हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १५ (अंतिम): हिमालयातून परत...

Submitted by मार्गी on 9 March, 2022 - 05:41

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर

९ नोव्हेंबरला पाताल भुवनेश्वरचा नितांत रमणीय प्रवास झाला आणि आता हिमालयातला मुक्काम उठवण्याची वेळ आली आहे! पण १५ दिवस हिमालयात राहता आलं आणि हिमालयाचा सत्संग करता आला! सततचे घाटाचे रस्ते, सुंदर ट्रेक, रमणीय हिमशिखर, गूंजीचा थरारक प्रवास, नवीन ठिकाणची भ्रमंती, रात्रीच्या आकाशातले झमगते तारे! पण गंमत म्हणजे हिमालयातून निघताना पूर्वी होमसिक व्हायचं तसं आता होत नाही. स्पीति सायकलिंगच्या वेळेस हिमालयाचा निरोप घेतला तेव्हा निरोप घेतला असं वाटलंच नाही. हिमालय सोबतच राहिला तेव्हापासून. असो. १० नोव्हेंबरला बाकीच्यांना वाटेत एका ठिकाणी जायचं‌ होतं, म्हणून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. अदू तर आमच्यासोबत येणार नव्हती, त्यामुळे ती सत्गडलाच थांबली व मी तिच्यासोबत अजून एक दिवस सत्गडला थांबलो. दिवसभर अदू आसपासच्या मुला- मुलींसोबत मस्त खेळली. शेत, अंगणातला धबधबा, झाडं, गच्ची! त्यातच दिवसभर माकडांची टोळी आली होती! इथल्या अंगणातली झाडं, शेतावरची पिकं ह्यांचं खूप नुकसान करत होती. पण त्यामुळे अदूला माकडांची लॉटरी लागली! जिकडे बघू तिकडे तेच! तीही न घाबरता जवळ जात होती. खूप उपद्रव झाल्यावर काही जणांनी घरगुती एअरगनने त्यांना घाबरवलं. पण तरी ते संध्याकाळपर्यंत तिथेच होते. संध्याकाळी अदू व इतरांसोबत सत्गडमध्येच एक छोटा ट्रेक केला. संध्याकाळच्या प्रकाशात शिखर लाल दिसत होते. दूरवरूनच त्यांचा निरोप घेतला! अंधार पडता पडता तो ट्रेक करून घरी आलो आणि अदू एकदम रडायला लागली! दिवसभर खेळत होती. रात्री मात्र तिला एकदम आईची आठवण आली. तिची आई व नानी दुस-या गावाला गेल्या होत्या, मावशीही नव्हती. त्यामुळे एकदमच तिचा बांध फुटला. तिचं रडू बघताना वाटत होतं, ही आम्ही गेल्यानंतर राहू शकेल का! तिचं रडणं इतकं तीव्र आहे की, एक वेळ तर ठरवलं की, विमानाचं आमचं तिकीट रद्द करून तिच्यासाठी ट्रेनचं तिकीट काढू. रात्री तिचंही बरचसं सामान पॅक करून ठेवलं.


.

.

दुस-या दिवशी भल्या पहाटे सत्गडवरून गड उतार झालो. अगदी अंधारातच पायवाटेने उतरलो. साडे सहाची बस आहे. अदू शांत आहे आणि ती इकडेच थांबेल म्हणते आहे. सत्गडवरून पिथौरागढ़ला आलो आणि तिथे टनकपूरची बस मिळाली. बाकीचे जण टनकपूरच्या जवळ- हिमालयाच्या पायथ्याशी आहेत. मी, अदू व इतर काही जण बसने निघालो. सहा तासांचा बसचा प्रवास! हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा हिमालयाच्या पायथ्याला आम्ही पोहचू आणि परत धरणीमाता भेटेल! पिथौरागढ़च्या बाहेर येता येता सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये रस्त्याला लागून असलेल्या दरीमध्ये धुक्याचा समुद्र दिसला! अक्षरश: समुद्रच तो! हा बसचा प्रवासही कमी थरारक नाहीय. किती तरी ठिकाणी रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही आहे. अनेक ठिकाणी दगड कोसळत आहेत. आणि दूरवर बघताना तर लँड स्लाईडच्या खाणाखुणा सतत दिसत आहेत. हिमालय उतरतानाही सतत वळणारा व चढणारा- उतरणारा रस्ता. एका मागोमाग एक डोंगर उतरण्याचा अनुभव. लोहाघाट लागतं वाटेत. इथून जवळच विवेकानंदांचा मायावती आश्रम आहे. कधी योग नाही आला पण जाण्याचा. पुढे चंपावतला प्रसिद्ध बाल मिठाई घेतली. आता वेध लागले आहेत धरणीला भेटण्याचे! हिमालयातून परतताना सपाटीला येण्याचा अनुभवसुद्धा विशेष असतो. आधी सगळीकडे नुसते डोंगरच डोंगर असतात. जिकडे नजर जाईल तिकडे. पण हळु हळु तीन बाजूंना डोंगर राहतात आणि एका बाजूला खड्डा दिसतो. आणि व्हिजिबिलिटी चांगली असेल तर अगदी ४०- ५० किलोमीटर दूरवरूनही जमिनीवरचा धुक्याचा समुद्र दिसू शकतो! हिमालय उतरून परत जमिनीला टचडाउन होणं, हाही एक ध्यानाचा क्षण! एक प्रकारचा संधीकाल! टनकपूरला पोहचलो. टनकपूरच्या आधीही एका ठिकाणी नदीवरचा ब्रिज वाहून गेल्यामुळे रस्ता अगदी अस्थिर बनला आहे. पहाड़ी जीवनातल्या खडतर स्थितीचे हे रस्ते प्रतीक आहेत. असो.


.

.

दुपारी टनकपूरच्या जवळच असलेल्या बनबसा गावातल्या नातेवाईकांकडे आराम केला. हिमालयातून उतरून एकदम सपाट जमिनीवर आल्यामुळे काहीसं पोरकं वाटतंय. तिकडचे डोंगर, नितळ निळं आकाश इथे नाहीय. अदूची तिच्या आईसोबत आणि नानीसोबत भेट झाली. तिला सांगितलं की, ती थांबणार म्हणून तिचं विमानाचं तिकीट काढलेलं नाहीय, आत्ता एकदम काढलं किंवा कँसल केलं तर खूप महाग पडतं. शिवाय तिला हिमालय आणखी बघता येईल वगैरे. अखेर ती थांबायला तयार झाली. कारण तिलाही बाकी गोष्टी आवडत होत्याच. भावनेचा उद्रेक सोडला तर बाकी ती थांबण्याच्या तयारीनेच आली होती. संध्याकाळी तिथल्या नातेवाईकांसोबत बोलताना वेगळी माहिती कळाली. मी २६ किमीचा ट्रेक केला होता, तेव्हा ग्वेता नावाच्या गावावरून गेलो होतो. हे नातेवाईक त्या गावाजवळ डोंगरात वर पूर्वी राहायचे. त्यांनी सांगितलं की, आता इतक्या डोंगरात आणि जंगलामध्ये राहणा-या लोकांचं प्रमाण कमी झालंय. लोक आता गावं सोडून शहरांमध्ये येत आहेत. जमेल तसं दिल्ली, मुंबई असे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे मूळ गावी आणि आतल्या भागात आता तितकं मनुष्यबळच शिल्लक नाही. त्यांनी सांगितलं की, वाघाचा वावर वाढण्याचं हेही एक कारण आहे. पूर्वी तिथे एक प्रकारे मानवी उपस्थिती असायची. तिथे शेतीही‌ केली जायची. पण आता तिथे माणसं फार जात नाहीत. ह्या मंडळींची तिकडे जमीन आहे, तरीही त्यांचं तिकडे जाणं होत नाही. त्यामुळे वाघांना मोकळं रान मिळालं आहे. आणि जैव व्यवस्थेमध्ये एक बदल झाला तर अनेक बदल होतात. कदाचित आधी जे वृक्ष संवर्धन आपोआप (सामाजिक रिवाजांचा व लोकसंस्कृतीचा भाग म्हणून) होत असेल, ते आता होत नसेल. त्यामुळे तिथलं वन विरळ झालं असेल. आणि त्यामुळे मग वाघांना निवारा कमी मिळत असेल व म्हणून ते इतरत्र जात असतील. अशा खूप गोष्टी बदलल्या असतील. असो. रात्री आम्ही बनबसावरून बसने दिल्लीला निघालो. अदूला बाय बाय करणं कठीण गेलं. पण तिथे तिची मावशी, नानी व इतर नातेवाईक होते, त्यामुळे ती शांत झाली.


.

.

रात्रीचा बस प्रवास खूप थकवणारा ठरला. एक तर खूप गर्दी होती. आणि सिटिंग होतं. शिवाय समोरच ड्रायव्हरने रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावली होती! त्यामुळे झोप लागलीच नाही. हिमालयातल्या आठवणी मनातल्या मनात अनुभवत ती रात्र पार झाली. बनबसामध्ये काही तास थांबलो नसतो तर पिथौरागढ़ ते दिल्ली सलग प्रवासात खूप जास्त थकलो असतो. पहाटे दिल्लीत आनंद विहार टर्मिनसला उतरलो. मेट्रोने दुस-या एका ठिकाणी गेलो. मेट्रोचा अनुभव मात्र खूपच छान होता. इतका छान वाटला की, नंतरचा दिल्ली- पुणे प्रवास त्या तुलनेत कंटाळवाणा झाला! त्या विमान प्रवासापेक्षा वेळेमध्ये एअरपोर्टला पोहचण्याचा टॅक्सी प्रवास व टॅक्सीचा शोध जास्त थरारक होता! पुण्यामध्ये रात्री पोहचलो. आता इथे अक्लमटाईझ व्हायला दोन दिवस तरी लागतील! असा हिमालयातला प्रवास पूर्ण झाला. तिकडे अदू नंतर अजिबात रडली नाही. बनबसाच्या जवळ नानकमत्ता परिसरात मस्त फिरली. दोन- तीन दिवस ती बनबसाला राहिली आणि परत सत्गडला गेली. तिचा हिमालयात अजून राहण्याचा योग आहे! तिथली थंडी तिला त्रासदायक होती, पण ती आनंदात होती.


.

.

अजून एक ते दोन महिने अदू तिथे राहील असं वाटत असतानाच नोव्हेंबर संपता संपता ओमीक्रॉनचा उद्रेक झाला. त्या वेळेपर्यंत त्याच्याबद्दल ठाम असं काही माहिती नव्हतं. वातावरण असं होतं की, दुस-या लाटेसारखी स्थिती येऊ नये, म्हणून सरकार खूप लवकर सगळ्या गोष्टी परत बंद करेल असं वाटत होतं. आणि जर परत दुस-या लाटेसारखी स्थिती आली तर महिना- दोन महिने सगळा प्रवास वगैरे बंद असेल. त्यामुळे बराच विचार करून अदूला परत आणायचं ठरवलं. हळु हळु तिथे तीही कंटाळत होतीच. पण तरी ती आधी तर यायला तयारच झाली नाही. तिकीट काढल्यावरही कँसल कर म्हणून रडत होती. पण अखेर ओमीक्रॉनची तीव्रता आणि वाढण्याची शक्यता बघता ७ डिसेंबरचं आमचं ट्रेनचं दिल्ली- परभणी तिकिट काढलं (जसं मिळालं तसं). अदूची मावशी व तिचे मिस्टर तिला दिल्लीला सोडायला आले.


.

दिल्लीमध्ये त्यांचा निरोप घेतानाही तिला खूप रडू येत होतं! लहान मुलं कशी सहजपणे जीव लावतात! अदूला मी एकटाच ट्रेनने आणणार होतो. तिच्यासोबत एकट्याने केलेला प्रवास हासुद्धा एक वेगळा थरारक अनुभव! त्याबद्दल लिहीण्याची जागा अर्थातच तिचं पुढच्या वाढदिवसाचं पत्र! पण सगळं सामान आणि तिला घेऊन निजामुद्दीनला ट्रेन पकडणं हेही एक खडतर टास्क वाटलं. बायका लहान मुलांना घेऊन कशा फिरत असतील, ह्याची किंचितशी जाणीव झाली. अदू पिथौरागढ़वरून नॉनस्टॉप दिल्लीला आली होती. निजामुद्दीनजवळच्या एका लॉजमध्ये थोडा वेळ त्यांनी आराम केला आणि मी तिथेच तिला भेटलो. रात्री १० ची ट्रेन होती आणि अदू इतकी थकली की तिला ८ वाजताच झोप लागत होती. त्यातच तिचं सगळं घड्याळ सत्गडचं होतं, जिथे लोक ७ ला सगळं आवरतात आणि ८ ला झोपलेले असतात. कसबसं तिला जागं ठेवलं. अनेक सायकल मोहीमा व ट्रेकिंग वगैरे करूनही तिला घेऊन ती ट्रेन योग्य प्रकारे पकडण्याच्या गोष्टीचं जाम दडपण आलं होतं. पण अदू सोबतीला होती आणि गोष्टी होत गेल्या. छोटी बॅग पाठीवर आणि माझा हात धरून ती सोबत चालली. आणि योगायोग म्हणजे ट्रेन दीड तास आधीच लागलेली होती! ट्रेनमध्ये बसल्यावर व सेट झाल्यावर थोड्याच वेळात ती झोपूनही गेली! आणि मी रिलॅक्स झालो! चोवीस तासांचा हा प्रवास होता. सकाळी उठल्यावर तिचं मला निन्नू म्हणणं, सराईतपणे मराठीबरोबर हिंदी बोलणं, तिची ऊर्जा व मस्ती ह्यामुळे सोबतचे प्रवासी चकीत झाले! प्रवास मस्त झाला. विमानापेक्षा निश्चितच जास्त चांगला होता! वाटेतल्या गावांबद्दल- नद्यांबद्दल अदूला सांगता आलं. वाटेत तिच्यासोबत गप्पा झाल्या. तिचं खेळणं सुरू होतं. गोष्टी- गाणी सांगत होती, ऐकत होती. प्रवासानंतर रात्री उशीरा परभणीत पोहचलो. आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली असतानाच अदूला उलटी झाली. पण तिची काहीच तक्रार नव्हती. असा हा प्रवास पूर्ण झाला! २४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर असा उत्तराखंडचा प्रवास झाला आणि नंतर परत अदूला आणण्याचा तितकाच थरारक अनुभव! हिमालयाचा सत्संग, गूंजीचा रोमांच, अनेक रोमँटीक ट्रेक्स आणि साथ देणारे हिमशिखर! ह्या सगळ्या आठवणींना आता विराम देतो. हे सर्व वाचल्याबद्दल आणि ह्या प्रवासामध्ये साथ दिल्याबद्दल आपल्यालाही खूप खूप धन्यवाद!


.

(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)

Group content visibility: 
Use group defaults