₿₿₿
" मेघनाद , तू खरंच बोलतोयस का ? आपण ९०० करोड रुपयांचे मालक होणार ? " , रागिणी पुन्हा अविश्वासाने विचारलं . ती अजूनही आश्चर्याच्या धक्क्यातून सावरली नव्हती.
" तसं बघायला गेलं तर आणखीही पैसे मिळू शकतात …. पण त्यासाठी आणखी थोडं थांबावं …. "
" नको , हेच खूप आहेत . " , मेघनादचं वाक्य पुर्ण होण्याआधी रागिणी म्हणाली . त्याने एकदा तिच्याकडे बघितलं , सध्याच्या परिस्थितीला ती कंटाळली होती . आणखी जास्त वाट बघण्यात अर्थ नाही असं मेघनादला वाटून गेलं.
" मार्केट बरंच खाली आलं आहे . मलाही वाटतं ही योग्य वेळ आहे. " , असं म्हणत त्याने त्याचा लॅपटॉप उघडला . दोघेही लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसले. त्याने कुठलीही वेबसाईट उघडली. लॅपटॉपवर बिटकॉईनचा चार्ट दिसत होता . रागिणी त्याकडे एकटक बघत होती. मेघनादने काही इंडिकेटर्स त्या चार्टवर ऍड केली आणि तो त्यांचा अभ्यास करू लागला . लॅपटॉपवरच्या त्या चार्ट्सवर आडव्या तिरप्या रेषा मारू लागला. रागिणीने त्याच्याकडे पाहिलं. नाकावर घसरणारा चष्मा त्याने तर्जनीने पुन्हा नीट बसवला . तिला त्याच्याबद्दल खूपच प्रेम दाटून आलं . आपल्याला मेघनादच्या रुपात खरं प्रेम मिळालं याबद्दल तिने देवाचे आभार मानले. असं कुणालाही खरं प्रेम मिळत नाही , त्यासाठी नशीबवान असावं लागतं, आणि आपण खरोखर नशीबवान आहोत याची तिला पुन्हा एकदा जाणीव झाली.
" येस , कदाचित हीच खरी वेळ आहे , आपल्या ह्या नाट्याचा शेवट करायची . " , बराच वेळ चार्ट्स बघून झाल्यानंतर तो म्हणाला. रागिणीची विचारांची लय तुटली .
" अं … काय म्हणालास तू ? "
" मी म्हणालो , हीच योग्य वेळ आहे . "
" कशावरून ? मलाही सांग जरा …. " म्हणत तिनेही लॅपटॉपमध्ये डोकं घातलं .
" मी तुला मागे ,वायकॉफ डिस्ट्रिब्युशनबद्दल सांगितलं होतं , आठवतंय का ? " , मेघनाद म्हणाला .
" नाव ऐकल्यासारखं वाटतंय , पण आता लक्षात नाही . " , चूक झाल्यावर लहान मुलं करतात तसा चेहरा करत ती म्हणाली . मेघनादने डोळे मोठे केले .
" बरं ठीक आहे . ऐक सोप्या भाषेत सांगतो , रिचर्ड वायकॉफ याने ही मेथड शोधून काढली. रिचर्ड वायकॉफ हा विसाव्या शतकातला स्टॉक मार्केट मधला एक मोठ्ठा टेक्निकल अनालिस्ट होता. त्याने स्टॉक मार्केट सायकल्स चा खूप अभ्यास केला. आणि काही थिअरिज बनवल्या. त्यामध्ये मागचे काही ट्रेंड्स बघून आपण फ्युचरमध्ये मार्केट कसे बिहेव करेल याचं भाकीत करू शकतो , त्यामुळे आपल्याला योग्य ठिकाणी एन्ट्री आणि एगझिट घेऊन प्रॉफिट बुक करता येते. ही थिअरी बिटकॉईन ट्रेडिंगलाही लागू होते . आता मार्केट बरंच खाली आलंय आणि एका सपोर्ट झोनमध्ये आहे . तुला आठवतंय का, आपण आपल्या एक्चेंजचे बिटकॉईन मागे विकले होते , त्यावेळी मार्केट सर्वोच्च बिंदूवर होते . त्या वेळी बिटकॉईनची किंमत 64000 $ होती . आपण त्यावेळी ते विकले . आणि आता आज बिटकॉईनची किंमत 29000 $ आहे . आता आपण जेवढे बिटकॉईन पूर्वी विकले तेवढेच आता खरेदी करू . "
" परत का खरेदी करायचे ? " , न समजून रागिणीने विचारलं .
" आपल्या नाटकाचा शेवटचा सिन त्याच्यावरच तर अवलंबून आहे . " , मेघनाद म्हणाला .
" ओके मग पुढे ? " , तिने कुतूहलाने विचारलं .
" आता हे बघ … " , असं म्हणून त्याने पांढऱ्या रंगाचा एक छोटा बॉक्स दाखवला .
" हा कसला बॉक्स , आणि हे कायंय पेन ड्राइव्ह सारखं ? " , रागिणीने विचारलं.
" हे आहे लेजर नॅनो एस …. हे कोल्ड वॉलेट आहे . त्यामध्ये आपण खरेदी केलेले बिटकॉइन साठवून ठेवू शकतो , हे इंटरनेटशी कनेक्टेड नाही , त्यामुळे कोणीही हॅकर , हे हॅक करून यात साठवलेले बिटकॉईन चोरू शकत नाही . हे सगळ्यात जास्त सेफ आहे . " मेघनाद म्हणाला , रागिणीने ते लेजर नॅनो एस डिव्हाईस हातात घेऊन पाहिलं , एखाद्या पेन ड्राइव्हसारखं ते दिसत होतं . पण यात करोडो रुपयांचे बिटकॉईन साठवू शकतो हे सांगूनही एखाद्या नवख्या माणसाला खरं वाटलं नसतं. त्यात लहानशी स्क्रीन आणि बाजूला दोन बटणे होती. केवळ या दोन बटनांच्या साहाय्याने ते डिव्हाईस वापरता येत होते . मेघनादने ते डिव्हाईस लॅपटॉपला कनेक्ट केलं , त्या डिव्हाईस मधून लगेच वेलकम असा मेसेज आला . आणि पाठोपाठ आठ आकडी पीन टाकण्याचा मेसेज छोट्याशा स्क्रीनवर दिसला . लॅपटॉपशी कनेक्टेड असलेलं ते लहानसं डिव्हाईस हातात घेऊन त्याने आठ आकडी पिन टाकला . आणि एक्स्चेंजवर सध्याच्या कमी किमतीला विकत घेतलेले बिटकॉईन त्यात असलेल्या बिटकॉईनच्या अल्फानुमेरिक वॉलेट ऍड्रेसवर पाठवले . त्याने एकदा ते वॉलेट अड्रेस उघडून त्यात बिटकॉईन साठवलेले आहेत ना , याची खात्री केली. त्याचं समाधान झालं . त्याने ते लेजर नॅनो एस डिव्हाईस लॅपटॉपला लावलेल्या वायर पासून डिस्कनेक्ट केलं . ताबडतोब त्याची स्क्रीन बंद झाली .
" अरे , हे तर लगेच बंद झालं ! ", रागिणीने आश्चर्याने विचारलं .
" हीच तर खासियत आहे या डिव्हाईसची ! हे फक्त एक माध्यम आहे , ॲक्चुली यात जो डाटा भरला तो सगळा डाटा ब्लॉकचेनवर सेव्ह होतो , त्यामुळे त्यात फेरफार करता येत नाही. आपले बिटकॉइन आता यात सेफ आहेत. अभिनंदन ! आता आपण जवळपास ९०० करोड रुपयांचे मालक झालोत ! " , असं म्हणून त्याने तिला मिठी मारली. रागिणीही आनंदाने त्याच्या मिठीत विसावली.
" आता पुढे काय ? आता हे कोल्ड वॉलेट पोलिसांच्या हातात कसे पडेल याचा विचार करायला हवा. " , ती म्हणाली .
" होय , त्याचीही व्यवस्था करून ठेवली आहे . " , मेघनाद म्हणाला. असं म्हणत मेघनादने आपला दुसरा मोबाईल काढला आणि फोन लावला आणि फक्त एवढंच म्हणाला , " डिकोड नाऊ ! "
₿₿₿
जयसिंग ज्या अवस्थेत खासदार साहेबांच्या बंगल्याच्या आत गेला होता , त्यापेक्षाही खालावलेल्या अवस्थेत तो बाहेर आला . त्याला सगळीकडे अंधार झाल्यासारखा दिसू लागला. त्याचं डोकंच काम करेनासं झालं . त्याच्या एका चुकीमुळे त्याचे मेहुणे खासदार प्रतापराव बोडके पाटलांची मिडियामध्ये बातमी दिसू लागली. सगळीकडून त्यांच्यावर आरोप होऊ लागले . त्यांची खूप बदनामी झाली . हे थोडं की काय म्हणून त्यांना आता त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता. इतक्या मेहनतीने , आणि अनेक वर्षांच्या निष्ठेने आणि तपश्र्चर्येने त्यांनी खासदारकीचं तिकीट मिळवलं , आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं , खासदार म्हणून निवडून आले. पण आपल्या क्षुल्लक चुकीमुळे त्यांची खासदारकी जाणार, ह्या विचारानेच जयसिंगच्या अंगातलं बळ नाहीसं झाल्यासारखं वाटू लागलं . तो बाहेर आला गेटपाशी झिपऱ्या बसला होता , जयसिंगला पाहून आत काय घडलं असावं याचा अंदाज त्याला आला .
" मालक , काय झालं ? एव्हढा चेहरा पाडून का आलाय ? " , बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडत झिपऱ्याने विचारलं . जयसिंग काहीच बोलला नाही , नुसता शून्यात बघत , पाय ओढत चालू लागला. " मालक , काय झालं ते सांगा की , असं गप गप राहू नका ."
" वाट लागली सगळी , माझ्यामुळं … प्रतापरावांची बदनामी झाली ती झालीच ! पण आता त्यांच्या खासदारकीचा बी प्रॉब्लेम झालाय माझ्यामुळं … आता काय करावं तेच कळना … " , जयसिंग नकारार्थी मान हलवत म्हणाला .
" तुमच्यामुळं कसं काय ? एवढं काय केलंय आपण ? " , झिपऱ्याने विचारलं .
" आता एवढं रामायण घडलं आन तू विचार सीता रामाची कोन ते ! " , जयसिंग वैतागला.
" पन मालक सगळा दोष तुमचा नाय … मला एक खबर मिळालीय … " , एखादं गुपित सांगावं अशा आवाजात झिपऱ्या जयसिंगला म्हणाला.
" काय ? कसली खबर ? "
" आवो , खासदार साहेबांनी खरोखरच बिटकॉइन मध्ये पैशे टाकल्यात . " , झिपऱ्याने गौप्यस्फोट केला .
" तू काय बोलतुया , तुझं तुला तरी कळतंय का ? " , जयसिंग वैतागला .
" मालक , विश्वास ठेवा माझ्यावर , तुम्ही आत गेला तेव्हा साहेबांचा पी ए बाहेर येऊन हळू आवाजात फोनवर कुणाशी तरी बोलत होता , ते ऐकलं मी … "
" काय बोलत होता पी ए ? "
" साहेबांचे 200 करोड बिटकॉईनमध्ये आहेत , पण त्यांच्या मेहुण्यामुळे सगळा गोंधळ झाला . बघा काहीतरी मार्ग काढा… , असं ते कुनाला तरी बारीक आवाजात सांगत होते . ते मी हळूच ऐकलं . " झिपऱ्या गुपित सांगावं तसं म्हणाला.
" काय सांगतोस काय ? खरं हाय का हे पन ? " , जयसिंगने पुन्हा खात्री केली .
" आयची आन मालक , मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलं . "
जयसिंगने ते ऐकलं आणि नुसता वेड्यासारखा हसत सुटला ….
क्रमशः
व्वा! खासदारांचे पण २०० करोड
व्वा! खासदारांचे पण २०० करोड बिटकॉईन मध्ये?
मस्त ट्विस्ट.
त्या रागिणीला काहीच टेक्निकल कळत नाही असं दिसतंय.
मस्त सुरु आहे कथा.
मस्त सुरु आहे कथा.
मेघनाद हाच ओमी असायची शक्यता वाटतेय.
भाग खुपच लहान आहेत.