आज "मराठी दिन". मराठी मातृभाषा असलेल्या जवळपास सर्व व्हाट्सएप वापरकर्त्यांनी त्यांना मराठी भाषेचा किती अभिमान आहे, हे स्टेट्स, समुहावर संदेश पाठवुन कळवले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. मराठी भाषेचा महिमा कसा आहे हे सांगण्यासाठी काही गंमतशीर वाक्ये सुद्धा सांगितली गेली. जसं की पुण्याच्या आजीबाई एका मुलाला विचारतात "नातुंचा नातु ना तू?" किंवा कप फुटता फुटता त्याला झेलणारा नवरा जेव्हा म्हणतो की "वाचला" तेव्हा बायको म्हणते "वाचला" नाही तर "वाचलात".
प्रत्येक भाषेत असे विनोद करता येते. विनोद करण्यासाठी भाषेचे बंधंन खरं तर नसतेच. पण असे विनोद भाषांतरीत केले तर त्यातली खरी गंमत जाते, हे ही खरं.
आपण सगळे, म्हणजे ह्या व्यासपीठावरील सदस्य, प्रामुख्याने मराठी भाषिक असल्याने मराठी भाषेतुन व्यक्त होत असतो. पण समाजात वावरताना कैक वेळा आपल्या नकळत आपण इतर भाषा इतकी आत्मसात करतो की आपण जो शब्द वापरतोय तो इतर भाषेतील आहे किंवा त्याचा समानार्थी शब्द मराठीत आहे ह्याचा विसर पडतो. उदाहरणार्थ, कुठे कोणाला चुकुन धक्का लागला तर "माफ करा" ऐवजी "सॉरी" हाच शब्द आपसुक बाहेर पडतो. "ठीक आहे" ऐवजी "ओके" चा वापर जास्त होतो.
येथे एका भाषेने दुसर्या भाषेवर अतिक्रमण केले, असं म्हणणं जरा धाडसाचे ठरेल. भाषा ही जशी आहे तशीच आहे. असणार. वापरकर्ते व्यक्त होण्यासाठी ज्या भाषेतील शब्दाला जवळ करतील तीच भाषा पुढे राहणार.
ह्या अनुषंगाने मला एक विचारावसं वाटतंय की जर तुमची मातृभाषा मराठी नसती तर तुम्हाला तुमची गैरमराठी असलेली मातृभाषा अधिक आवडली असती की मराठी भाषेच्या प्रेमात पडुन तिला आपलंसं केलं असतं?