लेक डिस्ट्रिक्ट...इंग्लडची स्वर्गभूमी

Submitted by मनीमोहोर on 30 July, 2022 - 18:37
Lake district , uk

इंग्लंडची स्वर्गभूमी...लेक डिस्ट्रिक्ट

सध्या मुक्काम पोस्ट लंडन आहे. समर असल्याने हे दिवस फिरायला जायला अगदी योग्य आहेत. ना फार थंडी ना खूप उकाडा आणि रात्री नऊ वाजेपर्यंत उजेड . म्हणून मुलीने चार दिवस लेक डिस्ट्रिक्टला जायचा प्लॅन केला. भारतात एखाद्या ट्रिपची आखणी, कुठे काय पाहायचं, काय खायचं, खरेदी कुठे करायची, हॉटेल बुकिंग , गाड्यांचं रिझर्वेशन हे सगळं मी करते , तो माझ्या आनंदाचा भाग आहे. पण ह्या ट्रिपच प्लॅनिंग मुलीने केल्यामुळे थोडं वेगळं ही वाटत होतं आणि छान ही वाटत होतं .

हा भाग इंग्लडच्या उत्तर पश्चिमेकडे आहे आणि प्रदेश तसा मोठा आहे. त्यामुळे चार दिवसाच्या ट्रिप मध्ये त्यातली सर्वात सुन्दर म्हणा (किंवा पॉप्युलर म्हणा हवं तर ) ठिकाणंच फक्त बघता येणार होती.. लंडन सोडून कन्ट्री साईड लागल्यावर सगळीकडे हिरवीगार कुरणं , त्यात सुखेनैव चरणाऱ्या मेंढ्या, गाई, गव्हाची, मक्याची शेतं, कधी विस्तीर्ण दिसणारं क्षितिज तर कधी हिरवाईच्या अनेक छटानी नटलेल्या लहान लहान टेकड्या हे सगळं बघताना डोळे बंद करणं अशक्यच होतं. पाच सहा तासाचा प्रवास करून आम्ही aMbelside या मुक्कामी गावी कधी पोचलो ते कळलं ही नाही.

कोणत्याही गावात पायी फिरताना जी मजा येते ती वेगळीच असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो पायी फिरायला. छोटी छोटी घरं, प्रत्येक घरासमोरची बाग, फुलं, दूरवर दिसणारं गावातलं एकुलत एक चर्च , छोटे छोटे रस्ते , सिग्नल फार नसल्याने गाड्याना हाताने इशारा करून रस्ता क्रॉस करणारे पादचारी, आपल्या मुला बाळांना आणि हो लाडक्या कुत्र्यांना ही घेऊन आनंदात फिरणारी तरुण मंडळी आणि एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना आधार देत हळू हळू चालणारी वयस्कर जोडपी, छत्री उघडायची गरज नाही पण जाणवतोय, कळतोय न कळतोय असा भुरू भुरू पडणारा पाऊस , हवेतला गारवा ह्यामुळे चालताना फार मस्त आणि ताजतवानं वाटत होतं.

IMG-20220722-WA0024_0.jpg

छोटंसं घर

IMG-20220722-WA0038_0.jpg

फुलं

20220730_230541_0.jpg

हे टूरिस्ट लोकांच लाडकं ठिकाण असल्याने इथे पुष्कळ घरांच्याबाहेर रहाण्याची आणि जेवणा खाण्याची होईल अश्या पाट्या दिसत होत्या. कोस्टा , सबवे, पिझ्झा एक्स्प्रेस अश्या मोठया चेनना ह्या भागात शिरकाव करण्याची परवानगी नाहीये त्यामुळे पदार्थांच्या चवीचं सरसकटीकरण न होता त्यांची लोकल चव टिकून राहिली आहे. आम्हाला ही इथलं जेवण खूप आवडलं. सगळ्याच पदार्थांची चव सुन्दर होती. एक भारतीय रेस्टॉरंट ही बघितले गावात पण मला अश्या ठिकाणी भारतीय जेवणात जरा ही इंटरेस्ट नसतो. असो.

चालता चालता एका फुटपाथवर मला तीनेक फूट उंचीचे दोन जाडे लाकडी वासे पुरलेले दिसले आणि त्याला दोन जाड्या लोखंडी साखळ्या ही अडकवलेल्या होत्या. पूर्वीच्या काळी घोडा हे प्रवासाचे मुख्य साधन होते, त्यामुळे बाजारहाट करताना घोड्याला ठाणबंद करण्यासाठी ह्याचा उपयोग होत असणार आणि त्याची आठवण म्हणून ते जपून ठेवले असतील हा माझा अंदाज. न जाणो आज ही येत असेल एखादा गोरा उमदा तरुण घोड्यावरून बाजारात अशी कल्पना ही केली मी मनात उगाचच.

लेक डिस्ट्रिक्ट ला जाऊन लेक ची सफर न करणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघण्यासारखेच आहे. त्या भागात एकंदर बारा लेक्स आहेत. आमच्या गावाजवळच असणाऱ्या विंडरमिअर ह्या प्रसिद्ध लेकची आमची बोट राईड फारच सुंदर झाली. एका बाजूला हिरवे डोंगर, एका बाजूला किनाऱ्यावरची छोटी छोटी गावं, मध्ये भरपूर पाणी असलेलं स्वच्छ लेक , पाण्यात पोहणारे राजहंस , बदकं, बोटीवर घिरट्या घालणारे सिगल्स, तलावाच्या पाण्यात होडी वल्हवणारे हौशी नाविक हे सगळं एखाद्या कुशल चित्रकाराने चित्र काढावं इतकं सुन्दर दिसत होतं.
20220730_234252.jpg

हा अजून एक फोटो

IMG-20220723-WA0012~2_1.jpg

इथे जी लेक्स आहेत त्याच्या काठा काठाने जाणारी एक हेरिटेज ट्रेन ही आहे. एका प्लँटफॉर्म च छोटंसं स्टेशन, तिथे जुन्या काळातल्या एका छोट्याश्या इमारतीत असलेलं रेल्वे ऑफिस आणि कँटीन , आजूबाजूला डोंगर , झाडी, कोळश्याच धूर सोडणारं इंजिन, डब्यात लाकडाची बाकं असा सगळा जुना बाज आहे त्या ट्रेनचा.

जुनं सामान

20220730_232953.jpg

ट्रेन
20220730_232322.jpg

डबा

20220730_232358.jpg

ट्रेन मधून समोरची लेक्स बघताना मला सारखी वर्ड्सवर्थ ची आठवण येत होती. त्या प्रसिद्ध कवीचं वास्तव्य ही ह्याच परिसरात होतं. त्यांचं घर ही जपून ठेवलं आहे पण आम्ही बघू शकलो नाही. मी दोनशे वर्षांपूर्वीच त्या काळातलं लेक district इमॅजिन करत होते. मोटारी, पक्के रस्ते, विजेचे दिवे नसतीलच तेव्हा आणि वस्ती ही अधिक विरळ असेल. जीवनशैली निसर्गाच्या जास्त जवळ असलेली असेल तेव्हा.. वगैरे वगैरे ...सुन्दर लेक्स, हिरव्यागार टेकड्या, कधी निरभ्र निळं आकाश आणि सुंदर सूर्यप्रकाश तर कधी करड्या ढगांची आकाशात गर्दी आणि तृप्त करणारा पाऊस, हिवाळ्यात कापसाची फुल पडावीत तसा होणारा हिमवर्षाव आणि वसंत ऋतूत हिरवळीवर फुलणारी रानफुले, तळ्याकाठाने फुलणारी डॅफोडील्स, वातावरणात कायमच भरून राहिलेला शांतपणा , निवांतपणा ... एखाद्या प्रगल्भ कवीची प्रतिभा फुलण्यासाठी किती पोषक हा सभोवतीचा निसर्ग ...

ह्या भागात टेकड्यांवर सगळीकडे गडगे घातलेले दिसतात. घराच्या कम्पाउंडला ही कोकणातल्या सारखे गडगेच असतात. फक्त इकडे स्लेट दगड असल्याने त्याचा वापर होतो, कोकणात जांभा वापरतात. हे गडगे म्हणे प्रॉपर्टीच्या सीमा रेषा म्हणून घालायला सुरवात झाली आणि ही पद्धत सात आठशे वर्ष जुनी आहे. हजारो मैल अंतर असून ही गडगे घालण्याची कोकणातल्या सारखी सेम पद्धत पाहून मन अचंबित झाल्या खेरीज राहिलं नाही. कदाचित दोन्ही भाग डोंगराळ आणि दगडांची / खडकांची विपुलता असल्याने गरज म्हणून एकच तंत्र दोन्ही ठिकाणी एकाच वेळी विकसित झाले असावे.

20220730_093646.jpg

इथल्या घरांच्या भिंती रुंद तसेच जाड असतात आणि त्या ही उंच आणि रुंद गडगेच असतात. फक्त आतून सिमेंटचा गिलावा दिलेला असतो. ह्या दगडाचेच पातळ चौकोनी तुकडेच घरांवर कौलं म्हणून ही सगळीकडे घातलेले दिसले. आम्ही रहात होतो त्या घराच्या भिंती ही अश्याच होत्या. आधुनिक सुख सोयीने युक्त असलेलं ते घर ही खूप जुनं होतं. उंच सिलिंग, लाकडाचा भरपूर वापर, जुन्या पद्धतीची पण चालू स्थितीत असणारी फायर प्लेस , तिचं वर पर्यंत गेलेलं धुरांड, शेजारी कोळसे / लाकडं हलवण्या साठी ठेवलेले लांब लांब लोखंडी चिमटे, सळया इ साहित्य आणि छपराला मोठ्या मोठ्या काचा असलेला खोलीसारखा सुसज्ज माळा हे अनुभवायला खूप मजा आली.

फायर प्लेस

20220731_003006.jpg
भारतात मोसमी पाऊस असल्याने जनरली पाऊस नसेल तेव्हाच फिरणं होतं. कुठे नवीन जागी गेले की पावसात हे ठिकाण किती सुंदर दिसत असेल ह्या कल्पनेत मी कायमच रमते. ह्या ट्रिप मध्ये मात्र मला अगदी ह्याच्या उलट कल्पना करावी लागली. ह्या लेकच पाणी सूर्यप्रकाशात किती चमकेल किंवा निळ्याशार आकाशाच प्रतिबिंब ह्या तळ्याला ही कशी निळाई प्रदान करेल. संध्याकाळच्या पिवळ्या तांबूस उन्हात समोरचे डोंगर किती सुन्दर दिसतील अश्या कल्पनेतच रममाण व्हावं लागलं. सतत ढगाळलेलं आकाश, समोरच्या डोंगरावर रेंगाळणारे ढग आणि हलका किंवा जोरात पडणारा पाऊस ह्याचीच साथ होती कायम. अश्या ठिकाणी मला पाऊस जरी किती ही आवडत असला तरी थोडं वेळ तरी इथलं ऊन अनुभवावं अस मला मनातून इतक्या उत्कटतेने वाटत होतं की शेवटी आम्ही निघालो तेव्हा जणू सूर्यदेवाने आम्हाला बाय करायला हात हलवला दोन मिनिटं आणि माझं कल्पनेतलं सुर्यप्रकाशातल लेक डिस्ट्रिक्टच चित्र प्रत्यक्षात उतरलं.

20220724_220130_0.jpg

इथल्या देवदत्त निसर्ग सौंदर्यात कमीत कमी मानवी हस्तक्षेप हे ह्या भागाचं खरं वैशिष्ट्य आहे आणि तेच त्याच बलस्थान ही आहे. असो. चारी बाजूने टेकडीवजा असलेले हिरवे डोंगर, डोंगर उतारावर मजेत चरणारी गुरं, चढ उताराचे अरुंद रस्ते, घनदाट झाडीने रस्त्यावर उभारलेल्या कमानी, रस्त्याच्या कडेला दिसणारे तेरडा सदृश्य गुलाबी फुलांचे ताटवे, हलका किंवा जोरात पडणारा पाऊस, छोटी छोटी एक मजली घरं आणि छोटी छोटी गावं , आणि कायम सोबत करणारे गडगे मला कोकणची आठवण करून देत होते. जणू क्षणात लेक डिस्ट्रिक्ट आणि क्षणात कोकण असा मनाचा खेळ चार दिवस सतत सुरू होता.

हेमा वेलणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख प्रवास वर्णन व फोटो. किती अप्रतिम निसर्ग आहे. ब्रिटिश म्युझिअम व लेक डिस्त्रिक्ट प्रवास यादीत आहेत.

आधी तर फोटो पाहून घेतले.. फारच सुंदर
मग लेख .. तो ही तितकाच सुरेख..
आणि शेवटी कोकणचा उल्लेख आलाच हे बघून बरेही वाटले Happy

सुंदर वर्णन आणि फोटो!
ऐतिहासिक वस्तू आणि स्थळांची, परंपरांची (कधीकधी नको इतकी Wink ) जपणूक करावी तर ब्रिटिशांनी.
लेक डिस्ट्रिक्टबद्दल डॉ. जयंत नारळीकरांच्या आत्मचरित्रातही वाचलं आहे. त्यांचे गुरू फ्रेड हॉएल यांच्याबरोबर ते हायकिंग करायला तिथे गेले होते. फ्रेड हॉएल यांचं ते आवडतं ठिकाण होतं!

फोटोतली हिरवाई बघून डोळे निवले . टुमदार घरे काय मस्त वाटत आहेत बघायला . कोकण ट्रिप ला गेले की बरीच ड्रीम होम दिसतात . त्या यादीत वरच्या फोटोतली पण घातली . गडगे चा अर्थ काय ?

वा! काय सुंदर ठिकाण आहे हे. सगळे फोटो सुरेख आलेत. तुमचं वर्णनही अगदी चित्रदर्शी आहे.
कोविडच्या आधीपासून लंडन ट्रीप च चालू आहे . या ना त्या कारणाने रखडत आहे. आता मनावर घेतल पाहिजे.

<<< ऐतिहासिक वस्तू आणि स्थळांची, परंपरांची जपणूक करावी तर ब्रिटिशांनी>>>> सहमत

सगळ्यांना धन्यवाद .
फोटो रिसाईज करून इथे दाखवणे फारच जिकिरीचं गेलं, त्या गोंधळात डबल धागा उघडला गेला , admin ने केलाय आता तो डिलीट.

बघते अजून दोन चार फोटो अपलोड करता येतात का ते.

आणि शेवटी कोकणचा उल्लेख आलाच हे बघून बरेही वाटले >> ऋ, कुठे ही गेलं तरी कोकण न आठवण शक्यच नाहीये मला Happy

लेकी बरोबर लेक डिस्ट्रिक्ट ..भारीच वाटलं वाचून.

ऐतिहासिक वस्तू आणि स्थळांची, परंपरांची (कधीकधी नको इतकी Wink ) जपणूक करावी तर ब्रिटिशांनी. >> अगदी अगदी .. रिसेन्ट गोष्टी मी बिनधास्त टाकून देते नको असतील तर पण मला ही जुनं जुनं जपण्याची, नीट ठेवण्याची अतोनात आवड आहे . माझ्या कडे 1932 वैगरे सालचे मनोरंजन मासिकाचे अंक अजून आहेत. बघू काळाच्या ओघात किती दिवस जपून ठेवता येतायत ते ..

म्हणून लंडन मला आवडत. पायी फिरायला ते ही सेंट्रल लंडन मध्ये खूपच मजा येते.

जाई होऊ दे तुझी ट्रिप लवकरात लवकर ..

गडगा म्हणजे सीमा दाखवणारा दगडांचा बांध. >> बरोबर मस्त explain केलंस वावे .

मस्त वर्णन…. तिकडे समरसुद्धा पावसात Lol

फोटो खुप सुंदर आहेत. समरची त्यांना किती ती असोशी.. जागोजागी फुलांचे ताटवे…

बाहेर गेले की वेज वाल्यांचे हाल होतात हे ऐकलेय. तु मात्र भारतीय होटेलकडे न पाहताही वेज जेवण मिळवु शकलीस..

फोटो रिसाईज करून इथे दाखवणे फारच जिकिरीचं गेलं,
>>>>
मी मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतो. आणि तो क्रॉप करतो. ते योग्य साईजला येतात आणि क्लीअरही दिसतात. ट्राय करा.

वाह. खुपच सुंदर फोटो आणि लेख सुध्दा. डोळ्यांचे पारणे फिटले अगदी.

हेरिटेज ट्रेन फारच छान. हॅरी पॉटर आणि शेरलॉक होम्स सिरीयल मधल्या ट्रेन्स आठवल्या एकदम.

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

बाहेर गेले की वेज वाल्यांचे हाल होतात हे ऐकलेय. तु मात्र भारतीय होटेलकडे न पाहताही वेज जेवण मिळवु शकलीस.. >> साधना , वेज मध्ये नक्कीच जास्त option असतात पण हल्ली इथे विगन खूप पॉप्युलर आहे. त्यामुळे मिळतं. तिकडे जाऊन indian खाणं कल्पनाच आवडत नाही. लोकल कधी खायचं मग अस वाटत.

मी मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतो. आणि तो क्रॉप करतो. ते योग्य साईजला येतात आणि क्लीअरही दिसतात. ट्राय करा. > करते ऋ.

सुंदर फोटो आणी तितकाच सुंदर लेख.
मलाही एकदा लंडन आणी आसपासचा परिसर बघायचा आहे. पी. जी वूडहाऊस आणी अगाथा क्रिस्टी वाचून वाचून डोळ्यासमोर हे असेच फोटो डोळ्यासमोर यायचे.

सुरेख वर्णन आणी तितकेच सुरेख फोटो. ममो, काही वर्षापूर्वी पद्मिनी कोल्हापुरेने लोकप्रभा मध्ये या परीसराची माहिती व फोटो दिले होते, तेव्हापासुन हे नाव डोक्यात होते. छान वाटले वाचुन. अशीच प्रवास वर्णने लिहीत जा.

खूप छान लिहिलं आहे मनिमोहोर. लेक डिस्ट्रिक्ट खूप सुंदर आहे. अतिशय निसर्गरम्य. आम्ही गेलो होतो तेव्हा जिकडेतिकडे daffodils फुलली होती. Wordsworth च्या घराभोवती तर खास लावली आहेत daffodils. Peter rabbit आणि इतर बालकथा लिहिणारी Beatrix Potter पण लेक डिस्ट्रिक्टची.

रश्मी, मंदार कात्रे, नीलमपरी अनिंद्य थॅंक्यु सर्वांना ...

नीलमपरी, वर्ड्सवर्थ च्या घराभोवती डॅफोडील्स पहाताना काय सुंदर वाटलं असेल ना ...

मस्त सफर!

१२ तलाव! इंग्लंडचे ठाणेच बघितलं तुम्ही.

शहरातले पावसाळी कुंद वातावरण फरसे आवडत नाही पण असा निसर्गातला पाउस खूप सुरेख असतो.

गडगा हे नुसते कुंपण नसते, त्याला स्वतःचे एक रुप अस्ते... ओबड-धोबड दगडांतून आलेले !

मस्त सफर! थॅंक्यु माधव.

१२ तलाव! इंग्लंडचे ठाणेच बघितलं तुम्ही. >> इंग्लडचे ठाणे हे फारच भारी.

शहरातले पावसाळी कुंद वातावरण फरसे आवडत नाही पण असा निसर्गातला पाउस खूप सुरेख असतो. >> अगदी अगदी पाऊस ही फारच मस्त वाटत होता.

गडगा हे नुसते कुंपण नसते, त्याला स्वतःचे एक रुप अस्ते... ओबड-धोबड दगडांतून आलेले ! >> 1000+ ह्या साठी . अप्रतिम ...गडगा जिवंत केलात ह्या वाक्याने. कोकणी माणसाच्या भावना नेमक्या शब्दात मांडल्यात ह्या करता…