो.
२. तपकिरी मेद (ब्राऊन fat) : या प्रकारचा मेद मात्र अत्यंत मर्यादित ठिकाणी आहे. तान्ह्या बालकांमध्ये त्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते. परंतु प्रौढपणी हा मेद शरीरातील काही मोजक्या भागांमध्ये राहतो. जसे की, मान, गळा व छातीचा मोजका भाग.

Brown AT adult (2).jpg
या मेदाचे एक वैशिष्ट्य असते. तिथे घडणाऱ्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियांमधून बऱ्यापैकी उष्णतानिर्मिती होते.

मानसिक अस्वास्थ्यामुळे शरीरात अशा क्रिया होतात :
१. Sympathetic चेतासंस्थेचे उद्दीपन होते.
व त्यातून noradrenaline हे रसायन स्त्रवते.

त्यामुळे २ घटना घडतात:
A. तपकिरी मेदाच्या पेशींचे आकारमान वाढते आणि पेशींमध्ये मेदाचे मोठ्या प्रमाणात विघटन होते. तसेच तिथे UCP नावाच्या प्रथिनाचे प्रमाणही वाढते. त्याच्या गुणधर्माने उष्णतानिर्मिती वाढते.
B. त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. >>> उष्णतेचे उत्सर्जन कमी होते.

२. वरील दोन्हींच्या एकत्रित परिणामातून ताप येतो.
अर्थात ही सर्वसाधारण उपपत्ती आहे. सर्व वैज्ञानिकांचे याबाबतीत अद्याप एकमत नाही. या विषयावरील संशोधन अद्याप पुरेसे झालेले नाही.

मानसिक अस्वास्थ्याची कारणे:
मनस्थितीजन्य ताप येणाऱ्या लोकांचे निरीक्षण केले असता अनेक प्रकारची कारणे आढळून आलेली आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. तो घेताना मुले आणि प्रौढ अशा दोन गटांचा स्वतंत्र विचार करता येईल.

मुले
• एका अथवा दोन्ही पालकांची भीती, दडपण, आई वडिलांतील भांडणे, इ.
• शाळेतील त्रासदायक वातावरण, शिक्षकांची भीती, अन्य मुलांनी वारंवार चिडवणे, टिंगल करणे किंवा धमकावणे, परीक्षा/स्पर्धापूर्व वातावरण.
• कुटुंबातील दुःखद घटना
• भीतीदायक दृश्ये/चित्रपट/ चित्रफितींचा परिणाम

प्रौढ व्यक्ती
• कामाच्या ठिकाणचे ताणतणाव, वरिष्ठांची भीती, नोकरी जाण्याची भीती
• काही लोक कामाच्या ठिकाणी कायमच मरगळलेले दिसतात. अशांवरही काही अभ्यास झालेले आहेत. त्यांचा कामाचा दिवस आणि विश्रांती/सुट्टीचा दिवस यांमध्ये देखील त्यांच्या शरीर तापमानात फरक पडलेला आढळला आहे.
• मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आधीचा दिवस
• कुटुंब व जिवलग मित्र परिवारातील दुःखद घटना आणि त्यांचे काही काळाने केलेले स्मरण, इत्यादी.
• मोठ्या शस्त्रक्रिया/ भूल यांना सामोरे जाताना.

उपचार
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की अशा प्रकारच्या तापामध्ये नेहमीच्या तापविरोधी औषधांचा उपयोग होत नाही. किंबहुना अशा औषधांचा उपयोग न झाल्यानेच डॉक्टर त्या व्यक्तीचा वेगळ्या प्रकारे विचार करतात. संबंधिताची खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर मानसिक मुद्दे समोर येतात. उपचारांच्या
पहिल्या पातळीवर मानसिक आधार आणि समुपदेशन हे उपाय राहतात. मनशांतीच्या नैसर्गिक उपायांनी पण फायदा होतो. जिथे ताप अशा उपचारांनी आटोक्यात येत नाही तिथेच औषधांचा विचार करता येतो. संबंधित औषधे मानसोपचार तज्ञांच्या अखत्यारीतील आहेत. त्यांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करता येतात.

................................................................................................................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Psychosomaticstress या शब्दांची मोठी गंमत आहे !
वैद्यकीय संदर्भात त्यांच्या सुस्पष्ट व्याख्या करणे अवघड जाते. या दोन शब्दांवरून वैद्यकीय क्षेत्रात वितंडवाद झालेला आहे. त्याबाबत टोकाची मतेही आढळतात.

काहींच्या मते, जगातील बहुतांश आरोग्य समस्यांचे मूळ या दोन शब्दांमध्येच आहे. तर अन्य काहींच्या मते, आपल्याला जेव्हा रोगाची कारणमीमांसा समजलेली नसते तेव्हा आपण टेकू म्हणून या दोन शब्दांचा आधार घेत असतो !

Psychosomatic व stress या शब्दांची मोठी गंमत आहे !
वैद्यकीय संदर्भात त्यांच्या सुस्पष्ट व्याख्या करणे अवघड जाते. या दोन शब्दांवरून वैद्यकीय क्षेत्रात वितंडवाद झालेला आहे. त्याबाबत टोकाची मतेही आढळतात.>>>>> व्याखेमधे जरी बंदिस्त करता आले नाही तरी संकल्पना म्हणून स्पष्टीकरण असणे हे वैद्यकीय असो वा विज्ञान असो या क्षेत्रात अभ्यासली जातेच. त्यात टोकाची मते असली सर्वसामान्य लोकांमधे अजूनच गोंधळ वाढतो. अगोदरच तो संभ्रमित असतो त्यात त्याला प्रश्नांची ठोस उत्तरे मिळाली नाहीत तर तो पुन्हा प्रश्नचिन्हांकित च होतो.

छान लेख आणि चर्चा.

सुदैवाने हा ताप कधी अनुभवला नाही. White coat hypertension चा अनुभव मात्र अनेकदा आला आहे.

डॉक्टरांनीच मला मृत्युच्या दरवाज्यात उभे केले आणि दुसऱ्या डॉक्टरांनी ओढून बाहेर काढले. चांगला डॉक्टर भेटायला पण नशीब लागते! +१११

सर्वांना धन्यवाद !

सुदैवाने हा ताप कधी अनुभवला नाही.
+११
मी पण नाही.

छान लेख व प्रतिक्रिया !

उपयुक्त लेख आणि चर्चा पण.
मला टेंशन आले की खोकला येतो. तसा माझा खोकला थंडीत येणारा एलर्जीक आहे पण थंडी बरोबर टेन्शनशी सांगड इंजिनीरिंग करतांना दिवाळीनंतर थंडीत होणाऱ्या परिक्षांमुळे घातली गेली. आता थंडीत येतोच पण बाकी वर्षभर टेन्शन आले की तेवढया टेन्शनच्या कालावधीमध्ये येतोच.

सर्वांना धन्यवाद !

मला टेंशन आले की खोकला येतो>>>
असे लोक पाहिलेत.
साधारण निरीक्षण असे :
बऱ्याच ५०+ ,लोकांना एखादा दीर्घकालीन आजार असतो. जेव्हा काही कारणाने मानसिक ताण तीव्र होतो तेव्हा मूळचा आजार अधिक बळावतो.

समजा,
मधुमेह + अन्य आजार अशी एकत्र परिस्थिती आहे. जेव्हा यातील एक आजार (तणावग्रस्त असताना) बळावतो तेव्हा तो दुसऱ्यालाही अधिक बिघडवतो.

मधुमेह + कोविडच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत

यातील एक आजार (तणावग्रस्त असताना) बळावतो तेव्हा तो दुसऱ्यालाही अधिक बिघडवतो.>>>>> धन्यवाद डॉक्टर. उपयुक्त माहिती

शारीरिक तापाबद्दल नाही परंतु संसारिक तापाबद्दल समर्थ रामदासांनी लिहून ठेवलय.

अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसीं मोहमाया ।।
अचपळ मन माझें नावरे आवरीतां ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥ १ ॥

ह्या धाग्याला अनुसरून ...

मनस्थितीजन्य तापें तापलों वैद्यराया ।
सायकोसोमॅटिकने तप्त केली माझी काया ।।
चढता ताप माझा नावरे आवरीतां ।
औषधांविण होतो दाह रे दाह आतां ॥ १ ॥

मला गेले कित्येक वर्ष ताप आलाच नाहीये. म्हणजे लहानपणीचा आठवायला गेले तर खूप लहान असताना आला असेल पण गेले 30 एक वर्ष तरी ताप हा आलाच नाहीये.
कधीकधी कणकण जाणवते स्नायू दुखायला लागतात, नाकातून गरम वाफ येते, पण थर्मामीटरने मोजल्यास ताप मात्र दाखवत नाही. अंग दुखणं, डोकं दुखणे हे तर नेहमी सुरू असतं पण ताप येत नाही.

ताप आल्यावर इतरांच्या जसे लाड होतात ना तसे माझे पण लाड व्हावे तसे माझे खूप इच्छा आहे. मस्त पांघरून घेऊन डोक्यावर मिठाच्या पाण्याची पट्टी ठेवून झोपून जावे. Wink
समोरच्याने डोक्याला हात लावल्यावर त्याला समजलं पाहिजे की अंगात ताप आहे. नाहीतर मेलं माझं दुखणं कोणाला समजतच नाही आतल्याआत काय दुखत असतं ते.

कोविडचं व्हॅक्सीन घेतल्यावर घरात मी सोडून सगळ्यांना ताप आला. सगळे दोन दिवस झोपले घरी मस्त आणि मी ऑफिस Sad

गेले 30 एक वर्ष तरी ताप हा आलाच नाहीये.
मग छान आहे की !
तुम्हाला ताप नाही आणि कुटुंबीयांनाही तुमचा ताप नाही
Happy

एखादी गोळी हवी ज्याने दोन दिवस ताप येईल आणि पडु आजारी मौज हीच वाटे भारी अनुभवता येईल.

चामुंडराय, कविता मस्तच.
तुम्हाला ताप नाही आणि कुटुंबीयांनाही तुमचा ताप नाही >>> हे भारी आहे.

चामुंडराय, कविता मस्तच.
निल्सन Happy

------
तणाव आला की काही ना काही जाळूनच जात असेल , ताण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने जाळतो इतकंच !!

--------
मानवदादांच्या पोस्ट वरून मला चि.वि.जोशींची गोष्टं आठवली. चिमणराव थोडं खोटं-थोडं खरं आजारी पडतात. मगं बायको म्हणजे काऊ साजूक तुपाचा शिरा करून देते पण एका दमात खाल्ला तर तिला शंका येईल ना , म्हणून हफ्त्याहफ्त्याने संपवतात. ऑफिसात आजारपणाची रजा टाकून सिनेमाला जातात. तिथे इंग्रजी अधिकारी असलेला त्यांचा वरिष्ठ गाठतो , मगं साळसूदपणे, 'डॉक्टरने थंड हवेच्या ठिकाणी जायला सांगितले आहे पण आम्हाला गरिबाला कुठले परवडायला म्हणून आम्ही सिनेमातले थंड हवेचे ठिकाण बघून जीवाला आराम देतो' म्हणतात. वरिष्ठाला मोठी गंमत वाटते व ते बहुतेक सुट्टी वाढवून देतात. धमाल आहे ते!! 'चिमणरावांचे चऱ्हाट' किंवा 'हास्य चिंतामणी' या पुस्तकातले आहे.

-----

कधीतरी असाही ब्रेक 'अस्वस्थ मनाचा 'ताप'' कमी करतो. हे असे लिहिल्याने हा प्रतिसाद आता अवांतर राहिला नाही. Wink Happy

चिमणरावांचे चऱ्हाट' किंवा 'हास्य चिंतामणी' या पुस्तकातले आहे.
>>> छानच !
कित्येक वर्षांनी या आठवणी जाग्या केल्यात
धन्यवाद
...
"तापा"शिवाय अस्वस्थ मनाचे अन्य तापही बरेच असतात Happy

चामुंडराय, कविता छान!
निल्सन Happy
मलाही पडू आजारी ही कविता आठवली!
माझीही सेम केस आहे. ताणाने पित्त वाढते आणि मग सर्दी. त्यामुळे नाक गळती, अंगदुखी, कणकण सगळे पण ताप भरलाय खुप असे होत नाही. त्यामुळे सोसवत नाही पण ब्रेक पण नाही. उलट सगळे सोसत करताना अजुन ताणच पडणार Lol आजुबाजूचे परत म्हणणार तुझी नाक गळती नेहेमीचीच आहे.

अचानक ताप भरल्यास जवळ बॅगेत वेट वाइप्स चे छो टे पाकीट ठेवावे. कपाळावर ओला नॅपकिन ठेवल्याने बरे वाट्ते.

समारोप
काही दिवसांपूर्वी हा विषय मला इथल्या विचारपूसमधून सुचवला गेला. प्रथमदर्शनी असे वाटत होते, की या विषयावर एखादा मोठा परिच्छेद लिहावा आणि तो "गरम आणि तापदायक" या पूर्वीच्या धाग्यातच प्रतिसादरुपी लिहावा.

परंतु, अधिक विचार करता मी यावर स्वतंत्र लिहायचे ठरवले. इथल्या प्रतिसादांमधून अनेकविध अनुभव सांगितले गेलेत. त्यातून पूरक माहितीची चांगली भर पडली आहे. हे सर्व पाहता या प्रकारच्या तापावर स्वतंत्रपणे लिहायचे चीज झाले असे म्हणतो.

चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद !

नमस्कार, आत्ता १००.७ ताप आला आहे. डोलो गोळी घेते. वाट बघते. आजचा दिवस आजिबातच स्ट्रेसफुल नव्हता. उलटे कामच कमी होते. आणि वीस दिवसात रिटायरमेंत. पण घरीआल्यावर एक फेज असते साधारण संध्याकाळी सेव्हन ते आठ. अंग दुखणे ताप असे होते. फार थकवा येतो.
हे आत्ताचे नाही पूर्वी नुसती थकावट असायची विशीत तिशीत.

फक्त शेअर करते आहे. स्वेटर व्हिक्स सर्व कोपिन्ग सिस्टिम कामाला लावली आहे. एक तासाने उठेन खायला करुन घेइन. आता अमेरिकेतील निवडणुकांचे कव्हरेज ऐकत पडले आहे.

डॉ. कुमार, तब्येत मुळातच खराब आहे. त्यावर उपाय चालू असतात. त्यामुळे ही असे होत असावे. तुम्ही बाफ काढलात म्हणून इथे लिहिले.

अमा
तुम्हाला लवकर आराम पडण्यासाठी शुभेच्छा. विश्रांती आणि योग्य ती औषधे घ्यालच. तुम्ही इथे लिहिलेले पाहून बरे वाटले. अनेक आरोग्यविषयक धाग्यांवर बरेच जण असे मोकळेपणाने व्यक्त होतात हे पाहून समाधान वाटते.

भविष्यात निवृत्तीनंतर तुम्हाला एक शांत व शिस्तबद्ध अशी जीवनशैली अंगीकारता येईल. त्यातून बऱ्याच आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात राहाव्यात.
त्यासाठी पण शुभेच्छा !

Pages