अबोली...!! ( भाग ४ )( अंतिम )

Submitted by रूपाली विशे - पाटील on 6 May, 2022 - 08:49

अबोली ..!! (भाग -४) ( अंतिम )
_____________________________________

आवाजाचा कानोसा घेत मी अबोलीच्या ताटव्याजवळ पोहचलो. माझा अंदाज खरा ठरला होता.

अबोलीच्या ताटव्याजवळ फुलं खुडणारी तीच तरुणी उभी होती, जिने माझी दोन दिवसांपासून अन्न -पाण्यावरची , झोपेवरची वासना उडवली होती. माझी मनःशांती भंग केली होती.

माझी चाहूल लागताच ती गर्रकन मागे वळली.

मी झपाटल्यागत पुढे पाऊल टाकलं पण, अबोलीच्या झाडांची होणारी विचित्र सळसळ पाहून मी जागीच थबकलो.

पुढे जायची हिंमत काही केल्या मला होईना.

माझ्याकडे पाहून तिने कालच्या सारखेचं स्मितहास्य केले. ते हास्य जबरदस्त आकर्षक होते. त्या हास्यात विलक्षण असे काहीतरी होते , जे माझ्या नजरेला बांधू ठेवू पाहत होते.

पुढे जे घडलं तेही मला अपेक्षित होतं. कालच्यासारखंच त्या तरुणीचं धुक्यात विरत जाणं... माझ्या डोळ्यांसमोर अदृश्य होत जाणं..!

भान हरपल्यागत मी ते दृश्य पाहू लागलो.

आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्या तरुणीच्या अदृश्य , अंधुक होणाऱ्या आकृतीच्या दिशेने बेभानपणे धावू लागलो.

" थांब ...ए...जाऊ नकोस... नाव काय तुझं..?? थांब जरा..!"

मी त्या आकृतीला थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो. अबोलीच्या ताटव्याजवळ भारल्यासारखा मी गोल चकरा घालू लागलो.

" कोण आहेस तू..?? समोर का येत नाहीस..?? का छळ मांडलाय् माझा असा...??" मी जोर - जोराने ओरडू लागलो.

माझ्याच आवाजाचे प्रतिध्वनी त्या स्तब्ध जंगलात सर्वत्र घूमू लागले. चारही दिशांना पोहचून , उलटे फिरून माझ्याच कानांवर आदळू लागले.

मी मटकन् खाली मातीत बसलो.

जमिनीवर अबोलीच्या फुलांचा सडा पडला होता.

'अबोली..!'

हो, तुझं नाव अबोलीचं असायला हवं ...!!

" अबोली....अबोली....!" अबोलीच्या ताटव्याजवळ वेड्यागत घुटमळत मी त्या तरुणीला मोठ्यांने हाका मारू लागलो.

थंडगार हवेच्या झुळका माझ्या शरीराला शिवू लागल्या.
मेंदूवर थंड बर्फ ठेवल्यासारखं भासू लागलं. अबोलींच्या फुलांकडे एकटक पाहत असतानाच मानसिक ग्लानीने मी खाली कोसळू लागलो.. शेवटी स्वतःला कसंबसं सावरत मी झोपडीत परतलो.

झोपडीत परतता क्षणीच मी ठरवून टाकलं की, आता ह्या जागी क्षणभरही राहणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

भूत - भुताटकी, चकवा लागणं हे अस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही, माझा त्याच्यावर काडीभरसुद्धा विश्वास नाही , मात्र माझी मन:शांती भंग करणारी एखादी अज्ञात प्रवृत्ती ह्या गूढ जागी अस्तित्वात असावी, अशी माझ्या मनाची पक्की समजूत झाली.

मी क्षणाचाही विलंब न लावता माझं सामान बांधायला घेतलं. इथून माघारी फिरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे मला कळून चुकलं. जर अजून काही दिवस मी त्या जागी राहिलो असतो, तर नक्कीच् मला वेड लागलं असतं. माझं उरलं - सुरलं मानसिक स्वास्थ्यही पूर्णपणे हरवून गेलं असतं.

__ पण माझं दुर्दैव आघाडीवर होतं. सामानाची बांधाबांध सुरु होती, तेवढ्या अवधीतच बाहेर गार वारा सुटू लागला.

आकाशात ढगांची गर्दी जमा होऊ लागली. आभाळ झाकोळून आले. झोपडीबाहेर येऊन पाहतो तर पावसाच्या सरींनी जमिनीकडे धाव घेतलेली ..!!

मला कळेचना की, दुपारपर्यंत कडकडीत उन्हं असताना अचानक वातावरण असं कसं काय बदललं असावं ..??

मी इथून बाहेर पडू नये म्हणून एखादी अज्ञात शक्ती घडवून आणते का बरं हे सगळं..??

मला पडलेल्या ह्या प्रश्नावर मात्र मी स्वतःशीच हसलो. डोंगराळ भागात वातावरण अचानक बदलू शकते , निसर्गाच्या ह्या लहरी स्वभावाची एवढी तरी माहिती आपल्याला असायला हवी की नाही..??

दुसऱ्या दिवशी पहाटे पाऊस थांबल्यावर आपण विक्याच्या फार्महाऊसवर पोहोचायचं असं मनाशी ठरवून मी व्हिस्कीचा ग्लास भरला.

का आलो आपण ह्या घनदाट , गूढ जंगलात..?? काय मिळवलं आपण इथे येऊन ...??

रोजच्या घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्याला, एकमेकांना धक्का - बुक्की करून, खाली पाडून पुढे जाऊ पाहणाऱ्या माणसांच्या आपापसांतल्या शर्यतीला, जीवघेण्या स्पर्धेला आपण कंटाळलो होतो. त्यासाठी आपण शांततेच्या शोधात ह्या जागी येऊन पोहचलो., ती शांतता आपल्याला मिळाली तर नाहीच , मात्र इथे येऊन आपली उरलेली मनःशांतीसुद्धा आपण गमावून बसलो आहोत, ह्याची सल मनाला टोचू लागली.

अपूर्ण राहिलेली कथा आता विक्याच्या फार्महाऊसवर राहून लिहून पूर्ण करायची असं मी मनोमन ठरवलं.

थोड्याच वेळात बाहेर मुसळधार पाऊस कोसळू लागला.

पावसासोबत आता आकाशात विजांचा खेळ सुरू झाला आणि त्या दोघांनाही साथ द्यायला ढगांचा गडगडाट सर्वांच्या पुढे होताच्..!

बाहेरून झोपडीसारखं दिसणारं वनखात्याचे हे घर आतून सुरक्षित होतं. घर उंचवट्यावर होते म्हणून , पावसा- पाण्याची एवढी चिंता वाटत नव्हती.

बाहेर घनघोर काळोख दाटून आला होता. दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने माझे डोळे मिटू लागले होते. कंदिलाची वात बारीक करत मी खाटेवर अंग टेकले. काहीच क्षणात मी झोपेच्या अधीन झालो.

आकाशात अचानक मोठा गडगडाटी आवाज झाला आणि मी झोपेतून खडबडून जागा झालो.

बाहेर कुणीतरी हलक्या हाताने दारावर थापा मारत असावं असं मला जाणवलं.

मी स्वतःला चिमटा काढून पाहिला. हे स्वप्नं नक्कीच नव्हतं.

__नाहीतर मग मला भास झाला असेल का..??

मी उठून खाटेवर बसलो. कंदिलाची वात मोठी केली. झोपडीच्या दारावर येणारा आवाज आता वाढू लागला होता.

एवढ्या मुसळधार पावसात अशा अवेळी इथे कोण असणार...??

एखादे जंगली श्वापद तर नसेल.. ?

-- की मग चोर- लुटारू आले असतील ..??

मी विचारातच उठलो. स्वःरक्षणासाठी मी कोपर्‍यातली काठी उचलली. आवाजाचा अंदाज घेत हळूहळू मी झोपडीचे दार उघडू लागलो.

दार पूर्णपणे उघडलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून मी अवाक् झालो. आश्चर्याचा विलक्षण धक्का मला बसला.

' अबोली...!!' मी स्वतःशीच पुटपुटलो.

मला गुंगारा देत रोज डोळ्यांसमोर धुक्यात अदृश्य होणारी ती तरुणी साक्षात ह्या घडीला झोपडीच्या दारात उभी होती.

मी पुन्हा एकदा माझ्या हाताला चिमटा घेतला.

हे स्वप्नं किंवा भास तर नव्हे...??

ती तरुणी पावसात भिजल्याने थंडीने कुडकुडत होती. '

'अबोली ' मी तिला हाक मारली.

तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं. ती हसली.

तिचं ते गोडव्याने ओथंबलेलं हसणं विलक्षण आकर्षक होतं. त्या नजरेत आणि त्या स्मितहास्यात माझी नजर बांधली गेली.

तिला आत ये, असं सांगायचे ही मला सुचले नाही. ती तरुणी स्वतःहून झोपडीच्या आत आली.

तिच्या अंगावरचे सगळे कपडे पावसाने भिजले होते. आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर आल्यावर मी तिला कोरडा टॉवेल अंग पुसायला दिला.

झोपडीच्या एका बाजूच्या कोपर्‍यात आडोश्याला उभे राहून अबोली आपले पावसाने भिजलेले अंग आणि केस कोरडे करू लागली होती, तेव्हा मी चोरट्या नजरेने तिच्यावर कटाक्ष टाकत, तिच्या सगळ्या हालचाली न्याहाळत होतो.

त्या लयबद्ध हालचाली पाहून माझा मेंदू बधिर होऊ लागला.

घडणारं सगळं चमत्कारिक होतं.

स्वप्नं, भास ...की ... वास्तव ..??

अबोलीला काही विचारावं का..??

__ पण माझ्या तोंडाला जणू कुलूप लागलेलं..!!

माझ्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता.

बाहेर पावसाचे आणि विजांचे थैमान सुरू होते.

__ आणि माझ्या डोक्यात विचारांचे थैमान..!!

कदाचित इथेच आसपास कुठेतरी आदिवासी वस्ती असावी, तिथेच हिचं घर असावं, अवेळी आलेल्या पावसाने तिला जंगलातून घरी जाता आलं नसावं कदाचित..!!

अबोलीच्या कपड्यांवरून ती एखादी आदिवासी स्त्री असावी असं मी ताडलं.

कदाचित जंगलात काही वस्तू शोधण्यासाठी म्हणून ती रोज येत असेल .. माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला पाहून ती पटकन् निघून जात असावी.

मी मनात अंदाज बांधू लागलो.

आदिवासी बांधव म्हणजे वनाचे राजे...!! त्यांना कसली आलीय् जंगलाची भीती..?? जंगल म्हणजे त्यांचा देवच..!! त्यांचं पोट , सारं आयुष्य जंगलातल्या साधन - संपत्तीवर अवलंबून...! दिवसभर रानोवनी भटकून पोटा-पाण्याची सोय करावी लागते बिचाऱ्यांना..!

मी विचार करू लागलो.

आपण उगाचचं भलते- सलते तर्क- वितर्क काढीत , घाबरून पळपुट्यासारखं इथून पळून जायला निघालो होतो..!

मी स्वतःशीच हसलो.

उद्या सकाळी अबोलीशी ओळख करून घेऊ आणि माझी मनःशांती भंग केल्याबद्दल तिला गंमतीने फैलावर घेऊ, असं मनाशी ठरवत मी खाटेवर पडलो.

अबोलीने जमिनीवर अंग टेकले. कदाचित तिला जमिनीवर झोपण्याची सवय असावी. मला ते बरं वाटलं नाही. मी माझ्याजवळ असलेली गोधडी तिला पांघरायला दिली.

तिने गोधडी अंगावर घेऊन शांतपणे डोळे मिटले.

आपले डोळे मिटण्याआधी माझ्याकडे पाहून गोड हास्य करायला मात्र ती विसरली नाही. त्या नजरेत , त्या हास्यात कृतज्ञतेचे भाव झळकत होते.

मी डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप काही केल्या मला लागेना. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर मी वळवळत राहिलो.

बाहेर पाऊस थांबायचं नाव काही घेत नव्हता.

अबोली शांत झोपी गेली होती.

कंदिलाची वात मंद जळत होती.

कंदिलाच्या उजेडात मी पाहिलं, एखाद्या पाळण्यात झोपी गेलेल्या लहान बाळासारखा तिचा चेहरा भासत होता. तिचा चेहरा न्याहाळता - न्याहाळता माझी नजर तिच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या भासणाऱ्या ओठांवर स्थिरावली.

मंत्रमुग्ध झाल्यागत मी ते ओठ पाहू लागलो आणि कल्पनेनेच त्या ओठांवरचे अमृत पिऊ लागलो... त्या कल्पनेनेच् माझं शरीर रोमांचित झालं.

__ आणि मग मात्र माझ्या देहात प्रचंड उलथापालथ सुरू झाली. श्वास तप्त झाला. मी झपाटल्यासारखा उठलो. माझं मन बेफामपणे धावू लागलं.

शांत झोपी गेलेल्या अबोलीचं तोंड मी माझ्या हातांच्या ओंजळीत घेतलं आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.

माझ्या देहाच्या कणाकणांत स्फोट होऊ लागले. ओठांची आग साऱ्या अंगभरात पसरू लागली.

एखाद्या धबधब्याच्या प्रवाहात सापडल्यागत मी वहावत जाऊ लागलो.

जे घडू नये ते माझ्या हातून घडू लागलं. वासनेने तप्त झालेल्या माझ्या तना-मनाला मी बंधन घालू शकलो नाही. बेभान झालेले तन - मन हट्ट करून पेटून उठले.

__ तेवढ्यात झालेल्या हालचालींनी जाग येऊन अचानक अबोलीने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं.

मी तिच्या नजरेत प्रतिसाद शोधू लागलो.

__ पण छे...! अबोलीच्या नजरेत प्रतिसाद कसा असू शकेल..?? तिच्या नजरेत प्रतिसाद शोधण्याचा किती खालच्या पातळीवरचा निलाजरेपणा मी करू पाहत होतो..!

त्या नजरेत माझ्याबद्दल विलक्षण संताप दाटून आला होता. मी तिच्या डोळ्यांत खोलवर पाहू लागलो. माझी नजर त्या डोळ्यांत बांधली गेली.

__ त्या डोळ्यांत मी पाहताच , माझ्याबद्दल वाटणाऱ्या घृणेचा आणि नजरेत पेटलेल्या संतापाच्या धगेचा चटका मला खोलवर बसला.

माझ्या डोळ्यांवर चढलेली वासनेची धुंदी एका क्षणात अंतर्धान पावली.

काळोख्या रात्री, भरपावसात, जंगलात भरकटल्याने मदतीच्या अपेक्षेने माझ्या आश्रयाला आलेल्या एका निष्पाप, असहाय्य स्त्रीवर मी बलात्कार करत होतो ..??

'बलात्कार ..!!'

नैतिकता आणि नितिमत्ता ह्यांच्या शब्दकोषात कधीच स्थान नसलेल्या ह्या बहिष्कृत शब्दाने माझ्या मेंदूला झिणझिण्या आल्या.

बाहेर पावसाने थैमान मांडलेले होतेच्..!

काय करून बसलो होतो मी ..??

हे घृणास्पद कृत्य करताना माझ्या उरात जीव नव्हता की मग मेंदू डोक्याबाहेर काढून ठेवला होता मी.. ??

कुणीही मला माफ करू शकणार नाही असा भयंकर गुन्हा मी केला होता ...!

विचारांच्या वावटळीत मी अडकू लागलो.

माझी छाती भीतीने अन् शरमेने फुटते की काय असं मला होऊ लागलं.

मी भीतीने गठाळून गेलो.

मी भीत - भीत अबोलीकडे दृष्टिक्षेप टाकला.

आता त्या नजरेत आग भेटली होती. तिच्या नजरेतले पेटते निखारे पाहून माझ्या मणक्यातून बर्फ फिरला.

त्या नजरेने मला ग्लानी येऊ लागली आणि मी डोळे गच्च मिटून घेतले. कदाचित मला झोप लागली असावी.

ढगांच्या गडगडाटासह पाऊस आणि विजांचा धिंगाणा बाहेर सुरूच होता.

कुणीतरी हलक्या हाताने दारावर थाप मारल्याचा आवाज कानांवर येऊ लागला. झोपडीतले ते दोघेजण झोपडीचे दार उघडण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यांच्यापैकी एकाने हातात स्व:रक्षणासाठी पिस्तौल धरले होते. मी निरखून पाहिलं, पण ते चेहरे मला अनोळखी होते.

त्यांनी झोपडीचे दार उघडले. दार उघडताच समोर पावसात भिजणारी, मदतीच्या अपेक्षेने त्या दोघांकडे पाहणारी... ती ओलेत्या अंगाची तरुणी...!!

मी त्या तिघांकडे आळीपाळीने पाहतोय्......

त्या तरुणीचा चेहरा निरखताना तिच्या चेहर्‍यावर माझी नजर स्थिरावली.

मी थक्क झालो कारण__

तो चेहरा माझ्या ओळखीचा होता.

ती तरुणी अबोली होती.

त्या दोघांनी तिला झोपडीत घेतले. ते दोघे दारूच्या नशेत असावेत असं त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट जाणवत होते.

त्यांनी अबोलीला अंग पुसायला कोरडा टॉवेल दिला. तिने आपले ओलेते अंग आणि केस कोरडे केले.

झोपडीच्या कोपर्‍यातील आडोश्याला उभे राहून आपले अंग आणि केस कोरडे करणाऱ्या अबोलीच्या शरीराच्या होणाऱ्या लयबद्ध हालचाली ते चार डोळे जिभल्या चाटत न्याहाळीत होते.

थोड्या वेळाने अबोलीने जमिनीवर अंग टेकले. क्षणार्धात तिला गाढ झोप लागली.

घनदाट जंगलातली पावसाळी रात्र , त्यात एक एकटी अतिसुंदर तरुणी आणि वासनांध डोक्यात चढलेली मदिरेची धुंदी..!!

वासनेने बरबटलेल्या मेंदूसाठीच हा त्रिवेणी संगम त्या तरुणीच्या दुर्भाग्याने घडवून आणला तर नसेल..??

त्या दोन तरुणांच्या मनात लपलेला वासनांध पशू तत्परतेने जागा झाला.

__आणि मग शांत झोपलेल्या निष्पाप, निरपराध अबोलीवर त्या पशूंनी झडप घातली.

शांत झोपलेली अबोली धडपडून जागी झाली. जिवाच्या आकांताने ओरडू लागली. आपली इभ्रत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागली. पण त्या पशुंपुढे तिचे एकटीचे प्रयत्न निष्पभ्र ठरले.

त्या घनदाट जंगलात, पावसाळी काळोख्या रात्री तिचा आवाज कुणापर्यंतही पोहचणं अशक्य होतं.

आपल्या स्त्रीत्वावर झालेला हल्ला कुणाही स्त्रीला सहन होणं शक्यच नाही. मग अबोली त्याला अपवाद कशी ठरणार..??

अबोली डगमगली नाही. आपल्यावर झालेल्या अत्याचाराने ती खवळून उठली.

झोपडीच्या कोपर्‍यातली कुऱ्हाड उचलत ती त्वेषाने त्या दोघा वासनांधावर धावून गेली.

पण हाय रे कर्मा ..!!

दोघातल्या एका नरामधाने चपळाईने पिस्तौल उचलले आणि बरोबर डाव साधला.

''' ठो...' !

पिस्तोलीच्या गोळीने तिच्या कपाळाचा अचूक वेध घेतला.

अस्फूट किंकाळी फोडत अबोली रक्ताच्या थारोळ्यात पडली. एक संगमवरी शिल्प मोडून - कोसळून जमिनीवर पडले.

रक्ताच्या थारोळ्यातला अबोलीचा मृतदेह पाहून दोघांचीही नशा एका झटक्यात उतरली.

भरपावसात , कंदिलाच्या उजेडात त्या दोघांनी झोपडीच्या बाजूला खड्डा खणत नाजूक देहाच्या अबोलीला त्या खड्डयात पुरून टाकले.

__ आणि अचानक पाहता - पाहता त्या खड्ड्यांवर अबोलीची रोपटी उगवू लागली. हां.. हां... म्हणता रोपे पट्पट् वाढू लागली. त्या झाडांना फुलांचा बहर येऊ लागला. अबोलीच्या तांबड्या रक्ताने त्या फुलांना वेगळीच झळाळी मिळू लागली.

त्या फुलांतून गीताचे स्वर उमटू लागले. सुरवातीचे आनंदाचे असणारे ते बोल शेवटाला विवशतेकडे झुकू लागले.

हे सारं पाहून मी दुःखाने वेडापिसा झालो.

मी अबोलीच्या ताटव्याजवळ गेलो, अबोलीच्या आठवणींनी , मनाला होणाऱ्या .अपरिमीत दुःखाने त्या फुलांना स्पर्श करू लागलो. .

अरे..!! हे काय असं विचित्र घडतंय् ..??

मी अबोलीच्या फुलांना स्पर्श करताच रक्ताची एक चिळकांडी माझ्या अंगावर उडाली.

रक्त ... लालभडक.. तांबडे .. तांबडे.. रक्त...!!

मी किंचाळत, धावत - पळत झोपडीच्या दिशेने निघालो.

मी झोपडीच्या दारात येताच कशाला तरी ठेचकाळून खाली जमिनीवर कोसळलो. मी घाबरून मागे वळून पाहिलं , तर.. तर.. झोपडीच्या दारात त्या दोन नराधमांचे मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले होते.

मी अतिव भीतीने किंचाळू लागलो. किंचाळता - किंचाळता मला जाग आली आणि मी धडपडून खाटेवर उठून बसलो.

मला भयंकर स्वप्न पडले होते. रोज तुकड्या - तुकड्यांनी पडणारे स्वप्नं आज पूर्ण झाले होते.

मी रात्रीचा प्रसंग आठवू लागलो. मी शेजारी जमिनीवर पाहिलं.

तिथे कुणीही नव्हतं.

काल रात्री अबोली इथे आली होती ना..??

मी आजूबाजूला पाहिलं , पण अबोली कुठेही मला दिसली नाही. ती झोपडीत आल्याचा कुठलाही मागमूस नव्हता. झोपडीचे दार आतुन व्यवस्थित बंद होते.

असं कसं घडू शकेल..??

अबोली आली होती इथे रात्री.... मला पूर्ण खात्री आहे.

मग ती गेली कुठे..?? अशी अचानक गायब कशी झाली...?? जमिनीत गडप झाली की काय..??

हे सगळं स्वप्नं, भास की वास्तव...??

अशी वेडीवाकडी स्वप्नं का पडताहेत मला..??

रात्री जे माझ्यासोबत घडलं ते स्वप्नं होतं ... भास होता ..की वास्तव ..??

मला काही समजत नव्हतं. मी खिडकीबाहेर पाहिलं. आभाळ स्वच्छ होतं, मात्र रात्री पडून गेलेल्या पावसाचं पाणी बाहेर साचलं होतं.

म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य मानावं का....???

अबोली खरंच आली असेल का रात्री ह्या झोपडीत ?? आणि मी.. मी .. तिच्यावर... बलात्कार....

माझ्या डोक्यात घणाचे घाव बसू लागले.

मी आतून कोलमडून गेलो.

रोज रात्री पडणारं ते एकसारखंच स्वप्नं.. कालच्या रात्री पूर्ण पडलेलं ते स्वप्नं.. पावसात भिजलेली दारात उभी असलेली अबोली, नशेतले ते दोन नराधम.. पिस्तौलीतून सुटणारी गोळी, झोपडीत पडलेले तांबडे ...तांबडे रक्त...झोपडीच्या दारात पडलेले त्या नराधमांचे मृतदेह.. अबोलीचा फुललेला ताटवा... माझ्या अंगावर उडणारी रक्ताची चिळकांडी...

काय अर्थ लावावा ह्या झोपेत पडलेल्या स्वप्नांचा...??

ह्या झोपडीत तीन वर्षापूर्वी काय घडलं असेल त्याची कहाणी माझं मन रचतेयं का...??

की खरंच असं वास्तवात काही घडलं असल्याची शक्यता आहे...??

ते नराधम म्हणजे तीन वर्षापूर्वी ह्या जागी मरून पडलेले ते दोन वनरक्षक तर नसतील...??

__ आणि त्या दोन वनरक्षकांनी एखाद्या निष्पाप तरुणीवर अत्याचार करून तिला खरोखर ठार मारलं असेल का....??

__ आणि आता त्या तरुणीचा अतृप्त आत्मा मुक्तीसाठी ह्या झोपडीच्या आसपास भटकत असावा का बरं..?? माझ्या स्वप्नात येऊन त्या तरुणीला काही सुचवायचं असेल का..??

__ की मग खरोखरंच् तिचा आत्मा कालच्या पावसाळी रात्री झोपडीत आला होता..??

ह्या प्रश्नाने मात्र माझं हृदय बंद पडतेयं असं मला वाटू लागलं.

छे... छे... असं कसं घडू शकेल...??

भुत-प्रेत, आत्मा सगळं थोतांड आहे... माझा विश्वास नाही ह्या भाकड कथांवर ..!!

__ मात्र मनुष्य आणि जनावरे यांच्या पलीकडे जर एखादी सृष्टी असेल तर तिच्यापुढे माझा टिकाव कसा लागू शकेल..??

हे खरं असू शकेल का....??

नाहीतर मग मला वेड लागू पाहतेय् का...?

__की मग माझ्या डोक्यात एखादी गूढ कथा शिजू लागलीयं..??

अबोली' खरंच अस्तित्वात होती का..??

की माझं मन अबोलीची कहाणी रचू लागलंय्.. की मनातलं एखादं सुप्त आकर्षण असावं हे...??

आपण अबोलीचा शोध घ्यायला पाहिजे..! मी स्वतःशीच ठरवलं.

आजचं खाली फार्महाऊसवर जाऊन नंदूच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीवर कुणी तरुणी तीन वर्षापूर्वी जंगलात गायब झालीयं का म्हणून शोध घ्यायचा, हे मी मनात ठरवू लागलो.

मात्र जर अशी तरुणी कुणी अस्तित्वातच नसेल तर मग आपल्याला सगळे वेड्यात काढतील की , ह्या झपाटलेल्या जंगलात आपण भुताटकीने पछाडलोयं असं म्हणतील..??

वेड्यावाकड्या विचारांनी माझं डोकं चौफेर वेढलं गेलं.

मी झोपडीच्या खिडकीतून बाहेर नजर फिरवली. सूर्याच्या कोवळ्या किरणात अबोलीच्या फुलांचा रंग अजूनच उजळला होता.

ह्या जागी आता क्षणभरही थांबता कामा नये, मी मनाशी ठरवित उठू लागलो , तशी भयंकर जीवघेणी कळ माझ्या कंबरेतून निघाली. कुणीतरी कंबरेतून करवत फिरवल्यासारख्या वेदना मला होऊ लागल्या.

मी धडपडून खाटेवर कोसळलो. मला काय होतं होतंय् तेच मला समजत नव्हतं. अंगातलं त्राण हळूहळू कमी होऊ लागलं. पायाखालची जमीनच कुणीतरी अचानक काढून घेतल्यासारखं झालं..!

असंख्य सुयांनी कुणीतरी माझ्या शरीरातल्या नसांतून रक्त
शोषू पाहतेय् ..फितूर झालेलं शरीर झोपडीच्या दारापर्यंत जाऊ पाहतेयं.. पण ते दाराबाहेर पडू शकत नाहीये.. अख्खा डोंगर उतरून मी फार्महाऊसवर पोहोचू शकेल एवढे बळ माझ्या शरीरात उरलेले नाहीये.

मला काहीच कळत नाहीये.

मला ह्या जंगलात, झोपडीत जे जाणवलं ते स्वप्नं, भास अथवा वास्तव जे काही असेल ते सारं - सारं मी डायरीत उतरतोयं.. . हातात थोडेफार बळ आहे तोपर्यंतच् ...!!

आता ह्या जंगलातून , ह्या झोपडीतून माझी सुटका होणे मला अशक्यप्राय वाटू लागलंय्.

या... कुणीतरी या इथे जंगलात... वाचवा मला...!!

वैदेही .. ये ... धावत ये ... मला वाचव ... मी अडकलोयं इथे ह्या घरात... ह्या जंगलात... तुझी भीती खरी ठरलीय्.. वैदेही, मला क्षमा कर...मी तुझं ऐकायला हवं होतं... ये ..गं इथे...मला सांग की, हे सगळे भास आहेत.. जे घडतंय् ते सारे माझ्या मनाचे खेळ आहेत ...!!

मला जोपर्यंत हे कुणी सांगणार नाही तोपर्यंत मी इथेच अडकून पडणार आहे..

माझ्या शरीरातून असह्य कळा येताहेत... माझं शरीर पांढर-फटक पडू लागलंय्...

अक्राळविक्राळ मृत्यू मला समोर दिसतोयं...

ते रात्री पडणारं स्वप्नं, ती दार वाजवणारी ओलेत्या अंगाची तरुणी... नंतर पुढे घडणारं सारं....

तीन वर्षापूर्वी त्या दोन वनरक्षकांना मृत्यूने असंच गाठलं असेल का..?? त्यांनी खरंच् काही अपराध केला असेल का..? त्यांनी केलेल्या अपराधाची मृत्यू हिचं शिक्षा मिळाली असेल का त्यांना..??

__ मग .. मग.. माझ्या हातूनही काही अपराध घडलाय् का....?? त्याच अपराधाची शिक्षा भोगतोयं का मी अशी..??

स्वप्न... भास ...की ... वास्तव..??

काय हे असं चमत्कारिक घडतंय् माझ्यासोबत...??

जीव वाचवायचा असेल तर इथून पळून जायला हवं.. पण कसं जाणारं...??

माझं मन माझं पक्कं वैरी झालंय्...

माझं अपराधी मन खेळ खेळतंय् का माझ्याशी..??

वेळ सरत चाललीयं... माझा श्वास कधीही थांबेल असं वाटू लागलंय्..

मला माहीत आहे, मला वाचवायला इथे कुणीही येणार
नाहीये..

नंदूने मला सांगितलं होतं की, जंगलात, ह्या घरात रात्री वस्तीला राहणारा मनुष्य पुन्हा कधीच जिवंत खाली परतत नाही ...ते सत्य असेल का...??

जर ते सत्य असेल तर मग फक्त आणि फक्त मृत्यूच माझी इथून सुटका करू शकेल. मी नंदूचं ऐकायला हवं होतं का..??

माझ्या हातातलं बळ संपत चाललंय्... शरीरातलं सगळं रक्त शोषलं जातंय्...!!

मी खिडकीतून पाहतोय् .. माझ्या थकलेल्या डोळ्यांना अबोलीचा ताटवा दिसतोय्.. ती फुलं दिसताहेत , पण.. पण अबोली कुठेही माझ्या नजरेस पडत नाहीये..... ते गीतांचे स्वरसुद्धा कानांवर पडत नाहीयेत आता...!

__मात्र तो अबोलीच्या फुलांचा ताटवा आज विलक्षण तेजाने बहरू लागलाय्.. त्या फुलांचा रंग तांबड्या रक्तासारखा होऊ लागलाय् का..??

हो.. हुबेहुब दिसतोय् मला ... अबोलीच्या देहाचं रक्त शोषून झाला होता अगदी तस्साच.. स्वप्नांत पाहिल्यासारखाच्!

अबोलीच्या झाडांच्या मुळांना, त्या फुलांना माणसांच्या रक्ताची चटक लागली असेल का....??

माझं रक्त शोषलं जातंय्.... ती अबोलीच्या झाडांची मुळं मला घट्ट जखडून ठेवू पाहताहेत...

मला वाचवा कुणीतरी ... बाहेर काढा इथून....!! मी फसलोय् ह्या झोपडीत.. ह्या जंगलात...!!

.. या ...कुणीतरी .. या इथे..! वाचवा मला...

माझ्या हातातलं उरलंसुरलं बळ खचत चाललंय्... .. मी .. मी ...नाही लिहू शकणार आता पुढे...

आता फक्त आणि फक्त शेवटचं लिहितोय्...

यदा-कदाचित तुम्ही चुकून कधी इथे आलात तर रात्री जंगलात, ह्या घरात राहायची घोडचूक करू नका... आणि तुम्हांला माझी एक कळकळीची विनंती आहे की, जर का ही माझी डायरी तुमच्या हाती लागली तर तेवढी ती माझा दिग्दर्शक मित्राच्या, देवराजनच्या हाती पोचती करा..!!

कदाचित आपल्या मित्राला श्रदांजली म्हणून , मी जे ह्या डायरीत लिहिलंय् त्यावर तो भविष्यात एखादा चित्रपट बनवेल ...जो मी लिहिलेल्या माझ्याच सत्यकथेवर आधारीत असेल... तो चित्रपट नक्की सुपरहिट होईल...

मला..मला... पूर्ण खात्री आहे.

__आणि मग त्या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून एखादा पुरस्कार मरणोत्तर जाहीर होईल .. मी रसिकांमध्ये प्रसिद्ध होईल.... खूप ...खूप ... कौतुक होईल माझं.....माझ्या टिकाकारांची तोंड एका झटक्यात बंद होतील.. बघाच तुम्ही..!!

__मात्र हे पाहायला मी जिवंत नसेन...!

माझी लेखणी हातातून खाली पडू पाहतेय्...

माझ्या... हातातून भयंकर कळा येताहेत..माझी हाडं गोठू पाहताहेत....

तुम्ही.. तुम्ही .... ही डायरी तेवढी पोचवालं ना देवराजनकडे...??

कराल ना माझ्यासाठी एवढं..??

प्लीज... प्लीज ... तेवढं करा हो... माझ्यासाठी....!

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - कथेत लिहिलेल्या स्थळांची नावे प्रत्यक्ष वास्तवात असली तरी , सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेतून अंधश्रद्धा पसरवणे कथालेखिकेचा हेतू नाही. )

अवांतर - आईकडून बालपणी एक लोककथा ऐकली होती. ती अशी की, लाकडे गोळा करायला गेलेली एक तरुणी जंगलात हरवते. जंगलातली काही रानटी माणसं तिचा जंगलातल्या त्यांच्या देवाला बळी देतात. तिचं रक्त जिथे जमिनीवर सांडते , तिथे मोगर्‍याची झाडं उगवतात. ती फुलांनी नेहमीच् बहरलेली असतात. जेव्हा त्या तरुणीचा भाऊ बहिणीचा शोध घेत त्या मोगर्‍याच्या झाडांजवळ येतो आणि मोगर्‍याची फुलं तोडू पाहतो तेव्हा त्या झाडांतून गाण्यांचे स्वर निघू लागतात.

हात नका लावू ... फुलं नका तोडू ...
माझे तलवारीचे घाव दुखतात...!!

अश्या अर्थाचे ते गीताचे बोल असतात..

ते व्याकूळ स्वर भाऊ ओळखतो... आपल्या बहिणीचा आवाज ऐकून खूप आक्रोश करतो .... अश्या अर्थाची ती लोककथा होती..

ते गाणं जेव्हा कथा सांगताना आई म्हणून दाखवायची.. तेव्हा मला खूप रडू कोसळायचे..!!

आता एखाद्या दिवशी माहेरी जाऊन पुन्हा एकदा ती कथा आईकडून ऐकेन... तेवढाच बालपणींच्या आठवणींना उजाळा मिळेल...!

___________________ XXX___________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा लेखक चांगला वागला असता तर तिची मुक्तता करू शकला असता, हा एक वेगळा शेवट सुचला म्हणून लिहीले.

कथा उत्तम..

ती खरंच होती ? कि भास ?
कि स्वप्नं ? कि मनाचे खेळ होते ते ?
गुंगवून टाकलंय !!!!
असतात एकेका जागेचे गुणधर्म... Happy
मस्त आहे कथा. आवडली !!!

सामो - अगं, अश्या बऱ्याच लोककथा सांगायच्या पूर्वी वयस्कर स्त्रिया.. आता कुणाला आठवतात की नाही काय माहित.. गोष्टी सांगणाऱ्या आज्यांची ती पिढी जवळजवळ संपलीय आता..!

च्रप्स - तुमचा प्रामाणिक प्रतिसाद आवडला.. पहिला भाग जेवढा उत्कंठावर्धक झाला तेवढे पुढचे भाग होऊ शकले नाहीत त्याबद्दल क्षमस्व..! हे अपयश मान्य करायला हवंच्.. मात्र अश्या प्रतिसादांमुळे आपल्या लेखनातल्या कमतरता आपल्याला समजतात ,त्या सुधारायचा प्रयत्न करता येतो हे मात्र खरं..!. तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी खूप आभार..!!

धनवन्ती - . धन्यवाद,. तुम्ही सुचवलायं तसाही शेवट करता आला असता... तो पण छानच झाला असता... खरंतर जो शेवट पहिल्यापासून डोक्यात होता तशीच कथा लिहिली. कथा पूर्ण लिहिल्यावर अजून एक शेवट लिहावासा वाटला होता, कथेतली इतर पात्र जशी देवराजन, वैदेही, विकास, नंदू, अबोली ह्यांना पुढच्या कथेत आणून थोडासा प्रेमत्रिकोणचा रहस्यमय तडका द्यायचा विचार केला होता.. पण कथा पूर्ण झाली होती म्हणून तो शेवट बारगळगला.

मामी - धन्यवाद, हो, वैदेहीच वाईट वाटतेच.. ऐकायला हवं त्याने तिचं..!

खरंच होती ? कि भास ?
कि स्वप्नं ? कि मनाचे खेळ होते ते ?
असतात एकेका जागेचे गुणधर्म... >> रानभुली, धन्यवाद..!!

कथेची आता थोडीशी चिरफाड करते..

पहिल्यापासूनच नैराश्यात असलेला एक लेखक, हट्ट करून जंगलात जातो.. त्याच्या दुर्दैवाने त्याचा मित्र विकास त्याला भेटत नाही.. तिथे नंदूसारखा अडाणी माणूस त्याला जंगलाची, जंगलातल्या घराची भीती घालतो.. कदाचित विकास भेटला असता तर त्याने काही वेगळं सांगितलं असतं.. जंगलात जाताना नंदूच्या चेहर्‍यावरच्या भीतीची आणि त्याने सांगितलेल्या कहाणीची नकळत नोंद लेखकाचे सुप्तमन घेत राहतं..
जंगलातल्या स्तब्धतेत आणि एकाकीपणात त्याच्या मनातली भीती उफाळून येतेच. कितीही मनात हिंमत असली तरी भीती हा मनुष्याचा गुणधर्म आहेच.. दोन वनरक्षकांचा मृत्यू कसा झाला असेल ह्या कुतुहलाने त्याच्या मनाने कहाणी रचणं सुरु केलं.. भूता- खेतांच्या अफवा उठवणारे लोकं अस म्हणतात की, अपघाती मेलेले जीव आत्मा रूपात येतात.. एखादी अकाली गेलेली स्त्री हडळ बनून फिरते .. आधीच नैराश्यात असलेल्या लेखकाला त्याचा ह्या गोष्टींवर विश्वास जरी नसला तरी त्याच्या मनावर नंदूने सांगितलेल्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतोच.. मुळात लेखनासाठी असणारी कल्पनाशक्ती आणि भयकथा, गूढकथा लेखनाची असणारी आवड त्याच्या डोक्यात अजून भर घालतात. त्याच्या मनातले सुप्त लैंगिक आकर्षण त्या एकाकीपणात उफाळून येऊ पाहते.. पुढे स्वप्नं... भास.. की वास्तव ह्या मध्ये तो अडकत जातो.

एखादी जागा झपाटलेली आहे असं कुणी सांगितलं आणि त्याजागी आपल्या धडपडण्याने ठेच जरी लागली तरी हि जागा वाईट आहे म्हणूनच असं घडलं असेल असं वाटू शकते. कावळा बसणं आणि फांदी तुटणं हा निव्वळ योगायोग असू शकतो.. उगाच जागेची बदनामी होते.

नैराश्यात असलेल्या लोकांना काहीही शारीरीक वेदना नसली तरी त्यांना आपल्याला खूप काही होतंय.. आपण खूप थकलोयं असं वाटू शकतं.. ( हे वाचनात आलंय् ..)
कथानायकाला मानसिक थकवा आलाय् फक्त... तरीही त्याला आपल्याला मृत्यू येणार असं वाटतंय् कारण इथून कुणीही जिवंत परतत नाही हे त्याने पक्कं मनात धरलंय्..

तो एवढा टोकाच्या नैराश्यात आलाय्... तरी प्रसिद्ध होण्याचा हव्यास काही केल्या सुटत नाहीये.. शेवटी मनुष्य स्वभाव..!

अपयशाने त्याला नैराश्य आलंय् हे निश्चित..!

अबोली हि त्याच्या मनाने रचलेली कहाणीचं असावी..

थोडक्यात मानवी मनाची गुंतागुंत कथेत मांडण्याचा लहानसा प्रयत्न केलाय् कितपत जमलाय् ते वाचकच जाणतील.

मला कथेत काय मांडायचं होतं ते कदाचित शब्दांत मांडायला जमलं नसेल . काही त्रुटी असू शकतील कथेत..!

वीरूजी - धन्यवाद, लेखकाने मदत मागितलीयं आपल्याकडे .. जायला पाहिजे का तिथे..?? ( रागावू नका बरं .. मस्करी करतेय)

rmd,- धन्यवाद तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

शर्मिलाजी , तुम्ही कथेच्या सलग भागांवर प्रतिसाद दिलात .. खूप धन्यवाद तुम्हांला..!!

सामो - अगं, अश्या बऱ्याच लोककथा सांगायच्या पूर्वी वयस्कर स्त्रिया.. आता कुणाला आठवतात की नाही काय माहित.. गोष्टी सांगणाऱ्या आज्यांची ती पिढी जवळजवळ संपलीय आता..!
खरं आहे न वाईट वाटत राहतं .

बिपिनजी खूप आभार..!
माझ्या लेखनाचा उत्साह वाढवणाऱ्या तुमच्या नेहमीच्या प्रतिसादासाठी..!