क्रिप्टो ( Crypto ) भाग - २४

Submitted by मिलिंद महांगडे on 22 June, 2022 - 05:50

₿₿₿

ओमी मिरचंदानीच्या प्रकरणात आता खासदार प्रतापराव बोडके पाटील यांचंही नाव आल्याने सुरुवातीला सोप्पी वाटणारी केस आता भलतीच गुंतागुंतीची होऊन बसली . ही केस आता हाय प्रोफाईल केस बनली होती. त्यात बरंच मोठं राजकीय नाट्य घडू पहात होतं . विरोधी पक्षाच्या नेत्यांना ही एक संधी दिसत होती , त्यामुळे सत्तेत असलेल्या बोडके पाटील साहेबांच्या पक्षाला कोंडीत पकडण्याचं काम ते करत होते. हहा सगळ्या गोंधळात पोलिसांचं काम वाढलं नसतं तर नवल होतं ! त्यात मिडियाचं भलतंच प्रेशर होतं. वाघचौरे साहेब आणि अमर वैतागून त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते असतानाच धाडकन दरवाजा उघडून सौदामिनी मॅडम आणि त्यांचा असिस्टंट चिकटे आत आले . सौदामिनी मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता .
" गुड आफ्टरनुन सर ! " , त्या उत्साहित होऊन म्हणाल्या .
" गुड आफ्टरनुन ! काय मॅडम ? आहेत कुठे तुम्ही ? बरेच दिवस दिसलाच नाहीत ! काही रिपोर्टिंग नाही ! ", तिला बघून खरं तर वाघचौरे साहेबांना खूप राग आला होता , पण महत्प्रयासाने ते शांत राहिले .
" तेच तर सांगायला आले आहे साहेब ! ओमी मिरचंदानीचा लॅपटॉप ओपन करण्यात आमच्या चिकटेंना यश आलं आहे ! " , सौदामिनी मॅडम खुशीत येऊन म्हणाल्या . त्या असं म्हणाल्या आणि वाघचौरे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .
" अरे , वा ! वा , फार चांगली बातमी आणलीत मॅडम ! चला , आज काहीतरी चांगली सुरुवात झाली. " , वाघचौरे साहेब आनंदात म्हणाले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांच्या वरिष्ठांचा फोन असावा , त्यामुळे ते अगदी अदबीत बोलत होते , येस सर ! जी सर , लगेच व्यवस्था करतो सर ! म्हणत त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर टेबलवर ठेवलेल्या काचेच्या ग्लासातून ते पाणी प्यायले.
" अमर , एक महत्वाचं काम आहे , त्या मिसेस रागिणीला सिक्युरिटी देण्याची वरून ऑर्डर आली आहे , आपला स्टाफ घेऊन तुला ताबडतोब निघायला पाहिजे . "
" पण सर ! , एवढं काय अडलंय ? कशाला सिक्युरिटी बिक्युरीटी ? " , अमर वैतागला .
" मलाही पटतंय ! पण काय करणार ? ऑर्डर्स आर ऑर्डर्स ! आपल्याला पाळायलाच पाहिजेत ! तुला जे लोक पाहिजेत ते घे आणि लगेच निघ. " , वाघचौरे साहेब म्हणाले. अमर नाईलाजाने उठला , सॅल्युट केला आणि तो केबिन बाहेर पडला.
" ओके, सौदामिनी मॅडम, काय आहे का त्या लॅपटॉपमध्ये ? आपल्या उपयोगाचं काही आहे का ? ", वाघचौरे साहेबांनी उत्साहात विचारलं .
" आम्ही तो लॅपटॉप ओपन केलाय सर , त्यात ओमी मिरचंदानीच्या नेहमीच्या कामाच्या फाईल्स आहेत . पण एक विशेष फोल्डर आम्हाला सापडलं . त्यात काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे , कदाचित हा काही संदेश असावा किंवा आणखीन काहीतरी . "
" दाखवा मला ! " , वाघचौरे साहेब घाईघाईने म्हणाले. सौदामिनी मॅडमनी त्यांच्या असिस्टंटला इशारा केला . त्याने लॅपटॉप वाघचौरे साहेबांच्या समोर धरला . काही क्षण त्यांनी समोरच्या लॅपटॉपची स्क्रीन पाहिली ,
" काय आहे तरी काय हे ? " , वाघचौरे साहेब निरखून बघत म्हणाले . स्क्रीनवर असं काहीतरी लिहिलेलं होतं .

R1M1L1 L1GL9 TH1N
LKSHMN1N5 M1RL1 B1N
T9TH21N N9GH1L9 GNG1
T9TH5CH S1PD5L KHJ9N1

₿₿₿

सायबर क्राईमची जीप मिसेस रागिणीच्या बिल्डिंगपाशी येऊन थांबली. त्यातून इन्स्पेक्टर अमर , दोन लेडी कॉन्स्टेबल , आणि बाकीचा पोलीस स्टाफ उतरला . अमरने दोन पोलिसांना बिल्डिंगच्या गेट पाशी आणि दोघांना बिल्डिंगच्या मागे माडांच्या बनात उभं राहण्याचे आदेश दिले . दोन लेडी कॉन्स्टेबल घेऊन तो रागिणीच्या फ्लॅटवर गेला . फ्लॅटची बेल वाजवली , मिसेस रागिणीने दरवाजा उघडला . अमर आणि दोन लेडी कॉन्स्टेबल आत आले. समोरच्या खुर्चीवर वकील मेघनाद निशाणदार बसला होता. त्याला बघून इन्स्पेक्टर अमरचं डोकं तापलं .
" तुम्ही ? आणि इथे ? " , त्याने मेघनादला विचारलं.
" आणखी कुठे असणार ऑफिसर ? मिसेस रागिणी माझ्या क्लाएन्ट आहेत , आणि सध्या त्या अतिशय वाईट परिस्थितीतुन जात आहेत . " , मेघनाद म्हणाला .
" पण तुमचं काम फक्त कायदेशीर सल्ला देणं आहे . मला असं वाटतं की तुम्ही त्याही पुढे जाऊन काम करता आहात ." , अमरने टोमणा मारला .
" अमर साहेब , काल त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला . कोणीतरी माथेफिरुने त्यांच्या खिडकीच्या काचेवर दगड मारला . त्यामुळे त्या घाबरलेल्या आहेत. अशा अवस्थेत माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो." , मेघनाद म्हणाला .
" कर्तव्य ! " , असं म्हणून अमर उपरोधिक हसला . " मग चांगल्या नागरिकांच कर्तव्यही करायचं होतंत … "
" म्हणजे ? मी समजलो नाही . "
" त्या धमकीचं फोन रेकॉर्डिंग तुम्ही पोलिसांना द्यायला हवं होतं . पोलिसांनी योग्य तो तपास केला असता . ते न करता तुम्ही ते रेकॉर्डिंग थेट मिडीयाला दिलंत…" , अमर म्हणाला .
" पोलीस काय तपास करतायत ते दिसतंच आहे . उद्या एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही तपास केला असता . " , मेघनादचा आवाज वाढला .
" मिस्टर मेघनाद , तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय . एक पब्लिसिटी स्टंट म्हणून तुम्ही फोनचं रेकॉर्डिंग मीडियात दिलंत … केयॉस निर्माण केलात … कशासाठी केलंत हे ? " , अमरही भडकला .
" एक मिनिट ! एक मिनिट ! प्लिज दोघेही थांबा ! काय लहान मुलांसारखे भांडताय ? ", रागिणी दोघांवरही वैतागली .
" रागिणी मॅडम, या तुमच्या वकील महाशयांनी ती क्लिप मीडियात दिली… त्यात खासदार बोडके पाटील यांचा नाव आल्याने खूप मोठा राजकीय गोंधळ उडालाय . आमची केस आणखी कॉम्प्लिकेटेड झालीय . " , अमर म्हणाला .
" अच्युअली सॉरी ऑफिसर , तुम्ही बसा . मी तुम्हाला सांगते. मीच ती ऑडिओ क्लिप मीडियात द्यायला सांगितली होती. मला खूप भीती वाटली कालच्या त्या प्रसंगामुळे, त्यामुळे मी हे पाऊल उचललं. त्यात खासदार साहेबांचा उल्लेख होता, हे तर माझ्या ध्यानीमनीही नव्हते. मीडियाला काय , त्यांना हवं तेवढंच घेतात आणि दाखवतात. आपल्या इन्वेस्टिगेशनमध्ये कॉम्प्लिकेशन करायचा माझा कोणताही हेतू नव्हता . सॉरी फॉर युअर ट्रबल. " असं म्हणत रागिणी इन्स्पेक्टर अमरच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेत म्हणाली. तापत्या तव्यावर लोणी ठेवावं तशी इन्स्पेक्टर अमरची अवस्था झाली. मेघनाद मिशीतल्या मिशीत हसत होता.
“ अं … इट्स ओके . ठीक आहे. ”, म्हणत अमर झटका लागल्यासारखा थोडासा मागे सरकला.
" माझ्यामुळे आपल्याला खूप त्रास झाला , त्याबद्दल आय अम व्हेरी सॉरी… " रागिणी अगदी हात जोडत म्हणाली .
" अहो , सॉरी काय म्हणताय रागिणी मॅडम , लोकांचं रक्षण करणं आमचं कामच आहे . ", अमर म्हणाला.
“ ऑफिसर , हा एवढा स्टाफ कशासाठी आणलात ? ”, रागिणीने लेडी कॉन्स्टेबलकडे बघत विचारलं.
“ हा स्टाफ तुमच्याच सिक्युरिटीसाठी आहे मॅडम … तुमच्यावर हल्ला झाला , तुम्हाला धमकीचे फोन येतात ,त्यामुळे मग हे करणं भाग आहे. ”, अमर मेघनादकडे बघत उपरोधिकपणे म्हणाला . रागिणी काहीही सांगत असली तरी हा उद्योग याच वकिलाने केला आहे या विचारावर अमर ठाम होता.
“ खरंच, काल खूपच घाबरले होते मी… या अशा प्रकारच्या गोष्टी आधी कधी घडल्या नाहीत . ”, रागिणी म्हणाली.
" बरं मला सांगा , तुम्हाला कोणत्या नंबरवरून फोन आला होता ? " अमरने विचारलं , रागिणीने तिचा मोबाईल पाहून कालचा नंबर इन्स्पेक्टर अमरला दिला.
" या नंबर वरून आधी कधी फोन आला होता का ? "
" नाही , काल फर्स्ट टाईम . "
" ओके , त्याने काही नाव सांगितलं का ? "
" नाही , काहीच नाव नाही सांगितलं . "
" आवाज ओळखीचा वाटत होतं का ? किंवा तुमचा कुणावर संशय ? "
" नाही . " ती नकारार्थी मान हलवत म्हणाली.
"ठीक आहे , या मोबाईल नंबरचा सी डी आर काढतो … तुम्हाला धमकवणाऱ्याला आम्ही लवकरच पकडू . " अमरने आश्वासन दिलं .
" थॅन्क्स अमर साहेब ! तुमच्यासारखे ऑफिसर आहेत म्हणून आम्ही सिटिझन रात्री शांतपणे झोपू शकतो . थॅन्क्स वन्स अगेन ! " , मेघनाद म्हणाला , पण त्याच्या बोलण्यात उपरोध असावा असं अमरला वाटून गेलं .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमरला जरा सांभाळून रहायला सांगा... गोत्यात येईल अशाने...
रागिणीने ओमीचा खरा लॅपटॉप दिलाय का पोलिसांना?