ती, मी आणि मुंबईची खादाडी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 October, 2022 - 12:28

ती, मी आणि मुंबईची खादाडी !
-------------------------------------

हम एक बार जीते है,
हम एक बार मरते है..
प्यार न जाने कितने बार करते है
पर दिन मे चार बार चरते है Happy

यातले 'चरते है' म्हणजे चरणे.
म्हणजेच शुद्ध मराठीत हादडणे!

कुठल्याही प्रेमाच्या नात्यात खादाडीचे विशेष महत्व असते. जसे की, दो दोस्त एक कप मे चाय पिते है.
आपण एखादा चित्रपट एकट्याने बघू शकतो, एखादे पुस्तक एकट्याने वाचू शकतो, सकाळ संध्याकाळ वॉकला एकट्याने जाऊ शकतो. पण खाताना कोणी सोबत नसेल, तर ते खाणे फार बोअर होऊन जाते. आईच्या हातचे जेवण आपल्याला जगात भारी वाटायचे प्रमुख कारण हेच आहे. ज्या प्रेमाने आणि मायेने ती आपल्याला भरवते ते जगात ईतर कोणीच करू शकत नाही.

म्हणून कुठल्याही नवीन नात्यातील बंध तपासून घ्यायला आपण खाण्यापासूनच सुरुवात करतो. एखाद्या आवडत्या मुलाला/मुलीला प्रपोज करायचे आहे, तर आपण त्याला/तिला सोबत घेऊन कॉफी वा डिनर डेटला जातो. कारण तुम्ही एकमेकांसोबत खाताना कम्फर्टेबल नसाल तर तुमच्यात ती केमिस्ट्री मिसिंग आहे असे म्हणू शकतो. ईतर स्वभाव गुण, आवडी-निवडी मिळणे न मिळणे, पत्रिका-कुंडली जुळणे न जुळणे, होतच राहते. पण जेव्हा खाणेपिणे आणि गप्पाटप्पा, दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून होतात, तेव्हाच तुम्ही 'मेड फॉर ईच अदर' असतात.

तर असेच एक नाते होते आयुष्यात, निखळ मैत्रीचे!
खादाडीच्या लेखाला सुरुवात करण्याआधी त्या नात्याला जाणून घेणे गरजेचे. तरच त्या खादाडीमागच्या भावनांना समजून घेता येईल.

-----------------------------------------------------

स्थळ - ईंजिनीअरींग कॉलेज, मुंबई
काळ - फायनल ईयर
वेळ - अगदीच रोमँटीक!
कारण नुकतेच एका एकतर्फी प्रेमाच्या अपयशातून बाहेर पडून मी आणखी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो.

छे!, ही कथा त्या मुलीची नाही, जिच्या मी प्रेमात पडलो होतो. तर त्या मुलीची आहे, जिच्याशी असलेले मैत्रीचे नाते एका मर्यादेनंतर उमललेच नाही. मला आवडणारी मुलगी प्रॉडक्शन डिपार्टमेंटची होती. आणि "ती" मात्र माझ्याच क्लासची होती. माझ्या कॉलेज जीवनात आलेली माझी पहिली खरीखुरी मैत्रीण.

माझी सकाळची सुरुवात तिला फोन करून व्हायची. आज येतेयस ना कॉलेजला विचारून व्हायची. कारण ती नसेल तर दिवसभर मला सोबत कोण असणार हा प्रश्न पडायचा. तसा ग्रूप मोठा होता आमचा. पण ती नसली की त्या सर्वांतही एकटे एकटे वाटायचे. तिला मी आज तू ड्रेस कुठला घालून येणार आहेस हे देखील विचारायचो. तिने येल्लो ड्रेस म्हटले की कपाटात ऊडी मारून पिवळा टीशर्ट बाहेर काढायचो. बावळटपणा होता तो. मान्य आहे. पण मला तिच्याशी मॅचिंग कपडे घालायला फार आवडायचे.

मग ते मॅचिंग कपडे घालून आम्ही क्लासमध्ये एकाच बेंचवर बसायचो. सबमिशन करायला लायब्ररीत एकत्रच जायचो. दुपारचे जेवण देखील कँटीनमध्ये सोबतच व्हायचे. माझा घरचा डब्बा असायचा, तर ती हॉस्टेलला राहणारी असल्याने ऑर्डर करायची. जे मला खावेसे वाटायचे ते ती ऑर्डर करायची. कारण तिला माझ्या घरच्या डब्यात ईंटरेस्ट असायचा. माझा डब्बा तरी काय, तर फोडणीचा भात! तो तिचा जीव की प्राण! रोजच तो भात असायचा. रोजच तो खाल्याशिवाय तिचे जेवण पुर्ण व्हायचे नाही. ज्या गप्पा क्लासमध्ये एकाच बेंचवर बसूनही मारता यायच्या नाहीत, वा लायब्ररीत जे खिदळता यायचे नाही, ती कसर मग आम्ही कँटीनमध्ये भरून काढायचो. गप्पांचे विषय आता आठवत नाहीत. पण तेव्हा कधी कमतरता भासली नव्हती हे आठवतेय.

जागाही आमची ठरलेली होती. आम्हाला शोधायचे असल्यास कँटीनमधील टेबलखुर्च्यांवर नाही, तर कँटीनमागच्या पॅसेजला यावे. तिथे जमिनीवर ऐसपैस पसरून आम्ही चरताना सापडायचो. मी चहाप्रेमी पजामाछाप ईंजिनीअर, तर ती आईसक्रीम लव्हर बार्बीगर्ल!.

मुली केवळ आईसक्रीम खायला म्हणून हॉटेलमध्ये जाऊ शकतात हे मला तिच्यामुळे समजले. कधी दुपारनंतर फ्री लेक्चर मिळाले किंवा प्रॅक्टीकल लवकर उरकले, तर आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जायचो. ती एकटीच आईसक्रीम खायची, आणि मी तिला आनंदाने आईसक्रीम खाताना बघायचो. गप्पा मारायचो. कधी ईच्छा झाल्यास चिकन मंचॉऊ सूप मागवायचो. तर कधी वाटलेच तर एखादा चमचा तिच्यातलेच आईसक्रीम खायचो. बाकी तिला कोणाशी असे आईस्क्रीम शेअर करताना पाहिले नव्हते. उष्ट्याचे खाताना तर बिलकुल पाहिले नव्हते. हे ती माझ्यासोबतच करते याचे मला फार अप्रूप वाटायचे. म्हणून मला आईस्क्रीम खाण्यात शून्य रस असताना, आणि त्या रेस्टॉरंटमधील चहा कॉफी परवडत नसतानाही केवळ तिच्या आनंदासाठी सोबत जायचो. कारण तिचा आनंद माझ्यासाठी सर्वप्रथम होता.

आणि तिचा हा आनंद सर्वात आधी यासाठी असायचा, कारण नंतर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदात सामील व्हायची. मी ज्या मुलीच्या प्रेमात होतो, त्या मुलीचा मागे मागे फिरताना ती मला साथ द्यायची. मी ज्या मुलीकडे बघून लाजायचो, तिथे ही तिच्याकडे बघून चक्क गोड हसायची. जिथे त्या मुलीचा लेक्चर चालू असेल तिथल्या व्हरांड्यात घुटमळायला ही माझ्यासोबत असायची. जिथे ती मुलगी लायब्ररीत अभ्यास करताना आढळायची त्यासमोर ही माझ्यासोबत पुस्तकात डोके खुपसून बसायची. तर कधी आम्ही दोघे मिळून त्या मुलीला बसस्टॉपपर्यंत सोडून यायचो.

एकदा या नादात दुपारच्या उन्हात तिला चक्कर आली. अरे देवाs, मी माझ्या स्वार्थासाठी हिचीही फरफट केली असे वाटले.. पण ती सावरली, "ईतना तो चलता है यार' म्हणत आईसक्रीम खाऊन शांत झाली. बहुधा ती पहिली आणि शेवटची आईसक्रीम असावी जी माझ्या पैश्यांची होती. अन्यथा ती 'बडे बाप की बेटी' होती. आमच्यातले बरेचसे खर्च तीच करायची.

तिची घरची श्रीमंती आणि तिचे माझ्या तुलनेत हाय प्रोफाईल राहणीमान कधी आमच्या मैत्रीआड आले नाही. पण आमच्यातील नाते मैत्रीच्या पुढे जाईल असेही कदाचित याचमुळेच मला वाटले नाही. अर्थात, आमच्या दोघांमध्ये माझे एकतर्फी प्रेम असलेली मुलगीही होतीच म्हणा..

पण आम्ही दोघे सोडून क्लासमधील सर्वांनाच असे वाटत होते की आमच्यात काहीतरी चालू आहे. आणि माझा दुसर्‍याच मुलीच्या मागे लागण्याचा बहाणा फक्त आमच्यातील नाते लपवायला आहे. लोकांचे गैरसमज ईतक्या टोकाचे होते की तिला बहिणीसारखे मानणारे तिचे काही मित्र, मी तिला फूस लावत आहे समजून मला मारायची संधी शोधत होते. फक्त माझ्या डोक्यावर बरेच वजनदार हात असल्याने त्यांनी कधी तशी हिंमत केली नाही.

जेव्हा मला हे समजले तेव्हा मला खरंच धक्का बसला. कारण कधी असा विचारही मनात आला नव्हता. ना तिच्या नजरेत तसे भाव दिसले होते. गंमत म्हणजे ती मला आडनावाने हाक मारायची. तश्या ईतर मुली मला नावाने हाक मारायच्या, पण ती माझी खास मैत्रीण असल्याने माझ्या ईतर मित्रांसारखेच मला आडनावाने हाक मारायची. आणि तसेच वागायची. त्यामुळे या नात्यात कोणाला वेगळा अँगल दिसू शकतो असे कधी डोक्यातही आले नव्हते.

पण कदाचित त्यांचीही चूक नव्हती..

वॅलेंटाईनचा दिवस होता. मी तिच्याच मदतीने माझ्या आवडत्या मुलीला फूल द्यायचा प्रयत्न केला. पण ती मुलगी माझ्याकडे बघून कितीही गोडगोड हसत असली तरी तितक्याच खट्याळपणे तिने माझे प्रेम नाकारले. माझ्या एकतर्फी प्रेमाला अर्धविराम लागला म्हणून मी उदास, हताश, निराश असा, तेच फूल कुस्करत कॉलेजच्या पायर्‍यांवर बसलेलो असताना, माझी ही मैत्रीण तिथे आली. माझ्या शेजारी बसली. आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत माझे सांत्वन करून लागली. एखाद्या मैत्रीणीने करावी अशीच ती कृती होती. हे त्या स्पर्शातून मला जाणवत होते, हे तिला स्वतःलाही ठाऊक होते, पण ते समजून घ्यावे ईतका आजूबाजूचा समाज प्रगल्भ नव्हता.

पण या सगळ्यात आमचे नाते मात्र फायनल ईयरसोबतच संपले. त्यानंतर मी कॅम्पसमधून जॉबला लागलो. तिनेही त्या कंपनीत ट्राय केलेले, पण ती सिलेक्ट झाली नव्हती. चार सहा महिन्यांनी जेव्हा आमच्याईथे वॅकेन्सी तयार झाली आणि मी तिची शिफारस करून तिला आमच्या कंपनीत जॉब मिळवून देऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा मी तिच्या मागे लागलो होतो. पण तिचा नकार ठाम राहिला.

पुढे वर्षभरात आमचे मार्ग वेगळे होत गेले. आणि मग समजले की ती लवकरच लग्न करणार आहे. तिनेच फोन केला होता. सारे काही ठरल्यावर मला कळवले होते. मुलगा आमच्याच कॉलेजचा होता. आमचा सिनिअर होता. तिचा फॅमिली फ्रेंड होता. कॉलेजला असताना आमच्यातील नात्याचा वेगळा अर्थ घेऊन तोच मला मारायला टपला होता. ईतकेच नाही तर माझ्या कंपनीत यायला तिने नकार द्यायचे कारणही हेच होते, की पुन्हा माझ्यासोबत कसलेही संबंध नको असे तिला घरून स्पष्टच सांगण्यात आले होते.

काही लोकांच्या मनात संशय होता. त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. याची किंमत आमच्यातील मैत्रीला चुकवावी लागली होती. हे तेव्हा फार त्रासदायक वाटले होते..

मी तिच्या लग्नालाही गेलो. चारचौघांच्या घोळक्यातील एक मित्र म्हणून. सुदैवाने तेव्हा माझ्या आयुष्यात एक गर्लफ्रेंड होती. आवर्जून तिलाही घेऊन गेलो. मुद्दाम तिच्या नवर्‍याला दाखवायला. माझी लाईफ सेट आहे मित्रा, तुमच्या संसारात काडी करायची माझी बिलकुल ईच्छा नाही. फक्त माझ्या मैत्रीणीच्या आयुष्यात आता टेंशन नको.

पण लग्न म्हटले की कुरबुरी आल्याच. वर्षभराने एकदा तिचा फोन आला. मला आनंद झाला. आश्चर्याचा धक्का बसला. पण ती हुंदके देत होती. अचानक तिला माझ्याकडे मन का मोकळे करावेसे वाटले माहीत नाही. कदाचित त्या लग्नाची किंमत म्हणून आपल्याला एक मित्र गमवावा लागला हे कुठेतरी तिच्याही मनात सलत असावे. त्या दिवशी तीच बोलत होती, आणि मी फक्त ऐकत होतो. याआधी फोनवर आमचे कधी पाच मिनिटांच्यावर बोलणे झाले नव्हते. गरजच पडली नव्हती. त्या दिवशी तासाभराचे बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला. मग पुन्हा काही वर्षे झाली. तो आलाच नाही.

पुढे कधीतरी तिचा एक शेवटचा मेसेज आला. हे कळवायला की ती कायमची परदेशी जातेय. अमेरीकावासी होतेय. त्यानंतर तिचा नंबर बदलला. तो ना मी मागितला, ना तिने स्वतःहून दिला. फेसबूक तिने केव्हाच उडवलेले. मी माझ्या संसारात व्यस्त होतो आणि ती जिवंत आहे की नाही हे देखील काही कॉमन फ्रेंडसमुळे समजत होते.

........... आणि अश्यात काही दिवसांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून व्हॉटसपवर मेसेज आला.

- कसा आहेस? हा नंबर सेव्ह कर. मी आठ दहा दिवसांसाठी भारतात आलेय. एकटीच आहे. पोरंही सोबत नाहीत. भेटायचे आहे आपल्याला. एक दिवस सुट्टी घेता येईल का येत्या आठवड्यात?

- एक दिवस काय, आठवड्याचीच टाकतो. पण सुट्टी घेऊन करणार काय?

- घूमेंगे फिरेंगे, खायेंगे पियेंगे, ऐश करेंगे और क्या...??

और क्या... एवढ्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा होत्या. आठवडाही पुरला नसता खरे तर.. पण मी सज्ज झालो भेटीला. तिला दिवसभर आमच्या कॉलेजच्या एरीयात फिरायचे होते. दादर माटुंग्याला हादडायचे होते. नॉस्टेल्जिक व्हायचे होते. मधल्या काळात ती काय कशी होती कल्पना नाही, पण तिच्या बोलण्यावरून जाणवले की तिला आपल्याच आयुष्यातून एक दिवस चोरून बिनधास्त जगायचे होते.

समोरची व्यक्ती जेव्हा भावनिक होते तेव्हा तिच्या आवाजात एक थरथर जाणवते. मला ते तिच्या मेसेजमधूनच कळले होते. आता माझे ध्येय एवढेच होते, काहीही करून तिचा हा दिवस अविस्मरणीय व्हावा..

-----------------------------------------------------

डोक्यावर कामाचा डोंगर होता. आणि मान डेडलाईनवर टांगली होती. पण मी दिवसाची रात्र केली. आणि रात्रीचा दिवस. चार दिवसांचे काम तीन दिवसात संपवले. आणि चौथ्या दिवशी सुट्टी मिळवली. खरं सांगतो, एवढा आनंद दिवाळी बोनस जमा झाल्याचा मेसेज वाचूनही झाला नव्हता.

मधल्या काळात दादर माटुंगा खादाडीचे पर्याय शोधू लागलो. दादरलाच माझी शाळा होती. त्यामुळे शाळेच्या मित्रांपेक्षा चांगले पर्याय कोण सुचवणार होते. व्हॉटसपग्रूपवर मेसेज टाकताच दणादण अशी लिस्ट तयार झाली.

सौराष्ट्र फरसाणवाला : समोसा, अमिरी खमन
श्री कृष्ण : बटाटा वडा, पोह्याचा पट्टी समोसा
सुरती फरसाण : कॉर्न रोल आणि सुरळीच्या वड्या
गोकुळदास : कचोरी, मटार करंजी
प्रकाश (मोठं ) : साबुदाणा वडा, पातळ भाजी
प्रकाश ( छोटं ) : बटाटा पुरी, दुधी वडी
आस्वाद : मिसळ, थालीपीठ
तृप्ती : भाजणीचे वडे, जेवण ताट
जिप्सी : मटार पॅटीस, फणस बिर्याणी
पणशीकर : पियूष
दुग्ध सागर : दुधी हलवा
फॅमिली स्टोअर : राधा कृष्ण बासुंदी
छेडा : अक्रोड हलवका]
पल्लवी स्टोअर : पिवळा ढोकळा, पांढरा ढोकळा
शिवसेना वडा कबुतरखाना : वडा
मठा चा वडावाला : मूग आणि पालक भजी
अन्नपुर्णा, रानडे रोड : चाट आयटम्स
मणी, शिवाजी पार्क : साऊथ ईंडियन आयटम्स
जिप्सी आणि चायनीज गार्डन : चायनीज खाद्यपदार्थ
ग्रीन चायनीज : मंचाऊ सूप आणि बीअर!
..
..
हुश्श !!!
वरची लिस्ट तिला फॉर्वर्ड केली. म्हटले हे मेनूकार्ड. हवे तिथे बोट ठेव. मी क्षणात तुला तिथे हजर करत जाईन.

पण दिवसभर नुसते खाणेपिणे शक्य नव्हते. फिरायचे कुठे तर फाईव्ह गार्डन, शिवाजी पार्क, सिद्धीविनायक, दादर चौपाटी, आणि हो, आपले कॉलेज. असे पर्याय तिला सुचवले. त्यावर तिने तेव्हाचे तेव्हा बघू म्हटले.

-----------------------------------------------------

भेटीचा दिवस उजाडला. कॉलजात असताना माझे जे शर्ट तिला सर्वाधिक आवडायचे त्याच रंगाचे शर्ट मी घालायचे ठरवले. तरी सकाळी उठल्यावर पहिला फोन मी तिलाच लावला. आणि तोच प्रश्न विचारला. जो तेव्हा विचारायचो. आज काय घालून येणार आहेस? आणि काय योगायोग. तिनेही तोच रंग सांगितला जो माझ्या शर्टचा होता. देव मानत नसलो तरी याला देवाचाच कौल समजून मी खुश झालो.

एम-ईंडीकेटर अ‍ॅपवरून तिच्या आणि माझ्या ट्रेनचे टाईमटेबल बघितले. आम्ही दोन वेगवेगळ्या दिशेने येणार होतो. तरी ट्रेन अश्या सिलेक्ट केल्या जेणेकरून एकाला दुसर्‍याची कमीत कमी वाट पहावी लागेल.

ठरल्याप्रमाणे मी तिच्या आठ मिनिटे आधी पोहोचलो. ती तिच्या वेळेनुसार आली. औपचारीक हसली आणि म्हणाली, फार वाट तर नाही ना बघावी लागली. मी लाजतच मान डोलावली, छे. एक ओळखीची भेटली होती. कॉलेजपासूनच आवडणारी. अशी बसस्टॉपवर अचानक भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. तेव्हाही क्यूट दिसायची. आता तर आणखी हॉट दिसू लागलीय. पण गधडे, तुझ्यामुळे तिला लवकर कटवावे लागले. तरी निघता निघता तिच्यासोबत एक सेल्फी काढला.. तिच्याही नकळत..

"मग जायचे ना तिच्यासोबतच.. मी फिरले असते एकटेच.." लटक्या रागाने ती म्हणाली, दाखव बघू सेल्फी.. कोण होती ती???

त्यावर मग मी हा खालचा फोटो दाखवला आणि तिचा एक छानसा धपाटा खाल्ला.

ना मी बदललो होतो.. ना ती.... ना आमच्यातील नाते Happy

१) मी आणि माझे कॉलेजातले क्रश.. हा त्या दिवशीचा पहिला फोटो.

01_0.jpg

.

पहिले नाश्त्याचे ठिकाण तिनेच ठरवले होते. तिला माटुंग्याला साऊथ ईंडियन नाश्ता करायचा होता. म्हणून मग महेश्वरी उद्यानच्या कॅफे मैसूरमध्ये शिरलो. एसीसाठी म्हणून वरच्या मजल्यावर गेलो. तर जवळपास सारे स्टेडीयम रिकामे दिसले. म्हटले चला छान झाले. आता निवांतपणे खात खात गप्पा मारता येतील. पण कसले काय. आज दिवसभर हादडायचे म्हणून सकाळी उठल्यापासून दोघे उपाशीच राहिलो होतो. आणि एव्हाना अकरा वाजले होते. दोघांच्या पोटात कावळे कोकलत होते. डोसे समोर येताच गप्पा राहिल्या बाजूला, आणि आधी त्यावर तुटून पडलो.

खादाडीचा हा पहिला फोटो तिथेच टिपला -

२) मैसूर डोसा आणि घी रोस्ट डोसा @ कॅफे मैसूर, महेश्वरी उद्यान/किंग्स सर्कल

02_0.jpg

३) सोबत फिल्टर काफी Happy

03_0.jpg

.

घटाघटा कॉफी पिताच बिल समोर हजर होते. आजही ती बडे बाप की बेटी होती. तिनेच पटकन बिल चुकवले आणि डिक्लेअर केले की आजचा सारा खर्च तीच करणार.

मी बर्रं म्हटले आणि आम्ही तिथून निघालो. पोट बरेपैकी भरले होते. काहीही खाण्याची मजा पुरेशी भूक लागल्यावरच. त्यामुळे आता चालून जिरवायचे ठरवले. पण तिचे चालणे म्हणजे काय, तर चला शॉपिंग करूया. कॉलेजात असतानाही तिने बायकांच्या सजावटीचे सामान घेण्यासाठी मला वणवण फिरवलेले. पण आता ती आपल्या पोरांसाठी गिफ्ट्स शोधत होती. माझेही हल्ली कुठेही गेले तरी तेच होते. आम्ही दोघेही बदललो होतो. पण एकसारखेच बदललो होतो.

पुढचा मोर्चा अर्थातच आमचे कॉलेज. कारण तिथेच जवळच तर होते. या टोकापासून त्या टोकापर्यंत. कुठेही न थांबता चालले तरी किमान पंधरा मिनिटांची पायपीट होती. पण त्या पंधरा मिनिटात पंधरा वर्षांपूर्वीचा काळ जसाच्या तसा नजरेसमोरून सरकत होता...

हे बघ आपले कँटीन आले.. आणि ही आपली जागा.. ईथेच आपण पडीक असायचो...

आणि ते बघ तिथे प्रॉडक्शन डिपार्टमेंट. तुझ्या ऐश्वर्याचे.. बघ आता अजून कोणी भेटतेय का?...

तिथून नको जाऊ यार, ते वर्कशॉप्स आता पुन्हा बघायची ईच्छा नाही माझी....

अच्छा, मग सर्व्हे लॅबच्या ईथून जाऊया का? तुझे आवडते सर दिसतील.. शी, कसली खुन्नस द्यायचे तुला. मला आजही आठवून हसायला येते...

ही स्टेअरकेस आठवते का? ईथेच तू तुझ्या ऐश्वर्याला गुलाबाचे फूल दिलेलेस. शेजारीच टॉयलेट होते. निदान जागा तरी नीट शोधायची रे, जर्रा म्हणून अक्कल नव्हती तुला...

हो, आणि मग तिथे स्टेप्सवर बसून मी रडत होतो, आणि तू मला थोपटत होतीस..

हो ना.. कसले वेडे होतो आपण...

ह्म्मम...

पुढे मग दोघेही शांत झालो.
हॉस्टेलच्या गेटने बाहेर पडताना मग मीच तिला आमचे हॉस्टेलचे किस्से आणि क्रिकेटच्या आठवणी सांगत होतो.

तिथून बाहेर पडल्यावर पुढे फाईव्ह गार्डन पसरले होते. तिथल्या कावळ्यांसोबत पोटातले कावळेही थोडे कोकलू लागले होते. त्यामुळे वेळ न दवडता लगेच टॅक्सीला हात दाखवला..

दादर, आयडीयल जवळील श्रीकृष्ण वडेवाला. अकरावी बारावीची दोन वर्षे तिथे शेजारीच क्लासला असल्याने जवळपास रोज न चुकता तिथला वडा खाणे व्हायचे. आता थोडे नॉस्टेल्जिक मला होऊ दे म्हटले. खादाडीचा दुसरा फोटो आम्ही तिथे टिपला.

४) बटाटावडा आणि पट्टी समोसा @ श्रीकृष्ण, आयडीयल - दादर

04_0.jpg

.

वडा समोसा खाता खाता माझे अकरा बारावीचे किस्से रंगले. काही तिला आधीही सांगितले होते, तर काही ती नव्याने ऐकत होती. आजचा दिवस केवळ गप्पांचा, फिरण्याचा आणि खाण्याचा होता. तो तसाच पुढे सरकत होता.

तिथून आता पुढचा मोर्चा कुठे वळवायचा म्हणून आम्ही लिस्ट बाहेर काढली आणि दादर मार्केटच्या गल्ल्यांमध्ये फिरू लागलो. दुपारचे एक वाजलेले, ऊन्ह डोक्यावर चढलेले. त्यामुळे काहीतरी थंड प्यावेसे वाटू लागले. पियुष होते वरच्या लिस्टीत, पण ईतके गोड दोघांनाही झेपणारे नव्हते. त्यामुळे लस्सीचा पर्याय निवडला. ईथे प्यायची का म्हणून मी एका चिंचोळ्या गल्लीकडे बोट दाखवले. तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले. पण गल्लीत डोकावून पाहताच तिला फिस्सकन हसू आले.

मधून जेमतेम एक माणूस जाईल अशी लांबलचक जागा, आणि दोन्ही बाजूला बाकड्यांवर रांगेत लस्सी पित बसलेली माणसे. ज्यात मग आम्हीही नंबर लावला. तिथे टंगळमंगळ न करता झटपट लस्सी पिऊन बाहेर पडायचे असल्याने त्या पंगतीचा फोटो काढायचा राहिला. पण जाताना तिथल्या पोराच्या हातातील लस्सीच्या ग्लासांचा फोटो तेवढा टिपला.

५) दादरची एक फेमस लस्सी @ जय कृष्ण डेअरी फार्म

05_0.jpg

.

लस्सी पिऊन बाहेर आलो आणि काय आश्चर्य! बन्सीवाले मुरली मनोहरने अपनी बन्सी बजा दी थी. अचानक वातावरणात बदल होत उन्हं गायब झाले आणि आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. एवढा वेळ उन्हात फिरून डोके गरगरू लागलेले. पण आता छान फिरायचे वातावरण निर्माण झाले तर लस्सीने पोट जड होऊन आम्हाला सुस्ती येऊ लागली होती. आणि बघता बघता अचानक तो आकाशातून कोसळू लागला. आमचा "प्लान बी" रेडीच होता. हेच तर ते मुंबईतले वातावरण जिथे समुद्रकिनारा गाठायचा असतो. पुन्हा टॅक्सीला हात दाखवला. मीटर पडले आणि आता आम्ही थंड वार्‍याशी स्पर्धा करत मरीनड्राईव्हकडे निघालो..

मरीनड्राईव्हला पोहोचेपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. पुर्ण कट्टा रिकामा होता. नाही म्हणायला काही जांबाज कबूतरांच्या जोड्या त्या मुसळधार पावसातही खरे प्रेम दाखवत एकाच छत्रीखाली गुटर्रगू करत बसली होती. पण आम्ही मात्र आडोसा शोधणेच शहाणपणाचे समजले.

आता आडोसा म्हणजेच खादाडी. जिथे आवडीचे खाणेही होईल, गप्पाही रंगतील, आणि समोर पसरलेला अथांग समुद्रही दिसेल अश्या तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही शिरलो. फारशी भूक नसल्याने हलकेफुलके खाण्यावरच भर दिला. पण त्यामुळे गप्पा छान झाल्या. हे दोघांत मिळून एवढे खाणेही आम्हाला तासभर पुरले Happy

६) ब्रुशेटो आणि वॉटरमेलन ज्यूस @ पिझ्झा बाय द बे, मरीनड्राईव्ह

06_0.jpg

.

ईथले बिल तेव्हाच चुकवले जेव्हा समोर पाऊस थांबला होता. छत्र्या मिटल्या होत्या. कट्टा सुकला होता. पुन्हा हळूहळू गजबजू लागला होता.
आता मात्र आम्ही बिलकुल वेळ न दवडता एक छानशी जागा पकडली.

मस्तपैकी मांडी घालून वा पाय पसरून बसता यावे ईतका ऐसपैस आणि लांबलचक पसरलेला कट्टा हिच खरी मरीनड्राईव्हची ओळख. त्यात असे वातावरण असेल तर क्या बात! समोरच्या वातावरणाचे दोनचार फोट टिपून झाल्यावरच आमच्या गप्पा सुरू झाल्या..

७, ८) स्वर्गाचीही ज्याच्याशी तुलना होऊ शकत नाही असे मरीनड्राईव्हचे पावसाळी वातावरण
07_0.jpg
.
08_0.jpg

.

अश्या वातावरणात, त्या कट्ट्यावर बसून या अँगलने सेल्फी काढावे असे ज्याला वाटणार नाही तो संतच!

९) एक संत नसलेला सामान्य माणूस Happy

09_0.jpg

.

आजूबाजूचे वातावरण आपल्या गप्पांवर फार प्रभाव टाकते. एवढा वेळ आम्ही जुन्या आठवणी उगाळत होतो. सध्या आमच्या लाईफमध्ये काय चालूय हे एकमेकांशी शेअर करत होतो. पण आता मनातल्या भावना समोरच्या खडकांतून खेकडे बाहेर यावेत तश्या झरझर बाहेर येऊ लागल्या.

ईतरांचे ईगो सांभाळताना आपण सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवला. त्यांच्या भावना जपताना आपण आपल्या भावनांना आवर घातला. हे आपले चूकले की आपण बरोबर केले? बरोबर असल्यास आपण यातून काय मिळवले? चुकले असल्यास आता तरी ती चूक सुधारायची का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायचा आम्ही प्रयत्न केला. या शोधाशोधीत ईतके वर्षं मनात साचलेले बरेच काही बाहेर आले आणि समोरच्या आठवणींना साद घालणार्‍या सागराला जाऊन मिळाले. या मंथनातून आणखी काही हाती लागो न लागो, मन हलके झाले आणि मैत्रीचे एक नाते पुन्हा नव्याने गवसले..

तास, दिडतास, दोन तास.. वेळेचा पत्ता नव्हता. वातावरण ईतका वेळ जैसे थे च होते. साधारण साडेचार वाजले असावेत. आम्ही पाय अखडले म्हणून शेवटी ऊठलो आणि आता थोडे चालूया म्हटले. आमच्यातले वातावरणही आता निवळले होते. हलक्याफुलक्या गप्पा सुरू झाल्या होत्या. त्याच नादात चालत चालत मरीनड्राईव्हच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो.

१०) तिथले आकाश वेगळेच भासत होते..

10_0.jpg

.

आकाशात हळूहळू पसरणारी सायंकाळची लाली पाहून चहाची तल्लफ आली. आणि ईथे तिथे शोधताच पहिल्याच नजरेत तो दिसला. त्या दिवशी असे योग एकामागोमाग एक जुळून येत होते. कदाचित वरतूनच कुठूनतरी या भेटीची प्लानिंग होत होती.

११) गरमागरम ईलायची चहा @ मरीन ड्राईव्ह कट्टा

11_0.jpg

.

१२) एवढ्या मोठ्या विशाल सागरात, जिथे आकाशपाणी एक होते त्या क्षितिजावर एखाददुसरीच नाव दिसत होती. त्या दिवशी मरीनड्राईव्हच्या गर्दीतही आम्ही स्वतःला असेच बघत होतो.

12_0.jpg

.

तिला अचानक माझे काही फोटो काढावेसे वाटले. मला स्वतःचे फोटो काढून घ्यायची प्रचंड आवड आहे हे तिला माहीत होते. पण हल्ली स्वतःचे नाही तर मुलांचेच काढले जातात असे मी तिला गप्पांच्या ओघात म्हटले होते. त्यामुळे आज तिने मला खुश करायचे ठरवले. दोनतीन फोटो झाल्यावर मीच लाजून बस म्हटले. हा त्यातलाच तिला आवडलेला. यानंतर पुढची पाच मिनिटे तिची फोटोचे क्रेडीट घ्यायची धडपड चालू होती. पण मी चांगल्या माणसांचे फोटो चांगलेच येतात म्हणून तिला दाद देत नव्हतो.

१३) मरीन ड्राईव्हच्या अगदी शेवटच्या टोकावर ...

13_0.jpg

.

आता पुन्हा भूक लागली होती. आजचा दिवस हा असाच होता. खाणेपिणे, गप्पा मारणे आणि फिरणे.. आणि अजूनही काही शिल्लक होता. आणि हो, तिची खरेदीही अजून शिल्लक होती. म्हणून तिथून आम्ही आमचा मोर्चा गेटवे ऑफ ईंडियाकडे वळवला.

तिथे मात्र तिने मुलांसाठी नाही तर स्वतःसाठी काही घेतले. दिवस मावळता मावळता ती स्वतःसाठीही विचार करू लागली होती हे बघून मलाच छान वाटले. त्यामुळे न कंटाळता त्या गर्दीत मी तिच्या मागे मागे फिरत होतो.

समोरच दिल्ली दरबार होते. तो आमच्या खादाडीचा लास्ट स्टॉप होता. त्यानंतर पुन्हा आमचे मार्ग वेगळे होणार होते. पुन्हा कधी एक होतील याची कल्पना नव्हती. त्यामुळे थोडा वेळ अजून शिल्लक आहे तर गेटवे ऑफ ईंडियालाही फिरून येऊया म्हटले.

तिथेही तिने माझा एक फोटो काढला. एक आम्ही दोघांचा सोबत काढून घेतला. पण तिने आपले सोलो फोटो काढायचे मात्र टाळले. का, ते तिलाच ठाऊक. कदाचित अजूनही ती मला पुर्ण उलगडली नव्हती.

हा माझा सोलो फोटो. का माहीत नाही, पण माझे आजवर ईतके छान फोटो कधीच आले नव्हते असे मला राहून राहून वाटत होते. कदाचित फोटो आपल्या चेहर्‍याचा वा शरीराचाच नाही, तर मूडचाही निघत असावा..

१४) गेट वे ऑफ ईंडिया समोर ...

14_0.jpg

.

ईथून मग थेट दिल्ली दरबार गाठले. एव्हाना कडकडून भूक लागली होती. दोघांचेही आवडते असे नॉनवेज आम्ही ऑर्डर केले.

हा त्या दिवसाच्या खादाडीचा शेवटचा फोटो !

१५, १६) सीग कबाब, चिकन पटियाला, बटर नान/बटर रोटी आणि स्पेशल फालूदा @ दिल्ली दरबार, गेट वे ऑफ ईंडिया

15_0.jpg
.
16_0.jpg

.

मधल्या काळात आपापल्या घरी फोनाफोनी झाली. पण जेवण समोर येताच दोघेही त्यावर तुटून पडलो. गप्पांनी कधी मन भरत नाही असे म्हणतात. पण आमचे त्या दिवशीपुरता भरले होते.

किंवा कदाचित असेही असावे...
निरोप घेताना शब्द जड झाले असावेत. काय बोलावे हे दोघांनाही सुचत नसावे.

काही हरकत नाही. जे तेव्हा बोलायला सुचले नाही. वा जे मन तेव्हा धजले नाही. ते आता लिहितो...

मैत्रिणी,
तुझ्यासोबत असा एखादा दिवस पुन्हा पुन्हा जगायला खूप आवडेल.
तरी आयुष्यात पुन्हा असा दिवस न आल्यास हाच आयुष्यभरासाठी पुरेल Happy

-----------------------------------------------------

तळटीप - लेखाचा आत्मा प्रामाणिक आहे. पण काही तपशील बदलले आहेत. किंबहुना आम्हाला ओळखणार्‍यांनी तिला ओळखू नये म्हणून मुद्दाम गोंधळवून टाकणारे केले आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा लेख वाचला तरी त्यातून कुठलेही अंदाज बांधायचा प्रयत्न करू नका. ते तुम्हाला हमखास चुकीच्या मुलीकडे घेऊन जातील Happy

तरीही हा लेख मला लिहायचाच होता. कारण तसे मी त्या दिवशी तिला वचन दिले होते. या आठवणी जरूर लिहून काढेन..

धन्यवाद,
तुमचाच ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ममो ताई.. काही जण असे तिथून बसमधून क्लिक केलेला फोटो टाकतात तेव्हा त्यांचा असाच हेवा वाटतो...

हा फोटोही सिग्नलला रस्ता क्रॉस करायच्या आधी पोरांसोबत असल्याने घाईतच काढला आहे.
गेल्याच महिन्यात इथे गेलेलो तेव्हा त्यांना समुद्राचे फार कौतुक वाटले नव्हते. पण आता गाडीतून उतरताच समोरचा नजारा बघताच ते चेकाळले. अगदी स्वर्गसुख. पूर्ण न्हाऊन आलो पावसात Happy

Pages