भयकथा !..

Submitted by Sujata Siddha on 17 August, 2022 - 03:49

भयकथा !..

“ बायजी sssss “मध्यरात्री सुगंधाचा ओरडण्याचा आवाज ऐकून अनुराधाबाई लगबगीने उठून तिच्या खोलीत गेल्या आणि आधी लाईट चालू केली त्याबरोबर खोलीत एकदम प्रकाश पसरला , त्यांनी बेडकडे पाहिलं तर सुगंधा उठून बसली होती ,तिचा संपूर्ण चेहेरा घामाने डबडबला होता ,मग जवळ जाऊन आपल्या पदराने तिचा घाम पुसत टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग उचलून त्यातलं पाणी त्यांनी तिला पाजलं , सुगंधा जरा शांत झाली आणि तशीच पाय दुमडून त्यांच्या मांडीवर झोपून गेली , त्या तिला थोपटत राहिल्या.
गावाबाहेर एकाकी असलेल्या त्या अवाढव्य वाड्यात ‘अभिक धोपेश्वरकर ‘ एकटेच रहात होते . जवळचं कोणी नातेवाईक नव्हतं , की लग्न केलं नव्हतं , तसे दिसायला ते वाईट नव्हते , चांगले उंचपुरे ,खानदानी , गोरेपान आणि रूबाबदार होते ,पण त्यांच्या निळसर घाऱ्या डोळ्यात काहीशी हिंस्त्र झाक होती ,चेहेऱ्यावर सतत गंभीर भाव , आणि कधीच कुणाशी न बोलणे , यामुळे त्यांच्या भोवती एक गूढ वलय पसरलेलं होतं . न बोलणाऱ्या माणसाबरोबर जरा दाबकायला होतं ना !.. अनुराधाबाई या अभिक धोपेश्वरकरांच्या लांबच्या नातेवाईक होत्या , गावाकडे आगरवाडीला असताना नवरा गेल्यावर त्यांचे खाण्यापिण्याचेही फार हाल होऊ लागले तेव्हा आपला दूरच्या नात्यातला एक भाऊ पुण्याजवळच्या एका गावात रहातो, या एवढ्याच माहितीच्या आधारावर त्या धोपेश्वरकरांच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या . आणि मग कायमच्या ईथेच राहू लागल्या.
बरोब्बर १८ वर्षांपूर्वी असेच कामासाठी म्हणून आफ्रिकेला गेलेले ,धोपेश्वरकर परत येताना फ्लॅनेल मध्ये गुंडाळलेलं ,गुलाबी नखांच्या मुठी चोखत पहुडलेलं ,गोऱ्यापान रंगाचं ईवलस मुटकुळं घेऊन आले .
( हो बरोबर वाचलं तुम्ही , आफ्रिकेला जाऊनही गोऱ्या रंगाचंच ) घरात आल्या आल्या त्यांनी ते बाळ ,अनुराधा बाईंच्या हातात सोपवलं आणि ते वरच्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत निघून गेले .अनुराधाबाईंना अर्थातच बरेच प्रश्न पडणं साहजिकच होतं पण ईतक्या वर्षात त्यांच्यात आणि धोपेश्वरकरांच्यात काहीही संवाद नव्हता ,आताही त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतील याची खात्री नव्हती त्यामुळे त्यांनी निमूट पणे ते बाळ हातात घेतलं आणि त्या दिवसापासून , त्याच त्या पिटुकलीची आई-बाप , भाऊ बहीण सगळं झाल्या ,नावही त्यांनीच ठेवलं , सुगंधा !..
सुगंधाला गाढ झोप लागली असं पाहून त्यांनी आपल्या मांडीवरचं तिचं डोकं अलगद बाजूला केलं आणि त्याखाली मऊ फराची उशी ठेऊन त्या उठल्या , लाईट बंद करून हळूच दार लोटून खाली निघाल्या ,चार-पाच पायऱ्या उतरून झाल्यावर सहजच त्यांची नजर समोर गेली ,आणि त्या तिथेच थबकल्या ! समोरच्या पॅसेज मध्ये कठडयाला रेलून कुणी तरी उभं होतं ,माणूस म्हणावं तर किती विचित्र पातळसा आकार होता आणि एवढ्या अंधारातही त्यांना ठळक पणे दिसले ते त्याचे मोठे लांबट डोळे, मगर किंवा तत्सम प्राण्यांसारखे . ‘अभिक ‘ तर नाहीये घरात , मग ...मग .. त्यांना घाम फुटला , परत वर जाऊन हटकावं या विचारांनी त्यांनी पायऱ्या चढायला सुरूवात केली , पण लटपटत्या पायांनी त्यांना वर जाता येईना , समोरच्या दृष्यावर नजर ठेवत त्या कठडयाच्या आधाराने पायऱ्या चढायचा प्रयत्न करू लागल्या , तेवढ्यात ते जे कोणी उभं होतं ते अलगद तरंगत खोलीत गेलं . कागदी बाहुली वाऱ्यावर तरंगत जाताना जशी दिसेल तसं दिसलं ते . ती खोली धोपेश्वरकरांची होती . ते दृष्य पाहून अनुराधाबाईंनी मट्कन जिन्यातच बसून घेतलं आणि अतीव भीतीने त्या तिथेच लुडकल्या.
आज सुगंधाचा १८ वा वाढदिवस होता , ज्या दिवशी ती घरात आली त्या दिवशी ४ मे ही तारीख होती , तोच तिचा वाढदिवस असं मानून अनुराधाबाई दरवर्षी तिचा वाढदिवस ४ मे ला करत असत . सकाळी सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांचा उबदार रेशमी स्पर्श गालाला जाणवला तशी सुगंधा जागी झाली , खिडकीतून डोकावणाऱ्या जाईच्या फुलांनी आणि गालावरून मायेने हात फिरवणऱ्या कोवळ्या सौरकिरणांनी तिला जणू कानात सांगितलं , “अगं उठ ना ,आज तुझा वाढदिवस आहे “ , सुगंधाने तिचे स्फटिकासारखे नितळ आणि आणि पारदर्शी डोळे उघडले. आळोखे पिळोखे देत ती उठली त्यावेळेस काल रात्री पडलेल्या स्वप्नाचा तिला पूर्णपणे विसर पडला होता . तोंड धुणं वैगेरे आवरून चहासाठी जिना उतरून ती खाली येऊ लागली , तितक्यात पायरीवर मुटुकुळं करून पडलेल्या अनुराधाबाई तिला दिसल्या , “बायजी ? , बायजी , उठा ,तुम्ही ईथे कशा काय ? “ या वेळेला तर त्या स्वयंपाक घरात तिच्या चहा नाश्त्याची ची तयारी करत असायच्या . तिच्या हलवण्याने अनुराधाबाई जाग्या झाल्या , आणि लगेच रात्रीची घटना आठवून त्या भयभीत नजरेने एकदा सुगंधा कडे आणि एकदा समोरच्या मोकळ्या कठड्याकडे बघू लागल्या , सुगंधा देखील मग गोंधळून त्या ज्या दिशेला बघत होत्या त्या दिशेला बघू लागली , आणि त्याच वेळी खोलीचं दार उघडून नाईट ड्रेस घातलेले धोपेश्वरकर बाहेर आले . त्यांना बघितल्याबरोबर सुगंधा खाली मन घालून जिना उतरायला लागली .
“थांब सुगंधा !.. आज तुझा वाढदिवस नाही का ? अभिष्टचिंतन !.. “ वाटलं त्यापेक्षा बराच दमदार आवाज होता त्यांचा . मानेनेच हो म्हणून,किंचित हसून ती अनुराधाबाईंबरोबर खाली उतरून गेली . हे कोण आहेत , आपल्याला अधूनमधून का दिसतात , कधीच बोलत का नाहीत , अशांसारखे विचार तिला कधीतरी लहानपणी चिकार वेळा पडून गेले होते , पण त्यांचे ते हिंस्त्र झाक असलेले निळे डोळे बघूनच त्यांच्याबद्दलच्या कुतूहलाची जागा भीतीने कधी घेतली हे तिला देखील कळलं नाही , मग तिची शिकवणी घ्यायला येणारे, तिच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठे असणारे एक तरुण शिक्षक कमलेश ,अनुराधा बाई ,आणि तिचं कासव म्हणजे तिचा ‘कोबे ‘ यांच्यापुरतंच तिचं जग तिने मर्यादित ठेवलं .
तिला जर कोणी विचारलं असतं आज वाढदिवस कसा सेलिब्रेट करणार , तर तिला ते हि सांगता आलं नसतं , अनुराधाबाई करतील ते आणि तेवढंच , आजच्या दिवशी अनुराधा बाई तिला नवीन कपडे शिवायच्या , गोडाचा शिरा, कोथिंबीरीच्या वड्या , सायीचं घट्ट दही घातलेली कच्च्या केळ्याची कोशिंबीर ,भाजणीचे वडे , गुळाच्या कापण्या असे तिच्या आवडीचे अनेक पदार्थ करायच्या, संध्याकाळी औक्षण करायच्या आणि आपल्या दोन्ही हातांनी तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवून कडकडा बोटं मोडायच्या .

धोपेश्वरकर सकाळी नुसते शुभेच्छा देऊन थांबले नाहीत तर , दुपारी जेवायला ही थांबले होते. त्यांच्या या वागण्याचं अनुराधाबाईंनाही नवल वाटत होतं पण एकाअर्थी ते आज घरात आहेत हे बरं झालं, त्यांना रात्रीचा प्रकार कानावर घातला पाहिजे असं अनुराधाबाईंना वाटून गेलं . सुगंधा ला मात्र धोपेश्वरकरांनी असं शेजारी जेवायला बसणं नकोसं झालं , त्यामुळे तिला काही जेवण गेलं नाही . ती लगेच उठली ,ते पाहून धोपेश्वरकरांच्या कपाळावर बारीक अठी उमटली आणि ते पानात अन्न चिवडत राहिले त्यावरून अनुराधाबाईंना समजलं की त्यांना ते आवडलं नाहीये .मग सुगंधा बद्दल त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून काही सांगायला त्यां त्यांच्या टेबलजवळ गेल्या तेवढ्यात धोपेश्वरकरांनी मान वर केली , आपले निळसर घारे डोळे अनुराधाबाईं वर रोखून घोगऱ्या आवाजात ते म्हणाले ‘सुगंधाला शृंगारून आज रात्री माझ्या रूम मध्ये पाठवा “ बोलताना त्यांच्या गर्द गुलाबी हिरड्या ईतक्या दिसत होत्या की त्यांच्या त्या वाक्याने अनुराधाबाईंना शिसारी आली की त्या हिरड्या दिसल्या मुळे हे सांगणं कठीण होतं . धोपेश्वरकर उठून निघून गेले . ईकडे अनुराधाबाईना त्यांच्या या मागणीने धक्का बसला , आपल्या मुलीच्या वयाच्या असणाऱ्या सुगंधाबद्दल असा विचार करण्याएवढे ते घृणास्पद असतील असं त्यांना वाटलं नव्हतं. किचन ओटा आवरता आवरता त्या संतापाने धुमसू लागल्या ,माझा भाऊ असूनही किती निर्ल्लज पणे सांगतो हा मला , मी जरी तिची आई नसले तरी आईच्याच वात्सल्याने तिला आजपर्यंत वाढवलंय . याला याचं काहीच भान नसावं का ? मला काय वाटेल याचाही विचार याने केला नसेल ? मी आश्रित आहे म्हणून ? पण मी याच्या आश्रयाला आले म्हणून काय झालं , हि एवढी भली मोठी वास्तू माझ्याच तर जीवावर टाकून जातो ना वर्षानुवर्षे ?लाज -लज्जा सगळी गुंडाळून ठेवली याने ,मी तरी आता याचा विचार कशाला करू ? कोणाची पोर आहे देव जाणे , मुठी सुद्धा उघडल्या नव्हत्या पोरीच्या तेव्हापासून या घरात वावरतेय ती ते काय याचा घास व्हायला ? मुळीच नाही , मी असेपर्यंत तरी ते होऊ देणार नाही . स्वयंपाक घरातलं काम आटोपून झाल्यावर ,मनाशी काही एक निश्चय करून त्या सुगंधाच्या खोलीत आल्या , येताना तिचं ताट भरून आणलं होतं त्यांनी. मग ती जेवेपर्यंत , एका पिशवीत तिचे थोडे कपडे भरले , कोबे ला एका वेगळ्या पिशवीत ठेवलं, त्या पिशवीला एक छोटं छिद्र पाडायला त्या विसरल्या नाहीत . मग परत खाली स्वतः:च्या खोलीत गेल्या ,वाचवून ठेवलेले काही पैसे , गुरू दत्तात्रेयांची तसवीर ,त्यांचे स्वतः:चे कपडे , जपाची माळ आणि थोडं खाण्याचं कोरडं साहित्य घेऊन त्या पुन्हा तिच्या खोलीत आल्या .’काय झालं बायजी ? तुम्ही कसली तयारी करताय ?, त्यावर हातानेच त्यांनी तिला गप्प राहण्याची खूण केली . दुपारी एकदा त्या बाहेर जाऊन आल्या , कुठे ते त्यांनी सुगंधाला सांगितलं नाही . मग संध्याकाळ व्हायची वाट पाहत त्या तिच्याच खोलीत थांबल्या ,अंधार पडताच सुगंधाला घेऊन त्या मागच्या दाराने निघाल्या .काहीतरी धोका आहे हे एव्हाना आता सुगंधा ला कळले होते त्यामुळे तीही आणखी काही चौकशा न करता त्यांच्या मागून निघाली ,मागच्या अंगणातले दार गेली कित्येक वर्षे बंद होते, उघडताना आवाज होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत अंधारात त्या निघाल्या . दाराच्या बाहेर खालच्या बाजूला ,एक छोटी चौकट होती , त्याच्या तळाशी असलेल्या भुयारा चा उपयोग करून तिकडून निसटायचे असे त्यांनी ठरवले होते , हे भुयार आधी कधी वापरले नसले तरी ते थेट गावच्या वेशीपाशी कुलकर्ण्यांच्या वाड्याच्या पलीकडे असणाऱ्या त्यांच्या वावरात उघडते हे त्यांना ऐकून माहिती होते , कित्येक वर्ष ते भुयार बंद असेल ,त्याचा दरवाजा जाम झाला असेल तर तो उघडून ठेवला पाहिजे म्हणून दुपारी अभिक नाहीयेत याची खात्री करून त्या ईकडे आल्या होत्या , भरपूर खटपट करून , वंगण वैगेरे टाकून अखेरीस ते उघडण्यात त्यांनी यश मिळवले होते , मग ते तसेच किलकिले ठेऊन आल्या होत्या त्या . आत काही विषारी किडे ,घुशी , मोठाले उंदीर किंवा साप यांच्यासारख्या जनावरांच्या तावडीत सापडण्याचाही धोका होताच की पण आत्ता त्यांच्यापुढे हाच एक पर्याय होता .कुबट वास येत असला तरी नशिबाने भुयार आतून भक्कम अवस्थेत होतं , बॅटरी लावून , सरपटत त्या पुढे निघाल्या स्वतः:च्या चपळतेच त्यांनाच नवल वाटलं , एवढं दिव्य करत असताना ते भुयार पलीकडच्या बाजूनेही उघडं असलं पाहिजे , याची स्वतः:ला खात्री देत त्या पुढे जात होत्या . सुगंधाही त्यांच्या मागून येत होती ,अर्ध्या एक तासाने कुठलाही अडथळा न येता जेव्हा त्या भुयाराच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना हायसं वाटलं . एक सुटकेचा श्वास टाकून आपल्या मागे आलेल्या सुगंधाला बघायला त्या वळल्या, आणि दचकल्याच , त्यांच्या मागे कमरेवर हात ठेऊन धोपेश्वरकर उभे होते ,आणि त्या पुन्हा सुंगंधाच्याच खोलीत उभ्या होत्या ,!
“अनुराधा ही वास्तू , माझ्या अखत्यारीत आहे ,अगदी वर्षानुवर्षे वाड्याची वीट न वीट माझ्या मर्जीनुसार चालते ,मला न सांगता काहीही केलंस तरी ते माझ्यापर्यंत पोहोचेल , लक्षात ठेव , माझ्याशी बेईमानी करण्याचा प्रयत्न मनात देखील करू नकोस , मी आत्ता निघतोय, पण रात्री परत येणार आहे , आणि आज रात्री सुगंधा माझ्या खोलीत आली पाहिजे .. नाहीतर पस्तावशील !.. “ डोळ्यातून ठिणग्या उडवत धोपेश्वरकर तरातरा खोलीबाहेर निघून गेले . बिचाऱ्या अनुराधाबाई थिजलेल्या अवस्थेत मट्कन खाली बसल्या . सुगंधा त्यांना बिलगून बसली , म्लान झालेल्या तिच्या चेहेऱ्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला, खरच माझ्या हे लक्षात कसं आलं नाही ,की हा सगळीकडे नजर ठेऊन असेल , हा चेटक्या आहे असं याच्याबद्दल सगळे कुजबुजत असतात , पण आपण कधी ते मनावर घेतलं नाही , ते चुकलंच . आता या चांडाळाच्या तावडीतून माझ्या पोरीची सुटका कशी करू? तीन-चार तासच काय ते त्यांच्या हातात होते, त्याआधीच काहीतरी केलं पाहिजे . या आधी त्या बंगल्याबद्दल बऱ्याच लोकांना त्यांनी बोलताना ऐकलं होतं . कित्येक वेळा अभिकच्या खोलीतून अगम्य भाषेत मंत्रांचे स्वरही ऐकू यायचे पण स्वतः: त्यांना असे वेडे विद्रे अनुभव कधीच आले नव्हते ,त्यामुळे लोक काहीही बोलत असतात असं त्यांना वाटे , फक्त कालची रात्र त्याला अपवाद होती . परत मनाशी काही एक निश्चय करून त्या उठल्या , सुगंधाला खाली आपल्या खोलीत नेऊन दत्तगुरूंच्या तसबिरीसमोर बसवलं . पूर्वी एकदा -दोनदा रात्री त्या दत्तगुरुंसमोर अशाच जप करायला बसल्या असताना धोपेश्वरकर आले होते आणि विंचू चावल्यासारखा वाकडा-तिकडा चेहेरा दचकून मागे सरकले होते , त्यानंतर अनुराधाबाईंच्या खोलीत पाऊल ठेवायचं त्यांनी कधी धाडस केलं नव्हतं . त्यामुळे अनुराधाबाईंच्या भाबड्या मनाची खात्री झाली होती की ही खोली पवित्र आहे, कितीही क्रूर असले तरी धोपेश्वरकर तिला ईथे येऊन काहीही करू शकत नाहीत . आपली रोजची जपाची माळ तिच्या गळ्यात घालून त्या उठल्या , खोलीला कुलूप घालून चावी स्वत:च्या कनवटीला लावली .
“बायजी कुठे चाललात ? लवकर परत याल ना ? “ केविलवाणा चेहेरा करून विचारणाऱ्या सुगंधाकडे एकवार डोळे भरून त्यांनी पाहिलं , मान हलवली आणि लगोलग निघाल्या .
धोपेश्वरकरांचा वाडा गावाबाहेर होता , तिथून गावात जायला एकच पायवाट होती , आजूबाजूला दाट झाडी आणि पलीकडे विस्तीर्ण पटांगण होतं , दबक्या पावलांनी त्या चालत निघाल्या . अर्धा अधिक रस्ता कापून झाला असेल तेवढ्यात पुढच्या वळणावरून त्यांना कमलेश येताना दिसला , अनुराधाबाईंना अशा अवेळी बाहेर बघून त्याला आश्चर्य वाटल्याखेरीज राहिलं नाही . चौकशी करता त्याला कळले की त्या टेंबे आजीकडे निघाल्या आहेत , त्याने त्यांना सायकलवर सोडू का म्हणून विचारले , बरं झालं तु भेटलास म्हणाल्या , मागे कॅरिअरवर त्याला धरून त्या बसल्या . कमलेशची सायकल जोरात निघाली , सायकल वर सुद्धा वाट किती लांबलचक वाटत होती , कधी एकदा टेंबे आजीकडे जाते असं अनुराधाबाईंना झालं होतं . जमेल तितक्या वेगाने कमलेश सायकल चालवत होताच ,पण हाय रे दैवा !.. समोर टेंबे आजीचं घर दिसत असतानाच एकाएकी कमलेशची सायकल उलटली आणि दोघेही सपाटून आपटले ,कमलेश एका झुडुपावर पडला आणि अनुराधाबाई जोरात आपटल्या त्या एका मोठ्या काळ्या पाषाणावरच , नारळ फुटावा तशी कवटी फुटून जागीच गतप्राण झाल्या . मरताना समोरच्या झाडा च्या फांदीकडे त्या एकटक बघत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती दाटून आली होती . त्याचवेळी टेंबे आजी धावत बाहेर आल्या , समोरचं भीषण दृष्य बघून त्यांनी आधी गड्याला हाक मारली , अनुराधाबाईंच्या मृतदेहाभोवती धुनीतलं भस्म टाकायला सांगतिलं. कमलेश ला त्यांनी घरात आणले , पाणी देऊन , दत्तगुरूंच्या मूर्तीजवळची विभूती कपाळाला लावली , नास्तिक असलेल्या कमलेशने एरवी ती पुसून टाकली असती , पण थोड्यावेळापूर्वीच घडलेल्या विचित्र अपघाताचा मानसिक धक्का त्याला बसला होता त्यामुळे काहीही हालचाल करण्याच्या मनस्थितीतच तो नव्हता , जरा वेळाने सावरल्यावर कमलेश टेंबे आजींना म्हणाला
“छे छे मला काही झेपतच नाही, सायकल वरून पडल्यावर एवढा जबरी मार लागून माणूस कसा मरू शकतो ?
“ तो अपघात नाहीये कमलेश . आफ्रिकन ‘वुडू ‘ विद्या सम्राट अभिक धोपेश्वरकरांनी घडवून आणलेला , अपमृत्यू आहे तो .”
“ नॉन्सेन्स , बकवास गोष्टी आहेत या , काळी जादू वैगेरे ,असं काहीही नसतं जगात असो .. पण सुगंधा तिकडे एकटी असेल , तिला कळवायला हवं . शिवाय पोलिसात कळवायला हवं .”
“पोलिसांना कळवायला हवंच ,माझ्या धाकट्या मुलाला पाठवलं आहे मी त्यासाठी , पण पहिले सुगंधाला तिथून बाहेर काढलं पाहिजे , तिला अभिक पासून धोका आहे, अनुराधाबाई त्यासाठीच येत होत्या माझ्याकडे “ टेंबे आजींनी सांगितलं .
“म्हणजे ? पण ते तिचे वडिल आहेत ना ? त्यांच्यापासून काय धोका ? “कमलेश ला न कळून त्याने विचारले .
“ ती त्याची मुलगी नाहीये , ते सगळं मागाहून सांगते तुला , आधी सुगंधाला वाचवलं पाहिजे , कुठल्याही परिस्थितीत आज रात्री जर ती त्याच्या तावडीत सापडली तर ती त्यांच्यातलीच एक होऊन जाईल “
“ तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाहीये पण सुगंधाला आणणं काही अवघड नाहीये , आत्ता जातो आणि घेऊन येतो , मी काही त्या धोपेश्वरकरला घाबरत नाही “ कमलेश त्वेषाने मुठी वळवत म्हणाला .
“तितकं सोपं नाहीये बाळा ते ,धोपेश्वरकर साधं प्रकरण नाहीये.. टक्कर एका अजस्त्र शक्तीशी आहे आणि कमलेश तुझा विश्वास असो अथवा नसो , तुला मी जे काही सांगते ते करावंच लागेल . नियतीचीच तशी ईच्छा आहे .सध्या सुगंधा दत्तगुरूंच्या संरक्षणाखाली आहे तोवरच जे काही करायचं ते करता येईल .”
“नियतीची तशीच ईच्छा आहे म्हणजे ? काही झेपेल असं बोलाल का ? .. “ कमलेश ने विचारलं .
“मेल्या तुला कशाला झेपायला हव्यात सगळ्या गोष्टी , मोठी माणसं सांगतात ते फक्त मान खाली घालून ऐकलं तर काही झिजेल का तुझं ? “ वैतागलेल्या टेंबे आजीं म्हणाल्या .
“बरं बरं .. मी सुगंधा साठी काहीही करायला तयार आहे आजी , मला सांगा ना मी काय करू शकतो .” कमलेश अजीजीने म्हणाला .
“ तुझ्याकडूनच बऱ्यचशा गोष्टी व्हावयाच्या आहेत ,आत्ता ताबडतोब वाड्याकडे जायला निघ , सुगंधाला त्या खोलीतून बाहेर काढून सुखरूप माझ्या पर्यंत आणायचं. त्या आधी तिकडे गेल्यावर पहिले सुगंधाच्या गळ्यात एक माळ आहे ना ते पहा , ती खूप महत्वाची आहे , काही वर्षांपूर्वी अनुराधाला मी दत्तगुरूंची एक प्रासादिक तसबीर दिली होती , आणि जपाची ती माळ दिली होती . रोज मी दिलेल्या मंत्राचा जप आणि या फोटोची पूजा कर म्हटल्यावर नियमितपणे करीत होती ती बापडी .आजपर्यंत तेच तिचं संरक्षण होतं , हे खूप उशिरानं तिच्या लक्षात आल्यावर आत्ता माझ्याकडे येताना तिने ती जपाची माळ सुगंधाला दिली असणार ,अनुराधाने सुगंधाला तर संरक्षण दिलं पण आपल्याला ही काही होऊ शकतं हे तिच्या लक्षात आलं नाही , असो ..गोष्टी घडून गेल्यावर बोलून काय उपयोग ? “ तुला हे माहितीये का ,की आत्ता तो आपल्याला पाहतोय ? “
“तो कोण ? “ कमलेश ने दचकून विचारले .
“ अभिक धोपेश्वरकर ,“ त्यांनी असं म्हटल्यावर कमलेशने ईकडे तिकडे पहायला सुरूवात केली .
“ ईकडे नाही मूर्खां तो त्याच्या वाड्यात बसून पहातोय हे सगळं . फार पोहोचलेला चेटक्या आहे तो . ऐक मी माझ्या काही शक्ती तुला आत्ता देते आहे , त्याचा वापर तुला ठराविक काळ करता येईल त्यानंतर त्या निष्प्रभ होतील , किती काळ राहतील मी सांगू शकत नाही ,ते तुझ्यातली ग्रहण शक्ती आणि मनोबल यावर अवलंबून असेल , आणि सगळं करताना तुला अतिशय सतर्क राहावं लागेल . ‘अभिक’ बद्दल आता मी काही बोलत नाही, अनुभवा अंती तुला कळेलच , मी ईथे बसून त्याचा सामना करीन पण त्याला सामोरा तु जाणार आहेस , काळजी घे . आता उठ ,पाच मिनिटात समोरच्या नदीत अंग बुचकळून ये . कमलेश उठला तो नदीवर जाऊन येईपर्यंत , टेंबे आजींनी समोर एक पंचकोन षट्कोनात दोन तीन अगम्य आकृत्या काढल्या होत्या . एक माणसाची तर दुसरी एका मगरीसारख्या प्राण्याची पण उभी असलेली आकृती . शेजारी एक होम कुंड तयार करून , त्यात समिधा टाकून अग्नी प्रज्वलित केलाच होता. शिवाय पलीकडे एका लाल चौकोनात केसाळ पंजा , गुलाल , काळे तीळ , पांढरा माखरा , सातू , मोहाची फुले आणि काही विचित्र तांब्यांच्या प्रतिमा याच्या त्यांनी विविध मांडण्या केल्या होत्या . आपण वास्तू शांतीला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा काढतो , देवतांच्या मूर्ती ठेवतो काहीसं तसंच, फरक एवढाच की ती रचना बघून आपल्या मनात शांती , समाधान , आनंद आणि पावित्र्य यांचं बीजा रोपण होतं , तर ईथे या रचना बघून भीती , किळस , संताप उत्पन्न होत होता . कमलेश ला हे काही कळत नव्हतं आणि त्याचा विश्वास नव्हता या दोन गोष्टी त्याच्या पत्थ्यावर पडल्या . त्याला फक्त सुगंधाची काळजी होती . तिला काहीतरी गंभीर धोका आहे आणि तो ‘अभिक’ पासून आहे म्हणून या दोन म्हाताऱ्या गडबड करतायत हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते . त्यातल्या एका म्हातारीचा करूण अंत तर त्याने स्वतः:च पाहिला होता . टेंबे आजींनी त्याला समोर बसवले त्याच्या कपाळावर एका डबीतून गोपीचंदनासारखे एक मातकट पांढऱ्या रंगाचे मारव्यासारखा मंद सुगंध येणारे गंध काढून लावले. ,रोजची काही उपासना करतोस का विचारल्यावर त्याने सकाळी अंघोळ झाल्यावर वडिलांच्या ईच्छेखातर गायत्री मंत्र म्हणतो असे सांगितले , हे ऐकल्यावर टेंबे आजींना, पोरगं अगदीच कुचकामी नाहीये याचं मनातून बरं वाटलं .मग न्यास करून , त्रिप्रणव गायत्री मंत्राचं कवच करून त्यांनी त्याला रक्षा सूत्र बांधलं .
“हे जोपर्यंत तुझ्या मनगटावर आहे तोपर्यंत तुला अभिक पासून काहीही धोका नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे मी साधना करून मिळवलेल्या काही शक्ती तुला देत आहे , समोरच्या पळीने , त्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी मी एक एक मंत्र म्हणून तुझ्या हातावर सोडीन ते तु तुझ्या हातात घेऊन ,डोळ्यांना ,कानांच्या पाळीला आणि कपाळावर मध्यभागी लावून पुन्हा जमिनीवर सोडायचं . कळलं ? कमलेश ने होकारार्थी मान डोलावली. सगळे विधी झाल्यावर , तो निघाला , दारातून बाहेर पडताना त्याने एकदा टेंबे आजीकडे पाहिलं , धगधगत्या अग्निकुंडासमोर समिधा टाकत मंत्र म्हणणाऱ्या टेंबे आजी त्याला खूप तेजस्वी वाटल्या ,तेव्हा मनोमन हात जोडत त्याने आपल्या सायकलला टांग मारली . मोजून पंधराव्या मिनिटाला तो धोपेश्वरकरांच्या वाड्यासमोर उभा होता .वाड्याजवळ पोहोचताच त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला , सर्वत्र कमालीची शांतता होती , आसपासच्या प्रचंड काळोखात फक्त रातकिड्यांचा कोरस चालू होता , दार उघडंच होतं. तो अंगणातून आत आला , समोर पडवीत ‘अभिक धोपेश्वरकर ‘बसलेले दिसले , डोळ्यांवर चष्मा लावून, पांढरी बंडी आणि पायजमा घालून कंदिलाच्या प्रकाशात ते पुस्तक वाचत होते , कंदिलाच्या आजूबाजूला पाकोळ्या उडून , दिव्यावर झेप घेऊन खाली पडत होत्या ,हे दृश्य त्याला अगदीच अनपेक्षित होतं , मघाशी टेंबे आजी जे काही बडबडत होत्या त्याचा ईथे मागमूसही नव्हता, एवढ्या सभ्य अवतारात आपण अभिकांना बघू अशी अपेक्षा त्याने केली नव्हती , एक क्षणभर त्याला वाटलं म्हातारीला भ्रम झालाय की काय ? आणि आपण उगीचच तीच्या नादाला लागतोय की काय . तितक्यात कमलेशची चाहूल लागून त्यांनी मान वर केली आणि विचारलं “कोण ? “
“मी कमलेश यादव “
“ ओह !.. तुम्ही सुगंधा ला शिकवायला येता ना , अनुराधा म्हणाली होती मागे मला एकदा , जा जा आत आहे ती “डोळ्यावरचा चष्मा काढत अभिक उत्तरले . कमलेश गोंधळला .
“ काय झालं ? जाताय ना ?”
“अं ? “
यावर त्यांनी वाडयाच्या आत वरच्या खोलीच्या दिशेने बोट दाखवले , कमलेश आत जायला निघाला आणि एकदम कुणीतरी त्याला ओरडलं ,”आत जाऊ नकोस , “ तो झटका बसल्यासारखा थांबला , आवाज कुठून आला ते त्याला कळलं नाही पण चांगला खणखणीत होता .
“अरे जा ना आत , का थांबलात ? “
“अं ..नाही काही नाही , आत्ता तुम्ही काही आवाज ऐकलात का ? “
“ नाही” असं म्हणून ते पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून वाचू लागले , जणू त्यांना काही घेणं देणं नव्हतं .
कमलेश तिथेच चुळबुळत उभा राहिला , तोच त्याच्या डोळ्यासमोर एक दृष्य चमकून गेले , एका खोलीत दत्तगुरूंच्या तसबिरीसमोर सुगंधा , गुडघ्यात खाली मान घालून बसली आहे आणि त्या खोलीला कुलूप आहे . त्याला एकदम आठवलं yes अनुराधाबाईंच्या कनवटीला त्यांच्या खोलीच्या कुलुपाची चावी होती , त्या पडल्यावर ती चावी पण पडली आणि टेंबे आजींच्या गड्याने ती उचलून कमलेश च्या हातात दिली होती . ती आत्ता ही कमलेशच्या खिशात होती .अनुराधाबाईंच्या खोलीला वाडयाच्या दोन्ही बाजूंनी दार होते , त्यामुळे त्याला आत जायची गरज नव्हती , तो बाहेरच्या बाहेर तिला घेऊन निघू शकला असता ,एकाएकी अभिक चा धूर्तपणा त्याच्या लक्षात आला ,कुठल्यातरी कारणाने अभिक सुगंधाला खोलीच्या बाहेर काढू शकत नव्हते , कमलेशच्या मदतीने त्यांचे काम होणार होते , आणि वाड्याच्या आतून आणताना अनायासे दोघेही अभिकच्या हातात सापडणार होते .. ओह आय सी !.. कमलेश स्वतःशीच म्हणाला ,आणि परत जाण्यासाठी वळला , “काय झालं ? आजची शिकवणी रद्द का ? “ थोडं अस्वस्थ होत अभिकनी विचारलं .
“हो आज रद्द च होती ते सांगायलाच आलो होतो , पण तुम्ही आहात तर तुम्हीच निरोप द्या तिला . “हि मात्रा चांगलीच लागू पडली आणि मघाचा सभ्यपणाचा आव एक क्षणभरही टिकला नाही .
“ कोणाला निरोप द्यायला सांगतोस तु ? मला ? अभिक धोपेश्वरकर ला? “ अभिकचा रागवलेला आवाज चांगलाच भीतीदायक वाटला. अभिक आता उठून उभे राहिले . हा ऐकणार नाही हे कमलेश लक्षात येताच नाईलाजाने कमलेश आत निघाला ,
वाडयाच्या आतल्या भागात सर्वत्र पिवळ्या रंगाचे , क्षीण प्रकाश देणारे दिवे लागले होते , गडद अंधारात ते भीती निर्माण करत होते ,दारातून त्याने एकवार नजर आत फिरवली आणि असंख्य डोळे त्याच्या वरती दबा धरून बसले आहेत अशी एक विचित्र जाणीव त्याला अस्वस्थ करून गेली . नकळत त्याचा डावा हात आपल्या उजव्या मनगटावरच्या रक्षासूत्राकडे गेला , त्यावर पकड तशीच ठेऊन त्याने जोरात हाक मारली ,
“ सुगंधा SSSSS”
प्रत्युत्तरादाखल वरच्या खोलीतून फक्त धडपडल्याचे काही आवाज आले ,मग उंबऱ्यातून आत शिरत त्याने पुन्हा एक हाक मारली ,”सुगंधा SSSSS” ,काहीही प्रत्युत्तर आले नाही , तसे त्याने आसपास पाहिले ,संपूर्ण वाडा रिकामा होता , मघाशी पडवीत बसलेले धोपेश्वरकरही गायब एव्हाना गायब झाले होते , त्या भयावह वाड्यात तो एकटा उभा होता , आता टेंबे आजीं काय म्हणत होत्या ते त्याच्या लक्षात आलं . धोपेश्वरकर प्रकरण साधं नाहीये शक्य तितक्या जलद गतीने तो अनुराधाबाईंच्या खोलीकडे निघाला . आतल्या जिन्याला वळसा घालून स्वयंपाक घराच्या डाव्या कोपऱ्यात जिन्याखालच्या छोट्याशा भागात अनुराधाबाईंची खोली होती . खिशातली चावी काढून कुलूप काढताच भेदरलेल्या अवस्थेत बसलेली सुगंधा त्याला बघून उठून उभी राहिली .
“सर तुम्ही ईथे कसे काय ? आणि बायजी कुठेत ? “
“आधी बाहेर पडू इथून मग सांगतो सगळं , चल “ तो कुजबुजत्या आवाजात उत्तरला . बाहेरच्या बाजूने उघडणाऱ्या दाराने निघायचा त्याचा बेत , धोपेश्वरकरांनी मागची बाजू बंद करून हाणून पाडला होता , आता आतूनच बाहेर जायला हवे होते , खोलीतून बाहेर निघून ते दोघे हॉलमध्ये पोहोचले मात्र समोरचं दृश्य बघून कमलेश चक्रावला , जिन्यात ,भिंतीवर, हॉलच्या छतावर मानवी उंचीचे , लांबट बटबटीत डोळ्यांचे असंख्य आकार तरंगत होते ,आणि सगळीकडे जनावरांचे मांस सडल्यावर येते तशी एक असह्य दुर्गंधी पसरलेली होती. ते आकार पाहून त्याला टेंबे आजीनी काढलेल्या आकृतींची आठवण आली , एकदम काहीतरी जाणवल्यासारखे त्याने सुगंधाच्या गळ्याकडे पहिले , तिच्या गळ्यात माळ नव्हती !.. आणि समोरचं दृश्य पाहून भीतीने तिची शुद्धही हरपली होती .
“ तिला ईथेच ठेऊन मुकाट्याने बाहेर पड , माझं तुझ्याशी काही शत्रुत्व नाहीये आणि तुझ्या कडे लक्ष द्यायला वेळही नाहीये . “ अभिक चा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला .
“ अरे जा sss !.. मी तिला ईथुन नेल्याशिवाय जाणारच नाही , काय करायचं ते कर “ गळ्याची शीर न शीर फुगवत कमलेशने ठणकावलं . क्षणार्धात निर्णय घेऊन त्याने ने आपल्या हातातलं रक्षासूत्र काढलं आणि ते तो सुगंधाच्या हाताला बांधू लागला , तीच संधी साधून असंख्य आकृत्या त्याच्यावर झेपावल्या .रक्षासूत्र खाली पडले .
, “टेंबे आजी sss “ घाबरून कमलेशने आरोळी ठोकली आणि त्याच्या कानापाशी हलक्या आवाजात कुजबुज झाली ,” त्रिप्रणव गायत्री मंत्राची आवर्तनं चालू कर , घाबरू नकोस , तुझी भीती हीच त्यांची ताकद आहे लक्षात ठेव “
कमलेश ने त्रिप्रणव गायत्री मंत्र सुरू केला आणि सगळीकडे पांगापांग सुरू झाली , तसे वरच्या खोलीतून धोपेश्वरकर बाहेर आले ,आता ते मघाच्या सभ्य वेषात नव्हते , लाल रंगाचं वस्त्र त्यांनी अंगभर लपेटलं होतं आणि डोक्याला काळ्या रंगाचं मोठं मुंडासं बांधलेलं होतं , गळ्यात असंख्य कवटीच्या माळा , त्यांचे निळे डोळे आता लाल-भडक झाल्यामुळे भेसूर दिसत होते , कमलेशच्या मागे खरा सूत्रधार टेंबे आजी आहेत हे त्यांना माहिती नव्हतं असं नाही , पण कमलेश टिकाव धरणार नाही आणि निव्वळ उपासनेने म्हातारीकडे आपल्याला टक्कर द्यायची ताकद येईल या त्यांच्या विचारांना त्या दोघांनीही छेद दिला होता . त्याचवेळी आपले हस्तक एवढे तकलादू निघाले याचाही मनोमन संताप येऊन त्या साऱ्यांचं मिश्रण त्यांच्या चेहेऱ्यावर दिसू लागलं होतं .अजूनही कमलेश च्या भोवती ते सारे फेर धरून होते पण प्रत्यक्ष स्पर्श करू शकत नव्हते जोवर त्याची गायत्री मंत्रांची आवर्तनं चालू होती . धोपेश्वरकरांनी भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं , रात्रीचे दहा वाजत आले होते , थोड्याच वेळात मंगळ आणि राहू एका विशिष्ट कोनात येणार होते , सुगंधा ही आफ्रिकेत स्थायिक झालेल्या एका भारतीयाची मुलगी तिचा त्यांना हव्या त्या नक्षत्र आणि ग्रहयोगावर जन्म झालेला म्हणून , आपली विद्या वापरून त्यांनी पळवून आणलेली. आज पुन्हा तोच ग्रहयोग होता आणि तेच नक्षत्र होतं , १८ वर्ष वाट पाहिल्यानंतर आज कमलेशच्या मध्ये तडमडण्याने त्यांची ती संधी जाऊ पाहत होती आजच्या मुहूर्तावर त्यांना सुगंधा त्यांची व्हायला हवी होती . ती अजूनही बेशुद्ध होती. धोपेश्वरकर आत जाऊन बसले त्यांच्या समोर सुमारे २० फूटाचे मगरीचे मेलेले एक अतिप्रचंड धूड पसरले होते . त्यावर वेगेवेगळे लाल , काळे धागे दोरे , नागमोडी आकारात बांधले होते आणि हाडांचा ढीग टाकून त्यांचे मंत्रोच्चारण चालू होते , त्या अचेतन देहात स्वतः:चे चैतन्य टाकून मगरीचाच देह वापरून सुगंधापासून त्यांना नवीन प्रजाती उत्पन्न करायची होती .बाहेर आपले हस्तक कमलेशचे काही नुकसान करू शकत नसले तरी निदान त्याला थोपवण्यात यशस्वी होतील याची त्यांना खात्री होती .
“कमलेश , ऊठ उभा रहा , सुगंधाला घेऊन लवकरात लवकर बाहेर पड ,अभिकच्या खोलीतलं धूड उठलं की मग मला तुझं रक्षण करणं कठीण जाईल . “ टेंबे आजींचा आवाज कमलेशच्या कानाशी कुजबुजला .
कमलेश उठण्याचा प्रयत्न करू लागला पण मघाशी जेव्हा सारे झेपावले होते ,तेव्हा असह्य अशा दुर्गंधी बरोबरच, त्यांच्या ओझरत्या स्पर्शाने त्याच्या हातावर भाजल्यासारखे मोठाले डाग पडले होते आणि वेदना होत होत्या . तोच त्याच्या डोळ्यासमोर टी. व्ही. स्क्रीन वर दिसते तसे दृश्य आले , जपाची माळ सुगंधानेच केव्हा तरी ती काढून फोटोसमोर थोडा वेळ ठेवली होती आणि कमलेश आल्यामुळे गडबडीने ती तशीच निघाली होती . हे दृश्य डोळ्यासमोर आल्याबरोबर कमलेश ने सुगंधाला आपल्या हातांवर उचलले , आणि तो पुन्हा खोलीकडे जायची धडपड करू लागला . “ आता तिला कशाला उचलायचे पुन्हा ? कमाल आहे , तुझे रक्षासूत्र तिला बांध आणि तू एकटा आत जाऊन माळ घेऊन बाहेर ये .” टेंबे आजींच्या तंबीने कमलेश भानावर आला . मघाशी खाली पडलेले रक्षासूत्र तो प्रयत्न पूर्वक उचलू लागला कारण तो ते उचलायला जाई तेव्हा सारे त्याच्या अंगावर झेप घेत , त्यांची ओझरती झळही त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होती , त्यातून तिथे पसरलेली ती दुर्गंधी , त्याने डोके फुटेल की काय असे वाटत होते , सुगंधाही कदाचित त्यामुळेच बेशुद्ध पडली असावी . कसंबसं तिला रक्षासूत्र बांधण्यात तो यशस्वी झाला , आता खोलीत जाऊन माळ तेवढी आणायची होती , तो निघाला , पण आतापावेतो कमलेशचीही शुद्ध हरपू लागली , गायत्री मंत्रांची आवर्तने क्षीण होऊ लागली तसे वर अभिक चे मंत्रोच्चरण जोरात सुरू झाले .
ईकडे टेंबे आजी अस्वस्थ झाल्या , कमलेश जर बेशुद्ध पडला तर अभिक ची सरशी होईल आणि त्याचा कुटील हेतू पूर्ण होईल , ती मेलेली २० फुटी मगर जिवंत होऊन दोन पायांवर उठून उभी राहिली तर किती सत्यानाश होईल या विचारांनी त्या घायाळ झाल्या . मग सर्व शक्तिमान असूनही करुणाघन असलेल्या अशा दत्तगुरूंची त्यांनी प्रार्थना केली , आपली सर्व उपासना आणि विश्वास पणाला लावून माला मंत्रांची आवर्तनं सुरू करत . धुनीतलं भस्म त्यांनी कमलेशच्या अंगावर जागेवरूनच फुंकलं . क्षणार्धात काळे ढग जाऊन आकाश निवळावं तसं कमलेशला झालं , आजूबाजूची दुर्गंधीची पटलं आणि ते तरंगणारे जीव त्याच्यापासून लांब फेकले गेले . धडपडून उठत तो खोलीत पोहोचला , फोटोपाशी ठेवलेली माळ आणि फोटो देखील उचलून तो परत हॉल मध्ये आला . आता ती माळ स्वतः:च्या गळ्यात घालून तसवीर आपल्या उजव्या हातात पकडून दुसऱ्या हाताने त्याने सुगंधाला अर्धवट उभे केले , हळूहळू ती शुद्धीवर येऊ लागली होती . मग तिला उचलून त्याने सरळ खांद्यावर घेतले आणि तीरासारखा तो वाडयाच्या बाहेर पडला . त्याबरोबर हस्तकांची झुंड देखील बाहेर पडली .रस्त्याने जितक्या झपाट्याने चालता येईल तितक्या झपाट्याने तो निघाला , टेंबे आजीचं अथक चाललेली माला मंत्रांची आवर्तनं त्याला कानावर ऐकू येत होती , पण डोक्यावरचा तो किळसवाणा थवा त्याला नको नकोसा झाला होता . खूप प्रयत्नपूर्वक त्याला मनोबल टिकवून ठेवावे लागत होते . आता तो पळत निघाला , लांबून अग्निकुंडात समिधा टाकणाऱ्या टेंबे आजी त्याला दिसल्या तसे आनंदातिरेकाने त्याला रडू येऊ लागले . ईतका वेळ टिकवून ठेवलेला धैर्य आणि संयम अजून पुढचा एक मिनिट देखील टिकेल अशी आशा त्याला वाटेना , कसाबसा त्यांच्या दारात तो पोहोचला आणि सुगंधाला दारापाशी बसतं करून तो स्वतः: तिथेच कोसळला .
पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने कमलेशला जाग आली , डोळे उघडताच समोर आई बाबा , टेंबे आजी आणि सुगंधा त्याच्या बेडभोवती तो उठायची वाट बघत बसलेले दिसले, आणि त्याला रात्रीचा सगळा प्रसंग आठवला, तो उठायचा प्रयत्न करू लागला , “अरे अरे , सावकाश ,आत्ता लगेच काही उठून बसायची गरज नाही , बरं वाटतंय का आता तुला बाळा ? दोन दिवस बेशुद्ध होतास तु “ बाबांनी जिव्हळ्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले . यावर हो म्हणून त्याने टेंबे आजीकडे बघितले ,त्यांनी त्याच्यासमोर एक गरम पेय धरले , वेगवेगळ्या काही उत्तेजक वनस्पतींचा अर्क होता पण चविष्ट होता . तो पिऊन त्याला हुशारी आली . तो आता तरतरीत झाला आहे हे दिसलं तशा त्या बोलू लागल्या , “अभिक चा डाव तु उलथून लावलास त्यामुळे तो रागावून आफ्रिकेला निघून गेला . आता तिथे बसून त्याने काही करू नये म्हणून तुला तुझी उपासना वाढवली पाहिजे . मी जिवंत आहे तोवर काळजी नाही तुला आणि सुगंधाला . पण त्याचं काही सांगता येत नाही म्हणून तुम्ही दोघांनी ईथेच राहावं हे उत्तम .अर्थात लग्न करावं लागणार तुम्हाला चालेल ना ? टेंबे आजीनी लबाड हसत विचारलं . तशी सुगंधा लाजली आणि कमलेशने हसत हसत डोक्यावरून पांघरून ओढून घेतले .
.

समाप्त !..

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच!
ह्याचा पुढचा भाग येऊ द्या

मस्त ! उत्कंठावर्धक होती गोष्ट. उलट क्रमश द्यायला पाहीजे होता, म्हणजे वाचकांना रात्री झोप आली नसती. Proud

नेहेमीप्रमाणेच कथेची छान मांडणी.

छान कथा.

सायीचं घट्ट दही घातलेली कच्च्या केळ्याची कोशिंबीर आणि गुळाच्या कापण्या यांची रेसिपी देण्याचे करावे.

भारी कथा.
गुळाच्या कापण्या>>> आखाडात तळतात/करतात त्याच ना!

किल्ली ,dipikajogal,रश्मी.,मामी,प्राचीन , आबा. : मनापासून आभार 

आबा : होय बरोब्बर !.. आखाडात तळतात  त्याच 

मामी : कच्ची केळी आधी सालीसकट  उकडून घ्यायची मग काप करून किंवा कुस्करून त्यात दही , आलं -मिरची वाटून घालायची , चवीप्रमाणे मीठ , साखर घालायची . आणि गुळाच्या कापण्यासाठी कणिक आणि थोडे हरभरा डाळीचे पीठ , मोहन टाकून गुळाच्या पाण्यात (त्यासाठी गुळ रात्री भिजत घालायचा ) घट्ट भिजवायचे आणि लगेच कापण्या  तळायच्या . 

छान

छान