डिस्क्लेमर -
- श्लोकांचे भाषांतर फार ढोबळ केलेले आहे. सार पोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- न्युमरॉलॉजीचा जो उल्लेख आलेला आहे त्याला आधार नाही. इट इज फिक्शनल.
________________________________________________________
पहाटे सहाला, गुरुद्वाराच्या बैठकीत प्रवेश करताच, चिनाबने ग्रंथसाहीबपुढे गुडघे टेकवुन, मस्तक जमिनीस आदराने टेकवुन प्रणाम केला. आणलेले ५-१० डॉलर दानपेटीत टाकून ती शांतपणे स्त्रियांच्या बाजूस जाउन स्थानापन्न झाली. हा तिचा दर गुरुवारचा नेम असे. इतक्या पहाटेदेखील काही भाविक जमलेले होते. पहाटेच्या शांततेत बाबाजींचा धीरगंभीर आवाज घुमत होता -
हुकमि रजाई चलणा नानक लिखिआ नालि ॥
हुकमी होवनि आकार हुकमु न कहिआ जाई ॥
हुकमी होवनि जीअ हुकमि मिलै वडिआई ॥
ओ नानक, त्याच्या आज्ञेमध्ये जगाचे चालणे हेच लिखित अहे.. त्याच्या आज्ञेनुसार विविध जीव, सारी सृष्टी जन्म घेते. त्याच्या इच्छेनेच जीवास पत प्रतिष्ठा प्राप्त होते.
बाबाजी एक एक पौरी धीम्या स्वरात, गात होते आणि शांतता भंग पावण्याऐवजी अधिक सुंदर होत जात होती. पण चिनाबच्या मनात काही वेगळेच विचार चालू होते ते कसे शांत होणार.
२९ मे, आज तीसरे वर्ष पूर्ण झाले अमेरीकेत पाउल ठेउन. आपले एम बी ए झाल्यानंतर आईने, मावशीकडे पाठविले. "यश मिळाल्याखेरीज आना मत" सांगूनच. अमेरीकेतच कोणी मुलगा सापडला निदान नोकरी सापडली तर आयुष्य मार्गी लागेल या हेतूने. पण झाले काही वेगळेच. मावशी तरी बरी वागवायची. पण तिनेही आल्याआल्या चिनाबला काम शोधायला भाग पाडले. ती थोडीच चिनाबला खालीफुकट खिलावणार होती! खरं तर एम बी ए ला खूप मागणी असेल या चिनाबच्या आशेलाच पहीला हरताळ फासला गेला होता. कशीबशी देव सेठीकडे नोकरी लागली खरी. पण नावापुरताच. देव सेठीकडे सगळे इल्लिगल हिस्पॅनिक/मेक्सिकन आणि काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके पण तेही अनडॉक्युमेन्टेड इन्डियन काम करत, अक्षरक्ष: राबत. बॉक्सेस पॅक करण्यापासून, सामान गाडीत चढविण्या उतरविण्यापर्यंत, फोनवर रिसेप्शनिस्टचई भूमिका निभावण्यापर्यंत पडेल ते काम चिनाब करत होती. पुढे शिक्षण घ्यायचा कायदेशीर मार्ग बंद. पगार तर इतका तुटपुंजा.
पुढे मावशी गेल्यानंतर एका आठवड्यात मौसाजींची उफराटी तऱ्हा पाहून, अनडॉक्युमेन्टेड , इल्लिगल चिनाबनेच तिथून काढता पाय घेतला. आणलेले पैसे खर्च झाले होते. अंगावर फक्त ५०० डॉलर होते ना भारतत परत जाता येत होते ना कुठे अपार्ट्मेन्ट घेउन रहाता येत होते. तिला एका गुन्हेगारी वस्तीत कसंबसं एक खोपटंवजा अपार्ट्मेन्ट मिळालं होतं. ते अपार्ट्मेन्ट, घरमालकाच्या नाना मिन्नतवाऱ्या करुन, झळ सोसून ती घट्ट धरुन होती. कसलंही भविष्य पुढे दिसत नव्हतं.
हुकमी उतमु नीचु हुकमि लिखि दुख सुख पाईअहि ॥
इकना हुकमी बखसीस इकि हुकमी सदा भवाईअहि ॥
मिळणारे सुख अथवा दु:ख ही त्याचीच देण. त्याच्या आज्ञेनुसार जग चालते कोणास बक्षीसी मिळते तर कोणाच्या मागे सततची भटकंती लागते.
हाच तो 'भवाईये' शब्द. कशी दुष्ट आणि दुर्दैवी रिंग आहे या शब्दाला. भवाईये - भेलकांडत जगणे, भटकणे, भोवळ, अस्थिरता, बेघर. आपलं म्हणावं असं घर नाही. घर ही जागा नसते घर असते 'स्टेट ऑफ माईंड'. झोपेतून उठल्याउठल्या कोणी कपाळावरुन, केसांवरुन हात फिरवणे म्हणजे घर, घरी आल्यावर कोणी " काय गं, चार घास खाल्लेस का" विचारणे म्हणजे घर. आजारपणात हक्काने बोलावुन, कोणाला पाणी, औषध मागता येणे, गुरगुट्या भात कर म्हणता येणे म्हणजे घर. याउलट आपण गेलो उद्या लापता झालो तर मागे कोणालाही फरक पडणार नाही, कोणी आपला शोधही घेणार नाही - भवाईये.
चिनाबची आई चिनाबला सहज म्हणुन गेली होती. आठ तारीख ना बाळा तुझी. इंग्रजी आठ कसा असतो लक्ष देउन पहा. २ वर्तुळे जोडलेली - एक भौतिक तर एक अध्यात्मिक, लौकिक-पारलौकिक. तुझ एक वर्तुळ जेव्हा आक्रसेल दुसरं वाढेल. प्रत्येकाचच असं होतं पण ८ नंबरवाल्यांना जाणवतं, कळतं. लौकिकात मार खाशील तेव्हा अध्यात्मात वाढता परीघ राहील, प्र-ग-ती! तेव्हा चिनाबला ते बोलणे फार चमत्कारीक वाटलेले होते पण आज तिला अर्थ कळत होता. जेव्हा सतत मनाविरुद्ध होतं तेव्हा आपली सोसण्याची ताकद वाढते. जेव्हा कोणी साथीसंगी नसतो तेव्हा ईश्वरालाच साद घातली जाते. जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात तेव्हा समोरच्याला समजुन घेण्याची आपली क्षमता टोकदार बनते. आई हेच सांगत होती. आईने तिच्या 'आईपणातून' हे जाणलेले होते की या संकल्पनेची गरज चिनाबला पडू शकेल. तिची अन्य प्रतलावरती प्रगती होते आहे, हा दिलासा मिळण्यासाठी. काळ्याकुट्ट ढगाला चंदेरी किनार असते हेच तर आई सांगत नव्हती ना.
हुकमै अंदरि सभु को बाहरि हुकम न कोइ ॥
नानक हुकमै जे बुझै त हउमै कहै न कोइ ॥
त्याच्या हुकमाबाहेर कोणी नाही. ज्याला हे समजले त्याचे 'मी-मी' पण गळुन गेले.
चिनाबने डोळ्याच्या कडांवर आलेले पाणी आतल्या आत जिरवले. तिने निश्चय केला, गुरुद्वाराच्या किचन कामात , लंगरची सामुग्री आणण्यात व्हॉलंटिअर करायचे.शीख धर्माची काही मूल्ये आहेत पैकी एक अतिशय सराहनिय, प्रशंसनिय मूल्य आहे - 'सर्व्हिस इन ॲक्शन' अर्थात सेवाभाव. आपली अध्यात्मिक प्रगती आपणच साधायची. आणि जर वाहेगुरूची इच्छा असेल तर न जाणो कोणी स्पेशल व्यक्ती - फ्युचर एंम्प्लॉयर किंवा मित्र-सखा इथे आपल्याला भेटेल, ओळखी होतील. नवा जॉब मिळेल किंवा नवी मैत्री.
जप जी साहीब कानावर पडतच होते -
मति विचि रतन जवाहर माणिक जे इक गुर की सिख सुणी ॥
गुरा इक देहि बुझाई ॥
सभना जीआ का इकु दाता सो मै विसरि न जाई ॥
गुरुंची वाणी, बोल ज्याने ऐकले त्याला रत्न, माणिक, मोती स्वत:च्या मनातच गवसले. माझ्या गुरुंनी मल एक गोष्ट समजावली - सर्व जीवांचा प्रतिपाळ करणारा एकच दाता आहे - हे तू कदापि विसरु नकोस. त्याला तुझी काळजी आहे.
काहे रे मन चितवहि उदमु जा आहरि हरि जीउ परिआ ॥
सैल पथर महि जंत उपाए ता का रिजकु आगै करि धरिआ ॥
सिरि सिरि रिजकु स्मबाहे ठाकुरु काहे मन भउ करिआ ॥२॥
ऊडे ऊडि आवै सै कोसा तिसु पाछै बचरे छरिआ ॥
तिन कवणु खलावै कवणु चुगावै मन महि सिमरनु करिआ ॥३॥
सभि निधान दस असट सिधान ठाकुर कर तल धरिआ ॥
रे मना कशाला नानाविध उपद्व्याप करत बसतोस, तुझ्या योगक्षेमाची काळजी त्याला आहे, ज्याने दगड माती खाली रहाणार्या जीवजंतूंना आहार नेउन समोर ठेवला. ज्याने अष्टसिद्धी हातात आवळ्यासारख्या धरलेल्या आहेत, ज्या पक्ष्यांच्या पिल्लांचे आईवडील त्यांना सोडून उडुन गेलेले आहेत त्या पिलांना ज्याने चारापाण्याची सोय केलेली आहे तो तुला मोकलेल असे नाही.
घुमटाच्या काचेतून, नुकत्याच उगवलेल्या सुर्याची कोवळी तिरपी किरणे चिनाबच्या केसांवर पडत होती. तिला उमेद वाटू लागली होती.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात तेव्हा समोरच्याला समजुन घेण्याची आपली क्षमता टोकदार बनते.>>
अगदी खरंय.
छान... क्रमशः आहे का?
छान... क्रमशः आहे का?
छानच कथा. अमेरिकेतील गरीबीवर
छानच कथा. अमेरिकेतील गरीबीवर जर्मन टीव्ही ने डॉक्युमेंटरी बनवली आहे. ती माहितीपूर्ण आहे. अश्या लोकांना कॉन्सुलेट मध्ये विचारणा करून मायदेशी येता येते का?
जेव्हा आपल्याला वाईट अनुभव
जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात तेव्हा समोरच्याला समजुन घेण्याची आपली क्षमता टोकदार बनते.>>+१.
छानच लिहिलंय.
@ शर्मिला, अमा आणि देवकी -
@ शर्मिला, अमा आणि देवकी - धन्यवाद
@देवभु बाबा - कथा क्रमशः नाही.
>>>>>>>>>>अश्या लोकांना
>>>>>>>>>>अश्या लोकांना कॉन्सुलेट मध्ये विचारणा करून मायदेशी येता येते का?
रोचक मार्ग आहे. कॉन्सुलेटने मदत केली पाहीजे. मला माहीत नाही.
बाकी एम्प्लॉयर थ्रु आला असाल व १ महीना बेरोजगार राहीलात तर एम्प्लॉयरने तुम्हाला परत पाठवावे लागते. एम्प्लॉयरची जबाबदारी.
छान लिहीलेत.
छान लिहीलेत.
जेबॉ धन्स.
जेबॉ धन्स.
आवडली गं, गुर्बाणी ऐकली की
आवडली गं, गुर्बाणी ऐकली की डोळ्यात पाणी आणि रोमांच येतात. काही तरी शांत शांत वाटत जातं , तुझ्यामुळे याच्याशी पुन्हा कनेक्ट होता येत आहे , आज दिवसभर 'एक ओंकार सत्नाम, कर्ता पुरख निर्भौ निर्वैर' ऐकत होते. /\
अस्मिता धन्यवाद. मी रोज काही
अस्मिता धन्यवाद. मी रोज काही पाने सध्या तरी वाचते आहे. - http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani
<< कॉन्सुलेटने मदत केली
<< कॉन्सुलेटने मदत केली पाहीजे.>>
ते जरा कठीण आहे. तसे करायचे तर कुणिहि भारतातून उठून अमेरिकेत येइल नि चार दिवस मजा करून म्हणेल आता मला परत पाठवा!
माझ्या मते अमेरिकेत रहाणार्या भारतीयांनी, ज्यांना तिच्याबद्दल जास्त माहिती आहे, ती गैरफायदा घेणार्यातली नाही हे बघून तिला मदत करावी.
धन्यवाद नंद्या. ही केस माझ्या
धन्यवाद नंद्या. ही केस माझ्या पहाण्यातली आहे. आम्ही स्वतःच त्या काळात कोणाला मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हतो. पण आता तिची खूप आठवण येते. आता कॉन्टॅक्ट राहीलेला नाही. तिला बॉयफ्रेन्डहोता, ती प्रेग्नंट झाली होती. पुढे आम्हीच अन्य राज्यात गेलो. पण खूप आठवण येते मात्र. मदत करण्याची वेळ निघून गेली खरी.
अर्थात ती अनडॉक्युमेन्टेड होती हे सत्य आहे. कशी त्या परिस्थितीच्या विळख्यात अडकली हा कल्पनाविलास आहे. पण येस अशा केसेस आहेत.