श्री तुकाराम महाराजांचे उपदेशपर अभंग

Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2022 - 04:04

श्री तुकाराम महाराजांचे उपदेशपर अभंग.

फळ देठीहूनि झडे | मग मागुतें न जोडे ||१||

म्हणउनि तातडी खोटी | कारण उचिताचें पोटीं ||२||

पुढें चढें हात | त्याग मागिला उचित ||३||

तुका म्हणे रणीं | नये पाहों परतोनि ||४||
.............................................................................

श्री तुकाराम महाराजांनी साधकांना केलेला हा बहुमोल उपदेश आहे.
साधकाने अतिशय जिद्दीने, सातत्याने आणि कमालीचे धैर्य राखून साधना करीत राहणे आवश्यक आहे असे बुवा सांगत आहेत.
पक्व झालेले फळ जसे आपोआप झाडावरुन गळून पडते तसेच साधनेत परिपक्वता आल्यावरच अनेक गोष्टी प्राप्त होतात असे बुवा निक्षून सांगत आहेत. साधकाने घाई घाईने वा तातडीने काही प्राप्त करायचे म्हटले तरी काहीही मिळू शकत नाही.

साधनेतून साधकाचे आंतरिक परिवर्तन होत असते ते अतिशय हळुहळु पण सतत होत असते. हे परिवर्तन जणू एखाद्या उत्तम जमिनीत पेरलेल्या बीजाप्रमाणे असते. ईशप्रेमाचे बीज तर सद्गुरुंकडून पेरले गेलेले असते, पण दोन...चार वर्षात काही त्याचा मोठा वृक्ष होऊ शकत नाही. कारण त्या बीजाला कोंब फुटणे, पुढे त्याला पाने येऊन फांद्यांचा विस्तार हे सारे हळुहळु होते. त्या झाडाची योग्य ती मशागत म्हणजे योग्य तेवढे पाणी, खते पुरवणे. तसेच कीडीचा बंदोबस्त या सार्‍यावरच त्या वृक्षाची वाढ अवलंबून आहे. अगदी तसेच सारे काही साधकाच्या परमार्थ साधनेबाबत असते. कारण परमार्थ साधनेची निगराणी कोणी दुसरी व्यक्ती करु शकत नाही, साधकाला ती आपली आपणच करावी लागते. आपल्या अध्यात्म साधनेची काळजी साधकाने अतिशय दक्षतेने घ्यायची असते. सद्गुरु तर फक्त मार्ग दाखवतात. पण त्यावरुन निश्चयाने, धैर्याने, सातत्याने वाटचाल ही साधकालाच करायची असते. तिथे सद्गुरु वा प्रत्यक्ष परमेश्वर ही येऊन त्या साधकासाठीची ती साधना स्वतः करु शकत नाही.

साधकाचा देहभाव पूर्णपणे गळून पडणे हे केवळ ईश्वरी कृपेनेच होते असे सार्‍या संतांचे सांगणे आहे. व एकदा का देहभाव गेला की आत्मभाव आपोआपच प्राप्त होतो. मग जसे ते पिकलेले फळ देठापासून तुटून पडते व परत झाडाला जाऊन चिकटत नाही तसेच साधकाबाबतही होते. पण याला बिलकुल घाई गडबड उपयोगाची नाही हे बुवा सांगत आहेत.
कारण सातत्याने साधना करणार्‍याच्या बाबतच ही गोष्ट घडणार आहे. त्यामुळे अतिशय उत्कटतेने, प्रेमाने निष्ठा राखत व धैर्यानेच वाटचाल करणे गरजेचे आहे.
याला उत्तम उदाहरण शबरीमातेचे आहे. तिच्या सद्गुरुंनी सांगितले की प्रभू श्रीराम याच मार्गावरुन पुढे जाणार आहेत, त्यांचे दर्शन व्हावे असे वाटत असेल तर अमुक अमुक पद्धतीने साधना करीत रहा. यावर शबरीने विचारलेही नाही की किती काळ हे सारे करावे लागेल, ते नक्की येणारत ना !, वगैरे वगैरे. अगदी बालपणीच साधनेला लागलेल्या शबरीमातेला पार वृद्धापकाळीच प्रभू श्रीरामचंद्रांनी दर्शन दिले, हे आपण लक्षात घेणे जरुरीचे आहे. सद्गुरु वचनावर पूर्ण निष्ठा ठेवून सातत्याने साधना करीत राहिल्यास भगवंताला भक्ताकडे यावेच लागते हे शबरीमातेकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे.

साधनेत जसजशी प्रगती होत रहाते तसे साधकाच्या लक्षात येते की अनेक अनावश्यक गोष्टींचा त्याग आपोआपच झालेला आहे. त्याकरता आपण फार प्रयत्न न करताही ते सर्व झालेले आहे. कारण आता भगवंतालाही अशा निष्ठावान साधकाकरता हात पुढे करावासा वाटू लागतो. साधकाने याकरता स्वतःला सिद्ध केलेले आहे याची खात्री भगवंतालाही पटते.

मात्र अतिशय निर्वाणीचा इशारा शेवटच्या चरणात बुवा देत आहेत- ते रणांगणात उतरलेल्या सैनिकाद्वारे ! तो सैनिक जसा सर्वस्वावर पाणी सोडून रणांगणात उतरतो तशी जिद्द साधकाच्या अंगी असणे अत्यावश्यक आहे. सैनिकाच्याबाबत जसे मेलो तरी बेहत्तर, पण परत फिरणार नाही असे टोकाचे मनोबल असते तसे साधकाचे मनोबल असेल तरच ईश्वर कृपा होऊ शकते, हे येरा गबाळाचे काम नोहे असे बुवा ठामपणे व आत्मविश्वासाने साधकाला सांगत आहेत.

असे असीम मनोबल आपल्याठायी निर्माण व्हावे याकरता श्री तुकोबारायांचरणी कळकळीची प्रार्थना.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम विवेचन शशांकजी! Happy

<<आपल्या अध्यात्म साधनेची काळजी साधकाने अतिशय दक्षतेने घ्यायची असते. सद्गुरु तर फक्त मार्ग दाखवतात. पण त्यावरुन निश्चयाने, धैर्याने, सातत्याने वाटचाल ही साधकालाच करायची असते. तिथे सद्गुरु वा प्रत्यक्ष परमेश्वर ही येऊन त्या साधकासाठीची ती साधना स्वतः करु शकत नाही.<<< हे खरय.
पण काही वेळा जिथे साधक जेन्युइन असेल तिथे स्वतः सद्गुरु साधकासाठी साधना करतात. उदा. रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा माता रात्रभर साधन/जप करत बसत. विचारले तर त्या म्हणाल्या, 'तुम्ही साधक लोक साधन पुर्ण करत नाही, म्हणुन आम्हाला करावे लागते. पु. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात पण अशीच काहीशी एक गोष्ट आहे.

मी_आर्या,
उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।।
।।अध्याय ६, श्लोक.५॥
उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥ ५ ॥
..............................................
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्‌ ॥ अ. सहा, श्लोक सहा ।।
जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला । सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥ ६ ॥
.........................................................................
स्वामी स्वरुपानंद म्हणतात -
पुण्यपत्तनीं श्री सद्गुरुनीं पथ-दर्शी होऊन
'ॐ तत्त्वं सोsहं सः' श्रुतिची दाखविली मज खूण ||१३४||
म्हणति आणि ते 'कोण कुणाचा करी येथ उद्धार
स्वयें कष्टल्याविण का होतो कोठें आत्मोद्धार' ||१३७||

____/\_____

छान विवेचन केले आहे. अभंग तर अगदी अर्थपूर्ण (संतांची स्वयंप्रज्ञा असल्याने ते तसे असतातच).
सामो आणि शशांकजी यांचे प्रतिसादही आवडले.