मुराकामी

Submitted by पाचपाटील on 3 February, 2022 - 10:34

हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे
उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..!

त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!
सुरूवातीला धूसर दिसणारी त्याची पात्रं हळूहळू 'विश्वरूप' प्रकट करायला लागतात..!
हे करताना मुराकामी उरकाउरकी अजिबात करत नाही.
गोष्टींकडे बघण्याची एक खास अशी फ्रेश नजर त्याला
लाभलेली आहे. त्यामुळे घटनेचा, प्रसंगाचा, ॲम्बीयन्सचा,
मनस्थितींचा एकेक पापुद्रा अत्यंत शैलीदारपणे काढण्याची त्याची पद्धत असते..!
पण तरीही तो कुठंही कंटाळा आणत नाही, पकड किंचितही ढिली होऊ देत नाही, हे विशेष..! मुराकामीची कल्पनेची झेप फार उंच असल्यामुळे कधीकधी आपलेही वास्तवाचे भान सुटते. आणि होतं असं की आपण तर्क बाजूला ठेवून
मुराकमीला शरण जातो..!
बाधा झाल्यासारखे आत आत शिरत जातो त्याच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि काही पात्रं तर बऱ्याच काळानंतरही आपल्याला अधूनमधून झपाटण्याची क्षमता राखून असतात, असं म्हटलं तरी चालेल. (उदाहरणच द्यायचं झालं तर
'काफ्का ऑन द शोअर'मधलं मिस्टर नकाटा हे एक पात्र‌..! निव्वळ अफलातून..!)

त्याची पात्रं मध्येच एखादं पुस्तकं वाचायला लागतात किंवा कधी बीथोवन मोझार्टसारख्या अशाच एखाद्या अनवट
कलावंतांचं संगीत ऐकायला लागतात किंवा कधी cooking मध्ये खोलवर बुडून जातात किंवा कधी चक्क
मांजरांशी बोलायला लागतात आणि मांजरंही अत्यंत
निरागसपणे स्वतःचं अंतरंग उघड करायला लागतात किंवा मग कधी बारमध्ये बसून फिलॉसॉफीकली दारू चाखणं
किंवा सेक्ससंबंधी उत्कृष्ट बहारदार हालचालींची वर्णनं
येतात..!
आणि मग त्यांच्या माध्यमातून मुराकामी त्या प्रत्येक
कलाकृतीबद्दलची, प्रक्रियेबद्दलची स्वतःची चिंतनशील
सघन निवेदनं व्यक्त करत राहतो. जे अत्यंत वाचनीय असतं..!

मुराकामीचं स्वतःचं वाचन घनघोर म्हणावं असं आहे..!
पौर्वात्य-पाश्चात्य जगातल्या अभिजात वाड्मयाची,
इतिहासाची, संस्कृतींची मुराकामीला जाण आहे.
बुद्ध, मार्केझ, सार्त्र, काम्यू, काफ्का, फ्रॉईड, ऑर्वेल, कोसलर, रसेल, हेमिंग्वे, शॉ, प्रुस्त, विटगेन्स्टाईन, इलियट,
फिट्झेराल्ड, नीत्शे, सॉक्रेटिस, प्लेटो, चेकॉव्ह, दस्तोव्हस्की आणि असे रग्गड अभिजात लेखक-फिलॉसॉफर्स मुराकामीने वाचून पचवलेले आहेत, हे दिसतं..!
कारण मुराकामी स्वतःच्या कादंबऱ्यांमध्ये काही सवांदांमध्ये, अशा लेखकांच्या साहित्यातले qotes अचूक जागी अत्यंत चपखलपणे पेरत असतो..!
ते सगळं वाचत असताना आपल्यामध्येही भावनिक,
मानसिक चक्रीवादळं येतात आणि नेणीवेच्या पातळीवर
आपलीही वरच्या दिशेने हालचाल सुरू होते, असाही एक अनुभव येतो.

बाकी मला आणखी एक आवडतं ते म्हणजे ह्या मुराकामीला 'शांतता' 'स्तब्धता' 'मौन' 'एकांत' ह्या गोष्टी शब्दांमध्ये फारच परिणामकारकरीत्या मांडता येतात..! त्यामुळे त्याच्या पॅराग्राफ्समधल्या शांततेची चव घेता घेता आपणही शांत होत जातो..!
आणि ती विनायास झिरपणारी शांतता आपल्याला एवढं काही देत असते की त्याबद्दल काय सांगावं..! ज्याने त्याने
वाचूनच अनुभवायला पाहिजे, अशी एक गोष्ट आहे ती.

'काफ्का ऑन द शोअर', '1Q84' 'नॉर्वेजियन वूड' ह्या काही माझ्या आवडत्या कादंबऱ्या आहेत. इतरही आहेत. आणि तशी तर मुराकामीच्या पुस्तकांची यादी काही लवकर संपेल असं दिसत नाही.! लिहिण्यासाठी एवढे वेगवेगळे विषय, आशय हा माणूस कुठून पैदा करतो कळत नाही !! असो.

जाताजाता: बिथोवनच्या एका अप्रतिम कलाकृतीचं वर्णन
मुराकामीने त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीत केले आहे. ते वर्णन एवढं जबरदस्त आहे की आपण पुस्तक संपल्यावर आपोआपच ते शोधून ऐकावं लागतं.! दुसरा काही इलाजच राहत नाही..! आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला पटतं की मुराकामी म्हणतोय ते बरोबर आहे..! मग आपण त्याला धन्यवाद देतो. बाकी मुराकामीला धन्यवाद वगैरेची काही गरज असेल, असं वाटत नाही..! तो गालातल्या गालात हसून सोडून देईल..! त्यामुळे ते एक असोच.

ऐका: बीथोवन Piano Trio No. 7 "Archduke"
https://youtu.be/5eb1y1bjBmM

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख . आवडलं.
या लेखकाचं मी काही वाचलं नाही तर सुरुवात कुठून करावी? लिस्ट दिलीत तर बरं होईल

या लेखकाबद्दल खूप कौतुक वाचून आहे पण अजुन वाचलेले नाही यांचे साहीत्य.
तुमच्या लेखामुळे उत्सुकता चाळवली गेलेली आहे.

लिस्ट दिलीत तर बरं होईल >>>> +१

'क्लासी' वाचकांकडून मुराकामीचं नाव ऐकलं आहे. पण त्यांची आणि आमची प्यॅकेजं जुळत नसल्याने कधी वाट्याला गेलो नाही. Wink
हा लेख वाचून उत्सुकता चाळवली. सुरूवात कुठून करायची हे समजलं तर प्रयत्न करता येईल.

आय क्यु ८४ माझे फेवरिट पुस्तक आहे. त्यातही एक क्लासिकल ऑपेरा संगीत आहे. ह्याचे कथानका चे कन्स्ट्रक्षन व ट्रीटमेंट फारच वेगळी व सुरेख झुळ झुळीत आहे. भाषा व शैली उत्तम तरीही अगदी साध्या व्यक्तिमत्वांच्या एकमेकांशी इन्टर अ‍ॅक्षन मधून जे जबरदस्त कथानक फुलवतो. ते फार भारी. ह्या पुस्तकात आत एक अंतरंगी स्त्रीवाद आहे. स्त्रियांसाठी जे सेफ हाउस आहे त्याला भरभक्कम कुत्रे आहेत. संरक्ष क म्हणून. मी अनेक दा असे सेफ हाउस कल्पनेत आणले आहे. त्यात जंगलात वसलेली वास्तू. सेफ असलेल्या मुली. लक्ष ठेवणारी म्हातारी. हे अगदी जवळचे झाले मला.

जसे मेट्रिक्स मधील ओरॅकल व सती.

लक्षात राहते ते हिरोच्या वडिलांचे पात्र टीव्ही नेटवर्क ची बिले घरो घरी जाउन कलेक्ट करणा रा थेंकलेस जॉब एकटे आयुष्य व कुठे ठेवायचा म्हणून सोबत बरोबर घेउन हिंडायचा बारका पोरगा. वाचताना आतून कुठे तरी तुट्त जाते. चांगले लेखक आपल्या मनाला एकदम हात घालुन बरोबर घेउन जातात ते ह्या पुस्तकात जाणवते. मानवाचे निसर्गाशी असलेले डीप कनेक्षन, कॄर पुरु ष प्रधानता. हे ही समर्थ पणे लिहिले आहे.

जगातील सर्वोत्तम लेखकांपैकी एक.

1Q84 मीही सध्या ऐकते आहे - अमांकडूनच त्याबद्दल ऐकलं होतं. Happy
सरीअल आहे, आवडतं आहे, पण ऐकणं पेशन्सचं काम वाटतं मात्र. ठाय लयीत सुरू आहे कारभार.

म्हणजे मला काय वाटते भरजरी दैवी व्यक्तिमत्वातून कोनीही उत्तम कथानक सादर करेल. पण अस्सल चांगला लेखक साध्या व्यक्तिरेखा घेउन त्यातून काहीतरी असामान्य घडवतो. आपल्या नेटिव्ह कल्चरची अनुभूति वाचकाला देतो. जपान जो आहे तो आहे. पण मी पाध्यांचे तोकोनोमा वाचले त्यातून जो जपान दिसतो तो अगदी मॅजिकल आहे. ही भाषेची मौज आहे. तसे मुराकामीचे आहे साधीच व्यक्तिरेखा कराल परिस्थिती. जीवनाचा झगडा प्रेम नवे जोडपे ज्याने एक टे पणा जुलुम खूप अनुभवला आहे त्यांना एका टप्प्यावर प्रेम सापडते. आपलाही जीवनावरचा विश्वास शाबूत राहतो. वाचकाला हा अनुभव देणे लेखकाचे यश.

अफाट मनुष्य आहे मुराकामी.
तो मॅरॅथॉन रनर ही आहे. वेळ पण भारी साधतो फुल्ल मॅरॅथॉन साडेतीन तासात वगैरे
माझे रनिंग सुरु झाल्यावर वाचन जवळपास बंदच झाले आहे आणि हा मनुष्य लिहायला कुठून आणि कसा वेळ काढतो देव जाणे!

त्याचे What I Talk About When I Talk About Running हे ही पुस्तक वाचण्याजोगे आहे.

>>>>>त्याचे What I Talk About When I Talk About Running हे ही पुस्तक वाचण्याजोगे आहे.
आहे नेटवर फ्री. जस्ट सॉ.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
अमा,
कुठे ठेवायचा म्हणून सोबत बरोबर घेउन हिंडायचा बारका पोरगा>>
आणि लहान पोरगा सोबत असेल तर लोक बिल द्यायला नाही म्हणणार नाहीत, हे ही एक कारण..!
जसे मेट्रिक्स मधील ओरॅकल >> +11

आओमेम, टेंगो, डोवेजर, कोमात्सु, लीडर, प्रोफेसर, उशिकावा, तमारू आणि लेखिका फुका एरी..!
ही कादंबरी रात्री वाचताना, आकाशात चंद्र किती आहेत, हे मी एक-दोनदा चेक केल्याचं आठवतंय Happy
सुदैवाने एकच होता..! Wink

हर्पेन,
त्याचे What I Talk About When I Talk About Running हे ही पुस्तक वाचण्याजोगे आहे.>>

होय. चांगलंच आहे ते. बाकी त्यातही तो रनिंग करताना वॉकमनमध्ये Lovin' Spoonful- Daydream वगैरे चाललेलंच असतं. Happy

लिस्ट दिलीत तर बरं होईल >>>>
'काफ्का ऑन द शोअर' पासून सुरूवात केली तर बरं होईल. जबरदस्त प्रकार आहे..! _/\_

बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत.

द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग एक-दोन बैठकीत संपण्यासारख्या नाहीत. दोन्हींमध्ये जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे.
शिवाय After the quake हा कथासंग्रह आहे ज्याचा मराठी अनुवाद झालेला आहे.

मुराकामीची वरती उल्लेख झालेली सर्व पुस्तकं विशलिस्टमध्ये आहेत. अजून एकही वाचलेलं नाही.

टोक्योच्या अंडरग्राऊंड रेल्वेत गॅस अटॅक झाला होता, त्यावर त्याने एक पुस्तक लिहिलंय (हल्ल्यातून बचावलेल्यांच्या मुलाखती घेऊन, वगैरे असं काहीतरी आहे.) पुस्तक तसं जरा जुनं आहे, ते पण मला वाचायचं आहे.