क्रिप्टो ( crypto ) भाग- २१

Submitted by मिलिंद महांगडे on 18 June, 2022 - 15:03

₿₿₿

वकील मेघनाद निशाणदारची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मध्ये काही दिवस गेले. आपली चौकशी होणार याची मेघनादला कल्पना होती , व्यवसायाने वकील असल्याने त्याने संभाव्य प्रश्नांची तयारी करून ठेवली होती. या चौकशीच्या निमित्ताने त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती , कि पोलिसांचा त्याच्यावर आणि रागिणीवर अशा दोघांवरही संशय आहे. त्याला मनातून हायसं वाटलं होतं. हा त्याच्या प्लॅनचा भाग होता. आतापर्यंत तरी त्याच्या प्लॅननुसार सुरु होतं. रागिणी मात्र एकटी नियमितपणे पोलिसांच्या चौकशीला सामोरी जात होती. तिच्या या धीराचं कौतुक करावं तितकं कमी होतं. पण तिलाही मर्यादा होत्या. ती जास्त काळ हे चौकशी प्रकरण सहन करू शकेल का याबाबत आता त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. आता लवकरच काहीतरी करणं गरजेचं होतं , परंतु त्याला हवी तशी मार्केटची स्थिती अजून तयार झाली नव्हती. तो रागिणीच्या घरी काही कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी आला होता. बरीच गहन चर्चा झाल्यावर दोघेही बिछान्यात पडले होते.
“ अजून किती दिवस लागतील मेघ ?? ”, तिने वर सिलिंग फॅनकडे बघत विचारलं.
“ थोडेच दिवस ! अजून आपल्याला हवी तशी योग्य परिस्थिती तयार झाली नाही. ”, मेघनाद तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला.
“ पोलिसांच्या चौकशीचा वैताग आलाय मला. ”, ती कसनुसं तोंड करीत म्हणाली.
" मला माहित आहे , पण फक्त थोडा वेळ राणी ! त्यानंतर तुला काहीही करायची गरज नाही. तसं तर आपण आताही या सगळ्याचा शेवट करू शकतो , पण मग आपल्याला हवं तसं आयुष्य जगता येणार नाही. ", मेघनाद म्हणाला.
“ ठीक आहे , पण मला कधी एकटीला सोडून जाऊ नकोस … ” ,असं म्हणत ती त्याच्या कुशीत शिरली.
“ वेडी आहेस का ? मी कशाला जाईन तुला सोडून … काहीही विचार करत असतेस. ”, असं म्हणून मेघनादने तिला मिठीत घेतलं. इतक्यात रागिणीच्या मोबाईलची रिंग वाजली. त्या शांत वातावरणात ती रिंग केवढ्यातरी मोठ्या आवाजात वाजली , रागिणी त्या आवाजाने दचकली.
“ या वेळेला कोण फोन करत असेल ? ”, तिने मोबाईल पाहिला , अननोन नंबर होता. तिने मोबाईल सायलेंट करून तसाच ठेऊन दिला. थोडा वेळ होतो न होतो तोच पुन्हा जोराने रिंग वाजली. तोच नंबर मोबाईलवर दिसला . इतक्या घाईत कोण फोन करत असेल ?
“ फोन घे … ”, मेघनाद म्हणाला. तिने नाखुशीने नकार दिला , पण मेघनादने तिला फोन घेण्याबद्दल खुनावलं . तिने फोन रिसिव्ह केला.
“ मिशेस रागिणी बोलतायत का ? ”, पलीकडून जड पुरुषी आवाजात कोणीतरी बोलत होतं.
“ हो बोलतेय , आपण कोण ? ”, तिने काहींशा संशयाने विचारलं.
“ मी कोण ? इतक्यात विसरलीस मला ? ”, पलीकडून बोलणारा नशेत असल्यासारखा वाटत होता.
“ हे बघा , नीट काय ते बोला . ”, रागिणी सावध होत म्हणाली. का कुणास ठाऊक तिला त्या आवाजाची भीती वाटली .
“ मी ओमी बोलतोय … विसरलीस काय ? ” , पलीकडून हे ऐकल्यावर रागिणीच्या हातातला मोबाईल खाली पडला. ती मेघनादकडे भयचकित नजरेने पाहू लागली. पुन्हा फोन तिने आपल्या कानाशी लावला.
“ हि मस्करी करायची वेळ नाही . कोण बोलतंय ? ”, ती जरा आवाज चढवत म्हणाली.
“ तुझा नवरा बोलतोय … ओमी मिरचंदानी ! माझे पैसे परत पायजेल मला … ”, पलीकडून बरळल्यासारखा आवाज येत होता. रागिणीने घाबरून फोन कट केला. ‘ काय झालं ? ’ मेघनादने खुणेने विचारलं.
“ फोनवर कुणीतरी प्यायलेला होता. म्हणत होता तो ओमी बोलतोय म्हणून ! ”, रागिणी गोंधळली होती. ती हे बोलत असताना पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला. तिने वैतागून फोन कट केला.
“ एक मिनिट ! घाबरू नको , कोणीतरी मस्करी करत असेल . आता पुन्हा फोन आला तर घे फोन , आणि स्पीकरवर ठेव ! मला पण ऐकायचं आहे. आणि तो समोरचा जर प्यायलेला असेल तर त्याला थोडं उकसवण्याचा प्रयत्न कर , त्याची ओळख तो स्वतःच देईल … ”, मेघनाद तिला धीर देत म्हणाला. तेवढ्यात पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला. मेघनादने खूण केली. तिने घाबरत फोन उचलला आणि स्पीकर ऑन केला.
“ ए sss , आपला फोन कट करायचा नाय …तुला सांगून ठेवतोय … आपले पैशे परत पायजेल आपल्याला … ”, पलीकडून धमकी आली.
“ कोण बोलतंय ? नाव सांगा … नाहीतर मी पोलिसांना बोलावीन. ”, रागिणी उसणं अवसान आणत म्हणाली. मेघनाद तिला मूकपणे धीर देत होता.
“ पोलीस ? ”, असं म्हणून पलीकडचा माणूस हसायला लागला. , “ पोलीस आपलं कायपण वाकडं करनार नाय … सांग कुणाला सांगायचंय ते ! ”
“ अस्सं ! असा कोण आहेस तू ? मला पण कळू दे जरा ! ”, रागिणी त्याला उकसवण्याचा प्रयत्न करीत होती.
“ तुला बऱ्या बोलानं सांगतोय … मी काय कुणी असा तसा माणूस नाय … ”, पलीकडून बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच रागिणीने त्याला मधेच तोडलं.
“ ए , शहाण्या ! खूप बघितलेत तुझ्यासारखे. हिम्मत असेल तर नाव सांग … ”
“ माझी हिम्मत बघायचीय तुला ? ” , पलीकडचा इरेला पेटला .
" हिम्मत असती तर भेकडासारखा फोन करून एका बाईला उगाच त्रास नसता दिलास . हिम्मत असेल तर तुझं नाव सांग आणि समोर ये … " , रागिणीही चिडली होती .
" साली , तू असं नाय ऐकनार … " , असं म्हणून फोन कट झाला .
" हॅलो … हॅलो … " रागिणी बोलत होती पण तोपर्यंत फोन कट झाला होता. तिला आता थोडं हायसं वाटलं . तिने मेघनादकडे बघितलं , तर तो कसल्यातरी विचारात असल्यासारखा दिसत होता. थोडा वेळ शांततेत पार पडला असेल , अचानक खळ्ळ असा जोराचा आवाज झाला , दोघांनी दचकून खिडकीच्या दिशेने पाहिलं , एक दगड खिडकीची काच फोडून आत आला होता. रागिणी खूपच घाबरली हा प्रकार पाहून . मेघनादला खरं तर ह्या प्रकाराचा खूप राग आला होता , तो उठून बाहेर जाऊन पाहणार इतक्यात त्याने स्वतःला सावरलं. ह्यावेळी अपरात्री वकील मेघनाद रागिणीच्या घरी कसा ? उगाच लोकांना चघळायला विषय मिळायचा ! तो तसाच बसून राहिला आणि रागिणीला धीर देऊ लागला. इतक्यात पुन्हा रागिणीचा फोन वाजला . तोच नंबर होता , मेघनादने फोन घेण्याबाबत तिला खुणावलं . रागिणीने घाबरत तो फोन घेतला.
" हॅलो , आता कसं वाटतंय ? आली का मज्जा ! " , पलीकडून आवाज आला.
" तुला काय पाहिजे ? ", रागिणीने विचारलं .
" तुला एकदा सांगून कळत नाय काय ? मला माझे पैसे पाहिजेत. "
" किती पैसे आहेत तुझे ? "
" वीस करोड …माझे 20 करोड मला परत पाहिजेत. आता फक्त काच फोडलिय , उद्या डोकं फोडीन तुझं खासदार बोडके पाटलांचा माणूस हाय मी ! समजलं का ! ", पलीकडचा माणूस दारूच्या नशेत एक चुकीचं वाक्य बोलून गेला. ' ठीक आहे ' म्हणून रागिणीने फोन ठेवला. इकडे मेघनादला झाल्या प्रकारामुळे आधी त्या फोन करणाऱ्या माणसाचा राग आला होता , पण तो आता आनंदाने नाचू लागला.
" मेघनाद, तुला झालंय काय ? अरे , एका माथेफिरूने आपल्याला मारण्याची धमकी दिलीय , दगड फेकून मारलाय आपल्याला , आणि तू आनंदात आहेस ? " , रागिणी वैतागून म्हणाली.
" वाईटातूनही कधी कधी चांगलं होतं ते असं ! " , मेघनाद म्हणाला .
" म्हणजे ? मला समजलं नाही . "
" आता ह्या एका दगडात मी दोन पक्षी कसे मारतो ते बघ ! " , रागिणीच्या घराच्या खिडकीची काच फोडून आत आलेला तो दगड उचलत मेघनाद म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर निराळीच चमक दिसत होती.

₿₿₿.

ब्रेकिंग न्यूज
आत्ताची ह्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ! खासदार बोडकेपाटील यांची बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक ! आमच्या गोपनीय सूत्रांकडून अशी बातमी मिळालीय की खासदार बोडके पाटील यांनी तब्बल 20 कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले आहेत. एकीकडे भारतात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केली आहे , तरीही खासदार साहेबांनी एवढी मोठी रक्कम बिटकॉईनमध्ये कशी काय गुंतवली ? ह्यामागे खूप मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. कारण खासदार बोडके पाटील यांच्याकडे बिटकॉइनमध्ये गुंतवण्यासाठी एवढे २० करोड कुठून आले ? हा संशोधनाचा विषय आहे .
बातम्या सांगणारी अँकर जोरजोरात ओरडुन ही बातमी सांगत होती. हळूहळू सर्वच मीडियावर ही बातमी दिसू लागली . न्युजवर काम करणारे रिपोर्टर विरोधी पक्षातल्या वेगवेगळ्या आमदार - खासदारांना या न्युज बाबत विचारू लागले. अमर आणि वाघचौरे साहेब त्यांच्या केबिनमध्ये बसले होते , आणि न्युज चॅनलला ही बातमी लागली .
" खासदार बोडके पाटील यांनी बिटकॉईन खरेदी केले , तुम्ही म्हणताय त्यांनी २० करोड त्यात गुंतवले आहेत , आहो त्यांच्याकडे कुठून आले हे पैसे ? हा जनतेचा पैसा आहे , तो त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापरलाय . " , विरोधी पक्षातील एक नेता म्हणाला.
" मला तर वाटतंय की हे प्रकरण म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे , खासदार साहेबांची सीबीआय चौकशी व्हायला हवी , आणखी अशी बरीच प्रकरणे बाहेर येतील.", दुसरा नेता म्हणाला.
" अरे ,बाप रे ! साहेब , हे बघा ! " , म्हणत अमरने टीव्हीचा आवाज वाढवला .
" आपले राजकारणी भलतेच पुढारलेले आहेत . बिटकॉईनमध्ये गुंतवणुक ! वा ! " , वाघचौरे साहेब टीव्ही बघत म्हणाले.
" पण साहेब न्यूजमध्ये सांगतायत की त्यांनी ओमी मिरचंदानीच्या एक्चेंजमध्ये बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले होते . हे बघा, न्यूज अँकर सांगतेय ." अमरने हे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला . ते लक्ष देऊन बातम्या ऐकू लागले .
न्यूज सांगणारी अँकर म्हणत होती , आमच्या खास सूत्रांकडून ही बातमी मिळालीय की खासदार बोडकेपाटील यांनी ओमी मिरचंदानीच्या एक्स्चेंजमधून बिटकॉईन खरेदी केले आहेत . एवढी मोठी रक्कम त्यांनी बिटकॉईनमध्ये गुंतवली आहे . त्यात ओमी मिरचंदानीचा अकस्मात मृत्यू झालाय . ओमी मिरचंदानी यांच्या अकस्मात मृत्यूमध्ये कुठेतरी पाणी मुरतंय अशी शंका येत आहे, संशयाची सुई खासदार साहेबांवरही जाणार यात शंका नाही .
" आयला , ह्या मिडियावाल्यांकडेच तपास द्यायला पाहिजे , काहीही बोलतात राव हे ! ही केस काय कमी होती , ते आता हे खासदार महाशय यात आले . " वाघचौरे साहेबांनी डोक्याला हात लावला .
" भलतंच होऊन बसलंय हे सर … आधी सोपी वाटत होती केस , पण आता ह्यात खूपच गुंतागुंत झाली आहे . " , अमर म्हणाला .
" मला काय नीट रिटायर होऊ देत नाही तुम्ही ! " , वाघचौरे साहेब नकारार्थी मान हलवत म्हणाले . इतक्यात न्यूज चॅनलवर खासदार बोडकेपाटील त्यांच्या राहत्या बंगल्याच्या बाहेर त्यांच्या गाडीमध्ये बसताना त्यांना टीव्ही चॅनल्सच्या रिपोर्ट्सने गराडा घातला . आणि त्यांना प्रश्न विचारू लागले .
" माझा आणि त्या बिटकॉईनचा काडीचाही संबंध नाही . बिटकॉइन कसला कॉइन आहे हे मला माहीतही नाही. मी बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आहेत , याचा कोणताही पुरावा नाही . मला बदनाम करण्याचा विरोधी पक्षाचा डाव आहे . मी बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवल्याचा पुरावा द्या , मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन . बाकी नो कमेंट्स … " असं घाईघाईने बोलून ते गाडीत बसले आणि निघून गेले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भलताच ट्विस्ट दिलाय की.!
फक्त मध्येच TV सीरियल सारखं उप कथानक जोडू नका (ही विनन्ती).
बाकी कथा मस्त चाललीय.