बारह माह / गुरु अर्जन दास - (०)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 15:58

शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते. प्रत्येक महीन्याचे नाव व वर्णन येत जाते व वाचकास मानसिक स्थित्यंतराची व कधी फळाफुलांचे उमलणे तर कधी धो धो वर्षा, कधी आभाळ भरुन आलेले तर कधी विजांचा कडकडाट, कधी बोचरे वारे तर कधी गुलाबी थंडी अशा ऋतुबदलाची सफर, या काव्यामधुन घडते. विक्रम संवत्सराच्या १२ महीन्यांच्या दिनदर्शिकेचे हे महीने घेतलेले आहेत. चैत्रापासून ते फाल्गुन मासापर्यंत. चैत्र ते माघ असे ११ महीने विरहावस्था आहे तर बाराव्या म्हणजे फाल्गुन महीन्यात मीलनाचे वर्णन आलेले आहे. एकूण ६ ऋतु आहेत - वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद, हेमंत आणि शिषीर. प्रत्येक ऋतुचे २ महीने असे १२ महीने.
चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)
जेष्ठ (मे/ जून)
आषाढ (जून/जुलै)
श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)
अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)
मार्गशीर्ष(नोव्हेम्बर/डिसेंबर)
पौष (डिसेंबर/जानेवारी)
माघ(जनेवारी/फेब्रुवारी)
फाल्गुन(फेब्रुवारी/मार्च)

----------------------------------------------------------------------------------

किरति करम के वीछुड़े करि किरपा मेलहु राम ॥
चारि कुंट दह दिस भ्रमे थकि आए प्रभ की साम ॥
धेनु दुधै ते बाहरी कितै न आवै काम ॥
जल बिनु साख कुमलावती उपजहि नाही दाम ॥
हरि नाह न मिलीऐ साजनै कत पाईऐ बिसराम ॥
जितु घरि हरि कंतु न प्रगटई भठि नगर से ग्राम ॥
स्रब सीगार त्मबोल रस सणु देही सभ खाम ॥
प्रभ सुआमी कंत विहूणीआ मीत सजण सभि जाम ॥
नानक की बेनंतीआ करि किरपा दीजै नामु ॥
हरि मेलहु सुआमी संगि प्रभ जिस का निहचल धाम ॥१॥

हे ईश्वरा, आमच्या स्वत:च्याच कर्मांमुळे, कृत्यांमुळे, आम्ही तुझ्यापासून दूर झालो. तू दयाळू म्हणवतोस, आम्हाला तुझी भेट घडव. या मायेच्या मोहाच्या जंजाळामध्ये आम्ही भटकत आहोत. आम्ही थकून आता तुला शरण आलेलो आहोत. ज्याप्रमाणे भाकड गाय दूध देत नाही. ज्या प्रमाणे पाणी न दिलेले शेत सुकते व त्यापासून कोणालाच धनलाभ होत नाही तद्वत, तुझ्या नामस्मरणाविना आमचे आयुष्य व्यर्थ गेलेले आहे. ज्या जीवाच्या हृदयामध्ये ईश्वर वास करत नाही, हृतकमलावरती ईश्वराची स्थापना झालेली नाही त्या जीवाला कोठुन शांती, शीतलता मिळणार? त्याच्याकरता कोणतेही गाव, कोणतेही धाम हे धगधगती भट्टीच आहे. पतीच नसेल तर सर्व दागिने, शृंगार, पान-वीडा सारे व्यर्थ आहे, पतीशिवाय अन्य सगेसोयरे हे शत्रूच आहेत. नानक हीच प्रार्थना सदैव करतात - तुझे नाम माझ्या सतत मुखात राहो. मला सदैव तुझ्या चरणांचा दास बनव. कारण अन्य सारे नश्वर आहे.
पूर्वसंस्कारांच्या परिणामांमुळे, जीव , ईश्वरास विसरतो. पंच इंद्रिये आणि सहावे मन यांच्यापासून निर्माण होणार्या आगीत पोळुन निघतो. आणि मिळालेले अनमोल आयुष्य व्यर्थ दवडतो.

क्रमशः

साभार - https://www.researchgate.net/publication/330839750_Quest_for_Ultimate_Tr...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेखमालिका. ह्याचे प्रवचन सीरीज व मध्ये गोड आवाजात गायलेली गाणी असे करून छान व्हिडीओ करता येइल व यु ट्युब वर टाकता येइल.

अक्षर नामा वर अश्याच पद्धतीच्या दर महिन्याच्या सुखां चे वि वेच न करणारे एक पुस्तक उपल ब्ध आहे त्याचा परिचय आहे. आपल्या इथले ॠ तू वेगळे पंजाबातले वेगळे.

पंजाबात धार्मिक लेखन पेक्षा मौखिक परंपरा जास्त स्ट्रॉन्ग आहे कारन शिक्षण कमी. त्यांना असे अभंग छान वाटत असतील.

जो बोले सो निहाल सत श्री अकाल.

धन्यवाद अमा Happy
>>>>पंजाबात धार्मिक लेखन पेक्षा मौखिक परंपरा जास्त स्ट्रॉन्ग आहे कारन शिक्षण कमी.
हां असू शकेल. छान माहीती!!
>>>>जो बोले सो निहाल सत श्री अकाल.
_/\_ ||वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह||

>>>>अक्षर नामा वर अश्याच पद्धतीच्या दर महिन्याच्या सुखां चे वि वेच न करणारे एक पुस्तक उपल ब्ध आहे त्याचा परिचय आहे. आपल्या इथले ॠ तू वेगळे पंजाबातले वेगळे.
प्लीज अमा लिंक आहे का? मी शोधले अक्षरनामा + नानक, अक्षरनामा + अर्जन वगैरे सर्चेस दिल्या पण मिळाले नाही.

_/\_
||वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह||
सगळं निवांत वाचणारे !

सुरेख!
ह्याचे प्रवचन सीरीज व मध्ये गोड आवाजात गायलेली गाणी असे करून छान व्हिडीओ करता येइल व यु ट्युब वर टाकता येइल.........मनावर घे सामो.चांगली कल्पना आहे.

Happy होय देवकी!
अस्मिता, स्वाती धन्यवाद.
-----------------------------------------------
खूप तोच तोचपणा आहे मात्र या बारह माह शिकवणुकीमध्ये. सत्संगती, गुरु, माया, दोष, नामस्मरण अर्थातच याच भोवती शिकवण फिरत रहाते.

उत्तर भारतात मान्सून आपल्यापेक्षा बराच नंतर पोहोचतो. त्यामुळे त्यांच्याकडचं ऋतू आणि महिन्यांचं समीकरण आपल्यापेक्षा वेगळं आहे.
इथल्या पाठ्यपुस्तकात बारा महिन्यांचं थोडक्यात वर्णन करणारी एक कविता होती. ती शोधायला बारह मासा गुगल केलं तर अशी आणखीही विरह गीते आहेत असं दिसलं.
हे एक
मलिक मुहम्मद जायसी म्हणजे पद्मावत या काव्याचे रचनाकार ना?

गदिमांनीही "जिवलगा कधी रे येशिल तू?" या गीतात ऋतूं आणि विरह आणले आहेत.

तुम्ही लिहिलेले दोन भाग वाचले. खूपच लहान आहेत. एकाच भागात सगळं लिहिता आलं असतं.

अन्य भाषांतील काव्य समजून घ्यायची तुमची असोशी कौतुकास्पद आहे.

एका मायबोली - हितगुज दिवाळी अंकात अशा अन्य भाषक कवींचा परिचय करून देणारे दोन लेख आहेत. ते वाचून पहा. त्यातला एक पंजाबीच आहे. तुम्हांला आवडावेत.

धन्यवाद भरत. हितगुज दिवाळी अंकातील लेख, वाचते.
https://vishesh.maayboli.com/index.php?q=diwali-2014/1570
https://vishesh.maayboli.com/index.php?q=diwali-2014/1577

तुम्ही दिलेली लिंक ऑफिसातून बॅनड आहे. घरी गेल्यानंतर नक्कीच वाचायची आहे.

अरे वा! लगेच शोधलंत. शिवकुमार बटाल वीवरचा लेख मला आवडला होता. तेव्हा त्याच्या कविता गुगल करून वाचल्या , ऐकल्या होत्या.

बारा माह आणि त्यातील विरह-मिलन / जुदाई-विसाल ही कन्सेप्टच फ़ार सुंदर वाटली. तुम्ही ती समजून घेण्याचे आणि समजावून देण्याचे स्पृहणीय काम केले आहे. काही भाग वाचले, उरलेले लवकरच!

जय हो !

>>>>>>>>शिवकुमार बटाल वीवरचा लेख मला आवडला होता

होय भरत काय लेख आहे तो.
https://www.youtube.com/watch?v=jfA6gqz-l2I

हे ऐका. हे गाणे त्या लेखात सापडले. कितीदा ऐकते आहे. ऑन रीपीट मोड.
-------------------------------
अनिंद्य खूप आभार.

https://www.youtube.com/watch?v=80RRBQcRzEI
या गाण्यातही सुहागन हा शब्द येतो. या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगीतलेला आहे - जिला प्रेमाची प्राप्ती झालेली आहे अशी आत्मारुपी वधू (soul bride).
नानक विचारतात 'जा कोण्या सुहागनला विचारा इतकी सुंदर तू कशी बनलीस? तुझ्या गालांवरती इतक्या सुंदर लाल रंगाची उधळण कशी झाली?
गाण्याच्या शेवटी गुरु अर्जनसिंग सांगतात - Beauty is not what you do. Beauty is what grace does to you.

ह्या प्रतिसादांवरून ह्या आशयाशी मिळताजुळता माबोवरील कबीरांच्या निर्गुणी भजनावरील माझा आवडता लेख देत आहे.
चैतन्य दीक्षित यांचा 'रमैया की दुलहिन'