दिल्लीला जाण्याची माझी ती चौथी वेळ होती. पण ही दिल्ली भेट सर्वात विशेष ठरणार होती. कारण त्यावेळी माझं अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. त्या स्वप्नपूर्तीला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
दिल्लीला जाण्यासाठी मी आणि माझा मित्र शशिकांत आम्ही पुण्याहून दुरंतो एक्सप्रेसनं निघालो. एकीकडे प्रवासाचा उत्साह होताच आणि दुसरीकडे दिल्लीला ज्या कारणासाठी निघालोय त्यामुळे तर उत्साह संचारलेला होता. दिल्लीला जाण्याचं त्यावेळचं निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्षात पाहण्याचं. प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्याला माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टीने अतिशय महत्व आहे. गेली 18 वर्ष बाळगलेलं स्वप्न 2012 मध्ये साकार होत होतं. आम्ही कडाक्याच्या थंडीत सूर्योदयापूर्वीच दिल्लीला पोहचलो. हजरत निजामुद्दिन स्टेशनवर उतरून लगेच नवी दिल्लीला गेलो आणि स्टेशनजवळच्याच एका हॉटेलमध्ये रुम घेतली.
26 जानेवारीला सकाळी राजपथाकडे निघालो. संचलनाची तिकिटं तर मिळाली नव्हती, त्यामुळे विनातिकिट संचलन पाहता येईल अशा ठिकाणी आम्हाला सोड असं रिक्षावाल्याला सांगितलं. कडक सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे त्यानं जरा लांबच आम्हाला सोडलं होतं. आम्ही मग भरभर चालत इंडिया गेटच्या दिशेने गेलो. मी मित्राला आधीच सांगितलं होतं की, जर इंडिया गेटच्या आसपास जाऊन संचलन बघता आलं तर ठीक, नाहीतर सरळ रुमवर येऊन टी.व्ही.वरच बघू. पण अखेर प्रत्येक सुरक्षा कडे ओलांडत आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षा तपासण्या पूर्ण करून आम्ही इंडिया गेटच्या मागच्या बाजूला पोहचलो. इंडिया गेटच्या मागच्या बाजूच्या टिळक मार्गाच्या अगदी कोपऱ्यावर जाऊन उभे राहिलो.
ठीक दहाच्या ठोक्याला तोफांचा आवाज येऊ लागला. म्हणजेच आता ध्वजारोहण, राष्ट्रगीत होऊन प्रत्यक्ष संचलन सुरू होत होतं. त्यानंतर पाचच मिनिटांनी आकाशातून हेलिकॉप्टर्सचा आवाज येऊ लागला आणि हवाईदलाची चार हेलिकॉप्टर्स उलट्या ‘Y’ आकारात उडत आमच्या डोक्यावरून निघून गेली. ही हेलिकॉप्टर्स राजपथावर पुष्पवर्षाव करत आली होती.
एकीकडे हे सुरू असताना मी मित्राला संचलनात काय काय होणार आहे ते क्रमाने सांगत होतोच. आता संचलन शेवटच्या टप्प्याकडे आले होते. राजपथावर सलामी मंचासमोरून कसरती करत आलेले मोटरसायकलस्वार आमच्यासमोर येऊन थांबू लागले. त्यांच्यानंतर काही मिनिटे शांतता होती. संचलन संपल्यासारखा भास होत होता. कारण आमच्यासमोर काहीच येत नव्हते. पण त्याचवेळी तिकडे सलामी मंचासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले होते. पुढे 13 मिनिटांनी आकाशातून विमानांचे आवाज येऊ लागले आणि संचलनातील सर्वात रोमांचक भाग सुरू झाला, Fly past!
आता मात्र मी मित्राला लगेच तयार राहायला सांगितलं, कारण आता येणार होती 3 SU-30MKI लढाऊ विमानं त्रिशूळ Formation मध्ये. त्या विमानांनी वेगानं उडत येत आकाशात जात त्रिशुळाची आकृती तयार केली. आमच्या डोक्यावरूनच ही विमानं प्रचंड गडगडाट करत आकाशात वर गेली होती. आणि लगेचच त्यांच्या मागोमाग आणखी एका SU-30MKI नं आकाशात एकदम सरळ रेषेत वर जात स्वत:भोवती गिरक्या घेत आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. अशा रितीने संचलनाचा शेवट झाला आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. जाता जाता संचलनाच्या शेवटी हवेत सोडण्यात आलेले तीन रंगांचे फुगे आम्हाला दिसत होते.
संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्यावर मी मित्राला पुन्हा इंडिया गेटकडे जाऊया म्हटलं. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमत्ताने उजळलेला तो सगळा परिसर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. आजपर्यंत फक्त दूरचित्रवाणीवर पाहिलेलं ते दृश्य प्रत्यक्षात समोर साकारलेलं होतं. काय नजारा होता तो!! हे पाहण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. हे दृश्य पाहून माझा मित्रही मग खूश झाला. अशा रितीनं अनेक वर्षे पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं. हे सगळं प्रत्यक्ष पाहत असताना त्या दिवशी माझ्या भावना काय होत्या हे शब्दांत मांडणं मात्र कठीण झालं आहे!
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/01/blog-post_25.html
संचलनाची तिकिटं तर मिळाली
संचलनाची तिकिटं तर मिळाली नव्हती, त्यामुळे विनातिकिट संचलन पाहता येईल अशा ठिकाणी आम्हाला सोड असं रिक्षावाल्याला सांगितलं. >> अरे देवा... त्यासाठी पण तिकिट आहे का..? किती तिकिट असतं अन ते कुठे बुक करायचं..?? मी ७ वर्षांपुर्वीच संचलन दिल्लित बसुन बघण्याचा प्लॅन केला होता पण तो सद्ध्या तरी २०२५ पर्यंत बारगळला आहे..
बाय द वे, तुम्ही संचलन बघायला गेला तेव्हा संचलनात देशभक्तीची सूज वगैरे काही नसेल.. देश ज्या काळी चांगल्या स्थितीत होता तेव्हा तुम्ही तिथं होता हे तुमचं परमभाग्यच म्हणावं लागेल..!!!
अरे वाह मस्त.. मला वाघा
अरे वाह मस्त.. मला वाघा बॉर्डरचा अंगावर शहारा येणारा अनुभव आहे. तुम्हाला किती भारी वाटले असेल हे समजू शकतो.
DJ, संचलन राजपथावर बसून
DJ, संचलन राजपथावर बसून पाहण्यासाठी पूर्वीपासूनच तिकिटं लागतात; पण 2016 नंतर त्याचे दर बरेच वाढले एवढंच!
<<तुम्ही संचलन बघायला गेला तेव्हा संचलनात देशभक्तीची सूज वगैरे काही नसेल.. देश ज्या काळी चांगल्या स्थितीत होता तेव्हा तुम्ही तिथं होता हे तुमचं परमभाग्यच म्हणावं लागेल..!!!>>
- सहमत!
तुम्ही ज्या दुरंतो
तुम्ही ज्या दुरंतो एक्सप्रेसचा उल्लेख केल तिने आम्ही सहकुटुंब नुकताच प्रवास केला.. तुमचा त्याबद्दलचा लेख आधीच वाचला असल्याने तुमचे बरेचसे अनुभव मीही ताडून घेऊ शकलो फक्त आम्हाला तीत टोमॅटो सूप नाही मिळालं
राजधानी, शताब्दी, दुरंतोमध्ये
राजधानी, शताब्दी, दुरंतोमध्ये जेवणाआधी मिळणारं सूप ४ वर्षांपूर्वी बंद केलं आहे. पण आता भांडं मात्र ३०० ते ५०० दरम्यान गुपचुप वाढवलं गेलंय.
हो न... भयंकर तिकिट होतं.
हो न... भयंकर तिकिट होतं. त्यापेक्षा विमानाने गेलेले परवडेल असं क्षणभर वाटलं. परंतु पुणे-हजरत निझामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस ने प्रवास करणे एक चैनीचा, आनंदाचा अन सुखद अनुभव होता. वेळेपेक्षा १०-१५ मिनिट आधीच पोचली हा शेवटचा सुखद धक्का..!!
पराग सुंदर आठवण. चित्तथरारक
पराग सुंदर आठवण. प्रत्यक्ष चित्तथरारक एअरशो पहायला खूप मजा येते.