हिंदी महासागरातील भारताच्या राष्ट्रहितांच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल पाण्याखाली, पाण्यावर आणि समुद्रावरील आकाश अशा तीनही ठिकाणी सक्षमपणे पार पाडत आहे. यापैकी समुद्रावरील आकाशातील भारतीय नौदलाच्या शक्तीची संपूर्ण ओळख करून घेण्यासाठी गोव्यातील नौवहन संग्रहालय (Naval Aviation Museum) एक महत्वाचे साधन ठरते.
भारतीय नौदलाच्या हवाई शाखेची स्थापना 1958 मध्ये झाली. तेव्हापासूनच्या या शाखेच्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणी या संग्रहालयात जागृत ठेवण्यात आलेल्या आहेत. बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानातील चितगाँग आणि कॉक्स बाजारावर हवाई हल्ले केले होते. भारतीय नौदलातील सी-हॉक आणि एलिझे या लढाऊ विमानांनी ‘भा. नौ. पो. विक्रांत’वरून (INS Vikrant) वरून उड्डाणे केली होती. त्या हल्ल्यांमुळे त्या युद्धाला निर्णायक वळण मिळाले होते. त्यामुळे नौदलाच्या हवाई शाखेची भूमिका, त्याचा गौरवशाली इतिहास यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी एक संग्रहालय उभारले जावे अशी संकल्पना ‘भा. नौ. पो. हंस’ (INS Hansa) या तळाचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर कॅप्टन (नि.) जे. सी. पुरी यांनी 1971 मध्ये मांडली होती. त्यानंतर नौदलाच्या हवाई शाखेचे मुख्यालय गोव्यात असल्यामुळे ते संग्रहालय या तळाच्या जवळपासचे उभारण्याचा निर्णय झाला आणि गोव्यातील विमानतळाच्या परिसरातच 12 ऑक्टोबर 1998 ला हे अनोखे संग्रहालय सर्वांसाठी खुले झाले.
या संग्रहालयाचे दोन प्रमुख भाग आहेत - खुले दालन आणि मुख्य इमारतीतील दालने. संग्रहालयाच्या मुख्य फाटकातून आत गेल्यावर खुल्या दालनात ठेवलेले सुपर काँस्टेलेशन हे भव्य विमान दृष्टीस पडते. या विमानाने आधी इंडियन एअरलाईन्समध्ये, त्यानंतर भारतीय हवाईदलात आणि अखेरीस हवाई शाखा सुरू झाल्यावर भारतीय नौदलात सेवा बजावलेली होती. या खुल्या दालनात सुमारे पंधरा विमाने आणि हेलिकॉप्टर्स ठेवलेली आहेत. पहिले विमानवाहू जहाज भा. नौ. पो. विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलात सामील झाल्यावर त्यावर ठेवण्यात आलेले सी हॉक (Sea Hawk) आणइ एलिझे (Elize) ही लढाऊ विमाने या संग्रहालयात ठेवलेली आहेत. यातील प्रत्येक विमान आणि हेलिकॉप्टर तसेच हवाई शाखेतील अन्य साधनांसमोर त्यांच्या संबंधीचे माहितीफलक ठेवलेले आहेत. याच दालनात नौदलाच्या सेवेत राहिलेल्या विमानांची इंजिनेही पाहायला मिळतात.
नौवहन संग्रहालयाच्या दुमजली इमारतीत प्रवेश करताच आपण एक वेगळ्यात विश्वात प्रवेश करतो. या इमारतीचे प्रवेशद्वार भारतीय नौदलातील दुसरे विमानवाहू जहाज असलेल्या – विराटच्या केबिनच्या प्रवेशद्वाराप्रमाणे केलेले आहे. या इमारतीतील काही भागांवर विविध विमाने, हेलिकॉप्टर्सची चित्रे रेखाटलेली आहेत. तसेच नौदलातील विमानांवर, हेलिकॉप्टर्सवर बसवण्यात येणारे बाँब्स आणि क्षेपणास्त्रेही येथील दालनांमध्ये पाहायला मिळतात. बांगलादेश युद्धाच्यावेळी भारतीय नौदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाच्या झालेल्या हानीबाबतची आणि अमेरिकन नौदलाच्या हेरगिरी करणाऱ्या विमानाच्या भारतीय हवाई हद्दीतील घुसखोरीविषयीची माहिती एका दालनात मांडण्यात आलेली आहे.
सोनोबॉय रुममध्ये सागराच्या पृष्ठभागाखालील लक्ष्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या विमानांवर वापरले जाणारे संवेदक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. भर समुद्रात असताना आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास नौसैनिकांकडून योजल्या जाणाऱ्या विविध उपायांची माहिती सुरक्षा कक्षात मांडलेली आहे. अशा प्रसंगी वापरली जाणारी जीवनरक्षक साधनेही येथे पाहता येतात. मल्टिमीडिया रुमला स्वप्नपूर्ती करणारे दालन म्हणूनही ओळखले जाते. कारण या दालनात बसवलेल्या सिम्युलेटरच्या मदतीने एखाद्या लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये बसून लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव घेता येतो. असे हे आगळेवेगळे संग्रहालय गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही लोकप्रिय झाले आहे.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/blog-post_24.html
छान माहिती
छान माहिती
चांगली माहिती.
चांगली माहिती.
उपयुक्त माहिती. गोवाभेटीला
उपयुक्त माहिती. गोवाभेटीला जाण्याचा योग आल्यास नक्कीच भेट द्यायला आवडेल. धन्यवाद.