क्रिप्टो ( Crypto ) भाग - १५

Submitted by मिलिंद महांगडे on 2 June, 2022 - 09:07

₿₿₿

जयसिंग निराश होऊन पुन्हा घरी आला . टोनीकडून काहीतरी माहिती मिळेल ह्या आशेने तो गेला होता . पण आता त्याचा काहीच उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आलं . त्याने बिटकॉईनमध्ये मिळवलेला स्वतःचा पैसा पुन्हा बिटकॉईन मधेच गुंतवला होता आणि आता ते एक्सचेंज बंद पडल्याने त्याचे कमावलेले पैसेही गेले होते . पण जयसिंगची अवस्था त्याच्याहूनही वाईट होती , एकतर त्याच्या खासदार मेहुण्यांकडून उसणे घेतलेले पैसे त्याने बिटकॉईन मध्ये गुंतवले होते . वीस करोड ही काही साधी सुधी रक्कम नव्हती . एवढे पैसे त्याने त्याच्या जन्मात पाहिले नव्हते , एका झटक्यात ते आले आणि तसेच गेले . आपल्याला पैशांची हाव खूप होती आणि त्यापेक्षा शॉर्टकट वापरून पैसे मिळवावेत अशी ईच्छा होती , पण पैसे असे सहज मिळत असते तर आणखी काय पाहिजे होतं . असा विचार करत तो घरात आला . त्याचा उतरलेला चेहरा बघून यमुनेला काहीतरी नक्की झालंय याचा अंदाज आला . आज काय ते जाणून घ्यायचंच असं तिने मनाशी पक्कं केलं . जयसिंग वैतागून सोफ्यावर बसला . समोर टीव्ही चालू होता . बातम्या सुरू होत्या.
" क्रिप्टो कॉइन एक्स ह्या कंपनीचे मालक श्री ओमी मिरचंदानी यांच्या दुःखद निधनानंतर त्यांची कंपनी सध्या बंद आहे . आमचे संवाददाता काही लोकांसोबत आहेत थेट जाऊया , " बातम्या देणारी तरुण रिपोर्टर बोलत होती . जयसिंगने ती बातमी बघितली आणि तो लक्ष देऊन ती बातमी ऐकू लागला . त्याने टीव्हीचा आवाज मोठा केला , इतका की आवाज खूप वाढलाय हे त्याच्या ध्यानीही आले नाही . यमुनेने त्याला आवाज कमी करा असं सांगितलं तरी त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही . यमुनाही मग ती बातमी ऐकू लागली . तो संवाददाता दहा बारा लोकांच्या घोळक्यात उभा होता , तो आता बोलू लागला ,
" धन्यवाद , मी आता उभा आहे क्रिप्टो कॉइन एक्स कंपनीच्या बंद ऑफिस जवळ , तुम्ही आता ही बिल्डिंग पाहताय त्याच्या नवव्या मजल्यावर हे ऑफिस आहे . जे काही दिवसांपूर्वी सील करण्यात आलं होतं . ह्या कंपनीचे मालक ओमी मिरचंदानी हे अचानक मरण पावल्याने तात्पुरते हे एक्सचेंज बंद करण्यात आलं आहे . तुम्हाला काय वाटतं , तुम्ही गुंतवले होते का पैसे ? " बाजूला उभ्या असलेल्या एका तरुणाला त्याने विचारलं.
" हा , मी टाकले होते पैसे …. पन आता ते गेले असं वाटतंय … " तो तरुण गोंधळून कधी त्या रिपोर्टरकडे तर कधी कमेऱ्याकडे बघत म्हणाला.
" किती गुंतवले होते पैसे तुम्ही ? "
" तशे तर मी पन्नास हजार टाकले होते बिटकॉईन मधी . पन पन्नास हजार ही रक्कम माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी जास्त आहे . आता हे एक्सचेंज बंद केलंय कधी सुरू होईल आणि आमचे अडकलेले पैशे कधी भेटतील देवालाच ठाऊक ! " तो तरुण निराशेने म्हणाला .
" तुमचं म्हणणं अगदी खरं आहे , सामान्य माणसासाठी पन्नास हजार ही रक्कम सुद्धा खूप मोठी असते . आपण ह्या काकांना विचारू तुम्ही किती गुंतवले होते पैसे ? ” एका मध्यमवयीन इसमासमोर माईक धरत रिपोर्टर विचारू लागला.
“ काय सांगू तुम्हाला ,माझ्या आयुष्यभराची कमाई मी ह्यात टाकली … वाटलं जरा पैसे आले तर मुलाचं शिक्षण आणि मुलीच्या लग्नासाठी कामाला असते , पण आता तर सगळंच संपलं… ”, रडवेला चेहरा करून तो माणूस सांगू लागला.
“ काही लोकांची आयुष्यभराची कमाई गेली आहे. ह्यापेक्षा आणखी वाईट ते काय असू शकतं… मला सांगा तुम्ही किती गुंतवले होते पैसे ? ” , रिपोर्टर आणखी एका तरुणा समोर जाऊन उभा राहिला.
“ मी ? मी नाय गुंतवले बाबा असल्या लफड्यात ... ”, तो पाल झटकल्यासारखं म्हणाला.
“ मग तुम्ही कशाला आले आहात इथे ? ”
“ मी माझ्या मित्राबरोबर आलोय , त्याने टाकलेत पैसे … ” ते ऐकल्यावर बाजूला उभा असलेल्या मित्राकडे रिपोर्टर वळला.
“ माझ्या दुसऱ्या एका मित्राने सांगितले टाक पैसे म्हणून मी टाकले, तो म्हणाला दोन महिन्यात डबल होतील म्हणून नातेवाईकांकडून उसने घेऊन टाकले पैसे . आता काय करणार… ”
“ मग आता तुमचं काय म्हणणं आहे ? ”
“ मला तर वाटतं की तो मिरचंदानी कि कोण तो तर मेला , आता काही दिवस त्यावर चर्चा होईल आणि मग सगळं शांत होईल . मग बाकीचे जातील पळून… त्यांचं काही वाकडं होणार नाही. ” , तो तरुण तावातावाने म्हणाला.
“ एक वेगळाच मुद्दा ह्यांनी उपस्थित केलाय पण असं तुम्हाला का वाटतं ? ” रिपोर्टरने माईक त्या तरुणाच्या तोंडासमोर धरला.
“आपल्याकडे फ्रॉड करणाऱ्यांची संख्या जास्त आहे , त्यांना पकडले जाणार असं कळलं की पळून जातात परदेशात . मग त्यांना कोणीच हात लावू शकत नाही , मला हा सुद्धा असलाच प्रकार वाटतोय आपल्याकडे असले फ्रॉड आधी सुद्धा झाले आहेत. आणि फ्रॉड करणारे पळून सुद्धा गेले आहेत… ”
“ तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे , त्यांची पत्नी श्रीमती रागिणी ह्यांची चौकशी सुरु आहे. ”
“ मी आपली एक शक्यता बोलून दाखवली . पण मग त्यांनी आजून पर्यंत एक्सचेंज चालू का केलं नाही ? ”
“ अगदी योग्य मुद्दा यांनी इथे मांडला आहे , कि अजून ते एक्स्चेंज पूर्ववत सुरु का झालं नाही … ”
“ बिटकॉइन ज्या वॉलेट मध्ये ठेवलेत , त्याचा पासवर्ड म्हणे फक्त त्या मिरचंदानीलाच माहीत होता , आता तो मेला तर आमच्या पैशांचं काय ? सरकारने ह्याच्यात लक्ष घालून काहीतरी मार्ग काढला पाहिजे . ”, गर्दीतून आणखी कोणीतरी म्हणालं. तो म्हणाला तसं आणखी दोन तीन जण तावातावत बोलायला लागले. गोंधळ सुरु झाला. रिपोर्टरने आपले प्रश्न आवरते घेतले. त्यानंतर स्टुडिओ मध्ये बातम्या देणारी तरुण रिपोर्टर बोलू लागली. , “ बहुतेक आमचा संपर्क होत नाहीये . तर आपण बघू शकता कि कितीतरी लोकांचे पैसे बिटकॉइन मध्ये गुंतवल्याने अडकून पडले आहेत. ह्या एक्सचेंजचे मालक ओमी मिरचंदानी ह्यांनी सर्व बिटकॉईन एका इंटरनेटशी संपर्क नसलेल्या एका डिजिटल स्टोरेज डिव्हाईस - कोल्ड वॉलेट म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं झालं तर एका पेन ड्राईव्ह सारख्या डिव्हाईस मध्ये ते स्टोअर करून ठेवले. त्याचा पासवर्ड फक्त मिरचंदानी यांनाच माहीत होतं . त्यांचे हे कृत्य अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे. एवढ्या लोकांचे पैसे त्यांनी अशा प्रकारे का ठेवले हा खरं तर एक प्रश्नच आहे . हे एक्स्चेंज कधी सुरु होईल , सांगता येत नाही , पण ह्या सगळ्यात सामान्य लोकांचे हाल होतायत हे मात्र नक्की ! ” हे बोलून ती बातम्या सांगणारी रिपोर्टर दुसऱ्या बातमीकडे वळली. जयसिंगने वैतागून टीव्ही बंद करून टाकला , आणि तो डोक्याला हात लावून सोफ्यावर आणखी रेलून बसला . त्याच्या अशा वागण्याचा अर्थ यमुनाच काय पण दुसऱ्या कुणालाही काढता आला असता . यमुना काय समजायचं ते समजून गेली . पण आता विषय कसा काढायचा ? काय झालंय ह्याचा थोडासा अंदाज तिला आला , पण नक्की काय ते तिला जाणून घ्यायचं होतं . तिने थोडा वेळ जाऊ दिला . मग हळूच विचारलं .
" जेवायला काय करू ? " आधी तर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. नुसता सोफ्यावर पडून होता . मग तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
" काहीही कर , तुला जे वाटंल ते … "
" का हो , काय झालंय ? आल्यापासून बघतेय , एकदम गप्प गप्प आहात … काय झालंय सांगा ना मला "
" काही नाही ग , जरा डोकं दुखतंय म्हणून बसतोय ." , तो तिची नजर टाळत म्हणाला .
" अगं बाई , मग डोकं दाबून देऊ का ? "
" नको , मला बसू दे जरा शांत " त्याने संभाषण तोडलं. आता पुढे कसं विचारावं ह्याचा तिला प्रश्न पडला. पण असं गोल गोल फिरून काही फायदा नाही . जे काय आहे ते सरळ विचारावं असं तिला वाटू लागलं . तिने मनाशी ठरवलं .
" एक विचारू का ? आपल्या रिसॉर्टचं काम कुठवर आलंय ? " तिने थेट विचारलं . तो काहीच बोलला नाही. " काय झालंय मला सांगाल का ? तुम्ही लय टेन्शन मधी दिसताय , प्लिज काय झालंय ते सांगा … तुम्हाला माझी शपथ आहे … " यमुना कळवळून म्हणाली . आता मात्र जयसिंग उठून बसला , आणि ओंजळीत तोंड लपवून रडू लागला . " आहो , काय झालं ? तुम्ही असं का रडताय ? सांगा मला ,काय झालं ? "
" यमुने , आपले सगळे पैसे बुडाले ग … मी 20 करोड रुपये बिटकॉईन मधी टाकले दोन महिन्यांनी डबल होणार होते ,पण ती कंपनी बंद झाली आणि आता ते सगळे पैसे गेले … " असं म्हणून तो हमसून हमसून रडू लागला . लोखंडी खांब डोक्यावर पडावा तसं यमुनेला झालं . काही क्षणांसाठी तीही स्तब्ध झाली . तिलाही काही सुचेना. उसणे घेतलेले वीस करोड रुपये बुडाले ? अरे देवा ! जे रुपये कधी स्वप्नात पण कमवू शकत नव्हतो , तेवढ्या रुपयांचं कर्ज होऊन बसलं . आता काय करायचं ? सर्वत्र अंधार दिसू लागला . पण कधी कधी संकट एवढं मोठं असतं की त्याचा सामना करणं आपल्या आवाख्या बाहेरचं असतं त्यावेळी जे होईल ते बघून घेऊ अशी मानसिकता तयार होते. कदाचित त्यावेळी यमुनेला असंच काहीसं वाटलं असावं . जयसिंगला इतकं हतबल झालेलं तिने यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं . तिने लगेच स्वतः ला सावरलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अन म्हणाली , " काही काळजी करू नका , होईल सगळं नीट , मिळतील पैसे… " तिने त्याला दिलासा दिला. शब्दाचा आधार किती मोठा असतो ह्याचा त्यावेळी जयसिंगला प्रत्यय आला. तो तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला . तिने डोळ्यांनी त्याला दिलासा दिला. जयसिंगने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं … तिने त्याच्या केसांतून हात फिरवला . त्याला आता बरं वाटू लागलं होतं .

क्रमशः

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

Group content visibility: 
Public - accessible to all site users