शांताराम खामकर ( शाम)- ‘भवताल ‘
शांताराम खामकर यांचा म्हणजेच 'शाम' यांचा 'भवताल' हा कवितासंग्रह (यशस्वी प्रकाशन, ब्लर्ब कवी संदीप खरेंचा) 2019 मध्ये माझ्या हाती आला तेव्हापासून त्यावर लिहायची इच्छा होती. श्याम यांची वैशिष्ट्यपूर्ण कविता मी मायबोलीच्या पूर्वीच्या दिवसांपासून वाचत आले आहे, मराठी कवितेचा तो एक सशक्त चेहरा आहे .
'भवताल'चे सोबती म्हणून श्रेयनामावलीत माझंही नाव खामकर यांनी लिहिलं आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे कारण त्यांनी मला श्रेय द्यावं अशी कोणतीही भूमिका मी निभावलेली नाही.
शांताराम खामकर कवी आणि गीतकार अशी विभागणी कृत्रिम ठरवणाऱ्या अशा एका सीमारेषेवर व्यक्त होतात. कारण असीम वेदना आणि संघर्ष घेऊन मार्गक्रमणा करताना ज्या तपमानावर कविता लिहिली जाते त्या तपमानावर पुस्तकी व्याख्या वितळून एकमेकीत मिसळून जातात. इथे आकृतिबंध आशयानुसारी आहे. वृत्तबद्ध कविता , साधं पद्य आणि मुक्तछंद सर्वच प्रकार नेणिवेतल्या ताकदीने हाताळले गेले आहेत.
संग्रहाचे चार भाग आहेत.आत्मधून, स्वप्नवेळा ,धूळाक्षरे आणि भवताल.
‘आत्मधून‘मध्ये प्रकाशित झालेले आत्मचरित्राचे कवडसे अस्वस्थ करणारे आहेत. हे कविताकवडसे एका अभावग्रस्त इतकंच नाही तर नियतीचं अतर्क्य ओझं वाहणाऱ्या अशा क्षेत्रावर पडतात तेव्हा तो विस्तारही त्याच्या सगळ्या गूढतेसकट,उदासीसकट सुंदर होऊन जातो. हाच कविताधर्म आहे.
‘शब्दांना आसुसलेले हृदयाचे रिक्त रकाने
क्षण भेटे जो जो त्याला मी फक्त मागतो गाणे ‘..ही धारणा त्यामागे आहे.
भूक आणि भाकरीची स्वप्नं पाहणारं बालपण, त्यावर गरीब पण स्वाभिमानी आईवडिलांनी केलेली तत्त्वांची मधुर शिंपण जेव्हा कवितेच्या मृदू शब्दात उतरते तेव्हा जिवाची कालवाकालव होते.
‘कावळ्याची हाकही ऐकायला येई तिला
पाहुणा येईल कोणी म्हणतसे आई मला
रोज आसावून हाती बाप पाणी घ्यायचा
फाटलेल्या ओंजळीने सूर्य ओवाळायचा‘ ..
'सूर्य आणि बाप' या कवितेत बापाने ओलांडलेले कष्टांचे डोंगर शब्दबद्ध होतात. कष्टकरी समाजाचं संचित या कवितेत टोकेरीपणे शब्दबद्ध होतं.
‘माझे आणि सूर्याचेही डोळे उघडण्याआधी
बाप गेलेला असायचा डोंगराच्या पलीकडे
भाकरीचा सूर्य शोधण्यासाठी...‘
......
या प्रवासात त्यानं
केळी विकली ,पाव विकले
अंडी कोंबड्या न् किराणाही विकला
ना त्याचं भाकरीचं वेळापत्रक होतं
ना पगाराचं गणित .‘
पण आयुष्य इथेच थांबत नाही.याहून अवघड वळणं समोर येत राहतात.कवी जेव्हा बापाच्या भूमिकेत येतो तेव्हा त्याच्यासमोर वेगळेच प्रश्न वाढून ठेवलेले असतात कारण त्याचं स्वतःचं बाळ बालपण सोडायला तयार नसतं.
‘पण
असं किती दिवस
बोबडं बोबडं बोलू
किती दिवस सांभाळू
हे तुझं बालपण
मी थकणार नाही रे
शरीर थकेल
संपेलही
मग कदाचित
ही दुनियाच वेडी होईल
मागे लागेल
तुझ्या या वेडाला ठेचण्यासाठी ‘!
- हा एक विदारक आयुष्यानुभव आहे .तो कवीच्या कविताकोमल ओंजळीत नियतीने जळत्या निखा-यासारखा ठेवला आहे.
हे संवेदनाशील मन एकीकडे शिक्षकाची भूमिका समाजात पार पाडत आहे,तेव्हा नाईलाजाने कधी एखाद्या बालकाच्या हातावर छडी मारण्याचा प्रसंग येतोच.
‘त्याच्या इवल्या हातावरती छडी मारली जेव्हा
कंठ दाटला परी मला ना रडता आले तेव्हा
आत्ता आत्ता हसत होता फुलासारखा गाली
क्षणात एका चर्येवरती चक्क उदासी आली
खिन्न मनाने मग मी त्याचा हात घेतला हाती
थरथरणाऱ्या हातामध्ये सोपविली ती काठी
बांध फुटावा तसेच उत्कट खळाळ हसला जेव्हा
कंठ दाटला परी मला ना रडता आले तेव्हा.. ‘
सगळीकडूनच अशी कोंडी अनुभवणारं कविमन या परिस्थितीत एवढंच म्हणतं -
‘हात जोडूनी नभाला घालतो मी साकडे
चंद्र दे आणून माझा खिन्न माझे झोपडे..‘
आत्मधूनमधील प्रत्येक रचना आयुष्याची अफाट आव्हानं तितक्याच ताकदीने कवितेत उतरवत राहते.
‘स्वप्नवेळा‘ या पुढच्या विभागात स्मरणरंजनातलं वास्तव अधिक लिरिकल स्वरूपात कवितेत उतरतं. वयाचे अधिक कोवळे टप्पे आणि त्या टप्प्यावर जाणवून गेलेल्या तरल भावना स्वप्नमय परिवेषात कवितेत गजबजतात.
‘तारुण्याचे स्टेशन सोडून
जाईल आपली गाडी जेव्हा
जुने वाटतील बाग-बगीचे
जरी बहरले कितीही तेव्हा
पुन्हा नव्याने होईन वेडा
पुन्हा तुझा मी घेईन ध्यास
पुन्हा कदाचित नकार येईल
पुन्हा नव्याने अडेल श्वास..‘
कोवळ्या वयातलं हरवून गेलेलं प्रेम कवितेच्या गावात मात्र हक्काने नांदत राहतं विस्तारत राहातं, थांबून राहातं ,कारण व्यवहाराच्या जगात त्याला कुठेच जायला जागा नसते.
‘हिवाळा सांडला कोऱ्या फुलावर
तडे ओठास गेले पाकळीच्या
निसटता चंद्र होताना अनावर
दिठीशी थरथरे दव ओंजळीच्या
कदाचित रात्रभर रडलाय रस्ता
अजूनही ओलसर स्वप्ने कडेला
इथूनच येत जातील लोक सारे
कुठे जाता न येई मात्र त्याला..‘
'धूळाक्षरे' या तिसऱ्या विभागातील कविता म्हणजे कवीने शेतीत आणि मातीत गिरवलेल्या रचना आहेत .यात शाम यांनी शेतकऱ्याच्या भावसंवेदना शब्दबद्ध केल्या आहेत. शाम यांच्या अभिव्यक्तीचा हा अजून एक वेगळा पैलू इथे आपल्यासाठी परिचित-अपरिचित भावचित्रं घेऊन मुखर होतो.
सृजनासाठी आसावलेल्या शेतकऱ्याचं सगळं विश्व मातीतून बाहेर फुटून येणाऱ्या आणि वाढणाऱ्या अंकुराभोवती फिरत असतं. खामकर लिहितात-
'असा रुजवा रुजवा घरादाराला सपान
आसावल्या डोळ्यांमध्ये दाटे पावसाचं गाणं
असा रुजवा रुजवा खुळा एक आनंदला
म्हणे बांधीन नभाला माझ्या लेकराचा झुला..'
या रूजव्यासाठी पावसाची प्रतीक्षा करत राहणं हा शेतकऱ्याच्या आयुष्यातला दैवाधीनतेचा अटळ जुगार.
'माझ्या काळ्या आईसाठी येई घेऊन तू धारा
तुझ्यावाचून पावसा जन्म माझा रे अधुरा..
उडे धूळ आभाळात कशी कवळुन धरू
माय पडते उघडी बघे उदास लेकरू
डोळा सपान पाहतो रंग हिरवा गहिरा..'
शेतकरी नित्यनेमाने हे स्वप्न पाहतो, नव्या परिस्थितीत नव्या तंत्रज्ञानाकडे आशेने बघतो आणि ..
'त्याने फार आशेने लावला होता डोळा
काळ्यानिळ्या यंत्राला
आणि वाटलं होतं त्याला
आपल्या डोळ्यातलं सारंच उगवून येईल संगणकावर
मग कळेल मायबाप सरकारला
कसं पिकत असतं वावर ..'
-या कवितेत समकालीन भ्रमनिरासाचा उद्विग्न आलेख उमटतो.मात्र याच शेतकऱ्याचा अडाणीपणा आणि व्यसनाधीनता त्याच्या घरधनिणीच्या शब्दात उतरवायला शाम विसरत नाहीत.
‘केली आवरसावर बाई निघाले कामाला
'चल झपझप सई दिस माथ्यावर आला
कसा झाला ग उशीर काय सांगू तुला आता
वळ पाठीचा सांगतो माझ्या संसाराची कथा
दारू सवत ग माझी रोज माझ्याशी भांडते
दिसभर शिणलेला जीव झोडून काढीते
नावगावासाठी बाई पाय माझा ग बांधला...'
पण याहीपुढे जाऊन हा कर्जबाजारीपणा आणि ही व्यसनाधीनता शेतकऱ्याला काहीवेळा अब्रूच्या दलालीपर्यंत नेऊन पोहोचविते, ही परिस्थिती 'धूळ' शीर्षकाच्या या विभागातील शेवटच्या कवितेतील येते.
'ती रोज दुपारी विसरून सारी गरती
सैलावून वसणे बसते धोंडीवरती
चाचपे अंग व्रण व्रण कुरवाळत थोडे
निरखते धन्याचे तुटके जुलमी जोडे
...
तंद्रीतच पुसते कुंकू हसते थोडे
निरखते धन्याचे तुटके जुलमी जोडे '
अशी भयानक परिस्थिती कवितेच्या आकृतिबंधात श्याम शब्दबद्ध करतात तेव्हा ग्रामीण स्त्रीचे असह्य भोग त्यातून प्रकट होतात.
शेवटचा विभाग 'भवताल' . यात समकाळाचं कवी-परिप्रेक्ष्यातून चित्रण येतं.
'चिकटून बसल्या जातीच्या
कुबड्यांची ऊब सुटे ना
मनगटातल्या धमन्यांची
फटफट ऐकू येईना
नाचवून क्रांतीज्योती
स्मरणांचे उत्सव होती
आधार वर्तमानाचे
कवटाळत बसती माती
मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालून पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी '...
असा कविचा विषण्ण प्रश्न आहे. यावर त्याची उत्तरे तोच कवितेतून शोधतो.
‘अजून नाही किरणांवरती सूर्याने कर लागू केला
अजून नाही आभाळाने पाऊस निर्यातीला नेला
अजून शेते हिरवी होती अजून मोती देते माती
अजून जपतो होड्या सागर अजून पक्षी उडान घेती '..
या आशावादी निसर्गवादी मानवतावादी उच्चारांसह कवितेत विपरित वास्तवातही संक्रमित झालेली ही आस्तिकता आपणही जपूया,अपरिहार्यपणे कविता लिहिणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यय देणा-या या अस्सल कवितांचा आदर करूया.
-भारती बिर्जे डिग्गीकर
काय एक से एक ओळख देतेयस. खूप
काय एक से एक ओळख देतेयस. खूप धन्यवाद भारती
>>>
अपरिहार्यपणे कविता लिहिणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यय देणा-या या अस्सल कवितांचा आदर करूया.<<< नतमस्तकच!
शाम फार हलवून टाकणाऱ्या कविता___/\___
पुस्तक मिळवते
धन्यवाद अवल, कवीला अशा
धन्यवाद अवल, कवीला अशा प्रतिसादाचीच भूक असते..
शामच्या कविता, त्याचे गद्य
शामच्या कविता, त्याचे गद्य लेख हा एक अस्सल अनुभव असतो. आणि त्याची मांडणी इतकी प्रभावी व रोखठोक असते की बरेच वेळा ती रचना वाचून झाल्यावर मन..बुद्धी केवळ बधिर होऊन जाते. विचारांच्या आवर्तात ही कविता आपल्याला सगळ्याच्या पार केव्हा घेऊन जाते हे ही कळत नाही.
असे असूनही शामच्या निर्मळ व संवेदनशील मनाचा तोल कुठेही सुटत नाही. काव्यातून प्रकट होणारे त्याचे अनुभव कधीही वाचकाच्या अंगावर येत नाहीत तर वाचकाला सहजच अंतर्मुख करुन सोडतात. त्या कवितेतील काव्य हे मग वाचकाला हळुहळू उमगू लागते, त्या कवितेच्या माध्यमातून कविमनाशी हळुहळु संवाद साधता येतो अशी ही शामची अतिशय प्रत्ययकारी कविता.
मायबोलीवर येऊन मला नक्की काय मिळाले असा विचार करता शाम सारखा अवलिया कवी असे नक्कीच म्हणू शकतो. शामच्या व्यक्तीमत्वातील जिद्द ही देखील वाचकांना खूप मोठी उभारी देत असते.
सारेच्या सारे जीवन- अनुभव शब्दावर सहज तोलणारा व कुठलाही आव न आणता वाचकाच्या पुढ्यात ते सरळपणे ठेवणारा असा हा केवळ अद्भुत कवी आहे., लेखक आहे.
शामच्या कविता अशाच हजारो...लाखो वाचक/रसिकांपर्यंत जाव्यात. शामची जी अद्भुत प्रतिभाशैली आहे तिलाही अनेक धुमारे फुटावेत व त्याचा प्रत्ययही आम्हा सर्वांना घेता यावा याकरता शामला हार्दिक शुभेच्छा.
भारतीताईंनी हा जो परिचय करुन दिला आहे तो शब्दप्रभावही फारच दमदार आहे, वाचकाला या कविता वाचायला प्रवृत्त करणारा असा आहे त्याकरता भारतीताईंना मनःपूर्वक धन्यवाद.
शामचे हार्दिक अभिनंदन व पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
_____/\_____
मी मायबोलीवर आलो तेव्हा
मी मायबोलीवर आलो तेव्हा शामने इथे लिहिणं थांबवलं होतं. पण त्यांचं बहुतेक लिखाण मी झपाटल्या सारखं वाचलं. या सा-या अस्सल अनुभुती वाचकाला खिळवून ठेवतात. एका वेगळ्या ख-याखु-या जगाशी आपली नाळ आपल्या नकळत केव्हा जोडतात हे कळतंच नाही. विलक्षण अनुभवसंपन्न लेखणी आहे. कुठेही कल्पक वाटतं नाही. अस्सल मातीतले वाटतं सारं.
पुस्तक वाचायलाच हवे.
>>>भारतीताईंनी हा जो परिचय करुन दिला आहे तो शब्दप्रभावही फारच दमदार आहे, वाचकाला या कविता वाचायला प्रवृत्त करणारा असा आहे त्याकरता भारतीताईंना मनःपूर्वक धन्यवाद.>>>+111
अतिशय सुरेख लिहिलेय.
अतिशय सुरेख लिहिलेय.
तुमच्या लेखांमधे अवीट गोडीचे मराठी वाचायला मिळते.
खूप छान वाटलं हे प्रदीर्घ
खूप छान वाटलं हे प्रदीर्घ उत्कट प्रतिसाद वाचताना शशांकजी,दत्तात्रय साळुंके _/\_शाम यांच्या कवितेचा प्रभाव त्यातून अधिक अधोरेखित झाला आहे.
अनेक आभार अस्मिता, चांगल्या पुस्तकांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न ..