वेगळा भाग - २२

Submitted by निशा राकेश on 5 August, 2022 - 08:29

पोलिसांना बघून राम थोडा घाबरला , त्याला काही कळेना , घराबाहेर प्रचंड धूर त्यामुळे नीटस काही दिसत देखील न्हवत , तो भरभर चालत घराजवळ आला , आत घुसताच एका पोलिसाने त्याने अडवलं.

“ये पोरा , कुठ चालला”पोलिसाने त्याच्या खांद्याला धरून विचारल.

“का , माझ घर आहे हे “ राम पोलिसाकडे आश्चर्याने पाहू लागला.

“तुझ घर , मग तो मेलाय तो कोण तुझा “ पोलिसाने निर्विकार पणे विचारल.

“रामच काळीज दडपल , धडधडत्या मनाने त्याने घरात वाकून पाहिलं, प्रचंड धुरामुळे पहिल्यांदा त्याला काहीच दिसलं नाही , पण नंतर मात्र जे दिसलं त्यामुळे रामला भोवळ आली तो खाली कोसळणार पण तितक्यात कोणीतरी त्याला आधार दिला , तो कसाबसा तोल सावरत उभा राहिला ,त्याने चटकन तोंड फिरवल, राम ने जे पाहिलं ते अंगाचा थरकाप उडवणार होत , समोर भिंतीला टेकून बसलेला चंदू जळून कोळसा झालेला.

एकट्या रामने ते दृश्य पाहिलं , नंतर झेंडू आणि दादा आले , त्या दोघांनाही त्याने चंदूला पाहू दिल नाही.

हे सगळ काय घडल नेमक चंदू च्या बाबतीत , हे शेजारी कुणाला कळल नाही पण चंदू ला घेऊन गेल्यावर झेंडू जेव्हा घरात आली , तेव्हा तिला बरेच कपडे देखील जळालेले दिसले , चंदूचा अचेतन देह स्टोव्ह शेजारी राम ने पाहिला होता ह्यावरून चंदू ने स्टोव्ह पेटवला होता हे कळाल.
झेंडू रोज रात्री झोपायला जागा पुरावी म्हणून स्टोव्ह उचलून कपड्यांच्या फळी खाली ठेवीत असे , ह्यावेळी पण झाडून घेताना किंवा फारशी पुसताना स्टोव्ह उचलून तिथेच ठेवला होता , चंदू स्वतः हून कधीही स्टोव्ह पेटवत नसे म्हणून शाळेत जाण्यापूर्वी तिने काही तो जागेवर उचलून ठेवला नाही पण त्या दिवशी मात्र घरात कोणीही नसताना चंदू ने तो स्टोव्ह तिथेच पेटवला ,त्याच्याच धक्याने वरच्या फळीवर चे सर्व कपडे खाली सरळ स्टोव्ह वर पडले , आणि त्यांना आग लागली , कपडे जळू लागताच चंदू घाबरला , आपल्याला आता घरचे सर्व ओरडतील म्हणून तो कपड्यांची आग वेड्यासारखी विजवू लागला आणि कपडे वाचवायच्या नादात चंदूच्याच कपड्यांना आग लागली , समोरचे कपडे वाचवावेत कि स्वत: च्या कपड्यांची आग विजवावी , काय कराव हे त्याच्या भ्रमिष्ट अवस्थेत त्याला समजल नाही . शेजारी पाजारी कुणाला काही आवाज देखील आला नाही ,त्याने इतकी वेदना, इतका दाह कसा सहन केला असेल , घरातून भरमसाट धूर निघू लागला तेव्हा शेजाऱ्यांच लक्ष गेल, पण त्यांनी काही काही पर्यंत सर्व संपल होत.

रुग्णवाहिका चंदुला घेऊन गेली, पोलीस केस झाली, पुढचे सोपस्कार उरकायला राम , दादा आणि त्यांच्या सोबत शेजारचे काही लोक गेले ,

हॉस्पिटल , पोलीस स्टेशन , आणि शेवटी त्याची अंतिम क्रिया करून राम आणि दादा घरी आले , राम पुष्कळ थकलेला आणि उदास , दादा सुन्न.

घरी आल्यावर झेंडू रामच्या गळ्यात पडून खूप रडली , तिला आधार द्यायला राम कडे शब्द न्हवते , तो तिला नुसताच थोपटत राहिला .

कालपरवापर्यंत आपल्या समोर असणारा , स्वतःच्याच विश्वात रममाण असणारा चंदू , आता तो नाही , तो आपल्यातून गेला , अनंताच्या प्रवासाला निघून गेला , पुन्हा कधीही न परतण्यासाठी , घरावर एक उदास छटा पसरलेली , कोणी कुणाशी काहीही बोलायच्या मनस्थित न्हवत,

राम त्या धक्यातून दुसर्या तिसर्या दिवशी सावरला , सावरावंच लागल , कारण इलाज न्हवता, त्याने जर हातपाय गाळले तर ते चालणार न्हवत,
झेंडू ने मात्र चंदूचा मृत्यू मनाला लाऊन घेतला होता , स्टोव्ह जर तिने उचलून ठेवला असता तर चंदूला काही झाल नसत अस म्हणत ती स्वतःला दोष देत राहायची , राम ने तिला खूप समजावलं स्टोव्ह एक निमित्त ठरलं , त्याच आयुष्य तितकच होत , ह्या गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार ठरवू नकोस , पण ते शब्द तिच्या कानापर्यंत पोहोचायचेच नाही , ती एकलकोंडी झाली होती , चंदूच्या आठवणीने तिला सतत रडू फुटायचं , आठ दिवस झाले तरी ती काही त्यातून बाहेर पडायला तयार न्हवती, तिने शाळेत जाणं बंद केल होत , नुसती तंद्री लागल्या सारखी शून्यात बघत बसून राही.

तिची हि अवस्था दादांना खूप अस्वस्थ करणारी होती , एक दिवस दादांनी तोंड उघडल “ झेंडू , बस कर आता , तुला जितक दुख व्हतय ना त्यापेक्षा कैक पटीन एक बाप म्हणून मला तरास व्हतोय, तुझी आय अशी एकाएकी निघून गेली , जवान पोरगा गेला , काय करायचं ह्या बापानी , पर मी जगतोय न्हव, तुम्हा दोघा लेकांरांसाठी , माझ्यासाठी तरी ह्यातून भाईर पढ, नशीब म्हणायचं आपल , अजून काय”

“ पण दादा , मला नाही विसरता येत , मी काय करू “ झेंडू पुन्हा रडू लागली.

“ माझ्या पोराला ह्या हातानी अग्नी दिला मी , मला नसल काय वाटत , पण काळजा वर दगड ठिवून राहतोय मी ,आन जागून तरी काय करत होता चांद्या , उद्या मी गेलो तर तुमी दोघ भावंड बघणार व्हता का त्याला माझ्या माघारी, तुमच्या व्यापात तुम्हाला नकोसा झाला असता तेवा तो , जे झाल ते यकार्थी बरच झाल, असल जीण जगण्यापारीस तो मेला हेच बर झाल, आता तुला काय झाल तर ते सहन करायची ताकद न्हाय राहिली माझ्यात, तुला हे अस बघून उद्या मला कायतरी .......”

“दादा , नका अस बोलू, मी सावरेन स्वतःला, तुम्हाला त्रास होईल अस नाही वागणार मी “ अस बोलून झेंडू उठली , दादांसाठी चहा करावा म्हणून स्टोव्ह जवळ गेली , स्टोव्ह कडे पाहिल्याबर चंदूच्या आठवणीने तिला पुन्हा भडभडून आल, मोठ्या कष्टाने तिने स्वतःला सावरल.

“दादा , हा स्टोव्ह विकून त्याच्या जागी नवीन स्टोव्ह आणाल का” झेंडूनी दादांना चाचरत विचारल.

“आणतो “ दादा शांत पणे म्हणाले.

खूप दिवस राम घरी आला नाही जया हाच विचार करीत होती, विजयकडून रामच्या घरी काय झाल ह्याची कल्पना तिला होती, तिला राम ला भेटायचं होत , सुशीला बाई ना पण खूप वाईट वाटत होत पण रामच्या घरी जाऊन सांत्वन करायला जाणार तितक्यात त्यांच्या गावावरून त्यांच्या बहिणीच पत्र आल ती आजारी होती म्हणून त्यांना गावी जाण भाग होत , शेवटी जाताना सुशालीबाई विजयला राम कडे जाऊन “हाक मारून ये “ अस
म्हणाल्या , विजय ने जयाला देखील सोबत घेतलं , कारण अश्या प्रसंगी एकट्याने जाव आणि काय बोलाव हे त्याला माहित न्हवत .

जेव्हा ते दोघ राम च्या घरी पोहोचले , राम खाटेवर एकटाच पुस्तक वाचत बसला होता, घरात दुसर कोणीही न्हवत , दादांना भेटायला त्यांची बहिण म्हणजे रामची आत्या आली होती , दादा आणि झेंडू तिला तिच्या घरी पोहोचवायला गेले होते , दोघांची अवस्था पाहून आत्या दोघांना दोन दिवस तिथेच थांबवणार होती अस तिने रामला जातानाच सांगितलं होत ,

राम विजयला बघून चकितच झाला ,

जया सगळीकडून रामच घर निरखून पाहत होती , विजय मात्र अनावधाने रामच्या घराची आपल्या घराशी तुलना करत होता.

राम ने विजयला तुला कस सापडलं हे विचारातच त्याने जयाकडे खुण केली.

“त्या दिवशी तू दत्त मंदिरात भेटला न्हवतास का , तेव्हा तू तुझी वस्ती दाखवली होती , वस्तीत आल्यावर विचारत विचारत आलो इथवर “ जया शक्य तितक प्रसंगाच गांभीर्य ओळखून शांतपणे म्हणाली.

“ हो का बर बसा हा मी चहा करतो “ अस म्हणून राम चहा करायला उठला .

“नको तुम्ही दोघ बसा बोलत मी करते चहा “ अस म्हणून जया उठली देखील.

तिने ओढणी एका बाजूला बांधून सराईतपणे स्टोव्ह पेटवून चहाच आधन ठेवलं,

राम अवाक होऊन पाहतच राहिला , हिला आपल्या घरातलं सगळ माहित असल्याप्रमाणे हात चालवतेय, एकीकडे विजयशी बोलताना त्याची नजर सारखी जया कडे जात होती, न जाणो हिला मधेच काही हव असल तर , पण संपूर्ण चहा ओतून आणेपर्यंत तिने रामला एकदाही हाक मारली नाही.

चहा सुरेख बनला होता , राम ला चहाच कौतुक करावस वाटल , पण हि ती वेळ न्हवती, औपचारिक बोलून झाल्यावर दोघांनी राम चा निरोप घेतला,

निघताना जया तिचा रुमाल रामच्या खाटेवर विसरली, ती गेल्यावर त्याची नजर त्या रुमालावर पडली ,गुलाबी रंगाचा तलम रेशमी कापडाचा रुमाल, हा तर जयाचा रुमाल , त्याने तो सहज उलघडून पहिला त्याच्या कोपर्यावर (Raj) अस इंग्रजीत लिहील होत , रामला राज हे नाव कुणाच जे कळेना , आणि ते पण जयाच्या रुमालावर असाव , त्याच मन नाराज झाल , आता मनापासून तीच कौतुक करणारा राम , लगेचच तिच्यावर संशय घेऊ लागला ,
त्याच एक मन सांगत होत , आपल्यासाठी आयुष्यभर थांबणार अस म्हणाली होती , ठीक आहे असेल कोणीतरी आपल्याला का इतक वाईट वाटतंय, आपण तिला तसही कुठे काय स्पष्ट सांगितलं होत , एक मुलगी असून तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली , आपण किती भित्रे तिला काहीही बोलू शकलो नाही , पण भित्रे म्हणण्यापेक्षा आपण काय सांगणार होतो तिला , आपल अजून कशात काही नाही, कुठे तिला अडकवायच , असू दे मिळाला आहे ना कोणी राज , होऊदे तीच चांगल , निदान ती तरी सुखी होऊदे , म्हणजे आपल्या सोबत ती सुखी राहिली नसती, आपण तिला सुख नसत दिल,
दिल असत कि , पण कधी, अजून खूप वेळ आहे , झेंडूच शिक्षण तीच लग्न , माझ शिक्षण , किती थांबणार ती, आणि आपण कोण तिला थांबवणारे , हा अन्याय नाही का तिच्यावर , बापरे डोक भनभनतय, किती हे विचार ...”

मनाची आंदोलन थोपवत त्याने तो रुमाल त्याच्या कॉलेजच्या पुस्तकांच्या पिशवीत ठेवून दिला, आणि त्याचे विचार मनातल्या पिशवीत,
सुरक्षित, जयाला कधीही कळू नये म्हणून ,

बारावीच वर्ष म्हणजे विजय आणि राम ह्या दोघांसाठी मोठ महत्वाच वर्ष होत आणि जया साठी देखील पण तिला ते वाटल तर , ती तिच्या विश्वात रमणारी होती , वाटल तर करायचा अभ्यास नाहीतर तासन्तास पुस्तकाकडे नुसत पाहत राहायचं , कधी झोपून जायची अभ्यास करताना ,
सुशीला बाईनी तिला ताकीद दिली होत दहावी जर पास झाली तर पुढे शिक्षण नाहीतर सरळ लग्न लाऊन देईन , अभ्यासात मनच लागतच नसेल तर करणार काय , विजयने बोलून झाल पण तरीही म्हणावा तितका परिणाम तिच्यावर होत न्हवता , एकदा विजयने हा विषय राम समोर काढला ,
राम काहीही न बोलता सर्व ऐकत होता , पण शेवटी विजयने तू बघतोस का समजावून अस विचारल्यावर मात्र राम चा नाईलाज झाला,
ठीक आहे बघू , बोलेन मी , अस म्हणून त्याने तेवढ्या पुरता विषय संपवला.

तीन चार दिवसात विजय कडे जायचा योग आला, सुशीलाबाई कामावर , आणि जया नेहमीप्रमाणे मागच्या अंगणात तिच्या कवितेच्या वही सोबत,

पुस्तक दिल्यावर राम तिच्याकडे पाहत बसून राहिला त्याला बोलायचं होत पण सुरुवात कशी करू हे कळत न्हवत,

“आज कोणती कविता “ त्याने तिच्या आवडत्या विषयापासून सुरुवात केली.

“सांगेन , पूर्ण झाली कि “ अस म्हणून तीने वही बंद केली.

“वही , फक्त कविता लिहीण्यासाठीच हातात घेतेस का , दहावीच वर्ष आहे न तुझ “

“विजय दादा ने कान भरले वाटत” जया उपहासाने म्हणाली.

“कशाला कोणी कान भरायला हवेत , त्याने फक्त सांगितलं मला, ”

“कंटाळा येतो मला अभ्यासाचा, पुस्तक समोर धरल कि झोप येते “

“कवितेच पुस्तक हातात धरल तरी , झोप येते “ राम ने विचारल.

“नाही नाही मराठी , इंग्रजी आणि हिंदी ह्यांच्या पुस्तकातल्या कविता वाचायला , धडे वाचायला आवडतात , पण हे विज्ञान, भूगोल, नागरीकशास्त्र, बीजगणित , नको वाटत “

“ठीक आहे तर मग जे आवडत त्याचा जास्त अभ्यास कर आणि जे नाही आवडत त्याचा फक्त पास होण्या पुरता अभ्यास कर”

“ अस केल तर चालेल “

“का नाही चालणार , आणि पुढे मग महाविद्यालयात जेव्हा जाशील तेव्हा भाषा घेऊनच पदवीधर हो, बी.एड कर , शिक्षक बन , तुझ तुलाच कळेल पुढे काय करायचंय ते , पण इतर विषय आवडत नाही म्हणून जर काहीही केल नाहीस , तर मात्र कठीण आहे , शिक्षण घेण , स्वता:च्या पायावर उभ राहण, खूप गरजेच असत , नापास झाल्यावर लग्न करून धुणीभांडी करायची आहेत का तुला “

जयाने नाही म्हणून मान हलवली ,

“करेन मी अभ्यास , मला हे अस कोणी समजावून सांगितलच नाही कधी “ जया प्रसन्न हसली.

राम ही हसला , आणि जायला निघाला पण निघण्यापूर्वी त्याने त्याच्या पिशवीतून तिचा रुमाल बाहेर काढून तिला देत म्हणाला .

“कवितेचे वही जशी जपतेस तश्या तुझ्या इतर गोष्टी पण सांभाळत जा , हा रुमाल माझ्याकडे राहिला होता त्या दिवशी “

जया ने रुमाल घेतला आणि त्याची पुन्हा घडी करून तिने रामच्या खिशात ठेवला आणि ती म्हणाली “ विसरले न्हवते , मुद्दाम ठेवला होता”

क्रमश :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंदू च्या मृत्यूचा प्रसंग वाचताना काटा उभा राहिला, मागिल भागात रामच्या आईच्या आजारपणातील प्रसंगही प्रभावी पणे लिहिले होते.
राम-बायडा किंवा राम-जयाचे हळुवार प्रसंग ही छान खुलवलेत.
कथानकातील राम ह्या पात्रच कौतुक वाटतं, प्रतिकूल पिस्थितीतही कोवळ्या वयात अशा चढ उताराना शांततपणे समोर जातो, .....प्रत्यक्षातही अशा व्यक्ती आहेत ज्यांनी अस बालपण अनुभवलं आणि त्यातूनही पुढे जाऊन आपल आयुष घडवलं