मोहाची फुले- मंजिरी पाटील

Submitted by भारती.. on 21 April, 2022 - 03:12

मोहाची फुले - मंजिरी पाटील 

जेव्हा कवितेचा आशयकंद अस्सल एतद्देशीय असतो तेव्हा तो परंपरेतून नेणिवेपर्यंत पोहोचलेले आकृतिबंध सहजतेने धारण करतो हे मंजिरी पाटील यांचा 'मोहाची फुले' (नावीन्य प्रकाशन 2019) हा कवितासंग्रह वाचताना सतत जाणवत राहतं. 

वृत्तबद्ध कविता आज अनेक तरुण कवी- कवयित्री लिहीत आहेत याचं श्रेय निश्चितपणे स्वामीजी निश्चलानंद यांना जातं .त्यांनी एखाद्या तात्त्विक अभियानासारखा वृत्तबद्धतेचा प्रसार केला आहे. स्वामीजींनी मंजिरी यांच्या या कवितासंग्रहाला सुंदर सकौतुक प्रस्तावना लिहिली आहे .

वृत्तबद्ध कवितेला अनुकूल असेच सौंदर्यलक्ष्यी घाट जेव्हा सक्षमपणे वृत्तात उतरविले जातात तेव्हा रसिकाला पर्वणी वाटेल अशा रचना निर्माण होतात. वृत्तबद्धतेचं हे सामर्थ्य आहे तसंच ही तिची मर्यादाही असू शकते. निराळ्या शब्दात सांगायचं तर ही कधी कवीची मर्यादा किंवा कधी आशयाची मागणी असू शकते की अभिव्यक्तीचे सगळेच उच्चार वृत्तबद्धतेत परिणामकारकतेने,रसपूर्णतेने उतरू शकत नाहीत. 

मंजिरींच्या कवितांबद्दल बोलायचं तर त्यांनी वृत्तबद्धता स्वीकारून समर्थपणे पेलली आहे आणि सौंदर्यपूर्णतेने जीवनानुभव त्यातून व्यक्त केला आहे ज्यात जीवनातील अभावांचा अतृप्तीचा सौंदर्यपूर्ण स्वीकार आहे.
उदाहरणार्थ, प्रेम आणि विरह हे चिरंतनात चमकत राहणारं एक मृगजळ आहे. अशावेळी-
'आर्त टिपेचा सूर अनावर घुमत राहतो भवतालावर 
तहानलेली धरा पुकारे कोसळ कोसळ हे मुरलीधरʼ 
असं जेव्हा मंजिरी म्हणतात तेव्हा आयुष्यभराची तृषा आणि त्यात तगमगणाऱ्या जीवाने परमेश्वराला घातलेली हाक ऐकू येते.ही हाक सशरीर साभिलाष आहे. हा परमेश्वर प्रियकराचं विशुद्ध रूप आहे, म्हणून ही प्रार्थना प्रियकराकडे केलेली उत्कट अशी प्रेमयाचना आहे.
'अबोल होऊन पाठ फिरवसी दूर राहसी कसा निरंतर
एकदाच बघ भेटुन मजला दोघांमधले मिटेल अंतर '-  
अशी ही आवाहक  विरहिणी आहे. 

मंजिरी भूतकाळात अनेकदा रमतात. हे स्मरणरंजन जणू दुःखाच्या उगमापाशी जाणं आहे हा सर्वांचा अनुभव आहे.म्हणून या प्रकारच्या अनेक कवितांमधल्या ओळी सहज हृदयात शिरतात-
' करकरित तिन्हीसांजेला| काटेरी झुडपापाशी| हे आठवणींचे रडणे |दुःखाच्या उगमापाशी| भर अवसेच्या दिवसाला| या कुठून गोळा झाल्या| क्रंदल्या ऊर फोडूनी| बुरजावर जाऊन बसल्या '..
- यातील प्रतिमाविलास लक्षणीय आहे.अवसेचा दिवस आणि बुरुजावर जाऊन बसलेल्या आठवणी,काटेरी झुडपं,दुःखाच्या झ-याचा उगम या सर्वातून मनाची कातरवेळ चित्रबद्ध होते, तर -
'निवळशंखश्या विहिरी आणिक तुङुंबलेले तळे 
भरावावरी पाटापाशी भुईकमळाचे कळे 
सुंदर आहे झिरपी आणिक छान थोरला मळा
बालपणीच्या काळापासुन या दोघांचा लळा 
....
कुबाभळीच्या कानामधले पिवळे लोलक झुले 
छुमछुम शेंगा पायी बांधुन एक सानुली डुले
तुरकाटीचा भारा घेउन दूर कुणीशी एक 
हाळी ऐकुन स्तब्ध होऊनी थबके एकाएक..'
- यातून एक मनोहारी असं स्मरणचित्र मंजिरी उभं करतात, आणि या शब्दांच्या मोहात आपल्याला पाडतात. या कविता म्हणजे सौंदर्यमोहाची फुलं आहेत हे जाणवून देतात. अर्थात उदास विटक्या रंगांची स्मरणचित्रंही तितक्याच समरसतेने मंजिरी रंगवतात .
'तुटकी फुटकी विटकी भांडी अन् फुटलेले झुंबर 
जळमटलेला कचरा त्यावर कळकट मातीचा थर 
भेगाळुन या गेल्या भिंती भग्न शांतता उरली
सरून गेल्या कालपटाची एक कहाणी विरली...'

प्रेम, विरह,प्रतीक्षा, मीलन, पाऊस ,सांज-सावल्या,निसर्गवैभव या विषयांवर सुंदर पण परिचित वळणे घेणा-या अशा रचना या संग्रहात आहेतही पण आशयाचं वैविध्य कवितेत आणण्याची कवयित्रीची प्रयोगशीलता निरनिराळ्या कवितांमधून जाणवत राहते. जसं की अनेक कथनात्मक कविता या संग्रहात आहेत.
'निष्ठुर निर्दय गुपिते' सारख्या कवितेत अशीच एक लहानशी कथाच येते. निर्जन गढीच्या आडोशाला एका वेडीला होणारी गर्भधारणा आणि त्यातून तिची सुटका करून देणारी वयस्क बाई अशा व्यक्तिरेखांच्या सावल्या कवितेत वावरतात.
'दुष्काळाने उभी जाळली खेडीपाडी' या कवितेत शहरात उंच इमारतीच्या बांधकामावर काम करताना बळी जाणारा शेतमजूर आहे. 
दुष्काळाने उभी जाळली ओस पाडली खेडीपाडी 
खळगी भरण्या पोटाची मग गाव सोडले घेरडवाडी
काम मिळवण्या भटके वणवण दुर्दैवाच्या दशावतारी 
टाचा घासत उभा कधीचा किसनाबापू शहरादारी..
या कवितेत या दुर्दैवी घटनेचे तिच्या पार्श्वभूमीसहित संपूर्ण  चित्रण आहे.
'जैतुनबी'सारख्या कवितेत प्रत्ययकारी व्यक्तीचित्रण येतं .
'डोक्यावरती चुंबळ त्यावर तरकारीची डाल असे 
हलक्याश्या त्या डालीचेही वजन तिला ना सोसतसे
लटलट लटलट मान कापते कंप सततचा हाताला 
जैतुनबीची वृद्ध आकृती विकण्या ने भाजीपाला'.. 

मंजिरी यांचा हा पहिला कवितासंग्रह शब्दप्रभुता, वृत्तांवरची पकड आणि प्रयोगशीलतेने युक्त आहे.‘स्व‘शी प्रामाणिक, रसपूर्ण ,वाचनीय अशी कविता त्यांनी या टप्प्यावर रसिकांसमोर आणली आहे. त्यांना पुढील प्रतिभा-प्रवासासाठी अपेक्षापूर्ण शुभेच्छा.

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users