₿₿₿
चार महिन्यानंतर ....
आज वाघचौरे साहेब रिटायर होणार होते. साहेबांचा निरोप समारंभ होता. सायबर क्राईमच्या संपूर्ण युनिटला पार्टी होती … त्यांच्या निरोप समारंभाला मोठमोठ्या व्यक्ती , पोलीस दलातले बडे अधिकारी हजर होते. सगळीकडे रोषणाई केलेली होती. वाघचौरे साहेब स्वतः छानसा ब्लेझर आणि टाय घालून बसले होते. साहेबांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरु झाला . त्यांच्या जवळचे कलिग्स आणि वरिष्ठ त्यांच्याबाबत भरभरून बोलले , सर्वजण त्यांच्या स्वभावाची आणि कामाच्या पद्धतीची स्तुती करत होते. साहेबांनी नुकतीच सॉल्व केलेली केस म्हणजे क्रिप्टो कॉइन एक्स या बिटकॉइन एक्सचेंजबाबत तर प्रत्येक जण बोलत होता. फार क्वचित प्रसंगी होणारी इतकी मोठी रिकव्हरी साहेबांनी करून दाखवली होती. त्यासाठी वरिष्ठही त्यांचं कौतुक करत होते. निरोप समारंभ संपला. संध्याकाळी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. वाघचौरे साहेब खूप खुश होते आणि मुख्य म्हणजे समाधानी होते. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी खूप मोठी कामगिरी पार पाडली होती. इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी चांगलं काम केलं होतं. वाईट, चांगल्या सगळ्या गोष्टी केल्या , पण वर्दीला डाग लागू दिला नाही. यशाच्या शिखरावर असताना ते रिटायर्ड होणार होते त्यामुळे त्यांना खूप बरं वाटत होतं. आलेल्या सर्व पाहुण्यांचे ते स्वतः आनंदाने विचारपूस करीत होते. त्यांना इन्स्पेक्टर अमर दुरून येताना दिसला , त्याचा चेहरा पडलेला दिसत होता , हातात एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा होता.
“ अरे , ये ये अमर ! ”, असं म्हणत त्यांनी त्याला मिठी मारली. “ हा इन्स्पेक्टर अमर ! माझा ज्युनियर … आमच्या त्या बिटकॉइनच्या केसमध्ये हा माझ्याबरोबर होता … अतिशय हुशार आहे हा … ”, वाघचौरे साहेबांनी आजूबाजूच्या पाहुण्यांना त्याची ओळख करून दिली. अमरला बुजल्यासारखं वाटू लागलं.
“ सर , तुमच्याशी थोडं बोलायचं होतं , रादर एक गोष्ट दाखवायची होती … थोडं आत येता का ? ”, अमरचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता.
“ काय रे ? काय झालं एवढं ? आणि चेहरा का दिसतोय तुझा असा ? बरं वाटत नाही का ? ”
“ ठीक आहे सर , प्लिज जरा आत जाऊन बोलू … ” दोघेही आतल्या खोलीत गेले. अमरने दरवाजा लावला.
“ हे बघा सर … ”, असं म्हणून त्याने तो पांढरा लिफाफा त्यांच्या हातात दिला . त्यांनी तो उघडून पाहिला , त्यात पोस्टकार्ड साईझचे दोन फोटो होते. एका फोटोत मिसेस रागिणी आणि ओमी मिरचंदानी यांच्या लग्नाचा फोटो होता. आणि दुसरा सेम फोटो मिसेस रागिणी आणि वकील मेघनाद निशाणदार यांच्या लग्नाचा होता …
“ हा तर रागिणीच्या घरातला त्यांच्या लग्नाचा फोटो आहे … ओह ! मिसेस रागिणीने त्या वकिलाशी लग्न केलं कि काय ? अरेरे … आणि म्हणून तुझा चेहरा पडलाय का ? ”, दुसरा फोटो बघत त्यांनी गमतीत विचारलं .
“ सर , तुम्ही हे दोन्ही फोटो नीट बघितले नाहीत … हे बघा , यातला एक फोटो ओरिजनल आहे आणि दुसरा फोटोशॉप केलेला आहे … ”
“ म्हणजे ? मला समजलं नाही . ”
“ सांगतो सर बसा , यातला रागिणीचा वकील मेघनाद निशाणदार सोबतचा फोटो ओरिजनल आहे. या फोटोमधला मिसेस रागिणीच्या चेहऱ्यावरचा प्रकाश आणि मेघनादच्या चेहऱ्यावरचा प्रकाश मॅच होतोय , हा दुसरा फोटो आपण रागिणीच्या घरी पाहिला होता , तो फोटोशॉप केलेला आहे. त्यातला ओमी मिरचंदानी हा मेघनादच आहे , फक्त त्याचा चेहरा एडिट केलाय …या फोटोत, ओमी मिरचंदानीचे केस बघा, चिकटवल्यासारखे वाटतायत. ”, अमर म्हणाला.
“ अरे , वाटणारच ! तो विग घालायचा ना … ”, वाघचौरे साहेब म्हणाले.
“ सर , माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे कि , ओमी मिरचंदानी नावाचा कुणी माणूसच अस्तित्वात नाही. हा सगळा रागिणी आणि मेघनाद निशाणदार यांचा डाव होता. ”, अमर तावातावात म्हणाला.
“ काय म्हणतोयस काय ? ”, वाघचौरे साहेब आश्चर्याने म्हणाले .
" हो सर , म्हणून तर त्याने हे दोन फोटो आपल्याकडे पाठवले. रागिणी आणि मेघनाद दोघे नवरा बायको आहेत , त्यांनी ओमी मिरचंदानी या फेक माणसाच्या नावाने क्रिप्टो कॉइन एक्स ही कंपनी स्थापन केली . मग तो ओमी मिरचंदानी मेला असं घोषित केलं आणि ते एक्स्चेंज बंद पाडलं .
" पण ते असं का करतील ? म्हणजे ओमी मिरचंदानी नावाचा फेक माणूस उभा करून, त्याला मारून त्यांना काय साध्य होणार आहे ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं.
" काय झालं असेल याचा अंदाज मला आता आला आहे . हा प्लॅन खूप आधी ठरलेला असावा , ओमी मिरचंदानी या नावाने त्यांनी सगळे डॉक्युमेंटेशन केलं . तो मेघनाद खूपच हुशार माणूस आहे, फेक डॉक्युमेंट्स तयार करणे त्याच्यासाठी अवघड नसावं. शिवाय वकील आहे, कायद्याच्या पळवाटा त्याला चांगल्या माहीत होत्या. आपल्याकडेच काय पण सगळ्या जगभरात या बिटकॉईनबद्दल पुरेसे नॉर्मस् क्लिअर नाहीत , त्याचाच फायदा यांनी घेतला. त्या दोघांनी क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज ऑनलाईन सुरू केलं. बऱ्यापैकी बिटकॉईनचा साठा झाल्यावर त्यांनी तो फंड एका कोल्ड वॉलेटमध्ये ट्रान्सफर केला , त्यावेळी बिटकॉईन त्याच्या ऑल टाईम हाय वर होतं. जवळपास त्यावेळी एका बिटकॉईनची किंमत पन्नास लाखांच्यावर होती. त्यांनी त्या किमतीला हे सगळे बिटकॉईन्स विकले. त्यावेळी हे दोघे लेह मध्ये होते , कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचाही फायदा त्यांना मिळाला. तिथे अस्तित्वात नसलेल्या ओमी मिरचंदानीचा मृत्यू घडवून आणला . का ? तर त्याच्या मृत्यूचा फायदा घेऊन एक्स्चेंजची ऑपरेशन्स बंद करता येतील . मग त्यांनी बनाव केला की ओमी मिरचंदानीने एका कोल्ड वॉलेटमध्ये सगळे बिटकॉईन्स ठेवलेत , आणि ते कुठे आहे हे माहीत नाही . खरं तर ते मार्केट खाली यायची वाट बघत होते , जेणेकरून कमी किमतीचे बिटकॉइन्स परत खरेदी करता येतील. त्याचवेळी एस एफ आय ओ ऑफिसर सौदामिनी आणि चिकटे दोघांची एन्ट्री झाली. इथेच आपलं थोडं दुर्लक्ष झालं. सौदामिनी बाई मुद्दाम रागिणीशी चिडून बोलायची , तिला दरडावून विचारायची, त्यामुळे आपण त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. या दोघांचं काम आपल्या सगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे होतं. ज्यावेळी बिटकॉईनची किंमत कमी होईल त्यावेळी कमी किमतीचे बिटकॉईन्स मेघनादने पुन्हा खरेदी केले आणि ते आपल्याला या दोघांच्या मदतीने मिळावेत म्हणून सौदामिनीला आणि चिकटेला आपल्यासोबत ठेवलं. आपल्याला कमी किंमत असलेलं बिटकॉईन्सचं वॉलेट या सौदामिनीनेच मिळवून दिलं आणि नंतर स्वतः गायब झाली . मेघनादचा प्लॅन हाच की ऑल टाईम हाय बिटकॉईनची किंमत आणि आता जवळपास अर्धी झालेली किंमत यातल्या किमतीच्या फरक ! तो फरक जवळपास एक हजार कोटींच्या घरात आहे. शिवाय लुप्त झालेले बिटकॉईन्स परत मिळवून दिल्याने रागिणी तर महान देवीच झाली. लोक तिच्या नावाचा उदोउदो करू लागले. कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली ती वेगळीच ! आता ते दोघे कुठेतरी पळून गेलेत असं माझा खबरी म्हणाला." अमरचं बोलणं ऐकून वाघचौरे साहेबांना चक्कर येईल की काय असं वाटू लागलं. आपला चांगलाच वापर करून घेतला असं वाटून त्यांना एकदम हरल्यासारखं वाटलं. जी केस त्यांनी बुद्धीचातुर्याने सोडवली असं ते मानत होते , तो सगळा आभास होता, याची जाणीव त्यांना झाली. ते काहीच बोलू शकले नाहीत. अमरला हतबल होऊन त्यांच्याकडे पाहण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
₿₿₿
बहामा बेटांवरच्या एका आलिशान रिसॉर्टवर पांढऱ्या शुभ्र वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या शॅकमध्ये दोन आरामदायी वेताच्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्यावर रागिणी आणि मेघनाद स्विमसूटमध्ये डोळे मिटून पहुडले होते. रागिणीच्या डोळ्यांवर गॉगल होता. समोर निळाशार समुद्र आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटा उसळत होत्या. त्या आलिशान हॉटेलमधला एक वेटर दोन मॉकटेल्स घेऊन आला आणि त्यांच्यासमोरच्या टेबलावर त्याने ते ठेवले. इतक्यात मेघनादच्या फोनचा मेसेजटोन वाजला. त्याने डोळे उघडून पाहिलं .
“ पार्सल डिलिव्हर्ड सक्सेसफुली … ”
मेसेज वाचून त्याला आनंद झालेला दिसला…
“ रागिणी, आपलं पार्सल इन्स्पेक्टर अमरकडे पोहोचलंय ”, तो म्हणाला.
“ वॉव… काँग्रॅच्युलेशन्स ! ”, तिला आनंद झालेला होता.
“ त्याचा चेहरा पाहण्यालायक झाला असेल नाही … ! ”
“ बिचारा ! बरं , मी सांगितलेलं काम केलंस का ? ”
“ येस मॅडम ! तुम्ही काम सांगणार , आणि मी ते करणार नाही, असं कधी होईल का ? ”, तो गमतीत म्हणाला. त्याने आपला फोन तिच्यासमोर धरला… त्यात तीन अकाउंट्सना प्रत्येकी दहा करोड रुपये आणि एका अकाउंटला पन्नास करोड रुपये ट्रान्स्फर केलेले दिसत होते.
" सौदामिनी , चिकटे आणि डॉक्टर दोरजे यांचं ठीक आहे , पण हे चौथं अकाउंट कुणाचं आहे ज्याला तू पन्नास करोड ट्रान्स्फर करायला सांगितलेस ? " , मेघनादने विचारलं .
" हे चौथं अकाउंट लेह जवळच्या नेर्मा गावातल्या नन्सचं आहे. त्या बौद्ध भिक्खूणींनी मला काही दिवस त्यांच्यात राहू दिलं. त्यांची सुखं आणि दुःखं मी जवळून बघितलीत. त्यांना खरोखर गरज आहे पैशांची … ! " रागिणी म्हणाली .
" ओके, फॉर गुड कॉज ! चला ! ओमी मिरचंदानीच्या नावाने चिअर्स करूया… त्याच्यामुळेच तर आपण 900 करोड रुपयांचे मालक झालोत… ”
“ येस , चिअर्स टु ओमी मिरचंदानी ! ” दोघांनी आपापले मॉकटेल्सचे ग्लास उंचावले . त्याचवेळी समुद्राची एक लाट उसळली , जणूकाही तोही या दोघांच्या आनंदात सहभागी झाला होता ….
@@@समाप्त @@@
ह्म्म, आधीच वाटत होतं तो
ह्म्म, आधीच वाटत होतं तो वकीलच कर्ताधर्ता असणार.
पण एकंदरितच मस्त होती कादंबरी / गोष्ट जे काय असेल ते.
एकदम वेगवान कथानक.
मस्तच रंगवलीत कथा. ती पण एकदम
मस्तच रंगवलीत कथा. ती पण एकदम पटापट...
मस्त कथा.
मस्त कथा.
सलग भाग टाकलेत त्यामुळे उत्सुकता टिकून राहिली आणि वाचताना मजा आली.
पुकप्र... पुढील कथेच्या प्रतीक्षेत
छान कथा
छान कथा
थोडी predictable होती पण रेग्युलर लिहिली आणि पूर्ण केली हे छान झालं.
मस्त होती कथा… शेवटपर्यन्त
मस्त होती कथा… शेवटपर्यन्त उत्सुकता टिकुन राहिली, भाग लहान होते तरी फटाफट आले.
ओमी हाच मेघ हा सन्शय होताच. पण इन्स. अमर शेवटीथोडी हुशारी दाखवेल असे वाटले होते.
चांगली झाली आहे कथा. पण
चांगली झाली आहे कथा. पण तितके जास्ती धक्के बसले नाहीत. सौदामिनीच्या पात्राला स्वस्तात गुंडाळल्यासारखे वाटले.
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
अभिनंदन मिलिंद सर....
अभिनंदन मिलिंद सर....
प्रतिलीपी सुपर लेखक दोन पर्वासाठी ही कथा विजेती ठरली.
दर्जेदार लेखनाचा उत्तम नमुना.
अभिनंदन..
अभिनंदन..
कथा खरंच वाचनीय आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद , सर्वांचे आभार
धन्यवाद , सर्वांचे आभार
मस्त कथा.
मस्त कथा.