अबोली...! (भाग -२)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 4 May, 2022 - 07:40

अबोली ..!! ( भाग - २ )
______________________________________'___

वेड्या-वाकडया विचारांच्या वावटळीत मेंदूच्या ठिकऱ्या जरी उडत असल्या तरी पुढे काय घडलं आणि माझ्यासोबत काय घडतंय् ते लिहिणं मला भाग आहे.

मी विक्याच्या फार्महाऊसवर पोचलो, तेव्हा सूर्य डोक्यावर होता. विक्या नेमका कामानिमित्त आठ - दहा दिवसांसाठी बाहेरगावी गेलेला. तो जरी तिथे नव्हता तरी बाहेरगावी जाताना माझ्या राहण्याची , खाण्या- पिण्याची सोय करण्याची संपूर्ण जबाबदारी त्याने फार्महाऊसवरचा त्याचा विश्वासू नोकर असलेल्या नंदूवर सोपवली होती.

विक्याचे फार्महाऊस आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडेल अगदी अस्साच आहे.

त्याची बागायत डोंगराच्या पायथ्यालगत असून डोळ्यांना गारवा देणारी विस्तीर्ण हिरवीगार वनराई बागायतीच्या आजूबाजूला पसरलेली आहे.

फार्महाऊसवर माझ्या पाहुणचाराची व्यवस्था नंदूने अगदी चोख ठेवली होती. दुपारचे सुग्रास भोजन उरकल्यानंतर नंदूसोबत मी आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यास निघालो.

बागायतीत असलेल्या वृक्षांची, फळांच्या - फुलांच्या एकेका झाडांची नंदू मला ओळख करून देत होता.

बागायतीत फिरता - फिरता माझं लक्ष अचानक डोंगरमाथ्यावर गेलं. डोळे ताणून पाहिल्यावर लांबून इवलंस असं एक कौलारू झोपडीवजा घर माझ्या दृष्टीस पडलं. डोंगराच्या पायथ्यापासून ते अगदीच पिटुकलं दिसत होतं.

" नंदू ते घर कुणाचं आहे रे..?? " नंदूला जवळ बोलावित त्या घराकडे इशारा करत मी विचारलं.

" ते डोंगरावरचं घर का..?? वनखात्याचं आहे ते.. वनरक्षकांना जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलंय् ..!!" नंदू तुटकपणे उत्तरला.

" सध्या कुणी राहायला आहे का तिथे..??"

" कुणीही राहत नाही त्या घरात..!"

" मग मला घेऊन चल तिथे... !"

" कशाला..?" नंदू खुळ्यागत माझ्याकडे पाहू लागला.

" मनाजोगता एकांतवास मिळेल मला त्या घरात..!!" मी उत्तरलो.

मला त्या घराची, डोंगरमाथ्याची विलक्षण ओढ लागली होती. त्या एकाकी घराबद्दल माझ्या मनात दबा धरून बसलेले सुप्त कुतुहूल जागे झाले.

" वरच्या जंगलात कुणीही जात नाही शेठ, तुम्ही पण नका जाऊ तिथे..!"

" का बरं..??""

नंदूने माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

" अरे सांग ना, का जात नाही तिथे कुणीच..?? त्या घरावर का बहिष्कार टाकलाय् सगळ्यांनी..??" माझी उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती.

" डोंगरावरचे जंगल आणि ते घर झपाटलेले आहे शेठ..!" एका झटक्यात नंदूने उत्तर दिले.

नंदूच्या ह्या उत्तरावर मात्र मी मनसोक्त हसून घेतले.

नंदू बिचारा इवलंस तोंड करुन माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत उभा राहिला.

" भूतं - बितं राहतात की काय तिथे..??" आपलं हसू कसंबसं आवरत मी म्हणालो.

" शेठ, तुम्ही शहरी माणसं, तुम्हांला नाही पटायचं मी काहीही सांगितलेलं... जाऊ द्या तो विषय..!"

नंदूच्या तोंडून सारखं - सारखं मला 'शेठ.. शेठ..' असं संबोधणं कानांना ऐकायला फारच गंमतीशीर वाटत होतं.

" बरं मला सांग नंदू, जगावेगळं , विपरीत असं काही घडलं होतं का तिथे..?" मी गंभीर होत विचारलं.

" तीन वर्षापूर्वी वनखात्याचे दोन वनरक्षक मरून पडलेले सापडले होते ...त्या जंगलातल्या घराजवळ..!" भीतीचे सूक्ष्म जाळे नंदूच्या चेहर्‍यावर पसरले.

" अचानक मेले होते का ...?? काय झालं होतं त्यांना..??"

" तिथेच तर खरी गोम आहे ना शेठ, त्यांना काय झालं, ते कसे मेले, त्यांना कुणी मारलं तेच् माहित नाही ना कुणाला..!!"

थोडा वेळ थांबून दीर्घ श्वास घेत नंदू पुन्हा सांगू लागला.

"कुणी म्हणतंय् की, चोरांनी लुटून त्यांना जीवे ठार मारलं, तर कुणी म्हणतंय् की, जंगलातल्या हडळीने त्यांचा घास घेतला..!!"

" काय सांगतोस..?? हडळीने ठार मारलं त्यांना..??" मी माझं हसू दाबण्याचा प्रयत्न करू लागलो.

" हो शेठ, मायावी रूप घेणारी हडळ वास करते तिथे..!"

" तर मग मी तिथे नक्की जाणार...!"

" अहो शेठ, माझं ऐका .. तिथे जाण्याचा हट्ट नका धरू..!" नंदू मला समजवताना अक्षरशः घायकुतीला आला.

" भूत - पिशाच्च , हडळ , राक्षस काहीही नसते रे नंदू..! ह्या सर्व माणसांनीच पसरवलेल्या अंधश्रद्धा आहेत आणि ऐक, पृथ्वीवर भुतं जर असतीलच् ना तर ती फक्त आणि फक्त माणसांच्या वृत्तीत , त्यांच्या आचार - विचारात, त्यांच्या वागण्या- बोलण्यात वास करून राहत असतील..!!" मी माझे विचार नंदूला ऐकवू लागलो.

"शेठ, तुम्ही सांगताहेत ते खरं असेलही, पण मी पडलो गावंढळ आणि अडाणी माणूस, तुमच्यासारख्या शहरी, शिकलेल्या माणसाशी बोलण्यात बरोबरी करता येणार नाही मला , पण वंगाळ असं काहीतरी आहे तिथे वर जंगलात.. .!!"

" चल दाखव मला ते जंगल..!" मी सुद्धा इरेला पेटलो होतो.

" तुम्हांला तिथे घेऊन गेलो तर माझा शेठ मला कामावरून हाकलून लावेल.. तुमची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून बाहेर गेलाय् माझा शेठ...!" नंदू केविलवाणा झाला.

" त्याची चिंता नको करू तू, मी समजावेन तुझ्या शेठला..!!" मी त्याला धीर देत म्हटलं.

" पण अंधार व्हायच्या आत परतायचं आपण तिथून..!" माझ्या हट्टापुढे नंदूचा नाईलाज झाला.

" नाही नंदू, मला खरोखरच एकांतवास हवाय.. मी त्या घरात माझी कथा लिहून पूर्ण होईपर्यंत राहेन..!"

मला वेड लागलं असावं अश्या चमत्कारिक नजरेने नंदू माझ्याकडे पाहत म्हणाला,

" शेठ, पाया पडतो तुमच्या पण तेवढा हट्ट सोडा, त्या जंगलात रात्री वस्तीला राहणारी माणसं पुन्हा जिवंत परतत नाहीत..!"

दिवसाढवळ्या माझ्या डोळ्यांसमोर सुंदर प्रेमकथा आकार घेऊ लागली होती. संपूर्ण चित्रपट आणि त्या चित्रपटातल्या नायक- नायिकेचा प्रणय माझ्या डोळ्यांसमोर फुलारू लागला होता. ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून पुरस्कारावर माझे नाव कोरले जात होते. आयुष्यात प्रत्येकालाच ज्या तीन गोष्टींचा हव्यास असतो त्या म्हणजे प्रसिद्धी , पैसा आणि यश .. !! त्या आपणहून माझ्या पायाशी लोळण घेत होत्या. दिवास्वप्न पाहण्यात मी अगदी दंग होऊन गेलो होतो.

नंदूचं बोलणं म्हणजे माझ्यासाठी भाकड कथा होत्या.

__ आणि असल्या भाकड कथांना मी भीक घालणार नव्हतोच.

ज्या जागेच्या, शांततेच्या शोधात मी होतो, ती जागा मला डोंगरमाथ्यावरच्या जंगलात लाभण्याची अधिक शक्यता होती. अशी जागा; जिथे माझ्या एकांतवासात , मला हव्या असलेल्या मनःशांतीत कुणीही व्यत्यय आणणारं नव्हतं... जिथे फक्त मी आणि माझी लेखणी दोघेचं एकमेकांच्या साथीला असणार होतो. मला आता बिल्कुल मागे फिरायचं नव्हतं.

फार्महाऊसवर राहून आपलं काम पूर्ण करावं असं नंदूने मला परोपरीने समजावलं. मी त्याच्या सांगण्याला बधत नाही ते पाहून, अखेरीस माझ्या हट्टापुढे हात टेकत तो माझ्यासोबत जंगलात येण्यास तयार झाला.

मी पंधरा दिवस पुरेल एवढे सामान बांधून घेतले. नंदू माझे सामान घेऊन माझ्यासोबतीने डोंगर चढू लागला. पायाखालची वाट चालताना तो एक चकार शब्दही माझ्याशी बोलत नव्हता.

अंधश्रद्वेवर भलं मोठं भाषण देत मी नंदूच्या साथीने डोंगर चढू लागलो. त्याच्या मनातली भुता-खेतांची भीती कमी व्हावी म्हणून माझे तोकडे प्रयत्न सुरू होते. पायवाट चालताना मध्येच मी त्याचा चेहराही निरखित होतो. त्याच्या डोळ्यातली अनामिक भीती मला स्पष्ट दिसू लागली होती.

अचानक चालता - चालता नंदू मध्येच थांबला. आपल्या खांद्यावरचे सामान खाली ठेवत , मी परत माघारी फिरावं म्हणून पुन्हा एकदा माझी समजूत घालू लागला. तुला यायचं नसेल तर तू जा खाली, मी जातो एकटा असं मी ठामपणे बजावल्यावर पुन्हा एकदा माझ्यासोबतीने तो पायाखालची वाट तुडवू लागला.

संध्यासमयी डोंगरावरच्या जंगलातून वाट काढताना माझं पूर्ण लक्ष पायतळी लागलं होतं.

वर जंगलात जाणारी पायवाट ओढ्या- ओहोळांतून, काट्या-कुट्यातून जात होती. आजूबाजूला घनदाट उंचच उंच वृक्षांची गर्दी होती. सूर्याचा प्रकाश दिवसाढवळ्या सुद्धा त्या वृक्षांना भेदून आतपर्यंत पोहचत नव्हता.

माझं संपूर्ण लक्ष पायतळाशी असल्याने आजूबाजूला काय आहे हे माझ्या जास्त ध्यानात आले नाही. मी थोडासा अंदाज घेतला, पण रातकिड्यांची किरकिर आणि हवेतला गारवा सोडला तर , त्या पलीकडे मला काहीही जाणवलं नाही..

सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. डोंगरतळापासून वर दिसणारे बांबू आणि कुडाच्या भिंतीचे झोपडीवजा ते घर थोडे उंचवट्यावर होते.

मी आणि नंदू झोपडीचे दार उघडून आत गेलो.

नंदूने घाबरतच आत प्रवेश केला. बर्‍याच वर्षांपासून पडीक असल्याने झोपडीत धूळ आणि जळमटांची भर होती. आतली जमीन शेणाने सारवलेली होती पण ठिक-ठिकाणी तिचे पोपडे निघालेले होते. नंदूच्या सोबतीने मी झोपडी आतून स्वच्छ करून घेतली. त्याने माझं सामान झोपडीच्या आत व्यवस्थित लावलं. कंदील व्यवस्थित घासून - पुसून लख्ख करून त्याची वात पेटवली.

हे सगळं करत असताना नंदूच्या सगळ्या हालचालींवर माझं बारीक लक्ष होतं. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता.

" पुन्हा एकदा सांगतो शेठ, रात्री नका राहू ह्या जंगलात. पाहिजे तर उद्या सकाळी पुन्हा या इथे, तुमचं काम पुरं करा आणि दिवस मावळायच्या आत खाली फार्महाऊसवर परत फिरा ..!" काम आटपल्यावर पुन्हा एकदा माझ्याजवळ येऊन तो हळू आवाजात म्हणू लागला,

मी त्याला स्पष्ट नकार दिला.

उद्या तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो , असं म्हणत तो घाई-घाईने निघू लागला.

काही हवं असेल तर मीच खाली फार्महाऊसवर येईन , तू इथे येऊन माझ्या एकांतवासात जराही व्यत्यय आणायचा नाही , अशी सक्त ताकीद मी नंदूला दिली.

माझं अडेलतट्टू बोलणं गपगुमान ऐकून घेत, एक दिर्घ निश्वास सोडत नंदू माघारी फिरला.

मी त्याला निरोप दिला.

" काळजी घ्या शेठ, आणि काही त्रास झाला तर लागलीच खाली फार्महाऊसवर परता..!" असं म्हणत हातातली टॉर्च पेटवत अंधुक प्रकाशात तो दिसेनासा झाला.

थोड्याच वेळात जंगलावर अंधाराचे साम्राज्य पसरले. संपूर्ण परिसराला अंधाराने वेढून टाकले. आकाशात चांदण्याची रोषणाई चमकू लागली. रातकिड्यांची किरकिर जंगलात जाणवणाऱ्या त्या विलक्षण स्तब्धतेला जणू भंग करू पाहत होती.

दिवसभराच्या दगदगीने मला थकवा जाणवू लागला होता. पोटातली भूक जोरदार खवळली. नंदूने बनवून आणलेल्या गावरान कोंबडीच्या झणझणीत रश्श्यावर व तांदळाच्या भाकरीवर मी तुटून पडलो.

भरपेट जेवण करून घेत, झोपडीचे दार व्यवस्थित आतून लावून घेऊन मी कंदिलाची वात मोठी केली. कंदिलाच्या उजेडात डायरी लिहायला घेतली, पण दिवसभराच्या दगदगीने आणि संध्याकाळी झालेल्या पायपिटीने माझे डोळे पेंगाळू लागले होते.

झोपडीच्या कुडाच्या भिंतीला बांबूची एक लहानशी खिडकी होती. त्या खिडकीतून आकाशात पसरलेल्या टिपूर चांदण्याचा उजेड आत झिरपत होता.

झोपडीत आधीपासूनच असलेल्या खाटेवर मी अंग टाकलं आणि निद्रादेवीला कधी शरण गेलो ते मला समजलंच नाही.

कधी नव्हे ती सकाळी मला लवकर जाग आली. झोपडीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि समोर दृष्टीक्षेप टाकताच माझी पाऊले आणि नजर दोन्हीही जागच्या जागी खिळली.

काय सुंदर अविष्कार होता निसर्गाचा..!!

ओहो...! निसर्गाचं असं विलक्षण मोहक रूप माझ्या उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहत होतो.

कथा-कादंबरीत, चित्रपटात तर मी निसर्गाचं यथासांग गुणवर्णन वाचलं व पाहिलं होतं, पण इथे तर प्रत्यक्षात अनुभवत होतो.

सूर्याची कोवळी किरणे सभोवतालच्या झाडांच्या शेंड्यातून आपले सोनेरी रंग उधळत होती. आसपासच्या परिसरावर धुक्याची चादर अंथरली होती. कळीचं फूल व्हावं तशी सकाळ उमलली होती. चारही दिशा उजळल्या होत्या. आजूबाजूच्या वृक्षांवर पाखरांची शाळा भरली होती जणू..!! त्यांचा किलबिलाट कानांना अतीव मधुर भासत होता.

इतकी सुंदर सकाळ आयुष्यात पहिल्यांदाच मी अनुभवत होतो. बाजूला लहानसा खळखळून वाहणारा ओढा होता. एखाद्या चित्रात रंगवलेल्यासारखी भासणारी ती सकाळ आणि आजूबाजूचा परिसर पाहून मनाला शांत वाटू लागलं होतं.

निसर्गाचे हे मोहक दृश्य नजरेस पडल्याने मागील काही दिवसांपासून मनावर आलेले नैराश्याचं मळभ अलगद दूर होऊ पाहत होते.

आजबाजूला फिरत असताना डोंगरमाथ्यावरून माझी नजर खाली गेली , पाहिलं तर अफाट विस्तारलेला तानसा तलाव माझ्या दृष्टीस पडला. त्या तलावाचं सौंदर्य मी डोळ्यात साठवू लागलो.

चारही दिशांना फक्त आणि फक्त मला एकट्यालाच जाणवणारी स्तब्धता आणि घनदाट वनराई यांच्याशिवाय दुसरं कुणीही तिथे नव्हतं.

निसर्गाच्या ह्या विलक्षण मोहक सौंदर्याच्या, तिथल्या जाणवणाऱ्या स्तब्धतेच्या प्रेमात मी अक्षरशः वेडापिसा झालो.

आपलं आवरून घेतल्यावर डोक्यात हॅट घालून स्वच्छंदपणे मी आजूबाजूच्या परिसराचा धांडोळा घेण्यास निघालो.

झोपडीच्या खिडकी लगतच्या बाजूने येत असताना अबोलीच्या फुलांचा सुंदर ताटवा माझ्या दृष्टीस पडला.

फुलांनी बहरून आलेला तो ताटवा पाहून मनाला प्रसन्नता लाभू लागली. लगतच्या ओढ्याच्या पाण्यात मी स्नान केले. तिथल्या गहिर्‍या शांततेच्या मोहात पडून मी कडुनिंबाच्या झाडाखाली बसून काही काळासाठी ध्यान- धारणा करू लागलो.

झोपडीच्या बाजूला तीन दगडांची चूल मांडून त्यावर स्वतःसाठी फक्कडसा चहा बनवून घेतला. गरम चहा पोटात गेल्यावर अंगात तरतरीतपणा आला.

दिवसाची सुरुवात खूपच प्रसन्न झाली होती. माझ्यासाठी जंगलातला हा एक वेगळा आणि विलक्षण अनुभव होता.

लेखनासाठी जसं वातावरण मला अपेक्षित होतं , अगदी तसंच् वातावरण त्या जागी मला लाभलं होतं. निसर्गाशी एकरूप होत आपल्या हातून अतिशय सुरेख कथा लिहिली जाईल ह्याची मला आता खात्री वाटू लागली होती.

मी झोपडीत परतलो.

कथेची नायिका वैदेही आणि नायक म्हणून स्वतःला त्या जागी कल्पून मी लेखनाला प्रारंभ केला.

वैदेहीचा विचार मनात येताच वाटलं की, ती जर इथे आली असती, तर तीसुद्धा आपल्यासारखीच ह्या जागेच्या प्रेमात पडली असती. लग्नानंतर मधुचंद्रासाठी मी तिला ह्या शांत ठिकाणी घेऊन येण्याचे ठरविले. तिने नक्कीच या जागी येण्यास नकार दिला नसता. ह्या गहिर्‍या शांततेत , निसर्गाच्या कुशीत फक्त मी आणि वैदेही एकमेकांच्या साथीला असू ह्या कल्पनेनेच् माझे तन - मन रोमांचित झाले.

मोठ्या उत्साहाने माझ्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. लेखन करते समयी काळ-वेळेचे भान सुद्धा मला उरले नव्हते.

बहरलेल्या प्राजक्ताची नाजूक फुले झाडावरून टपटप् खाली जमिनीवर पडावीत, तसे शब्द माझ्या लेखणीतून कागदावर उतरू लागले. पहिल्या दिवशीच कथेने चांगलाच वेग घेतला होता.

पोटातल्या भुकेने जेव्हा हाक दिली , तेव्हा मात्र लेखन थांबवून जागेवरून उठणे मला भाग पडले. जडावलेलं अंग मोडून मी जरा आळोखे - पिळोखे देतच होतो तेवढ्यात__

__अचानक गाण्याचे मंजूळ स्वर माझ्या कानी पडू लागले. आवाजावरून तो आवाज एखाद्या स्त्रीचा असावा ह्याची मला खात्री पटली.

मी चमकलो.

अश्या वाळीत टाकलेल्या, एकांत ठिकाणी, घनदाट जंगलात जिथे पुरुष माणूससुद्धा दिवसा-ढवळ्या येण्यास भितो , तिथे एखाद्या स्त्रीचे अस्तित्व कसे काय असू शकेल ..???

मला प्रश्न पडला.

मग मला गाण्यांच्या स्वरांचा भास झाला की काय..??

असा कसा भास होऊ शकतो आपल्याला..?? आपल्या कानांनी गाण्याचे स्वर ऐकलेत आपण..!!

हो, तो नक्कीच भास नव्हता.

मी झटक्यात झोपडीबाहेर आलो. झोपडीच्या आजूबाजूला आवाजाचा कानोसा घेऊ लागलो..

मात्र मी झोपडीबाहेर येताच कानावर पडणारे गाण्याचे स्वर अचानक थांबले होते.

आपल्याला नक्की भास तर झाला नाही ना..??

माझ्या डोक्यात गोंधळ वाढला.

मला भुता - खेतांची, माणसांची , जनावरांची, चोर- चिलटांची कुणाची म्हणून भीती वाटत नाही. कुणी लुटारू जरी इथे आले ना, तरी एक- दोघांना मी नक्कीच भारी पडू शकेन एवढा विश्वास मनात आणि आपल्या शरीरात रग मी बाळगून होतो.

स्व:रक्षणासाठी जवळ चाकू आणि काठी मी बाळगली होती.

__पण ह्या विलक्षण स्तब्ध असलेल्या घनदाट जंगलात कदाचित अशी एखादी प्रवृत्ती असू शकेल, जी वास्तवातल्या सृष्टीपेक्षा वेगळी असू शकते , जी आपल्याला अज्ञात असेल या मनात आलेल्या विचाराने मी थोडासा चरकलो.

कदाचित असं काही अस्तित्वात असू शकणारही नाही, आपण जास्त खोलवर विचार करतोय् का बरं...??

आजकाल अति विचारात गुंतलेलं आणि नेहमीच कथा - कादंबऱ्यात अडकलेलं आपलं मन जंगलातल्या गूढ स्तब्धतेने काही काळासाठी भरकटलं गेलं असावं, अशी मनाची समजूत घालत मी झोपडीत परतलो. लेखनाला पुन्हा जोमाने सुरुवात केली.

__ तेवढ्यात पुन्हा तेच गाण्याचे स्वर माझ्या कानावर पडू लागले. आता ते स्वर अगदी जवळून आल्यासारखे भासू लागले होते. तारुण्याच्या उन्मादाने भरलेले गीताचे ते स्वर शेवटाला व्याकूळतेकडे झुकत होते. सुरुवातीला आनंदगीत असणाऱ्या त्या गीताच्या बोलांना शेवटी कारुण्याची किनार असावी असं ऐकताना जाणवत होतं.

वाऱ्याच्या थंड झुळूकांनी माझं शरीर शहारलं. डोक्यातील कोलाहल वाढला. लिहिणं गुंडाळून ठेवून मी व्हिस्की प्यायला सुरुवात केली.

जे घडतंय् ते वास्तव आहे की आपल्या मनाला निव्वळ भास होताहेत ..???

माझं डोकं बधीर होऊ लागलं.

क्रमश:

रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

_________________ XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान झाला आहे हा ही भाग.
उत्कंठा जास्तच ताणली गेली आहे. ही कला छान जमली आहे. Happy
प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायला आवडले असते, पण काही कारणाने शक्य होणार नाही याबद्दल वाईट वाटतेय. क्षमस्व !
शेवटच्या भागात मात्र नक्की नक्की आवडही कळवणार आणि प्रतिसादही देणार. Happy
पुलेप्र. .

वीरूजी, शर्मिलाजी, मनस्विता, जाई, सामो, धनवन्ती, च्रप्स, रानभूली .. धन्यवाद..!!

जाई - हो.. गूढकथा आहे थोडीशी..!!

सामो - पुर्नजन्म कथा नाहीये..!

धनवन्ती - हो, फार दिवसांनी लिहिली कथा.. लेखन करायचा आळशीपणा दुसरं काय..?? पण छान वाटलं तुम्ही असं विचारल्यावर..!!

रानभुली - क्षमा कसली मागतेस माझी..?? तुला जेव्हा जमेल , जसं जमेल तेव्हा वाच कथा..!! पुढच्या दोन भागात कथा संपेल आता ..!

कथेच्या प्रत्येक भागावर प्रतिसाद मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा धरणं गैर आहे असं मला वाटते आणि जेव्हा वाचकांचा प्रतिसाद मिळतो तेव्हा मानवी स्वभावधर्मानुसार आनंद होणं स्वाभाविकच आहे , मात्र वाचक वेळ काढून कथा वाचतात ह्याचा आनंद सर्वात मोठा आहे.

जेव्हा वाचून पूर्ण होईल तेव्हा कथेवर प्रतिसाद द्यायला मात्र विसरू नकोस .. कथा आवडली तरी अथवा नाही आवडली तरी...!!

सुरेख ! मध्ये २ दिवस धावती भेट दिल्याने नेमका दुसराच भाग आज आधी वाचला आणी उत्सुकता वाढली. लिखाणात पकड पण आहे आणी वेग पण आहे. रुपाली, असे सुंदर ठिकाण तुला सापुतारा व त्या पुढे नक्कीच अनुभवायला मिळेल. निर्भेळ हवा, रम्य निसर्ग. अश्या ठिकाणी माणसे फार कमी गेलीत.

Similar story by narayana dharap.>> असू शकेल अशी एखादी साम्य असलेली कथा..!! प्रामाणिकपणे सांगायचं तर मी धारपांच्या कथा वाचलेल्या नाहीत आणि गूढकथा म्हटलं की जंगल , गाण्यांचे आवाज, पावसाळी रात्र, शांतता हे येणारच.. हे सारं चित्रपटासुद्धा पाहिलंय त्यामुळे समान कथासूत्र असलेली कथा कुणालाही सुचू शकते पण त्यातली पात्रे, मांडणी ह्यामध्ये बराच फरक असणार.. !

रश्मीजी. - धन्यवाद, रश्मीजी, मी ४ वर्षापूर्वी सापुतार्‍याला जाऊन आलेयं.... निसर्गरम्य अस्साच आहे सापुतारा.... तिथे जाणारा रस्ताही खूप शांत आहे.. तिथे पुन्हा एकदा जायची इच्छा आहेच..!

ह्या कथेत उल्लेख केलेली स्थळं मात्र खरी आहेत .. कथा काल्पनिक असली तरी..!! शहापूरला सासरी जाताना प्रवासात मला नेहमी तानसा अभयारण्य आणि तानसा तलाव लागतो.. मला दिवसा-ढवळ्यासुद्धा तिथली शांतता गूढ वाटते. त्या निसर्गाच्या प्रेमात असल्याने मी नवर्‍याला गाडी थांबवायला लावून काही वेळ त्या रस्त्यात थांबतेच... त्या गूढ शांततेचा अनुभव घेते.. त्याच रस्त्यातून जाताना डोंगर्‍याच्या पायथ्याला एक झोपडीसारखं घर लागते.. अगदी एकटं.. मला नेहमीच भूल घालते ते झोपडीसारखं घर.. डोकं सारखं ह्या गोंष्टींच्या विचारात असलं की सुचतं असं काहीतरी...!

Andharatil oorvashi. Writer goes to haunted place to write a story. He has a young lady love . Sexy long haired ghost lady haunts him .

अमा, मी ती कथा अजिबात वाचलेली नाही.. जमलं तर नक्की वाचेन..!
हि माझी कथा पूर्णपणे माझ्या डोक्यातल्या गोंधळाने लिहलेली कथा आहे ..

चांगला जमलाय प्लॉट.

शक्यतो फिमेल भूतच जास्त डेंजरस असतं, असं काब्र ? अशा कथा वाचून वाचून अंधारात खरी खुरी केस मोकळे सोडलेली बाई समोर आली तर गपकन जायचा एखादा जागच्या जागी. तेच रात्री अंधारात एखादा टोपी, सदरा विजार वाला माणूस भेटला तर त्याला आपण पत्ता विचारू, गप्पा मारू. हेच भूत असेल असं डोक्यात येत पण नाही.
ता.क. : पुरूष भूत गाणं म्हणत नाही. त्यांना भादंवि प्रमाणे शिक्षा होते का ?

हाहाहा
>>>>>> गपकन जायचा एखादा जागच्या जागी.
लोल!!!
>>>>>त्याला आपण पत्ता विचारू, गप्पा मारू. हेच भूत असेल असं डोक्यात येत पण नाही.
Lol

शक्यतो फिमेल भूतच जास्त डेंजरस असतं, असं काब्र ?>> शांमा, धन्यवाद आणि असं काही नाही बरं... मेल भूत पण डेंजरस असतील कदाचित ..!! विरुद्ध कथा पण लिहून पाहायला हवी.

अशा कथा वाचून वाचून अंधारात खरी खुरी केस मोकळे सोडलेली बाई समोर आली तर गपकन जायचा एखादा जागच्या जागी.>> लहानपणी केस मोकळे ठेवून हुंदडताना आजूबाजूच्या आज्यांना मी दिसली की, त्या नेहमी केस बांधायला सांगायच्या.. नाहीतर मग अंगात हडळ घुसेल अशी भीती घालायच्या.( आता कुणी नाही सांगत तसं...) .. कदाचित जेवणात एखादा केस यायला नको.. म्हणून सांगत असतील असं वाटते. ( अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

कथा- कादंबऱ्यात वाचण्याआधी अश्या बऱ्याच भयकथा, गूढकथा बालपण गावात गेले असल्याने ऐकल्या आहेत.

बाकी हा विषय तसा पण लेखकांनी, मालिका - चित्रपटवाल्यांनी घासून- घासून एवढा ठिसूळ केलायं की, नाविन्य असं काही नाही कथेच्या विषयात..!

लहानपणी माझी आई एक भयकथा सांगायची.. जी तिच्या आईने तिला सांगितलेली होती.. मला वाटते, हे कुठेतरी आपल्या सुप्त मनात दडपून राहत असावं.. ती कथा ऐकताना मला खूप रडू यायचं.. मी ऐकलेल्या त्या कथेचा माझ्या ह्या कथेच्या शेवटच्या भागात मी थोडासा समावेश केलायं..!