६) गुप्तहेर बबन बोंडे - और खजूर मे लटके

Submitted by सखा on 27 October, 2022 - 08:44

(परंतु या सांस्कृतिक देवाण घेवाणीत झुर्र्याला अजिबात काही कळेना उलट बबन काही तरी अश्लील जोक सांगतो आहे असे वाटून तो गडबडा लोळून हसू लागला. आता हा जर हसून हसून मेला तर या जंगलातून वाट काढणे मुश्किल होईल म्हणून बबनने तो विषय तात्काळ तिथेच थांबविला. आजच्या रात्रीच्या पार्टीत हा देवमाणूस बहार आणणार या खुशीत मग झुर्रा बबन ला घेवून तांड्याच्या दिशेने निघाला.
...आता पुढे )
तांड्यापाशी पोहोचे पर्यंत उन्हे कलायची वेळ झालेली होती. पानधारी झुर्रा आणि लालवस्त्रधारी बबनला पाहून ही तोबा गर्दी जमा झाली बायका पोरे आनंदाने ओरडत बबनच्या अंगाला हात लावून पाहू लागली. झुर्याच्या शेजारणीने तिच्या नंणदेच्या मावशीकडून ऐकून झुर्याच्या बायकोला खात्रीने सांगितले कि सक्काळी भांडून गेलेल्या झुर्याने नवीन फॉरेनर बायको आणली आहे. तशी ती कजाग बाई हातात चुलीतले जळते लाकूड घेवून जे तरातरा निघाली ते काही शहानिशा करायच्या आधीच तुफान बडबड करत झुर्ऱ्याला सर्वा समक्ष असा धुतला कि ज्याचे नाव ते. झुर्ऱ्याचे मार खावून पूर्णपणे झुरळ झाल्या नंतर शेवटी गावातल्या एका म्हातार्या वैदुने कसे बसे तिला सांगितले कि हा फॉरेनर एक बाप्या आहे तेव्हा कुठे ती बाई कशीबशी शांत झाली. अर्धमेल्या झुर्याने मरणप्राय यातना सहन करत त्याही परिस्थितीत खाणाखुणा करून बबन कसा देवमाणूस आहे आणि कोंडासुराचे पोट फोडून तो कसा बाहेर आला याचे वर्णन केले. मग लोकांनी बबनला खांद्यावर घेवून वाजत गाजत काबिल्याच्या सरदारा कडे न्यायला सुरवात केली. झुर्रा मात्र लंगडत लंगडत मनातल्या मनात बायकोला शिव्या देत सुकड्या माणसाने दांडगट बाईशी लग्नच करू नये असे काहीसे बरळत त्या म्हातार्या वैदू बरोबर जखमांवर पाला लावायला निघून गेला.
काबिल्याचा सरदार मोठा विनोदी माणूस होता. बबनची कीर्ती त्याच्या कानावर एव्हाना आलेली होती. बबनची मिरवणूक त्याच्या झोपडी समोर येताच तो त्याच्या दहा बायका आणि वीस पंचवीस पोरा बाळा सोबत बबनच्या स्वागतास बाहेर आला. प्रत्येकाने मग आदरात्मक बबनच्या अंगा तोंडाला राख फसली.
बबनने देखील प्रतिउत्तर म्हणून त्यांना राख फासली एकूण काय तर हा तिळगुळ देण्याघेण्या सारखा हा कार्यक्रम मोठा मजेत पार पडला.
रात्री शेकोटी नृत्य आणि दारूकाम झाले. सूप मध्ये माकडाचे डोळे आणि चटणी विंचवाच्या नागीची असल्याने बबनने फक्त फलाहार आणि सापाचे भरीत खाल्ले.
मोहाची दिलकश दारू पिवून बायका-पुरुष-बबन सारे फुल्ल टुन्न झाले तेव्हा आकाशात शुक्राची चांदणी दिसू लागली होती. बबनवर सारेच फार खुश होते सरदार तर फारच इतका कि त्याने आपण आपली सर्वात लाडकी आणि सुंदर मुलगी बबनला देत आहोत आणि आज पासून तो आपला जावई असे जाहीर केले. अति पिल्याने बबन ला अनाउन्समेंट काय होती हे कळण्याचे काहीच कारण नव्हते त्यामुळे तो देखील इतर सारखाच नाचू लागला टाळ्या वाजवू लागला. त्याला एव्हढेच कळत होते कि आपल्याला अति हर्ष झाला आहे आणि एक तीनशे पौंडाची विशाल महिला आपल्याशी नाचताना लगट करीत आहे.
दुसऱ्या दिवशी आपण एका भयंकर गोरिला सदृश केसाळ स्त्रीच्या शेजारी जागे झालो आहोत हे जेव्हा बबनच्या ध्यानात आले तेव्हा त्याला आपल्यावर आलेल्या गंडानतरावर हसावे का रडावे ते कळेना. ती बाई उठल्या पासून ज्या पद्धतीने बबनला हिडीस फिडीस करत सूचना करू लागली त्यावरून आपले हिच्याशी काल लग्न झाले आहे हे सांगायला एखाद्याला बबन सारखे हुशार असण्याची देखील गरज नव्हती.

दुसऱ्या दिवशी गावात सभा भरली. गावातला वैदू नैसर्गिक रित्याच डम चार्टस मध्ये उत्तम होता त्या मुळे बबनच्या फारकतींच्या मागणी बद्दल साधारणपणे सहा तासा नंतर सरदारच्या डोक्यात प्रकाश पडला. बबनला आपल्या मुली पासून फारकत हवी आहे याचा त्याला अर्थातच भयंकर राग आला. वैदू नसता तर आपले कसे झाले असते याचा विचार करूनही बबनचा थरकाप झाला
रानटी खाप पंचायतीने निर्णय दिलाकी साधारणपणे अश्या प्रकारची रिक्वेस्टला देहदंडा शिवाय पर्याय नाही परंतु बबनचे स्टेट्स फोरेनर देव सदृश असल्याने त्याला दोन पर्याय आहेत.
१) बबनची बायको ठरवेल त्या पद्धतीने आत्महत्या करणे.
२) बबनची बायको ठरवेल त्या माणसा बरोबर मुष्टी युद्ध करणे आणि वाचल्यास कायमचे तोंड काळे करणे.
बबनने अर्थातच दुसरा पर्याय स्वीकारला. कुस्ती बघायला माणसांची हि गर्दी झाली. सरदार आणि त्याचे कुटुंबीय अगदी पुढच्या रांगेत बसले होते. बबनच्या विशाल ढेरपोट्या बायकोच्या आणि तिच्या सारख्याच तिच्या बहिणींच्या विशाल पोटावर लहान पोरे उड्या मारून ट्रम पोलीन खेळत होती. थुलथुलीत पोटावर इकडून तिकडे उसळताना त्यांना फार मज्जा येत होती. खरी अंदरकी बात अशी होती कि ज्या माणसाला तिने लढायला निवडले होते तो तिचा एक्स होता. तिच्या बाबांनी बबनला मध्ये आणले नसते तर त्यांचे चांगलेच लफडे चालू होते. आताही बबनला धूळ चारल्यावर ती त्याच्याशीच लग्न करणार होती. आता तुम्ही म्हणाल मग तिने सरळ खरे खरे का नाही सांगितले? ही मारामारी ची भानगड उद्भवलीच नसती. बरोबर आहे तुमचे म्हणणे परंतु तुमच्या का ला काहीच उत्तर नाही. उत्तर असते तर महाभारत घडलेच नसते. जगात काही "का?" ना उत्तरे नसतात.
जेव्हा आपल्या आठ फुटी दैत्याकार प्रतिस्पर्ध्याला बबनने पहिले तेव्हा काही तरी दैवी चमत्कार झाल्या शिवाय या सांडाला हरवणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आले. ट्रक जेव्हढा मोठा आणि वजनदार तेव्हढा त्याला वळायला आणि थांबायला वेळ लागतो हे बबन त्याच्या ट्रेनिंग मध्ये शिकला होता. त्या मुळे पहिल्या तीन रौन्डला लोकांना दिसले कि दैत्य नुसताच बबन ला पकडायला धावत होता आणि बबन चपळाईने त्याच्या हातातून सुटत होता. बबनने नाही म्हणायला त्याला सोळा गुद्दे लगावले पण त्याने त्याला काहीच फरक पडला नाही. शेवटी अचानक कसा कुणास ठावून बबन त्याच्या तावडीत सापडला तसे त्याने बबनला उंच उचलून पायावर उसाच्या कांडक्या प्रमाणे मोडावे असा त्याच्या बेत होता परंतु त्याला त्याची माजी प्रेयसी आणि तिच्या बहिणी पहिल्या रांगेत त्याला चिअरअप करताना दिसल्या म्हणून त्यांची जर मज्जा करावी या हेतूने त्याने बबनला गरागरा फिरवून त्यांच्या दिशेने जोरात भिरकावले. त्यामुळे बबनच्या माजी प्रेयसीस राग येऊन तिने बबनला गरागरा फिरवून दैत्याच्या दिशेनं भिरकावले तसा दुप्पट वेगाने सुपरमॅन पोज मध्ये क्षेपणास्त्रा सारखा वेगाने येवून दैत्याला असा जोरदार धडकला कि दैत्य सरळ नॉक आवुट झाला. लोकामध्ये एकच हल्ले कल्लोळ झाला जो तो बबन च्या नावाचा जयघोष करू लागला. झुर्याने बबनला जंगलच्या बाहेर मेन रोड वर आणून सोडले. नशिबाने एक भारतीय वैज्ञानिकांची टीम तिथे माकडावर रिसर्च करण्या साठी आली होती. बबनने त्यांना आपण एक माणूसच असल्याची ओळख पटवून दिल्यावर त्यांच्या मदतीने बबनला पुढच्या चोवीस तासात दिल्लीला आणण्यात भारत सरकारला काहीच अडचण पडली नाही.
एअरपोर्ट वर बबन ला ऑफिस तर्फे एक बॅग देण्यात आली. त्यात बबन साठी काही नवे कपडे, नवा सेल फोन आणि बाकीच्या खास गोष्टी देण्यात आल्या. बबनला पुढच्या सूचनांची प्रतीक्षा करायला सांगितले. दिल्ली विमान तळावरून बबन जेव्हा आपल्या हॉटेलच्या पॅलेशिअल स्वीट
वर आला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. फ्रेश होवून त्याने शांत पणे वृत्तपत्रातील बातम्या चाळल्या एका दिग्गज पत्रकाराने छोटा बटू अजून कसा
सापडला नाही या साठी गुप्तहेर संघटनेवर ताशेरे ओढले होते. विरोधी पक्षाने संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून संसदेत चुकून आपल्याच पक्षाच्या कुणाला तरी काळे फासले. विज्ञान पुरवणी मध्ये कुणा एका मानव
उत्क्रांती संशोधकाने टांझानिया मध्ये झुर्रा जमात अस्तित्वातच नसल्याचा ठाम दावा केला होता. शेवटच्या पानावर कोंडासूर नावाच्या अजस्त्र सापावर कुणी तरी लेखकाने लेख लिहिला होता व त्यात त्याने म्हंटले होते कि कोन्दासुर हे फक्त माकडे खाऊन जगतात आणि गम्मत म्हणजे ते मनुष्याच्या जवळपास ही फिरकत नाहीत. बबनने तो पेपर एका हाताने कचरा कुंडीत टाकून दिला आणि दुसर्या हाताने मग टीव्ही लावला तर सौंदर्याचा अणु बॉम्ब प्रियांका मस्काचे ब्रेकअप नंतर आपल्या सध्या दवाखान्यात असलेल्या प्रोडुसर बरोबर लफडे चालू असल्याचे रस भरीत वर्णन चालले होते. क्लीप मध्ये प्रियांका स्वताच्या हाताने केलेले शिळ्या पोळीचे कुटकतीन मार (तीनदा तीच अक्शन) स्टाइल मध्ये खावू घालताना दाखवत होते बबनने कंटाळून टीव्ही बंद केला
साधारण पणे रात्री दोनच्या सुमारास त्याचा सेल फोन वाजला. बबन ने फोन कानाला लावला आणि हेल्लो म्हणाला
पलीकडे मा होत्या त्या सध्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवाद ऐकण्यासाठी स्वीडन ला आल्या होत्या. बबनने आपला संपूर्ण हेलपाटा कथित केल्यावर त्या थोड्या व्यथित झाल्या. बबनने आपणही सरकारी नौकारीत फार दिवस असल्याने आणि आयुष्यात एकदा झुर्रा जमात पहायचे मनात होतेच असा त्याला पोझीटिव्ह स्पिन दिल्याने आता माँ ला पण बरे वाटले. त्यांनी मग बबनला त्याचे अणु बॉम्ब चोरी बद्दल काय विचार आहेत हे सांगायला सांगितले.
बबन म्हणाला कि "खूप डीप विचार केल्या नंतर मला असे वाटते कि ज्या अर्थी अणु बॉम्ब हा अंड्याच्या आकाराचा आहे याचाच अर्थ असा कि हे काम नक्कीच कुणा तरी नॉन व्हेज माणसाचे असले पाहिजे. ज्या अर्थी साधूच्या वेशात हे लोक आले म्हणजेच ते धार्मिक नसणार. परंतु प्रश्न हा उरतो कि हे काम कोणी बरे केले असेल?...." मध्येच माँ म्हणाल्या बबन तुझ्या एका जुन्या शत्रू ने आपणच हे कृत्य केल्याचे वृत्त अल जझीरा वर प्रसिध्द केले आहे. आता आश्चर्य करण्याची पाळी बबनची होती, माँ पुढे म्हणाल्या मला असे वाटले कि तू अप टू डेट आहेस असो. तो व्हिडीओ बघ आणि ताबडतोब पुढच्या कामगिरीवर निघ चोवीस तासाच्या आत आम्ही त्याला पकडू असे मी पंतप्रधानांना वचन दिले आहे. गुड लक!
फोन ठेवताच बबनने आपली बॅग उचलली आणि तो लगेचच आपल्या कामगिरीवर निघाला.....

(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !
मागचा ही भाग हहपुवा होता. छान खुसखुशीत आहेत सगळ्या कथा.
पाचव्या भागाची कथा दोनदा पोस्ट होतेय, कमेण्ट्स दोन्हीकडे सारखेच. या भागात तो बग निघून गेलाय.
यावर पण एक तुमच्या बबन बोंडेला कामाला लावता येईल Happy

रानभूली
आभार!
पाचवा धागा दोनदा पोस्ट होण्यामागे नक्कीच बबनच्या
गुप्त शत्रूंचा हात असला पाहिजे किंवा वेब डेव्हलपरची चूक असे सर जेम्स बाँड यांनी ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या नूतन पंतप्रधान मोहोदयास खाजगीत सांगितले म्हणे...