माझ्या कवितांचा ‘कदाचित’ हा (पहिला आणि शेवटचा) काव्य-संग्रह दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला त्या दिवसाच्या आठवणी दाटून येतात. तो माझा सत्तरावा वाढदिवस होता! माझ्या बाबतीत असे काही होणार आहे असे कुणी मला माझ्या चाळीशी-पन्नाशीत सांगितले असते तर मी त्या माणसाला वेड्यात काढले असते कारण जवळपास अर्धे आयुष्य जगून होईपर्यंत मला काव्य हा एक दुर्बोध आणि ‘कठीण’ साहित्य प्रकार वाटायचा.
शाळेत आपण सगळेच कविता ‘शिकतो’. म्हणजे काय तर, कोणीतरी लिहून ठेवलेल्या कवितांचा ‘अभ्यास’ करतो. त्याहून वाईट प्रकार म्हणजे एकेका कवितेवरच्या ‘संभाव्य’ प्रश्नांची उत्तरे ‘तयार’ करून ठेवतो. आपल्याला हेही सांगून ठेवलेले असते की अंकगणितातल्या प्रश्नांचे फक्त एकच उत्तर ‘बरोबर’ असते आणि बाकी सगळी ‘चूक’ असतात पण भाषेतल्या प्रश्नांचे तसे नसते. एकेका प्रश्नाची एकाहून अधिक उत्तरे असू शकतात आणि ती कमी-अधिक प्रमाणात बरोबर किंवा चूक असू शकतात. तेंव्हा मला वाटायचे, “ही भलतीच आफत ओढवली की! आता पैकीत पैकी मार्क मिळणे शक्यच नाही.” हे असे का असावे ते मला अजिबात कळायचे नाही आणि आवडायचे तर त्याहून नाही; कारण शाळेत जाउन शिकायचे तेच मुळी परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी अशी माझी (आणि बहुतेक सर्वांचीच) ठाम समजूत होती. गणित, शास्त्र हे विषय झकास कारण त्यात पैकीत पैकी मार्क मिळण्याची सोय असते वगैरे.
माझ्या सुदैवाने मला मराठी शिकवायला वाटवे बाई लाभल्या. कविता उलगडून सांगणे ही त्यांची खासियत होती. आपल्या आपण वाचून किंवा ‘गाईड’ वाचून आपल्याला कळले नव्हते ते वर्गात बाईंनी शिकवल्यावर समजले, हा अनुभव यायला लागला. एकदा त्या म्हणाल्या होत्या, “कवितेवर परीक्षेत प्रश्न विचारणे म्हणजे त्या कवितेवर अन्याय करणे होय.” अर्थात त्यावर ना त्यांच्याकडे ना आमच्याकडे काही उपाय होता ! त्यानंतर पुढे एकदा त्यांनी एक आणखी बॉम्बगोळा टाकला होता. “ कविता समजणे यापेक्षा कविता आवडणे हे जास्त महत्वाचे आहे.” न राहवून मी विचारले होते, “ कविता समजलीच नाही तर ती कशी आवडेल?” त्यावर त्यांनी एक बडबडगीत म्हणून दाखवले आणि विचारले होते,” आवडली का ही कविता?” आम्ही सगळे ‘हो’ म्हणालो. पुढे त्या म्हणाल्या, “पण समजली का?” आम्ही गप्प.
खूप पुढे जाउन लक्षात आले की खरे तर त्यावेळी वर्गातली झालेली ही चर्चा फार मूलगामी होती पण ते समजण्याइतकी बौद्धिक क्षमता तेंव्हा आमच्यात नव्हती. शाळेतल्या अभ्यासक्रमात नव-काव्य नव्हते, मुक्तछंद नव्हता. ‘सतारीचे बोल’ सारख्या कवितेतल्या वरकरणी साध्या, सोप्या वाटणाऱ्या ओळीत काही गर्भितार्थ कसा असू शकतो, त्यातून एक ‘मूड’ कसा निर्माण होतो हे बाई छान समजावून द्यायच्या, तेंव्हा आम्ही चकीत होऊन जायचो. तरीही, कविता हा प्रकार आपल्या आवाक्याबाहेरचा आहे ही समजूत पक्कीच होत गेली. पुढे प्रशासनासारख्या रूक्ष क्षेत्रांत आल्यावर तर कवितेचा ‘वृथा छंद’ धरणे राहूनच जायला झाले.
आयुष्याच्या वाटेवरची काही वळणे अतर्क्य आणि अगम्य असतात. माझ्या आयुष्यात तसे एक वळण अचानकपणे आले आणि कविता हा प्रकार गांभीर्याने घेण्याचा असतो, एव्हढेच नव्हे तर तो ‘समजण्या’ पेक्षाही, ‘अनुभवण्या’चा असतो, या निष्कर्षापर्यंत येऊन मी आदळलो. एकदा ही पायरी ओलांडल्यावर मग कवितेतून आपण व्यक्त होऊ शकतो हा शोधही मला लागला. तो माझ्या दृष्टीने, ‘तिळा उघड’ क्षण होता ! ‘तंत्र’ आणि ‘मंत्र’ या गोष्टी अभ्यासाने समजू शकतात पण आपण त्या वाटेला नाही गेलो तरी त्यामुळे फारसे काही अडत नाही असेही मी पटवून घेतले. माझे ज्येष्ठ मित्र मनोहर सप्रे यांचे एक वाक्य कामी आले. ‘मेडिकल कॉलेजला जाऊन प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणे आणि घरात आपल्या बायकोला दिवस जाणे या अगदी भिन्न गोष्टी आहेत’.
इतके होऊनही, आपल्या कविता प्रसिद्धीयोग्य सोडाच पण जपून ठेवण्यासारख्या आहेत यावरही माझा विश्वास बसला नव्हता. कित्येक कविता तर मी एकदा वाचून फाडून फेकून देत असे. थोडी भीड चेपल्यावर काही मोजक्या मित्र मैत्रीणीना वाचून दाखवू लागलो. मग एकदा ‘मायबोली’ या पोर्टलची ओळख झाली. तिथे ‘पोस्ट’ल्या जाणार्या कविता, त्यावर होणार्या चर्चा, हे सगळे म्हणजे मला अलीबाबाची गुहाच वाटली. हळू हळू माझ्या वेड्यावाकड्या रचना मी तिथे टाकू लागलो. त्यापैकी अनेक कवितांवर चांगले अभिप्राय येऊ लागले. आपल्या कविता जपून ठेवण्याची सवय लावून घेतली. त्याचं काळात माझा आणि मनोहर सप्रे यांच्यामधला पत्रव्यवहार बहरू लागला होता. त्यांनाही मी काही कविता पाठवू लागलो. ते त्यांच्या काही आवडत्या कवितांबद्दल मला लिहून कळवू लागले. या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘कदाचित’ हा काव्य संग्रह. त्याचे श्रेय प्रामुख्याने ‘प्रफुल्लता’चे प्रकाशक गुलाब राव सपकाळ यांचे. ‘हा माल बाजारात सहजासहजी खपणारा नाही’ हे पक्के ठाऊक असूनही त्यांनी तो काढला.
हल्ली माझ्याबद्दल काही जण म्हणू लागलेत की ‘ हा माणूस तसा प्रशासनातला पण कवि-मनाचा आहे.’ कवि-मन म्हणजे नक्की काय आणि ते नेमके कसे असते या विषयावर अलीकडे माझे थोडे वाचन आणि मनन सुरू झाले आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी.
-प्रभाकर (बापू) करंदीकर.
सुंदर अनुभव...
सुंदर अनुभव...
पुढील लेखाची प्रतिक्षा...
तुमच्या कविता वाचतोय...
चौकट कविता समजण्यासाठी गुगल करावं लागलं...2008 चं कंधमाल विषयी वाचलं आणि कविता समजली... माणसं कधी कधी माणसं नसतात हा समज पक्का झाला...
धन्यवाद, दत्तत्रय!
धन्यवाद, दत्तत्रय!
का कोण जाणे सारखं वाटू लागलं
का कोण जाणे सारखं वाटू लागलं वरचा प्रतिसाद अर्धवट झाला...
प्रथम बहात्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... परमेश्वर तुम्हाला उदंड आनंदी आणि निरोगी आयुष्य देवो...सत्तराव्या वर्षी काव्यसंग्रह प्रकाशनाला प्रकाशक मिळणं तुमच्या कवितेत उच्च प्रतीचे साहित्यमूल्य आहे याचेच निदर्शक आहे.
बूकगंगावरुन हा काव्यसंग्रह मागवतो.
तुमचे मा.बो. वरचे लिखाण खूप सुंदर आहे...वाचतोय...
मा. बो. करांना वाचण्यासाठी असेच सुंदर लिखाण आपल्याकडून होवो.
तुमचा कवितेकडचा प्रवास थक्क करणारा आहे.
लेख आवडला. नर्म विनोद आणि
लेख आवडला. नर्म विनोद आणि नर्म मिश्किलता.