पाण्यात पाहताना

Submitted by Rajkumar Jadhav on 20 April, 2022 - 12:49

Shri Shri says
You can see love everywhere in this world if only you have an eye to see it.
श्री श्री नी सांगितल्या नुसार, मी माझ्या अवतीभवती प्रेम शोधण्याचा प्रयत्न नियमीत चालू ठेवलाय पण कुठ दिसलेल नाही. कदाचीत आपली नजर कमजोर झाल्याचा हा परिणाम असावा कारण श्री श्री नक्कीच खोट सांगणार नाहीत म्हणून सकाळी सकाळी चष्मा प्रेमाने पुसून हळुवार फुंकर मारून घालतो तर डोळ्यात त्याची कांडी गेली. त्यानेही कांडीचा प्रसाद देऊन आजूबाजूला प्रेम शोधणारी माझी नजर आणखी जायबंदी करण्याचा प्रयत्न केला.
काॅलेजात असताना खूप उच्च विचारांनी प्रभावित होतो, प्रेम ही बोलून दाखविण्याची गोष्ट नाही ती आपोआप समजली पाहिजे, मनातील भाव नजरेतून व्यक्त होतात वगैरे वगैरे. तरिही त्या भाव भावनांची डोळे सोडून आणखीही कुठून कुठून बाहेर पडण्याची धडपड चालूच असे आणि मग आम्ही कवी झालो. कवितांनी वह्या भरल्या पण मन मोकळे झालेच नाही.
आम्ही डोळ्यात प्रेम शोधत राहिलो अन् आमच्‍या डोळ्या देखत ते दूर देशीच्या राजकुमारा सोबत कायमच निघून गेल.
मनात घोंगावणारं प्रेमाच वादळ मनाच्या चिंध्या करून व अश्वत्थाम्याची जखम देऊन थंडावलं.

पाण्यात पाहताना
आकाश चांदराती
ते मंद मंद तारे
पाण्यात बोलविती
होती भेटत एक परी
प्रभात किरण शलाके परि
असे वेड तीने मज लावले
माझे देहभान हरपले
अजूनही या एकांती
तीचे शांत डोळे आठवती
पाण्यात पाहताना
आकाश चांदराती
ते मंदधुंद डोळे
पाण्यात बोलविती

ते प्रेम पुष्प माझे
गळूनी असेच गेले
गळताना ते तरिही
एक जखम ठेऊन गेले
अजून सुद्धा या एकांती
जखमेतील ते रक्त बिंदू
अश्रू रूपे अवतरती
पाण्यात पाहताना
आकाश चांदराती
ते बिंदूबिंदू अश्रू
तारका बनून जाती

तारका त्या लुकलुकल्या
जणू पापण्या मिटल्या अन् उघडल्या
मन भाबडे बिचारे
म्हणे जवळुनी त्यां पहा रे
तव त्यांसी स्पर्शू जाता
तत् क्षणी लुप्त होती
पाण्यात पाहताना
आकाश चांदराती
ते लाख लाख डोळे
मज पुन्हा पुन्हा फसविती

- राजकुमार जाधव.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users