वेगळा भाग - २०

Submitted by निशा राकेश on 23 July, 2022 - 16:33

जयाला काही कळेना , रामने तिला कानातल्याचे जोड दिले होते , निळ्या रंगाच्या खड्याचे सोनेरी डूल होते ते, त्याला काही विचारव तर तो रस्ता ओलांडून पलीकडे निघून देखील गेला,

तिने ते जोड कोणालाही न दाखवता तिच्या दप्तरात तसेच ठेऊन दिले , तिच्या मनातली रामच्या बाबतीत वाटून राहलेली रागाची जागा आता कुतूहलाने घेतली होती .

विजय आणि राम पुढच शिक्षण आता कस घ्यायचं , कोणती साईट निवडायची आणि कामच काय करायचं ह्या विचारात होते , कारण दोघांनाही शिक्षणासोबत काम करणे अनिवार्य होत, विजय देखील कामला जाता याव म्हणूच रात्र शाळेत जायचा.

राम आणि विजय दोघांनी कॉमर्स साईट घेतली , खूप शोधाशोध केली तरी त्यांना नाईट कॉलेज सापडलं नाही .

नाही म्हटलं तरी राम चे मालक मनाने खूप चांगले होते , त्यांनी रामला ह्या आधी देखील त्याच्या शिक्षणासाठी बरच सहकार्य केल होत , पण विजय ज्या कंपनीत नोकरी करायचा ती कंपनी खूप मोठी होती , कुणाला कुणाशी काही देण घेण नसायच तुमच काम करा , पगार घ्या आणि घरी जा.

विजय आधी बरेच दिवस सकाळच्या शिफ्ट मध्ये काम करायचा , आता अचानक शिफ्ट बदलून घ्यायची म्हंटल्यावर त्याला त्याच्या सुपरवायजर ची बरीच खुशामत करावी लागली होती , अखेर सतत मागे घोशा लावल्याने विजय ला दुपारची शिफ्ट मिळाली.

कॉलेज सकाळच असल्यामुळे दोघंही आता सेकंड शिफ्ट मध्ये काम करू लागले , कॉलेज वरून घरी आले कि पटापट दोन घास पोटात ढकलायचे आणि कामाला जायचं हे त्याच रोजच सुरु झाल.

कधी कधी तर विजयला इतका उशीर होई मग तो परस्पर घरी न जाता तसाच कामावर निघून जाई , राम मात्र ह्या बाबतीत सुदैवी होता , तो घरी जाऊन जेवण करून मगच कामावर जायचा . विजयच्या धावपळीच त्याला वाईट वाटे पण तो ह्याबाबतीत त्याला तो आता तरी काही मदत करू शकत न्हवता ,

कॉलेज सुरु होऊन महिना दोन महिने झाले होते , ऐके दिवशी कॉलेज मध्ये लेक्चर संपल त्या नंतर सर्व मुलमुली आपापाली पुस्तक घेऊन निघू लागली तितक्यात कॉलेज चे निवाते सर वर्गात आले, निवाते सर त्यांना अर्थशास्त्र शिकवायचे त्यांनी सर्व मुलांना बसायला सांगितलं आणि ते कॉलेजच्या काही एक्सट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती देऊ लागले , राम आणि विजय ह्याचं सरांच्या बोलण्यापेक्षा भिंतीवरच्या घड्याळा कडे जास्त लक्ष होत , सर निवांत होऊन बोलत होते त्यांना ह्या दोघांचा काहीही अंदाज न्हवता , एकदाच त्याचं बोलन संपल तसं सर्व मुलांच्या आधी राम आणि विजय धावतच कॉलेज बाहेर पडले , राम विजय साठी पटापट चालत होता , रामच्या लक्षात आल हातातल्या पुस्तकांमुळे विजय पटापट चालू शकत नाहीये ,आणि त्याला वेळेत ड्युटी जॉईन करण गरेजच आहे म्हणून राम ने विजयाला त्याची पुस्तक स्वतः जवळ द्यायला सांगितली, राम ती विजय च्या घरी देऊन मग कामावर जाणार होता , विजय ने आधी नकार दिला पण अखेर त्यांनी त्याने रामच ऐकल.

राम त्याची पुस्तक घेऊन विजयच्या घराकडे गेला , समोरचा दरवाजा बंद होता त्याने एक दोनदा जयाला व सुशीलाबाईना आवाज देऊन पहिला
काही प्रतिउत्तर आल नाही म्हणून मग तो मागच्या दरवाज्या पाशी गेला तर तिकडे जया एकटीच अंगणात काही तरी लिहित बसलेली त्याला दिसली,

“जया, विजयची पुस्तकं , “ अस म्हणून राम ने पुस्तकांची पिशवी जयाला दाखवली .

कानातले दिल्या नंतरच्या प्रसंगानंतर प्रथमच राम आणि जया समोर समोर भेटत होते,

तिने ती पिशवी पुढे जाऊन राम च्या हातातून घेतली ,

राम ने सहज म्हणून “ अभ्यास चालू आहे का “ अस विचारल.

“नाही कविता करतेय”

“ तुला येतात कविता करता, बघू तरी काय केलीस कविता “ राम ने आश्चर्याने विचारल.

“ हो , पण आधी सांग हे देण्याच कारण “ अस म्हणून तिने घातलेले कानातले चिमटीत पकडून रामला विचारल.

“कारण काहीच नाही , मला आवडले म्हणून मी घेतले.”

“माझ्यासाठी म्हणून घेतलेस होतेस का ? ” जयाने राम च्या डोळ्यात पाहत विचारल.

“नाही, मी ते झेंडु साठी घेतले होते , तू त्या दिवशी रागवली होतीस म्हणून मग मी ते तुला दिले” राम ने खाली मन घालून उत्तर दिल.

जया मनातून नाही म्हटलं तरी बरीच चड्फडली कारण तिला राम बद्दल आकर्षण वाटत होत , आता त्यात राम ने स्वताहून काही तरी दिल म्हणून तिला मनापासून आनंद झाला होता , पण राम ने सर्व खर सांगितल्या मुळे तिची निराशा झाली, चेहऱ्यावर तसं काही न दाखवता ती त्याला म्हणाली.

“माझी कविता वाचायची होती ना तुला , थांब आणते” अस म्हणून तिने त्या लिहिलेल्या कवितेच पान फाडल आणि त्याला दिल.

“ अग पान का फाडलं , वहीच द्यायची ना , मी पटकन वाचून दिली असती “

“ कविता अशी घाईत वाचायची नसते , तुला कामावर जायचय असेल ना , निवांत वाच “ अस म्हणून ती पुन्हा तिच्या जागेवर बसून काहीतरी लिहू लागली.

राम ने तो कागद व्यवस्थित घडी करून खिशात ठेवला आणि जाता जाता मागे वळून जयाकडे पाहिलं ,

जया तिच्या कानातले डूल काढून ठेवीत होती.

कामावरून घरी यायला रामला खूप उशीर व्हायचा , झेंडु देखील तिचा अभ्यास सांभाळून थोडी जास्त काम करू लागली होती , दादा तिला स्वयपाकात मदत करायचे म्हणून राम घरी आल्यावर जेवून झाल कि तो एक दोन तास अभ्यास करीत असे आणि मग झोपत असे , पण आज त्याने अभ्यास न करता जेऊन झाल्यावर लगेचच अंथरुणावर अंग टाकल , पण अचानक त्याला जयाच्या कवितेची आठवण झाली त्याने झटकन उठून शर्टच्या खिशातली कविता काढली , घरात लाईट बंद करून सर्व झोपले होते म्हणून पुन्हा लाईट चालू करण त्याला प्रशस्थ वाटेना त्याने शर्ट अंगात चढवला आणि तो सरळ आधी जिथे झोपायचा त्या पडलेल्या घराच्या ओसरीवर जाऊन बसला , निघताना त्याने खिशातून मेणबत्ती आणि काडेपेटी आणली होती ,त्याने आधी मेणबत्ती पेटवली आणि तिच्या प्रकाशात त्याने तो कवितेचा कागद उघडला सुंदर आणि वळणदार अक्षरात जयाने कविता लिहिली होती. राम कविता वाचू लागला .

कवितेच नाव : आधार

तुझ्या मनाच्या वस्तीत
एक घर मला बांधू दे …
उन्हा थंडी पावसात
थोडा आसरा मला शोधू दे…..
माहितीये मला तू काही बोलणार नाही
माझं अस्तित्व तुला जाणवणारही नाही……
एक फडफडणार पान मी तुझ्या झाडाचं
बहरलं, सुकलं, चुरगाळलं तरीही तू निश्चल वटवृक्षासारखा….
थोडासा आधार दे तुझ्या अस्तित्वाचा मला
अनुभवाचय तुझं अस्तित्व मला माझ्यात….
सावरायचंय मला स्वतःला तुझ्या अस्तित्वाने
जगायचंय हे आयुष्य फक्त तुझ्याच आधाराने ..

राम ने ती कविता दोन –तीन वेळा वाचली पहिल्यांदा तर हि कविता तिने केलीच नसेल तिने आपल्याला खोट सांगितलं अस त्याला वाटल , पण नंतर मात्र त्याला ती कविता जयाचीच वाटू लागली .

वाचून झाल्यावर त्याने मेणबत्ती विजवली , कवितेचा कागद घडी करून खिशात ठेवला आणि त्याने वर आकाशात पाहिलं , आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या , त्याने त्याच्याही नकळत चांदण्या मोजायला सुरुवात केली ,

दूर कुठेतरी रेडीओ वर लता तिच्या सुमधुर आवाजात गात होती

“आजा सनम मधुर चांदनी मे हम-तुम मिले
तो वीराने ने भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमा”

दिवसांमागून दिवस जात होते कॉलेज सुरु होऊन सहा महिने होऊन गेले , विजय आणि रामच काम आणि कॉलेज दोन्ही उत्तम चालू होत ,
पण विजयच्या घरी जाण आणि जयाशी बोलन राम थोड टाळू लागला, त्या दिवशी जयाच्या नजरेत आणि तिच्या कवितेत त्याला अस्पष्ट अस काहीतरी जाणवलं होत ,
जे त्याला पुढे वाढू नये वाटत होत पण जयाची कविता मात्र त्याने जपून ठेवली होती.

त्या दिवशी दुपारी जेव्हा राम कॉलेज वरून घरी आला , जेवून त्याला कामाला निघायचं होत म्हणून तो घाई करत होता आणि त्यावेळी झेंडु एका दोन महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घेऊन घरी आली , ते बाळ अतिशय गोंडस आणि बाळसेदार होत, राम बाळाला बघून खूप खुश झाला त्याला कामावर जायचय हे देखील तो विसरून गेला ,

“ कोण आहेस रे तू , पिटुकल्या , कुठून आलास “ अस म्हणून त्याने बाळाला उचलून घेतलं आणि तो त्याच्या दोन्ही गालांचे पापे घेऊ लागला .
“ अरे दादा, आपल्या बायडीचा मुलगा आहे हा , छान आहे ना “ झेंडु अतिशय उत्साहात म्हणाली.

बायडाच नाव ऐकताच राम थबकला, त्या बाळाला त्याने निरखून पाहिलं , त्यावेळी त्याचे डोळे त्याला बायाडा सारखेच दिसले त्याने त्या बाळाला प्रेमाने हळुवार छातीशी कवटाळ, डोळे बंद करून जणू त्याला आपल्यात सामावून घेत तो शांत उभा राहिला.

“ अरे मला तर दे , आल्यापासून तूच घेतोयस “ झेंडु अस म्हणताच तो भानावर आला, झेंडु कडे बाळाला देऊन तो घराबाहेर पडला , कामात त्याच लक्ष लागत न्हवत पण घरी लौकर गेलो तर कदाचित बायडाशी भेट होईल म्हणून रोजच्या प्रमाणे घरी येऊन देखील सर्व निजाजीज होई पर्यंत तो दत्त मंदिरात बसून राहिला .

जेव्हा तो घरी आला तेव्हा इतक्या रात्री देखील बायडा घरात येऊन झेंडु सोबत बोलत बसली होती ,जणू ती त्याला भेटायलाच थांबली होती , तिला पाहताच तो घरात न येता आल्या पाऊली बाहेर निघून गेला , त्याच्या नेहमीच्या झोपायच्या जागी म्हणजे त्या पडक्या घराच्या ओसरीवर अस्वस्थ मनाने बसून होता , त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने चमकून पाहिलं तर ती बायडा होती ,

“कसा हैइस” बायडा ने त्याच्या शेजारी बसत विचारल.

“मी बरा आहे , तू कशीयेस ,ठीक आहे ना सर्व “ रामने तिची नजर टाळत विचारल.

“ पदरी पडल ध्यान , आणि हसून म्हणाव छान “ बायडा उपहासाने म्हणाली .

“का , अस का म्हणतेस, खुश आहेस ना “

“खूशच म्हणायचं आता , माझ जाऊदे , तू नक्की बारा हैईस ना , मला काकींच कळल , अस कस झाल अचानक”

“तू माझ्या आयुष्यातून गेलीस आणि काहीच दिवसात आई देखील गेली , कॅन्सर झाला होता तिला , तीन- चार महिन्यातच सर्व आटोपलं मला जमेल तितक मी सर्व केल, पण नाही वाचली , गेली , कधी कधी फार एकट वाटत मग मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी टेकडीवर जाऊन बसतो , संध्याकाळचा , मावळत्या सूर्याला पाहतो आणि त्यासोबतच माझ दु:ख विसरायचा प्रयन्त करतो” राम उसण हसू आणत म्हणाला.

“लय वाईट झाल , पण तू सवताला एकट का समजतूस , झेंडु, दादा , चंदू , समदे हैईत कि इथ आणि मी पण हाय आता इथच “

“तू आता इथच आहेस म्हणजे , “ राम ने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.

“माझ भाडंण झाल काल माझ्या नवर्याशी माझ काय पाटत नाय तिकड , लय झाल इतके दिवस गप्प बसले , नंदा आणि सासू मिळून माझ्या नवर्याचे लय कान भरतात, आणि माझ्या नवरा त्यांचच ऐकून मारतो मला , मी आता नाय जायची परत” बायडा चिडून बोलत होती.

“होईल सगळ नीट , असा तडकाफडकी निर्णय नको घेउस , परत नाही गेलीस तर तुझ्या बाळाच काय , त्याला कुठे ठेवशील , कस वाढवशील”

“आपण करू कि लगीन , माझ्या बाळाला तुझ नाव देशील ना तू “ बायडा राम कडे आशेने पाहत म्हणाली.

रामला अचानक तिच्या ह्या वाक्याने पुढे काय बोलाव हे सुचेना .

“ बायडे , मला हे ठीक नाही वाटत , मान्य आहे ग , आपल खूप प्रेम होत एकमेकांवर , तू पाहिलस ना मी किती समजावलं आबांना , तुझी मौशी माझ्या पाया पडायला लागली मग मी काय करणार होतो माझ्याकडे काय इलाज होता , दोन दिवस तिथेच वाकडला एस्टी स्टोप वर बसून होतो पण जेव्हा तुझ्या नवर्याला पाहिलं, तुझ लग्न होताना पाहिलं , तेव्हा मग मला कुठेतरी वाटल , आपण फार लहान आहोत , लग्न करायचं हे वयच न्हवत आपल , आणि आपल्प्या नशिबात न्हवत एक होण , विसरून जा सर्व आणि परत जा , काही दिवसाने खरच सर्व ठीक होईल , तुझ्यासाठी नाही तर मी म्हणतोय म्हणून तरी जा , तुझ्या बाळा साठी जा “ राम तिला जमेल तितक समजावू लागला .

“ तुझ लगीन झाल असत न मग कळल असत तुला , लगीन काय असत ते , पोरींच आयुष्य सोप्प नसत, तुला काय माहित , इथ जितपणी रोज मरण भोगव लागतंय “ अस म्हणून बायडा चेहरा ओंजळीत लपवून रडू लागली .

रामला तीच रडण सहन झाल नाही तिला त्याने तिला जवळ घेतलं आणि तो तिला थोपटून शांत करू लागला ,

राम चा स्पर्श होताच बायडा त्याला आणखीन घट्ट बिलगु लागली , आपले ओठ त्याच्या ओठांजवळ न्हेताच, राम पटकन तिच्या पासून लांब झाला .

“काय करतेस तू ,” राम चिडला तिच्यावर.

“ तुला काय झालय पण ” बायडा त्याच्याकडे निराश होऊन पाहू लागली .

“ हे बघ जया..........मी “ अस बोलून राम थांबला, त्याला त्याची चूक लक्षात आली त्याने बायडाला जया म्हणून हाक मारली होती.

“जया , कोण हि जया ,म्हणून आता मी नको व्हय, मला आधीच कळाया पाहिजे होत ,खूप दिस झाल का आपल्याला येगळ होऊन , तुम्ही सगळ पुरुष सारखच, तुम्हाला कसला बी फरक पडत न्हाय, कोणी तुमच्यासाठी जीव बी दिला तरी तुम्ही इसरून जाल, आणि इथ तर मी जिती हाय अजून , तू असा वागशील अस कदी वाटल न्हवत मला, पुण्यांदा तोंड दाखवू नगस तुझ”

अस म्हणून बायडा तनतनच तिथून निघून गेली , राम मात्र सुन्न झाला , जयाच आणि माझ काहीही नात नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस अस काही तरी बोलायचं होत पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत तो पाठमोऱ्या बायडाला तसाच पाहत उभा राहिला.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान हा भाग सुद्धा
छोटीशी कविता आवडली
आता हा वेगळा भाग पुढे काय दाखवणार ह्याची उत्सुकता आहे