वेगळा भाग -१९

Submitted by निशा राकेश on 22 July, 2022 - 10:25

आई गेल्या नंतर तीच दहाव झाल्यानंतर बाबू शाळेत आणि कामावर जाऊ लागला , सकाळी लौकर उठून तो सर्वांसाठी त्याच्या परीने जमेल तशी भाजी -चपाती बनवत असे , झेंडु त्याला चपात्या लाटायला , कांदे – टमाटे चिरून द्यायला मदत करी , तो तिला जास्त स्टोव्ह जवळ काम करू देत नसे,
तू चहा देखील मी घरात असेल तरच बनवायचा अस त्याने तिला ठाम बजावलं होत , सकाळीच दादा आणि बाबू कामावर गेल्यावर , झेंडु केर काढून फरशी साफ करी , सर्वांचे कपडे धुणे आणि रात्रीच जेवण बनवायचं काम बाबू आणि झेंडु दोघे मिळून रात्री करायचे , त्यामुळे एकट्या झेंडु वर आणि एकट्या बाबू वर घरातल्या सर्व कामाची जबाबदारी पडायची नाही.

चंदूने आई गेल्यावर शाळा देखील सोडून दिली होती , कधी कधी तर तो चार-चार दिवस घरी येत नसे , कधी घरी आलाच तर त्याचा अवतार हा एका रस्त्या वरच्या भिकाऱ्या सारखा असे , मग दादा आणि झेंडु, बाबू यायच्या आत त्याची अंघोळ उरकून त्याला काहीतरी खायला देऊन झोपवीत असे ,
चंदुला बघून बाबूची चीड -चीड होई , त्यांची भांडणे होऊ नये म्हणून त्यांना ते एकमेकांसमोर येऊ देत नसत , चंदूला गांज्या पिण्याच व्यसन लागल होत ,
तो कुठून माहित नाही पण घरी आला कि गांजा पिऊन तऱ्हाट होऊन झोकांड्या खात घरी येत असे , त्याला प्रचंड भूक लागलेली असायची म्हणून तो स्वयपाक घरातील सर्व डब्बे , भांडी , काही खायला सापडतंय का ते पहायचा , काही खायला मिळाल नाही तर तो झेंडूला बडबड करी कधी कधी तर मारायला हि धावे , मग झेंडु बाबू ने नाही सांगितलं असताना देखील हि स्टोव्ह पेटवून चंदुला चहा करून देई , शेजारच्या दुकानातून उधारीवर डझनभर पाव आणून त्याला खायला देई , झेंडु देखील चंदूला खूप बडबड करी , पण चंदू तिला अजिबात दाद देत नसे , तो फक्त थोडाफार बाबूला घाबरे, बाबू आला कि मात्र झोप आली नसेल तरी गप्प पांघरून घेऊन पडून राही , बाबू ने त्याच्यावर हात उचल्या पासून त्याला बाबूच्या ताकदीचा अंदाज आला होता ,म्हणून तो त्याला आता उलट बोलत नसे , गांजा ओढून ओढून त्याची तब्बेत फारच सुकून गेली होती , बरगड्यांची हाड दिसायला लागली होती , मुळात बाबू पेक्षा देखील देखणा दिसणारा चंदू आता त्याची पार रया गेली होती .

आई गेल्या नंतर दादांनी चंदू ला खूप समजावलं , “चांद्या अस वागू नकोस , त्रास होतो र तुझ्या अश्या वागण्याचा मला “ दादा कधी कधी त्याच्या समोर रडत , मग चंदू ला कधी कधी दादांची दया येई , कारण आईचा लाडका फक्त बाबू आहे हे त्याने मनाशी खूप आधीच पक्क केल असल्यामुळे त्याला दादा त्याच्या जवळ चे वाटत ,
तो मग दादांना वचन देई “ नाही दादा मी नाही वागणार पुन्हा तसा , मी नाही तुम्हाला त्रास देणार “ असे म्हणी पण मग चार दिवसांनी पुन्हा गांजा ची तल्लफ आली , की घरातल्या वस्तू , कधी पैसे , घड्याळ , भांडी देखील तो चोरून विकायला घेऊन जाई , आणि त्यातून आलेल्या पैशातून भयंकर नशा करे, अलीकडे अति व्यसनाने तो थोडा भ्रमिष्टा सारखा वागू बोलू लागला होता , एक दिवस जेव्हा तो घरी आला तसाच चिखलात लोळून आल्यासारखं ते अंग आणि ते फाटलेले कपडे, येऊन तो खायला काही न शोधता एक कोपरा पकडून पोटाशी पाय घेऊन बसून नुसता राहिला , झेंडु ने त्याला जेवायला वाढल , पण त्याने जेवणाकडे लक्ष देखील दिल नाही , मग तिने ताट उचलून ठेवलं आणि ती दादांच्या येण्याची वाट पाहू लागली ,दादा आले त्यांनी देखील त्याला अंघोळ कर , कपडे बदल , जेव अस खूप काही सांगून पाहिलं पण तो नुसता शून्यात नजर लाऊन एकटक कुठेतरी पाहत होता , शेवटी जेव्हा बाबू घरी आला तेव्हा बाबूने त्याला हाताने उचलत मोरीत न्हेवून अंघोळ घातली , त्याला स्वच्छ कपडे घातले , त्याला हाताने तो भरवू लागला , एक घास पोटात गेल्यावर त्याला भुकेची जाणीव झाली तसं त्याने बाबू कडून ताट हिसकावून घेतलं आणि अधाश्यासारखा खाऊ लागला , खाताना त्याचं तोंड , मनगटा पर्यंत हात बरबटले , झेंडु त्याला तसं वागताना पाहून रडू लागली , दादा देखील उठून बाहेर निघून गेले , बाबू त्याच संपूर्ण जेवण होई पर्यंत तिथेच बसून होता , त्याच तोंड हात सर्व साफ करून चंदुला त्याने अंथरुणावर झोपवल व तसाच त्याला थोपटत तिथेच बसून राहिला , त्याला गाढ झोपलेलं बघून तो दादान्कडे गेला ,

दादा विडी ओढत घराबाहेर एका कठड्यावर बसले होते ,
“ दादा , चला जेवून घेऊ” बाबू दादांना म्हणाला.

“चांद्या झोपला “ दादांनी बाबूकडे न बघतच विचारल.

“ हो , चला तुम्ही”

“ चांद्या अस का करत असल” दादा लांब कुठेतरी शून्यात नजर ठेऊन बोलत होते.

“सतत व्यसन करून , त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला दिसतोय” बाबू ने उत्तर दिल.

“ तुझ्या आईच्या आजारपणात पोर कधी हातच निसटून गेल कळल बी नाय”

ह्यावर बाबू काहीच बोल्ला नाही कारण , चंदुला व्यसन करायची सवय फार आधी पासून लागली होती , तेव्हाच जर त्याच्या सर्व गोष्टीना दादांनी वेळीच आळा घातला असता , त्याला लांब कुठेतरी निदान बोर्डिंग मध्ये ठेवलं असत तर कदाचित चंदूच्या बाबतीत आज जे घडतंय ते घडल नसत , पण दादांनी तसं नाही केल कारण काहीही असो पण चंदुच अस होण्या मध्ये कुठेतरी दादा जबाबदार आहेत अस बाबुला वाटत होत ,
बाबू दादांची विडी कधी पिऊन होते ह्याची वाट पाहत तिथेच बसून राहिला.

“डाक्टर कड घेऊन जाव लागल त्याला” ह्यावेळी मात्र दादांनी बाबुकडे पाहिलं.

“हो , बघू , तुम्ही चला आता घरात” अस म्हणून तो घराच्या दिशेने चालू लागला.

दिवसेंदिवस चंदूचा विक्षिप्त पणा वाढत होता , कधी तो दिवस दिवस झोपून राही , तर कधी दिवसरात्र नुसता एका कोपर्यात बसून राही , कधी कधी सतत झेंडूला जेवायला मागी, नाहीतर कधी दोन दोन दिवस देखील उपाशी राही.

दादांनी त्याचा ओळखीच्या माणसात एक दोन जणांशी बोलून चंदूला मानसिक रुग्णांच्या दवाखान्यातून दाखवून आणल , त्याची औषध सुरु झाली , पण औषधांची गुंगी इतकी होती कि तो संध्याकाळी देखील पांघरून घेऊन सदैव झोपलेला असे ,

बाबूला मात्र त्याच्यासाठी काही करायचा , त्याच्याशी बोलायचा मनस्वी कंटाळा येई , आधीच त्याच पहिल्यापासून त्याच्याशी पटत न्हवत , आणि तसही आईच्या आजारपणात काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे होते , आई चे शेवटचे शब्द खूप शिक अस ती म्हणाली होती म्हणून त्याला त्याचा राहिलेला सर्व अभ्यास भरून काढायचा होता , त्यामुळे दादा जे काही चंदू साठी करत होते ते एकटेच करत होते , कधी कधी झेंडु त्यांना तिचा अभ्यास आणि घरातली काम सांभाळून लागेल ती मदत करायची पण बाबुला मात्र काही सांगायची दादांची हिम्मत होत न्हवती ,

चंदू औषध खात होता , त्यामुळे त्याच विक्षिप्त वागण बंद जरी झाल असल तरी तो गप्प गप्प राहू लागला , तो पहिल्या सारखा झेंडु शी भांडत देखील नसे , त्यामुळे नाही म्हंटल तरी घरात थोडी तरी शांतता बाबुला मिळाली ,

बाबू ची वार्षिक परीक्षा जवळ आली होती म्हणून त्याने कामावर सुट्टी काढून ठेवली होती , तो रात्र रात्र जागून आणि दिवसा उजेडी टेकडी वर जाऊन त्याचा अभ्यास करीत असे.

त्याच्या वर्गात विजय नावाचा एक हुशार विद्यार्थी होता , अभ्यासात बाबू त्याची मदत घेत असे , विजय देखील काहीही स्वार्थ न ठेवता त्याला मनापासून मदत करी , बाबू कधी कधी त्याच्या घरी जाऊन देखील अभ्यास करीत असे , विजयला बाबू ची सर्व परिस्थिती माहित होती.

विजयला एक धाकटी बहिण होती त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान तीच नाव “जया”, जया पंजाबी ड्रेस घालायची त्यावर त्याच रंगाची पांघरलेली ओढणी आणि दोन लांब वेण्या , जयाला बघून आपण देखील झेंडु थोडी मोठी झाली कि तिला देखील असेच छान छान ड्रेस घेऊन देऊ , आपल्या प्रत्येक पगाराला अस बाबुला वाटे , जया बाबू शी अनेक विषयांवर बोलत असे , एकदा तिने बाबुला त्याचे खरे नाव विचारले , जेव्हा बाबू ने त्याच्या रामचंद ह्या नावाचा उल्लेख केला तेव्हा पासून जया त्याला बाबू न बोलता राम म्हणून हाक मारू लागली , मग विजय आणि त्याच्या घरातले देखील त्याला राम म्हणूनच हाक मारू लागले.

राम जेव्हा केव्हा घरी येई तेव्हा जया स्वतःच्या हाताने चहा आणि काहीतरी खायला बनवून रामाला देत असे , विजय आणि राम अभ्यास करीत असले तर ती देखील स्वतः च्या अभ्यासाची पुस्तके काढून त्याच्या सोबत अभ्यास करी.

राम चा गणित विषय चांगला होता , कधी कधी गणितातल्या काही काही शंका ती विजयला न विचारता सरळ राम ला विचारी , आणि राम मात्र स्वताचा अभ्यास सोडून तिच्या शंकेचे निरसन करण्यात मग्न होई , मग विजय ने आठवण करून दिल्यावर पुन्हा स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष देई ,

राम ची वार्षिक परीक्षा खूप छान गेली, राम चांगल्या मार्कांनी पास झाला , राम ला मात्र त्याच वर्ष वाया गेल नाही ह्याचच समाधान जास्त होत.

तो पेढे घेऊन विजयच्या घरी गेला , तेव्हा विजयच्या आई सुशीलाबाईनी विजयला काही तरी आणण्यासाठी दुकानात पाठवल होत ,

बाहेरच्या खोलीत जया एकटीच पुस्तक वाचत बसली होती , राम ला येताना पाहून “आज काय विशेष पेढे बिढे “ अस त्याला खुणेनेच विचारल ,

पण राम ने तिला आधी काहीही न सांगता “ विजय कुठंय “ अस विचारल ,

बाहेर कुणाची तरी चाहूल लागलेली पाहून सुशीलाबाईनी “ जयू, कोण आलाय ग बाहेर “ अस आतूनच विचारल

“ मौशी , मी आहे रामचंद”

राम आलाय हे पाहताच सुशीलाबाई पदराला हात पुसत बाहेर आल्या , राम ने त्यांच्या पायाला स्पर्श करून आधी त्यांना नमस्कार केला आणि मग त्याने त्याच्या हातावर पेढा ठेवत “ मी पास झालो “ अस सांगितलं.

सुशीला बाईनी प्रेमाने त्याच्यावरून हात ओवाळले , “ खूप छान , शब्बास “ अस त्या म्हणल्या.

सुशीला बाईच्या त्या कृतीने राम ला आईची आठवण झाली आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळल.
त्यावेळी विजय ला देखील आलेला पाहून राम ने त्याला आधी कडकडून मिठी मारली आणि स्वतःच्या हाताने विजयला पेढा भरवला, मग विजय ने देखील खुश होऊन राम ला पेढा भरवला , राम स्वतःचा आनंद विजयच्या घरच्यांसोबत वाटून खूप खुश झाला ,

पण इतक सगळ असूनही तो जयाला मात्र पेढा द्यायला साफ विसरला , आणि विजय सोबत त्याच्या वर्गातल्या इतर मुलांचे रिझल्ट कुणाला किती मार्क्स पडले , पुढे आता कोणती साईट निवडायची , कॉलेज कोणत चांगल आहे ह्याबद्दल चर्चा करू लागला .

जया ने खूप वेळ वाट पहिली आणि मग ती आतल्या घरात निघून गेली , आणि मागच्या दारातून सरळ ती त्याच्या मागच्या अंगणात जाऊन बसली .

मागून घरातून रामच्या बोलण्याचे आवाज तिला येतच होते , पण तिला काय झाल होत हे तिलाच कळत न्हवत , “ ठीक आहे विसरला असेल , किती खुश आहे राम आज , नसेल राहील लक्षात , पेढा आहे तो , तू काय कधी पेढे खाल्ले नाहीत काय , पण इन मीन तीन माणस तर होतो तिकडे , आणि तसं हि घरी आल्या आल्या आधी मला भेटला , तरी त्याने आधी मला नाही संगीतल , काय समजतो स्वतःला , अरे बास आपण किती स्वतःशीच बोलतोय , आपण सरळ जाऊन त्यालाच विचारू म्हणजे काय होईल , त्याने काय होईल , सॉरी सॉरी म्हणेल , माफी मागेल , आणि मग पेढा देईल , माझ्या मनाला जे आता वाईट वाटलंय ते थोडीची पुसलं जाणार आहे” स्वतःशीच बोलत , स्वतःलाच समजवात ती खूप वेळ तशीच बसून राहिली ,

आतून सुशीला बाईनी जायला आवाज दिला तशी ती उठून आत गेली , “ हे पोहे आणि चहा दे बाहेर “

“ ए आई , मी नाही हा , तुझ तू घेऊन जा “ जया चिडून आईला म्हणाली.

“अग , अस काय करतेस , पाहतेस ना , मी भाजी चीरतेय ,”

“आण , माझ्याकडे मी चिरते ,” अस म्हणून तिने सुशीला बाईच्या हातातली भाजी घेतली आणि स्वतः चिरू लागली .

राम चे चहा पोहे खाऊन झाल्यावर तो सुशीलाबाईनच निरोप घेऊन जायला निघाला,

आणि आत डोकवत काहीतरी शोधू लागला , वास्तविक तो जया ला शोधत होता , पण ती काही त्याला दिसेना मग तो हळूच विजयला म्हणाला , “ अरे विजय , मघाशी आनंदाच्या भरात जायला पेढा द्यायला विसरलो ,प्लीज तिला हा पेढा दे”

विजय ने देखील “ हो अरे , ठीक आहे अस म्हणत , तो पेढा घेतला”

राम विजयच्या घरातून बाहेर पडला , राम चा घरी जायचा रस्ता हा विजयच्या घरला वळसा घालून असल्यामुळे त्याला मागच्या अंगणात बसलेली जया दिसली , त्याने पटकन तिला हाक मारली

जया ने देखील काही झालच नाही अस दाखवत “ काय रे राम” अस विचारल.

“ सॉरी , बर का मघाशी आनंदाच्या भरात.....................”

“मला विसरलास “ जया ने रामच वाक्य पूर्ण केल.

“ मनापासून सॉरी , खरच सॉरी “ राम तिच्या जवळपास डोळ्यात बघत बोलत होता.

त्याच्या त्या तश्या बघण्याने जया काहीशी गोंधळली आणि मग गोड हसून “ठीक आहे , अभिनंदन” अस त्याला म्हणाली.

दोघे हि एकमेकांकडे बघून प्रसन्न हसले , राम घरी जायला वळणार तितक्यात त्याला काहीतरी आठवल आणि त्याने खिशातून काहीतरी काढून जायच्या हातात दिल .

आणि त्याने घराची वाट धरली.

क्रमश :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, बाबूचा राम झाला Happy
पण बऱ्याच ठिकाणी टायपो आहेत.
मावशी च मौशी
जयाच्या ऐवजी जायच्या

छान

मागचा भाग जरा दुःखद घटनाचा होता
बाबू चा राम झालाय, नवीन भरारी घेईल बहुधा
जया ची साथ मिळते का बायडा पुन्हा येते ते पाहुया....
एखाद्या छान सध्या चित्रपटा सारखं कथानक पुढे सरकत पण कुठेतरी मनाला भिडत..…
येऊ द्या पुढचे भाग ....