भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे.
सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते. ब्रिटिश-भारतीय सैन्यदलांमधील भारतीय शिपाई बरेच कमी शिकलेले असत. त्यामुळे सैन्यदलांविषयीची अधिकृत माहिती त्या शिपायांना व्हावी, सरकार त्यांच्या कल्याणासाठी राबवत असलेल्या निर्णयांची माहिती त्यांना मिळावी या मुख्य हेतूने हे प्रकाशन सुरू करण्यात आले होते. काही काळातच या पाक्षिकाची लोकप्रियता वाढल्यामुळे त्याच्यामागील उद्देश पूर्ण झाला असल्याचे लक्षात आले. पुढे काही काळासाठी लाहोरहून, नंतर सिमल्याहून आणि त्यानंतर नवी दिल्लीहून हे प्रकाशन प्रकाशित होऊ लागले. त्यावेळी फौजी अखबारच्या शेवटच्या दोन पानांवर रोमन लिपीतूनही उर्दू भाषेतील काही सदरे प्रकाशित केली जात असत.
युद्धभूमीवरील बातम्या प्रकाशित होऊ लागल्याने पहिल्या महायुद्धाच्यावेळी फौजी अखबारची लोकप्रियता विलक्षण वाढली होती. त्यामुळे त्यावेळी फौजी अखबारची पानंही वाढवावी लागली होती. तसेच संपूर्ण महायुद्धाच्या काळात एक विशेष पुरवणीही प्रकाशित केली जात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फौजी अखबारची लोकप्रियता पुन्हा इतकी वाढली की, विविध देशांमध्ये लढत असलेल्या भारतीय जवानांसाठी इजिप्तची राजधानी कैरो येथून याची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रकाशित होऊ लागली होती. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाबाबतची माहिती देणारी जंग की खबरे ही विशेष पाक्षिक पुरवणीही काढली जात होती.
स्वातंत्र्यानंतर फाळणी झाल्यावर फौजी अखबारमध्ये काम करत असलेल्या अनेक मुस्लिम कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केल्यामुळे फौजी अखबारचे प्रकाशन काही काळ बंद पडले होते. पण काही कालावधीतच फौजी अखबार पुन्हा प्रकाशित होऊ लागला. त्यानंतर 4 एप्रिल 1954 पासून फौजी अखबार सैनिक समाचार म्हणून ओळखला जाऊ लागला. आज हे पाक्षिक संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क निदेशनालयाकडून प्रकाशित केले जात आहे.
सैनिक समाचारच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने Soldering On या शीर्षकाचा एक खास विशेषांक (Coffee Table Book) प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये या प्रकाशनाच्या 100 वर्षांमधील वाटचालीचा चित्रमय आढावा घेण्यात आला होता. त्याचवेळी सैनिक समाचारचाही विशेषांक त्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आला होता.
आज सैनिक समाचार प्रकाशनाला भारतीय सैन्यदलांमध्ये मानाचे स्थान आहे. सैन्यदलांमध्ये घडणाऱ्या घडामोडींविषयी जाणून घेण्याचे हे एक महत्वाचे साधन ठरत आहे. भारतीय सैन्यदलांच्या आणि देशाच्या दृष्टीनेही महत्व असलेल्या घटनांची दखल यामध्ये घेतली जात असते, मग ते पूर, भूकंप, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सैन्यदलांनी देशात आणि विदेशात केलेली मदत असो किंवा भारताची चीन-पाकिस्तानबरोबर झालेली युद्धे असोत, पोखरणच्या अणुचाचण्या असोत किंवा गलवानसारख्या संकटकाळात सैन्याने बजावलेले गौरवपूर्ण कामगिरी असो, एकूणच देशाच्या सुरक्षेशी संबंधित विविध घडामोडींना सैनिक समाचारमध्ये स्थान मिळत असते. दरवर्षी नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचेही सचित्र वार्तांकन सैनिक समाचारमध्ये येत असते.
2020 मध्ये आलेल्या कोरोना संकटाचा परिणाम सैनिक समाचारवरही झाला. कोरोनामुळे देशात लावण्यात आलेल्या Lockdown मुळे सैनिक समाचारची छपाई त्याचे वितरणही काही काळासाठी प्रभावित झाले होते. पण तेव्हापासून सैनिक समाचारची छपाई बंद झाली ती कायमचीच! त्यामुळे हे प्रकाशन आता केवळ online स्वरुपातच उपलब्ध आहे. त्याचवेळी याची वर्गणीही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
Link
https://avateebhavatee.blogspot.com/2022/01/blog-post_8.html
chan mahiti.
chan mahiti.
तुमचे सर्वच लिखाण खूप
तुमचे सर्वच लिखाण खूप माहितीपूर्ण असते.
धन्यवाद देवभुबाबा आणि धनवन्ती
धन्यवाद देवभुबाबा आणि धनवन्ती.
तुमचे सर्वच लिखाण खूप
तुमचे सर्वच लिखाण खूप माहितीपूर्ण असते. +१
छान माहिती. याबद्दल काहीच
छान माहिती. याबद्दल काहीच माहीत नव्हते.
>>छान माहिती. याबद्दल काहीच
>>छान माहिती. याबद्दल काहीच माहीत नव्हते.>> +१
धन्यवाद कुंतल, मानव पृथ्वीकर
धन्यवाद कुंतल, मानव पृथ्वीकर आणि स्वाती२