फौजदारी डाळ ही शक्यतो हिवाळ्यात केली जाते, सहसा ओसरत्या हिवाळ्यात संक्रातीच्या अगोदर हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ - दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात... सोबतीला शेतातच उगवलेला ताजा भाजीपाला सलाद म्हणून घेतला का काम सेट.
साहित्य
3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ
1 टेबलस्पून तुरीची डाळ
1 टेबलस्पून मुगाची डाळ
1 टेबलस्पून चणे डाळ
1 टेबलस्पून मसूर डाळ
1 टेबलस्पून चवळी
2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ काप
1/2 कप कांदा (साधारणतः एक मोठा) उभा चिरून
7 मोठ्या किंवा १२-१३ बारक्या लसूण पाकळ्या
बोटाच्या अर्ध्या पेरा इतके आले
1 टी-स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
फोडणीसाठी
1 टी स्पून मोहरी
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
3-4 गोडलिंबाची पाने
3 टेबलस्पून तेल.
कृती :-
प्रथम सर्व डाळी तीन वेळा नीट धुवून अर्धा तास भिजत घालाव्यात, नंतर कुकरमध्ये ४ शिट्या करून शिजवून घ्याव्यात.
कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा
कांदा नीट परतला की त्यात खोबरे घालुन परत खोबरे लालसर होईस्तोवर परतून घ्यावे
आता ह्याच्यात बारीक चिरलेले आले लसूण घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतावे
आले लसूण परतून झाले का त्यातच एक चमचा लाल तिखट घालून चांगले परतून घ्यावे (पुन्हा एकदा जर ह्या स्टेपला घरच्यांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही जिंकलेले आहात)
आता हा पूर्ण सौदा कढई उतरवून गार करून घ्यावा, नंतर त्यात अर्ध्या चमचा हळद आणि एक चमचा असल्यास खान्देशी काळा मसाला नसल्यास किचन किंग मसाला एक चमचा घालावा, आणि गार झालेल्या ह्या मसाल्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
आता कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करावे त्यात मोहरी जिरे हिंग आणि गोडलिंबाची फोडणी करावी, आता ह्या फोडणीत आपण बारीक केलेले वरील वाटण घालावे अन चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,
वाटणाला तेल सुटले की त्यात शिजवलेली डाळ घालून एकजीव मिक्स करावी, चवीनुसार मीठ घालावे आणि, ह्यात एक ग्लास गरम पाणी घालावे (एकच ग्लास कारण फौजदारी डाळ थोडी घट्टसरच असते)
पाणी घातल्यावर परत डाळ एकजीव करून तिला झाकून उकळी फुटू द्यावी, उकळी फुटली का गॅस बंद करून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी डाळ दहा मिनिटे झाकून ठेवावी.
तयार आहे फौजदारी डाळ, सोबत काकडी टोमॅटो दाण्याचा कूट घालून केलेली कोशिंबीर आणि उडदाचेच कळणे घातलेली भाकरी अन गरम वाफाळता भात.
आता काय ? ओरपा पोट भरस्तोवर, आजचा पाऊस गारवा, रजा हे मौके अन दस्तुर यशस्वी भजी अन वडे तळण्यापेक्षा इकडे लावले अन जेवणच सार्थक झाले.
नाही
वावे, धन्यवाद.
वावे, धन्यवाद.
छान आहे पाककृती करून बघणार,
छान आहे पाककृती करून बघणार, तुमची वांग्याची भाजी पण करून बघितली छान झाली होती.
अस्मिता, थँक्स, नक्की करून
अस्मिता, थँक्स, नक्की करून पाहा, खान्देशी फूड एक्सप्लोर करायला मी पण शिकतोच आहे अजूनही, जवळपास सगळ्या रेसिपी फ्रुगल रस्टीक अन बऱ्याच अंशी मिनिमलिस्ट (भारतीय कलिनरी स्टॅण्डर्ड्सने) असतात. परत क्षेत्रीय वातावरण अन चालीरितींना धरून थोड्या स्पायसी बेंट असणाऱ्या सापडतात, संडे एक्सप्लोरेशन कुकिंग किंवा एखाद दिवस करून खायला बेस्ट.
मस्त रेसिपी, फार तिखट नाही ना
मस्त रेसिपी, फार तिखट नाही ना होत वांडोजी? कोरडा फडफडीत भात आणि ही आमटी चांगली लागेल. सौदा शब्द सांगली- कोल्हापूर भागात पण वापरतात वाटलेला मसाला ह्याच अर्थी.
लंपनजी,
लंपनजी,
ते काश्मिरी तिखट आहे हो अन फोटो मोबाईलच्या फूड मोड मध्ये काढला आहे झालं !
तिखट नॉट तिखट हे पर्सनल चॉईस पण जपत बनवता येईल ही आमटी, पण खान्देशी जेवण मुळात थोडे तिखट असते असा आमचा नवा नवा जोशपूर्ण अभ्यास सांगतो बघा, त्यामुळे कुर्सी की पेटी बांध के मन की तयारी कर के एखाद बार मनासोबत आतड्यांची थोडी तयारी करून हे गॅस्ट्रोनॉमिक ऍडव्हेंचर करून बघाच असा आमचा एक सल्ला आहे (तो द्यायला आमच्या बापाचं काही जात नाही, बाकी आपापली ईच्छा)
सौदा हा शब्द बाजारहाट हा
सौदा हा शब्द बाजारहाट हा अर्थाने जुन्या हिन्दी चित्रपटात ऐकला आहे. अगदी आठवणीतील म्हणजे अनुराधा चित्रपटात अनुराधाचे बाबा तिच्या घरी येतात तेव्हा ती घरी नसते, मुलगी सांगते की मा सौदा लाने गयी है.. बाबांना मुलीच्या गरिबीचे दु:ख होते, सौदा लानेके लिये भी नौकर नही घरमे??..
खानदेशी जेवण बर्यापैकी तिखट
खानदेशी जेवण बर्यापैकी तिखट असते, अश्रुपात करत जेवायचे प्रसंग माझ्यावर ओढवलेले आहेत पण चविष्ट असते.
सोलापुर बाजार आमटी तर जालिम तिखट.. भाकरी, आमटी व गव्हाची खीर असा बेत होता. मिळमिळीत जेवायची सवय असल्याने असला तिखटजाळ प्रकार झेपणे कठिण. पण तरी एक घास आमटीसोबत एक घास खीरीसोबत असे मी जेवण केले. आमटी इतकी चविष्ट की डोळ्यांच्या धारांना न जुमानता खीर व आमटी असे करत मी भरपुर ओरपली.
खानदेशी पोळी भाजी केंद्र आहे
खानदेशी पोळी भाजी केंद्र आहे इथे त्यांना विचारते कधी फौजदारी डाळ कराल का. तिथून मी बहुतेक दर शनिवारी ज्वारी , बाजरी भाकऱ्या आणते आणि कधीतरी शेव भाजी आणते.
बाकी इथे जवळ खानदेशी दरबार म्हणून हॉटेल होतं तिथे फौजदारी डाळ दिसली नाही, ते बंद पडले बहुतेक. तिथून एकदा पातोडी रस्सा, एकदा वरण बट्टी, दोनदा कळण भाकऱ्या आणलेल्या.
वरण बट्टीतली बट्टी छान खरपूस होती, पदर सुटलेली पण नुसती वरणाबरोबर देतात ते वरण नाही आवडलं, मी घरी फोडणी केली त्याला. सोबत भरीत मात्र छान होतं.
डाळ बट्टी मी मध्यप्रदेशमध्ये एकांच्या घरी खाल्लेली ती आत्तापर्यन्तची सर्वात चविष्ट होती, चुलीवरची होती . नंतर राजस्थानी खाल्ली तीही फार आवडली नाही.
वॉव्व्व यम्मी. फौजदारी डाळ,
वॉव्व्व यम्मी. फौजदारी डाळ, डाळ गंडोरी, पंगतीची वांगं भाजी, काटक्यांवर भाजलेलं भरीत आणि रावण पिठलं हे माझे आवडते खांदेशी पदार्थ आहेत
राजस्थानी खाल्ली तीही फार
राजस्थानी खाल्ली तीही फार आवडली नाही>>> मला ही राजस्थानी दाल बाटी फारशी आवडली नाहि. खांदेशात बट्ट्यांसोबत च १ चविष्टं प्रकार बनवतात, त्याला बाफले म्हणतात. बेसिकली, बट्टी ला स्लाईस करून तुपात शॅलो फ्राय करतात. :डोळ्यात बदाम:
जोरदार मामला दिसतो. ती
जोरदार मामला दिसतो. ती वांग्याची भाजी करायचे अजेंड्यावर आहे. त्यात ही दुसरी भर.
सगळ्यांचे आभार,
सगळ्यांचे आभार,
1. आशु29 येस खानदेशी जेवण एक अलग टच आहे नक्कीच
2. बाफले मूलतः मध्य प्रदेशातील माळवा भागातील विंटर स्पेशालीटी आहे
@विरु, दोन्ही रेसिपीज करून पाहा नक्की.
मस्त रेसिपी.. मला पण आवडेल
मस्त रेसिपी.. मला पण आवडेल करून खायला..
सगळं असतं घरात सालाची उडद डाळ सोडून.. गोटा उडद चालेल का?
गोटा उडीद वापरला तर कदाचित
गोटा उडीद वापरला तर कदाचित चिकट जास्त होईल असे वाटते, एक डाळ सालीची असावी सहसा, उडीद असल्यास बेस्ट नसल्यास मुगाची वापरून प्रयोग करायला हरकत नाही पण मूग, तूर वगैरे लवकर गळतात, उडीद अन चणा डाळ फौजदारी डाळीचे टेक्स्चर मेंटेन ठेवतात,
थोडक्यात,
प्रयोग करू शकता पण फसू शकतो, त्यामुळे सालीची उडीद डाळ पावशेर आणलेली उत्तम असेच म्हणेन.
सालीची आणली असल्यास त्याची
सालीची आणली असल्यास त्याची पंजाबी/ अमृत सरी मा की दाल बनवता येइल.
ओके नको मग उगीच रिस्क.
ओके नको मग उगीच रिस्क.
सालीची आणून बनवेन.
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
थँक्स
थँक्स
आज ही डाळ केली.
आज ही डाळ केली.
कांदालसूण मसाला परतल्यावर घरचे कोणी शिंकले नाहीत त्याअर्थी पहिली फेरी मी हरले.
जे वां नी केलेल्या डाळीसारखा रंग नाही आला.तेवढे तिखट झेपायचे नाही.2 कोकम मात्र घातली.अजून खाल्ली नाही.
आपापली चव, केलीत ते बरे केलेत
आपापली चव, केलीत ते बरे केलेत, वेगळा प्रकार आहे, कोकम नसते खान्देशात म्हणून फक्त हटके वाटली एकदम.
आमच्याकडे आमटी/ डाळ यात
आमच्याकडे आमटी/ डाळ यात हलक्याशा आंबटपणासाठी चिंच,कोकम,कैरी,लिंबू हे घातलेच जाते.तेव्हा सवयीने कोकम घातले इतकेच.
छान झाली होती ही फौजदारी डाळ.परत करेन त्यावेळी कांदा लसूण मसाल्याऐवजी तिखट किंवा मालवणी मसाला घालेन.घरच्या ऑडिटरने भुरकून खाल्ली.
घरच्या ऑडिटरने भुरकून खाल्ली.
घरच्या ऑडिटरने भुरकून खाल्ली.>> घरी ऑडिट चालू आहे का?
मस्त.
मस्त.
याचा जरा सौम्य प्रकार मी करते क्वचित कधीतरी. वाटण वगैरे नाही करत. फोडणीवर कांदा, लसूण, खोबरं परतून शिजवलेल्या मिश्र डाळी त्यावर टाकते. तिखटही बेताचं. आमच्याकडे तिखट खाण्याचा आनंद आहे.
आता एकदा असं वाटण करून बघेन.
सौदा चर्चा आवडली.
घरी ऑडिट चालू आहे का?....
घरी ऑडिट चालू आहे का?.....रोजच असते.चुका काढा,बक्षीस मिळवा असं काही ठेवले असते तर फायदा होता ना.
हा पदार्थ आवडला आहे. डिनरला
हा पदार्थ आवडला आहे. डिनरला हलकं आणि one dish meal खायची सवय आहे. ही डाळ कमी मसाला आणि कमी तिखट घालुन केली आणि बरोबर पुष्कळ हिरवं salad घेतलं की एक जेवण होऊन जाईल. रेसिपीसाठी धन्यवाद.
' सौदा ' चर्चा माहितीपूर्ण.
नाशिककडे या डाळीला भेसळीचे
नाशिककडे या डाळीला भेसळीचे वरण म्हणतात , खूप मसाला नाही पण लसूण ठेचून घालून कढीपत्ता (कढीलिंब ) कोथिंबीर घालून छान होते. देवकी सेम पिंच
मीराजी व इंद्राजी,
मीराजी व इंद्राजी,
आपल्या अभिप्रायाबद्दल आपले मनःपूर्वक आभार
सालीची उडीद डाळ नव्हती घरात.
सालीची उडीद डाळ नव्हती घरात. आणि खानदेशी काळा मसाला, किचन किंग मसाला हे दोन्ही पण नव्हते. पण पाचही डाळी , चवळी घालून केली ही डाळ. काश्मिरी तिखट , घरचा गोडा मसाला आणि पाव चमचा घरचा गरम मसाला असे घातले. चिल्लर पार्टीला फौजदार कळणार नाही म्हणून ‘पुलिस ऑफिसर दाल ‘ असे नाव सांगितले. मस्त झाली होती डाळ आणि घरच्यांनी पण आवडीने खाल्ली.
Pages