बारह माह - चैत्र/वैशाख - (१)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 16:00

बारह माह / गुरु अर्जन दास - (०)

दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -

चेति गोविंदु अराधीऐ होवै अनंदु घणा ॥
संत जना मिलि पाईऐ रसना नामु भणा ॥
जिनि पाइआ प्रभु आपणा आए तिसहि गणा ॥
इकु खिनु तिसु बिनु जीवणा बिरथा जनमु जणा ॥
जलि थलि महीअलि पूरिआ रविआ विचि वणा ॥
सो प्रभु चिति न आवई कितड़ा दुखु गणा ॥
जिनी राविआ सो प्रभू तिंना भागु मणा ॥
हरि दरसन कंउ मनु लोचदा नानक पिआस मना ॥
चेति मिलाए सो प्रभू तिस कै पाइ लगा ॥२॥

चैत्र आला आहे आणि बरोबर वसंत ऋतु घेउनच. विविध फुले उमलली आहेत. अशा काळात जर आपण ईश्वराची आठवण ठेवली तर आनंद द्विगुणीतच होइल. परंतु हा आशीर्वाद फक्त पात्र लोकांनाच मिळाणार आहे, ज्यांनी गुरु केलेला आहे. ज्यांनी कोणी ईश्वराचे नामस्मरण करुन, आपल्या जीवनाचे सार्थक करुन घेतलेले आहे, त्यांनाच आनंद मिळू शकेल. अन्य लोक करंटे ज्यांनी मिळालेला मनुष्य जन्म वाया दवडला. जो ईश्वर जल-स्थळ-काष्ठ-पाषाण सार्‍यात निवास करुन असतो तोच जर आपल्या हृदयात वास करत नसेल तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. ज्या कोणाच्या मनात ईश्वर वसतो ते साक्षात्कारी लोक आहेत. अशा सर्वव्यापी ईश्वराला भेटण्याकरता, नानक अधीर आहेत, त्यांना तहान लागलेली आहे. जे कोणी मला ईश्वराची भेट घडवुन देतील त्यांच्या पायावरती मी खुषीने लोळण घेइन.
या पौरीमध्ये सत्संग व नामस्मरणाची महती गायलेली आहे.
------------------------------------------------------------------------------
तीसरी पौरी आहे वैशाख महीन्याबद्दल.

वैसाखि धीरनि किउ वाढीआ जिना प्रेम बिछोहु ॥
हरि साजनु पुरखु विसारि कै लगी माइआ धोहु ॥
पुत्र कलत्र न संगि धना हरि अविनासी ओहु ॥
पलचि पलचि सगली मुई झूठै धंधै मोहु ॥
इकसु हरि के नाम बिनु अगै लईअहि खोहि ॥
दयु विसारि विगुचणा प्रभ बिनु अवरु न कोइ ॥
प्रीतम चरणी जो लगे तिन की निरमल सोइ ॥
नानक की प्रभ बेनती प्रभ मिलहु परापति होइ ॥
वैसाखु सुहावा तां लगै जा संतु भेटै हरि सोइ ॥३॥

वैशाख त्याच्याबरोबर घेउन येतो त्या अपेक्षा, इच्छा. ज्या वधू, पतीपासून विरह पावलेल्या आहेत त्यांच्या हृदयाला कोठुन थंडक असणार! असे हे लोक जे ईश्वरास विन्मुख होउन, मायेच्या मागे धावत आहेत. धन, दारा, पुत्र, व्यवसाय काहीच आपल्याला शेवटपर्यंत सोबत करत नाही. फक्त सोबत असते ती आपल्या अंत:करणातील ईश्वराची. पण या वैशाखात सारेजण नश्वर मोहाच्या मागे लागलेले आहेत आणि अध्यात्मिक ऱ्हास होत आहे. मृत्युसमयी, नाम सोडता, बाकी गोळा केलेले काहीही बरोबर घेउन जाता येत नाही. मृत्युपश्चात सर्व जमवलेल्या भौतिक सुखांपैकी कशाचाही उपयोग नसतो. एक नाम सोडले तर अन्य काही बरोबर घेउन जाता येत नाही. माझी प्रार्थना आहे की मला एकदा तरी तुझ्या छबीचे, दर्शन व्हावे. अशा रीतीने, संतसज्जनांची संगत प्राप्त झाली तरच वैशाखातील सृष्टीचा आनंद प्राप्त होउ शकतो.

जेष्ठ (मे/ जून)
आषाढ (जून/जुलै)

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users