हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
२९ ऑक्टोबरची दुपार! धारचुलाच्या पुढे आलो तेव्हा मोबाईल नेटवर्क गेलं. आणि हळु हळु रस्ताही डोंगरामध्ये छोटा होत चालला. गूंजीला जायचं ठरलं तर आहे, पण रस्ता किती पुढेपर्यंत चालू आहे कल्पना नाही आहे. इकडचे जाणकार तर म्हणत आहेत की, गूंजीपर्यंत आता गाड्या जातात. पण मला शंका आहे. त्यामुळे इथून पुढे जे मिळेल ते पूर्ण अनपेक्षित असणार आहे. तवाघाटच्या जवळ एक जण ओळखीचे आमच्यासाठी रस्त्यात थांबले होते. ते एका अर्थाने आमच्या ह्या गूंजी दौ-याचे संयोजक होते. त्यांनीच सांगितलं की, गूंजीला जा, ॐ पर्वत बघायला मिळेल. ते आमच्यासाठी तिथे थांबले होते आणि आल्यावर त्यांनी आमच्या गाडीचा ताबा घेतला. रस्ता हळु हळु कच्चा होत होता, त्यामुळे आमच्या जीपच्या ड्रायव्हरला त्यापासून आराम मिळाला. अजूनच दाटीवाटीने आम्ही बसलो. आणि मग सुरू झाला एक थरारक प्रवास!
.
.
नव्याने जॉईन झालेले जित्तूजी तसे तर ड्रायव्हर पेशातले. पण अगदी ऑलराउंडर माणूस. ड्रायव्हर, टूअर ऑपरेटर, टूरिस्ट गाईड, शेतकरी, ट्रेकर अशा सर्व बाबींमध्ये कुशल. त्यांनी मग सांगितलं की, गूंजीला कसं कसं काय आहे. मी त्यांना एकदा विचारलं की, खरोखर जर गूंजीला जाता येत असेल तर मग इनर लाईन परमिट लागेल ना. त्यावर ते म्हणाले की त्यांची ओळख आहे व त्यामुळे लागणार नाही. मग इकडचे रस्ते किती बिकट आहेत, कसे ड्रायव्हर्स चालवतात ह्यावर त्यांनी माहिती दिली. तवाघाटच्या काही अंतर पुढे गूंजीच्या रस्त्यावर शेवटचं हॉटेल असलेलं गाव लागलं. तिथे दाल- सब्जी- राईस असं जेवण करून घेतलं. लोकांच्या चेहरेपट्टीमध्ये जाणवण्याइतपत फरक पडला आहे! आणि हळु हळु रस्त्यावरच्या रहदारीमध्ये मिलिटरीच्या वाहनांची जास्त संख्या आहे!
.
जित्तूजी सांगत आहेत की, इथून गूंजीचं अंतर साधारण ४५ किमी आहे. पण पोहचायला पाच तास तरी लागतील. म्हणजे आम्ही जेमतेम अंधार पडण्याच्या आधी गूंजीला पोहचू. हॉटेलचं ते गाव मागे पडल्यावर रस्ता पूर्ण कच्चा झाला. रस्ता नव्हेच आता, आता हा तर ट्रकचं वजन पेलवेल अशी लेव्हल केलेली पायवाटच! तीसुद्धा मधून मधून तीव्र चढ असणारी! संपूर्ण दृश्य, नजारे, आसमंत आणि आजूबाजूचा परिसर सर्वच बदलत चालले! जौलजिबीपासून सोबत आलेली कालीगंगा हळु हळु छोटी होत चालली. तिचं पात्र आता कोसळत्या पहाडी नदीसारखं व पुढे तर धबधब्यासारखं होत गेलं आणि मग ती एका डोंगराआड गेली. आजूबाजूचा निसर्गही बदलत चालला. हळु हळु हिरवा रंग कमी होत जातोय. आणि एकामागोमाग एक बर्फाचे शिखर डोकावत आहेत. एकदम स्पीतिची आठवण करून देणारा निसर्ग आणि तितकच दुर्गम रस्ता! जागोजागी दरीचं तीव्र 'एक्स्पोजर' असलेला रस्ता. आता त्यावर पर्वतावरून कोसळणारे धबधबेही आहेत. काही ठिकाणी तर डायरेक्ट वरून धबधबा रस्त्यावर पडतोय. इतका तीव्र की, त्यामधून गाडी जाताना पाच सेकंदांसाठी पूर्ण विजिबिलिटी जाते. अक्षरश: वायपर्स सुरू करावे लागतात. गंमत म्हणजे त्या धबधब्याच्या पावसात इंद्रधनुष्यही दिसतंय!
.
.
एका ठिकाणी मिलिटरीचं एक युनिट लागलं. तिथे काही चहाचे दुकानही दिसले, किंचित वस्ती होती. तिथे थोडा वेळ थांबलो. सोबतचे मित्र व जितूजी तिथल्या सैनिकांशी बोलले. त्यांच्या तिथे सिव्हिलियन्ससाठी काही सुविधा होत्या. मग त्यांच्याशी थोडं बोलणं झालं. आणि त्यांनीच मग आम्हांला चहा- कॉफी दिलं. सशस्त्र सीमा बलाचं हे युनिट. इथली उंची २७०० मीटर्स! म्हणजे आता आम्ही 'अती उंची' म्हणतात त्या उंचीच्या पायथ्याला आलो होतो. इथून पुढे आणखी कठीण होणार हा प्रवास! सोबतच्या काही जणांना थोडा त्रासही सुरू झाला. त्यांना मग माझ्या विविध ट्रेकिंग- सायकलिंगच्या अनुभवांच्या आधारे सावध केलं. इथे येईपर्यंत निसर्ग इतका बदलला आहे की, इथल्या कुत्र्याचे केसही अतिशय दाट आहेत. थंडीसाठी नैसर्गिक व्यवस्था! काही क्षण तिथे थांबून आणि तिथले नजारे फोटोमध्ये घेऊन पुढे निघालो. बर्फाचे शिखर आता अगदी समोर आलेले दिसत आहेत!
.
इथून पुढे खूप मोठा घाट लागला. कदाचित ह्या पॅचवरचा सर्वांत तीव्र घाट असेल. आता मात्र खरा थरार जाणवतोय. जाणवतंय की, इथे गाडी चालवणं भयानक खडतर आहे. आणि सोबतचे ड्रायव्हर खूप अनुभवी आहेत, ह्याचा खूप आनंद होतोय. मध्ये मध्ये इतका तीव्र चढ आणि पाठोपाठ वळणारा रस्ता! त्यातही अनेक ठिकाणी अरुंद रस्ता, ज्यामुळे वाहनांचं क्रॉसिंग होताना मागे- पुढे करावं लागतंय. मी स्वत: महाराष्ट्रात चारचाकी चालवलेली आहे, पण इथे मी चालवण्याचा विचारही अफॉर्ड करू शकत नाही! हे मैदान वेगळंच! साक्षात दुर्गमता! स्पीतिमध्ये सायकलिंग करताना दुर्गा, दुर्गमगा, दुर्गमस्थाना अशी दुर्गमतेची नावं आठवली होती! हा रस्ता तोच अनुभव परत देतोय. जितूजींनी सांगितलं की, ह्या रस्त्यावर फोर बाय फोर गाड्याच हव्यात. म्हणजे ज्या गाड्यांना मागची चाकंही स्वतंत्र वेग घेणारी असतात अशा गाड्या. आमची बोलेरो तर खूप कमकुवत वाटते आहे. शिवाय सोबत असलेले मूळ ड्रायव्हर व ते गाडी मालकही आहेत- ते बोलले की, नवीन बोलेरोमध्ये आधीच्या बोलेरो गाड्यांसारखा पक्का पिक अप नाहीय! त्यामुळे ती तितकी फास्ट चढत नाहीय. पण जितूजी शिताफीने गाडी नेत आहेत. आमच्यासोबतचे एक सर "मारणे" शब्द सारखे वापरतात. म्हणजे जेवताना पाव भाजी मारली, नैनिताल "मारलं", रिचार्ज "मारलं" वगैरे वगैरे! तसे जितूजी इथे गाडी अक्षरश: मारत आहेत! किती योग्य वेळी ते आमच्या सोबत आले हा आमचा मोठाच आनंद आहे! पण हा आनंद फार वेळ टिकला नाही, कारण त्यांची दुसरीही एक स्वत:ची गाडी होती. आणि तीही मागून येत होती, त्यांनी दुस-या एका ड्रायव्हरला ट्रेनिंगसाठी ती चालवायला दिली होती. पण एका वळणावरून दिसलं की, ती चढतच नाहीय. त्यामुळे काही वेळ वाट बघून शेवटी जितूजी निघाले. त्यांनी काही टिप्स आमच्या ड्रायव्हरला दिल्याच होत्या. तोही बिचारा तयार झाला. भिती तर त्याला होतीच, भितीपेक्षाही गाडीची काळजी होतीच. पण त्यांची गाडीही अडकली होती, त्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांच्या ओळखीचे अनेक गाडीवाले इथे असतात, त्यामुळे त्यांच्याकडे एक व्हॉकी टॉकीही होता. त्यावर ते अधून मधून 'चार्ली वन चार्ली वन' म्हणून बोलायचे. तो नेमका गाडीतरच ठेवून ते गेले.
.
... आणखी काही तीव्र चढ अक्षरश: कसेबसे गाडीने चढले. श्वास रोखायला लावणारा एक एक चढ. त्यातच सारखं दरीच्या सोबत होणारं क्रॉसिंग. कधी एकदा गूंजी येतंय असं झालं. अखेर तो तीव्र चढाचा पॅच कसाबसा पार झाला आणि गब्रियांग का कोणतं तरी मिलिटरीचं ठाणं आलं. तिथली उंची १२ हजार फुटांच्या पुढे होती. म्हणजे आम्ही निश्चितच ३५०० मीटर उंचीवर आलो आहोत. आणि ते जाणवतंय. तीव्र थंडी, आजूबाजूला आणि आता तर मागेसुद्धा बर्फाची शिखर दिसत आहेत. हळु हळु झाडं विरळ होत आहेत. उघडे बोडके डोंगर अगदी जवळ आलेले आहेत. इथल्या चेक पोस्टवर चौकशी झाली आणि गूंजीच्या जत्रेत जातोय असं सांगितलं, तेव्हा जाऊ दिलं. वाटेमध्ये काही ठिकाणी चिखलाचे पॅचेस आहेत, तिथे काळजी घ्या असं सांगितलं. आतापर्यंत जवळ जवळ सगळेच जण गूंजीसाठी डेस्परेट झाले आहेत. कधी येणार गूंजी! ह्यावेळी बाहेरचा सगळा परिसर मात्र हेच म्हणतोय-
गुंजी सी है सारी फ़िज़ा जैसे बजती हो शहनाइयाँ
लहराती है महकी हवा गुनगुनाती हैं तन्हाईयाँ
सब गाते हैं सब ही मदहोश हैं
हम तुम क्यों खामोश हैं
पण परिसर असा आहे की, सगळे जण एका अर्थाने मदहोश आणि खामोश झाले आहेत. आणि ह्याच गाण्यातली पुढची ओळसुद्धा तितकीच आठवतेय-
तन मन में क्यूँ ऐसे बेहती हुयी
ठंडी सी इक आग है
साँसों में है कैसी यह रागिनी (विरळ हवेमुळे!)
ठंडी सी इक आग मात्र पुरेपूर अनुभवता येतेय! लवकरच अंधार पडणार आणि गूंजी अजूनही जवळ आलेलं नाहीय. फक्त त्या ठाण्यानंतर चढ मात्र थांबला आणि चक्क उतार सुरू झाला. पण इथेही काही खरं नाहीय. कारण इथे इतका चिखलाने भरलेली वाट आहे ज्यात अक्षरश: जीप रुतते आहे. तरी ड्रायव्हर अनीलजी काळजीपूर्वक पुढे गेलेल्या वाहनांच्या पाऊलखुणांवरूनच जीप नेत आहेत. पण तरी कुठे कुठे जीपला ग्रिप मिळतच नाहीय. आणि ह्या चिखलामुळे रस्ता भुसभुशीत झालाय. म्हणजे कणकेसारखा. गाडी त्यात आत जातेय आणि मागचं चाक नुसतं फिरत बसतं आणि गरम होतं. तरी रस्त्यावर मिलिटरीचे लोक- इतर गाड्यांचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी अशा जागेवर आहेत. त्यामुळे आम्ही तिथे अडकलो नाही. पण अशी कसरत दोनदा- तीनदा करावी लागली. अडकता अडकता जीप सुटली. कुठे कुठे ढकलावीही लागली. डोंगर उतरून रस्ता परत एकदा धबधब्यासदृश कालीगंगा नदीजवळ आला. कुठे ती जौलजिबीची रौद्र नदी आणि आता हा सौम्यसा छोटा धबधबा! सहज दगड पलीकडे फेकता येईल असा अरुंद प्रवाह! पुढे पुढे तर तो इतका छोटा झाला की, काही ठिकाणी सहज पायी ओलांडता यावा! पण बाकी नजारा अपूर्व! संध्याकाळच्या लाल प्रकाशातले हिमशिखर अवर्णनीय!
.
.
हिमालयाच्या इतकं आत यायला खरंच नशीब लागतं! तेही मानस सरोवर परिक्रमेच्या रूटवर! नशीबात नसेल तर हे जमतच नाही. इतका जबरदस्त हिमालय आणि त्याचा सखोल सत्संग! असा निसर्ग नतमस्तक करतो, आपला अहंकार अशा वातावरणामुळे गळून जातो. जे ध्यान करत नाहीत, त्यांच्याही बोलण्यात आलं की, सोबत प्रवास करणा-या आम्हा सगळ्यांचं काही गतजन्मीचं नातं असलं पाहिजे. त्याशिवाय आम्ही असे एकत्र इथे आलो नसतो! आणि अशा वातावरणात गाडीत पहाडी गाणी वाजत आहेत. त्यातलं एक गाणं विशेष लक्षात राहिलं- ‘तेरो मेरो रिश्तो पीछले जनम वा' असं काहीसं! आणि पुढे पुढे अंधारून आलं आणि गूंजी येतच नाहीय, तेव्हा भितीने मग ॐ नमोs शिवाय असं गाणं सुरू झालं. दूरवर काही वस्तीसारखं दिसतंय आणि मोबाईल टॉवरही दिसतंय. गूंजीच ते! पण ते जवळच येत नाहीय. पुढे गेलं की मधले डोंगर व मधलं अंतर दिसतंय. गूंजीला एक जत्रा आहे व त्यामुळे तिथे अनेक गाड्या जात आहेत. सो रस्ता अगदीच निर्जन नाहीय.
.
गूंजीच्या अगदी अलीकडे परत एका चेकपोस्टवर तपासणी झाली. आणि इथे मात्र इनर लाईन परमिट विचारले! सोबत जितूजी नव्हते, त्यामुळे त्यांची ओळखही कामी आली नाही. त्यांनी आम्हांला जवळ जवळ खडसावलंच की, तुम्ही परमिट नसतानाही इतके आत कसे आलात, येऊच कसं दिलं वगैरे. शेवटी आमची नीट चौकशी केली आणि अनीलजींचं ओळखपत्र ठेवून घेतल्यावर आम्हांला जाऊ दिलं. जत्रेमुळे अनेक लोक जात आहेत, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो. पण ते बोलले की, परमिट नसल्यामुळे पुढे ॐ पर्वत किंवा आदि कैलास पर्वत बघण्याच्या व्ह्यू पॉईंटला मात्र जाता येणार नाही. तसंही कोणामध्ये तेव्हा गूंजीच्या पुढचा विचार करण्याचंही त्राण नाहीय. कधी एकदा गूंजी येतं आणि आपण अंग टेकतो असं प्रत्येकाला झालं आहे. पण गूंजी काही केल्या येईना. शेवटी व्हॉकीटॉकीवरून जितूजींना फोन लावण्याचे प्रयत्न झाले. पण तसाही संपर्क झाला नाही. रस्त्यावर किलोमीटरचा एकही बोर्ड नाही. गाव जवळ आल्याच्या काहीच खुणा नाहीत. रस्त्यावर लोक मात्र आहेत- मिलिटरी, बीआरओवाले व त्यांचे काही मजूर, काही इतर गाडीवाले. असं करत करत एकदा जेव्हा काही लाईटस आजूबाजूला दिसले तेव्हा चौकशी केली की, गूंजी आलं का! तर ते गूंजीच आहे हे कळालं! हॉटेल- लॉज पुढे असतील असं म्हणून पुढे गेलो तर परत पुढे सुनसान झालं. परत उलटं येऊन चौकशी केली तेव्हा कळालं की हे आणि एवढंच गूंजी आहे! मग एक हॉटेल सापडलं. पण गाडीच्या बाहेर आल्यावरही सुटका नाही. कमालीचा गारठा. हात गार पडत आहेत.
त्या हॉटेलमध्ये चहाची ऑर्डर दिली आणि चौकशी केली. आम्ही मघाशी साधारण ३५०० मीटर उंचीवर होतो व त्यानंतर थोडं उतरलो असलो तरी किमान ३३०० मीटर उंचीवर नक्की असू असं वाटत होतं. चालताना- एकदम हालचाल करताना जरा सावकाश असं सगळ्यांना सांगितलं. सोबत एक १० वर्षांचा मुलगाही आहे, त्याला मात्र प्रवासात काहीच त्रास झाला नाही. मुक्कामाच्या जागेसाठी काही वेळ वाटत होतं की, जितूजी येईपर्यंत थांबावं, कारण ते आल्यावर व्यवस्था करतील असं वाटत होतं. पण हळु हळु थंडी अंगात भिनत चालली व त्यांची वाट पाहण्यापेक्षा आपलीच सोय केलेली बरी असं वाटलं. इथे जत्रेमुळे सरकारी- कुमाऊँ मण्डल विकास निगम चीही व्यवस्था होती. पण त्याऐवजी प्रायव्हेट हॉटेल बघू असं सगळ्यांचं मत पडलं. काही जणांनी तसं यथावकाश हॉटेल शोधलं. सगळे फुल आहेत. पण एका हॉटेल कम होम स्टेमध्ये एका रूममध्ये सगळ्यांची व्यवस्था झाली. नंतर रात्री जेवण केलं. प्रचंड थंडीमध्ये कुडकुडायला होत आहे. पण काय रोमांचक प्रवास होता! तीव्र चढ, घसरणारा रस्ता, दरीची सोबत, कणकेसारखा चिखल आणि उत्तुंग हिमाच्छादित शिखर! खरंच नशीब लागतं अशा जागी यायला! जीवनाने केलेली ही कृपाच! रात्रीच्या अंधारात आसपासचे शिखर नीट दिसत नाही आहेत. ढगही आहेत, त्यामुळे तारेही नीट दिसत नाही आहेत. पण उत्तरेचे तारे आणखी आकाश माथ्याच्या दिशेला सरकलेले दिसत आहेत. आजचा अनुभव इतका जबरदस्त आहे की, त्या थंडीतही तिथल्या तिथे तो रेकॉर्ड करावासा वाटला. प्रवासातले आणखी अनुभव व तपशील इथे ऐकता येतील. काय दिवस आणि काय रात्र आहे ही! उद्या ॐ पर्वत किंवा आदि कैलास जवळून बघायला मिळेल किंवा नाही, पण सगळ्यांना इथून सुखरूप कसं जाऊ, ही काळजी आहे! अक्षरश: श्वास रोखून धरायला लावणारा रस्ता! तिथे वावरताना सतत हेही गाणं आठवतंय-
चलता है जो ये कारवाँ, गूंजी सी है ये वादियाँ
है ये ज़मीं गूंजी गूंजी, है ये आसमां गूंजा गूंजा
हर रस्ते ने हर वादी ने हर पर्बत ने सदा दी
हम जीतेंगे हम जीतेंगे हम जीतेंगे हर बाज़ी
.
.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर
माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com
थरारक! कसे राहतात लोक इथे.
थरारक! कसे राहतात लोक इथे.
फोटो कसले अप्रतिम आहेत.
काय सुंदर आहे हे सगळं.. फारच
काय सुंदर आहे हे सगळं.. फारच हेवा वाटत आहे
डोळे निवले.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी परत एकदा माझ्या कैलास यात्रेचे फोटो बघून घेतले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेखात उल्लेख केला आहे त्या ॐ पर्वताचा सगळ्यांसाठी म्हणून फोटो टाकत आहे.
सुंदर आहे !
सुंदर आहे !
फार भारी!
फार भारी!
भारी! आणि भीतीदायक. हिमालयात
भारी! आणि भीतीदायक. हिमालयात गाडी चालवणारे चालक ग्रेट असतात.
रस्ता खराब किंवा असा धोकादायक असेल तर माझ्या मनात हमखास विचार येतो की आत्ता पुढे जातोय पण आपली तेवढ्याने सुटका नाही. याच रस्त्यावरून परत यायचंय!
कोकणात एकदा एका अत्यंत खराब रस्त्यावरून जाताना मनात हायसं वाटत होतं की इथून आपल्याला परत यायचं नाहीये. एक कार्यक्रम अटेंड करून मग आम्ही वेगळ्या रस्त्याने पुढे जाणार होतो. पण तो दहापंधरा किलोमीटरचा खराब रस्ता पार करून गेल्यावर कळलं की आपली वाट चुकली. आपण जास्त पुढे आलो! परत मागे त्याच रस्त्याने यायला लागलं आणि शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच रस्ता नशिबात होता!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद!
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद!
@ हर्पेन जी, अहा हा! व्वा!
सुंदर प्र.चि.
सुंदर प्र.चि.
सुंदर लेख, थरारक अनुभव
रोचक आणि थरारक, रौद्र असा
रोचक आणि थरारक, रौद्र असा हिमालय. डोळ्याचं पारणं फेडणारे फोटोज आहेत एकसे एक.