कबीर ऐकणे ही माझी आवड. नदीकाठच्या रस्त्याला रमत-गमत येता-जाता कबीराचे दोहे गुणगुणणं हा माझा आवडता छंद.
या रस्त्याकाठीच तुझी हवेली. त्या ताशीव-रेखीव खिडकीत तू बसायचीस.
आठवतं का गं? ते तुझं गाणं? संध्यासमय. मी जाता-जाता ऐकलं. तू अद्भुत गीत गात होतील. मी थबकलो. नजर आपसूक तुझ्या खिडकीशी वळली. तुझं गीत मला कळालं नाही, तूही दिसत नव्हतीस, पण त्या गाण्यानं माझ्या मनावर गारुड केलं. न पाहिलेल्या तुझ्या प्रेमातच मी पडलो.
या हवेलीच्या उंचीपुढं मी किती खुजा आहे हे समजत असून हा अवघड खेळ मी खेळलो. स्वप्नातल्या प्रीतीत मी रमलो. सत्य उमजूनही कधीच मनी निराशा आली नाही. तू जणू ग्रेस झालीस गं, मला कळालीच नाहीस. पण मी मला कळावा असा कबीरही राहिलो नाही.
तुला रानफुलांची आवड. तुला आठवतं? ती फुलं शोधत शोधत तू आलीस पळसबनात.
मीही वेंधळ्यासारखा तिथेच निरखत राहिलो; रानफुलांत फुललेलं हे सोनफुल.
ती पहिली नजरभेट. कोणी कोणाला उमजेना. पण तुझी ओढ थांबली नाही, माझं वेड थांबलं नाही.
मी आधी आलो तर त्या पळसापाशीच नजर फिरे अन् तू आधी आलीस तर तो पळस सोडून तूही जात नव्हतीस. तो पळस हेच तर जणू आपलं संकेतस्थळ झालं होतं. आपण कधी गुंतलो हे मग समजलंच नाही.
ईश्वरसाधनेत लीन झालेल्या, कमरेत वाकलेल्या वयोवृद्ध फकीरासारखा तो पानं त्यागून माळावर उभा राहिलेला पळस. अन् त्याच्या आश्रयाशी फुललेली आपली प्रीत.
चैत्र आला.
तू रोज माळावर फुलांच्या चांदण्या मोजायला यायचीस अन् तुझ्या नाजूक पाऊलखुणांच्या चांदण्या वेचत मी.
त्या अनवट चैत्रात आपण बहरलो.
आपली प्रीत पाहून तो संन्यस्त पळस मोहरला, बहरला, फुलला.
त्यालाही त्याच्या फकीरीचा विसर पडावा ना! पळसाच्या सावलीत ती आपली पहिली जवळीक.
तुला आठवतंय का गं? मी तुझा हात पहिल्यांदा हातात घेतला आणि दोघांच्याही अंगावर मग मोहर फुलला.
तू लाजलीस. हात सोडवून चपळ खारीसारखी झटकन पळालीस.
झाडावर मधुपान करणा-या पळसमैना दचकून उडाल्या अन् त्या केशरीया पळसफुलांनी तुला-मला गर्भकेशरी रंगात न्हाऊ घातलं.
तुला आठवतं, दिसामासी पळसानं फुलांचा सडा घातला आणि तू व्याकूळलीस. हा फुलांचा सडा की आपल्या प्रीतीच्या गुपिताचा हा बोभाटा? तू लाजलीस अन् त्या पळसफुलांपेक्षा केशरीया लाली तुझ्या गालांवर आली. फुलांचा मकरंद शोधणारं ते फुलपाखरुसुद्धा क्षणभर भुललं. ते तुझ्याच गालाशी रुंजी घालत होतं.
मग मीच तुझी समजूत काढली होती. ‘अगं, हा फकीर पळस. त्याच्या पायाशी फुलाची पखरणसुद्धा मुकी- निशब्द. ही जणू माळावरच्या फकिरानं जर्दकेशरी धुनीच पेटवली आहे. बघ. पण या धुनीला तो परिचित सुगंधसुद्धा नाही. हा निसंग फकीर. याला प्रेमाची कुठली आस? म्हणून त्याची ती पेटलेली धुनीही तशीच निसंग लवलवती, कुठल्याच सुगंधाची त्याला आशा नाही. त्याचा नसणारा सुगंध ही वार्ता घेऊन जाणार कुठं? हे तुझं माझं गुपित तुझ्या माझ्यातच.
पण वास्तवाची जाणीव तुलाही अन् मलाही. न फुलणा-या स्वप्नाची किती मशागत करावी? ना तुला उमगलं, ना मलाही.
मी असा कोरडा ठाक. मनातल्या वेलांट्या मोजणारा.
तू किलबील चिमणी. मी आपल्यात रमणारा.
तू मुक्त आभाळात विहार करणारी विद्युल्लता. मी जणू माघातला रंगहीन उजाड माळ.
तू श्रावणसरींनी नाहलेली धरा. तुझ्या तनामनात बारा मास श्रावण. सप्तरंगांची उधळण तू.
तुझ्या प्रीतपूजेला मी माझ्या जीवनाचं अर्ध्य जरी दिलं तरी तुझ्याशी बरोबरी करावी इतकं भाग्य माझ्या नशीबी कुठलं? मी प्रयत्नही खूप केला गं, पण म्हणून तुला भावणारा श्रावण मी कधीच होऊ शकलो नाही.
या खिडकीशी तुझ्या
गाईल्यास तू त्या ओळी
माझे कबीराचे दोहे साधे
तू ग्रेस अवघड झाली
तुझ्या प्रीतीचा गुलाल झालो, अबीर झालो नाही,
मी कबीर झालो नाही
चैत्रात भेट अनवट
तपन फकीर पळसाला
निसंग पळस सांडतो
गुपित सांगतो काय कोणाला
तो फकीर चेतवी धुनी केशरी, राखिला सुवास नाही
कसे कळेल कोणा काही?
मी माघाच्या गुणाचा
तू श्रावण साक्षात्कारी
मी रंग असा बेढंग
आणि तू इंद्रधनूची स्वारी
जीवनाचे मी अर्ध्य वाहिले, पावन झालो नाही
मी श्रावण झालो नाही
वाह!
वाह!
क्या बात!! पिकू मध्ये पळसाला
क्या बात!! पिकू मध्ये पळसाला उद्देशून पांथस्थाला सौंदर्य दे अशा काही अर्थाचे सुरेख बंगाली कडवे आहे. (गाणे आता आठवेना). नकळत ते आठवले.
वाह! पळसाला फकीराची उपमा किती
वाह! पळसाला फकीराची उपमा किती शोभते!
सी, मी शोधलं पिकूचं गाणं.. जर्नी नाव आहे.
ओ आकाश ओ पलाश राशी राशी
एक्तू शोबूजे चौक मुछिए दे
घर छोरा मानुशीर मोने
याचा अर्थ - आकाशा, पळसाच्या झुबक्यांनो घर सोडलेल्या माणसांना नजरांना थोडी हिरवाईची झलक द्या असा होत असावा. (इंटरनेट ज्ञान)
वरदा नीट सांगू शकेल!
खूप भिडणारं स्फुट..
खूप भिडणारं स्फुट..
कविता तर अप्रतिम, जितकी जास्त वाचावी तितकी अजूनच उलगडत जाणारी...
अर्रे थँक्यू जि. - https:/
अर्रे थँक्यू जि. - https://youtu.be/oZ7PnR_ZKRE?t=13
जितकी जास्त वाचावी तितकी अजूनच उलगडत जाणारी... >> अगदी!!
खूप च सुंदर आणि तरल!
खूप च सुंदर आणि तरल!
अप्रतिम
अप्रतिम
सही!
सही!
सुंदरच !
सुंदरच !
कविता खुप आवडली.
कविता खुप आवडली.
सुंदर!!
सुंदर!!
छान
छान
आहा खूप सुंदर, अलवार, जियो
आहा
खूप सुंदर, अलवार, जियो
खुप छान
खुप छान
प्रतिसादांसाठी सर्वांना
प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद.
@सीमंतिनी, जिज्ञासा - गाणं ऐकलं. आवडलं. धन्यवाद
पुन्हा पुन्हा वाचतेय.........
पुन्हा पुन्हा वाचतेय............
कवितेबद्दल काय लिहू... अ प्र ति म
धन्यवाद सामी
धन्यवाद सामी
अप्रतिम.. असं काही वाचले की
अप्रतिम.. असं काही वाचले की मी माबोवर का येतो याचं उत्तर मिळतं.
पळसाच्या झाडा-फुलांना एक
पळसाच्या झाडा-फुलांना एक वेगळच गूढ स्थान होत मनात..ते आणखीन गर्द केलेत !
अप्रतिम....पूर्ण लेखच एक कविता आहे !
छान लिहीलंय. आवडलं.
छान लिहीलंय. आवडलं.
फारच सुंदर.
फारच सुंदर.
खूपच छान !
खूपच छान !