क्रिप्टो (Crypto ) - भाग - ३

Submitted by मिलिंद महांगडे on 22 May, 2022 - 05:59

₿₿₿

सिटी हॉस्पिटलच्या डिलक्स एसी प्रायव्हेट रुममध्ये जयसिंग बेडवर आडवा पडला होता. त्याच्या बाजूला सलाईनचा स्टॅन्ड होता आणि त्याला सलाईनची बॉटल लटकवलेली होती. त्यातून टपटप थेंब पडत होते. त्याची बायको बाजूला बसली होती आणि मधून मधून डोळ्यांना पदर लावत होती . दरवाज्याबाहेर झिपऱ्या तोंडावर मास्क लावून बसला होता. तोही चिंतेत होता . कारण त्यानेच जयसिंगाला बातम्या बघण्याचा सल्ला दिला होता. आता जयसिंगच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ? तो स्वतःच्या कपाळावर मारून घेऊ लागला. इतक्यात त्याला लांबून सुहासिनी ताईसाहेब येताना दिसल्या. त्यांना बघून तर तो आणखीनच घाबरला. त्याच्या पायाला मुंग्या आल्यासारख्या वाटल्या. तो आपोआप आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. त्या शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होत्या. त्यांच्या सोबत एक सफारी घातलेला आणि गॉगल लावलेला बॉडीगार्ड सुद्धा होता . झिपऱ्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता . कसंबसं त्याने सुहासिनी ताईंना हाक मारली. त्या घाईघाईत त्याच्याकडे आल्या.
“ जयसिंग कुठे आहे ? ”, त्यांनी काळजीत विचारलं.
“ ताईसाहेब न… नमस्कार … इकडं आतल्या खोलीत … ” तो कसंतरी एवढंच बोलू शकला. बॉडीगार्ड बाहेरच थांबला. सुहासिनी ताई घाईघाईत आत गेल्या. आत गेल्या गेल्या जयसिंगच्या बायकोचा हुंदका झिपऱ्याच्या कानी आला. सुहासिनी ताई तिला समजावू लागल्या . ह्या गोंधळामुळे जयसिंगाला जाग आली . ताईकडे बघून त्याला प्रचंड टेन्शन आलं. त्याचा श्वास चढला.
“ जयसिंग , काय करून घेतलंस हे ? तरी मी तूला सांगत होते , तब्येतीची काळजी घेत जा म्हणून ! ”, त्या भावाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. जयसिंगाला आता रडू आलं. “ बास ! रडू नको आता . कसं वाटतंय ? डॉक्टर काय म्हणाले ? ”
“ स्ट्रेस आलाय म्हनले. थोडे दिवस आराम करायला सांगितलंय . ” जयसिंग म्हणाला.
“ तरी मी जीव तोडून सांगत होते , कि उगा बाहेर जास्त फिरू नका , फिरू नका …, तर मागच्या आठवड्यात दोन तीन दिवस कुठेतरी बाहेर गेले होते. तवापासनं तब्येत बिघडलीय. ” , जयसिंगची बायको , यमुना तक्रारीच्या सुरात म्हणाली.
" कुठं गेला होतास रे ? अरे बाबा, बाहेर कोरोना आहे …. कशाला बाहेर गेला होतास ? ” सुहासिनीताई विचारू लागल्या.
“ अगं ताई , तू काय ऐकतीस तिचं ! तिला काय कळतंय ? ” , जयसिंग बायकोवर वैतागला.
" तर … तर … आणि तुला खूप कळतंय व्हय रे ! तिला काळजी वाटणार नाय का ? आता गपचूप तिचं ऐकायचं . ती सांगेल तसंच वागायचं … कळालं का ? " ताई साहेबांनी जयसिंगला चांगलाच दम दिला . जयसिंगला ते मान्य करावंच लागलं . सुहासिनी ताईसाहेब म्हणजे खासदार प्रतापराव बोडकेपाटील ह्यांच्या सुविद्य पत्नी आणि जयसिंगची सख्खी मोठी बहीण . जयसिंग जगात फक्त दोनच माणसांचं म्हणणं मनावर घेत असे , ते म्हणजे प्रतापराव आणि सुहासिनी ताई !
" साहेब बरे आहेत ना ? कुठं आहेत ? " , जयसिंगने हळू आवाजात विचारलं .
" ते दिल्लीला गेलेत . पक्षाची कसली तरी मिटिंग आहे , म्हणून गेलेत . येतील तीन चार दिवसांनी . " ताई साहेब म्हणाल्या .
“ बरं झालं … ” , साहेब इथं नाहीत हे ऐकून का कुणास ठाऊक पण जयसिंगला बरं वाटलं .
“ का रे ? असं का म्हणतोस ? ”
“ अगं , त्यांची उगाच धावपळ झाली असती ना , म्हणून म्हणालो ”, जयसिंगने वेळ मारून नेली. " बरं ,ते जाऊ दे , अनुसया कशी आहे ? कॉलेजला जाते का नाई? " जयसिंगने विचारलं .
" तिचं काय , ऑनलाइन कॉलेज चालू आहे . मी पण येते म्हणाली मामाला बघायला . "
"अहो मग आनायची ना तिला … " जयसिंगची बायको म्हणाली .
" अगं , पुढच्या आठवड्यात कसलीशी ऑनलाईन परीक्षा आहे , आता शेवटच्या वर्षाला आहे ना , म्हणून म्हणलं अभ्यासावर लक्ष दे … "
" हो , बरोबरे . तिला सांग मी बरा आहे आता . " जयसिंग म्हणाला .
" हो सांगते . आणि जयसिंग, कामासाठी एवढं जीवाचं हाल करणं बरं नाही . काम तर काय होतंच राहतात . आपला जीव महत्वाचा , काय ? बाकी , तुझं काम नीट चालू आहे ना ? " सुहासिनी ताईसाहेबांनी काळजीने विचारलं .
" हो … काम चालू आहे की नीट . त्याची काय काळजी नाय … " जयसिंग सुहासिनी ताईंची नजर टाळत म्हणाला .
" लवकर बरा हो बाबा … काही लागलं तर मला कधीही फोन कर . काय ? समजलं का यमुने ? "
" हो ताई साहेब . " , यमुना म्हणाली .
" आणि ती सफरचंद आणलीत ती खाऊन घे … तब्येतीला जप. बरं , मी येऊ का आता ? " सुहासिनीताई म्हणाल्या .
“ ताई साहेब , तुम्ही आता घरीच जानार का ? कि बाहेर कुठे काम आहे ? ” , यमुनेने विचारलं.
“ हो , घरीच जाणार . का गं ? ”
“ नाही , मला पण घरी जायचं होतं. सुमित घरी एकटाच आहे . मला आमच्या चौकात सोडून तुम्ही पुढं जा … ” यमुना म्हणाली.
“ ठीक आहे , आणि जयसिंग जवळ कोण गं मग ? ”
“ झिपऱ्या आहे कि … त्यो काही ह्यांना सोडून जायचा नाही . ”
“ बरं , चल मग ! जयसिंग , येतो रे आम्ही . ”, ताईसाहेब म्हणाल्या.
“ हो , हो … सांभाळून जा . ” सुहासिनी ताई आणि यमुना गेल्या आणि जयसिंगने सुटकेचा निश्वास टाकला. बाजूला उशीखाली ठेवलेला मोबाईल काढला आणि क्रिप्टो कॉईन एक्स कंपनीची वेबसाईट उघडली .

₿₿₿

अमरने त्याच्या समोरच्या लॅपटॉपवर क्रिप्टो कॉईन एक्स कंपनीची वेबसाईट उघडली . पहिल्याच पेज वर अनाऊन्समेंट होती ती ओमी मिरचंदानीच्या अकाली मृत्यूची ... त्यात त्यांनी सध्या ऑनलाईन ट्रेडिंग तात्पुरती बंद करण्यात आली आहे, लोकांनी धीर सोडू नये , तुमचे पैसे सुरक्षित आहेत वगैरे वगैरे दिलासादायक विधानं केली होती. पण लोकांचा त्यावर बिलकुल विश्वास नव्हता . वेबसाईटच्या चॅट सेक्शनमध्ये लोकांनी भरमसाठ मेसेजेस टाकून ठेवले होते . काही विचारपूस करणारे , काही आपल्या पैशांबाबत काळजी करणारे, बरेच जण तर आपले पैसे बुडवल्याबद्दल ओमी मिरचंदानीला उघड उघड शिव्या घालत होते .... सगळीकडे बातमी पसरली होती की आपले गुंतवलेले पैसे बुडाले . त्या कंपनीच्या फेसबुक पेजवर सुद्धा हेच चालू होतं . लोक तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारत होते . पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कोणीच नव्हतं . त्या कंपनीच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट सेक्शन मध्ये जे दोन फोन नंबर दिले होते ते बंद होते . अमरने आणखी थोडा प्रयत्न करून नेटवरून थोडी फार माहिती जमवली . क्रिप्टो कॉईन एक्स कंपनी 2015 साली ओमी मिरचंदानी ह्याने स्थापन केली होती. तो एकटाच ह्या कंपनीचा मालक होता . ऑनलाईन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी विक्री चालत असल्यामुळे स्टाफ सुद्धा कमी होता . क्रिप्टो कॉईन एक्स कंपनी बाबत जी काही माहिती नेटवरून मिळेल ती गोळा करण्याचं काम चालू असतानाच त्याच्या ऑफिसच्या दारावर टकटक वाजलं .
" आत येऊ का साहेब ? " अमरने मान वर करून पाहिलं आणि त्याचा होता नव्हता तेवढा उत्साह सुद्धा निघून गेला. दारावर शहरनामा पेपरचा पत्रकार सोनकांबळे उभा होता , तेच त्याचं नेहमीचं चामट हास्य घेऊन ... त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता , पण तो नाकातोंडावर न लावता खाली हनुवटीवर लावला होता. अमरने मानेने या असं खुणावलं .
" काय साहेब ! बरेच दिवस झाले फोन नाही , मेसेज नाही ... माया पातळ झाली आमच्यावर ... हे हे हे " करत सोनकांबळे समोरच्या खुर्चीत येऊन बसला . त्याला बघितलं की अमरला रस्त्यावरच्या झेब्राक्रॉसिंगची आठवण यायची . सोनकांबळेच्या डोक्यावरचे केस तसेच होते , काळ्या केसांमध्ये पांढरे पट्टे मारल्यासारख्या पांढऱ्या केसांच्या बटा अधून मधून दिसत होत्या .
" काय काम आहे ? " अमर थेट मुद्द्यावर आला , कारण त्याला त्याच्याशी बोलण्यात बिलकुल रस नव्हता आणि वेळही !
" आमचं काम काय असणार साहेब ? सध्या तुम्हीच खूप बिझी दिसताय " सोनकांबळे टेबलावर पडलेले पेपर लांबूनच निरखत म्हणाला . ते बघून अमरने सर्व पेपर्स एकत्र केले आणि ते फाईलमध्ये ठेऊन दिले .
" सोनकांबळे , खरंच खूप बिझी आहे . तुमचं काय काम आहे ते लवकर सांगा. "
" बिटकॉईन म्हणजे काय हो ? " साळसूद चेहरा करून त्याने विचारलं .
" हे विचारायला आलाय का तुम्ही इथे ? " अमर वैतागला .
" तसं नाही , सहज विचारलं हो . तुमचा तपास कुठपर्यंत आलाय ? जरा माहिती दिली असतीत तर .... "
" ही खूप मोठी केस आहे सोनकांबळे , अजून काहीच स्पष्ट झालं नाही आणि तपास हा गोपनीय असतो , त्यामुळे तुम्ही इथे येऊन वेळ वाया घालवताय असं नाही वाटत का तुम्हाला ? " त्यावर सोनकांबळे काही बोलला नाही . थोडा वेळ शांत बसून राहिला .
" गेल्या महिन्यातच लग्न झालं होतं बिचाऱ्याचं … " सोनकांबळे मधेच म्हणाला .
" हो का ? तुम्हाला होतं वाटतं आमंत्रण ! " , अमरने लॅपटॉपवरून नजर न हटवता टोमणा मारला .
" काय साहेब , चेष्टा करता काय गरिबाची ! "
" नाय हो, आता तुम्हाला एवढं सगळं इत्यंभूत माहिती आहे म्हणून आपलं विचारलं . "
" पत्रकार आहोत साहेब आम्ही ! आम्हाला खबरी ठेवाव्या लागतात . "
" छान … छान … " अमर लॅपटॉपवर काम करत म्हणाला . थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही . फक्त लॅपटॉपच्या की बोर्डाचा टायपिंगचा आवाज येत होता.
" एक विचारू का साहेब ? आपली एक शंका आली हो मनात … " तेच चामट हास्य चेहऱ्यावर आणत सोनकांबळे विचारत होता .
" सोनकांबळे ! " वैतागून अमर म्हणाला .
" ऐका ना साहेब , हनिमूनसाठी लडाखसारख्या ठिकाणी ते पण ऐन कोरोनाच्या काळात कोणीतरी जाईल का ? तुम्हाला काय वाटतं ? " सोनकांबळे फिरून फिरून विचारत होता .
" मला काही वाटत नाही . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ." अमर म्हणाला इतक्यात वाघचौरे साहेब आत आले . त्यांना बघून पत्रकार सोनकांबळे तात्काळ उठून उभा राहिला .
" नमस्कार साहेब . " तो अदबीने म्हणाला . हा इथे काय करतोय ? अशा अर्थाचा चेहरा वाघचौरे साहेबांनी केला. त्याच्या नमस्काराकडे लक्ष न देता साहेब अमरला म्हणाले , " जरा माझ्या केबिनमध्ये ये ." साहेब गेले त्या पाठोपाठ अमर लॅपटॉप आणि कागदपत्रे घेऊन त्यांच्या पाठोपाठ निघाला .
" साहेब , मी निघतो , काही बातमी असेल तर देत जा ... " सोनकांबळे म्हणाला . त्यावर मानेने होकार देत अमरने त्याला कटवलं आणि तो आपल्या केबिन मधून बाहेर पडला .
" अमर , ही खूप हाय प्रोफाइल केस आहे . कुणालाही ह्याबाबत बाहेर कळता कामा नये . तो यडझवा सोनकांबळे इथं काय करत होता ? " वाघचौरे साहेब त्यांच्या केबिन मध्ये शिरता शिरता म्हणाले .
" काही नाही साहेब , त्याला काही माहिती मिळेल ह्या आशेने आला होता तो , पण मी काही कळू दिलं नाही आणि त्याला सांगितलंय की परत काही विचारू नको म्हणून . "
" हे पत्रकार म्हणजे ना ताप आहे नुसता . वैताग येतो मला त्यांच्याकडे बघूनच ! " वाघचौरे साहेब असं म्हणाले आणि त्याचवेळी त्यांच्या केबिनच्या दारावर टकटक झाली . त्यांनी पाहिलं बीटा न्यूज चॅनलची रिपोर्टर मिताली दारात उभी होती . गोरीपान , जीन्स आणि टॉप घातलेली, कलर केलेल्या एक दोन बटा , ओठांवर फिकट लिपस्टिक , मॉड अशी ती रिपोर्टर दिसायला सुंदर होती . गळ्यात बीटा न्यूज चॅनलचं आयकार्ड लटकत होतं . एका पायावर भार देऊन लाडिकपणे ती केबिनच्या दारात उभी होती .
" वाघचौरे सर , येऊ का , बिझी नाहीत ना आपण ? " , तिने काहीशा नाजूक आवाजात विचारलं.
" अरे, या या मिताली मॅडम … आज कशी काय आठवण झाली आमची ? " सोनकांबळे पत्रकाराला बघून आलेला वाघचौरे साहेबांचा वैताग मिताली रिपोर्टरला बघून कुठच्या कुठे निघून गेला . अमरला ह्या प्रकाराची गंमत वाटली .
" थोडं काम होतं सर तुमच्याकडे … " ती त्याच लाडात म्हणाली , तिच्या पाठोपाठ ट्रायपॉड आणि कॅमेरा घेऊन एक तरुण आत आला .
" अच्छा ! हे काम आहे तर ! काय मिताली मॅडम , फारच काम करता तुम्ही . आणि आमच्याकडे कामाशिवाय तर तुम्ही येत नाही . कधीतरी सहज भेटायला आलात तर आम्ही काही जा म्हणणार नाही तुम्हाला … ", वाघचौरे साहेब तिरकसपणे म्हणाले .
" काय करणार सर ! खूप काम असतं . पण पुढच्या वेळी मी वेळ काढून नक्की भेटायला येईन सर , प्रॉमिस … आज जरा बाईट हवी होती तुमची , त्या ओमी मिरचंदानीच्या मॅटर मध्ये … " ती हळूच माईक समोर धरत म्हणाली .
" बाईट द्यायला आधी काहीतरी हाती लागायला हवं ना मॅडम … तपास अजून सुरूही झाला नाही . आणि हे खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे . आत्ताच ह्या प्रकरणात काही बोलता येणार नाही . आम्हाला काहीतरी धागेदोरे हाती लागू द्या , मग बोलू की आपण … तुमचा मोबाईल नंबर आहेच की माझ्याकडे ... ", वाघचौरे साहेबांनी गोड बोलून बाईट देण्यास नकार दिला . त्यांची ही खासियत होती . समोरच्याला न दुखावता त्यांना हवं तसं करून घेण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. नाईलाजाने त्या टीव्ही रिपोर्टरला रिकाम्या हाताने परत जावं लागलं. अमर मात्र कुतुहलाने हे सर्व पहात होता .
" काय सर , नाराज केलंत बिचारीला तुम्ही … " , अमर गमतीने म्हणाला .
" काय करतोस बाबा , त्यांना चार हात लांबच ठेवलेलं बरं , तो सोनकांबळे काय आणि ती मिताली काय , दोघेही सारखेच ! "
" हो सर , पण जाता जाता सोनकांबळेने एक मुद्दा सांगितला तो मलाही थोडासा पटला . "
" कसला मुद्दा ? "
" ऐन कोरोना काळात , लडाखला हनिमूनसाठी कोणी कशाला जाईल ? "

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users