मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>Kindle वर आहे
बघते. व्यं मा लेखक फार आवडतात.

Parkiy Haat.jpgRAW.jpg
सध्या ही दोन पुस्तके वाचून संपवली. एकंदरीत युद्धस्य कथा रम्यः प्रमाणे हेरगिरीच्या व जिओपॉलिटिक्सच्या कथाही सुरस असतात.
परकी हात वाचून संपवले आणि त्याच आठवड्यात ट्रम्पने यू एस एड चे फंडिंग बंद केले. It was like an epiphany.
काही गोष्टी काळ्या पांढऱ्या राहूच शकत नाहीत आणि नेमका ग्रे एरिया कुठे सुरू होतो हे त्यात इन्व्हॉल्व असणाऱ्यानाही समजत नाही याची ही जिवंत उदाहरणे. यातल्या काही गोष्टी उदाहरणार्थ कंदाहार अपहरण किंवा श्रीलंकेतील तामिळ मूव्हमेंट हे इतरत्रही वाचले होते. पण प्रत्येक पुस्तकातून नवा अँगल मिळत जातो. मराठीमध्ये अशी पुस्तके कमीच आहेत.

माझे मन, तुम्ही परकीय हात बद्दल मागच्याच पानावर हेच लिहिले आहे. परकीय हात ही संज्ञा बहुधा इंदिरा गांधींच्या काळात प्रचलित झाली.

रॉ वरचं पुस्तक मी वाचलंय. तीन वर्षे झाली असतील. बांग्ला देश निर्मिती आणि सिक्कीमबद्दलचे भाग थरारक आहेत. इतरही असतील. हे लक्षात राहिलेत.
रवि आमलेंची लोकसत्तेतील प्रचारभान ही लेखमालिकाही चांगली होती.
मराठीत असं लेखन पहिल्यांदाच वाचायला मिळालं .

ओह परकीय हात बद्दल लिहिलंय का मी ऑलरेडी? आठवत नव्हतं.
काही पुस्तकं आहेत मराठीत. ऑपरेशन ब्लू स्टार वर एम एस ब्रार यांचं किंवा राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास कसा झाला यावर तपास अधिकाऱ्याचं. पण ती अनुवादीत आहेत.
गिरीश कुबेर एकेकाळी अशी (जिओपॉलिटीक्स उलगडणारी) पुस्तकं लिहायचे.

इथे थोडं अवांतर पण एक कविता शोधत आहे.
'कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी'
अशी सुरवात आहे. बहुतेक पद्मा गोळे यांची असावी पण नक्की माहीत नाही. कुणाला माहिती असल्यास पूर्ण कविता आणि कोण कवियत्री ते सांगू शकाल का?

चीकू,
हे पहा.
कविता स्फुरते कशी--

कशी अचानक जनीं प्रकटते मनांतली उर्वशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी
कुंभ रसांचे शिरी घेउनी शब्दांच्या गौळणी
नजरेपुढतीं ठुमकत येती रूपवती कामिनी
हंसती रुसती विसावती कधि तरंगती अंवरीं
स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरीं
त्यांच्या नादें करूं पाहते पदन्यास भी कशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी
अवकाशावर धुंद उषेचें स्मित ओघळतें करें
स्मितासवें त्या उन्मेषांचे बाग बहरती कसे
क्षितिजमंडली अथवा झुकते रजतपौणिमा कशी
मनोभाव न्हाणीत राहते शीतल ज्योत्स्नारसीं
अंतरवाहिर एकसुरावर घुमे सुरावर कशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी
हें स्वरसुंदर जीवनमंदिर कुणीं कसें उभविलें
मी न कुणाला दावायाची शिलालेख आंतले
समयीमधली ज्योत अनिश भावभरें तेवते
तिच्या प्रकाशीं कुणापुढे मी हितगुज आलापिते
कशी नाचतें कीर्तनरंगों हरपुन जाते कशी
मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी
- सौ संजीवनी मराठे

Isaac Asimov चे The Best Mysteries of Asimov हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. Asimov मुख्यतः सायन्स फिक्शनसाठी प्रसिद्ध असला तरी यातील रहस्यकथा/कूटप्रश्न एकदम रंजक आहेत. गणित, विज्ञान, तर्कशास्त्र अशा सर्व विषयांवर या कथा आहेत.

अंधश्रद्दा, अतींद्रिय शक्ती, आणि लोकांचा त्यावरील विश्वास यावर यात The Obvious Factor ही मला विशेष आवडलेली कथा आहे. यात एक शास्त्रज्ञ एका डिनरच्यावेळी काही परिचित मित्रांना त्याला आलेल्या एका अनुभवाविषयी सांगतो. हे सर्व मित्र विज्ञाननिष्ठ आणि उच्चविद्याविभूषित असतात. शास्त्रज्ञ त्यांना न्यूयॉर्कमधील एका बाईविषयी सांगतो जिने कॅलिफोर्नियामधे एका ठिकाणी आग लागणार आणि त्यात इतके लोक मरणार असे भाकीत केले असते आणि त्याच वेळी, त्याच ठिकाणी आग लागून त्या बाईने सांगितलेलीच प्राणहानी झाली असते. तिला खरंच अतींद्रिय शक्ती आहे का याचा हा शास्त्रज्ञ तपास करत असतो. त्याचे मित्र बाकीच्या शक्यता बोलून दाखवतात (त्या बाईचा साथीदार असेल आणि त्यांनी आधीच हे संगनमताने ठरवले असेल वगैरे ) पण तो शास्त्रज्ञ या सर्व शक्यता आम्ही आधीच पडताळून पाहिल्या आहेत असे सांगून त्या खोडून काढतो. साथीदाराने आग लावली असेल या शक्यतेवर तो ती आग वीज पडून लागल्यामुळे होती असे सांगून तीही शक्यता खोडून काढतो. शेवटी मला आता अतींद्रिय शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल असं तो हतबलपणे म्हणतो. सर्व मित्र बाकी कुठलीच शक्यता दिसत नसल्याने त्याच्या म्हणण्याला दुजोरा देऊ लागतात. तेव्हा हे ऐकणारा वेटर म्हणतो 'तुम्ही सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आणि त्यातल्या सर्वच अशक्य वाटल्या तर जी उरेल ती सत्य असते. म्हणजे या बाबतीत अतींद्रिय शक्ती बाईला आहे हे सत्य आहे. पण तुम्ही खरंच सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आहेत का? तुमच्या ध्यानात न आलेली अजूनही एक शक्यता असू शकते ती ही की हे शास्त्रज्ञमहाशय खोटं बोलत आहेत!'
सर्वजण इतक्या अधिकारी व्यक्तीला असे बोलल्याबद्दल त्याच्यावर ओरडतात पण तो शास्त्रज्ञ मात्र प्रसन्न होऊन वेटरला म्हणतो 'हो मी पूर्ण बनावट कहाणी रचली होती. मला बघायचं होतं की हे सर्वजण आंधळ्या विश्वासाने अतींद्रिय शक्ती आहे हे मान्य करतील का माझ्यावर अविश्वास दाखवण्याचं धाडस करून आपली बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी सिद्ध करतील? माझ्या कसोटीला तूच एकटा उतरलास कारण मी खोटं बोलत असेन हा obvious factor तुझ्या लगेच लक्षात आला!'

भोंदू लोकांवर आपली सारासारबुद्धी बाजूला ठेवून अंधविश्वास ठेवणारे लोक दिसले की आता ही कथा नक्कीच आठवणार आहे Happy

ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी ...माय लाइफ विथ स्टीफन
जेन हॉकिंग.
अनुवाद - सुदर्शन आठवले.

मराठी अनुवाद (२०१२) वाचनालयात मिळाला तो वाचला.
सहाशे पानांच्या या पुस्तकात जेनने स्टीफनशी ओळख, लग्न कसे झाले, मग त्याचा आजार , शुश्रुषा , पंचवीस वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तीन मुलं आणि स्टीफनची देखभाल, त्याची प्रसिद्धी, मानमतराब , प्रवास हे सर्व लिहिले आहे. A brief history of time हे पुस्तक गाजले तेव्हा विश्वाची गणितं सोडणाऱ्या स्टीफनच्या आयुष्यात वेगळ्याच घटना घडत होत्या. त्याला सांभाळण्यासाठी ठेवलेल्या परिचारकांत एकीवर त्याचे मन जडले होते. त्याच्या डोक्यातले विचार व्यक्त करून देणारा प्रोग्राम बनवून देणाऱ्या माणसाची ती बायकोही होती. एक दिवशी घटस्फोटाचे कागद जेनीच्या हातात ठेवून स्टीफन या परिचारिकेबरोबर बाहेर पडला. स्टीफन आणि जेनीच्या मुलीला, ल्युसीला पियानो शिकवणारा शिक्षक जोनाथन कधी घरी येत असे आणि स्टीफनला मदतही करत असे.तसेच जेनबरोबर गप्पाही मारत बराच वेळ बसत असे. या गोष्टी परिचारिका स्टीफनच्या कानावर घालत असत. जोनाथनची बायकोही आजारपणात वारल्याने तो एकटाच होता व त्याला हॉकिंगच्या मुलाबाळांच्या, घराचा फार आसरा वाटत असे. घटस्फोटानंतर जेनने जोनाथनशी लग्न केले. २००७च्या पुस्तकात लेखिकेने हे सर्व लिहिले आहे.
या २०१२च्या अनुवादात नवीन घटना जोडल्या आहेत. दुसराही विवाह तोडून स्टीफन परत जेनकडेच राहात आहे.

'अस्वस्थ दशकाची डायरी ' हे अविनाश धर्माधिकारी
ह्यांचं पुस्तक नुकतच वाचून संपवलं. अगदी प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असं पुस्तक आहे हे. दशक ऐशी चं असलं तरी अजूनही relevant आहे.
ह्या पुस्तकाचं English translation झालेलं आहे ' Diary of a Decade of Agony ' by Gauri Deshpande.

अस्वस्थ दशकाची डायरी फार पूर्वी विशीत असताना वाचलंय. खरोखरच सुंदर आणि अस्वस्थ करणारं पुस्तक!

अस्वस्थ दशकाच्या डायरीमधला 'भिरीभिरी भ्रमंती' हा लेख आम्हाला धडा म्हणून अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात होता Happy तो खूप आवडल्यामुळे तेव्हा लायब्ररीतून पुस्तक घेऊन वाचलं होतं आणि मग काही वर्षांनी विकतही घेतलं. खूप उत्कटपणे लिहिलेलं पुस्तक आहे. आता खूप वर्षांत वाचलं नाही पण अनेक वाक्यं लक्षात आहेत.

मी अर्धे वाचले आहे. सुरूवातीला एकदम भारी वाटले पण नंतर पुढे इतके एंगेजिंग वाटले नाही असे लक्षात आहे Happy कदाचित लेखनात तोचतोचपणा आला असेल.

अस्वस्थ दशकाची डायरी वाचलंय. त्यातील भिरभिर भ्रमंती, तमिळनाडूतली वादळाच्या आपत्तीतलं अनुभवकथन आवडलेलं. काश्मीर, खलिस्तान, बेलूर मठ, आसाम, रामजन्मभूमी, मंडल वगैरे इश्श्यूंवर प्रकरणं आहेत, काही मुलाखती आहेत, ते माहिती म्हणून चांगलं आहे. पण माहिती म्हणूनच ठीक आहे.‌ बाकी ते सगळ्या समस्यांवरचा हमखास उपाय म्हणजे राष्ट्रवादाचा उत्कट डोस, त्यातही पुन्हा लेखकाची स्वतःच्या विचारसरणीची छाप लपवताना उडालेली तारांबळ वगैरेंचं काय, हे असं होतंच असतं, म्हणून सोडून दिलं.
या लेखकाचं अजून एक आहे की स्व जरा जास्तच डोकवतो. वाचक कशामुळे भारावून जाईल, याची चांगली जाण असल्याने टाळ्याखाऊ वाक्यांची उधळण बऱ्यापैकी दिसते. आपण कुणीतरी गुरू बसलोय इथे आणि समोरच्या सर्वसामान्य शिष्यांना ध्येयवादानं प्रेरित करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, या पातळीला जायला लागतं मग हळूहळू. अर्थात असं असलं तरीही वाचनीयता हा एक गुण आहे यात, त्यामुळे एकदा वाचण्यासारखं आहे, हे खरं.

आपण कुणीतरी गुरू बसलोय इथे आणि समोरच्या सर्वसामान्य शिष्यांना ध्येयवादानं प्रेरित करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, या पातळीला जायला लागतं मग हळूहळू >>> हो पुस्तकातील टोन लक्षात नाही पण एकदा त्यांच्या भाषणाला गेलो होतो तेव्हा तसे वाटले होते.

पण आपल्याकडे अगदी टोकाच्या लोकप्रियतेला किंवा अ‍ॅचिव्हमेण्टला पोहोचलेले लोक वगळले, तर नम्र वागणार्‍यांना लोक सिरीयसली घेत नाहीत. त्यामुळे असा आव आणावा लागत असेल.

संप्रति१ >>> + 1
भारावून जायच्या दिवसात अस्वस्थ दशकाची डायरी वाचली की भारी वाटत.
नंतर परिस्थितीची जाणीव झाली तो भाबडेपणा आठवून ओशाळलेपण हाती लागत.
वर प्रस्तुत लेखकाचा फेसबुकवरचा ॐ =mc२ वेडेपणा वाचून हेची काय फळ असंही फीलिंग येत

इंटरेस्टिंग चर्चा!
अस्वस्थ दशकाची डायरी तेव्हा वाचलं होतं, आणि आत्ता मला जाणवतंय, की त्यातलं काहीही आज मला आठवत नाहीये. Proud
कदाचित तेव्हा माझा मुलगा अगदी लहान होता, पुस्तक वाचत असताना एक डोळा सतत त्याच्यावर ठेवावा लागण्याइतका लहान, त्यामुळेही हे झालं असेल.
आपण पुस्तक वाचतो तेव्हा आसपास कोणती परिस्थिती असते यावर ते पुस्तक आवडणार की नाही, लक्षात राहणार की नाही हे अवलंबून असतं असा मला अनेकदा अनुभव आला आहे.
सिनेमाच्या बाबतीतही हे झालंय.

इति-आदि (अरुण टिकेकर)

आपल्या रोजच्या वापरातल्या, पाहण्यातल्या, अनुभवातल्या आणि इतिहासातल्याही लहान-मोठ्या गोष्टींबद्दल माहितीपर, उद्बोधक, रंजक स्वरूपात केलेलं लेखन आहे. छोटे छोटे २-३ पानी लेख आहेत. मिरची, केळी, सिताफळ अशा आहारातल्या गोष्टी, भारतात खाण्याचा बर्फ कधी अवतरला, चुलीचा (म्हणजे अन्न शिजवण्याचा इतिहास), गुलाबाच्या अत्तराचा इतिहास, छपाईकला, गोधडी शिवण्याची कला अशा अनेको गोष्टींवर लिहिलं आहे.

सामान्यज्ञान, सामान्य विज्ञान, आहारशास्त्र, मानववंशशास्त्र, अलीकडचा इतिहास (फडणविशी थाट, पेशवाईतल्या जेवणाच्या मेनूचं डिटेल वर्णन), संतसाहित्य, etymology असे अनेक पैलू या लेखनात येत राहतात. जुन्याजुन्या ग्रंथांतले संदर्भ दिले आहेत. इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या नोंदींचेही अनेक संदर्भ येतात. टिकेकरांचं स्वतःचं वाचन केवढं प्रचंड होतं ते यातून समजतं. आपल्याला माहिती असणार्‍या गोष्टी वाचकांनाही रंगवून सांगण्याची असोशीही दिसते.

पुस्तकाचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी, असा हा विरंगुळा आहे. प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार यातले काही लेख आवडतील, लक्षात राहतील. तर काही वाचून बाजूला सारले जातील.

संप्रती१ , जाई +१
इतके चांगले पुस्तक लिहिणारे नंतर whatsapp uncle झालेले पाहून वाईट वाटते.

हो, नंतर त्यांचं जे झालं ते आवडलं नाहीच, पण त्या पुस्तकाला मात्र अजूनही मनाच्या कप्प्यात खास जागा आहे Happy
आणि कदाचित तशा शैलीतलं लिखाणही नंतर कॉमन झालं का? त्यामुळे मग त्या शैलीचाच कंटाळा आला?
मध्यंतरी एकदा 'गारवा'मधली गाणी कवितांसकट ऐकताना वाटलं की सौमित्रच्या कविता सुंदरच होत्या, पण नंतर त्या स्टाईलमधल्या इतक्या कविता आल्या की गारवामधल्या कविताही तशाच सामान्य वाटू शकतात.
अस्वस्थ दशकाची डायरी परत वाचून बघायला पाहिजे. बघूया अजूनही आवडतं का.

अजय पांडे यांनी लिहिलेलं ,शर्मिला फडके यांनी अनुवादित केलेले 'यू आर दि बेस्ट वाईफ' हे पुस्तक वाचलं...यात अजय पांडेनी त्यांची खरी प्रेमकथा लिहिली आहे...खूप छान आहे पुस्तक...कथेचा शेवट फारसा चांगला नसूनही आयुष्यात प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिने बघण्याचा संदेश हे पुस्तक देत....प्रेम मिळवण्यासाठी लेखकाच्या आयुष्यात बर्‍याच अडचणी येतात...त्याबद्दल रडत न बसता...त्यांचं लिखाण जागोजागी विनोदाचा शिडकावा करतं....अजय पांडे नामवंत लेखक आहेत पण मला माहीत नव्हते...त्यांचे अजून काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत...मिळाले तर नक्की वाचेल...

लोकसत्तात अरुण टिकेकरांचं जे वाचलं होतं (किती वर्षे झाली असतील ?) आणि ते गेले तेव्हा त्यांच्याबद्दल जे वाचलं त्यावरून त्यांनी साध्या साध्या गोष्टींबद्दल काही लिहिलं असेल याचं नवल वाटलं. इति- आदि मिळतंय का बघतो.

सगळ्याच पोस्टी वाचल्या. 'अस्वस्थ दशकाची डायरी' वरील पोस्टी वाचायला आवडले. 'इति- आदी' वरील पोस्ट आवडली ललिता प्रीती. Happy

Pages