दरम्यान, सकाळचा चहा येऊन गेला होता आणि नाश्ता यायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गाडीत काहींच्या सहप्रवाशांबरोबर गप्पा चालू होत्या, काहींचे वर्तमानपत्राचे वाचन सुरू होते, तर काहींची डुलकी सुरू होती, तर काहींचे मोबाईलमध्ये डोळे घालून काही पाहणे सुरू होते. पुढे भिगवणमध्ये आत जाताना शताब्दी थोडी हळू धावू लागली. भिगवणनंतर पुढे अजून दुहेरी मार्ग सुरू झालेला नसल्यामुळे इथे नेहमीच डाऊन दिशेला जाताना गाडीचा वेग मंदावत असतो. त्यामुळे मला वाटलं की, हळूच गाडी पुढे जाईल आता, पण तितक्यात वेग आणखी कमी झाला आणि गाडी 3 मिनिटं भिगवणमध्ये फलाटावर विसावली. गाडी थांबल्यामुळे पेंगुळलेले प्रवासी जरा जागे झाले होते. आमच्या शेजारच्या मेन डाऊन मार्गावर एकट्या डब्ल्यूडीजी-4 अश्वासह टँकरची मालगाडी उभी होती. ती कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली होती आणि तिला शताब्दीसाठी रोखून धरण्यात आले होते. पलीकडच्या मार्गावर सोलापूर विभागाला देण्यात आलेल्या नव्या एलएचबी डब्यांचा एक मोकळा रेक उभा होता.
आता एकेरी मार्ग सुरू असल्यामुळे दोन स्थानकांच्या मधल्या मार्गावर गाड्या आळीपाळीने सोडण्यात येऊ लागल्या होत्या. जिंती रोडमध्ये शताब्दीला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रोखून धरलेली सीएसएमटी चेन्नई सेंट्रल मेल दिसलीच माझ्या बाजूच्या खिडकीतून.
इथून पुढे विद्युतीकरणाच्या कामाची सुरुवात झालेली दिसली, मात्र दुहेरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचे लक्षात आले. जिंती रोडनंतर तर काहीच दिसले नाही. पलीकडच्या खिडकीतून दिसणाऱ्या उजनीच्या बॅक वॉटरचे दृश्य पाहण्यात तिकडे बसलेले प्रवासी मग्न होते. 7.39 ला पारेवाडी ओलांडले. तिथे कंटेनर घेऊन हैदराबादकडे निघालेल्या मालगाडीला शताब्दीसाठी बाजूला काढण्यात आले होते. 2 शक्ती अश्वांसह ती गाडी शताब्दी पुढे जाण्याची आणि आपला स्टार्टर सिग्नल ऑफ होण्याची आतुरतेने वाटतच पाहत उभी असावी. पारेवाडीनंतर दुहेरीकरणासाठी आखणी करून ठेवलेली होती. शताब्दी आता पुन्हा वेगाने धावू लागली होती. पुढच्या वाशिंबे स्थानकातही कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली आणि शताब्दीच्या वाटेत येणारी सिमेंटवाहू मालगाडी 2 डब्ल्यूडीजी-4 अश्वांसह बाजूच्या लाईनवर नेऊन उभी करण्यात आली होती. दौंडपासून पुढे गाड्यांना मार्ग उपलब्ध करून देण्याचे, कोणती गाडी कुठे बाजूला ठेऊन कोणती गाडी पुढे न्यायची याचं नियोजन सोलापूर विभागातील ऑपरेटिंग विभागातील सेक्शन कंट्रोलरकडून होत होतं. मध्ये मध्ये एकेरी मार्ग असल्यामुळे हे काम जरा जास्तच किचकट आणि जिकरीचं होत असतं.
आता शताब्दीचा वेग थोडा कमी झाला होता आणि इकडे गाडीत नाश्ता दिला जात होता. या गाडीत मिळणाऱ्या सेवेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळाली आहे. नाश्त्याच्या ट्रेमध्ये पोहे, ब्रेडचे दोन स्लाईस, बटर, सॉस आणि 5-स्टार चॉकलेट अशा गोष्टी होत्या. पुण्यात बसल्यापासून मास्क आणि हाजमोजे घालून बसलेल्या आणि मला काहीही नको म्हणणाऱ्या त्या प्रवाशानंही नाश्ता घेतला. इकडे माझे नाश्ता करता करताच खिडकीतून बाहेरच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे सुरूच होते. 7.50 ला पोफळज ओलांडले आणि इथून पुढे विद्युतीकरणाच्या कामाची सुरुवात झालेली दिसली. देशातील चार महानगरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेले असले तरी मुंबई-चेन्नई यातील एका महत्वाच्या मार्गाची ही दोन्ही कामे अनेक वर्षे रखडलेली होती. सध्या त्या कामांनी वेग घेतलेला असल्याने लवकरच भारतीय रेल्वेवरील डिझेल इंजिन जोडल्या जाणाऱ्या या एकुलत्या एक शताब्दीलाही विद्युत इंजिन जोडलेले पाहायला मिळेल याची खात्री विद्युतीकरणाचा वेग पटली.
मी नाश्ता करत असतानाच भालवणी ओलांडत असताना दौंडच्या दिशेने जाणारी विभागीय गाडी (Departmental train) आमच्यासाठी रोखून धरलेली दिसली. इथून पुढे दुहेरी मार्ग सुरू झाला. तो वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे आता एका गाडीसाठी दुसरी गाडी रोखून धरण्याची इथून पुढे गरज नव्हती. आतापर्यंत कुर्डुवाडीपासून भालवणीपर्यंतचे दुहेरीकरण पूर्ण झाले होते. भालवणीतून बाहेर पडल्याबरोबर लगेचच नव्या कोऱ्या एलएचबी डब्यांची 12158 हुतात्मा एक्स्प्रेस दौंडच्या दिशेने गेली. तिला भालवणीच्या अप होम सिग्नलवर थांबवण्यात आले होते आणि शताब्दी बाहेर पडताच तिला आतमध्ये घेण्यात आले आणि मिनिटभराच्या विसाव्यानंतर तिला दौंडच्या दिशेने सोडले जाणार होते. कारण पुढे एकेरी मार्ग होता. आता हुतात्माला पुढे जाऊ देण्यासाठी भालवणीमध्ये रोखून धरलेली विभागीय गाडी अजून काही वेळ तिथेच थांबणार होती. कारण हुतात्माच्या पाठोपाठ 11014 कोईंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस असते.
ही मध्य रेल्वेची एकुलती एक शताब्दी असल्यामुळे मध्य रेल्वे हिच्या देखभालीकडे विशेष लक्ष देत असल्याचे डब्यांच्या परिस्थितीवरून लक्षात आले. इकडे गाडीत प्रत्येकाचं आरामात नाश्ता करणं सुरू होतं.
कुर्डुवाडीतून बाहेर पडत असतानाच डब्ल्यूडीजी-4 इंजिनासह क्रांतिवीरा सांगोल्ली रायण्णा बेंगळुरूहून नवी दिल्लीकडे निघालेली 12627 कर्नाटक एक्सप्रेस कुर्डुवाडीत येत होती. इथून पुढे दुहेरी मार्ग सुरू झाला. आता नाश्त्यानंतरचा चहा दिला गेला. 8:16 ला कुर्डुवाडी ओलांडून पुढे माढ्यात आलो, तेव्हा मुंबईहून चेन्नईला निघालेली 11027 मेल आमच्यासाठी बाजूला काढून ठेवलेली दिसली. दरम्यान, नाश्ता झालेला असल्याने ज्यांना उतरायला अजून वेळ आहे, त्यांच्या गप्पाही थोड्या थंडावलेल्या होत्या. पण असे प्रवासी तिथे थोडेच होते. कारण माझ्या डब्यातील बरेच जण सोलापूरला उतरणार होते. त्यांची जरा चुळबूळ सुरू झालेली होती. माढ्यापासून विद्युतीकरणाचे काम काहीच सुरू नसलेले आढळले. पुढे वाकव, अंगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी, पाकणी, बाले अशी स्थानकं पटापट ओलांडत शताब्दी 9.09 ला म्हणजे नियोजित वेळेच्या 1 मिनिट आधी सोलापुरात दाखल झाली.