असा शाम मोही

Submitted by पुरंदरे शशांक on 15 May, 2022 - 11:35

असा शाम मोही

कधी शीळ येते पहाटे कुणा ती अनोख्या अनामा खगाची तरी
भुलावून टाके मनाला स्वभावे निळे स्वप्न तेही निळी बासरी

निळेभोर आकाश पूर्वे उजाळे क्षितीजात मंदावला शुक्र तो
हिरा कोंदणी शुभ्रचि तेवणारा रुळे कुंतली श्याम निद्रिस्त जो

झळाळे सुवर्णी जरी माखलेला निलावर्ण शेला कटीचा तया
ललाटी तया कस्तुरीचा सुरंगी टिळा शोभलासे रवी सौम्यसा

असा शाम मोही मना वेढुनिया ह्रदी ज्योत तिही निळी गोमटी
कळेना कदा ती कुडी व्यापूनिया निळा डोह कालिंदि घाली मिठी
......................................................................................

अनामा.....अनामिक
खग....... पक्षी
कुंतल......केस
कटी.....कंबर
ललाट.... कपाळ
ह्रदी.....ह्रदयी
कुडी..... शरीर
कालिंदी.....यमुना नदी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा, सुंदर
शेवटच्या कडव्यात हृदयी आहे का? मला शब्द कळला नाही

खूप छान कविता.

शेवटच्या कडव्यात हृदयी आहे का? >> मला वाटतं हृदी पाहिजे. चुकून ह्रदी झालं आहे.

>>>>>>>ललाटी तया कस्तुरीचा सुरंगी
टिळा शोभलासे रवी सौम्यसा
या ओळी खूप गोड आहेत.
सूर्य हा जणू, निळ्या व्योमकेशी पुराण पुरुषाच्या भालावरचा केशरी कस्तुरीचा टीळाच आहे.

निळाई सुंदरच..!!

यातल्या सुस्पष्ट असणाऱ्या प्रतिमांबरोबरच मागची निळी धूसर, गुढ पार्श्वभूमीही मस्तच..