पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - व्हिएतनामी फ्रेश स्प्रिंग रोल्स - अमितव

Submitted by अमितव on 3 September, 2022 - 15:52
व्हिएतनामी फ्रेश स्प्रिंग रोल्स
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. गोल राईस पेपर: कुठल्याही एशिअन स्टोअर/ ग्रोसरी स्टोर मध्ये एशिअन पदार्थ मिळतात त्या रांगेत सहज मिळेल. भारतातही मिळावा. (पांढरा रंग)
२. आवडीच्या भाज्या बारिक लांब काप करुन. यात क्रंची भाज्या छान लागतात. मी आज करताना काकडी, गाजर, कोबी आणि रंगीत सिमला मिरची आणि अ‍ॅवकाडो काप करुन घेतले आहेत. यात आवडी प्रमाणे पुदिना, कोथिंबिर, बेझल ची पाने चिरुन छान स्वाद येतो. क्रंची सॅलडचं एक पानही छान लागतं. स्प्रिंग मिक्स असेल तर ते ही घालू शकता. (हिरवा आणि केशरी रंग)
३. राईस नूडल्स (आज घरात न्हवते त्यामुळे वगळले आहेत. घाला नका घालू फार फरक पडत नाही. )
spring-roll-tayari-1.jpgपीनट डिप करिता:
पीनट बटर ३-४ टेबल स्पून
पांढरं व्हिनेगर : १ टे. स्पू.
अर्ध्या लिंबाचा रस
सोय सॉस: १.५ टेबल स्पून
तीळ : १ टी स्पून
साखरः १.५ टे स्पून.
थोडं आलं किसून
मीठ : हवं असेल तर. सोय सॉस मध्ये असतं, त्यामुळे घातलंत तर जपुन.
चिली ऑईलः १ टे. स्पून
थोडं फ्लेवर साठी हवं असेल तर ऑलिव्ह ऑईल.
फिश सॉसः आवडत असेल, घरात असेल तर. स्किप करू शकता. मी घातलेला नाही.
नारळाचं दूधः १ टे स्पून. हे ही मी आज घातलेलं नाही. घातलं तर रंग जरा उजळतो आणि क्रिमी टेक्श्चर येतं.

क्रमवार पाककृती: 

१. पीनट डिप मधले सगळे जिन्नस एक मोठ्या मायक्रोवेव्ह सेफ बोल मध्ये एकत्र करा. पीनट बटर किंचित मऊ व्ह्यायला १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह करा. डिप म्हणून घट्ट वाटलं तर चार थेंब पाणी घालून सगळं एकत्र करुन घ्या. स्प्रिंग रोल्स मधली सगळी मजा या डिप मध्येच आहे. त्यामुळे हे डिप चांगलं तिखट, गोड, आंबट, क्रिमी लागलं पाहिजे. त्याप्रमाणे वरील पदार्थांचं प्रमाण कमी जास्त करा.

२. आता एका पसरट प्लेट मध्ये थोडं पाणी घ्या. ह्या पाण्यात राईस पेपर बुडवायचे आहेत म्हणजे ते नरम पडतील आणि रोल वळता येतील. राईस पेपर यात बुडवला की एका बाजुला २ सेकंद ठेवा. मग उलटा करा आणि परत फक्त २ सेकंदच थांबा. तो कागद हाताला अजुनही कडकच लागेल तेव्हाच तो बाहेर काढा.
spring-roll-process.jpg

३. तो अर्धवट नरम पडलेला राईस पेपर कटिंग बोर्डवर ठेवा. आता त्यावर वरच्या भाज्या आणि राईस नूडल्स थोड्या थोड्या घाला. याचा रोल करायचा आहे त्यामुळे भाज्या मध्यभागी न घालता मध्याच्या एका बाजुला घाला. (आठवा: बरीटो करताना कशा घालतात?)

४. आता याचा बरीटो समजुन गुंडाळी करायची आहे. आधी दोन्ही साईड ने भाज्या झाका मग लहान बाजू दुमडुन जितकी घट्ट करायला जमेल तशी गुंडाळी करा.

५. झाला फ्रेश स्प्रिंग रोल तयार. डिप मध्ये बुडवुन फस्त करा.

spring-roll-final1.jpg
*
spring-roll-final2.jpg
एक खाल्लात की खातच रहावसं वाटतं. त्यामुळे एकदम बनवुन ठेवा. सगळ्या गोष्टी मध्ये ठेवुन 'बिल्ड युअर ओन रोल' करायला पण मजा येते.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके कमीच.
अधिक टिपा: 

१. प्रोटिन साठी टोफू, शिजवलेले श्रिंप, पनीर घालू शकता.
२. भाज्या ज्या असतील त्या चालुन जातात.
३. राईस पेपर पाण्यात बुडवुन मऊ करताना तो पूर्ण मऊ व्हायच्या आधीच भाज्या भरायला घ्या. कारण भाज्या भरुन होईपर्यंत तो आणखी मऊ होतो. आधीच खूप जास्त नरम पडला तर मग गुंडाळी करताना नीट हाताळता येत नाही. त्रास होतो.

माहितीचा स्रोत: 
व्हिएतनामी जेवण खूप आवडतं. त्यामुळे ऑनलाईन घेतलेला शोध.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कच्च्या भाज्या बोअर वाटत असतील तर अमितवने वर दिलेल्या टिप्स आणि सोबत आवडीचे रोस्टेड सीड्स टाकले मूठभर तर अजून क्रंची लागेल बोअर वाटणार नाही असा माझा अनुभव. ट्राय करून बघा.

धन्यवाद!
नानबा, तांदुळाच्या सालपापड्या पाण्यात भिजवल्या की हाताळता येतील अशा मऊ पडतात का? मला वाटतं त्या इतक्या पातळ नसतात आणि मऊ पडायला खूप वेळ लागेल. शिवाय त्यांचा आकार खूप लहान बघितलेला आहे. म्हणजे अशा भाज्याभरुन गुंडाळी करता येईल इतका मोठा नसेल तर रोल नाही जमणार करायला. पण प्रयोग करुन बघू शकता.

सालपापड्या भाज्या होल्ड करणार नाहीत. राइस पेपर स्टिकी राइसचा असतो, त्यामुळे मऊ झाला तरी भाज्यांचं वजन पेलून एकसंध राहातो.

आज हे रोल्स बनवण्याची जय्यत तयारी केली.
Screenshot_20220913-145522_Gallery.jpg(याशिवाय टोफू वापरला.)

आधी डिप बनवले. चिनी ऑईल आणायला विरसलो होतो मग चिली फ्लेक्स आणि ऑलिव्ह ऑईल वर काम निभावले.

भाज्या जास्त होत असल्याने शेवटी पिवळं झुकिनी घेतलं नाही.
Screenshot_20220913-145558_Gallery.jpg

कच्च्या भाज्या म्हटल्यावर बायको जरा साशंक होती. मग दोन चमचे तहीनी एक एक मूठ कोथिंबीर, पुदिना, दोन ओले ओमानी खजूर, मिरपूड, लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून ड्रेसिंग बनवले भाज्यांवर वापरायला, आणि अरुगुलावर बाल्सामिक व्हिनेगर शिंपडले.

सर्व तयारी मनासारखी झाल्यावर खोलगट ताटात पाणी घेऊन, आणि रोल्स बनवायला परात उलटी ठेवून राईस पेपरचे पाकीट उघडले आणि हाय रे दय्या!
सगळ्या राईस पेपर्सना मधोमध ३-४ इंच लांबीचा तडा गेला होता!
Zepto वर मिळत नाही माहीत असूनही एकदा zepto वर बघितले इतक्यात मिळायला लागलाय का. पण नव्हता.

मग दोन राईस पेपर्स त्यांच्या तडा काटकोनात छेदतील असे एकावर एक मांडून जुगाड केला. रोल्स कसे बसे बनले त्यातील फोटो काढण्यालायक हे दोनच.
Screenshot_20220913-145619_Gallery.jpg
एकूण चार रोल्स असे कसे बसे वळवता आले. इतर राईस पेपर्स अजून जास्त तडकले होते. उरलेल्या भाज्यांवर ड्रेसिंग आणि डिप घालून सलाड प्रमाणे खाल्ले.
मस्त चव आहे. जमलेले रोल्स आणि मग सलाड दोन्ही एंजॉय केले.
कच्च्या भाज्याच (त्यावर ड्रेसिंग/चटणी घालून अथवा न घालून) छान क्रंची लागतात हे पटले अमितव. वाफवल्या/फ्राय वगैरे केल्या तर ती मजा येणार नाही.

रोल्स एकदम आवडले आहेत, नियमित करण्यात येतील.

बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा दुकानात दिसले म्हणून काय आहे करून बघावे असा विचार करून राईस पेपर चे पाकीट आणले होते. त्यावेळी मला हे नंतर वाफवावे किंवा तळावे लागतात असे वाटलं होते आधी. त्याच्यावरच्या सूचना वाचून मग केले होते रोल. बहूतेक काकडी, गाजर आणि अजून एखादी भाजी वापरली होती कच्चीच. पण यासोबत खायला वेगळे डिप असते हे नव्हते माहिती. त्यावेळी मला ते धड वळता आले नव्हते रोल. तेवढं पाकिट कसेबसे संपवले होते आम्ही.

नंतर कधी दिसले पण नाहीत दुकानात. इथे रेसिपी आल्यानंतर माझ्या नेहेमीच्या ग्रोसदीर दुकानात दिसायला लागले राईस पेपर अचानक. मग आणलेच शेवटी.
आज करतेय रोल आणि डिप.

Pages