नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 December, 2021 - 14:47

नक्षत्रांची शांती - भाग १ - https://www.maayboli.com/node/80761

........................................................

पहिल्या भागातील नागबली नारायणाची पारायणे करून झाली असतील तर आपण आता दुसर्‍या भागाकडे वळूया...
आशा करतो हा देखील तसाच ओघवान होईल Happy

तर, आता मी मोठा झालो होतो. खरे तर आपले मूल कुठल्या बाबतीत किती मोठे झालेय हे आईवडीलच ठरवत असतात. त्यांनी मला देवधर्म मानण्या न मानण्याबात व्यक्तीस्वातंत्र्य द्यावे ईतका मोठा मी त्यांच्यासाठी झालो होतो.

मी नवीन नवीनच नास्तिक झालो होतो. त्यामुळे आस्तिकांची टिंगल टवाळी उडवायचे कामही नित्यनेमाने करत होतो. घरी मात्र तो आगाऊपणा टाळायचो. कारण आईवडिलांनी दिलेल्या या व्यक्तीस्वातंत्र्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला होता. जेव्हा ईतर भावंडांना त्यांचे आईवडील देवधर्माबाबत कसलीही तडजोड करू देत नव्हते तेव्हा माझे मंदिरात न येणे, गर्दी असेल वा रांग असेल तर सत्यनारायणाच्या पुजेचे दर्शन टाळणे, आवडीचा नसेल तर प्रसाद न खाता गपचूप आईच्या हातात सरकावणे, भूक लागली असेल तर देवाच्या आधी जेवणे, ईत्यादी प्रकार घरी चालवून घेतले जात होते. पाहुण्यांकडे जाताना मात्र अमुकतमुक वागू नकोस, बरे दिसत नाही अशी विनंती केली जात होती. तशी विनंती करण्यातही त्यांचाच मोठेपणा होतो हे उमजून मी ती मान्य करत होतो.

हळूहळू त्यांनी नातेवाईकांना आणि बाहेरच्यांनाही कल्पना द्यायला सुरुवात केली की आमचा मुलगा नास्तिक आहे, तर तो अमुकतमुक धागे दोरे हातात घालणार नाही. घरी पूजा असली तर गुरुजींना सांगायचे की त्याचा यावर फार विश्वास नाही तर त्याने ज्या विधी करायच्या आहेत त्या आम्हाला सांगा, आम्ही करतो. यावर गुरुजी म्हणायचे, आईने केले तरी ते पुण्य मुलाला लाभते. मग मला पुण्य मिळावे म्हणून मला रोज करायला सांगितलेले मंत्रजाप आई करायची. मला पाळायला सांगितलेले मंगळवार आई पाळू लागली. आधीचे तिचे सोमवार गुरुवार वगैरे होतेच, त्यात आणखी एका वाराची भर पडली.

त्याचवेळी एकेकाळी न चुकता दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाणारा मी मात्र अंगारकी संकष्टीलाही स्वहस्ते अंड्याचे ऑमलेट करून खाऊ लागलो. अभ्यासाला रात्रीचे डोंगरावर जायचो तेव्हा खाली गाड्यांवर मिळणार्‍या मांसाहारात बीफ असू शकते याची कल्पना असूनही त्यावर तुटून पडायचो. एखाद्या निर्जीव वस्तूलाही पाय लागला तर चटकन पाया पडायचे संस्कार शाबूत होते. भले मग ती वस्तू एखाद्याची चप्पलच का असेना. पण तेच रस्त्यात मंदीर दिसले तर सवयीनेच पाया पडणे आता नकळत बंद झाले होते. देवाधर्माच्या सार्‍या संकल्पना माझ्यासाठी शून्य झाल्या होत्या. एकेकाळी मी शिंकणे, मांजर आडवी जाणे, लिंबू-मिर्ची बांधणे वा नजर उतरवणे सारख्या अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवत होतो याचे माझेच मला हसायला येत होते.

आणि अश्यातच एके रविवारी सकाळी कसल्याश्या गोंगाटानेच जाग आली.

खरे तर रविवारचा गोंगाट म्हणजे आम्हा पोरांची क्रिकेटची मॅच. पण हा गोंगाट त्याहून भारी होता. बाहेर येऊन पाहिले तर सर्व गॅलर्‍या फुल्ल होत्या. लहानथोर, बायकापुरुष सर्वांच्या नजरा खाली मैदानावर लागल्या होत्या. असे चित्र केवळ नवरात्री वा दहीहंडीलाच बघायला मिळायचे. आज काय स्पेशल आहे म्हणून त्या गर्दीत घुसून खाली डोकावलो तर एक बुवा आणि एक बैल होता. शेजारच्याला विचारले, काय रे, बैल पोळा आहे का आज? तर तो म्हणाला, छे रे. भविष्य सांगतोय तो माणूस..

झालं, मी डोक्याला हात लावला. रोज पेपरात वाचतो राशी भविष्य, हा काय वेगळे सांगणार आहे. तरी चला जवळून मजा घेऊया म्हणून खाली मैदानात गेलो. जेवढा तो बैल सजवला होता तेवढाच तो माणूसही स्वतः सजलेला होता. शेजारीच त्याचा एक मदतनीस बसला होता. तो मात्र साध्या पांढर्‍या कपड्यात होता. तोच एकेकाला प्रश्न विचारायला उकसवत होता. पण अजूनही संकोचाने म्हणा वा भितीने म्हणा कोणी विचारायला तयार होत नव्हते.

अखेर एक आगाऊ म्हणून ओळखली जाणारी मुलगी पुढे आली. मेरे बारे मे बताओ बाबा. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. तिचा चंचल स्वभाव, तिची खर्चिक वृत्ती, तिचा चटकन चढणारा रागाचा पारा वगैरे. मी मनातल्या मनात म्हटलं हे तर जगातल्या ९० टक्के मुलींना लागू होईल. कुछ और बताओ बाबा. आणि मग त्याने एक बाँब टाकला. म्हणाला तू तुझ्या आईवडीलांची खरी मुलगी नाहीयेस. हे ऐकून मी उडालोच. ईतके वर्ष मी त्या मुलीला बघत होतो, आय मीन ओळखत होतो. पण ही खबर मलाही माहीत नव्हती. ती मुलगीही आता सिरीअस झाली. त्याने अजून तिच्याबद्दल दोनचार गोष्टी सांगितल्या. ज्या तंतोतंत जुळल्या. त्यापुढे तो म्हणाला की तुझे खरे बाबा आता या जगात नाहीत. पण आई अजून जिवंत आहे. आणि ती तुला भेटणार देखील आहे. हे ऐकून मात्र ती मुलगी रडायची शिल्लक होती.

मग त्याने लगेच दुसरा मुलगा पकडला. त्याच्या वडिलांच्या दोन बायका आहेत म्हणाला. हे तर आमच्याकडे सर्वांना माहीत होतेच. पण पुढे हे देखील म्हणाला की तुझीही दोन लग्ने होतील. हे ऐकून सारेच फुटले. मग त्याने अजून एकाला पकडले, मग अजून एकाला. कोणाचा व्यवसाय सांगितला तर कोणाचे शिक्षण, एखाद्याचा छंद सांगितला तर एखाद्याची आवड, कोणाची चिंता सांगितली तर कोणाचा आजार... तो भूत भविष्य वर्तमान तिन्ही सांगत होता. भूत आणि वर्तमान बरोबर येत होते तसे भविष्याबद्दल तो जे सांगतोय त्यावरही लोकांचा विश्वास बसू लागला होता. लोकांची उत्सुकता वाढू लागली होती. आणि एवढा वेळ जे फक्त लहान मुलेच त्याचा खेळ बघायला खाली जमली होती ते आता वरतून मोठ्यांनीही आवाज देऊन त्याला आमंत्रण धाडले होते.

त्याने बैल खालीच बांधला आणि आता तो एकेकाच्या घरात त्यांच्या विनंतीवरून फिरू लागला. आमच्याकडूनही त्याला बोलावणे आले होते. एकेकाचे उरकत आमचाही नंबर लागला. एव्हाना लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला होता. त्यात एक आमचेही कुटुंब होते. आधीच तो भारदस्त माणूस, त्यात भरजरी पोशाख. गळ्यात माळा, हातात अंगठ्या, डोक्यावर पगडी. एकूणच व्यक्तीमत्व छाप टाकणारे. आता तो आमच्यासमोर आमच्या घराण्याचा ईतिहास सांगायला बसला. आजोबा पोस्टमास्टर होते हे त्याने सांगितले. वडिलांना पकडून आठ भावंडे हे सांगितले. प्रॉपर्टीवरून लफडे झालेत हे सांगितले. त्यात आमच्यावरच अन्याय झाला हे सांगणे आलेच. आणि मग ही साडेसाती अशीच कायम राहणार हे देखील सांगितले. कारण काय तर विधवा बाईची नजर लागली आहे.

बिल्डींगमधील एका विधवा बाईशी आमचे बिलकुल पटायचे नाही. तसे तर त्या बाईचे अर्ध्या बिल्डींगशी पटायचे नाही. पण आमची कयामत से कयामत तक सारखी एका पिढीपासूनची दुश्मनी होती. विधवा बाईची नजर म्हणताच तीच डोळ्यासमोर आली. तिच्या बाबतीत हे बिलकुल शक्य आहे म्हणत ते पटलेही. मग काय, अकलेचा भाग पळाला आणि लागला मासा गळाला!

आता समस्या आली तिथे उपाय आला. तो अर्थात तोच देणार होता. पण फुकटात तर कोणी काही देत नाही. भले मग तो कितीही थोर पुण्यात्मा का असेना. आकडा ऐकून आम्हालाच आकडा आला. तब्बल पंचवीस हजार. आमच्या सुदैवाने ईतके पैसे आमच्याजवळ नव्हते. आमची ती ऐपतही नव्हती. किस्सा फार जुना आहे लक्षात घ्या. तेव्हाचे पंचवीस हजार म्हणजे आताचे लाखभर रुपये. असे म्हणायची एक पद्धत असते. मग बार्गेंनिंग सुरू झाली. वॉऽव. यातही बार्गेनिंग. एकामागोमाग एक धोक्याच्या घंटा वाजत होत्या. पण आम्हाला घंटा काही ऐकू येत नव्हते. पंचवीस हजाराचा आकडा उतरत उतरत सात हजारांवर आला. एवढे भाव दणकन अत्तराचेही कोसळत नसावेत, पहिल्या पावसात.. त्यातही गंमत म्हणजे घरात कॅश तीन ते चार हजारच होती. हे देखील एक सुदैवच म्हणावे. वरना डुबने के लिये हम तैयार थे गालिब, पर हमारी नाव जहा गोते खा रही थी, वहा पाणी ही कम था.

मग एक अभुतपुर्व फिल्मी सौदेबाजी झाली. आधा काम होने से पहले, आधा काम होने के बाद. असे म्हणत आम्ही तीन हजार पाचशे रुपये त्या नंदूच्या हातावर टेकवले. कारण राजाबाबू पैसे स्वतःच्या हातात घेत नाहीत. भले पोशाख भरजरी घालतात पण त्यांना पैश्यांचा मोह नाही. सात हजार बहुधा बैलाच्या चार्‍यासाठी मागितले होते.

आणि मग उपायाला सुरुवात झाली. आम्हा सर्व कुटुंबियांना गोलाकार बसवले. तसेही कितीसे ते मोठे कुटुंब. हम दो हमारा एक. ऊस मे से भी सिर्फ दो बंदे नेक. माझ्या वडिलांनी आधीच त्या बाबाला सांगितले की या पोराचा यावर फारसा विश्वास नाही, त्याला काही करायला सांगू नका. मागणी चटकन मान्य झाली. मग झटपट काहीतरी विधी झाले. सगळे काही आठवत नाहीत. पण तुळशीची पाने तोडून, त्यांनी आमची नजर उतरवून, पुन्हा ती त्याच तुळशीच्या कुंडीत पुरायला सांगितली. हे एक एवढे आठवतेय कारण तुळशीच्या पानांची ने आण करायचे काम मलाच करायला सांगितले होते. मी अनिच्छेनेच उठल्याचे मला आठवतेय म्हणून हे लक्षात. आणि हो, एक मंतरलेला धागा जो मला हातात घालायचा होता पण मी विनम्र नकार दिल्याने तो माझ्या डोक्यावरून फिरवून जाता जाता त्याच तुळशीत तो पुरून गेला. जणू तो तिथून माझी रक्षा करणार होता.

त्या धाग्याला गंडा का बोलतात हे त्या दिवशी मला समजले. गंडा घालणे हा वाक्यप्रचार कुठून आला हे देखील समजले. कारण तो आम्हाला साडेतीन हजारांचा गंडा घालून गेला होता. तेव्हाचे साडेतीन हजार म्हणजे आताचे... सोडा, जे असतील ते असतील.. पण ते त्या भामट्याच्या हातात जात होते आणि मी काही करू शकत नव्हतो, काही बोलू शकत नव्हतो.. कारण उफ्फ हमारे ये उसूल, हमारे ये संस्कार.. जो हमे मां बाप के सामने कुछ बोलने की ईजाजत नही देते.

पण पुढचे काही दिवस मात्र मी बोलत होतो. माझ्या आईवडीलांनी मला दिलेले स्वातंत्र्य, ज्याचा लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला आहे ते विसरून कृतघ्नपणे त्यांना सतत या प्रसंगाची आठवण करून देत टोमणे मारत होतो. पण त्यांचे तरी काय असे चुकले होते. एकदा तुम्ही कश्यावर श्रद्धा ठेवली तर अध्येमध्ये अंधश्रद्धेची धूसर रेष ओलांडणे स्वाभाविक असते. आणि अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते. ज्या श्रद्धेला सर्वसामान्यांकडून मान्यता मिळत नाही ती अंधश्रद्धा. अन्यथा पहिल्या भागातील नागबली नारायण आणि या बाबाने केलेला चुटपूट विधी यात तार्किकदृष्ट्या फरक तो काय...

त्या रात्री कट्ट्यावर सारे मित्र जमले तेव्हा कोण कसे फसले याच्याच चर्चा चालू होत्या. काही किस्से उघड झाले होते, तर काही बचावलेले आम्ही कसे हुशार याच्या फुशारक्या मारत होते. त्या मारतानाही त्यांच्या हातातील पंधरा-वीस हजारांचे खडे खुदकन चमकत होते. मी मात्र आज झोपायला जाण्यापूर्वी कुंडीतला गंडा हळूच उचलून कचराकुंडीत कसा टाकावा याचा विचार करत गपचूप बसलो होतो.
ना तेव्हा कोणाला हे सांगितले, ना कालपर्यंत कोणाला माहीत होते. पण आज हा किस्सा ईथे लिहीला आणि हलके वाटले Happy

पण पण पण .....
एवरीथिंग ईझ फेअर ईन लव्ह अ‍ॅण्ड वॉर ..

असे म्हणत आयुष्याच्या एका गोड वळणावर पुन्हा एकदा मी स्वखुशीने हा गंडा आपल्या अकलेवर बांधून घेणार होतो..

क्रमशः आणि धन्यवाद,
ऋन्मेष

-------------------------------------

नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु
https://www.maayboli.com/node/80854

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे ऋसरांच्या दुसऱ्या धाग्यात त्यांनी ज्यावेळी हा नंदीवाल्याचा प्रसंग सांगितला तेव्हाही हा वाद झालाच होता.
@अनु , ही रंडकी, बोढकी, रांडाव अशी विशेषणे पूर्वी नाहीतर आजही ग्रामीण भागात विधवा किंवा पती नसलेल्या स्त्रियांना तसेच ज्या स्त्रीच्या नवऱ्याने दुसरी बायको केलीय त्यांनाही वापरले जातात. विधवा हा शब्द मी आतापर्यन्त खेड्यांत कधी ऐकला नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरुषांसाठी रंडवा, बोढक्या असे काहीही तिथे अस्तित्वात नाही. बायको नसलेल्या गड्याला एक शब्द ऐकला होता एकदा मागे पण आता आठवत नाही.
(आधीच्या कमेंट्स मध्ये सगळा उजगारा केलेला दिसला म्हणून मी वरचे टँकले आहे. कुणालाही दुखवायचा हेतू नाही. इथे काही लिहायचीबी भीती वाटते शक्ती कायद्याने आता )

ओके जिद्दु
ही माहिती नव्हती.
तो शब्द चि वी जोशींचं एक मेस चालवणाऱ्या बाईंचं म्हणून लिहिलेलं आत्मवृत्त आहे त्यात वाचला होता.

तो पुरुषवाचक शब्द बहुधा हिंदितला रंxवा असावा.

त्या शब्दकोसानुसार "विधवेसंबंधी तिरस्कारयुक्त व करुणाजनक शब्द, निराश्रित व दुर्बळ विधवा"
म्हणजे शब्दकोश बनला तोपर्यंत तरी विधवा या शब्दात काही आक्षेपजन्य नव्हते असे म्हणता येईल का?

बाकी तो शब्द वापरातुन का काढला याचे कारण अधिक स्पष्ट झाले.

आताही नाहीये
इथला मुख्य चालू झालेला (पहिल्या प्रतिसादातला) आक्षेप मूळ शब्दाला नसून 'विधवा नजर लावतात' या गृहितकाला असावा असं वाटतं.
मुळात कोणाबद्दल वाईट चिंतणे आणि स्पाउस गेलेला/ली/विभक्त झालेला/ली असणे/मूल असणे/नसणे/आपल्या स्वतःच्या प्लॅनिंग ने होऊ न दिलेले असणे यांचा परस्पर संबंध नाही हा मुख्य मुद्दा असावा.(इथे ते तसंही कोणीतरी तिसऱ्याने म्हटलेलं या संदर्भात आलं आहे.)

दाते कर्वे शब्दकोशात असा अर्थ दिला आहे
विधवा
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/date_query.py?qs=%E0%A4%B5%E0%A4%BF...

विधवा आणि कुमारी हे एकाच अर्थाने
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/date_query.py?qs=%E0%A4%85%E0%A4%B5...

पारंपारिक शब्दकोशात विधवा शब्दाचा अर्थ
http://marathibhasha.org/?s=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE

विषयांतर केल्याबद्दल धन्यवाद च्रप्स,
विकेंडला तर लिहीणार नाही मी हे.. वीकडेजला काम करता करता एका कोपच्यात मायबोली उघडून लिहिणे बरे पडते.
येत्या आठवड्यात कामही खूप आहे, त्यात मी नव्यानेच मॉर्निंग वॉकही सुरू केलेय, झोपायचा टाईम हळूहळू लवकर होतोय, त्यामुळे वेळ कमीच मिळेल.
तसेच येणारा भाग जरा जटील कुटील असल्याने आणखी वेळ लागू शकतो. कदाचित लांबही होऊ शकतो. तसे झाल्यास त्या भागाचेही दोन भाग करावे लागतील. त्या केसमध्ये नक्षत्रांची शांती कुठेय हे गूढ पुढच्या भागाअंतीही कायम राहू शकते Happy

>>पतीपश्चात परिस्थितीशी समायोजन करून जीवन कंठणे प्रत्येकीला जमतेच असे नाही. आक्षेपार्ह काय वाटलं ते नेमकं नाही सांगता येणार पण काय माहिती नाही पण वाचून एक बिटर आफ्टरटेस्ट वाटली.<<
>>भारतीय समाजात विधवा अपशकुनी, तिची नजर लागते, तिला मंगल कार्याला बोलावत नाहीत इ अनेक समज होते आणि अजूनही आहे<<

हि दोन्हि वाक्यं तुमचीच आहेत ना? विधवा शब्दाला आक्षेप घेताय कारण त्या शब्दामागचा, तुम्हाला अपेक्षित, कार्यकारण भाव या वरच्या वाक्यांमधुन ध्वनीत होतोय. पण तशी परिस्थिती आता नाहि. पण तुम्हि आणि तुम्हाला दुजोरा देणारे अजुन अठराव्या शतकातंच आहेत; म्हणुन ग्रो अप म्हणालो. बघा आता तरी समजतंय का...

रंडकी, रांड हे शब्द विधवांसाठी खूपच अपमानास्पद आहेत. विधवा स्त्री ही वेसवेसमान असते, कोणीही तिच्याशी खेळू शकतो. तिचा कोणी संरक्षणकर्ता अथवा मालक नाही, अर्थात ती सार्वजनिक वस्तू आहे, असे अर्थ आहेत ह्या शब्दांमागे. बोडकी, बोढकी हे शब्द केशवपित विधवांसाठी वापरले जात. ज्यांच्या डोक्यावर काही आच्छादन नाही, ते/तो / ती बोडके, बोडका, बोडकी. टोपी न घालणारा बोडका. त्यामुळे हे शब्द तितकेसे अपमानास्पद नव्हते. मुळात विधवा होणे हेच दुर्दैवीपणाचे लक्षण नसून पापीपणाचे लक्षण मानले जात होते. त्यामुळे गतधवा ही स्थिती दाखवणारे सर्व शब्द तिरस्कार आणि अपमानाचे छटा दाखवणारे ठरले.

तुस्सी तो छा गए, राज पाजी (पाजी इथे पंजाबी शब्द आहे!) इतकं व्यवस्थित मराठी लिहीलंत.. केवळ त्याचा मान ठेऊन -

"तशी परिस्थिती आता नाहि" हे पूर्णसत्य नाही. भारतात जगभरातील सर्वाधिक विडोज आहेत - जवळ जवळ ३३ मिलीयन (३ करोड + ). सती, केशवपन थांबले असले तरी गेल्या ५ वर्षातील प्रत्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनात हेच आढळले की पती मृत झाल्यावर स्त्रियांना सामाजिक कलंकास (सोशल स्टिग्मा) सामोरे जावे लागते. नंदीबैलाचा किस्सा प्रातिनिधीक आहे. याशिवाय सामाजिक उपेक्षा (सोशल नेग्लेक्ट) व एकाकीपण (सोशल आयसोलेशन) आहे. तिने काय वेशभूषा करायची, कुणाशी किती हसायचं-बोलायचं इ बद्दलचे अलिखित नियम इतर स्त्रियांपेक्षा अधिक जाचक आहेत. पुनर्विवाहास कायद्याने मान्यता असली तरी वारसाहक्काच्या जटील नियमांमुळे हे प्रमाण नगण्य आहे. केवळ ५-१०% महिलांचेच पुनर्विवाह झाल्याची आकडेवारी आहे. एकूणात अठराव्या शतकात कोण अडकली आहे तिचा विचार होणे गरजेचे आहे.

अर्थात ती सार्वजनिक वस्तू आहे, असे अर्थ आहेत ह्या शब्दांमागे. >>> असे अर्थ शब्दकोशात नाहीत. या लोकांच्या इच्छा / भावना आहेत ज्या लादल्या गेलेल्या आहेत. समाजाचा दृष्टीकोण आहे आणि त्यात अनेक अनिष्ट बाबींची भर पडत गेली. मूळ प्रश्न असा आहे की शब्दांचा वापर थांबवला किंवा बदलला तरी त्याने हा दृष्टीकोण निर्मळ होईल का ? रंडकी हा शब्दप्रयोग प्रगत भागात वापरात नाही. तरीही विधवा हा शब्द बदलावासा वाटतो.

एखाद्याची ओळख इतरांसाठी असेल तर इतरांचा दृष्टीकोण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याने कुठले कपडे घातले, संबोधन बदलले किंवा अन्य काहीही केले तरी बदलत नाही.

एखाद्यावर जादूटोणा करतो असा शिक्का बसला की त्याच्या पूर्ण कुटुंबावर तो शिक्का बसतो. पुढच्या पिढ्यांकडेही संशयाने पाहीले जाते.
तेच जिथे शिक्षण कमी आहे, एक्स्पोजर कमी आहे अशा भागात एखाद्या स्त्रीला जखीण / डाकीण. चेटकीण ठरवले जाते. ही तिची नवीन ओळख तिला आणि तिच्या कुटुंबाला समाजातून उठवते. अशा स्त्रियांची धिंड काढणे इथपासून ते जिवंत जाळण्यापर्यंत शिक्षा समाजाकडून दिल्या जातात.

उद्या चेटकीण म्हणू नका अन्य काही म्हणा असे म्हटल्याने दृष्टीकोण बदलणार नाही.

मी शब्दकोशातले अधिकृत अर्थ दिलेले नाहीत. ते शब्द उच्चारले की लोकांच्या मनात काय अर्थ आणि भावना निर्माण होत होत्या ते लिहिले आहे. ते अनधिकृत मानून खोडून टाकण्याचे स्वातंत्र्य अर्थात प्रत्येकाला आहेच. आणि अशा भावना उपजल्या नसतीलच आणि असे अर्थही निघाले नसतील असे म्हणण्याचेही स्वातंत्र्य आहेच.

असा वैताग करू नये. मागे कुणीतरी हीरा या शब्दाचे अधिकृत अर्थ सांगतील असे म्हणाले आहे. त्यामुळे तुम्ही ते तसे दिले असावेत असा ग्रह झाला.
एखाद्या शब्दाला चिकटलेले अर्थ यावर मागच्या पानावर चर्चा झालेली आहे.

मला या धाग्यावरील त्या शब्दावरून प्रतिक्रिया वाचून देजावू फिलिंग येत आहे

रून्मेश चा च धागा होता तो हेही आठवतंय

२-२ वेळा तारीख चेक केली, मला वाटल जुनाच धागा वर आला

विधवा स्त्री ही वेसवेसमान असते, कोणीही तिच्याशी खेळू शकतो. तिचा कोणी संरक्षणकर्ता अथवा मालक नाही, अर्थात ती सार्वजनिक वस्तू आहे, असे अर्थ आहेत ह्या शब्दांमागे.
>>> अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा....

>>>>> की त्या बाबानेच तसे सांगितले. आणि ते साहजिकच होते. त्याने सर्व चाळीतल्यांची खबर काढलेली की कोणाचे कुठे भांडण आहे, तर कोणाचे कुठे प्रेमप्रकरण, आणि त्यावरच भूत वर्तमान ओळखून भविष्य सांगायचा दावा करत होता. <<<<<
तो सीआयडी वाला होता का?
त्याने कशी कधी माहीती काढली, सोर्स कोण, याचा तपास केला होता का? का उगाच आपला "समाजवादी आरोप"?

वाकड्याजी, एकतर त्याने खबर काढली वा एकतर त्याला खरेच भूत भविष्य वर्तमान ओळखता येत होते. मला पहिली शक्यता वाटते ईतकेच. अजूनही तिसरी शक्यता असेल तर ऐकायला आवडेल Happy

Pages