क्रिप्टो (crypto ) भाग - २

Submitted by मिलिंद महांगडे on 22 May, 2022 - 05:47

₿₿₿

जयसिंगने काठोकाठ भरलेला पेग घेतला , एका सुंदर तरुणीने त्याला तो पेग देऊ केला होता. व्हिस्कीची नशा अधिक कि तिच्या डोळ्यांची असा प्रश्न पडावा इतकी ती तरुणी सुंदर होती. कमनीय बांध्यावरून नजर हटत नव्हती. त्यात तिने जो वेश परिधान केला होता तो तर अगदी काळजाचा ठाव चुकवणारा होता. नजरेचे बाण सुटत होते . तिच्या सुंदर ओठांकडे बघतच त्याने व्हिस्कीचा पेग तोंडाला लावला , जणूकाही तो तिच्या ओठांचे चुंबनच घेऊ पहात होता. इतक्यात कुठूनसे संगीत सुरु झाले , आणि त्या तालावर ती गौरांगना आपल्या मादक अदांनी घायाळ करणारं नृत्य करू लागली. ते पाहून जयसिंग आणखीनच चेकाळला. हातातल्या व्हिस्कीची नशा दसपटीने वाढल्यासारखी वाटली. तो पेग घटाघट पिऊन त्याने संपवला. संबंध शरीरभर आग पसरल्यासारखं त्याला वाटलं. आधीच वासनेची आग होती त्यात मद्याची आग मिसळली . तो त्याच्या जागेवरून उठला आणि थेट नृत्य करणाऱ्या त्या गौरांगनेपाशी पोहोचला. नृत्यात मग्न असलेली ती , त्याला इतका जवळ आलेला पाहून दचकली, नृत्याची लय तुटली आणि ती पुतळ्यासारखी त्याच्या समोर उभी राहिली. जयसिंग तिच्या जवळ गेला. क्षणभर धपापणाऱ्या उरोजांकडे त्याचं लक्ष गेलं , ते लयीत वर खाली होत होते. तो तिच्या आणखी जवळ गेला . त्याला तिच्या श्वासांचा आवाज येऊ लागला होता. तिच्या रसभरीत ओठांचे चुंबन घ्यावे असे त्याला वाटले, त्याने तिला कवेत घेतले , तिच्या ओठांवर तो ओठ टेकवणार इतक्यात त्याच्या कानात ट्री sss ट्री sss असा मोठा आवाज झाला आणि दचकून तो झोपेतून जागा झाला. कानाच्या बाजूला त्याचा फोन ठणाणा करीत होता . क्षणभर रागात त्याला तो फोन फेकून देण्याची इच्छा झाली , पण ते करून काही फायदा नाही , असं त्याला वाटलं. त्याने बघितलं झिपऱ्याचा फोन होता. तो आणखीनच वैतागला. ह्या झिपऱ्यामुळं पडलेलं चांगलं स्वप्न मोडलं ह्याचा राग जयसिंगला आला ,
“ आरं ए झिपऱ्या , माकडतोंड्या … तुला हाच टाईम भेटला व्हय … चांगलं स्वप्न पडलं होतं लेका … ”
" कसंलं स्वप्न मालक ? "
" तुला काय करायच्यात नसत्या चौकशा ? बोल पटकन काय ते … " जयसिंग चांगलाच वैतागला होता.
“ मालक , माफ करा … पन मी उगाच कशाला तुम्हाला सकाळच्या नऊ वाजता फोन करीन ? तुमची झोप कशाला मोडीन मी ? ” पलीकडून झिपऱ्या म्हणाला.
“ काय काम हाय ते बोल लवकर , उगाच पाल्हाळ लावू नको … मला झोप येतीया … ”, झिपऱ्याने पटकन काय ते बोलावं म्हणजे आपल्याला पुन्हा झोपता येईल व ते अर्धवट राहिलेले स्वप्न बघता येईल असं जयसिंगला उगाचच वाटलं.
“ मालक तुम्ही अजून झोपेतच हात व्हय ? जरा बातम्या लावा , म्हंजे तुमची झोप उडंल जरा .”, पलीकडून आवाज आला.
“ का ? काय झालं ? ” जयसिंगला जरा संशय आलाच.
“ आवं मालक बगा तरी . ”
“ आता तू फोन ठेवल्याशिवाय कसा बगु ? ठेव फोन . ”, जयसिंग त्याच्यावर खेकसला आणि त्याने फोन बंद केला. त्याला टीव्हीचा रिमोट वेळेवर सापडेना. इकडे तिकडे शोधल्यावर तो एकदाचा सापडला . तातडीने उठून त्याने न्यूज चॅनेल लावला . समोरची बातमी ऐकून त्याला चक्कर येईल कि काय असं वाटू लागलं. सगळं जग आपल्याभोवती फिरतंय असं त्याला वाटलं. त्याच्या छातीत एक बारीकशी कळ आली. आणि तो तसाच धाडकन मागच्या खुर्चीत आपटला.

₿₿₿

करोडो रुपयांच्या बिटकॉईन्सचा खजिना लुप्त ....
आत्ताची ह्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे , क्रिप्टो कॉइन एक्स ह्या बिटकॉइन एक्सचेंज कंपनीचे सर्वेसर्वा श्री ओमी मिरचंदनी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे . विशेष म्हणजे ओमी मिरचंदानी ह्यांचा विवाह रागिणी ह्यांच्याशी गेल्या महिन्यातच झाला होता , ते हनिमूनसाठी लेह लडाख येथे गेले असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला आहे , आणि धक्कादायक बाब म्हणजे क्रिप्टो कॉइन एक्स ह्या बिटकॉईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीचे करोडो रुपयांचे बिटकॉईन आता त्यांचे ग्राहक कधीच पाहू शकणार नाहीत , कारण ते बिटकॉईन ज्या अकाऊंट मध्ये ठेवले होते त्याचा पासवर्ड फक्त आणि फक्त ओमी मिरचंदानी यांनाच माहीत होता . आता करोडो रुपयांचा बिटकॉईनचा खजिना त्यांच्या मृत्यूबरोबरच लुप्त झाला आहे .
सकाळच्या सातच्या बातम्या सांगणारी टीव्ही अँकर मोठमोठ्याने ओरडून ही बातमी अशी सांगत होती जणूकाही तिचेच पैसे बुडाले होते . अमरने न्यूज चॅनल बदलला , दुसरा न्यूज चॅनल लावला ,तिथेही तीच बातमी ! हिंदी न्यूज चॅनलवरही त्याच बातमीने थैमान घातलं होतं.
" काय चालू आहे तुमचं ? सकाळी सकाळी न्यूज चॅनल लावून बसलात ते ! " अमरची बायको अंजली त्याला म्हणाली . " उठा , आज ऑफिसला जायचंय की नाही ? "
" अरे देवा ! फिरोज बरोबरच बोलत होता . खरंच पैसे बुडाले . " तो बोलून गेला , तेवढंच त्याच्या बायकोने ऐकलं .
" काय म्हणालात तुम्ही ? पैसे बुडाले ? " , तिने संशयाने विचारलं .
" अगं , कितीतरी लोकांचे पैसे बुडाले असतील असं म्हणालो मी … " त्याने सारवासारव केली . तरी नवऱ्याच्या ह्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही, तिला आणखीनच संशय येऊ लागला .
" तुम्ही खरं बोलताय ना ? की मागच्या सारखे कुठल्या तरी स्कीम मध्ये पैसे लावलेत आणि बुडवलेत ? "
" नाही ग बाई . तसं काही नाही . माझा डबा झाला का ? उरक , मला जायचंय … " तो असं म्हणत असतानाच त्याचा फोन वाजला . वाघचौरे सर कॉलिंग ….
ते बघून तर त्याला आणखीनच वैताग आला. " जय हिंद साहेब , .... हो सर ... हो ... हो .... येतो सर .… ओके सर ... " म्हणत त्याने फोन ठेवला . " बघतेस काय ? चल डबा दे लवकर , मला जायचंय . जाम काम लागणार आहे ... आता माझी काही वाट बघू नको . हे प्रकरण संपेपर्यंत आमचं काही खरं नाही ... " अमर सर्व आवरून निघाला . त्याची बुलेट काढली आणि पोलीस स्टेशनला पोहोचला . पाय ओढत ओढत पोलीस स्टेशन मध्ये शिरत असतानाच सब इन्स्पेक्टर पाटीलने त्याला दारातच हटकलं. त्याला बाजूला घेत म्हणाला , “ आज न्यूज मध्ये बातमी बघितली. खरं आहे का ते ? ”
“ न्यूजला आलं म्हणजे खरंच असेल कि … ”, अमर म्हणाला.
“ अरे , म्हणजे आपले पैसे ? ”
“ बुडाले असं समज . ” अमरने त्याचं वाक्य पूर्ण केलं.
“ काय यार अमर , तुझ्या भरवशावर टाकले होते पैसे . ”, पाटील कुरकुरत म्हणाला.
“ एक मिनिट ! मी आधीच सांगितलं होतं , ह्यात रिस्क खूप आहे . तेव्हा तू काय म्हणाला होतास ? हाय रिस्क हाय प्रॉफिट … विसरलास काय ? ”
“ हो रे बाबा ! सहज म्हणालो मी . दिल पे मत ले यार ! ”
“ माझेही पैसे गेलेत आणि तू टाकले होते त्यापेक्षा कितीतरी जास्तच गेलेत . ”, अमर वैतागून म्हणाला.
“ सॉरी बाबा ! जा , सिनियर साहेब विचारत होते तुला … ”
" तिकडेच जातोय , बरं काही टेन्शन घेऊ नको , मार्ग निघेल काहीतरी. " , त्याने सब इन्स्पेक्टर पाटीलला दिलासा दिला .
" ओके , चल मी निघतो , मला कळवत जा काय होतंय या प्रकरणात ते "
" हो नक्की , चल बाय … "
अमरने थेट वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन कडक सॅल्युट केला .
" बस ... बस .... आज सकाळी सकाळीच डेप्युटी कमिशनर साहेबांचा फोन आला होता . भेटायला बोलावलं होतं . मी जाऊन आलो , हे बघ . " म्हणत एक फाईल त्यांनी अमर समोर ठेवली . त्याने ती उघडली , क्रिप्टो कॉईन एक्स कंपनीचीच फाईल होती.
" काय साला वैताग आहे , माझी दोन वर्षे राहिलीत रे ... सुखानं रिटायर्ड होऊ द्या मला ... " वाघचौरे साहेब मिश्किलपणे म्हणाले . वाघचौरे साहेब तसं कलंदर व्यक्तिमत्व ! स्वभाव एकदम गमतीदार . त्यांच्या बरोबर काम केलेला माणूस त्यांच्याबद्दल वाईट कधीच म्हणणार नाही . कामात हुशार माणूस ! कामात म्हणजे कायद्याचं आणि लिखापडीचं काम सोडून दुसरी जुगाड कामं करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. त्यांचे इंफॉर्मर सगळीकडे पसरलेले होते . समोरच्या माणसाची नस ते लगेच पकडत . समोरचा माणूस किती पाण्यातला आहे हे त्यांच्या अनुभवी नजरेला लगेच कळायचं . कुणाच्या मनात काय आहे ?, कुणाला कशाची गरज आहे ? हे ते बरोब्बर ओळखायचे . माणसं जोडण्याची एक वेगळीच कला त्यांना अवगत होती . वाघचौरे साहेब त्यांचा ड्रायवर हरी , त्यांचा हाताखालचा इतर स्टाफ , अमर ह्या सगळ्यांना ते मित्रत्वाच्या नात्याने वागवत . पण आता ते कंटाळले होते , रिटायरमेंट आधीची दोन वर्षे शांतता मिळावी , कसली तकतक नको म्हणून हा माणूस सायबर क्राईमला आले आणि झालं उलटंच ! जवळपास सर्व देशाचं लक्ष वेधून घेण्याची ताकद ह्या केसमध्ये होती . कित्येक लोकांचे लाखो - करोडो रुपये ह्यात अडकले होते देव जाणे ! आणि आता हे सगळे लोक , मीडिया , आपले बॉस काही आपल्याला सुखानं जगू देणार नाहीत हे त्यांना माहीत होतं. त्यांनी आपलं सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यातून एक सिगारेट काढून शिलगावली. दोन चार कश मारले आणि त्यांनी हलक्या हातांनी ती एष्ट्रे मध्ये विझवली. आणि विझलेली सिगारेट पुन्हा पाकिटात ठेवून दिली. अमरला नेहमी त्यांच्या ह्या युनिक स्टाईलचं कुतूहल वाटत आलं आहे.
“ सर , एक विचारू का ? ”, अमरने विचारलं.
“ बोल ”
“ सर , तुम्ही हि सिगारेट अर्धी पिऊन पुन्हा पाकिटात का ठेवता ? ” अमरने विचारलं त्यावर ते हसले.
“ त्याचे दोन फायदे - मोठी सिगारेट थोडी थोडी करून प्यायली तर हेल्थवर परिणाम होत नाही आणि पैसेही वाचतात… ” , गमतीदार चेहरा करून वाघचौरे साहेब म्हणाले.
“ पण सर, आता पैसे वाचवण्याची काही गरज नाही ना . ”
“ हा सवयीचा परिणाम आहे. कॉलेज पासूनची सवय… त्यामुळे ती काही आता सुटणार नाही. आणि हेल्थ वर पण जास्त परिणाम होत नाही. आलेली तलफ भागवणे हा मुख्य हेतू आहे , बाकी काही नाही. ” ते सिगारेटचं पाकीट आत ड्रोवरमध्ये ठेवत म्हणाले. अमर समोरची फाईल वाचू लागला.
" ह्या केसमध्ये आपण काय करायचं सर ? म्हणजे कुठून सुरवात करायची ? " फाईल बघून झाल्यावर अमरने विचारलं .
" ते कोणतं बिटकॉईन एक्सचेंज आहे , त्याची सगळी माहिती , त्याचे किती डायरेक्टर आहेत , पार्टनर आहे त्यांची माहिती , त्यात किती लोक काम करतात , त्यांचे युजर्स किती आहेत ? किती लोकांचे पैसे बुडाले आहेत ? ह्याची सगळी माहिती काढावी लागेल. किती दिवस लागतील ? ”, त्यांनी कॅलेंडर कडे बघत विचारलं.
" सर , एवढी माहिती मिळवणं म्हणजे .... " अमर पुढे काही म्हणणार तेवढ्यात वाघचौरे साहेबांनी डोळे मोठे केलेले त्याने पाहिले . " करतो सर , थोडा वेळ लागेल , पण करतो ... " म्हणत तो फाईल घेऊन उठला .
" किती ? " साहेबांनी पुन्हा विचारलं .
" पाच सहा दिवस लागतील सर .... "
" दोन दिवसांत माहिती पाहिजे मला . आज वार काय ? मंगळवार ... मला गुरुवारपर्यंत सगळी माहिती पाहिजे . " वाघचौरे साहेबांनी त्यांच्या टेबलावरच्या कॅलेंडरवर खूण करूनही टाकली . येस सर म्हणण्यावाचून अमर पुढे पर्यायच उरला नाही . वैतागत आपल्या टेबलपाशी येऊन बसला . समोर कामाचा डोंगर उभा असल्यासारखं त्याला वाटू लागलं . दोन मिनिटं त्याने डोळे बंद केले , थोडा शांत झाल्यावर त्याने खिशातला आपला मोबाईल काढला आणि फिरोजला फोन लावला . बराच वेळ फोन वाजत होता , पण पलीकडून फोन कोणी उचलला नाही .
' छे ! हा फिरोज पिऊन कुठे आडवा पडलाय देव जाणे ! '

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users