प्रेम अगन.
इसवी सन १९९८.
फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना.
राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन.
स्मिता जयकर- सूरजची आई.
अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे.
बीना बॅनर्जी- सपनाची आई.
समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ).
निर्माता,दिग्दर्शक: फिरोझ खान.
पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर
झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट
करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे.
विशालभैय्या आणि सपना वेगवेगळ्या
स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात.
अनुपमपापा अब्जाधीश आहेत.
कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर
असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..
परंतु ट्रेनिंगचं अचानक गाण्यात रूपांतर होतंय.
कोरियोग्राफी वगैरेची अशी काही खास गरज नाही.
जमेल तेवढ्या जास्तीत जास्त आक्षेपार्ह हालचाली
करायला सांगितले गेले आहे.
गाण्याचे बोल साधारण असे आहेत:
शाम सुबह अय्या अय्या, रात दिन अय्या अय्या
दम लगा के मूव्ह इट, जोर लगा के डू इट डू इट
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजात साईड बाय साईड कराटे वगैरेपण शिकवतात.
ट्रेनिंगच्या नावाखाली कराटेचा ट्रेनर काहीही कारण नसताना एका विद्यार्थ्याला दाणकन् उचलून आपटतो.
सूरज आणि विशाल तोंडातून आळीपाळीने 'हा: हू:'
'खम्मॉं खम्मॉं' 'हाऊजदेss' यासारखे
चित्कार काढत तत्सम तायक्वांदो
वगैरेची कौशल्ये उपस्थित एक्स्ट्रा कलाकारांना आणि
श्री. ट्रेनर महोदयांस दाखवतात.
श्री. ट्रेनर यांस चेहऱ्यावर आळीपाळीने कौतुक आणि क्रोध या भावना दाखवण्याचे ठोक कंत्राट दिले गेले आहे..
परंतु तेही त्यास भलतेच अवघड जातेय.
ह्या ट्रेनर मनुष्याचे पोट नीट साफ झालेले नसावे, अशी शंका
घ्यायला पुरेशी जागा आहे.
या मूव्हीमध्ये नेहमीचे प्रॉब्लेम्स आहेतच.
पण संवादफेकीच्या बाबतीत विशेष गडबडगुंडा
झालेला आहे.
म्हणजे अगदी लहान मुलांचं नाटक बसवताना कसं असतं की त्यांना सांगावं लागतं प्रत्येक वेळी की,
'हं आता तुझा डायलॉग म्हणून दाखव बरं शोनुल्या'
इथेही तसंच आहे. हे आपापल्या वाट्याला आलेले शब्द
म्हणून दाखवतात फक्त. समोरच्या व्यक्तीला त्या
शब्दांतून काहीतरी भावना वगैरे पोचवायच्या असतात
याबद्दल त्यांना काही आयडियाच नाही.
हावभाव, हातवारे आणि शब्दोच्चार ह्या़ंचा ताळमेळ पूर्णपणे गंडलेला आहे.
त्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे वगैरे भानगड
नष्टच होऊन गेली आहे.
शब्द घडाघडा म्हणून गप्प बसणे. दॅट्स ऑल.!!
एका पात्राच्या तोंडातून शब्द घरंगळायचे बंद झाले की लगेच पुढचे पात्र घडाघडा शब्द ओकून मोकळे होते..!
त्या ओकण्यामध्येही एक घाई आहे. एक धडपड आहे.
एक नवखा बथ्थडपणा आहे.. भकासपणा आहे... रंग उडालेपणा आहे..
म्हणजे डायलॉग आठवून आठवून म्हणणे हा एक
भाग झाला.. पण ह्यात एक दुर्मिळ प्रकारचे कुंथणेही आहे..!! सूरज-सपना आणि विशालभैय्या ह्यांच्या संवादफेकीत तर कुंथण्याची अक्षरशः चढाओढच आहे.
शिवाय आपल्यामुळे किती हजार रिटेक्स घ्यावे लागले, ह्याचा ह्या लोकांना काही मेळच नसल्यामुळे एक दयनीय
निर्ढावलेपणही आहे..! काहीतरी फंडामेंटलच हुकलेलं आहे ह्या मनुष्यांचं..!
संवादफेकीचा हा नावीन्यपूर्ण पैलू
एकदा आपल्या पचनी पडला की मग काही अडचण
राहत नाही. कारण एका पॉईंटनंतर आपलं मन विशाल
होतं आणि परफॉर्मन्स मोजण्याचे बेंचमार्क्स आपण
एका झटक्यात न्यूट्रलला आणून ठेवतो.
सपना आणि सूरज ताबडतोब प्रेमात पडले आहेत
आणि एकमेकांना प्रेमासंबंधी लंब्याचौड्या रोमॅंटिक
पुड्या हाणत आहेत. त्या पुड्या कलात्मक करण्याच्या नादात स्क्रिप्टरायटर पार फाफललेला आहे.
स्क्रिप्टरायटरच्या नादाने डायरेक्टरही फाफलत
आडरानात डोंगरदऱ्यात शिरलेला आहे.
खरंतर नेमकं कुणाच्या नादाने कोण फाफललं, हे
ठरवणं फारच गु़ंतागु़ंतीचं आहे ह्यात..!
मध्येच हे हीरो-हिरॉईन एका खोल धबधब्यात उडी
मारतात. कार्यकारणभाव असा काही नाही.
'आपल्या पवित्र प्रेमात एवढी ताकद आहे की आपण मृत्यूचं चुंबन घेऊन परत येऊ.!' असा एक केकाटणारा डायलॉग
तेवढा आपल्यावर आदळतो.
शिवाय हे सगळं एका बाजूला चाललेलं असतानाच दुसऱ्या बाजूला नाच-गाणी वगैरे असतातच.. ती थांबवून कसं चालेल?
इथे एक सीन आहे
मुलगी स्वतःच्या तोंडातून 'इष्क' असा शब्द उच्चारते
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक खास असं हसू प्रकट होतं,
असं ह्या सूरज मनुष्याचं होपलेस निरीक्षण..!
एक हेलिकॉप्टर उतरताना दिसतं अधूनमधून.
अनुपमपापा देशविदेशातील दौरे आटपून
हेलिकॉप्टरमधून घरी येतायत. तशी पद्धत आहे.
शिवाय एक प्रोटोकॉल वगैरेही असतोच.
सपनाची आई केस कलप केलेले, साडी-मंगळसूत्र-दागिने
हास्यगुटीका वगैरेसह हेलिपॅडवर स्वागताला..!
आणि सोबत चार एक्स्ट्रा कलाकार सूटाबूटातले..!
एक जण दरवाजा उघडायला.
एक जण सलाम करायला. एक जण पापांची
लाडकी कुत्री सांभाळायला. आणि उरलेला एक जण
फोन रिसिव्ह करायला.
दिल्लीवरून हमखास कॉमर्स सेक्रेटरी किंवा तत्सम
फायनान्स सेक्रेटरी वगैरे अनुपमपापांसाठी तिष्ठत
बसलेले असतात.
अनुपमपापांचं काम भव्यदिव्य आहे. ते अब्जाधीश
आहेत, हा कन्सेप्ट क्लिअर होतो.
ह्यावेळी अनुपमपापा 'सांघा इंडस्ट्रीज'शी एक मोठा
औद्योगिक करार यशस्वी करून आले आहेत.
सांघा हा त्यांचा बचपनका दोस्त आहे आणि शिवाय
ह्या सांघाला राजेश नावाचा बिनलग्नाचा टोणगाही
आहे, हे परंपरेने आलेच.
हा करार फत्ते केल्यामुळे अनुपमपापांच्या जेके
इंडस्ट्रीजचा व्याप जगभर वगैरे वाढणार आहे..
लब्बाड अनुपमपापा असे एकाच दगडात तीन
पक्षी मारण्याची चाह उराशी बाळगून आहेत.
तिकडे कॅप्टन बब्बर आर्मीच्या ट्रूपला ट्रेनिंग देतायत.
ट्रेनिंग म्हणजे काही जवान मातीच्या ढिगाऱ्यांवर गोळीबार
करून मोकार धूळ उडवून देतायत, एवढंच.
नंतर कॅप्टन जवानांना उद्देशून एक मोटीव्हेशनल स्पीच किंवा ओरीएंटेशन किंवा
युद्धशास्त्रविवेचन कम् स्ट्रॅटेजिक हालचाली किंवा
तत्सम हौसला बुलंद वगैरे करतायत.
हे सगळं एका बाजूला चाललेलं असतानाच आपली
आयुष्यभराची सगळी बचत फुंकून ते एक महागडी
स्पोर्ट्स बाईक सूरज टोणग्यास भेट म्हणून पाठवतायत.
ही बाईक आर्मीतलाच एक माणूस पोस्टींगवरून थेट
सूरजच्या मुक्कामी घेऊन येतोय. मग त्याच बाईकवर
सपनाला बसवून सूरज लगेच पित्याच्या भेटीस निघतोय.
डायरेक्टरने त्या आर्मीतल्या माणसाला कशाला उगाच
खालीफुकट हेलपाटा घालायला लावला कळायला मार्ग नाही. असो.
सासू-सुनेची भेट..! सासू भावी सुनेला हाताने घास वगैरे
भरवतेय. सून पुऱ्या खातेय. नको वगैरे काही म्हणत नाहीये.
पहिल्याच भेटीत जे एक अवघडलेपण असतं, तसल्या क्षुद्र गोष्टींना पूर्ण फाटा दिलेला आहे. सगळं खुलं वातावरण.
बाकी ह्या सौ. स्मिता जयकर सासूबाईंचा आधीच
कसलातरी अपघात झालाय आणि
त्यामुळे त्यांना ह्या पिच्चरमध्ये कायम
व्हीलचेअरवर फिरायला लागतेय.
कॅप्टनसाहेब रोज जवानांना ट्रेनिंग देऊन झाल्यावर धावतपळत येऊन बायकोची काळजी घेत असतात, म्हणजे तिला आंघोळ वगैरे घालत असतात.. परंतु कॅप्टनसाहेबांना आज उशीर झालाय... बायको स्वतःच्या मजबूर हालतीवर क्रुद्ध होऊन स्वतःच आंघोळ करायचं ठरवतेय.. आणि त्या प्रयत्नात जिन्यातून गडगडत खाली येऊन डोक्याला खोक
वगैरे पाडून घेतेय. आता व्हीलचेअरवर बसून जिन्यातून
उतरायला लागल्यावर दुसरं काय होणार..! साधं फिजिक्स आहे..!
परंतु पिच्चरांमधी मोकळ्या जागा भरण्यासाठी हे असलं फारच करावं लागतं..!
बाकी ह्या अपघाताचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही.
किंवा व्यापक पातळीवर बघितलं तर एकूणच ह्यात
कशाचा कशाला संबंध नाही..! पण व्यापक पातळीवर
तुम्हाला कुणी बघायला सांगितलंय..! आपण आपलं नॉर्मल
पातळीवर बघावं..! ते नको असेल तर भंपक पातळीवर बघावं..!
आणि तेही नको असेल तर हरीहरी करत बसावं..!
इथे पाहा
एक सीन/डायलॉग आहे. ह्या दर्जाचा माठपणा
सहजसाध्य नाही. हा पवित्र माठपणा साध्य
करण्यामागे सूरजचे आणि तीर्थरूप फिरोझ खानसाहेबांचेही बेसुमार कष्ट आहेत.
आपल्याकडे दगडांमध्ये बेसॉल्ट प्रकारचा दगड
अतिटणक मानला जातो. छिद्रं फार कमी असल्यामुळे त्यात पाणी वगैरे शिरत नाही.
सूरज शंभर टक्के बेसॉल्ट आहे..!
बेसॉल्ट इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म..!
शतकातून एकदा असा सीन घडून येतो.!
ह्यात सूरजचा बेसॉल्टपणा अत्यंत शुद्ध स्वरूपात प्रकट झाला आहे..! किंचितही भेसळ नाही..!
निव्वळ दैवी अभिनय सूरजमधून पाझरलाय..! सवालच नाही..!हे पाहाच
अनुपमपापा आणखी कितव्यांदा तरी हेलिकॉप्टरमधून
सैरसपाटा, मजाहाजा करून आले आहेत. हेलिपॅडवर
नेहमीचा सगळा प्रोटोकॉल आहेच.
फरक एवढाच की आता कुत्रीसुद्धा वाट बघून बघून जांभया देताना दिसतायत.
अनुपमपापा नेहमी हेलिकॉप्टरमधून उतरले की
कुत्र्यांना कुरवाळतात. अब्जाधीशांना अशी सवय
असेल.! आम्हास त्यासंबंधी कल्पना असण्याचं काही
कारणच नाही.
(कारण आम्हास आत्तापर्यंत बऱ्यापैकी वडापमध्ये किंवा
तत्सम टमटममध्ये चारी बाजूंनी स्वतःस दामटून मुडपून
घेत प्रवास करण्याचाच अनुभव पुष्कळ आहे.
आणि तिथे सीट बेल्ट वगैरेची काहीच गरज पडत नाही.
कारण उदाहरणार्थ उद्घोषणा ह्या असल्या असतात : ओ मावशीsss बारक्याला घ्या मांडीवर..! सरकून बसा दादाss आवो पाच जन आरामशीर बसतेत.. म्हागं फुडं सरकून बसा जराss)
-----------------------------********-----------------------
(पुढे चालू)...
आता मारामारी केल्यामुळे सूरज सपनाला अटक झालेली आहे. विशेष म्हणजे त्या दोघांना ज्या कोठडीत ठेवले आहे ती
कोठडी म्हणजे एक मोकळ्या जागेतली खोली आहे. हे ही ठीक. पण आता तिथे एक चहावाला येऊन ह्या दोन कैद्यांना चहा हवाय का असेही विचारतोय. हे ग्रेट आहे.
अनुपमपापा आणखी एकदा हेलिकॉप्टरमधून उतरून
डायरेक्ट कोठडीबाहेर हजर. लगेच फुल्ल आर्मी
युनिफॉर्ममध्ये कॅप्टनसाहेबही बॉडीगार्ड्सना घेऊन
घटनास्थळी हजर.
दोन बाप मोहब्बत, कठीन रस्ता, दौलतका नशा,
हिमालय, चंद्र सूर्य, ताजमहाल, ईश्वरी वरदान,
वफा की दास्तान, कुर्बानी यासारखे ट्रकभर काव्यात्म
शब्द वापरत, मोजून पाच मिनिटे तुंबळ डायलॉगबाजी
करत राहतात.
कॅप्टनसाहेब आर्मी वगैरेमध्ये असले तरीही
'प्रेम' ह्या संकल्पनेवर इथे सघन उत्कट बोलतात..
कॅप्टन बब्बरसाहेब म्हटल्यावर काही प्रश्नच नाही.
{ते कलावंत आहेत. मनाने रोमॅंटिक आहेत.
टवटवीत आहेत. त्यांना सर्व शक्य आहे.
म्हणजे समजा 'सवाई गंधर्व'च्या स्टेजवर गायला
बसवलं तर ते सहजच मैफिलीमागून मैफिली गारद
करतील.
तिथेही फुल्ल आर्मी युनिफॉर्म घालून आलाप घेतील.!!
आणि हातात बंदूक वगैरे असेलच तंबोऱ्यासारखी..
विशेषतः प्रेमविषयक राग मधुवंती किंवा तत्सम
बागेश्री वगैरेंमध्ये श्रोत्यांना चिंब भिजवतील..! }
आणि दुसऱ्या बाजूला अनुपमपापा समजा
रक्तपिपासू भांडवलदार वगैरे..!
एकदा बटन ऑन केलं की किमान एक हजार
शब्द बोलून झाल्याशिवाय थांबायचं नाही, अशी
प्रतिज्ञाच आहे त्यांची.
एवढा वेळ कुठेतरी लंपास झालेला इन्स्पेक्टर तिथे
प्रकटतो. त्या दोघांवरची केस मागे घेतल्याची घोषणा
करतो आणि दोघा बापांची भाषणबाजी थांबवून
प्रेक्षकांची सुटका करतो.
कारण हा सगळा प्रकार मोकळ्या मैदानात
खुल्यामध्ये चाललेला आहे.
मध्येच मख्ख हिरो हिरोईनचं एक भांडण आणि तीन
मिनिटांत लगेच पॅचअप. म्हणजे सरळसरळ टाईमपासच.
परंतु इथे रूसलेल्या हिरॉईनचा हिरोला उद्देशून एक डायलॉग असा आहे की 'तुम पत्थरदिल हो और
मैं एक पत्थर में प्यार ढूंढ रही थी'
ह्यावरून आम्ही वरती मांडलेल्या बेसॉल्ट थेरीला आपोआप पुष्टी
मिळाली, हे एक बरे झाले.
इथे एक सीन आहे.
हिरो हिरोईन एकांतात आहेत. दोघांच्याही शरीरांमध्ये बहुदा हार्मोन्सच्या हालचाली सुरू झाल्यायत. हिरोईन म्हणतेय की
'सूरज, मुझे वो हसीन दर्द दे दो.'
आता हा हसीन दर्द नेमका कशा प्रकारे देतात हे
बघायला आपण सावरून बसतो.
तशी दर्द देण्या-घेण्याची प्रोसेस सुरूही होते,रंगातही
येते परंतु शेवटास मात्र जात नाही.
कारण बाहेर वीज कडाडते आणि सूरज म्हणतो की,
''हम जजबात में बह गए थे सपना. मैंने अभीतक
तुम्हारे मांग में सिंदूर नहीं भरा. अभी हमारा मिलन
होने का वक्त नही हुआ''
ह्यावर सपनाही म्हणते की ''मी पण तुझी परीक्षा बघत
होते सूरज..! आणि तू परीक्षेत पास झालास..!''
{{अरेच्चा...! हे असं नाय चालणार..!
बिलकुल नाय चालणार..!
हा अन्याय आहे..!
आंबटशौकीनांवर हा सरळसरळ
कुठाराघात आहे..! असे नका करू प्लीज..!
आमच्या तमाम आंबटशौकीन बांधवांच्या वतीने
आम्ही विनंती करतो. पदर पसरतो.
असा रसभंग करू नका..!
तुम्ही जजबातमध्ये असेच अजून थोडा वेळ
वाहात रहा..
आम्हालाही तुमच्यासोबत जजबातमध्ये वाहायला आवडेल..! परंतु ही हसीन दर्दवाली परीक्षा अशी
अर्ध्यावर सोडू नका..! 'पास की नापास' हे असं
एवढ्यात ठरवता येणार नाही..!
कधी नव्हे तो जरा बरा सूर लागला होता तुमचा..!
आणि ऐन मोक्याच्या क्षणी आता हे 'मांग में सिंदूर'
वगैरेसाठी अडून राहता..! हे बरोबर नाही..!
एक तर आमच्या विद्यार्थीदशेत आमची कुणी असली
परीक्षाच घेतली नाही.
''नुसता सिलॅबस बघायला काय हरकत आहे'',
असं विचारलं होतं एकीला तर ''सुपरव्हायजरना विचारून सांगते''
असं उत्तर मिळालं..! त्यामुळे तेन्व्हा ते एक राहूनच गेलं..!
बाकी नंतर वयाच्या या टप्प्यावर वेगवेगळ्या
हसीन दर्दवाल्या स्पर्धापरीक्षा देण्यात, त्यांची तयारी
करण्यात व्यावहारिक अडचणी फार..
वेगवेगळ्या परीक्षांची वेगवेगळी डीमांड..!! त्याप्रमाणे मग अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलावी लागते...!
प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं लागतं..!
कधीकधी पुढची पार्टी वारंवार परीक्षेलाच
बसण्याचा हट्ट करू लागते.. असले आकर्षक
हट्ट पुरवण्याचा नादात कायमस्वरूपी रेस्टीकेट होऊन
बसण्याची रिस्क असते..!
ह्यामध्ये कौटुंबिक सपोर्ट अजिबातच मिळत
नाही..! कारण कुटुंबाचं म्हणणं असं पडतं की आता तुला
परीक्षा-फिरीक्षा द्यायची गरजच काय आहे?
आता सगळी उत्तरपत्रिका आपलीच आहे..!}}
तेवढ्यात अनुपमपापांच्या रूपात स्कॉड किंवा तत्सम भरारी पथक वगैरे
परीक्षा केंद्रावर धाड घालते
पाऊस असल्याने यावेळी हेलिकॉप्टर नाहीये.
सपना-सूरजला बेडवर बघून पापा पिसाटतात.
हसीन दर्दवाली सपना लगेच पलटी मारते
आणि बापाला म्हणते की,
'आमचं प्रेम पवित्र आहे. तुम्ही उगाच गैरसमज इत्यादी करून घेताय.'
पापा सूरजला गुंडांकरवी जाम पिदवतो.
पापा सपनाला इमोशनल ब्लॅकमेल करून
ब्रेकअप करायला लावतो.
इकडे कॅप्टनसाहेब युनिफॉर्मसहित बायकोस घेऊन सूरजला सरप्राइज व्हिजिट द्यायला येतात.. वाटेत
पत्नीला सुहागरात्रीची रोमांचक नॉस्टॅल्जियात्मक वगैरे आठवण करून देतात.
कॅप्टनसाहेब आधी घरात शिरतात आणि बघतात तर
सूरज जखमी अवस्थेत घरात पडून आहे..!
अंगावर ठिकठिकाणी टोमॅटो सॉस कलात्मक पद्धतीने
लावलेला आहे. कॅप्टनसाहेब किंचाळतात.
लगेच बाहेर सौ. स्मिता कॅप्टन किंचाळायला लागतात,
"क्या हुआ मेरे सूरज को ? बताओ मुझे.. क्या हुआ
सूरज को? मुझे देखने दो.. मेरा सूरज ठीक तो है ना?"
कॅप्टनसाहेब किंचाळतात की 'सूरज बिलकुल ठीक
आहे. काळजी करू नको.'
कॅप्टनसाहेब एकाच वेळी सूरजच्या
भावनिक पप्प्या वगैरे घेतायत आणि त्याच वेळी
बायकोस सगळं ठीक असल्याचं भासवतायत.
मोठीच कठीण परिस्थिती कॅप्टनसाहेबांवर
आली आहे.
खरंतर ही स्मिता जयकर नामक आई सरळसरळ
घरात येऊन बघू शकतेय.. व्हीलचेअरला काहीच
अडथळा दिसत नाहीये...पण प्रसंगात नाट्य निर्माण
करण्यासाठी हा सगळा बेंटेक्स प्रकार केलेला
असणार.. शिवाय आईची वेदना, तळमळ, दु:ख,
तडफड हे सगळं असतंच...! ते ही साईड बाय साईड
दिसत राहतं...!
{ज्यांना बघायचं ते बघतील..!
सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचा विचार करावा लागतो.
सर्वांचं थोडं थोडं समाधान करावं लागतं. ग्राहकांची खुशी हाच परम संतोष..!
आणि ही रडारड बघायला ते काही एक्स्ट्रा पैसे मागत
नाहीत. एकाच तिकिटात सगळ्या भावना भरगच्च उपलब्ध असतात..!
तुम्हाला ज्या हव्यात त्या तुम्ही निवडा आणि अनुभवा. उगाच पिरपिर कशासाठी ?}
कॅप्टनसाहेब सूरजला बदला घेण्यासाठी मोटिव्हेट
करतात आणि पुन्हा ड्यूटीवर जातात.
सूरज नीट होतोय. सूरजची माऊली हातात
दुधाचा ग्लास घेऊन व्हीलचेअरमध्ये बसली आहे. सूरजकडे कौतुकाने प्लस मायेने पाहतेय..
सूरजचं व्यायाम, कराटे वगैरे चाललंय घरातल्या घरात. बदला घ्यायचा म्हटल्यावर हे सगळं करावंच लागणार..!
दूधही प्यावं लागणार..!
सूरजला सपनाकडून ब्रेकअपसंबंधी पत्र आलंय.
तेव्हा मोबाईलचं एवढं नव्हतं..!
सूरज पत्र वाचतोय.
पत्रात जुदा होण्याची वेदना आहे. भावनिक उष्णता
आहे. किस्मतला दोष आहे. नशीबापुढे शरणागती
आहे. मानवी प्रयत्नांची विफलता आहे.
वाट वेगळी झाल्याची घोषणा आहे.
ह्या सगळ्या व्यामिश्र भावनांचे वादळ सूरजने
चेहऱ्याद्वारे अभिव्यक्त करावे,
अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे.
तिकडे अनुपमपापा हेलिकॉप्टरच्या दिशेने चाललेले
आहेत. ह्यावेळी ते बहुदा दिल्ली वगैरे ठिकाणी चालले आहेत. कारण दिल्ली एअरपोर्टवर फायनान्स
मिनिस्ट्रीतले सचिव वगैरे त्यांची वाट बघत
बसले आहेत. नंतर सगळ्या फॅमिलीसहित
ऑस्ट्रेलिया वगैरे देशात जाण्याचे पापांनी नियोजन
केले आहे.
हेलिकॉप्टर वरती उडते आणि खाली सूरज गुंडांचा
बदला घेतोय. सगळे गुंड सूरजपुढे दयेची भीक मागतायत.
यापैकी एक गुंड चक्क टाय वगैरे बांधून मारामारी
करतोय. ही अशी भागवाभागवी करावी लागते आपल्याकडे..!
ऑस्ट्रेलियात बचपनका दोस्त सांघासाब यांचेकडे
अनुपमपापांचा हा सगळा गोतावळा उतरलेला आहे.
श्री. राजेश सांघा नवरदेव एका उग्र घोड्यावर पन्नास
सेकंदापर्यंत बसण्याचे प्रात्यक्षिक रोमहर्षक दाखवतोय.
हा एक विशेष प्रजातीचा घोडा आहे.
सामान्य मनुष्याला हा घोडा फक्त पाच सेकंदांमध्येच
फेकून देतो. परंतु श्री. राजेश सांघा थोर आहेत.
पन्नास सेकंद घोड्यावर टिकून राहतात.
ही एक खरीखुरी ग्रेट ॲचिव्हमेंट आहे.
विषयच नाही..!
अनुपमपापा, सगळी फॅमिली आणि इतर टाईमपास
गौरवर्णीय बघे मंडळी टाळ्या वाजवतात.
श्री. राजेश सांघा नवरदेव ह्यांच्या चेहऱ्यावरची
माशीही उठत नाही, ही किरकोळ बाब आपण
ह्याठिकाणी दुर्लक्षित केली पाहिजे.
श्री. राजेश टोणगे यांनी सपनाला मद्यसेवनाचा नाद
लावला आहे.
सपना रोज टुन्न होऊन घरी येऊ लागतेय.
अनुपमपापा आणि सपनाच्या आईस हा
सगळा चंगळवाद, भोगविलास वगैरे मान्य नाही.
सपनाची आई म्हणते,
"शेवटी तू भारतीय संस्कृतीत वाढलेली असल्यामुळे
तू राजेशला योग्य वळण लावायला हवेस.
परंतु इथे तर तूच रोज मद्य वगैरे पिऊन सुसाट झाली आहेस. हे पाहून आमचे मन फार दुखते."
सूरज इकडे झुरत दर्दे गाणी म्हणत भारतीय
जंगलांमध्ये भटकत फिरत असतो. कॅप्टनसाहेब
पुत्रास अद्भुत सल्ला देतात की आता तू
ऑस्ट्रेलियाला जाऊन सपनाचा शोध घे.
पैसे वगैरेची चिंता करू नकोस. ही स्पोर्ट्स बाईक
विकून पैसे उभे करू..
"मुमताजला शोधण्याची वेळ आली असती तर
शहाजहानने ताजमहालही विकला असता,
त्यापुढे ही बाईक वगैरे काहीच नाही", असं
कॅप्टनसाहेबांचं म्हणणं पडतं..
ही बाईक घेण्यासाठी आपली आयुष्यभराची
पुंजी उडवावी लागली होती, हे कॅप्टनसाहेब साफ
विसरून बसले आहेत..!
लगेचच एक विमान हवेत उडताना दिसतेय.
त्यात सूरज असेलच.
कारण सूरज याचे ताबडतोब ऑस्ट्रेलियादेशी आगमनही
झालेले दिसतेय.
डायरेक्टर सूरजचा बाप असल्यामुळे ऑस्ट्रेलियात
बनियनवर मोकाट फिरण्यात सूरजला अडचण नाही.
सपनाची सगाईची पार्टी चाललीय. तिथं अचानक
सूरज प्रकट होऊन नाचायला लागलेला आहे.
इतरांना तो ओळखू येत नाही. फक्त सपनाला
ओळखू येतो. खरं प्रेम हे असंच असतं..!
{तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे काय? कशाला सारख्या
शंका काढताय..खऱ्या प्रेमाची ताकद तुम्हाला
काय कळणार ! }
बाय द वे, सूरजनं वेषांतर केलंय, हे एक सांगायचं राहिलं.
कारण हे वेषांतर म्हणजे डोळ्यांच्या भोवती काळे फर्राटे ओढणे, इतकंच आहे.
पहा इथे एक सीन आहे. राजेश सपनावर जबरदस्ती करतोय. घड्याळाला चावी दिल्यासारखी शब्दफेक चाललीय.
हतबल बेसहारा सपना म्हणते, ''मेरे जिस्म को पाना इतना आसान नहीं. मैं भारत की तहजीब का दर्पण हूं"
स्वस्त दर्जाची नशा केल्याशिवाय असे असंबंध डायलॉग
लिहून होणे शक्य नाही, असे आमचे (अनुभवाअंती) मत आहे.
कंगाल स्क्रीप्टरायटरचा सगळा पैसा खलास झाल्यामुळे ब्रॅंड बदललेला असणार बिचाऱ्याने..!
बाकी हा तर सरळसरळ हरिहरेश्वरचा बीच आहे की काय असा मला डाउट येतोय.
ऑस्ट्रेलियाच्या नावाखाली बरेच सीन्स आपल्याकडेच
आडरानात डोंगरदऱ्यात उरकले आहेत, असे दिसते.
कारण ह्यांचे असले वेडे चाळे भर रस्त्यात करू द्यायला
ऑस्ट्रेलियन प्रशासनाने एका झटक्यात परवानगी नाकारली असेल.
अनुपमपापा तर शेवटी शेवटी एवढे हुकलेले आहेत की
ते मनात येईल त्याला डायरेक्ट गोळ्याच घालायला लागतात..!
रेपिस्ट राजेशला गोळ्या घालताना अनुपमपापा जे
डायलॉग मारतात ते सुंदर आहेत.
भाषेच्या अंगाने बघितलं तर त्यात फार मोठं सौंदर्य आहे.
उदाहरणार्थ हा डायलॉग पहा
"क्या यहीं दिल था जिसने हवस को पनाह दी थी?"
हा डायलॉग म्हणून झाला की अनुपमपापा राजेशच्या
थेट दिलावर गोळी मारतात. राजेशचं फक्त आचके देतो.
त्याला डास चावणे आणि गोळी लागणे ह्यातला फरक कळत नाही. त्याच्यासाठी सगळं सेमच आहे.
तर प्रेमअगन ही अशी एक अस्सल कलाकृती आहे..! देश, भाषा, संस्कृती वगैरेच्या पलीकडे जाऊन
समस्त मानवजातीच्या अंतःकरणास भिडण्याची क्षमता ह्यात आहे.. !
शिवाय या चित्रपटात वारंवार पाहण्याचा मोह होईल अशा,
तसेच रसग्रहण करण्यासारख्या सुंदर जागा विपुल आहेत.
परंतु आमच्या दृष्टीस मर्यादा आहेत. मायनस तीन नंबर आहे चष्म्याचा..!
त्यातून किती आणि काय काय पहावं!!
आणि ही प्रेमाची आग एकाच बैठकीत पूर्णतः झेलण्याची
ताकदही नाही.!
म्हणूनच हा प्रेमाचा उजेड भविष्यातही आम्हास पुन्हा पुन्हा आकर्षित करत राहील, यात शंका नाही.
बाकी हा एक कलात्मक चित्रपट असल्याने त्याचा शेवट ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूपाचा असा आहे.
पिच्चर पाहून संपला आणि त्यामुळे एक तृप्त तरीही
हुरहुर लावणारी भावना या क्षणी माझ्या मनात आहे.
त्यासोबतच जगावं लागतं माणसाला..!
काय करणार..!
धिस इज लाईफ, यू नो.!
आपल्या हातात काय असतं दुसरं..?
जाताजाता :
आणि शेवटी ह्या चित्रपटाबद्दल आमच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन करण्यासाठी,
कविश्रेष्ठ तुकारामबुवांच्या निर्मळ शब्दांची मदत घेणे
अगदीच योग्य होईल, असे वाटते
काय वाणू आता / न पुरे ही वाणी /
मस्तक चरणी / ठेवितसे //
खतरनाक लिहिलं आहे
खतरनाक लिहिलं आहे
फरडींन ला बेस्ट डेब्यु चा फिल्मफेअर गावला यासाठी असे त्या करणं बिस्वाच्या व्हिडिओतपहिले
त्यामुळे उच्च कोटीचा असणार यात शंकाच नाही
अफलातून लिहिलंय.
अफलातून लिहिलंय.
Pages