ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २५

Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2021 - 07:41

काही दिवसांपूर्वी २०१९ च्या दिवाळीतला लोकमतचा चुकून वाचायचा राहिलेला अंक वाचत होते. तेव्हा एका लेखात Langston Hughes नावाच्या अमेरिकन कवीच्या काही ओळी वाचनात आल्या:

How still,
How strangely still
The water is today,
It is not good
For water
To be so still that way

चमकलेच एकदम. आजकाल माझ्या मनाचं असंच झालंय का? तळ ढवळला जातच नाहीये. विचारांचं काहूर माजत नाही पूर्वीसारखं. तळाशी काही नाही असंही नाही. खूप काही आहे. दररोज आणखीही काहीबाही जमा होतच असेल. पण आपल्याच मनाचा ठाव लागत नाहीये. बरं असंही नाही की मनात खूप काही असताना शांत राहायची साधना समजून उमजून केली आहे. त्या बाबतीत पाटी कोरीच आहे. म्हणूनच ह्या शांततेची भीती वाटते.

It is not good
For water
To be so still that way
---------------

'Boss, can you please forward this message in your network? This is a genuine message forwarded on my B school network. They need Tocilizumab badly'. एप्रिल किंवा मे २०२१ चे दिवस होते एव्हढं सांगितलं तरी पुरे. Whatsapp आणि Telegram ग्रुप्सवर नेहमीच्या मेसेजेस ऐवजी एकामागून एक हेच मेसेजेस येत होते. पेशंटची नावं आणि शहरं वेगळी. मेसेज तोच. SOS. एका ग्रुपवरून मेसेज उचलायचा आणि दुसरीकडे फॉरवर्ड करायचा. मी हा मेसेज माझ्या एका मैत्रिणीला फॉरवर्ड केला.

'Sure. Can I also forward you some messages? Please see if you have any leads' तिचा उलटा मेसेज आला. मी 'पाठवून दे' म्हटल्यावर धडाधड मेसेजेस आले. काहींसाठी माझ्याकडे इनपुट होतं ते तिला पाठवून दिलं. उरलेले माझ्या नेटवर्कमध्ये फॉरवर्ड केले. आणि मग आम्ही दोघींनी ऑफिसच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा हे करायला सुरु केलं. कुठे ऑक्सिजन सिलिंडर्स तर कुठे हॉस्पिटल बेड. Tocilizumab, Amphotericin B, प्लाझ्मा हे तर कधीही न ऐकलेले शब्द. हे काय आहे हे माहिती असायची गरज नव्हती. पण हे जे काय आहे ते कुठेतरी कोणाचेतरी प्राण वाचवू शकतं एव्हढीच माहिती पुरेशी होती. त्या माहितीच्या जोरावर आम्ही इतर हजारो लाखो भारतीयांसारखंच जीव तोडून मेसेजेस पाठवत होतो, रिसिव्ह करत होतो.

एक दिवस बिझनेस स्कुलच्या ग्रुपवर रात्री ११:३० ला एकाचा मेसेज आला - प्लाझ्मासाठी. माझ्याकडे जेव्हढी माहिती होती ती त्याला फॉरवर्ड केली. मग लक्षात आलं की डिस्क्लेमर दिलं नाही. मग म्हटलं बाबा, ह्यातला एकही नंबर मी चेक केलेला नाही. तसेच पाठवलेत. सॉरी. त्याचा उलट मेसेज आला 'हरकत नाही. एव्हढी लिस्ट पाहूनच मला धीर आला आहे. मी करतो त्यांना फोन.' मी मनात म्हटलं जय हो व्हॉट्सॅप बाबाकी.

एके दिवशी दुपारी असाच उदयपूरमधल्या कोणा सिनियर सिटीझनसाठी ऑक्सिजन सिलिंडर हवा होता. मी माझ्या मैत्रिणीला फॉरवर्ड केला आणि ऑफिसच्या कामात बुडाले.संध्याकाळी तिचा मेसेज आला. ऑक्सिजन सिलिंडरचे डिटेल्स होते. खाली एक ओळ होती - उदयपूरवाले अंकलके लिये.

मेसेज वाचता वाचता थबकले. 'उदयपूरवाले अंकल'? ह्या सिनियर सिटीझनबद्दल आधी कधी ऐकलं नव्हतं. आमची त्यांची भेट व्हायची शक्यता नव्हती. त्याचं पुढे काय झालं हे आम्ही फोन करून विचारल्याशिवाय कळणार नव्हतं. पण कधीही न पाहिलेले हे सिनियर सिटीझन आमच्यासाठी 'उदयपूरवाले अंकल' झाले होते. जात, धर्म, भाषा न पाहता त्या अंकलसारख्या अनेकांना वाचवायची आमची आणि आमच्यासारख्या अनेकांची धडपड चालू होती.

Ships that pass in the night, and speak each other in passing,
Only a signal shown and a distant voice in the darkness;
So on the ocean of life we pass and speak one another,
Only a look and a voice, then darkness again and a silence.
---------------

'अनघा, कश्या आहात?' बरेच दिवसांत मेसेज न आल्यामुळे मीच मेसेज केला.
'बरं नाहीये.'
'ओह, काय झालं? सर्दी-पडसं का? मध्ये मला पण झालं होतं. वेदर चेंज होतंय ना.'
'मला ब्रेस्ट कॅसर आहे'.

पायांखालची जमीन सरकणे म्हणजे काय ते तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं. ब्रेस्ट कॅन्सर? कितवी स्टेज?

मला माझ्या gynecologist चे शब्द आठवले. रुटीन mammography करून त्याचे रिपोर्टस दाखवायला गेले होते तेव्हा घराण्यात हिस्टरी नसेल तर दर वर्षी टेस्ट करायची गरज नाही असं ती म्हणाली. माझ्या जवळच्या मैत्रिणीची आई नुकतीच ब्रेस्ट कॅन्सरने गेली ते तिला सांगितलं. म्हटलं त्यापेक्षा दर वर्षी टेस्ट केलेली बरी. त्यावर ती म्हणाली होती 'साइनस दिसतात त्याच्या. तुमच्या मैत्रिणीच्या आईने दुर्लक्ष केलं असेल. वेळेत डिटेक्ट झाला तर बरा होतो. ब्रेस्ट कॅन्सर fatal नाहीये हो.'

हिचा वेळेत डिटेक्ट झाला असेल ना? पण विचारू कसं? शेवटी मेसेज केला.

'काळजी घ्या. ट्रीटमेंट सुरु असेलच. बरं वाटेल लवकर. मग मात्र मला कळवा. कॉफी प्यायला जाऊ मस्तपैकी'
तिचा स्मायली आला 'नक्की'.

आपण फारच कोरडा रिस्पॉन्स दिला का? फोन करायला हवा होता. पण बोलायचं काय? तसंही मला फोनवर बोलायला फारसं आवडत नाही. आता तर काय बोलायचं हा प्रश्न होता. आजारी व्यक्तीला उगाच आजाराबद्दल प्रश्न विचारू नयेत असं माझं प्रांजळ मत आहे. तरी मनात विचारांचं काहूर माजलंच.

दोन महिने गेले असतील नसतील. कामाच्या नादात ती कशी आहे ते विचारायचं राहून गेलं. दिवाळीच्या आधी ३-४ दिवस पुन्हा लक्षात आलं की हिचा काही मेसेज नाही. काही फॉरवर्डेड मेसेजेस वाचले गेले नव्हते.आजार बळावला तर नाही?

'अनघा, कश्या आहात? बरेच दिवसात मेसेज नाही तुमचा. सगळं ठीक आहे ना?' मी मेसेज केला. २ दिवस तोही वाचला गेला नाही. ही असं कधी करत नाही. लगेच नाही जमलं तरी १ दिवसात उत्तर देतेच. आता दिवाळीत फोनच करायचा असं ठरवलं. दिवाळीच्या २ दिवस आधी तिचा डीपी बदललेला दिसला. फोटो बदलायला वेळ आहे आणि मला मात्र उत्तर दिलं नाही असं वाटून गेलं आणि मग एकदम लक्षात आलं की पुस्तकांच्या इमेजऐवजी तिचा स्वतःचा फोटो होता. तिच्या प्रोफाइलवर नेहमी पुस्तकांच्या इमेजेस असतात की. फोटो पण साडीतला. मी तर तिला कधी साडीत पाहिलं नव्हतं. मनात शंकेची पाल चुकचुकली. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी कोणाला तरी मेसेज करायला कॉनटेक्ट लिस्ट स्क्रॉल केली तेव्हा 'अबाऊट' मध्ये तिच्या भावाचं नाव दिसलं. क्लिक करून पाहिलं तर त्याचा मेसेज होता - मी मेसेज केला होता त्याच्या दोन दिवस आधी माझी मैत्रीण गेली होती. १ वर्ष कॅसरशी झगडून.

तिला ओळखत होते ती मागची ७ वर्षं मनात तरळून गेली. माझ्यापेक्षा वयाने मोठी ही. एका क्लासमध्ये ओळख झाली. मोडी, संस्कृत, पुस्तकं अशी गोत्रं जमली. माझ्या घरापासून चालत २० मिनिटांच्या अंतरावर असेल तिचं घर. क्लास संपले त्यानंतर एकदा गणपतीला गेले होते तिच्या घरी पण त्यानंतर भेटणं जमलंच नव्हतं. पण संवाद कायम होता. व्हॉटसॅप झिंदाबाद. तिथे आमची बरीच वादावादी चालायची. ती भाजप समर्थक आणि मी विरोधी पक्षात. तिची बरीचशी मतं मला 'भक्ती' वाटायची. मी तावातावाने भांडायचे. शेवटी मग ह्या भानगडीत मैत्रीचा बळी जाऊ द्यायचा नाही असं ठरलं. एकमेकांना राजकीय आणि धार्मिक काही फॉरवर्ड करायचं नाही असंही ठरलं. राजकारण हरलं. मैत्री जिंकली.

हिला १ वर्ष कॅसर होता? मागच्या एक वर्षातली आमची मेसेजेसची देवाणघेवाण आठवून गेली. लॉकडाऊनच्या काळात किती कोडी फॉरवर्ड केली तिने मला. म्हणीवरची, शब्दातली गाळलेली अक्षरं भरायची, सिनेमाची नावं ओळखायची. मी बरोबर उत्तरं पाठवली की टाळ्यांचा इमोजी यायचा. मला त्या काळात sane ठेवण्यात हिचा वाटा सिंहाचा. पण तेव्हा कॅसरशी झगडत असणार ती. मला एका शब्दाने बोलली नाही. कदाचित आमची मैत्री तेव्हढी जवळची नसेल. कदाचित तिला कोणाला कळू द्यायचं नसेल. काय कारण ते आता मला कधीच कळणार नाही.

मेघदूत संस्कृतातून वाचायची इच्छा आहे म्हटल्यावर कुठलंही संस्कृत साहित्य वाचायचं असेल तर एम. आर. काळे ना रिफर करायचं असं म्हणाली होती. मेघदूत वाचून त्याच्यावर तिच्याशी चर्चा करायची होती मला. लॉकडाऊन संपला की एशियाटिकमध्ये जायचं ठरवलं होतं आम्ही. मागच्याच आठवड्यात साहित्य संमेलनात बरीच पुस्तक विक्री झाल्याची बातमी वाचली तेव्हा उत्साहाने मेसेज फॉरवर्ड करायला घेतला आणि मग लक्षात आलं की तो मेसेज वाचायला आता अनघा ह्या जगात नाही. किती आनंद झाला असता तिला वाचून. माझा अजून विश्वासच बसत नाहीये की माझी ही मैत्रीण आता मला कधीच भेटणार नाही. तिला फोन केला नाही ही खंत शेवटपर्यंत राहील.

कधीकाळी वाचलेल्या एका कवितेच्या काही ओळी आठवल्या. नेटवर जाऊन शोधलं तेव्हा ती कविता Charles Hanson Towne ची Around the Corner आहे हे कळलं.

"Tomorrow," I say, "I will call on Jim,
Just to show that I'm thinking of him."
But tomorrow comes--and tomorrow goes,
And the distances between us grows and grows.
Around the corner!--yet miles away . . .
"Here's a telegram, sir . . ."
"Jim died today."
And that's what we get, and deserve in the end:
Around the corner, a vanished friend.
---------------

करोनाने माझा आणखी एक मित्र हिरावून घेतला. तो सहीसलामत आहे. देव करो आणि तो तसाच राहो. पण आता तो माझा मित्र नाही. बहुतेक. नक्की सांगता नाही येणार. पण हे सगळं सुरुवातीपासून सांगायला हवं.

हाही तसा माझा ऑनलाईन मित्र. काही वर्षांपूर्वी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने ओळख झाली. पुस्तकं, गाणी, गझला वगैरे ग्रह जमले आणि मैत्री झाली. काही चांगलं वाचलं, पाहिलं, ऐकलं की आवर्जून शेअर केलं जाऊन लागलं. त्यालाही फोनवर बोलायची आवड नसल्याने आमच्या गप्पा व्हॉट्सएपवर रंगत. मग २०१४ मध्ये राजकीय मतांचा विचार केलयास 'दोन ध्रुवांवर दोघे आपण' असल्याचा साक्षात्कार झाला. तरी शक्यतो वाद टाळण्याकडेच दोघांचा कल होता. मग २०२० मध्ये करोना आला. लॉकडाऊन लागायच्या आधी सगळं ठीक होतं. लॉकडाऊन लागला तेव्हा तो फार घाईत लावलाय असं माझं मत. तर तो लावणं आवश्यक हे त्याचं. मग शहरात काम करणाऱ्या मजुरांचा लोंढा गावाकडे निघाला. उपाशीतापाशी. कच्च्याबच्च्यांना घेऊन चालत. कित्येक किलोमीटर्स दूर असलेला मुलुख गाठायला. मग मात्र माझा संताप झाला. एक प्रोजेक्ट करायचा तर रिस्क मॅनेज नाही केली तर क्लायंटस पिसं काढतात. इथे लाखो जीवांच्या जीवनमरणाचा प्रश्न. का नाही नियोजन केलं? मला वाटलं निदान आता तरी माझा मित्र माझ्याशी सहमत असेल.

झालं उलटंच. हा निर्णय बरोबर कसा हे तो मला पटवून द्यायला लागला. एकुणात मजुरांचे हाल हा collateral damage होता त्याच्यासाठी. मला खूप धक्का बसला. जगजीतच्या गझला ऐकणारा माझा हळवा मित्र हाच का? एक क्षण असा आला की मी त्याला विचारलंसुद्धा 'तुला आणि तुझ्या बायकोला तुमच्या मुलीला घेऊन असं गाव गाठायची वेळ आली तर काय करशील ह्याचा विचार केला आहेस का?'. सरळ साध्या उत्तराची अपेक्षा होती. नाही मिळालं. शेवटी लक्षात आलं ते हे की त्याचा एकूण आविर्भाव मी बरोबर आणि तू चूक हा होता. माझंही म्हणणं तेच होतं. फरक एव्हढाच की तो निर्णय घेणारा पक्ष कोणताही असला असता तरी हा निर्णय चुकीचा असंच माझं मत असतं. त्याचं तसं नव्हतं. माझी बाजू ऐकून घ्यायची त्याची तयारी नव्हती कारण ह्या चर्चेत दुसरी बाजूच नव्हती. शेवटी मला असह्य झालं. 'एक शब्द बोलू नकोस ह्यापुढे. Just shut up.' मित्रालाच सोडा, दुसरया कोणालाही मी कधी असं म्हटलेलं नाही. पण मी म्हटलं. आणि मग पुढे संवाद बंद झाला. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा मेसेज आला नाही. त्याच्या वाढदिवसाला मी मेसेज केला त्यावर माझ्या वाढदिवसाच्या बिलेटेड विशेस आल्या. दिवाळी, नवं वर्ष, ह्या वर्षीचे सगळे सण शुभेच्छाविना गेले. ह्या वर्षी ना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा मेसेज आला ना मी त्याला त्याच्या वाढदिवसाला मेसेज केला.

मी माझा मित्र गमावला. ती चर्चा व्हॉट्सएपवर करायला नको होती का असं आता वाटतं. पण दुसऱ्याला आपलं मत असू शकतं हे नाकारणारा कोणी माझा मित्र असू शकतो का? हातांवर पोट असलेले लोक निर्वासितासारखे चालत निघतात, त्यातल्या काहींचे बळी जातात हा कोणाच्याही साठी फक्त एक collateral damage कसा असू शकतो? जीवनाविषयी आपली काही मतं - मूल्य हा फार भारी शब्द वाटतो - असतात त्यावर तडजोड होऊ शकत नाही. जोवर आमच्या मैत्रीची गाडी ह्या स्टेशनात आली नव्हती तोवर रुळावर होती. ते स्टेशन आलं आणि मार्ग वेगळे झाले. समांतर झाले.

अजून त्याचा नंबर माझ्या लिस्टमध्ये आहे. तो काढून काही फायदा आहे असं वाटत नाही. आणि ठेवून काही उपयोग आहे असंही वाटत नाही. कारण पुन्हा झाली तरी ती मैत्री पूर्वीसारखी असणार नाही. गुलझार म्हणतात तेच खरं

मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिरहें
साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे
---------------

फार वर्षांपासूनची एक इच्छा गंगेच्या तीरावर जाऊन तिची आरती बघायची. तिच्या प्रवाहात शांतपणे तेवत दूर जाणारे दिवे निरखायची. स्वतः:च्याच विचारांत अंतर्मुख व्हायची. आपण कोण? कुठून आलो? कुठे जाणार? असे जगायच्या रेट्यात कधीही न पडणारे प्रश्न स्वतःला पाडून घ्यायची. त्याची उत्तरं मिळणार नाहीत हे माहीत असूनही शोधायचा प्रयत्न करायची...

पण २०२० सोबत करोना घेऊन आलं. आणि एक दिवस काही ओळी वाचल्या - पारुल खक्करच्या मूळ कवितेच्या हिंदी अनुवादाच्या.

एक साथ सब मुर्दे बोले 'सब कुछ चंगा चंगा'
साहेब तुम्हारे रामराजमे शव-वाहिनी गंगा

जान्हवी, भागीरथी, अलकनंदा ... किती सुंदर नावं आहेत गंगेची. पण एका क्षणात माझ्यासाठी ती सगळी पुसली गेली. आता माझ्यासाठी तिची केवळ एकच ओळख उरलेय - शव-वाहिनी.

Langston Hughes च्याच काही ओळी.

Life is for the living
Death is for the dead
Let life be like music
And death a note unsaid

आता गंगेच्या तीरी जाऊन बसायची हिम्मत माझ्यात उरली नाही.
---------------

ता. क.

खूप दिवसांपासून हा पन्ना लिहायचं मनात होतं. पण मायबोलीची जी रणभूमी झालेय त्यात आपण भर नको टाकायला असं वाटायचं. पण मनात आहे ते बोलण्यासाठीच तर हे पन्ने आहेत. राजकारणाविषयी लिहिलं कारण जे लिहायचं होतं त्याचा तो अपरिहार्य भाग होता. पेपरात लिहितात तसं 'एका विशिष्ट समाजाचे लोक' असा उल्लेख करून राजकीय पक्षांबद्दल लिहायचं म्हटलं तरी जमलं नसतं कारण संदर्भावरून कुठला पक्ष ते लक्षात आलं असतंच. तेव्हा ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय हशील?

तर मुद्दा हा की कोण बरोबर आणि कोण चूक ह्या तपशीलात मला घुसायचं नाही. ही दोन्ही बाजूपैकी कोणालाही न जिंकता येणारी लढाई आहे. तेव्हा त्यात न उतरण्यातच शहाणपणा आहे. तुम्ही हा लेख वाचण्यासाठी आपला वेळ बाजूला काढून ठेवलात ह्याचा अर्थ तुम्हाला कदाचित मी लिहिते ते आवडत असावं. जर तसं असेल तर माझी एक विनंती आहे - कृपया आपली राजकीय मतं मांडायला ह्या लेखाचा वापर करू नका. कुठल्याही पक्षाच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही. त्यासाठी मायबोलीवर दुसरे विभाग आहेत. कोणी तशी मतं मांडली तर त्यांना खोडून काढायलाही लिहू नका. टाळी एका हाताने वाजत नाही.

अर्थात ह्या विनंतीचा मान राखणं वा ती अव्हेरणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मला अ‍ॅडमिनचं काम वाढवायचं नाही. पण वाह्यात प्रतिक्रिया येत असल्यास धाग्यावरच्या प्रतिक्रिया बंद कराव्यात ही त्यांना विनंती. हा २५ वा पन्ना आहे. फार पूर्वी २५ पानांच्या वह्या मिळायच्या. तशी ही वही फक्त २५ पानांचीच झाली तरी आनंद आहे.

उगाच शेवटच्या पानांवर वेड्यावाकड्या रेघोट्या उठणार असतील तर ती पानं वहीत नसलेलीच बरी, नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळे पाणावले. नेहेमीप्रमाणेच नितांत सुंदर लिखाण
ता. क. मधल्या मजकूराची गरज भासत्ये हे जाणवून हताशा आली.

शंभर पन्ने वाचायला मिळायची आशा आहे. लिहीत रहा.

अतिशय सुंदर पन्ना.... नेहमीसारखाच

म्हणूनच ह्या शांततेची भीती वाटते.
हे एव्हढ्या प्रमाणात भिडलं आणि स्वत:बाबत जाणवलं की अचानक छातीत धडधडलं. हल्ली तळ ढवळला जात नाही हे नक्की.

तुमचा प्रांजळपणा आवडतो

डोळे पाणावले. नेहेमीप्रमाणेच नितांत सुंदर लिखाण..... अति सुंदर!

ह्या राजकीय मुद्यांवरून गेल्यावर्षी तुंबळ युद्ध झाले होते आम्हां शालेय गृप मधल्यांचे त्याची आठवण आली.

किती टचिंग लिहिता तुम्ही.

आजारी व्यक्तीला उगाच आजाराबद्दल प्रश्न विचारू नयेत असं माझं प्रांजळ मत आहे. >>>>>>> याबद्दल सहमत
नुकताच मामेबहिणीला कैन्सर डिटेक्ट झाला आहे.ट्रिटमेंट सुरू आहे.मला दुसऱ्याकडून समजलं,आम्ही नेहमी संपर्कात असतो फोन,मेसेज तरीही काही कल्पना नव्हती.काळजी वाटते पण जोपर्यंत तीला सांगणे इष्ट वाटत नाही तोपर्यंत कसं विचारायचं बाकी विचारपूस इतर विषय बोलणे होते.

किती सुंदर लिहिलेय !! अजून लिहीत रहा . केवळ धागा कर्त्याचे नाव वाचून लेख वाचावा असे वाटावे अशांपैकी तुम्ही एक आहात.

छान लिहिलंय. किती मनापासनं लिहितेस. त्यामुळएच मनाला लागतं. लिहित रहा. आता खंड पडु देऊ नको. तळ ढवळला गेला पाहिजे वारंवार.

अगदी निःशब्द झाले वाचून
खुप छान लिहिले आहे, माणसाच्या मनातला ओलावा आटत जातोय असे वाटते

खूप दिवसांनी लिहिलंस. मी आवर्जून वाट बघते तुझ्या लेखनाची.
छान म्हणवत नाही पण अगदी पोचलं लिहिलेलं.
अनघाबाबत वाचून एक नुकतीच घडलेली घटना आठवली.
दिवाळीच्या फराळाची ऑर्डर दिली होती एकाला. कधी भेटलो नाही की बोललो नाही.‌फेसबुकवर माहिती मिळाली वॉटसऍपला ऑर्डर दिली. अर्धं पेमेंट पण केलं.
घरच्या साठी फराळ मागवला तसेच इतर मदतनीस, गार्ड, कचरा उचलायला येणारा वगैरे साठी १० लाडू चिवडा बॉक्सेस मागवले.
सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी डिलिव्हरी दिली नाही. दुसरे दिवशी मी विचारल्यावर उद्या देतो असा मेसेज आला. तिसरे दिवशी मी वाट पाहून फोन केला तर पाठवतो म्हणाले पण संध्याकाळी डिलिव्हरी दिली. उघडून पाहिले तर लाडू चिवडा बॉक्स ऐवजी चक्क ब्राऊन बॅगेत भरून पाठवले होते. मग मला राग आला.‌फोन केला आणि बोलले जरा. 'थोड्या वेळाने बॉक्स पाठवतो' म्हणाले पण मला आता विश्वास उरला नव्हता. खरंतर माझं सगळंच प्लानिंग वरखाली झालं होतं. मी रागातच सगळे १० पॅकेट्स परत पाठवले. घरचे होते ते तेवढे ठेवून घेतले आणि पेमेंट केले उरलेले.
फराळ अप्रतिम होता. अगदी घरची चव. तूप वगैरे जाणवत होतं चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं.
दिवाळी झाली आणि ४-५ दिवसांनी मेसेज केला की फराळ आवडला. वगैरे.
दुसरे दिवशी उत्तर आले की त्यांचे ६ तारखेलाच हार्टऍटॅकने निधन झाले. मी हादरलेच. राहून राहून आठवत राहिलं की मी रागाने बोलले खूप. त्यानंतर ३ दिवसांनी गेले ते. बिचारे.. तब्येत बरी नसेल, तसेच ऑर्डर पूर्ण करायची धावपळ करत राहिले असतील.. दुर्लक्ष झाले असेल लक्षणांकडे.
काय झाले काय की. एक तरूण दोन छोट्या मुलांना मागे सोडून गेला. किती जणांची दिवाळी गोड केली असेल त्यांच्या लाडवांनी, पण ऐन दिवाळीत त्यांच्या कडे मात्र असे दुःख.. Sad

फारच सुंदर लिहीले आहे. अगदी काळजाला हात घातला म्हणतात तसे! लिहीत रहा आणि २५ का, १०० - २०० पानी वही होऊ द्या.

२५ पानांच्या असतात तश्याच ५०० पानी वह्यासुद्धा असतात की! तुझी वही ५०० पेक्षा जास्तीची असूदे अशी इच्छा करते.
हा ही पन्ना सुंदर झालाय. मनाला भिडेलसा. आवडला.

मोजकं लिहितेस पण अप्रतिम लिहीतेस! हा पन्ना वाचताना अनेक ठिकाणी स्वतःला पाहीलं आणि काही गोष्टी बदलल्या पाहिजेत याची जाणीव झाली. त्यासाठी आभार!
आणि तू लिहीत रहा! मायबोलीवरची राजकीय धुळवड अनेक चांगल्या धाग्यांना गालबोट लावते हे जरी खरं असलं तरी त्यामुळे तुझे लिखाण तू थांबवू नकोस. सुदैवाने मायबोलीवर अजून तरी उपद्रवमूल्य असलेले सदस्य हे अल्प आहेत. बहुतांश मायबोलीकर विवेकी आणि उत्तम लिखाणाची पारख असलेले आहेत. पुढील पन्न्याच्या प्रतिक्षेत!

वाह अप्रतिम लिहितेस
पन्ना आलेला पाहून बरे वाटले मला वाटलं थांबवलेस का काय

मित्राच्या बाबतीतला किस्सा तर अनेकांच्या बाबतीत झाला आहे
चांगले जवळचे म्हणावे असे मित्र या राजकीय धुमाळीत गमावले आहेत
एकाने तर देशद्रोही विकृत आहेस असे बोलून संबंध तोडले, इतकं हलवून गेलं ते
अरे आपण इतक्या वर्षांचे मित्र, एकत्र फिरलो, ट्रेक केले आणि आज एक राजकीय नेत्यावर टीका केली म्हणून मी देशद्रोही विकृत असल्याचा शिक्का मारलास
अवघड आहे सगळं

स्वप्ना, तुझी ही ( आणि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ही सुद्धा ) लेखमाला खूप आवडते. प्रत्येक पन्ना अंतर्मुख करतो.
' उदयपूरवाले अंकलके लिये '... हे मनाला भिडलं ... These little things can make your day.
Your 'panna' always gives me new perspective... लिहित रहा !

अप्रतिम, नेहमीप्रमाणेच, का ही २५ पानांची वही...????
अस करणं निष्ठुर आहे.....
लिहित जा.... काहीतरी दर्जेदार हृदयाला भिडणारे लिहितेस... जियो

सगळ्यांचे मनापासून आभार - प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि माझ्या विनंतीचा मान राखल्याबद्दल