पो.स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने मी थोडा नर्व्हस होतो. गेलो तेव्हा इन्स्पे. कानविंदे मोहंती साहेबांशी बोलत होते. मला मोहंती साहेबांचं आश्चर्य वाटलं एवढा मोठा धक्का बसूनही ते थंडपणे घेत होते. फक्त उठताना मात्र ते धमकीवजा म्हणाले, " ऑफिसर ध्यानमे रखना अगर मेरी बेटी नही मिली या उसके साथ कुछ हुवा तो तुम तुम्हारे कुर्सीकी फिकर करना चालू करो, समझे " हे बोलणं अर्थातच कानविंदेंना आवडलं नाही. " सर हम पूरी कोशिश करेंगे, आप फिकर नही करना " मग मोहंती म्हणाले, " फिकर मुझे नही आपको करनी है. " असं म्हणून मोहंती गेले. कानविंदेंची चर्या उतरली. त्यावर त्यांनी राग माझ्यावर काढायला सुरुवात केली. मला दरडावून म्हणाले, " बोला सबनीस लवकर बोला, तुम्ही मुलीला कशी गायब केलीत, का तुमचा कुणावर संशय आहे ? " मी शांतपणे म्हणालो, " हे पाहा साहेब , सगळे लोक पार्टीला होते. त्यामुळे कोणाचाच संशय घेता येत नाही. मग मात्र ते उसळून म्हणाले, " याचाच अर्थ असा, की तुम्ही मुलीच्या अपहरण कर्त्याला सामिल आहात. असा कसा तुम्हाला संशय येत नाही ? " आता मात्र मी गप्प बसणं पसंत केलं. मला माहित होतं की त्यांच्या जवळ कोणताच पुरावा नसल्याने ते भडकले होते. मी काहीच बोलत नाही असे पाहून ते म्हणाले, " चला , आपण परत तुमच्या वाड्यावर जाऊ. मला आत्ता दिवसाउजेडी वाडा पाह्यला पाहिजे. " ; त्यावर मी त्यांना म्हंटले, " अहो मला ऑफिसला जाणं भाग आहे. आज मिटिंग आहे. " त्यावर त्यांनी उत्तरादाखल उठून दोन कॉन्स्टेबल बरोबर घेत ते गाडीकडे निघाले. गाडीत बसता बसता मला म्हणाले, " तुम्हाला काय वाटलं तुमच्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही ? " असं म्हणून गाडी चालू केली. तितक्यात मला तिथे हरिदास येताना दिसला. मी पटकन त्यांना म्हंटलं, " साहेब तो पाहा हरिदास एजंट. " त्याबरोबर ते खाली उतरले. आणि मला जायला सांगून ते त्याला घेऊन आत गेले. माझं काम झालं होतं. लीना घाबरली होती. मला आज तरी पोलिस माझ्या घरी यायला नको होते. एकूण प्रकरणावर नीट विचार करून मी काही सापडतंय का ते पाहणार होतो. त्यासाठी मला वेळ हवा होता. शिवाय मला रसिकाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. मी तसाच बँकेत गेलो. जुडेकर आला होता . पण गोळे आला नव्हता. बाकी स्टाफ होता. त्यांना याची थोडी कुणकुण लागली होती. पण मी कालचा विषय काढला नाही. तरी संध्याकाळी पै त्याबद्दल बोललेच. " सर , मला वाटतं, कालच्या विधींमुळे तर असं झालं नाही. ? " मी त्यावर त्यांना म्हणालो, " पै साहेब माझा असल्या विधींवर काडीमात्र विश्वास नाही, केवळ माझ्या बायकोच्या समाधानासाठी मी हे सगळं केलं. नक्कीच याच्या मागे कोणितरी आहे. ते शोधावं लागेल. मलाही आणि पोलिसांनाही. " असं म्हणून मी गाडी काढून घरी निघालो. मी चांगलाच उत्तेजित झालो होतो.
घरी गेलो आणि लीनाला विचारलं , " चल रसिकाला डॉक्टरांकडे नेऊन आणू. " त्यावर ती म्हणाली, " मी नेऊन आणल्ये. तुमची गरज नाही. " आणि ती अबोला धरून बसली. रसिका नुकतीच झोपली होती. मी लीनाला म्हंटलं, " जे झालं त्याला मीच जबाबदार आहे अशी तू का वागतेस ? " तिने त्यावर काहीच उत्तर न देता माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवला. आणि ती जाऊ लागली . आता मात्र मी पुढे होऊन तिचा हात धरून तिला जबरदस्तीने सोफ्यावर बसवून म्हंटले, " लीना हा काय वेडेपणा आहे ? अगं या सगळ्याला मी जबाबदार नाही . " तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ......... " हे पाहा आज सकाळपासून बाजूच्या बंद खोलीतून वेगवेगळे आवाज येतायतं. समजलं, विचारा पाहिजे तर भावजींना. पोलिसही येऊन गेल्येत. त्यांच्या परत परत त्याच प्रश्नांनी मला भंडावून सोडलं. त्यांना काहीही सापडलं नाही म्हणून ते वैतागून निघून गेले. ..... " थोडावेळ थांबून ती म्हणाली, " मी इथे राहणार नाही मुलांच्या परीक्षा झाल्या की या शाळेतला दाखला काढून घेऊन मी मुंबईला निघून जाईन. " मी काही बोलणार तेवढ्यात माझा भाऊ आणि वहिनी वरच्या मजल्यावरून उतरत खाली आले आणि त्यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला. .... "अरे विकास , वास्तुशांत झाली , म्हणजे सगळं संपायला हवं की सुरुवात व्हायला हवी. लीना म्हणत्ये ते खरं आहे. आणि हो आम्हीही उद्या सकाळी निघतोय. " आता मात्र मला राग आला. सध्या मी लीनाला काहीच बोलू शकत नव्हतो. की त्या खोल्यांमध्ये जाऊन पुन्हा शोधाशोध करू शकत नव्हतो. जेवणाच्या टेबलावर कोणीच बोलायला तयार नव्हते. .......ती रात्र अशीच गेली. रात्रीत एक दोन वेळा मी लीनाला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. तिने माझा हात जोरात बाजूला सारला. ती उठून हॉलमध्ये झोपायला निघून गेली. मला कोणतेही आवाज ऐकू आले नाहीत की कोणता भास झाला. दुसरा दिवस मंदपणे आणि मरगळलेला उगवला. मनावर एक प्रकारचं हारल्यासारखं सावट राहिलं. त्याही अवस्थेत, मी मुलांना शाळेत सोडून आणि बंधूंना एस टी स्टँडला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिले. बंधू फारसं काही बोलले नाहीत . फक्त " तू ही नोकरी सोड , म्हणजे सगळं काही ठीक होईल, " असे मात्र म्हणाले. मी काहीच बोललो नाही. घरी आलो तेव्हा साडेनऊ वाजत होते. मला सकाळचा दुसरा चहा लीनाने न बोलता आणून दिला. थोड्यावेळाने तिने दिलेला डबा घेऊन मी ऑफिसला गेलो. आजकाल घरातला संवाद संपला होता. पुन्हा एकदा वाडा मौनव्रत स्वीकारतो की काय असे मला वाटू लागले. अचानक लाभलेला इतक्या दिवसांचा आनंद नाहीसा झाला. ....... ऑफिसला गेल्या गेल्या हेड ऑफिसचा फोन आला. त्यावर मला कालच्या मिटिंगला गैरहजर राहिल्याबद्दल चांगल्याच कानपिचक्या दिल्यागेल्या. माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत मी असे प्रथमच ऐकत होतो . अर्थातच , मी त्याच्यावर पो. स्टेशनला जाणं कसं जरूरीचं होतं ते पटवायचा प्रयत्न केला . पण मी ऑफिसची परवानगी न घेता पोलिस स्टेशनला का गेलो ते विचारलं गेलं . त्याचप्रमाणे मला पो. स्टेशनला संध्याकाळीही जाता आलं असतं हे सांगितलं गेलं . माझी मनः स्थिती चांगलीच बिघडली. तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला कशाला सांगता ? वाड्याचं पुढे काय झालं ते सांगा. तुमचंही बरोबर आहे. संध्याकाळी घरी गेलो. मुलं बाहेर खेळत होती. लीनाचा अबोला चालूच होता. तरीही मी मुलांना घेऊन बाहेर गेलो. त्यांच्या मनोरंजनात काही कमी करित नव्हतो. लीना मात्र बरोबर यायला तयार नव्हती. मग मात्र मुलं हट्ट धरून बसली. " मम्मी , तू पण चल ना ग. " रसिका म्हणाली. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मीच म्हंटलं , " अगं काही काही लोकांना ना आपल्याबरोबरयायला आवडत नाही. चला आपणच जाऊ या. " पण आता रसिका हटत नव्हती. ती मागेच लागल्यामुळे लीना तयार होऊन आली . मग आम्ही गावातल्या पार्कमध्ये गेलो. मुलं खूश होती. त्यांना खाऊही मिळाला होता. इतर मुलांमध्ये ती रमली. लीना आणि मी एकाच बाकावर घटस्फोट घेतल्यासारखे बसलो होतो. तेवढयात तिथे अचानक गोळे आला. त्याची बायकोही बरोबर होती. आज तिने अबोली रंगाचा ड्रेस घातला होता. आता ती जास्तच आकर्षक दिसत होती. मी गोळेशी जुजबी बोललो. तोही तुटक उत्तरे देत होता. त्याची बायको मात्र लीनाशी चांगलं बोलत होती. दोघींचं अचानक कसं काय जमलं कुणास ठाऊक. मला तर गोळे कधी जातो असं झालं होतं. त्यात त्याच्या बायकोची फिगर माझ्या डोळ्यात खुपत होती. ती अधून मधून माझ्याकडे पाहत होती. की मीच तिच्याकडे पाहत होतो म्ह्णून मला तसं वाटत होतं, कोण जाणे. थोड्याच वेळात ते दोघे गेले. मी सहज म्ह्णून लीनाला म्हंटलं.. " यांना मुलं नाहीत हे खरं वाटत नाही , नाही का ? " लीनाने उत्तरादाखल फक्त रसिका आणि राहुलला चलण्याची आठवण केली. ते तयार नव्हते, पण कुरकुरत तयार झाले. रसिकाची " आत्ताच तर आलो आपण शी ! काय हे ........ " अशी सारखी कुरबुर चालू होती. घरी पोहोचलो. घराचा दरवाज्या उघडला. आणि अचानक ऊद जाळल्यासारखा वास आला. पण कोणी जाळला असेल ? त्याचा काहीही मागमूस लागेना. म्हणून ज्या कोनाड्यात फकीर बाबांनी दिलेला ऊद ठेवला होता तिथे पाहिले तर उदाची पुडीच नाहीशी झालेली दिसली. उदाचा वास हळू हळू कमी झाला. लीनाने माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले . जणूकाही तिला म्हणायचे होते, की पाहिलंत ना हे असं होतंय, म्हणून तर मी जाणार आहे. अर्थात ती काहीच बोलली नाही स्वैपाकघरात जाऊन ती जेवणाच्या तयारीला लागली. जेवणं झाली. माझं कोडं अजून सुटत नव्हतं. उदाची पुडी गेली कुठे ? आणि मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतक्या दिवसात ऊद जाळला असता तर काही तरी वेगळं झालं असतं . पुढचे पंधरा दिवस काहीच घडलं नाही. अधून मधून सारखे कानविंदे बोलवायचे , पुन्हा पुन्हा स्टेटमेंट घ्यायचे. नवीन काहीच घडत नव्हतं की सापडत नव्हतं. मलाही आणि पोलिसांनाही. एकदाचा जानेवारी महिना संपला. आता हेडऑफिस मधून आमच्या लोन डिपार्टमेंटचे असि. चीफ मॅनेजर पिंटो यांच्यासोबत प्रत्येक ब्रांच हेडची मिटिंग ठरली. जी मुंबईला होती. त्या निमित्तने मला दोन दिवस मुंबईला जायची वेळ आली. लीना मात्र वाड्यात मुलांना घेऊन एकट्याने राहायला तयार नव्हती. म्हणून तिलाही बरोबर घेऊन जावे लागले. मुलांच्या शाळेत आजारपणाची खोटी चिठ्ठी पाठवून ती त्यांना घेऊन निघाली. आमचं घर होतंच. बरोबर या वेळेला जुडेकर होता. फाईली सांभाळणं आणि तो हुशार असल्याने कोणत्या अर्जदाराबद्दल आम्ही काय कारवाई केली हे त्याला चांगलंच माहित असल्याने तो मला माहिती फीड करणार होता.
मिटिंग ठीक अकरा वाजता चालू झाली. मॅनेजर पिंटो यांनी बँकेची पॉलिसी आणि प्रत्येक ब्रांचला लोन देण्यासाठी सुपूर्त केलेली रक्कम याबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी महिना असल्याने प्रत्येकाच्या जवळ जवळ फायनल फिगर तयार होत्या.
एक फक्त मी सोडून . तशी माझीही फिगर तयार होती. पण ती अगदीच नगण्य वाटत होती . अर्थात त्याला कारणं होती. मि. मोहंती यांच्या हाताखाली एकूण पाच ब्रांचेस होत्या. त्या सगळ्यांमध्ये माझी फिगर सर्वात कमी होती. माझ्या ब्रांचचे नाव पुकारण्यात आल्यावर मी माझी फिगर
सांगितली , त्याबरोबर पिंटो साहेब मोहंतीना म्हणाले, " मि. मोहंती हे काय चाललय ? तुम्ही सबनिसांवर कारवाई का केली नाही. निदान इन्स्पेक्शन घेऊन त्यांना ताकीद तरी द्यायला हवी होतीत. " त्यावर मोहंती काहीच बोलले नाहीत. मग मला मी " प्रत्येकाची सिक्युरिटी आणि
स्टॉक पडताळून मगच लोन्स दिलेली नाहीत . बँकेला त्यामुळे भविष्यात वसुलीची गंभीर समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला. " असे सांगितले. मग मात्र पिंटी भडकले, " अहो , पण सध्या पाच लाखाच्या आतल्या कर्जांना सिक्युरिटीवर जास्त जोर देऊ नये असा सरकारचा आदेश आहे. मग तो आपण धाब्यावर बसवायचा का ? तुम्हाला दिलेल्या परिपत्रकात सगळं विस्तृत दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास करीत नाही का ? "मग मोहंतींकडे वळून ते म्हणाले, " काय हे , काय चाललंय काय तुमच्या राज्यात ? हे असं . " मोहंती पुन्हा काही बोलले नाहीत. ते पाहून पिंटो साहेबांनी बरोबर आणलेल्या स्टाफला ताबडतोब सूचना देऊन मोहंतींनाच मेमो दिला आणि " मला याचं स्पष्टिकरण एका आठवड्याच्यात पाहिजे " अशी तंबीही दिली. मग मिटिंग संपली. मला मोहंतींची दया आली. आपणच आता काहितरी केलं पाहिजे हे मला जाणवलं. एकीकडे मुलगी नाहीशी होणं हा ताण त्यांच्या डोक्यावर होता. आमच्या नंतर पिंटो साहेबांसमवेत उद्योजकांची मिटिंग होती. आम्ही कॉंफरन्स हॉलच्या बाहेर आलो. नेमका शितोडीकर भेटला. त्याच्या नजरेत कृद्धपणा भरलेला होता. आता तर त्याला संधी मिळाली. हेच खरं. मी बाहेर आल्या आल्या मोहंतींची माफी मागितली. आणि अजून एक महिना बाकी आहे त्यात मी जेवढा बॅकलॉग भरून काढता येईल तेवढा भरून काढीन असे आश्वासन त्यांना दिले. ते फार काही बोलले नाहीत. पण निघून गेले. माझ्याबद्दलचं इंप्रेशन बिघडलेलं दिसलं. जुडेकरला मी शोधू लागलो. तेव्हा तो श्रिवास्तव बरोबर बोलत असलेला आढळला. श्रीवास्तवला बरे वाटल्याचे दिसत होते. मी जुडेकरला खडसावून विचारले, तेव्हा त्याने श्रीवास्तवलाही वैयक्तिक स्वरूपाचे लोन हवे असल्याबद्दल तो बोलत होता असे म्हणाला. माझा विश्वास बसला नाही. मी नंतर बोलण्याचे ठरवले. आम्ही दोघेही माझ्या घरी आलो. आजच्या दिवस राहून रामनूरला दुसऱ्यादिवशी जाण्याचे ठरवले. त्यावर लीना म्हणाली, " मी दोन दिवस इथेच राहणार आहें, नंतर येईन. " मी मान्य केले. आम्ही मात्र दुसऱ्यादिवशीच निघालो. तो शनिवार होता. थेट बँकेत गेलो. तालुक्याची ब्रांच असल्याने एक प्रकारचा मंदपणा होता शहरामध्ये ब्रांच कशी भरलेली असते. इथेही स्टाफ कामात गर्क होता. पण का कोण जाणे कामाला वेग नसल्याचे मला जाणवले. मी मग पैं ना आत बोलावले , त्यांना थोडीफार कल्पना दिली. कामाचं गांभिर्य जाणवून तेही विचार करून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी घरी गेलो. आता आजपासून लीना आणि मुलं नव्हती. मी ती संधी घेण्याचं ठरवलं. मी जेवढा कामावर असायचो तेवढं वाडा त्यातल्या सगळ्या गोष्टी विसरायचो , पण घरी आलो की पुन्हा तेच विचार येत. आज घरी आल्या आल्या, समोरच्या मोकळ्या जागेत लावलेली झाडं पाहिली. ती बरीचशी मलूल आणि सुकत चालल्या सारखी दिसली. तिथे आता हळूहळू कोरडे गवत तयार होत होते. वाडा परत पूर्वीच्याच स्थितीवर येणार का , असे मला वाटले. पोलिसांचा भरवसा नव्हता. ते केव्हाही येऊन उभे राहत असत. मी चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसलो. अजून थंडी चागलीच जाणवत होती. निदान वाड्याच्या परिसरात तरी. .
अचानक वारा सुटल्याचं मला जाणवलं. ................. वारा इतका सुटला होता की जड दरवाज्यासुद्धा थोडा हलल्यासारख मला भासला.
अंगात स्वेटर आणि खांद्यावर शाल पांघरलेला मी वाड्याच्या आतल्या रुपाकडे पाहू लागलो. रंग दिल्याने
वाडा माणसात आला असला तरी अचानक तो मला आकुंचित वाटू लागला. हे काय होतंय मला कळेना हॉल जास्तच लांबलचक वाटू लागला. हॉलची रुंदी कमी झाली आणि मी एका मोठ्या लांब बोळातील सोफ्यावर बसलो असल्याचं जाणवल. मी घाबरून दरवाज्या गाठला. बाहेर उभा राहून आत पाहू लागलो. तेवढ्यात फकीरबाबांचा आवाज आला. " बेटा तू कहां जायेगा, यहां रहना तेरे लिये ठीक नही है. औरत को लेकर निकल जा. डरना नही. ये उदी लेकर अंदर की तरफ फेक दे. आजके लिये छुटकारा पायेगा." त्यांनी माझ्या हातात तीच उदी दिली. मी त्यांना
उदी नाहीशी झाल्याबद्दल विचारणार होतो , तेवढ्यात ते धावत गेट कडे गेले आणि नदीच्या दिशेने पळत गेले. मी तसाच उदी खिशात टाकून
त्यांच्यामागोमाग धावलो. तेव्हा ते धावता धावता म्हणाले, " मेरा पीछा मत कर. तू पछाताएगा. ...... " असं म्हणून ते पडक्या चर्चच्या मागे दिसेनासे झाले. मला हे नवीन होतं मी स्वतःला चिमटा काढून पाहिले . मी शुद्धिवर होतो. मग मी घरात आलो. मगाचचाच नजारा होता. मी त्यांनी दिलेली उदी फेकली. त्याबरोबर हॉल पूर्ववत झाला. माझा विश्वासच बसेना. हे सगळं फकीरबाबा करीत नव्हते ना ? अशी शंका मला चाटून गेली. आत जावं की नाही मी विचार करीत होतो . परत असं झालं तर माझ्याजवळ आता उदीही नव्हती आणि फकीरबाबा पण आता येणार नव्हते. सात वाजून गेले होते. बाहेरचा वारा थांबण्याची चिन्हे दिसेनात. मी दरवाज्या लावून घेतला. आता मी एकटाच होतो. कधीही देव वगैरे न मानणारा मी आज देवांसमोर दिवा लावीत होतो. मला स्वतःचं आश्चर्य वाटलं. काहीही असो. माणसाबरोबर अनाकलनीय घटना घडू लागल्या की माणूस अशा गोष्टी करतो. कारण लहानपणी झालेले संस्कार त्याला आठवू लागतात. तेव्हाही अशीच भीती वाटलेली असावी . आईवडलांनी सांगितल्याप्रमाणे आपण देवापुढे नतमस्तक होतो. काहीही असो. मला जरा बरं वाटलं. उदबत्तीच्या वासात एक प्रकारची प्रसन्नता
पसरली. जेवणाची तयारी करायला घेतली. कारण आज लीना नव्हती . तसाही मला तासभर लागलाच असता. कुकरचं झाकण लावणं हा प्रकार मला जमायलाच पंधरा ते वीस मिनिटं गेली. बायका कशा या गोष्टी पटकन करतात, कोण जाणे. अखेरीस लागलं. मी हॉलमधे आलो.
इथे टीव्ही नव्हता. त्यामुळे मला बातम्या कळायला उद्या सकाळचा पेपर येई पर्यंत वाट पाह्णं भाग होतं. वेळ जावा म्हणून मी वाचायला पुस्तक काढलं. माझं लक्ष लागेना. आज लीना नाही झोप लागणं कठीण आहे. मी एवढ्या मोठ्या वाड्यात एकटाच झोपणार होतो. नाही म्हंटलं तरी तिची गेले काही महिने सवय झाली होती. एखादा टीव्ही आणणं भाग होतं. कुकरची शिट्टी झाली आणि मी दचकलो. वातावरणात वाऱ्याशिवाय
एकही आवाज नव्हता. सहज म्ह्णून मी सरदार साहेबांच्या चित्राकडे पाहिलं . त्यांची नजर दरवाज्यावर स्थिर झालेली दिसली . मग उठून मी चित्राजवळ गेलो. चित्राकडे निरखून पाहू लागलो. तशी ते चित्रही माझ्याकडे निरखून पाहत असल्याचा भास झाला. मी माझयाजवळचा मोठा
टॉर्च आणला आणि चित्राच्या सर्व कडांवर मारून पाहिला. तिथे हातही फिरवून पाहिला. हाताला काळसर डाग पडले. मग टॉर्च खालच्या
कडेवर मारल्यावर मला असं आढळून आलं की माझ्या एका बोटाच्या रुंदी इतकी लांबलचक फट तिथे होती. केवळ कुतुहल म्हणून मी टॉर्च तिथे मारला. आतला भाग पोकळ असल्यचे आढळून आले. आत मध्ये भिंत नसावी तर एखादा मोठा कोनाडा असावा आणि त्यावर चित्र खिळवून बसवले असावे असे वाटले. कारण प्रकाशाची तिरीम बरीच आत जात होती . पण दुसरे टोक दिसत नव्हते. म्हणजे तिथे भिंत असावी अशी माझी समजूत झाली. काही झालं तरी इथे एक गोष्ट चांगली होती , ती म्हणजे इथे उंदीर, झुरळं असले प्राणी नव्हते. असो. मी स्वैपाकघरात गेलो. जेवण बनवलं एका डिशमध्ये वाढून घेऊन टेबलावर बसलो. जेवण तर झालं. जेमतेम नऊ वाजत होते. दुसरं काही काम नसल्याने मी सरदार साहेबांच्या चित्राजवळ परत जाऊन त्या फ्रेमचं निरिक्षण करू लागलो.सगळ्ञ्या कडा पाहून घेतल्या पण कोठेही फट सापडेना आता माझ्या हातात एका लहानश्या पटाशी सारखे हत्यार होते. माझ्याकडे असलेल्या एकूण हत्यारांमधे तीच एक सापडली. जिचा उपयोग होईल असे वाटले.
मी ती पटाशी फ्रेमच्या खालच्या भागातल्या कडांमधे घालून पाहिली, फ्रेम उचकटता येत नव्हती . एक तर ती फार जुनी होती. कदाचित शंभर
एक वर्ष जुनी किंवा त्याहीपेक्षा जुनी असावी. मग टॉर्च पेटता ठेवून मी ती फ्रेमच्या खालच्या भागात जिथे फट होती तिथे घालून पाहिली पण फ्रेम
तसूभरही हालली नाही. सरदार साहेबांच्या डोळ्यात आता माझ्याबद्दलची तुच्छातेची भावना दिसली. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं . पण पूर्वी
अशी जिवंत दिसणारी चित्रे काढण्याची कला विकसित झाली असावी. मी त्याबद्दल बरेच वाचले होते. माझ्या चित्रकलेच्या दोन परिक्षा झाल्या होत्या. त्यात आम्हाला चित्रकलेचा जागतिक इतिहास अभ्यासाला होता. त्यात अशा अद्भुत चित्रकलेचे वर्णन होते. अर्थात त्यात अशी चित्रे कशी काढावीत याबद्दल काहीही पद्धत दिली नव्हती. मी परत एकदा प्रयत्न करून पाहिला टॉर्चच्या प्रकाशात आत एखादी लाकडी फळी असावी असे दिसले. पण मला त्याचा अर्थ लागेना. कदाचित चित्र सरकवून आत एखादा रस्ता किंवा खोली निघेल अशि मला शंका होती. पण तसे काही
झाले नाही. मी प्रयत्न सोडून दिला. परत एकदा पुन्हा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. या सगळ्य प्रकारात दहा वाजून गेले होते. मी झोपण्याची
तयारी केली. अर्थातच हॉलमधे. मला बेडरूममधे झोपण्याचे धाडस झाले नाही. दिवा तसाच ठेवून मी झोपी गेलो.
केव्हातरी तीन एक वाजता मी तहान लागल्याने उठलो. स्वैपाकघरात पाणी पीत असताना अचानक
वरच्या म्हणजे बाजूच्या भागात कोणीतरी धावत असल्याचा आवाज आल्याने मी चांगलाच दचकलो. मग भानावर आल्यावर मी ओरडलो. " अरे,
को ण आ हे वर ?........" थोड्यावेलाने आवाज थांबला. पण टॉर्च घेऊन बघण्याचे धाडस मला होईना. तरीही मनाचा हिय्या करून मी जिना
चढू लागलो. तेव्हा वरच्या कॉरिडॉरमधून जिन्यावर धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी थरथरत्या हाताने टॉर्च लावला. त्याच्या प्रकाशात वरच्य दोन पायर्यांवर मला हिरवे डोळे असलेले मांजर दिसले. ते ट़़क्क माझ्याकडे बघत होते. त्याची नजर लवत नव्हती. मी हातातली पटाशी उगारली तेव्हा कुठे ते परत वरच्या मजल्यावर उडी मारून गेले. मग वरचे जिन्याचे दार उघड ले. तिथल्या बेडरूममधे शिरलो. पण तिथे काहीही सापडले नाही. सरदार साहेबांच्या फोटो मागे नक्कीच काही तरी असावं असा मला संशय होता. उद्याचा दिवस माझ्या हातात होता. नंतर लीना येणार होती. रात्र कशीतरी काढली. दिवस उजाडला. आज सुट्टी असल्याने मी जरा आरामात उठलो. माझी अपेक्षा लीनाचा फोन येईल
पण आला नाही. मीही मुद्दामच केला नाही.
सकाळचा वेळ तर साफसफाई करण्यात आणि वर्तमानपत्र वाचण्यात गेला. घरात जी काही बिस्किटं, वगैरे होते ती खाल्ली गेली. आत्ता तरी माझ्याकडे कोणीही येणार नव्हतं. म्हणून मी घराला कुलुप घालून पडक्या चर्चकडे मोर्चा वळवला. साधारण दोनतीन मिनिटं चालल्यावर एका बाजूने पडके चर्च समोर आलं. त्याचा प्रार्थना हॉल शिल्लक होता. तिथे असलेले तुटके फुटके बेंचेस तुडवीत मी तेथील व्यासपिठाकडे गेलो. ते साधारन दोन तीन फूट उंच होतं. वर सगळं गवत उगवलेलं होतं. तिथलं भाषणाचं मेज केव्हाच नष्ट झालेलं होतं. हॉलच्या खिडक्या बऱ्याचश्या तुटलेल्या होत्या. ज्या होत्या त्या जेमतेम उभ्या होत्या. त्यांच्या रंगित काचा शिल्लक होत्या. नदीचा आवाज आता स्पष्ट येत होता. त्या काळात जवळ जवळ पन्नास साठ माणसं सहज आत मावत असतील तिथल्या पडझडीत मला काहीही वस्तू अथवा कसलेही अवशेष दिसले नाहीत. फुटक्या काचांपासून पायांना वाचवीत मी बाहेर आलो. बाहेरील दगडी प्रवेशदाराची कमान अजून पक्की उभी होती. त्यावर त्या चर्चचं नाव कोरलेलं होतं. एक दोन ग्रीक किंवा रोमन लहान मुलांचे उघडे नागडे पुतळे म्हणजे आपण त्यांना मूर्ती म्हंटलं तर बरं होईल त्या अजून चांगल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि खेळकरपणा अजूनही दिसत होतं. हॉलच्या कमानीसारख्या खिडक्या म्हणजे उत्तम शिल्पशास्त्राचा नमुना होत्या. मग मी पडक्या भागाकडे वळलो. तिथे असलेले कॉरिडॉर सुद्धा प्रचंड लांब होते. जिथे लागून खोल्याअसाव्यात. ज्या आता भंगलेल्या अवस्थेत होत्या. कदाचित त्या पाद्र्यांचे विश्रांती स्थान असाव्यात. ज्या आता भंगलेल्या अवस्थेत होत्या. कदाचित त्या पाद्र्यांचे विश्रांती स्थान असाव्यात. जेवढ्या भागात आत शिरता येत होतं तिथे गेलो. मध्येच एक मोठा खड्डा, म्हणजे एखादे विवर असावे असा पडलेला दिसला. आत काळोख असल्याने मला दिसले नाही. दिवसाउजेडी इतक्या काळोखापुढे तर रात्रीच्या भयानकतेची कल्पना करता येत नव्हती. मी फार आत न शिरता मागे फिरलो. सहज नजर चर्चच्या मनोऱ्याकडे गेली तर तिथे एक दोन घारीसारखे पक्षी बसलेले दिसले. मी मग नदीकडे गेलो. नदीवरचा भन्नाट वारा अक्षरशः मला ढकलीत होता. जणूकाही तो म्हणत होता. " इकडे का आलास ...........? चालू लाग " हा भाग तुझ्यासारख्या सामान्य माणसासाठी नाही. इथे वैराणतेचं राज्या चालतं. तू अतिक्रमण करतोयस. तरीही मला तो परिसर आवडला. चिंतन मनन वगैरे करणाऱ्यांसाठी तो चांगला असावा. पण का कोण जाणे तिथे पावित्र्य आहे असे मात्र वाटले नाही. कंटाळून मी निघणार इतक्यात माझी नजर नदीतील खडकांच्या एका रांगेकडे गेली . जणूकाही सेतू बांधला असावा. ती रांग नदीच्या पलिकडच्या तिराकडे नेत होती. तिथे मात्र रान होतं. विषेश काही न सापडल्याने मी घरी परत आलो. ........... आता सकाळचे साडे नऊ वाजत होते. मी विचार केला शोध घ्यायचा असेल तर तो आत्ताच घेतला पाहिजे. म्हणून मी पुन्हा सरदार साहेबांच्या चित्राजवळ आलो.
खरं म्हणजे मला आत्ता भूक लागली होती. मी पोहे करायला घेतले. मला जवळ जवळ पोहे खायला साडेदहा झाले. केवळ लीना कसे बनवते ते पाहून बनवल्याने बनवेपर्यंत माझ्या तोंडाला फेस आला. स्वैपाक हा प्रकार बायकाच करू जाणेत. असो. मी आता पुढचे दार लावले. आतून कसाबसा अडसर लावला. आतला लाइट चालू केला. मग मी माझ्याजवळची हातोडी, पटाशी, आणि स्क्रू ड्रायव्हर वगैरे घेऊन सरदार साहेबांच्या चित्राकडे आलो. त्यांच्या मुद्रेकडे दुर्लक्ष केले. मला आत्ता त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यात मुळीच स्वारस्य नव्हते. .........आता टॉर्च फुल ठेवून मी पटाशी चित्राच्या खालच्या फटीत घातली. मग एका बाजूने चित्राच्या उभ्या कडेला स्क्रू ड्रायव्हर लावला. जोर लावता लावता माझं सगळं लक्ष फट कशी उघडेल याकडे होतं. त्यामुळे खड.... र्र र्र र्र असा आवाज करीत चित्र वर वर सरकू लागलं. मला आनंद झाला. मी माझ्या कामात यशस्वी होतोय हे पाहून मी पुन्हा जोर लावायला सुरुवात केली. चित्राची उंची पाच ते साडे पाच फूट होती. ते पूर्ण सरकवण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आता माझी उंची कमी पडू लागली. माझ्याकडे मोठं स्टूल किंवा इतर काही साधन नसल्याने मला चित्र अर्ध्याच्यावर थोडंसंच सरकवता आलं. अर्थात माझी उंचीपण त्याने गाठली नाही. मग माझं लक्ष उघडलेल्या भागाकडे गेलं. आतमध्ये एका लहान खोली एवढी पोकळ जागा दिसली. कदाचीत हा मोठा कोनाडा असावा. त्या कोनाड्याच्या खालच्या भागावर पाय ठेवून मी टॉर्च मारला आणि वरचा भागही दिसला. माझा अंदाज बरोबर होता. मी खाली पाहिलं. आत मध्ये एक मोठं खड्ड्यासारखं विवर होतं. टॉर्चच्या प्रकाशात आत उतरणाऱ्या पायऱ्या मला दिसू लागल्या. त्या गोल असाव्यात . मला आत पाऊल टाकण्याचं धैर्य झालं नाही. आत व्यवस्थित बसवलेल्या चिऱ्यांवर वर्षानुवर्षाच्या घाणीचे जाड थर बसले असावेत. कदाचित ते निसरडे असतील. मला का कोण जाणे आत पाऊल टाकावेसे वाटेना. ही कोणत्याही दृष्टीने मला फायर प्लेस वाटत नव्हती. पण सगळ्याच भागात बसलेली पुटं आणि जाड जाड कोळ्यांची मोठमोठी जाळी पाहून परत ते चित्र जागेवर बसवावे असे वाटू लागले. पण ते मला शक्य होईल असे वाटेना. आता वरून ते ढकलावे लागणार आणि माझी उंची तेवढी नव्हती. मी चित्राच्या खालच्या भागाला जोर लावून पाहीला. पण आता ते खाली सरकायला तयार नव्हते. मला आता चांगलाच घाम फुटू लागला होता. ते खरंतर वरून ठोकायला पाहिजे होतं. पण वर म्हणजे तरी दहा बारा फुटांवर मी जाणार कसा ? सिलिंग वीस फुटांचे होते. आणि स्वैपाकघर आणि चित्र यांमध्ये वर मजला नव्हता. आता हे चित्र जर खाली आले नाही तर ? मला लीनाची आठवण झाली. कोणी नाही आलं तरी ती आज संध्याकाळी येणार होती . मी जरा वेळ सगळेच प्रयत्न बंद करूनसोफ्यावर बसलो. इकडे तिकडे पाहत होतो काही अवजार किंवा काही कल्पना सुचते का.पण काही सुचायलाच तयार नव्हतं. मी वेळ जावाम्हणून वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे निघालो. दिवस असल्याने विचित्र अनुभव येण्याचा प्रश्नच नव्हता. मी बेडरूमचे कुलूप उघडले. आतशिरलो. तिथली खिडकी उघडली. बाहेर पाहत बसलो. मला नसते उद्योग करायला कोणी सांगितले होते ? असं लीना विचारणार. बाहेर पाहतापाहता शिवमंदिरा जवळच्या कंपाउंड वॉलजवळ एक लांबलचक लाकडी दांडा आणि त्यवर लोखंडी कंगव्या सारखी वस्तू बसवलेली दिसली.म्हणजे रेल्वे वर्करच्या हातात जो लोखंडी पंजा असतो , ज्याने तो रुळांमधले लहान लहान दगड एका पातळीत आणण्याचा प्रय्त्न करतो तसलंकाहीतरी . मला त्याचा उपयोग लक्षात येईना. पूर्वी इथे दगड पसरलेले असतील का ? मी उगाचच कल्पना करीत होतो . मग या अवजाराचाउपयोग काय ? विहिरीतला गाळ काढायला, की विहिरीत पडलेली वस्तू काढायला ? प्रश्न माझेच होते , उत्तरंही माझीच होती. मला काहीसमजेना. अचांनक ते अवजार घरात आणून पाहावे आणि काही उपयोग होतो का ते पाहावे. म्हणून मी जिन्यावरून धावत जाऊन ते अवजार घेऊनयेण्याचा प्रयत्न केला. तर ते माझ्याच अंगावर आले. मी बाजूला झाल्याने माझ्या अंगावर न पडता. ते वेडे वाकडे पडले. ते चांगलंच जड होतं. मी ते कसेतरी ओढीत दरवाज्यातून घरात आणले. एकदाचे खाली टाकले. मग चित्रा जवळ उभा राहून मी त्याचा कंगव्यासारखा भाग चित्राच्या वरलावला. आणि तो तिथे अडकल्यावर खाली ओढू लागलो. मी त्याला लटकलो आणि त्याची पकड सुटली की काय काही कळायच्या आत त्याअवजारासहीत खाली पडलो. माझा श्वास वरचा वर खालचा खाली झाला. जरा विश्रांती घेण्यासाठी सोफ्यावर बसलो. मी स्वतःला लाख शिव्या दिल्या. आता हे चित्र खाली कसं येणार या कल्पनेनीच मला घाम फुटू लागला. त्यात लीना येणार. मी पुन्हा
ते अवजार उचललं. आणि पुन्हा वरच्या कडेला लावलं. आणि दांडा थोडा लांब राहून आणि तिरका करून ओढून पाहिले. मोठ्या प्रयासाने ते चित्र थोडे खाली आले. आता माझा उत्साह वाढू लागला. मी परत परत ते अवजार वापरून ते चित्र हळूहळू खाली आणण्यात यशस्वी झालो. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे हे अवजार यासाठीच तर वापरले जात नव्हते ? असा विचार माझ्या मनात आला. याचाच अर्थ जेव्हा जेव्हा खाली उतरायचे असेल तेव्ह ते अवजार वापरून चर सरकवताही येत असेल आणि बंद करता येत असेल. मी ते अवजार परत बाहेर जाऊन जिथे होते तिथे ठेवले. मी त्या अवजाराला नमस्कार केला.
जेमतेम मी जेवण बनवले . दुपार नंतर झोपलो. वातावरण थंड होते. मी अजूनही वाड्याची मागची बाजू पाहिली नव्हती.आत्तातरी माझ्यात तेवढी चिकाटी नव्हती. उद्या ऑफिसला जायचे होते आणि संध्याकाळी लीना आणि मुलं येणार होती. मी पाच वाजेपर्यंत वाट पाहिली . मग गाडी घेऊन लीनाला आणायला स्टँडवर गेलो. ............. साडेसहा वाजता बस आली. त्यांना उरतून घेतलं आणि घरी आलो. वाटेत येताना लीना फार बोलत नव्हती. पण अगदीच अबोल नव्हती. तिने विचार केला असावा. जे झालं त्यात माझी चूक
नव्हती. आता ती घरी आल्यावर नेहमीप्रमाणे वागू लागली. मला आनंद झाला. पण झोपताना मात्र ती मुलांना घेऊन वेगळ्या वेडरूनमध्ये झोपली. मी तेही मान्य केले. वास्तविक पाहता मी तिच्या जवळीकेची वाट पाहत होतो. असो. रात्र ठीक चालली होती. अचानक दीड वाजता
कुणातरी लहान मुलीचया रडण्याचा आवाज येऊ लागल्याने मी जागा झालो. मी इकडे तिकडे पाहिले. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता.
तोही न वापरात असलेल्या भागातून. मी तिथली खिळवलेली खिडकी सावकाश , आवाज न करता उघडली. पलिकडच्या भागात असलेल्या एका खोलीच्या उंबऱ्यात बसून एक मुलगी रडत होती. मला तिचा चेहरा काळोखामुळे दिसत नव्हता. तिच्या अंगावरचे फ्रॉक सारखा कपडा असावा. बहुतेक तिने चेहरा ओंजळीत लपवलेला असावा. मी तिला धीर करून विचारावंसं वाटलं , " का ग बाळ का रडतेस ? आई दिसत नाही का तुझी ? आणि तू इथे कशी आलीस ? " पण प्रत्यक्षात माझ्या तोंडाला कोरड पडली होती . आणि फक्त हवा बाहेर पडली. त्यावर उत्तरादाखल( ? ) ती विरळ होत होत दिसेनाशी झाली. माझ्या मानेवरून घामाचा थंडगार ओघळ सरकत असलेला जाणवला मी खिडकी तशीचउघडी ठेवून खाली आलो. लीना आणि मुलं गाढ झोपेत होती. त्यांना न उठवण्याचं ठरवून मी हॉलमध्ये आलो आणि सोफ्यावर बसून या घटनेवरविचार करू लागलो. आत्तापर्यंत फक्त सावल्या दिसत होत्या , आज प्रत्यक्ष मुलगी दिसली. हे नक्की काय आहे ? कोणाला विचारावं ते समजेना.इथे कोणीही नव्हतं , की ज्याच्याजवळ मी मन मोकळं करू शकलो असतो . लीनाला तर हे सांगणं कठीण होतं. ......... सकाळ होईपर्यंत मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी मी तसाच मरगळलेल्या स्थितीत बँकेत गेलो. मला कोणाचातरी सल्ला हवा होता. मध्ये एकदा मोहंती साहेबांचा फोन आला . त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं होतं. त्यांना आत्ताची कर्जांची माहिती हवी होती. मी तसा हा विषय विसरलो होतो. म्हणजे काम करीत नव्हतो असे नाही. अचानक संध्याकाळी पै माझ्या केबिनमध्ये आले. ते थोडे काकू करीत मला म्हणाले, " सर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही मानाल का ? म्हणजे काय आहे की तुमचा देवावर वगैरे विश्वास नाही म्हणून म्हणतोय. ..... " त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं मी " बोला " या अर्थी मुद्रा केल्यानंतर ते म्हणाले, " सर इथे नदीच्या पलिकडच्या तीरावर एक बाबा राहतो त्याला जाऊन भेटलात तर तुम्हाला थोडी मदत होईल...... असं वाटतं. " ते पुन्हा माझ्या प्रतिक्रियेसाठी थांबले. मी काही वेळाने म्हणालो, " ठीक आहे , पण तुम्ही माझ्या बरोबर याल तर बरं होईल. " त्यावर ते प्रथम कचरू लागले. मग त्यांनी येण्याचं मान्य केलं. मग ते इकडे तिकडे घाबऱ्या घुबऱ्या पाहत म्हणाले, " सर ही गोष्ट गोळेला कळून उपयोगी नाही. " मी का विचारलं पण ते उत्तरादाखल उठून निघून गेले. अचानक मला आमच्या हेड ऑफिसमधून बोलावणं आलं . ते कशा संंदर्भात होतं कळलं नाही. म्हणजे उद्या प्रथम हेड ऑफिसला जावं लागणार तर, मी स्वतःशी पुटपुटलो. दोन दिवस तरी जातील . त्या अवधीत लीनाला " ती " मुलगी दिसली तर गहजब होईल आणि आल्यावर ती काहीही करेल ही भीती मला वाटली. मी घरी पोहोचलो. लीनाला उद्या मला मुंबईला जायचंय म्हंटल्यावर ती परत माझ्याबरोबर यायचं आहे असं म्हणाली. पण
मुलांची शाळा सारखी बुडवणं बरोबर होणार नाही असे मी म्हंटले. ते तिने नाराजीनेच मानले. त्या रात्री काहीही झालं नाही. सकाळी उठून मी
मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो. जाताना मी तिघांचा निरोप घेतला. लीनाचा मूड चांगला नव्हता. मी त्याची पर्वा केली नाही. .............
मुंबईची मिटिंग झाल्यावर मला माझ्या मुंबईतल्या साहेबांनी बोलावलं. ते म्हणाले, " मि. सबनीस . माझ्याकडे तुमची गोपनीय फाइल आलेली आहे. त्यात वेगवेगळी आरोपपत्र आहेत. हे झालं कसं ? मी काय निर्णय घ्यावा तुम्हीच सांगा. " मी काही बोलत नाही असे पाहून ते म्हणाले, " मार्चपर्यंत मी तुम्हाला मुदत देतोय , ती घ्या आणि तुमचं काम रुळावर आणा. उशीर केलात तर मी काहीही करू शकणार नाही. " मी आभार मानून निघालो. केबिनचा दरवाज्या उघडणार इतक्यात साहेब म्हणाले, " सबनिस काही प्रॉब्लेम आहे का ? माझाअसं विचारण्याचा काहीही संबंध नाही. पण तुम्ही फार ताणाखाली वावरताय असं मला वाटतं. " मी उत्तरादाखल एवढेच म्हणालो, " तुम्ही दिलेली डेडलाइन मी पाळीन. " मी बाहेर पडलो. बस पकडण्यासाठी मुंबई सेंट्रलला आलो .गाडीची वाट पाहत बसलो होतो. गाडी लागायला वेळ होता. माझी नजर सहजपणे एक दोन बाकडी सोडून बसलेल्या एका माणसाकडे गेली. ते एक मोठा चेहरा असलेले गृहस्थ होते. त्यांनी अंगात फक्त सदरा आणि लेंगा घातलेला होता. त्यांचे भव्य कपाळ पाहणाराचे लक्ष वेधून घेत होते. लांबलचक वाढवलेले पांढरे केस मानेपर्यंत रुळत होते. पाढरी शूभ्र दाढी त्यांना शोभून दिसत होती. का कोण जाणे पण मला ते बुवा बापू यांपैकी वाटले नाहित. तेजस्वी मोठे डोळे टोकदार नाक आणि निश्चयी जिवणी त्यांच्या कर्तवगारीचे प्रतीक होती. कपाळावर तिबोटी शिवगंध आणि मध्ये शेंदरी टिळ्यावर बुक्का लावलेला त्यांना शोभून दिसत होता. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेला एक साधारण माणूस जो त्यांचा सचीव होता (हे नंतर कळलं) तो उठून माझ्याकडे आला आणि त्याने मला त्यांच्या बद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं नाव "वरदाचार्य पुराणिक" होते. त्यांची गूढ शास्त्रांतील प्रगती आणि त्यांचे विचार, आजकालची पिढी कशी फसव्या अध्यात्माच्या मागे लागल्ये आणि त्यामुळे त्यांचे नुकसान यावर त्या माणसाने जणू व्याख्यान आरंभले. मला जरा वैतागच आला. आता लवकरच बस येईल तर बरं . म्हणजे या चेल्याच्या तडाख्यातून मी सुटेन असा विचार करून मी इकडे तिकडे पाहिलं. ते पाहून तो म्हणाला, " मी तुम्हाला बहुतेक बोअर करतोय असं दिसतंय . पण आमच्या महाराजांची गूढशास्त्रांवर जी हुकुमत आहे तिचा अनुभव घेतल्यावर तुमचा नक्कीच विश्वास बसेल. "असे म्हणून त्या माणसाने समोर बोट करीत " अरे ती पाहा बस आली " असे म्हणून मला नमस्कार केला. आणि मला त्या महाराजांचं कार्ड दिलं व म्हणाला, " कधी काही सल्ला मसल्त लागली तर जरूर फोन करा. कारण महाराज बहुतेक परदेश दौऱ्यावर असतात पण इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते विशेष आस्था दाखवता बरं का. चला निघूया. “ असे म्हणून तो दुसऱ्या आलेल्या गाडीत जाऊन महाराजांसहित बसला. जाता जाता महाराजांनी माझ्याकडे सहजपणे पाहिले व ते हसले. त्यांचं हास्य खरोखरीच गोड होतं. माझ्या आयुष्यात तरी मी असा माणूस पाहिला नव्हता. त्यांचा विचार मागे सारीत , मी गाडीत जाऊन बसलो.बसलो. दिवस थंडीचे होते. पण मला आवडत नव्हते. माझा विचार खरं म्हणजे हरिदास कडे जाण्याचा होता. पण मी तसं केलं नाही. आता मीच सगळं शोधून काढणार आणि त्यातून सुटणारही. रात्री अकराच्या सुमारास मी घरी पोहोचलो. मधलं जंगल एकूण सगळा वैराणपणा मला काहीच जाणवत नव्हतं. घरी आलो. लीनाने दार उघडले. मला जेवायचं नाही असं मी सांगितल्यावर तिने जास्त चवकशी न करता ती झोपण्यासाठी निघून गेली. वरचा मजला अर्थातच मी बंद करून चावी माझ्याकडे ठेवली होती . लीनाने वर जाऊन काही पाहू नये म्हणून. मला लवकर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. थोडा जास्तवेळ अंथरूणात रेंगाळलो. चहा वगैरे घेतल्यावर लीना म्हणाली, " काल माझ्या स्वप्नात एक मुलगी आली होती. आपल्या रसिकापेक्षा थोडी मोठी होती. आणि ती रडत होती. वरच्या मजल्यावरच्या दरवाज्यामागे उभी होती. मी जागी झाले. तेव्हा पहाट झाली होती. इथे नक्की काय आहे , याचा तुम्ही कधी विचार केलाय .. .....?" माझ्याजवळ उत्तर नव्हते. लीना घरी असल्याने मला माझी शोध मोहीम राबवता येत नव्हती.
फेब्रुवारी महिना असल्याने मुलांच्या परीक्षांचं वेळापत्रक तर मिळालं होतं. वीस तारखेच्या पुढे म्हणजे शेवटच्या
आठवड्यात परीक्षा होत्या. असो. दोन दिवस लक्षात राहण्यासारखं काही न घडल्याने मी कामावर बिनधास्त जात होतो. अशाच एका संध्याकाळी मी घरी येण्या जरा वाड्याच्या वापरात नसलेल्या भागात काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला . ते संध्याकाळचे सात वाजले होते. मला यायला नेमका उशीर झाला होता. लीना घाबरून मुलांना घेऊन पोर्चमध्ये येऊन बसली होती. मी आलो तर आमची कोणाचीच तिथे जाऊन पाहण्याची प्राज्ञा नव्हती. अर्थात मला पाहण्याची सारखी उबळ येत होती.म्हणून मी त्या रात्री लीना झोपल्यावर बघायचे ठरवले. लीना आणि मुलं रात्री साडेदहाच्या सुमारास झोपली. मी हळूच उठून वरच्या मजल्यावर कुलुप उघडून आलो. तिथल्या बेडरूमचा दरवाज्या उघडून दिव्याचे बटण चालू केल्यावर तिथल्या धुळीत काहीतरी सरकत गेल्याच्या खाणाखुणा दिसल्या . मी त्या कुठे जातात ते पाहू लागलो. पण भिंतीजवळ त्या खुणा संपलेल्या दिसल्याल. मग बाहेर येऊन पाहिलं तर बेडरूमच्या बाहेरच्या धुळीतही तशाच खुणा आणि दोन मोठे पाय दिसले. ते खिळवलेल्या खिडकीच्या जवळ संपलेले दिसले. ते मानवी पाय होते. मी खिडकीतून आत टॉर्च मारून पाहिले. मी जसा आतल्या जिन्याचा दरवाज्य अर्धवट उघडा सोडला होता , तो तसाच दिसला. तिथेही काहीतरी पुन्हा ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या. अगदी जवलून पाहिल्यावर ते पाय एखाद्या मोठ्या जनावराचे आहेत असे भासले. "पण इथे कोणते जनावर येणार .....? " मी स्वतःशी पुटपुटलो. मग मात्र मी बेडरूम बंद केली आणि खाली निघणार एवढ्यात खिडकी पलीकडच्या भागात कोणीतरी धावत असल्याचा आवाज झाला. मी जोरात
" कोण आहे तिकडे ......... " असे विचारले. उत्तर आले नाही . नाही म्हणायला खिडकी पलीकडच्या बंद खोलीबाहेर एक आकृती दिसली . तिच्याकडे पाहता पाहता ती पांढऱ्या रंगात रुपांतरीत झाली. आता आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारची विचित्र शांतता निर्माण झाली. त्या पांढरट आकृतीने आता माझ्याकडे मान वळवली. तिचा चेहरा मी कॉलेजात असताना एका मुलीच्या कायम मागे असे, त्या पुष्पा नावाच्या मुलीसारखा दिसू लागला. ती हसत होती. माझा घसा कोरडा पडला होता. ही इथे कशी आली ? आणि हिचा संबंध काय ? असं माझ्या मनात आलं पण मग माझ्या भोवतालचा सगळा भागच फिरत असल्याचा मला भास झाला आणि माझी शुद्ध हरपून मी खाली पडलो. .............
मला जाग आली तेव्हा मी खालच्या बेडरुममध्ये बिछान्यावर पडल्याचे मला जाणवले. लीना बेडजवळ उभी होती.तिच्या हातात पाण्याचा पेला होता. तिने तो माझ्यापुढे केला. आणि म्ह्णाली, " घ्या. पाणी ......... " मी पाणी प्यायलो. आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो ओलसर लागला. त्यावर लीना म्हणाली, " वर पडला होतात बेशुद्ध होऊन. मी पाणी प्यायला उठले, तेव्हा तुम्ही बेडवर दिसला नाहीत . म्हणून वर आले. " थोडा वेळ थांबून ती म्हणाली, " अशा अवस्थेत इथे राहावसं वाटतंय तुम्हाला ? हे प्रमोशन की काय आहे ना ते नाही म्हणा आणि बदली करून घ्या आणि मुंबईला चला. यातच शहाणपणा आहे. खरंतर चहाची वेळ नव्हती पण तिने चहा केला . तो घेतल्यावर मला जरा बरं वाटलं. मग मात्र मी तिला म्हणालो, "परीक्षा झाल्याबरोबर तू मुलांना घेऊन मुंबईला जा. " त्यावर ती शांतपणे म्हणाली, " मी दाखला काढून घेणार आहे. " आणि बाजूला माझ्याकडे पाठ करून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी मी येताना गावात जाऊन काही किराणा सामान वगैरे विकत घेतले. गाडीमध्ये टाकून गाडी सुरू करणार एवड्यात माझी एका व्यक्तीकडे नजर गेली. ते होते. पारलोके भटजी. मी गाडी बंद करून त्यांना हाक मारली. त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांना नीट दिसलं नसावं. म्हणून ते गाडीजवळ आले. त्यांची माझी नजरानजर झाली. आणि मला ओळखताच ते पळत सुटले. कोणतेही उत्तर न देता ते का पळाले मला कळेना. मग मीही उतरून त्यांचा पाठलाग करू लागलो. अधून मधून मी त्यांना हाका मारीतच होतो. ते हळू हळू शिवमंदिराजवळ आले. ते घरात जाण्याच्या आत त्यांना गाठले. त्या बरोबर ते गयावया करून म्ह्णाले," साहेब मला जाऊ द्या हो. तुमच्या बरोबर पाहिलं तर "ते" मला त्रास देतील. माझ्या बायको मुलांना मारतील . मी जातो. मला जाऊ द्या..........." असं म्हणून ते मला टाळून पुढे जाऊ लागले. मग मी जाऊन देऊन त्यांना म्हणालो, " गुरुजी मी तुमच्या घरी आलो तर चालेल का ? मला तुमच्याशी बोलायचंय. त्यावर ते " ठीक आहे ठीक आहे . पण कोणालाही कळता कामा नये. " असं म्हणत घरात गेले. मी विचार करीत गाडीत बसलो. भटजींनी मला घाबरण्याचं कारण कळेना. यात गोळेचा तर संबंध नाही ? मी घरी पोहोचलो. लीना आणि मुलं बाहेर खेळत असलेली दिसली. मला पाहून लीना मुलांना म्हणाली," चला, बाबा आल्येत . खेळ बंद. " त्यावर रसिकाने तक्रारीच्या सुरात म्हंटले " येऊ दे ना. तुला पाहिजे तर जा. आम्ही दोघे खेळतो. " रसिकाचं कधीच समाधान होत नसे. मग मीच म्हंटलं, " खेळा गं थोडावेळ. " मग लीना आणि मुलं अर्धातास खेळत राहिली. लीनाचा माझ्या येण्यामुळे खेळातला इंट्रेस्ट गेला होता. लवकरच ती आत आली. मी गंमत म्हणून विचारले, " आज काय घडलं वाड्यात ? , म्हणजे काही दिसलं बिसलं ? " लीनाला माझा चेष्टेचा सूर आवडला नाही. पण ती काही न बोलता संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली. रात्री नवाच्या सुमारास आम्ही जेवायला बसलो. परीक्षेचा विषय निघाला . मग त्यावर लीना म्हणाली ," मी नन मॅडमशी बोलल्ये. आम्ही दाखला काढून घेऊ म्हणून. ........ " थोडे थांबून तिने माझी प्रतिक्रिया अजमावण्याचा प्रयत्न केला. मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून ती पुढे म्हणाली, " ............मॅडमनी तुम्हाला भेटायला बोलावलंय. " मी जाऊ म्हंटलं आणि विषय टाळण्याच प्रयत्न केला. तिला ते आवडलं नाही. आवरा आवर करताना ती म्हणाली , " तुम्ही काय ठरवलंय , शाळेच्या बाबतीत ? " मग मात्र मी म्ह्णालो, " आपण थोडं थांबावं , इतकी चांगली शाळा मिळणार नाही. परीक्षा झाल्याबरोबर तू मुलांना घेऊन जा पाहिजे तर, पण दाखला काढण्यावर विचार करू. " तिला ते आवडलं नाही. " काहीही झालं तरी मी मुलांना घेऊन इथे परत येणार नाही. " ती थोडी चिडूनच म्हणाली. पुढचा दरवाज्या उघडाच होता. बाहेर मिट्ट काळोख होता. वातावरणात चांगलीच थंडी होती. दरवाज्या जवळ रसिका उभी होती.अचानक ती ओरडली, " मम्मी , तिकडे बघ कोण आहे. ती ताई वाटते. ....." लीनाने धावत येऊन तिला जवळ घेतलं. लीनाने लावलेल्या मंदिरातल्या दिव्याच्या उजेडात रसिकाला कोणीतरी दिसत होते. आम्ही सगळ्यांनीच मग तिकडे पाहिलं. पण आम्हाला काहीही दिसले नाही. मी धावत जाऊन मंदिरावजवळ गेलो. पण तिथे कोणीही नव्हते. पोलिस स्टेशनला आठवड्यातून एक दोन तरी फेऱ्या माझ्या होत होत्या. पण त्यांच्याकडे सबळ पुरावा माझ्या विरोधात नसल्याने ते मला पकडू शकले नाहीत. असो. हरिदासला भेटायला हवं होतं. पण कसं ? हा प्रश्न होता. त्याला नक्कीच बरीच माहिती असणार. पोलिस हरिदास काय म्हणाला ते सांगत नव्हते. एक दोन वेळा त्यांनी माझ्याबद्दल हरिदासला बरीच माहिती आहे असा गुगली त्यांनी टाकून पाहिला पण त्यांना मला या प्रकरणात गोवता आलं नाही.
असेच विचित्र विक्षिप्त अनुभव अधून मधून येत राहिले. त्यात मुलांच्या परीक्षा झाल्या. मार्चच्या सुरुवातीला लीना मुलांना घेऊन मुंबईला गेली. आता मी मोकळा होतो. माझा शोध चालू झाला अर्थात संध्याकाळच्या सुमारास आणि रविवारी सकाळी सुद्धा. लीना गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्ह्णजे लगेचच येणाऱ्या रविवारी सकाळी मी परत स्क्रू ड्रायव्हर आणि पटाशीच्या सहाय्याने सरदार साहेबांचे चित्र वर ढकलले. मुख्य दरवाज्या बंद केला होता. टॉर्चच्या प्रखर प्रकाशात मला पायऱ्या दिसत होत्या. प्रथम मी एक पाय टाकून पाहिला. एखाद्या जाजमात पाय बुडावा तसं मला वाटलं . ते धुळीचं जाजम होतं. किती वर्षांची धूळ होती काय माहित . मग दुसरा पाय टाकला टॉर्च आणि पटाशी हातात धरून मी दुसरी पायरी उतरलो. पायऱ्या थोड्या उंच होत्या. असो. पण दोन तीन पायऱ्या उतरलो तरी समोर काहीच दिसेना अजूनही भिंतीसारखा भाग दिसत होता. मग टॉर्चची तिरिम समोरच्या प्रशस्त हॉलसारख्या जागेवर पडली. कुठेतरी लांबवर पाणी पडत असल्याचा आवाज येत होता. आत अंधारच होता. आता माझ्या पायऱ्या संपल्या होत्या. मी सपाट दगडी जमिनीवर उभा होतो. मी टॉर्च सगळ्या दिशांनी फिरवला. तिथे मला तीन चार लाकडी पेट्या भली मोठी कुलुपे लावून ठेवलेल्या दिसल्या. यांची कुलुपं उघडायची म्हणजे कर्मकठीण . चाव्या सापडण्याची सुतराम शक्य्ता नव्हती. तिथे एक पहार पडली होती. मी हातातली पटाशी सर्वात खालच्या पायरी वर ठेवून पहार उचलली. शस्त्र म्हणून वापर करता येईल . एका पेटी जवळ गेलो ती वाजवून पाहिली. आत काय असावं कळणं कठीण होतं. हातातली पहार जाडजूड कडीत सरकवून मी टॉर्च खाली ठेवला. आणि जोर लावायला सुरुवात केली.
जोर लावून लावून मी थकलो पण कडी रेसभरही हलली नाही. शेवटी जुनं काम होतं. अर्थात मी आत्ता त्या गोष्टीचं कौतुक करण्याच्या मनः स्थितीत नव्हतो. थंडी असूनही माझ्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या. मग दुसऱ्या बाजूने पण प्रयत्न करून पाहिला पण कडी ढिम्म हालेना. मग मी कंटाळून पहार तिकडेच टाकली. जरा दम खाण्यासाठी बसलो., पण उकिडवा. खाली फरशी असावी . ती बरीच जुनी असल्याने खडकासारखी भासत होती. पायऱ्यांवर बसण्याची सोय नव्हती . माझा एक हात लाकडी पेटी वर होता. आपण दुसरं कोणाची मदत घ्यावी का असा विचार माझ्या मनात आला. कोणाची मदत घेणार ? जुडेकर , गोळे , की पै ? जुडेकरवर विश्वास वेताचा होता. गोळे लबाड होता. पै कितपत मदत करतील कळत नव्हतं. कदाचित ते नाही म्हणतील. त्यांना न विचारताच मी ठरवीत होतो. तसे ते सामान्य होते. मलाबरेच सीनियरही होते. माझी नजर मग समोरच्या बाजूकडे गेली. मी टॉर्च मारला. त्या प्रकाशात त्या भुयाराचा शेवट दिसत नव्हता. म्हणजे ते बरंच मोठं असणार. मी उठून दुसरीकडे काय आहे ते पाहायला गेलो. मला माझ्या पेटी वरच्या हातावर कसली तरी हालचाल जाणवली. पाहतो तर काय ......? माझ्या हातावर एक दीड इंच लांबीचा कोळी चालत होता. मी घाबरून त्याला उडवले. आणि आजूबाजूला पाहिले. टॉर्चच्या प्रकाशात भुयाराच्या छतापासून जमिनीपर्यंत मोठ मोठी कोळ्यांची जाळी लटकलेली दिसली. मी परत पहार उचलली. आणि समोर जाऊ लागलो. पेट्यांच्या पलिकडे काही अंतर सोडून चांगली आठ दहा थडगी होती. त्यातली काही फुटकी होती. तर काही तडे गेलेली होती. आत नक्कीच मृतदेह असावेत, म्हणजे त्यांचे सांगाडे. ते तरी असतील का , अशी शंका घेत मी पुढे निघालो. जवळच दिसणारं थडगं मी पाहू लागलो. त्यावर काही लिहिलंय का , ते पाहत होतो. कसल्यातरी अगम्य भाषेत काही तर कोरलेलं होतं. त्याला तडा गेलेला होता. मी त्या तड्यावर टॉर्च मारून आत काही दिसतंय का ते निरखून पाहू लागलो तर मला बऱ्याच लांबून " मि. स ब नि स , दार उघडा ........ " असं ऐकू येऊ लागलं. मी घाबरून पायऱ्यांकडे पाहिलं. पण तिथे काहिच दिसलं नाही. मग मी स्वतःशी म्हणालो, " आत्ता कोण आलंय की काय ..........? " लगेचंच माझ्या प्रश्नाला हुंकारासारखा आवाज आला आणि उत्तर मिळाले. दचकून मी इकडे तिकडे पाहिलं . कोणीच नव्हतं. मग उत्तर दिलं कोणी ? आता पुन्हा बाहेरच्या दरवाज्या वाजवल्याचा आवाज आला. कोणीतरी मोठ मोठ्याने दरवाज्या वाजवीत होतं. आत्ता कोण असेल ?
जुडेकर ? गोळे ? की आणखीन कोणी ? ......... मी पटकन टॉर्च बंद केला आणि पायऱ्यांकडे धावलो. पायऱ्या चढून वर आलो. आता दरवाज्या
ठोकणं बंद झालं होतं. बहुतेक आलेला माणूस निघून गेला असावा. मग मला बोलणं ऐकू आलं. " तुम्ही असं करा , मागच्या बाजूने कोणती खिडकी उघडी असेल तर आत शिरता येतंय का ते पाहा " आवाज ओळखीचा होता. तो इन्स्पेक्टर कानविंदेंचा होता. मी आता कोनाड्यातून हॉलमध्ये प्रवेश केला. अचानक माझ्या अंगाला थरथर सुटली. काय करावं मला सुचेना दुसरं कोणी आता येण्याच्या आत मला काहीतरी करून कोनाडा बंद करावा लागणार होता. ते कंगव्यासारख हत्यार बाहेर होतं. चित्र परत खाली आणणं मुष्किल होतं पण गरजेचं होतं. मला काही उपाय सुचेना मी सहज म्हणून बेडरूममध्ये गेलो आणि कोनाडा झांकण्यासाठी काय उपयोगी पडेल ते पाहू लागलो. तिथलं कपाट उघडल. पण काही सापडलं नाही मग अचानक मला बेडवरची चादर दिसली ती त्यावर लावता येईल या विचाराने मला सुटल्यासारख वाटू लागलं. मी ती ओढली आणि हॉलमध्ये येऊन तिथे लावून पाहिली . माझ्या हातांच्यावर अजून दोन ते तीन फूट चित्राचा खालचा भाग होता. आता मला तिथे उभं राहून चादर कशी लावावी सुचेना . मी तिथली एक खुर्ची आवाज न करता उचलली आणि कोनाड्याजवळ आणली. तिच्यावर उभं राहून मी चादरीचं एक टोक चित्राच्या मागच्या फटीत कोंबू लागलो. बरोबर त्याक्षणीच पुन्हा दरवाज्या वाजू लागला. इन्स्पे. कानविंदे ओरडले " मि. सबनिस दरवाज्या उघडा नाहीतर मला तोडावा लागेल.मला माहित आहे तुम्ही आत दबा धरून बसले आहात . " कसं तरी टोक तर अडकलं. दुसरं टोक अडकवण्यासाठी खुर्चीवर उभा राहिलो तेही अडकलं. मग मी सोफा शक्यतोवर हळूच सरकवून कोनाड्याला समांतर आणि चिकटवून ठेवला. तेव्हा कुठे तो कोनाडा बंद झाला. मग मी तोंड धुण्यासाठी बाथरुममध्ये गेलो. तिथला टॉवेल पाहून मला एक कल्पना सुचली. मी माझ्या डोक्यावरपाणी मारून घेतलं आणि टॉवेल गुंडाळून , "आलो , आलो .............." असं ओरडत दरवाज्या उघडला. रागाने लाल झालेले इन्स्पे. इतर माणसांसहित आत घुसले. आणि अंगावर येत म्हणाले," आम्हाला थांबवून ठेवण्याची काय सजा आहे माहिती आहे ? " हा सरकारी कामात अडथळा झाला. तुम्ही पुराव नष्ट करीत असणार. बोला कुठे होतात तुम्ही .........? " त्यावर मी शांतपणे उत्तर दिलं " अहो मी अंघोळीला गेलो होतो. आणि पाण्याच्या आवाजात मला तुमच्या हाका ऐकू आल्या नाहीत त्याला काय करणार ? " त्यावर भडकून ते म्हणाले, " एकदम खोटं , साफ खोटं , पाण्याचा आवाज बिलकूल येत नव्हता. मला काय लहान पोर समजलात ? " मध्येच त्यांचे पाताडे नावाचे सहकारी म्हणाले, " अहो पण सर आपलं लक्ष दरवाज्यावर असल्याने आपल्याला ऐकू आलं नसेल." ते ऐकल्यावर इन्स्पे. त्यांच्यावर ओरडले. " पाताडे, आरोपीची बाजू घेताय ? तुम्ही त्यांचे वकील आहात की काय ? बंद करा तोंड . पाताडे सॉरी म्हणाले. “............ असं पुन्हा केलत तर निलंबित करीन. " साहेब पुन्हा त्यांच्यावर गुरकावले. माझ्याकडे वळून मग म्हणाले " आम्हाल दिवसाउजेडी वाडा पाहायचाय, काढा चाव्या. आमच्या बरोबर चला. " मी त्यांच्या हातात चाव्या ठेवल्या. त्यांची अजून तगमग चालू होती . त्यांना पाहिजे तशी कारवाई माझ्यावर करता येत नव्हती. मी कपडे केले आणि परत आलो त्यांच्या बरोबर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी वळणार एवढ्यात अचानक चित्राखाली लावलेली चादर आधी एका बाजूने खाली आली आणि नंतर दुसऱ्या बाजूने खाली आली. आम्ही सगळे पाहात राहिलो. ते पाहून इन्स्पे.माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "म्हणजे हे असं आहे तर ? हे चित्र वर सरकवून तुम्ही खालीतळघरात काहीतरी करीत होतात . मला वाटलंच इथे तळघर असणार. " मला चांगलीच थरथर सुटली ,तोंडाला कोरड पडली. पण माझ्या नशिबाने म्हणा किंवा आणखीन कशानेही म्हणा पडलेली चादर अशा रितीने पडली होती की तळघराकडे जाणाऱ्या विवरातल्या पायऱ्या झाकल्या गेल्या. इन्स्पे. जोरात तिकडे वळत् मला म्हणाले, " किती प्रयत्न करणार आहात पुरावे लपवण्याचा ? काय ? त्यावर कळू नये म्हणून सोफा सरकवलात ....... ? " त्यांनी घाईघाईने सोफा बाजूला ओढला. माझ्या लक्षात आलं की ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते कोनाड्यात शिरले पण त्यांना काहीही दिसले नाही की सापडले नाही त्यांनी एका हातात चादरीचे एक टोक धरले , पूर्ण चादर धरली नाही. नाहीतर खालच्या पायऱ्या दिसल्या असत्या. माझं नशीब जोरावर होतं. मग मी तोंड उघडलं. "साहेब , हा फक्त मोठा कोनाडा आहे. मी कधी पाह्यला पण नव्हता. केवळ कुतुहल म्हणून मी चित्र वर सरकवलं. " त्यानी हातातली चादर खाली टाकली. पण ते जोरात म्हणाले, " तुम्हाला काय वाटतं आम्ही तसेच जाऊ ? अजून कितीतरी गोष्टी इथे पाह्ण्यासारख्या सापडतील. चला वर जाऊ. " असं म्हणून ते आणि आम्ही सगळेच जिन्याकडे निघालो. वरच्या मजल्यावर गेल्यावर आधी आमच्या बेडरूमची तपासणी झाली. त्यात काही न मिळाल्याने इन्स्पे. साहेब नाराज झाले.
मग ते बाजूच्या भागात जाण्यासाठी मला म्हणाले, " तिकडच्या चाव्या द्या. ...... " त्यावर तो भाग मी भाड्याने न घेतल्याने माझ्याकडे तिकडच्या चाव्या नसल्याचे आणि त्या हरिदास कडे असतील असे सांगितले. मग माझ्यवर जोरात ओरडून म्हणाले, " मग मागच्या वेळेला आपण आत कसे शिरलो होतो ? " त्यांना कुठूनतरी मला अडकवायचे होते. त्यांना बाजूची खिडकी दाखवली . तिथे ग्रिल नव्हतं. ती खिडकी त्यांनी सताड उघडली. आणि आधी ते खिडकीतून उडी मारून आत उतरले. नंतर त्यांची माणसं . मी अजून तिथेच उभा राहिलेला पाहून ते मला म्हणाले, " तुम्हाला काय निमंत्रण पत्रिका द्यायला पाहिजे का ? " मग मीही उडी मारून आत शिरलो. आतल्या खोलीला कुलूप होतं. त्यात सगळेच शिरले. तिथे पडलेला बेड अजूनही तसाच होता. गादीची आता चाळण झाली होती. आमच्या चालण्यामुळे खोलीतली धूळ उडत होती. एक भिंतीतलं कपाट होतं. तेही जोर लावून उघडले. त्यातले खण वाळवी लागल्यामुळे अर्धवट पडण्याच्या स्थितीत होते. पण तिथेही काही सापडलं नाही. मग शेजारची दुसरी खोली तपासण्यासाठी बाहेर आलो. तिला कुलूप होतं. ते पण त्यानी फोडलं. त्याचा कडी कोयंडा मात्र हालायला तयार नव्हता. ज्या कॉन्स्टेबलने तो उघडला. त्याच्या हाताला जखम झाली. दरवाज्या उघडला. आतमध्ये बेड नव्हता. खोली चांगलीच मोठी होती. तिची खिडकी बंद होती. त्यात दोन मोठाले पेटारे होते. त्यांनाही कुलुपं होती. तीही उचकटून उघडली. आता पेटाऱ्यांचे दरवाजे उघडण्यासाठी दोन माणसं लागली. एका पेटाऱ्यात कपडे भरलेले दिसले. त्यात जुनी लुगडी, काही फ्रॉक आणि इतर कपडे होते. पण सगळ्यांचीच जाळी झाली होती. हातात उचलताच त्यांची माती होत होती. इन्स्पे. साहेबांचा इंटरेस्ट जात होता. मग दुसरा पेटारा उघडला. तिथे मात्र एक लहान मुलाचा तुटका सांगाडा दिसला. तो कोणाचा होता. आणि किती जुना होता. कळत नव्हतं. माझ्याकडे संशयाने पाहत इन्स्पे. म्हणाले , "शेवटी सापडला ना महत्त्वाचा पुरावा. " जणू काही मीच तो लपवून ठेवला होता. कॉन्स्टेबल कडे वळून ते म्हणाले, "पंचनामा करा आणि हे ताव्यात घ्या. तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवा. आत्ता कळेल काय गौडबंगाल आहे ते. " विजयी मुद्रेने कानविंदे गेले.
मी माझा शोध सुरू केला. दरवाज्या बंद केला चादर काढून पुन्हा मी पायऱ्या उतरून आत गेलो. मला आत्ता तरी भुकेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आत शिरून मी पुन्हा पेट्यांच्या मागे न लागता थडग्यांकडे माझा मोर्चा वळवला. टॉर्च वापरून मी तडा गेलेल्या थडग्याचं निरिक्षण करण्यात गर्क होतो. हातात पहार घेऊन आत घुसवली. आणि जोर लावला. एका बाजूने थडगं अर्धवट फुटलं. आत मध्ये विस्कळित झालेली हाडं आणि एक कवटी पडली होती . बाजूला एक लुगड्याची घडी होती. आणि काही भांडी होती. मला याचा अर्थ लागेना. कदाचित ज्या कुणाला पुरलं त्याच्या बरोबर कपडे आणि खाणं पिणं ठेवलं असावं. मी टॉर्चच्या प्रकाशात जास्त निरिक्षण करू लागलो. माझं लक्ष अजिबात नव्हतं. तेवढ्यात फडफड फडफड करीत एक मोठ्या आकाराचं वटवाधुळ माझ्या डोक्यावरून चिर्र चिर्र .............. असा आवाज करीत गेलं.
घाबरून माझ्या हातातली पहार पडली. आणि मी धावत पायऱ्यांकडे आलो. दोन तीन पायऱ्या चढलो , तेव्हा पुन्हा तेच वटवाधुळ पुन्हा माझ्या दिशेने तरंगत गेले. माझा श्वास जड झाला होता. मी कसातरी पायऱ्यांवरून एकदाचा कोनाड्यात आलो. आता मात्र कोनाडा बंद करणं गरजेचं होतं. मी धावत जाऊन दरवाज्या उघडला. अचानक दारात जुडेकरला पाहून मला थरथर सुटली. मी चांचरत त्याला विचारलं. " क का का आलास ? तुझं काय काम आहे ? " तो म्हणाला , " सर एवढं घाबरायला काय झालं. ? अहो, मी तुम्हाला सहजच भेटायला आलोय. तुमच्या जेवणाची काय व्यवस्था आहे ती पाहायची होती. बाकी काही नाही. " आता बाहेरचा तो कंगवा आणणं कठीण होतं. त्याच्या समोर कसा आणणार ? त्याल कोनाड्यात काय आहे ते दिसले असते. मी स्वतःला सावरीत म्हणालो. " अरे मी स्वैपाक केलाय. तू जा. , तू तू जा . प्लीज मला वाटलं तर मी बोलावीन. " मी त्याला आत घेत नव्हतो . हे त्याला जाणवलं असावं. तो थोडा निराश झाला. मग म्हणाला, " सर काही लागलं तर सांगा. येतो मी. " आणि तो निघून गेला. तो पूर्ण जाईपर्यंत मी दरवाज्यातच उभा राहिलो. तो दिसेनासा झाल्यावर मी ते अवजार आणण्यासाठी बाहेर आलो तर तिथे मला ते अवजार दिसेना. मी डोकं फिरल्यासारखं ते शोधीत राहिलो. त्या नादात आणि भीतीच्या लहरीत मी वाड्याच्या मागच्या भागातही गेलो. जिथे विहीर आहे. तिथला वाकलेला वड अधून मधून हालत होता. मला आत्ता तरी काही सुचत नव्हते. ते अवजार मिळाले नाही तर चित्र खाली कसे आंणणार ? आणि तळघरातलं/भुयारातलं वटवाधुळ वर आलं तर ? अशी किती वटवाधळं आत आहेत कोण जाणे . असं काय करावं की जेणे करून तो तळघराचा भाग बंद होईल. मला घरात जावेसे वाटेना. खरं तर आत्ता ऊन होतं. आणि तेही चांगलं कडक. विचार कर करून माझं डोकं भणाणू लागलं. मी पुन्हा पुन्हा त्याच जागी जाऊन ते अवजार शोधत राहिलो. शेवटी एकदाचा थकून घरात गेलो. कोनाड्यातल्या त्या पायऱ्या आता अगदी स्पष्ट दिसत होत्या. मला आता खाली जावसं वाटत नव्हतं. मग एखादी शिडी सापडते का ते बघू लागलो. त्यासाठी वरच्या मजल्यावरच्या खोल्याही शोधल्या. पण व्यर्थ. मला काही मिळेना. वाड्यातल्या सगळ्या जागा पाहून मी बेजार झालो. आणि सोफ्यावर बसलो. परत एकदा बाहेर जाउन ते अवजार शोधावं असं वाटलं. पण तो विचार झटकून टाकला. मग मात्र मी वाड्याच्या दुसऱ्या भागातल्या खोल्या पाहण्याचं ठरवलं. धावत जाऊन मी वरच्या मजल्यावरच्या त्या बिनगजांच्या खिडकी कडे गेलो. आता आत उजेड होता. मी कालच्या सारखीच उडी मारून आत शिरलो. समोरच उघडी असलेली खोली पाहीली. पण तीत काही सापडलं नाही. मग दुसऱ्या खोलीतील पेटाऱ्यांमधील सामान वर खाली करून पाहिले तिथे मला एक हातोडी आणि काही खिळे सापडले. ते सगळं इतकं गंजलेलं होतं की गंजाचा बराचसा भाग माझ्या हाताला लागला. मला पर्वा नव्हती. मग मी विचार केला ज्याअर्थी इथे हातोडा खिळे सापडले त्याअर्थी हे वापरण्यासाठी शिडी असलिच पाहिजे. पण ती सापडली नाही. मी स्वतःला बुद्धिमान समजत होतो , पण माझं डोकं आता चालेनासं झालं. खाली आलो. स्वैपाकघरात येऊन मी भात लावला. थोडं फार दूध होतं. दूधभात तरी जेवता येईल. कुठेतरी लोणचं सापडलं.
आता भूक लागली होती. घड्याळात पाहिलं. बारा वाजून गेले होते. अति श्रमामुळे मला सोफ्यावर झोप लागली. दरवाज्या उघडा होता. त्याची मला पर्वा नव्हती. जवळ जवळ तास भर झोप लागली. जाग आली ती जळल्याचा वास आल्यामुळे . सबंध वाडाभर जळल्याचा वास येत होता. मी धावत स्वैपाकघरात गेलो. तिथे लावलेल्या भाताचा कोळसा झाला होता. मी पटकन गॅस बंद केला. एक दोन पंखे होते ते फुल केले. सगळी दारं खिडक्या उघड्या ठेवल्या तेव्हा कुठे वास कमी झाला. मग परत मी भात लावला. आता मात्र लक्ष ठेवून मी तो नीट होऊन दिला.
लवकरच जेवायला बसलो. अर्ध्यातासात जेवण झालं. खाण्यासाठी आणखीन काही आहे का ते शोधता शोधता मला एक डबा होता. त्यात लाडू होते. आता मात्र मला शिडी पाह्णं गरजेचं वाटू लागलं. मी गेट बाहेर चर्चच्या दिशेने असाच गेलो. तिथल्या प्रार्थना हॉल मध्ये उभा होतो. बाजूच्या पाद्र्यांच्या खोल्यांमध्ये शोधाशोध केली. तिथे एका खोली मध्ये मला एक पाच सहा फुटी शिडी सापडली. मला आनंद झाला. ती जड शिडी उचलून मी मोठ्या कष्टाने वाड्यात आणली. एकदाची ती चित्राच्या बाजूला लावली. आणि वर चढलो. एवढ्या उंचीवरून मोठ्या मुष्किलीने मी मघाशी मिळालेला हातोडा घेऊन फटके मारायला सूरुवात केली. चित्र हालत नव्हते. पुन्हा दुसऱ्या बाजूने शिडी लावून तिथे ठोकीन पाहिलं. अचानक जोराचा आवाज करीत चित्र खाली दाणकन कोनाड्यावर घसरून घट्ट बसले. ते तुटून तर बसले नव्हते ..........? माझ्या मनात शंका . जर तसं झालं असेल तर परत ते वर जाणार नाही. असो. आजच्या दिवसा पुरते तरी माझे काम झाले होते. संध्याकाळी मी गाडी घेऊन गावात जायचे ठरवले. हॉल आवरून ठेवला. मग पुन्हा मी झोपी गेलो. मला पुन्हा थोडी डुलकी लागली.
आता उठल्यावर मात्र मला जरा नॉर्मलला आल्यासारखे वाटले. साधारण सहाच्या सुमारास मी गावात गेलो. वेगवेगळ्या प्रकारची भाजी घेतली. चालता चालता शिवमंदिराजवळ आलो. तिथेच गाडी पार्क केली होती. अचानक मला पारलोके गुरुजींची आठवण झाली. मी मंदिराच्या मागच्या भागात डोकावलो. तिथे गुरुजींच्या दोन खोल्या होत्या. पुढे होऊन मी गुरुजींच्या घराची कडी वाजवली. आतून गुरुजींच्या कण्हण्याचा आवाज येत होता. अतिशय क्षीण आवाजात गुरुजींनी " आलो , आलो .......... " म्हंटले. आणि दरवाज्या उघडला. गुरूजींची तब्बेत ठीक दिसत नव्हती. घाबरून गुरुजी म्हणाले, " तुम्ही कशाला आलात , मीच आलो असतो तुमच्याकडे . येताना तुमचा पाठलाग तर झाला नाही. ? " मी मानेनेच नकार दिला. त्यावर ते म्हणाले, " या , जरा आजूबाजूला पाहून मग दरवाज्या लावून घ्या. मग या. " मी दरवाज्या लावून घेतला. मग गुरुजी क्षीण आवाजात म्हणाले, " काय सांगणार ? तो गोळे आणि ते पाठक भटजी दोघे डांबरट आहेत हो. तुमच्या वाड्यात सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी एक आजी राहत होत्या. त्या चेटुक विद्येत प्रविण होत्या. त्या सगळे वेडाचार करून पिशाच्च विद्या संपादन करायच्या. त्यासाठी त्या नदीकाठच्या स्मशानात साधना करीत . माझे वडील त्यांच्या घरी पुजा अर्चा करायचे. आणि त्यांचे पुरोहितही होते. सगळी धर्म कृत्ये पण तेच करायचे. खरंतर ते एक कर्नाटकी कुटुंब होतं. त्या कुटुंबातले प्रमुख रघुराजन या जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यांच्या पत्नीही सुविद्य होत्या. त्यांना दोन मुलं होतीमुलीचं नाव होतं चिरुमाला आणि मुलाचं नाव रमेश. थांबा हं , माझ्या वडिलांनी एक डायरी ठेवली होती. त्यात बरीचशी माहिती लिहिलेली होती. ही घ्या. .............." असं म्हणून त्यांनि एक निळ्या रंगाची डायरी माझ्या हातात दिली. मी ती घेऊन माझ्या बॅगमध्ये ठेवतोय न ठेवतोय तोच दरवाज्यावर लाथा मारायला सुरुवात झाली. " ए भटा, दार उघड. तुला आता धडा शिकवलाच पाहिजे........" असे म्हणत आधीच जुनाट दरवाज्या. लवकरच तुटला आणि तीन माणसं आत शिरली. एकाच्या हातात भला मोठा सुरा होता. दुसरे दोघे पुढे झाले आणि त्यांनी भटजींना धरून ठवले. ते जिवाच्या आकांताने ओरडत होते. मी पुढे होऊन विरोध करू लागलो. तर मला एकाच्या हातातील काठीचा प्रसाद मिळाला. त्यावर तो म्हणाला," ओ , मॅनेजर , भाइर व्हा, न्हाई तर तुमाला बी पाठवू वर. मग त्यांनी मला दरवाज्या बाहेर ढकलले. तरीही मी पुन्हा आत शिरायचा प्रयत्न केला. मग माझ्या लक्षात आलं की पोलिसांना बोलावलं पाहिजे. फोन केल्यावर कानविंदे साहेब आले मी त्यांना सगळी माहिती दिली. ते म्हणाले, " तुम्ही तिथेच थांबा आम्ही येतो. पण तोपर्यंत भटजींच्या पोटात सुरा भोसकला होता. भटजी तळमळत होते. मग ते तिघे पळून गेले. बाहेर उभ्या असलेल्या बाइक्स वरून त्यांनी पळ काढला. तेवढ्यात पोलिसांची जीप आली. कानविंदे म्हणाले, " हे बरं केलत, आम्हाला बोलावलंत. पळून गेला नाहीत. त्या मारेकऱ्यांचं वर्णन सांगा मग सगळे सोपस्कार होईपर्यंत जवळ जवळ आठ वाजत आले . दुसऱ्या दिवशी पो. स्टेशनला येण्याचं आश्वासन देऊन मी घरी निघालो. माझ्या डोळ्या समोरून भटजींचा चेहरा हालत नव्हता. घरी परत मला स्वैपाक करावा लागला. जेमतेम जेऊन मी पुन्हा अंथरूणावर लवंडलो. साडेदहा अकराच्या सुमारास मी लाइट मालवून सोफ्यावर झोपलो. अजूनही मला बेडरूममध्ये झोपण्याचं धाडस होत नव्हतं. थंडीचे दिवस होते. केव्हातरी मध्यरात्री एक दीडच्या सुमारास मला माझ्या सोफ्याभोवती फिरत असल्याचा भास झाला. उठून दिवा लावायला हवा होता. मी सोफ्यावर उठून बसलो. तर तिथे जिन्याच्या खालच्या पायऱ्यांवर एक आठदहा वर्षांची मुलगी. जिचा फ्रॉक ठिकठिकाणी फाटला होता. खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मला दिसले की ती रडत बसली होती. तिचं विवळणं ऐकून मला घामफुटला.हे असं दृष्य कधीही न पाहिल्याने मला थंडी भरली. आता ती मुलगी पुढे पुढे येत होती. तिच्या तोंडातून भरमसाट लाळ गळत होती. तिचे दात टोकदार होते. तिची मान बघता बघता फिरली आणि ती जिन्यावरून जाऊ लागली. मी कसा तरी उभा राहिलो , पण भीती मुळे लाइट लावण्याचे जमले नाही. माझे दात वाजू लागले आणि माझी शुद्ध हारपून मी सोफ्यावर पडलो. किती वेळ मी त्या अवस्थेत होतो. कोणास ठाऊक. मुलगी मात्र आता गेली होती. दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठलो. माझ्या अंगात ताप होता. माझं अंग ठणकत होतं. मी जेमतेम चहा केला. आणी पुन्हा झोपलो.खरंतर डॉक्टरांकडे जायचं होतं. पण गाडी चालवणं कठीण होतं. साडे नऊ पर्यंत मी अंथरूणात लोळत होतो. घरच्या गोळ्या घेतल्या. पण माझा कामावर जाण्याचा मूड होईना. दहाच्या सुमारास जुडेकर आला. माझं येण्याचं चिन्ह दिसेना त्यावर तो म्हणाला, " सर मी तुमच्या साठी औषध घेऊन येतो आणि डबा सुद्धा. ......... " मी त्याला नाही म्हणणार होतो. . पण मलातरी स्वैपाक कसा जमला असता ? तो गेला. मी हळूहळू उठून लहानसहान कामे केली. कामाला येणाऱ्या बाईने काम कधीच सोडले होते. लीना नव्हती, त्यामुळे असेल. मी फक्त पुढचा पुढचा कचरा काढून घेत असे. अचानक मला ही बदली स्वीकारल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. मी त्या भावनेतून स्वतःला सावरले.मलासगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता. लवकरच जुडेकर आला . त्याच्यामुळे जेवणाचा प्रबंध झाला. मग तोच म्हणाला, " सर ,वहिनी येत नाहीत तोपर्यंत माझी बायको तुमच्या घरची कामं करील. मी तिला पाठवतोच. तुम्ही बिलकुल नाही म्हणू नका. " त्याने औषधही आणले होते. मला त्याचं आश्चर्य वाटत होतं. इतकं चांगलं वागणं असलं तरी तो श्रीवास्तवशी संबंध का ठेवीत होता. मला कालच्या त्या गुंडांमध्ये पैंसारखा आवाज वाटला. ते कशाला असलं कृत्य करतील. आता मला अंधुक संशय येऊ लागला. जुडेकर , पै, हरिदास , गोळे आणि पाठक गुरुजी काहीतरी कारस्थान तर माझ्या विरुद्ध करीत नव्हते ? मोहंती साहेबही यात सामिल होते की काय ? असे मला वाटले. पण मी तो विचार झटकला. मुलगी नाहीशी होऊनही ते स्वस्थ कसे बसले होते . ........छे माझा विश्वासच बसेना. माझी नक्कीच काहीतरी चूक होत असेल, असे वाटून मी तो विचार सोडून दिला. दिवस आळसात गेला. संध्याकाळच्या सुमारास मी पो. स्टेशनला गेलो. कानविंदेंना गुन्हेगारांचं वर्णन दिलं. इतरही गोष्टी झाल्या. ते थोडे निवळलेले दिसले. बहुतेक त्यांना माझा फारसा सहभाग जे घडत होतं त्यात नसावा हे पटलं असावं. नंतर मी त्यांच्या कानावर वाड्यातल्या चमत्कारिक घटना घातल्या. तेही आश्चर्यचकित झालेले दिसले. शेवटी ते सौम्यपणे म्हणाले, " असं आहे बघा सबनिस , आम्ही फक्त जे दिसतं त्यावरच कारवाई करू शकतो. याचा अर्थ तुम्ही बोलताय ते खोटं आहे अस नाही. फक्त लक्ष ठेवा. आणि अधून मधून मला रिपोर्ट करीत जा. लवकरच काहीतरी लिंक आमच्या हाती नक्की लागेल. " मी घरी आलो. मला परत दमल्यासारखे वाटू लागले. ताप भरतो की काय अशी भीती वाटली. संध्याकाळचा डबा जुडेकर देऊन गेला होता. तो खाल्ला. दिवस भरात काहीही शोधता आलं नाही. किंबहुना आता शोध वरच्या आणि बाजूच्या भागातल्या खोल्यांमध्येच घ्यावा लागणार असे दिसत होते. चित्र पक्के बसले होते म्हणून मला तळघरात जाता येत नव्हते.
ण्याची पद्धत इतकं होऊनही मी बदलली नाही. आता मार्च महिना संपला होता. मोहंती साहेबांनी मध्यंतरी एकदा अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यांना
हरकत घेण्यासारखं काहीही सापडलं नाही. सरकारच्या सूचनेप्रमाने मी लहान उद्योजकांना कर्ज दिले होते. त्यामुळे त्याना काही बोलता येईना. अर्थात त्यांनी मोठ्या उद्योजकांचे अर्ज योग्य ती कारवाई न केल्याबद्दल मला मेमो दिला. अर्थात तो अतिशय औपचारिक होता. माझी पद्धत बँकेच्या नियमाप्रमाणे असल्याने त्याचे उत्तर देणे मला शक्य झाले. असो. जाताना मात्र मोहंती साहेब कोणत्या तरी दडपणाखाली असावेत असे मला दिसले. मी विचारल्यावर त्यांनी तसे काही नसल्याचे म्हंटले. मी जास्त विषय न ताणता सोडून दिला. त्यांना काहीतरी वेगळेच अपेक्षित होतं असं दिसलं. माझ्या बद्दल ते ना तक्रार करू शकत होते की माझं समर्थन् करू शकत होते. मग एक दिवस बँकेत मला हरिदास आलेला दिसला. तो जुडेकर बरोबर बोलत बाहेत उभा होता. मला शंका आली काहीतरी काळे व्यवहार त्यांच्यात असलेच पाहिजेत. ते काळे व्यवहार असावेत. मी सध्या फक्त लक्ष ठेवण्याचे ठरवले. आता हे सगळं कोण शोधून काढणार ? वाडा हा माझ्यासाठी स्वतंत्र विषय होता. कोणाची तरी मदत घेतली पाहिजे याची मला जाणीव झाली. पोलिसांना सांगणं कठीण होतं. रितसर तक्रार केल्याशिवाय ते काहिही करणार नाहीत हे मला माहित होतं. मला माझ्या एका मित्राची आठवण झाली. तो एका कंपनीत व्हिजिलन्स खात्यात होता. त्याने नोकरी सोडली होती. आता स्वतंत्र व्यवसाय करीत होता, तो अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देत होता. तसा तो मला खूपच सिनियर होता. त्याची माझी भेट एका बँक प्रकरणात झाली होती. माझ्यापेक्षा मोठा असूनही तो मैत्री टिकवून होता. त्याला फोन केल्यावर तो म्हणाला, " मी येऊन बघीन , आणि किती दिवसात तुझं काम करता येईल पाहिन. " तो येत्या रविवारी येईन म्हणाला . मला थोडं सुटल्यासारखं वाटलं. हरिदास जुडेकरला भेटणं ही बातमी कानविंदेंना द्यावीशी वाटली. सांगितल्यावर ते म्हणाले, " मला त्याच्यावर संशय आहेच. तुम्ही फक्त लक्ष ठेवा. वेळोवेळी तसंच काही घडलं तर कळवत चला. " हल्ली इन्स्पे. माझ्याशी बरे वागत होते.
वाड्यावर अधून मधून रात्रीचे रडण्याचे आवाज येतच राहिले. मी तिकडे लक्ष दिलं नाही. माझ्याजवळ पारलोकेंची डायरी होती . ती वाचायची होती. मी लक्षात ठेवूनही विसरत होतो. शुक्रवारी संध्याकाळी बँकेतून घरी आलो. गाडी पार्क केली आणि दरवाज्या उघडून मी आत शिरत होतो, तेवढ्यात अचानक फकीरबाबा दिसले. ते गेटमधून आत शिरत होते. " अल्ला " असं ते जोरात ओरडले. मी त्यांना मुद्दामच आत बोलावून घेतल.त्यावर ते म्हणाले, " हम किसीके घरमे नही जाते. , तूने मेरी बात मानी नही. अब मै कुछ नही कर सकता. " फकीरबाबांचं वय सत्तर पंच्चात्तर असावं. तरीही मी त्यांना विचारलं , " बाबा आगे क्या हो सकता है. बताईये. " त्यावर हासून ते म्ह्णाले, " हमे वो कहनेकी इजाजत नही है , बेटा. जब वक्त आएगा हम आकर बता देंगे. लेकीन तू हमे मानता नही. " त्यामुळे काही न बोलता ते निघून गेले. आता मला ते कुठे जातात हे पाह्ण्याची इच्छा झाली नाही. अचानक मला बसस्टॉपवर भेटलेले दाढीवाले गृहस्थांची आठवण झाली. जे गूढ शास्त्रात प्रविण होते. मला त्यांचं कार्ड सापडेना. का कोण जाणे पण मला आता त्यांना भेटावंस वाटू लागलं. कार्ड खूप शोधलं. शेवटी नाद सोडला. जेवणाचा डबा जुडेकरच्या बायकोनि तयार केला होता. ते मी गरम केलं आणि प्रथम जेवून घेतलं. आता चित्र वर सरकवणं कठीण होतं. आतली दुनिया शोधायला हवी होती. या तळघर कम भुयार दुसऱ्या बाजूने उघडे होते का ? ते पाहायला हवं होतं. शेजारच्या भागातून सारखे आवाज येत होते. कधी ओरडण्याचा, कधी रडण्याचा तर कधी धावण्याचा. मला त्यांची सवय झाली होती. मी स्वैपाकघरात गेलो, तिथली खिडकी मी थोडी उघडी
ठेवित असे. माझी नजर आज तिकडे गेली. विहिरीवर कोणी तरी काही तरी वाकून पाहत होते. माझा श्वास वर खाली झाला. रात्रीचे जेमतेम नऊ वाजत होते. मी पटकन हातात टॉर्च आणि काठी घेतली. आणि धावतच मागच्या बाजूला आलो. तर तिथे डोकावणाऱ्या माणसाने विहिरीत उडी मारल्याचं मला दिसलं. मी विहिरी कडे धावलो. टॉर्च मारून विहिरीत पाहिले . तिथे कोणीच नव्हतं. विहिरीजवळ जाऊन मी टॉर्च मारला. आत काहीही दिसलं नाही , की विहिरीचं पाण्यावर जराही तरंग उमटलेले दिसले नाहीत. थोडावेळ थांबून मी घराकडे परतलो.
आता साडेदहा होऊन गेले. मी सोफ्यावर स्वस्थ बसलो. एकूण सगळाच विचार परत करायला हवा होता.
मी पहिल्या पासून पाहिलं. सगळ्या घटनांमध्ये मला काही रिकाम्या जागा दिसल्या. जुडेकर, गोळे, मोहंती , पारलोके, पाठक आणि मुख्य म्हणजे हरिदास. यांचं काहीतरी कनेक्शन आहे असं वाटू लागलं. मला तर आता मी एका विशिष्ट कटात अडकवला गेलोय की काय अशी शंका येऊ लागली. म्हणजे माझ्या ट्रान्स्फर पासून ते आजतागायत. हा कोणता कट चालू आहे ? कर्जांचा की वाड्याच्या मालकीचा ? की कर्ज मंजूर करून घेण्यात येणाऱ्या अनैतिक व्यवहारांचा . आमच्या मुंबई बँकेतलेही काही लोक यात गुंतलेले असण्याची शक्यता होती. अचानक मला शशीला भेटावंस वाटलं. त्याला नक्कीच काहीतरी माहित असावं. त्याला आलेले अनुभव जर मला त्यानि मला सांगितले तर शोधाशोध करायला मदत होईल. मी शशीचा पत्ता मिळवण्याचे ठर्वलं. मी टॉर्च आणि काठी जवळ घेऊनच झोपण्याचं ठरवलं. पुढच्या काही दिवसांमध्येभुयार वजा तळघराला दुसरिकडून तोंड आहे का ते शोधावं लागणार होतं. कदाचित वाड्याचा नकाशाही सापडेल. नकाशा हा नवीन विचार होता. मला जरा बरं वाटलं. त्या विचारांच्या गर्दीत मला झोप लागली. दिवा तसाच राहिला होता.
मला गाढ झोप लागली. केव्हातरी साडेतीनच्या आसपास मला जाग आली. ती बाथरूमला जाण्याच्या जाणिवेने आणि तहानेने. उठल्यावर लाइट चालू राहिलेला दिसला. मी तो प्रथम बंद केला. पाणी वगैरे पिऊन मी पुन्हा झोपलो. थोड्याच वेळात मला पुन्हा झोप लागली. मध्येच केव्हातरी रडण्याचा सूर ऐकू आला. मी खडबडून जागा झालो. फक्त पावणेचार वाजले होते. म्हणजे पंधरा मिनिटेच झोप लागली होती. बाजूला ठेवलेली काठी आणि टॉर्च घेऊन मी जिन्यावरून फिरवला. रडण्याचा आवाज येत असला तरी मुलगी आज दिसत नव्हती. जिन्याला लागून वरच्या मजल्यावरच्या कठड्याला धरून एक म्हातारी स्त्री उभी राहून खाली वाकून पाहत होती. जिचे केस पांढरे स्वच्छ आणि पिंजारलेले दिसत होते. तिचाचेहरा पांढरट होता.तिचे डोळे शून्यात पाहत होते. तरीही ती माझ्याकडे पाहत असल्यासारखीवाटली . अंगावर कानडी बायका नेसतात त्या धर्तीचेकाळसर लुगडे होते. तोंड अर्धवट उघडे होते. आत दात दिसत नव्हते. हळू हळू तिची आकृती विरळ होत होत नाहीशी झाली. आता रडण्याचाही सूर थांबला होता. ही बाई आणि ती मुलगी यांचा काहीतरी संबंध असलाच पाहिजे. पारलोकेंनी सांगितलेली हिच ती आजी होती का ? मी डायरी वाचली नव्हती म्हणून मला कळत नसावं. असो. माझी झोप आता पार उडाली होती. साडेचार पावणेपाचलाच उठून मी चहा केला. तो घेतल्यावर जरा बरं वाटलं. उठण्याची वेळ नसल्याने मी पारलोकेंनी दिलेली डायरी काढली. ती अर्धवट पेन्सिलमध्ये अर्धवट शाईमध्ये लिहिली होती. काही काही अक्षरं फार फिकट तर काही अतिशय गडद होती. सुरुवातीची काही पानं फाडलेली दिसली. असो. पहिल्याच पानावर मला वाड्याच्या तळघर वजा भुयाराचा नकाशा सापडला. मला आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. कारण तो पेन्सिलमध्ये काढलेला होता. चित्राच्या दरवाज्यापासून ते चर्चपर्यंतचा तो नकाशा असावा. वेगवेगळ्या खाणाखुणांनी भरलेला नकाशाचा फारसा अर्थबोध होत नव्हता . मी तो दिवसा उजेडी पाहण्याचं व माझ्या मित्राला दाखवण्याचं ठरवलं. पुढचे पान उलटले . पुन्हा नकाशाचहोता. अशी पहिली तीन चार पानं नकाशा होता. मग लिखाण होतं. त्यात तारीख होती. फाल्गुन १४, शके १८५२"आजच्या दिवसी , ताईसाहेबांशी ज्वर होता. त्याकारणे, कलेक्टर साहेब दोन प्रहरी वाड्यात परतले. सोबत डाक्तर होता., ते समई ओखद देऊनही ज्वर वाढत गेला. डाक्तराने ओखद दुसरे दिले. परंतु फरक पडला नाही. रात्रीच्या प्रहरी ताईसाहेबांना वायू झाल्याने त्या सारख्या, "चिरू " नावाचा घोष करीत होत्या. कलेक्टार साहेबांच्या आत्याबाई त्यांच्या अंगावर फिस्कारित होत्या. आणि चिरू येईल असे खोटे बोलत होत्या. चिरू कोठे होती हे मात्र त्या सांगत नव्हत्या. ........ " पुढचं
लिखाण पेन्सिलमध्ये असल्याने नीट दिसत नव्हतं. पण तळघराबाबत
काहीतरी लिहिलेले दिसत होते. माझे डोळ्यांना पेन्सिलचे लिखाण कळेना मी वाचणे सोडून दिले. उद्या पाहू असे ठरवून मी डायरी नीट ठेवून दिली. ती हरवून चालणार नव्हती. मी ती बँकेच्या माझ्या लॉकरमध्ये नेऊन ठेवण्याचे ठरवले. मग मात्र मी झोपलो. सकाळी साडे आठला उठलो.
आज मी डायरी घेऊन बँकेत गेलो. ती माझ्या लॉकरमध्ये नीट ठेवली. मी कोणी पाहत नाही याची काळजी घेतली. दुपारपर्यंत काहीच घडलं नाही. अचानक तीन वाजता माझ्या केबिनचा दरवाजा वाजला . मी येस कम इन म्हणण्याच्या आतच हरिदास दार लोटून आत आला. मला जरा धक्का बसला. याचं काय काम आहे कळेना. मला त्याचं न विचारता आत येणं आवडलं नव्हतं. मी त्याला तसाच उभा ठेवला. ते पाहून तो म्हणाला, " काय साहेब बसायला बी देनार नाही का ? " मी मनात नसताना त्याला बसायला सांगितलं. त्याने मग मला तो लोन एजंट असल्याचं सांगितलं. शेवटी म्हणाला," साहेब आजपर्यंत माझ्या सगळ्याच गिऱ्हाईकाना लोन मिळालं . तुम्ही आलात आणि वेगवेगळे फाटे फोडत राहिलात. साहेब नक्की तुम्हाला किती टक्के पायज्येत ते तरी सांगा बाकीच्यांची टक्केवारी मला पाठ आहे. अगदी पिंटो साहेब ते मोहंती साहेब सुद्धा. मोकळे पणानि बोला साहेब. मला काही अडचण नाही . गिऱ्हाईक ते पैसे देतं. " त्याने हवेत प्रश्न सोडला.
माझा राग नुसता उसळत होता. मी स्वतःवर ताबा मिळवित म्हंटलं. " हरिदास , निघा तुम्ही. तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलात . " मी दुसरी फाइल पुढे ओढली आणि त्याला जाण्याचं सुचवलं. मग काही वेळ तो नुसता खुर्चित बसून राहिला. बहुतेक शब्दांची जुळवाजुळव करित असावा. मग उठत तो म्हणाला, " साहेब नीट विचार करा. नाहीतर ............काय होई*ल ते मी सांगू शकत नाही. " ............ आता माझ्या सहनशक्तीची परिसीमा झाली होती. मी त्याला दरवाज्याकडे बोट दाखवून म्हणालो. " दरवाज्या तिक्डे आहे. ........ " तो निघाला पण जाण्यापूर्वी म्हणाला, " साहेब गोळेची बायको कशी वाटते ............????? " आणि बाहेर पडला. इतका सगळा तपशील त्याला कसा कळतो. समजेना. मग पुन्हा आत येत तो खिशातून एक पाकीत काढीत म्हणाला, " साहेब तळघराचा नकाशा आहे हा . लागेल तुम्हाला. ठेवून घ्या. ...."
मला धक्क्यावर धक्के बसत होते. तो गेला. मी बराच वेळ त्या पाकिटाला हात लावला नाही. का कोण जाणे मला असं वाटलं की
हरिदास जुडेकरला भेटला असणार. शंका नको म्हणून मी जागेवरून उठून बाहेर आलो. पै दचकून जागेवर बसत असलेले दिसले. आणि बाहेरच्या काचेच्या दरवाज्या मागे मला जुडेकर हरिदासशी बोलत असल्याचे जाणवले. मी फटकन दार उघडले. हरिदास जुडेकरच्या हातात नोटा कोंबत असताना दिसले. मी पुढे होऊन जुडेकरच्या हातातल्या नोटा हिसकावून घेतल्या आणि म्हंटले, " अच्छा म्हणजे हे असं आहे तर.
हप्ता देण्याचं काम करताय का ? " दोघांचेही चेहरे गोरेमोरे झाले. तरीही निर्लज्जपणे हरिदास म्हणाला, " सर, हे पैसे मी जुडेकर कडून मागे
घेतले होते तेच परत करतोय. आणि आम्हाला जर तसं काही करायचंच असेल तर आम्ही काय तुम्हाला विचारणार आहोत ? " जास्त मध्ये मध्ये करू नका पारलोकेंची अवस्था काय झाली हे लक्षात घ्या. " मी काही न बोलता आत शिरलो. पै कपाळावरच घाम पुसत असताना दिसले. मी जागेवर बसलो. इथले बहुतेक सगळेच या हरिदासला सामिल असल्याचा मला संशय येऊ लागला.
मी फाईल पुढे ओढणार तेवढ्यात एक उंच
जाडसर पोलिस खात्यातल्या माणसासारखा माणूस आत आला आंणी " मे आय कम इन" म्हणून त्याने विचारले. तो माझा मित्र श्रीकांत प्रभुदेसाई होता. अर्ध टक्कल पडलेला , बारिक बारिक डोळे असलेला आणि फुटबॉलसारखा चेहरा असलेला श्रीकांत चांगलाच इंप्रेसिव्ह दिसत होता. मी सुद्धा त्याला सात आठ वर्षांनी पाहत होतो. त्याने हस्तांदोलन केले आणि तो बसला. मी त्याल प्रथम कॉफी मागवली. आत्ताच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर त्याचं येणं न्हणजे थंडगार वाऱ्याची झुळुक येण्यासारखं होतं. मी त्याला आत्ताचा प्रसंग सांगितला. त्यावर त्यो म्हणाला,
" मला तू तुझे संशय आणि इथली परिस्थिती ब्रिफ करून लिहूनच दे. म्हणजे मी अभ्यास करून ठरवीन माझी लाईन ऑफ ऍक्शन काय आहे ते.” ते ऐकल्यावर मी त्याला माझ्याबरोबर घरी चलण्याचा आग्रह केला. नाहीतरी ह्या आडगावात तो कुठे राहणार होता ? तो ही तयार झाला. साडेपाच सहाच्या सुमारास आम्ही निघालो. घरी पोहोचल्यावर वाड्याचे निरिक्षण करीत तो म्हणाला, " एवढ्या मोठ्या वाड्यात तू एकटा म्हणजे कठीण आहे. वहिनी सोडून गेल्या यात काही आश्चर्य नाही. " मला त्याचं हे बोलणं फारसं आवडलं नाही. तो वाड्यातल्या प्रत्येक खोलीत फिरत होता. आणि लांबलचक उसासे सोडित होता. ते पाहून मी त्याला म्हंटलं. " मला तरी बदल्यांमध्ये आव्हानं घेण्याची आणि ती पुरी करण्याची आवड आहे. " हे बघ आज तरी निदान जेवणाचा डबा आहे. उद्याचं उद्या बघू. तो फ्रेश होऊन सोफ्यावर बसला. मी चहा केला .
चहा घेता घेता तो म्हणाला, " आपल्याला बराच तपशील लागेल. " मी त्याला सरदार साहेबांचं चित्र आणि तळघराबद्दलही सांगितलं. जेवणं वगैरे झाल्यावर मी आज बरेच दिवसांनी वेडरूममध्ये झोपण्यासाठी गेलो. त्याची नजर बेडरूमवरून फिरत होती. तो आणखी काही बोलेल असं मला वाटलं पण त्यानी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. लाईट बंद करून आम्ही अंथरूणावर पडलो. थोडावेळ असाच गेला. मग तो म्हणाला, " विकास , मी अश्या जुन्या जागा खूप पाहिल्येत. माझा थोडाफार अभ्यासही आहे. इथल्याही काही गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्यास तरी हरकत नाही. " मग मी त्याला अथ पासून इतिपर्यंत सांगितलं. ते ऐकून तो म्हणाला. " मला वाटतं मी इथे पंधरा विस दिवस राहावं. " मी अर्थातच त्याला होकार दिला. मला पण कोणीतरी बरोबर राहावं असं वाटत होतं.
त्या रात्री काही खास घडलं नाही. आवाज नेहमी प्रमाणे येत राहिले. श्रीकांत अधून मधून जागा होत असे आणि आवाजाची दिशा पाहून बेडरूम बाहेर जात असे. त्याला आवाज नवीन होते. मी मात्र निर्धास्तपणे बरेच दिवसांनी झोपलो होतो. सकाळ झाली . आम्ही दोघांनी चहा घेतला. आज शुक्रवार बँकेत जायचं होतं. मी श्रीकांतला म्हंटलं, " तू काय करणार आहेस ? तुला एकटं वाटू शकतं. " त्यावर तो म्हणाला ," मी पण तुझ्या ऑफिसमध्ये येईन . प्रथम मी माझा बँक अकौंट उघडीन म्हणजे संशयाला जागा नको. .......... मी पाहिजे तर जरा उशिरा निघेन. " असं म्ह्णून तो अंघोळीला गेला. आमची इतर आन्हिकं उरकेपर्यंत जुडेकर येईल असं वाटलं होतं. पण आज तो आला नाही. त्याच्या बायकोची पण येण्याची शाश्वती वाटत नव्हती. तिच्याबद्दल मी श्रीकांतला सांगितलं. तो म्हणाला त्याच्या वेळेत ती येईल तर ठिक आहे नाहीतर तिला पुन्हा यावं लागेल. मला खरंतर जुडेकरच्या बायकोला ठेवायची इच्छा नव्हती. ती जुडेकरला बातम्या पुरवीत असणार असं मला वाटलं. असो. मी ऑफिसला गेलो. श्रीकांत घरी एकटा होता.
मी गेल्यावर श्रीकांतनि सगळा वाडा पिंजून काढला. वाड्यामध्ये दिवसा चांगलं ऊन पडत होतं. त्यानी सरदार साहेबांचं चित्र परत वर सरकवता येईल का ते पाहिलं. त्याला फ्रेमच्या बाजूला कसलासा खटका दिसला. त्याची उंची चांगली असल्याने त्याचा हात तिथे पोहोचत होता. त्याने तो वर सरकवला. आणि खडर्रर्रर्र....ऽ ..ऽ असा आवाज करी चित्र वर सरकले. त्याला आतल्या पायऱ्यांची कल्पना नसल्याने तो आत शिरला नाही. दिवस असल्याने नीट दिसत होतं. मग त्याला एकदा हे कळल्यावर त्याने तोच खटका खाली खेचला. आणि सरदार साहेब प रतकोनाड्यावर विराजमान झाले. असो. तो असे पर्यंत जुडेकरची बायको आली नाही. तो ऑफिसला आला त्याचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्याने स्टाफशी मैत्री केली. स्टाफनेही त्याला खातं उघडायला मदत केली. त्याने त्याला मिळणाऱ्या कर्जाची सुद्धा माहिती करून घेतली. ....... त्त्या दिवशी जुडेकर कामावर आला. त्याला दोन तीन दिवसांची रजा पाहिजे होती. कारण विचारल्यावर म्हणाला," सर मुंबईला माझी मेव्हणी राहाते तिच्याकडे एक फंक्शन आहे त्यासाठी जायचंय. ....." बोलता बोलता त्याने माझ्या प्रतिक्रियेसाठी पाहीलं. तेवढ्यात त्याचा हात नाकाच्या शेंड्याकडे गेला. मी ओळखलं की तो खोटं बोलतोय. माणसाचा हात बोलता बोलता जर नाकाच्या शेंड्याकडे गेला तर तो चक्क खोटं बोलतोय समजावं असा एक शरीरबोली शास्त्राचा नियम मला आठवला. मी त्याची रजा मंजूर केली. तो गेला , मी त्याचा अर्ज श्रीकांतला दाखवला. त्यावर श्रीकांत म्हणाला," मला वाटतं त्याच्या मागोमाग मी मुंबईला जावं म्हणजे छडा लागेल. " मी जुडेकरला परत बोलावलं. त्याला विचारल्यावर म्हणाला, " सर मी उद्या सकाळच्या आठच्या एस.टीनी जाणार आहे. " त्याला मी कोणत्याही प्रकारे त्याची बायको का येत नाही, किंवा तो घरी का आला नाही असं विचारलं नाही. त्याचं प्रेशार वाढवायचं मी ठरवलं. श्रीकांतला सांगितल्यावर त्याने जुडेकरवर लक्ष ठेवण्याचं ठरवलं. त्यासाठी तो जुडेकर घरी निघाल्याबरोबर निघाला. पुढचं मला माहित नाही. ते तो आल्यावर समजेलच. म्हणजे मी घरी एकटाच असणार होतो. असो. घरी गेलो. संध्याकाळच्या संधिप्रकाशात मला घराच्या पायरीवर कोणीतरी बसलेले असल्याचे दिसले. गाडी गेटजवळ सोडून मी मुख्य दरवाज्याकडे गेलो. पाठमोरी असलेली ती व्यक्ती म्हणजे गोळेची बायको होती. तिच्या अंगावर परत लाल साडी दिसली. तिच्या जवळ एकच साडी असावी किंवा तिला ती अतिशय आवडत असावी. अत्यंत पारदर्शक असा ब्लाऊज तिने घातला होता. आत ब्रा नसावी. आतलं गोर गोरं मांसल अंग दिसत होतं. ती गोड हसली. माझ्या भुवया आक्रसल्या होत्या. ते पाहून ती म्हणाली. ," हल्ली वहिनी घरी नाहीत , म्हणजे तुमची आबाळ होत असणार हे आलंय लक्षात माझ्या म्ह्णूनच मी कामासाठी आले. ........" असं म्हणून ती माझ्या मागोमाग घरात शिरली. तिच्या अंगाचा वास मला तापवत होता. काळोख पडत होता. घरातले दिवे मी लावले . ती आकर्षक हसत , पार्श्वभाग हालवित स्वैपाकघरात गेली .तिने दहा पंधरा मिनिटात चहा करून आणला. मला दिला आणि स्वतः करता घेतला. आम्ही दोघे सोफ्यावर बसून चहा पीत होतो. माझी नजर तिच्या लालबुंद ओठांकडे जातहोती. तिच्या येण्याचा हेतू काय असावा हे सुद्धा मला जाणवू घ्यावेसे वाटले नाही पुढच्या तासाभरात तिनी स्वैपाक केला . ती स्वैपाकात निष्णातहोती. अतिशय चविष्ट जेवण तिनी केलं होतं. बरेच दिवसात मी असे जेवलो नसल्याने भरपूर जेवलो. माझ्या मनात ना श्रीकांतचा , ना लीनाचा, ना गोळेचा, कसलाच विचार आला नाही. मी इतका भारलो होतो. की कधी बेडरूममध्ये तिच्या बरोबर जातो असं मला वाटू लागलं.
तिने ते ओळखलं असावं. लवकरच मी बेडरूममध्ये झोपण्याची तयार केली. ती आत आली. मी खिडकीशी पाठमोरा असल्याने मला दिसली नाही मागच्या बाजूने येत तिने माझ्याभोवती विळखा घातला. तिचे गरम श्वास माझ्या मानेभोवती फिरत राहिले. मागे वळून मी तिला आवेगाने मिठीत घेतली. तिचा चेहरा खरोखरीच सुंदर होता. पांढरा स्वच्छ चेहरा लालबुंद ओठ मी माझ्या ओठांमध्ये पकडून चुंबनांचा वर्षाव केला. इतके लाल मादक ओठ मला कधीच मिळाले नव्हते. आता आम्ही दोघेही अर्ध नग्न अवस्थेत बेडवर पडून होतो. पुढचे सगळे प्रकार आम्ही सुरू केले. भान राहिले नाही. तिने नक्की काय केलं मला कळलं नाही पण ती माझा गाल चाटत होती. मला रक्ताचा वास आला म्हणून मी तिला बाजूला सारून पाहिले . ती हासत होती आणि पुन्हा पुन्हा माझ्या गालाजवळ चाटण्यासाठी धडपडत होती. मला किळस आली. मी सहज म्हणून माझ्या गालावर हात फिरवून पाहिलं . हाताला चिकट चिकट रक्त लागलं. तिने माझ्या गालाचा चावा घेतला होता.
ती ब्लड सकर होती की काय कोण जाणे असा विचार मनात आल्याबरोबर मी तिला दूर ढकलली. ती पुन्हापुन्हा माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करीत होती. कशीतरी मी आता तिला दरवाज्याजवळ नेऊन बाहेर ढकलून दिली . ती तिथे वेडीवाकडी पडली. त्याबरोबर मी दरवाज्या शिताफीने आतून लावून घेतला. बाहेरून ती ओरडत होती, " साहेब दार उघडा मला तहान लागल्ये. ......... " मग तिने मला वाटेल तशा शिव्या द्यायला सुरुवात केली. पण मी दरवाज्या उघडला नाही . रात्रीचा एक वाजून गेला होता. ती दरवाज्यावर धडका मारीत होती. अचानक मला गोळेच्या गालावरच्या जखमा आठवल्या. ही त्याची लग्नाची बायको होती, का वश केलेली एखादी हडळ होती कळेना. अशाच जखमा मी हरीदासच्या गालावरही पाहिल्या होत्या. गोळे आणि पाठक गुरुजी काहीतरी जारण मारण आणि चेटुक विद्या करीत असणार याची मला खात्री वाटू लागली. काही वेळातच मला मुख्य दरवाज्याचा अडसर उघडल्याचा आवाज ऐकू आला. मी पटकन बेडरूमचे दार उघडले ........... पाहतो तर काय गोळेची बायको वेगाने दरवाज्या बाहेर जाताना दिसली. एवढी अंगापिंडाने जाडजूड बाई , पण तिच्या हालचाली चपळ होत्या.
मी तिच्या मागे धावलो. पण ती गेटजवळ जाऊन गेट उघडायचा प्रयत्न करताना दिसली. मी तिथे पोचायच्या आत ती गेट उघडून पळत जाताना दिसली. ती विचित्र वेगाने धावत होती. ती जिवंत भुताटकी होती असंच मला वाटलं. मी धापा टाकीत घरात आलो. माझ्या गालावरची जखं आता वाळत होती.
झोप जेमतेमच लागली. हळू हळू गाल चांगलाच सुजला. उद्या डॉक्टरांकडे जावं लागेल . त्यांना काय सांगायचं. प्रश्नच होता. सध्या त्यावर विचार न करता मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. अर्धवट लागलेल्या झोपेत मध्येच पुढचा दरवाज्या कोणीतरी वाजवित असल्याचा भास झाला. मी खडबडून जागा झालो. खरोखरीच कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. मी वेळ पाहिली " सव्वातीन. ......... यावेळेला कोण आलं असेल . असा विचार करीत मी दरवाज्याजवळ गेलो. गोळेची बायको तर नाही आली ? . दरवाज्या पुन्हा वाजला. आता मी तो उघडण्या ऐवजी , पुन्हा बेडरूममध्ये आलो. तिथली खिडकी हळूच उघडली . हेतू हा की तिथून मुख्य दरवाज्या दिसेल. मी वाकून वाकून पाहिलं पण काहीही दिसलं नाही बाहेर मरणाचा अंधार होता. बरोबरीनं वाराही. मी दरवाज्याशी आलो. आता वाजणं बंद झालं होतं. हातात टॉर्च आणि काठी घेऊन मी जोरात दरवाज्या उघडला. प्रथम वादळासारखा वारा तोंडावर भुंकला. बाहेर डोकावलो तर कोणीही नव्हतं. मी टॉर्च फिरवला. त्या प्रकाशात माझ्या गाडीच्या पुढच्या बाजूला एक मुलगी पाठमोरी बसलेली दिसली.तिच्या अंगावर एक पांढरा फ्रॉक ज्याच्यावर लाल रंगाचं डिझाइन होतं. मला अचानक तो फ्रॉक कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. मग आठवलं. असा फ्रॉक मोहंतींच्या मुलीनि घातला होता. मला आता थंडी भरल्यासारखं वाटू लागलं. हे काय होतंय माझ्याबरोबर ? मी स्वतःला विचारलं. बसलेल्या मुलीने आपली मान मागे न वळता तशीच वळवली. ती मोहंतींचीच मुलगी होती. तिचे डोळे खोल गेलेले निस्तेज होते. तिचा चेहरा रडवेला दिसत होता. मी तिला विचारलं. " क क क कोण आहेस तू .........? " उत्तरादाखल फक्त सर्रकन सरकत ती गेट बाहेर गेली . तिनी जाताना माझ्याकडे पाहिले देखिल नाही. मी कसातरी दरवाज्या लावून घेतला. आणि अचानक मला लीनाचे शब्द आठवले. "............. अजूनही तुम्ही इथेराहणार आहात ? " काही न बोलता मी मागे परत आलो.
पुढची रात्र मी बिछान्यावर बसून काढली.
सकाळी सकाळी इस्ंपे. कानविंदे आले. सात वाजत होते. आल्या आल्या त्यांनी विचारलं, " काल कुठे होतात ? "
उत्तर देण्यापूर्वी मला शंका आली. काही घडलंय का ? तरीही मी काही न दाखवता म्हणालो, " कुठे असणार ? घरीच. " त्यावर ते भडकून म्हणाले, " मि. सबनीस , तुम्ही दोन दिवसांची जुडेकरला रजा का दिलीत ? " " त्याचं कारण मला पटलं नव्हतं. पण तो ऐकेचना म्ह्णून दिली. का काही घडलंय का ? " मग ते थोडावेळ असाच घालवून माझ्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत म्ह्णाले, " जुडेकरचा खून झालाय, आत्ताच मुंबई पोलिसांनी कलवलंय आणि आम्हाला बोलावलय पण. " माझ्यावर झोपेसारखी ग्लानी होती. ती फाटकन बाजूला झाली. आणि नकळत माझ्या तोंडून शब्द आले, " बाप रे ! " ते एवढ्यासाठी श्रीकांत तिकडे गेलाय, मला त्याची काळजी होती. त्याचा काही संबंध जर पोलिसांनी लावला तर माझी पंचाइत व्हायची. खरंतर श्रीकांतचा फोन यायला हवा होता. तेवढ्यात माझा फोन वाजला. तो घ्यावा की नाही याचा विचार करीत असताना इन्स्पेक्टरांनी घ्या घ्या अशा खाणाखुणा केल्या. तो श्रीकांतचा फोन होता. मी तो बंद केला. त्यावर इन्स्पे. म्हणाले, " घेतला नाहीत फोन ? कोणाचा होता. ? " माझ्या बायकोचा असे मी त्यांना सांगितले त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त ते निघाले आणि म्हणाले, " संध्याकाळी पो. स्टेशनला या. " मी हो म्हंटले. ते गेल्यावर मला जुडेकरच्या बाबतीत बसलेल्या धक्क्याची जाणीव होऊ लागली. त्याच्या घरी जाणं आधी भाग होतं. नाही म्हंटलं तरी त्याच्या बायकोनी आमची कामं केली होती. मी कशीतरी अंघोळ केली इतर सगळी आवरा आवर केली. आणि ऑफिससाठी निघालो. दरवाज्याला कुलुप लावीत होतो, तेवढ्यात गेटचा आवाज आला. वळून पाहिल्यावर श्रीकांत आत शिरताना दिसला. मला आश्चर्य वाटलं. मी पुन्हा दरवाज्या उघडला. तो आत आला. दोन मिनिटं तो काही न बोलता सोफ्यावर बसून राहिला. शेवटी न राहवून मीच विचारलं, " असा अचानक परत कसा आलास ? एक दोन दिवसांपूर्वीच तर गेला होतास. " तरीही तो बोलेना. मग मी त्याच्या जवळ जाऊन , त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, " श्रीकांत काही फार गंभीर घडलंय का " त्यावर तो म्हणाला, " हरिदास गायब झालाय ........ आणि मला त्याचा ट्रेस लागत नाही. मग मी त्याला सविस्तर काय झालं ते सांगायला सांगितलं. मध्येच मी कॉफी केली. आम्ही दोघांनी ती घेतल्यावर तो म्हणाला, " मी जुडेकरच्या मागावर होतो, तुला माहित आहे. त्याचा पाठलाग करता करता हरिदासच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. त्याच्या फ्लॅटकडे जाणाऱ्या जिन्यावर पोहोचलो. दरवाज्या उघडा होता. मी वरच्या जिन्यावर गेलो. हरीदासशी इतरांचं चालू असलेलं बोलणं ऐकू येत होतं. प्रथम बोलणं सौम्यपणे चालू होतं. मग अचानक आवाज वाढले. आतल्या माणसांपैकी एक जण म्हणाला, " अरे पण तू का घाई केलीस, हा सबनिस का कोण आहे त्याची तुला माहिती नव्हती तर त्याची ऑर्डर काढायला पिंटो साहेबाला का भाग पाडलंस ? पैसे न मिळून जवळजवळ वर्ष झालं अशानं आपली रोजी रोटी कशी चालेल ? " हरिदासच्या तोंडून एक शब्दही फुटत नसावा. मग शिव्यागाळी झाली. तेवढ्यात आत असलेले दोन बुरखाधारी व्यक्ती हातात पिस्तुलं घेऊन त्याला पुढे करून दरवाज्याकडे निघाले. " चल, तुला इथे ठेवण्यात अर्थ नाही. तू काही कामाचा नाहीस, तुझं जगणं आता मोहंतीच ठरवेल. " मी पटकन वरच्या जिन्यावरच्या टोकाला जाऊन लपलो. हरिदास पुढे आणि ते बुरखाधारी मागे आणि तिसरा जो होता तो त्यांच्या मागे. जो यांचा म्होरक्या असणार. त्या पैकी कोणाचाच चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. दरवाज्या तसाच उघडा ठेवून ते निघाले. मी , ते गेल्यावर आत जाऊन झडती घ्यायला सुरुवात केली. थोडा वेळ गेला. मला काही कागदपत्रं मिळत होती . त्यातली काही खिशात कोंबली. अचानक जिन्यावर पावले वाजली तशी मी फ्रंट डोअरच्या मागे लपलो. तिथे जुडेकर येणार अशी माझी खात्री होती. ऑफिसच दार सताड उघडं होतं. रात्री दहाचा सुमार होता. आणि खरंच जुडेकर आला. त्याला काही दिसलं नसावं. तो आत पाऊल टाकताक्षणीच जिन्यावरून एक पिस्तुलधारी गोळ्या झाडित आला. त्या जुडेकरला लागून तो रक्ताच्या थारोळयात पडला. त्याला मारून पिस्तुलधारी वेगाने जिना उतरू लागला. . त्याला मी फ्रंट डोअरच्या मागे लपलेला दिसलो नाही. कदाचीत त्याला हरिदासने आधीच सुपारी देऊन ठेवलेली असावी. पण हरिदासला आपल्यालाच किडनॅप करतील याची कल्पना नव्हती. असो. जुडेकरचा खून माझ्यासमोर झाल्याने मी पोलीस यायच्या आत तिथून बाहेर पडलो. पुढे काय झालं मला माहित नाही. "
मग मात्र मी लवकरच मिळेल ती बस पकडून तिथून निघालो. मला कोणती बस पकडली माहीत नसल्याने पुण्याला उतरावं लागलं दुसरी बस पकडून मी इकडे आलो. " त्याचा चेहरा घामाने डबडबला होता.
माझं डोकं चालेना. माझ्या गालावर रुमाल धरलेला पाहून त्याने मला विचारलं. " हे काय केलंयस ...........? " मी हात बाजूला करून त्याला जखम दाखवली. आता गाल दुप्पट आकाराचा झाला होता. शिवाय ठणकाही लागला होता. ते लक्षात घेऊन मी त्याला उत्तर न देता म्हणालो, " तू आता इथेच राहा. सध्या कुठेही जाऊ नकोस. मी डॉक्टरांकडे जाऊन परत येतो . मला वाटत नाही आज मला कामावर जाता येईल. " असं म्हणून मी त्याच्या होकाराची वाट न पाहता बाहेर पडलो. गाडी घेऊन डॉ. कीर्तनेंचा दवाखाना गाठला. मलम पट्टी करून इंजक्शन देताना डॉकटर म्हणाले, " ही जखम उंदराच्या चाव्याची दिसत नाही. उंदराचा दात टोकदार असतो. ...... " असं म्हणून त्यांनी माझ्याकडे उत्तरादाखल पाहिलं. मी म्हंटलं , " तुमचं म्हणणं खरं आहे , डॉ. काल रात्री लीना व्हॉयलंट झाली होती. अतिउत्तेजित आवस्थेत तिनी हे केलं असावं. " त्यांना लीना इथे नाही हे माहित नव्हतं. त्यावर ते हसत हसत म्हणाले, " एकदा वहिनींना भेटलं पाहिजे. बहुतेक त्या बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटल्या असाव्यात. " मी गोळ्या आणि औषधाचं प्रिस्क्रिपशन घेतलं आणि तडक जुडेकरचं घर गाठलं. त्याच्या घरासमोर माफक गर्दी दिसत होती. मी पुढे झालो. त्यावर त्याची बायको उठून माझ्याकडे येत म्हणाली, " का दिलीत त्याना रजा ? नाही तरी म्हनायचं होततं. ............... " आणि तिनी रडायला सुरुवात केली. जुडेकरची बॉडी अजून मिळाली नव्हती . पोलिस ताबा केव्हा देतील कळत नव्हतं. बाहेर उभ्या असलेल्या लोकांमध्ये गोळे असलेला मला दिसला नाही. तो पुढे झाला आणि म्हणाला, " वहिनी, तुमच्या नवऱ्याला यांनीच मारलेला आहे. याला सोडू नका. पोलिसांना यांचं नाव सांगा...... " मला कापरं भरत होतं. मी जोरात ओरडलो, " मी मुंबईला गेलो नव्हतो. माझा याच्याशी काही संबंध नाही. असं म्हणून मी तिथून निघालो. तशी गोळे माझ्या मागे आला . गाडीच्या खिडकीवर हात ठेवले. आणि गालावरची पट्टी पाहून म्हणाला, " तिची जखम खोल असते, लवकर बरी होत नाही. रोमान्समध्ये एवढा जोर दाखवायला नको होता. " त्याला हे बोलताना लाज वाटली नाही. त्याचीच बायको माझ्या कडे आली होती. मी काही न बोलता गाडी सुरू केली. आणि घाईघाईनी वाड्याकडे निघालो.
दरवाज्या वाजवला. श्रीकांतने दार उघडलं. तो झोपला असावा. मी काही न बोलता आत गेलो. तो पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपला. प्रथम गोळ्या घेतल्या. आता गाल दुखायचा थांबला होता. जेवणाची तयारी करावी लागणार होती. पुन्हा बाहेर जाऊन हॉटेलातून जेवण घेऊन येणं कंटाळवाणं होतं. तरीही मी घरात पडलेल्या पावाचं सँडविच बनवून खाऊन घेतलं. तासाभरानी श्रीकांतला उठवलं. त्याला बऱ्याचश्या गोष्टी सांगणं भाग होतं. तो कॉफी आणि सँडविच खात होता. मी त्याला अथ पासून इति पर्यंत सगळं काही न लपवता सांगितलं. ते झाल्यावर तो म्हणाला, " मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस ? " ..... बारा वाजून गेले होते. बाहेर लख्ख ऊन पडलं होतं. मी त्याला चित्र वर सरकवून खालच्या भुयाराचा तपास करायचा विचार सांगितला. तो तयार होता. त्याची ही गोष्ट फार चांगली होती. तो कोणत्याही कृतीला हरकत घेत नसे. मात्र त्यातून काहीतरी निष्पन्न व्हायला पाहिजे असे. आम्ही पुढचा दरवाज्या लॉक केला आता कोणी येण्याची शक्यता नव्हती. त्यातून कोणी आलंच तर करू काहीतरी . नाहीतर दार उघडायचंच नाही. ............
त्यानी चित्र वर सरकवलं. कोनाड्यात थोडा दिवसाचा प्रकाश पडला. अर्थात टॉर्च घेणं जरूर होतं. आणि काठीही. आम्ही काळजीपूर्वक पायऱ्या उतरू लागलो. तिसऱ्या पायरीवर आल्यावर लक्षात आलं की सगळं छतच वटवाघूळांनी भरलंय. आमच्या दोघांभोवती ती फिरू लागली. आम्हाला ना मागे जाता येई ना पुढे. हातातल्या काठ्या फिरवून फिरवून हात दुखायला लागले. अचानक यांची आज शाळा कशी काय भरली. असला फालतू विनोद मला सुचला. अर्थात मी तो ; श्रीकांतला सांगितला नाही त्याची प्रतिक्रिया चांगली नसण्याची शक्यता होती. अचानक मला तो म्हणाला, "अरे , थांब, माझ्याजवळ पिस्तुल आहे. घाबरू नकोस , लायसन्सही आहे. माझ्या धंद्यात
मला त्याची गरज लागते. " तो कसातरी मागे वळला. एक दोन वाघुळानी त्याला चोची मारल्या. पण ते सहन करून तो वर गेला. जवळ जवळ पंधरा मिनिटांनी तो पिसुल घेऊन परतला . त्याने एक दोन गोळया हवेत झाडल्या . मला गोळीच्या आवाजाची सवय नसल्याने आणि आत आवाज घुमल्याने माझ्या हातातील टॉर्च आणि काठी गळून पडली. श्रीकांतनी मिलिटरी सर्व्हिस केल्याने त्याला प्रश्न नव्हता. अचानक वाघुळांचा कालवा थांबला. आणि ती जिथून आली होती तिथे गेली. आता आम्ही नेटाने आमचं काम करू शकत होतो. एक दोन वाघुळं तडफडत खाली पडली. आम्ही पुढे पुढे जात होतो. आज आम्हाला या तळघर वजा भुयाराला दुसरं तोंड आहे का ते पाहायचं होतं. दिवस असला तरी आत अंधार होता. मध्ये मध्ये येणारी थडगी अडचण निर्माण करीत होती. आम्ही ठेचाळत होतो. थोडे पुढे गेल्यावर एक मोठं दगडाचं कारंज दिसलं. त्याच्या भोवती निरनिराळे दगडी पुतळे बसवले होते. त्यातले काही नग्न होते. काही कपडे ;घातलेले होते. त्या सगळ्याच्या डोळ्यात जिवंतपणाची झाक होती. टॉर्च मारल्यावर त्यांच्या मुद्रा भीतीदायक वाटत होत्या. सगळीकडे प्रकाश टाकता टाकता. अचानक पुष्करणीच्या मध्ये प्रकाशाची तिरिम गेली. आणि त्यात एक सहा सात फूट उंचीचा पुतळा दिसला. त्याच्या एका हातात काटेरी मुकुट होता . दुसऱ्या हातात भाल्यासारखे शस्त्र होते. त्याचे डोळे इतके जिवंत होते की तो काहीतरी बोलू पाहत होता अस वाटलं. कोरलेल्या डोळ्यांमध्ये क्रौर्याची झांक होती. ओठ पूर्णपणे मुडपलेले, पण जिवणीच्या दोन्ही कडांतून त्याचे सुळे डोकावीत होते. पुष्करणीचं पाणी त्याच्या हातांतून येत असावं. अर्थात आता ती कोरडी होती. कदाचित दोनएक शे वर्ष तरी ती जुनी असावी. असले पुतळे वापरात कशासाठी होते याचा अर्थ लागत नव्हता. त्यावरश्रीकांत म्हणाला, " मध्ययुगात चेटुक, जारण मारण आणि तंत्र मंत्र विद्या वापरात फार असाव्यात . त्यांचा अर्थातच किती उपयोग झाला हे माहीत नाही. म्हणजे बघ ना, एखाद्याला तांत्रिकाने तुझे रुपांतर मांजरात होईल असे म्हंटले तरी ते नाही झालं तरी तसं बाहेर सांगितलं जायचं.साधारण लोकांवर वचक बसावा असा समाजातील एखाद्या घटकाचा आग्रह असणार हे नक्की. किंवा आपल्याला कुठे तंत्रविद्येचं ज्ञान आहे , कदाचित असं रुपांतर होतही असेल. ............" तो आणखीही काही बोलणार होता पण मी दुसरीकडे लक्ष दिल्याने तो थांबला. मग आम्ही पुढे सरकलो. आता मात्र तास भर चालल्यानंतर पाणी लागलं आणि भुयाराचं छत उतरतं होत होतं खाली येउ लागलं. पाण्यात पाय टाकावा की नाही ते कळेना. आणि ते किती खोल आहे याच अंदाजही येईना. मग श्रीकांतनी हातातली काठी त्यात घालून पाहिली. सध्यातरी ते गुडघ्यापर्यंत खोल होतं. पुढे टॉर्च मारून पाहिलं.समोर उतरतं छत आणि त्यापर्यंत येणारं पाणी याशिवाय काही दिसलं नाही. आत शिरण्याचं आम्हाला धैर्य होईना. शोध मोहिम इथेच थांबवून जाता येणार नव्हतं . अशी संधी पुन्हा मिळेल की नाही याची शंका होती. आजूबाजूला काही सापडतं का ते पाहावंसं वाटलं. मग मला एकदम नकाशाची आठवण झाली. मी श्रीकांतला सांगितालं. त्यावर तो म्हणाला, " हरकत नाही. आपण नकाशा बरोबर आणू या किंवा आधी त्याचा अभ्यास करू या. पण लवकर केलं पाहिजे. जवळ जवळ दुपारचे चार वाजत होते. आता मागे जायला हरकत नव्हती. मागे वळलो आणि टॉर्च मारून पाहिलं तर परवा पाहिलेल्या कानडी आजी भिंतीजवल उभ्या होत्या. त्या एका ठिकाणी हात दाखवित होत्या. जणू काही आम्ही तिकडे जावं असंच त्या सांगत असाव्यात. या इथे कशा आल्या आणि कशाला असले प्रश्न आम्हाला पडले. त्या विरळ विरळ होत होत नाहीशा झाल्या .त्यांना काय दाखवायचं होतं. कोणास ठाऊकत्या दाखवीत असलेल्या दिशेत आम्ही वळून पाहिले. तर जिथे पाणी कमी होतं. तिथे एक भुयारासारखं भोकसं होतं . तिथे जाणं शक्य होतं . पण तिकडे गेलंच पाहिजे का याचाही विचार करायला हवा होता. तिथे आणखी कोणता धोका तर नव्हता ? श्रीकांतला माझ्या मनातले विचार कळले असावेत. तो म्हणाला, " आपण तिकडे जाऊन बघायला काय हरकत आहे.थोडा वेळ घालवावा लागेल इतकंच. पुन्हा टॉर्च मारून पाहिलं तिथलं पाणी उथळ होतं. आम्ही पाण्यात पाय टाकले. पाण्यातून उडी मारून एक उंदीर चिर्र असा आवाज काढीत अंगावर चढला. मी घाबरून मागे सरकलो. श्रीकांतनी तो झटकून टाकून पुढे जाण्याची खूण केली आता आणखी दोन चार उंदीर अंगावर आले. तरीही आम्ही त्या भोकशात शिरलो. आत पाणी फारच कमी होतं. टॉर्चच्या प्रकाशात ती एक खोली होती. तिथे तीन पेटारे होते. त्यांना कुलुपं नव्हती तरी उघडणं आम्हाला जड गेलं आम्ही दोघांनी प्रयत्न केल्यावर एका पेटाऱ्याचं दार वर उचलंलं गेलं टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तर तिथे एक मृतदेह रक्तात तरंगत असलेला दिसला. (कदाचित मोहतींच्या मुलीचं रक्त वापरलेलं असावं. याचाच अर्थ मोहंतींच्या मुलीचा देहही सापडेल. माझ्या मनात आलं ) त्याचे अर्धवट दृष्टीहीन उघडे डोळे पाहून मला चक्कर आल्यासारखं झालं. श्रीकांतनी मला धरलं म्हणून बरं . नाहीतर मी पडणारच होतो. त्या देहाला अत्यंत घाण मारत होती. तो एका मुलीचा मृतदेह होता. तिचा चेहरा इतका ताजा कसा , याचं मला आश्चर्य वाटलं. त्यावर श्रीकांत म्हणाला, " पूर्वी , अतिप्राचीन काळी माणूस मेल्यावर त्याच्या देहात जिवंत माणसाचं रक्त घालून तो काही वर्ष ताजा ठेवण्याची पद्धत होती. असा एक पंथ होता. अशा रितीनि माणसं आपले आप्तेष्टांचे देह सांभाळित असत. नंतर नंतर ही पद्धत बंद झाली. त्यांच्याही काही अडचणी असणार. असो. मी जे वाचंलय ते तुला सांगितलं. " आम्ही कशीतरी ती पेटी बंद केली. दुसरे दोन पेटारे उघडण्याचं धैर्य आम्हाला झालंनाही. ती मुलगी म्हणजे मला सुरुवाती पासून दिसलेलीच होती. आम्ही वळून पायऱ्यांवरून लवकरच हॉलमध्ये आलो. चित्र परत सरकवलं . आता भीतीदायक काहीही दिसणार नव्हतं. पाच वाजून गेले होते. मला अजून पो. स्टेशनला जायचं होतं. मी श्रीकांतला सांगितल्यावर तो म्हणाला, " तुम्ही लोक हे असे विदाउट समन्स का जाता काही कळत नाही. त्यांनी तुला समन्स पाठवलं नाही ना . मग गप बस. " मला तो विचार पटला. पण उद्या ते बँकेत आले तर ? माझी शंका श्रीकांतला जाणवली. त्यावर त्याने "पाहा बुवा " अशी मुद्रा केली. असो. आम्ही थोडा नाश्ता बनवला आणि सहा साडेसहच्या सुमारास गाडी घेऊन नदीकिनारी गेलो. भन्नाट वारा सुटला होता. थोडं अंधारत होतं. संधिप्रकाश पसरला होता. काही वेळ
शांततेत गेला. श्रीकांत नदीच्या पाण्यात दगड टाकीत बसला होता. मी इकडे तिकडे करीत होतो. अचानक मला चर्चची आठवण झाली. मी श्रीकांतला सांगितल्यावर तो म्हणाला, " काही हरकत नाही , आत्ता जायला. फक्त आपल्या जवळ टॉर्च नाही. मोबाईलचा टॉर्च आहे म्हणा. "
आम्ही निघालो. गाडी तिथेच ठेवली. चर्चच्या प्रवेशदारापाशी आलो. त्याच्या प्रार्थना हॉलमध्ये गेलो. तिकडे जसं आधी होतं तसंच होतं. अचानक मी फादरच्या डेस्कच्या उजव्या बाजूला वळलो. तिथेच ते विवर होतं. आत टॉर्च मारला . पुन्हा उंदरांचा आवाज आला. ते पाहून श्रीकांत म्हनाला, " हेच पाणी तिकडे आहे . याचाच अर्थ भुयारवजा तळघराच दुसरं तोंड इथेच असलं पाहीजे. आपण आत्ताच जाऊन तिकडे बघू या का ? " असे म्हंटल्यावर मी शहारलो. तो मृतदेह मला दिसू लागला. मी नकार दिला. ते श्रीकांतला आवडलं नाही. मग आम्ही घरी गेलो. कुलुप उघडतो न उघडतो तोच मागून इन्स्पे. कानविंदेंचा आवाज आला, " तुम्ही आला नाहीत पो. स्टेशनला. तुम्हाला काय लेखी समन्स पाहिजे का ? " ............ "नको ? " असं श्रीकातने विचारताच ते म्हणाले, " आता हे आणखीन नवीन कोण ? " मला त्याची ओळख करून द्यावी लागणारच होती. मी काही बोलण्याच्या आत तेच म्हणाले, " हे तुमचे डिटेक्टिव्ह तर नाहीत ? " माझा चेहरा बोलका असावा. आम्ही काही उत्तर न देता आत शिरलो. तेही आत शिरले. सोफ्यावर बसत ते म्हणाले, " तुम्ही , जुडेकर आणि हरिदास यांचा ब्रॅकेट असावा असा मला वाटत आलंच होतं. तुम्ही जुडेकरचा खून कोणाकडून करवलात ? तेवढं मला सांगा. म्हणजे केस सुटायला सुरुवात होईल. तुमचा सहभाग बराच असणार नाही का "
ते माझ्या चेहऱ्याचं निरिक्षण करीत होते. मी टाळाटाळ करीत नव्हतो , पण आत्ता मला श्रीकांत असताना काहीही उत्तरं द्यायची नव्हती.तुम्ही म्हणाल तुमचातर तो मित्र होता, मग असं का ? खरंतर मला आत्ता सुचत नव्हतं. मी कानविंदेंना चहा घेणार का विचारलं. त्यावर ते म्हणाले," आम्हाला पो. स्टेशनचाच चहा पचतो आणि दुसर्यालाही तो पचवायला लावतो. " थोडक्यात ते चहा घेणार नव्हते. मी त्यांना नजरेने बाहेर बोलावले. ते उठले. मी बाहेर गेल्यावर त्यांना सांगितलं, " हे पाहा, तो माझा नातेवाईक आहे , तो वाटेल ते बाहेर जाऊन सांगेल, मी उद्या सकाळी
दहा वाजता , पाहिजे तर पो. स्टेशनला येतो. प्लीज. ........" असं म्हणून मी त्यांची तो डिटेक्टिव्ह आहे ही शंका दूर केली आणि खोटं सांगून उद्यापर्यंत
चा वेळ मागून घेतला. एक तर मी श्रीकांत बरोबर आज चर्चा करीन आणी मग ठरवेन आणि आत्ताच्या आत्ता मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार नाहीत. ते विचार करून हो म्हणाले. पण त्यांनी विचित्र अट घातली. या तुमच्या नातेवाईकाचं नाव , पत्ता, फोन नंबर पाहीजे. अर्थातच मी ते उद्या देईन असं सांगितलं. तेव्हा ते निघाले. ते गेल्यावर श्रीकांत मला विचारणार हे मला माहिती होतं. पण आश्चर्य म्हणजे त्यानी काहीच विचा रलं नाही.
लवकरच मी स्वैपाकाच्या मागे लागलो. म्हणजे जेवण निदान नऊ वाजेपर्यंत तरी तयार होईल. मला फारसं करता येत नव्हतं. तो बाहेर जाऊन बसला होता. तो फिरत होता. आसपासचा परिसर बघत असावा. टीव्ही लावला. वेगवेगळ्या बातम्या ऐकण्यात माझा वेळ जाऊ लागला. आता तो पुन्हा आत येऊन बसला. माझ्या मागे स्वैपाकघरात येत तो म्हणाला," तू खरंच जुडेकरला पाठवायला नको होतंस. "
मी त्याच्याकडे पाहत राहिलो.
(क्र म शः )