गझल - सोबत

Submitted by अनिवार on 8 August, 2022 - 02:31

सोबत

सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला

गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला

रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला

माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला

वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला

का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला

रस्साकशीत ह्यांच्या प्रेमास बोलवावे
आकाश साथ माझ्या सीमांत सोबतीला
___________________________________

आनंदकंद :- गागालगा लगागा गागालगा लगागा

Group content visibility: 
Use group defaults