दामिनी : सायबर गुप्तहेर

Submitted by Kavita Datar on 26 October, 2021 - 06:41

दामिनी : सायबर गुप्तहेर

सकाळची कामं आटोपल्यावर मयुरीने मोबाइल वर फेसबूक उघडले. रीतेशची फ्रेंड रिक्वेस्ट होती. लगेच तिने Confirm बटन दाबून रिक्वेस्ट accept केली आणि उत्सुकतेने रीतेशचे प्रोफाइल पाहू लागली. फोटोत दिसणारा, आलिशान बंगल्यासमोर, होंडा सिटी कार सोबत उभा असलेला रीतेश पाहून तिच्या काळजात कळ उठली. दहा वर्षांपूर्वी चे दिवस तिला आठवले. नाशिक मधील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएससी च्या शेवटच्या वर्षात शिकणारी मयुरी, आपल्या सौंदर्य आणि हुशारीमुळे बऱ्याच मुलांची ड्रीम गर्ल होती. त्यातीलच एक होता रीतेश.

मयुरी ला देखील रितेश खूप आवडायचा. पण बीएससी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी रितेश पुण्याला निघून गेला आणि तिचा त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर दोन वर्षांनी मयुरीचे लग्न होऊन ती मुंबईत आली. मुंबईतील एका नामांकित कंपनीत मयुरी चा नवरा फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होता. त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती आणि त्यांना इरा नावाची एक पाच वर्षांची गोंडस मुलगी होती. दुपारी फावल्या वेळात मयुरी आसपासच्या आठ-दहा मुलांची ट्युशन घेत असे. मयुरी तिच्या संसारात सुखी होती. पण म्हणतात ना, पहिलं प्रेम सहजासहजी विसरलं जात नाही. तसंच तिचं रितेशच्या बाबतीत झालं होतं. म्हणूनच आज त्याची फ्रेंड रिक्वेस्ट तिने लगेचच एक्सेप्ट केली.

त्याच्या आकर्षक फेसबुक प्रोफाईल वरून आणि त्यावरील त्याने टाकलेल्या फोटोंवरून रितेशच्या आर्थिक सुबत्तेचा सहज अंदाज येत होता. फेसबुक वरील त्याच्या आलिशान घराचे, उंची कपडे घातलेल्या बायको आणि मुलाचे, त्यांच्या युरोप टूर दरम्यानचे फोटो मयुरी पाहतच होती तेवढ्यात रितेश चा मेसेज आला,

"हाय मयुरी ! कशी आहेस ? मुंबईत कुठे रहातेस ?"
"हाय रितेश ! मी मजेत आहे. दादर इस्ट ला राहते. तू कुठे असतोस? काय करतोस ?"
"मी पुण्यात आहे. माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी आहे."

रितेश सोबतच्या गप्पांत मयुरीचा अर्धा-पाऊण तास मजेत गेला. रोज सकाळची कामं संपल्यावर त्याच्यासोबत चॅटिंग करणं, तिचा परिपाठ झाला. एकदा चॅटिंग करताना त्याने तिला विचारलं,
"तु कधी शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत का ?" "नाही. अजून तरी नाही." मयुरी ने उत्तर दिले.
"मी गेली पाच वर्षे शेअर्समध्ये गुंतवणूक करतोय. पाच हजार रुपयां पासून सुरुवात केली होती. आज माझ्या जवळील शेअर्स ची मार्केट व्हॅल्यू दीड कोटी आहे."
रितेश ने असे सांगताच मयुरी चे डोळे विस्फारले.
"तुला शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत का ? मी तुला गाईड करू शकतो."

मयुरी ने थोडा विचार केला. रितेश इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट आणि तिचा जुना मित्र असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, असे तिला वाटले.
"सुरुवातीला किती पैसे गुंतवावे लागतील ?"
"माझ्याजवळ एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ॲप आहे. मी त्याची लिंक तुला पाठवतो. ते मोबाईल वर इन्स्टॉल कर. ॲप मध्ये काही पैसे डिपॉझिट केल्यावर ते पैसे योग्य त्या शेअर्स मध्ये ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट केले जातात. त्यात पहिल्यांदा एक हजार रुपये डिपॉझिट कर. दोन तीन दिवसांनी त्यांची व्हॅल्यू चेक कर. ते नक्कीच वाढलेले असतील. नंतर तुला वाटलं तर तू अजून डिलिंग करू शकतेस."

पाठोपाठ फेसबूक मेसेंजर मध्ये स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ॲपची लिंक रितेशने मयुरीला पाठवली. मयुरी ने विचार केला, ॲप इन्स्टॉल करून थोडे पैसे डिपॉझिट करून पाहू, वाढले तर अजून डिपॉझिट करू,नाहीतर ॲप काढून टाकू. त्याप्रमाणे ॲप इन्स्टॉल करून तिने आपल्या बँक अकाउंटला लिंक केले आणि सुरुवातीला पाचशे रुपये ॲप मध्ये डिपॉझिट केले.

दोन दिवसांनी ॲप उघडून पाहिल्यावर मयुरीला दिसले, तिच्या पाचशे रुपयांच्या शेअर्स ची किंमत बाराशे रुपये झाली आहे. तिला फार आनंद झाला. तिने अजून दोन हजार रुपये ॲप मध्ये डिपॉझिट केले. दोन-तीन दिवसांनी त्याचे देखील पाच हजार रुपये झाले. मग मयुरी ने एकदम दहा हजार रुपये गुंतवले. पाचच दिवसात त्या दहा हजारांचे सत्तर हजार झाले.

उत्साहात येऊन मयुरी ने चार महिन्यांपूर्वीच केलेली एफ डी मोडून पाच लाख रुपये त्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये डिपॉझिट केले. ते पैसे वेगवेगळ्या, योग्य त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट झाल्याचा मेसेज अॅपकडून तिच्या मोबाईलवर आला. आठवडाभरातच त्याचे चक्क साडेसात लाख रुपये झालेले दिसले. आता ॲपवर एकूण आठ लाख सव्वीस हजार दोनशे बॅलन्स दिसत होता.

मयुरी ने सगळे पैसे आपल्या बँक अकाउंट ला ट्रान्सफर करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तिने अॅपमधील ट्रान्सफर टू बँक अकाउंट हे ऑप्शन सिलेक्ट केले. पण.....काही परिणाम झाला नाही. तिचे पैसे तिच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर झाले नाही. तिने दोन-तीनदा आणखी प्रयत्न केला. पण..... ते ॲप ब्लॉक झाले.

मयुरी ने रितेश ला काॅल करण्याचा प्रयत्न केला, पण 'हा नंबर बंद आहे ' असाच मेसेज वारंवार येत राहीला.
तिने मेसेंजर वर जाऊन देखील त्याला मेसेज टाकला. पण बराच वेळ झाला तरी त्याच्याकडून कुठलाही रिप्लाय आला नाही.

मयुरीच्या तोंडचे पाणी पळाले. कारण ही सगळी गुंतवणूक तिने महेशला, तिच्या नवऱ्याला न विचारता केली होती. तिच्या अकाऊंट मध्ये आता जेमतेम पाचशे रुपये उरले होते. तिचे पाच लाख बारा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे मोठेच नुकसान होते.

**********

सायबर गुप्तहेर दामिनी तिच्या आॅफिसमध्ये लॅपटॉप समोर बसली होती. सायबर स्टॅकिंग च्या एका हाय प्रोफाईल केस वर सध्या ती काम करत होती. कांचना राणावत नावाच्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला इमेलवर आणि व्हाट्सअप वर जीवे मारण्याच्या कोणीतरी वारंवार धमक्या देत होतं. कांचना ने दामिनीला भलीमोठी फी देऊन हे सर्व कोण करत आहे हे शोधून काढायला सांगितलं होतं.

दामिनी पंडित....तिने बेंगलोर आयआयटीमधून कम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक झाल्यावर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या नाकारून, स्वतःची सायबर सिक्युरिटी फर्म उभी केली होती. आज ती मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सायबर गुप्तहेर म्हणून गणली जात होती. खरंतर हेरगिरीचे बाळकडू प्रथमपासूनच तिला मिळालं होतं. तिची आई राधा पंडित महाराष्ट्रातील पहिली स्त्री गुप्तहेर होती. तिच्या पूर्वजांनी सतराव्या शतकात शिवाजी महाराजांसाठी यशस्वी हेरगिरी केली होती. दामिनी ची बहिण यामिनी ही भारतीय गुप्तचर संस्था राॅ मध्ये गुप्तहेर म्हणून कार्यरत होती.

दामिनी कामात बुडालेली असताना तिचा फोन वाजला फोन वरील स्त्री चिंतित वाटत होती.

"हॅलो....मी मयुरी पाटील बोलतेय. जस्ट डायल वरून तुमचा नंबर मिळाला...."
" बोला मॅडम मी तुमची काय मदत करू शकते ?"
मयुरी ने सर्व घटना दामिनीला सांगितली आणि ही केस लवकरात लवकर सोडवण्यासाठी विनंती केली. खरंतर दामिनीला नव्या केसेस साठी अजिबात वेळ नव्हता. पण मयुरीच्या बोलण्यातील आर्जव आणि केसमधील चॅलेंज पाहून तिने केस सॉल्व करायचे ठरवले.

" मॅडम तुम्ही जो मोबाईल वापरून चाट करत होतात आणि ज्यावर तुम्ही ते ॲप इन्स्टॉल केलं आहे, तो घेऊन ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकाल का?"
" हो...एक तासाभरात पोहोचते."
" त्या अगोदर रितेश च्या फेसबुक प्रोफाईल ची लिंक आणि त्याने दिलेला मोबाईल नंबर मला पाठवा मी माझे काम सुरु करते."

मयुरी ने पाठवलेली रितेशच्या फेसबुक प्रोफाईल ची लिंक
दामिनी ने उघडली आणि बारकाईने तपासली. प्रोफाइल रितेश पवार या व्यक्तीचेच वाटत होते. पण प्रोफाइल च्या वॉल वर गेल्या दोन वर्षांपासून कुठलाही मेसेज नव्हता. ही बाब दामिनीला खटकली, म्हणून तिने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर आधारित ओपन सोर्स इंटेलिजन्स टूल वापरून रितेश पवार या व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या टूल द्वारे एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण डेटा मिळवता येऊ शकतो. त्यावरून एक धक्कादायक सत्य समोर आले. रितेश पवार याचा दोन वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला होता. पेपर मधील या बातमीची लिंक दामिनी च्या समोर होती.

फेसबूक अकाउंट रितेश पवारचेच होते पण हे अकाउंट कोणीतरी हॅक करून स्वतःला रितेश असल्याचे भासवत होते. आता हे अकाउंट ऑपरेट करणारे कोण होते ? हे शोधून काढायला हवे होते. त्यासाठी ती व्यक्ती ऑनलाईन येणे गरजेचे होते.

तासा-दीड तासात मयूरी दामिनीच्या ऑफिसला पोहोचली. दामिनीने तिला रितेशच्या मृत्यूची बातमी दाखवताच तिला जोरदार धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरायला तिला वेळ लागला. दामिनीने तिचा मोबाईल लॅपटॉप ला कनेक्ट करून त्यावरील स्मार्ट इन्व्हेस्टमेंट अॅप तपासले. ते ॲप बँक अकाउंट ला लिंक होऊ शकत असले तरी ते एक पूर्णपणे नकली, फेक ॲप होते. शेअर मार्केटशी त्याचा कुठलाही संबंध नव्हता. त्याच्यात दिसत असणारे आकडे देखील आभासी होते. नीट तपासल्यावर दामिनीच्या लक्षात आले, की ॲपच्या द्वारे हॉंगकॉंग च्या एका बँक मध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते.

"रितेश पवार चे अकाउंट हॅक करून स्वतःला रितेश भासवून तुमची फसवणूक करणारी व्यक्ती कोण आहे ? हे आता आपल्याला शोधून काढायला हवे." दामिनीने म्हटले, "त्यासाठी तुम्ही त्याला माझ्या लॅपटॉप वरून मेसेज करून बघा. तो ऑनलाइन येणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा आयपी एड्रेस आपण मिळवू शकतो."

मयुरी ने दामिनीच्या लॅपटॉप वर तिचे फेसबुक अकाउंट लॉगिन करून रितेश ला मेसेज पाठवला, "हाय रितेश ! तू पाठवलेले ॲप फॅन्टॅस्टिक आहे. मला अजून काही पैसे गुंतवायचे आहेत, पण ॲप सध्या काम करत नाहीये. तु त्याची लिंक परत एकदा पाठवशील का?"

त्यांना फार वेळ वाट पहावी लागली नाही. तीन-चार मिनिटातच रितेशच्या अकाउंट वरून मयुरीच्या मेसेजला उत्तर आले, "किती पैसे गुंतवणार आहेस ? ॲप ची लिंक पाठवत आहे." त्यासोबत ॲपची लिंक होती.

दामिनीने लॅपटॉप वरील इतर सगळ्या विंडोज बंद करून कमांड प्रॉम्प्ट वर netstat कमांड दिली आणि आय पी ऍड्रेस मिळवला. नंतर फेसबुकला एक रिक्वेस्ट ई-मेल पाठवून या आयपी ॲड्रेस वरून लॉगिन होणाऱ्या युजर ची माहिती देण्याची विनंती केली.

नकली रितेशने दिलेला मोबाईल नंबर कोणाच्या नावे अस्तित्वात आहे, हे तपासल्यावर तो मोबाईल रितेश च्या नावांवरच असल्याचे कळले. याचा अर्थ फसवणूक करणारी व्यक्ती ही रितेशला आणि मयुरीला नक्कीच ओळखणारी असली पाहिजे. रितेशचे आयडी प्रूफ आणि फेसबुक अकाउंट पासवर्ड ही त्याला माहीत असले पाहिजे. आयडी प्रूफ द्वारे त्याने तो मोबाईल नंबर मिळवला असावा.

"उद्यापर्यंत फेसबुक कडून उत्तर येणे अपेक्षित आहे. मगच या सायबर गुन्हेगाराचा पत्ता लागेल."
दामिनीने मयुरीला सांगितले.
"पण ....मला माझे पैसे परत मिळतील का ?"
"मॅडम, पैसे हॉंगकॉंग च्या बँकेत ट्रान्सफर झाले आहेत. त्यामुळे थोडं कठीण दिसतंय. पण या गुन्हेगाराचा माग लागल्यावर काय ते कळेल."

दामिनी चा फोन आल्यावर उद्या परत यायचे ठरवून मयुरी तिथून निघाली.

दुसऱ्या दिवशी मयुरी दामिनीच्या ऑफिसमध्ये तिच्यासमोर बसली होती. दामिनीने दिलेल्या आयपी ॲड्रेस वरून लॉगिन होणाऱ्या व्यक्तीचे डिटेल्स फेसबुकच्या सपोर्ट सेंटर ने पाठवले होते. ही व्यक्ती रितेशच्या अकाऊंट सोबतच अजून एका अकाउंट वरून लाॅगिन झालेली दिसत होती. ते फेसबूक अकाउंट दीपक चौधरी नावाच्या व्यक्तीचे होते. मयुरीला ते नाव आणि प्रोफाईल पाहून दुसरा धक्का बसला. दीपक सुद्धा कॉलेजला तिच्यासोबत होता आणि रितेशचा जवळचा मित्र होता. अभ्यासात फारसा हुशार नसलेला दीपक नसते उपद्व्याप करण्यात मात्र पुढे होता. पण त्याने एवढी मोठी फसवणूक केली याचे मयुरीला आश्चर्य वाटत होते.

दामिनीने सांगितल्याप्रमाणे मयुरी ने दीपक विरुद्ध सायबर सेल ला कंप्लेंट रजिस्टर केली. दिपक पकडला गेला. त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि गजाआड झाला. मयुरीचे आणि त्याने फसवलेल्या आणखी काही लोकांचे पैसे देखील परत मिळाले.

(विस्तार स्वातंत्र्य घेऊन लिहिलेली सत्यघटना. पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत.)

©कविता दातार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सावधगिरी बाळगावी अशीच घटना. हल्ली नकली बँक अँप द्वारे सुद्धा अशी बऱ्याच जणांची फसवणूक सुरू आहे. छान कथा.

सावधगिरी बाळगावी अशीच घटना. हल्ली नकली बँक अँप द्वारे सुद्धा अशी बऱ्याच जणांची फसवणूक सुरू आहे. छान कथा.

कविता दातार- तुमच्या कथा/ लेख या नेहेमीच लोकांना सावध करतात.

पैसे असे सहजगत्या वाढत नसतात, तसे ते वाढत असल्यास जरुर शंका घ्यावी. जुन्या काळात अगदी कमी वेळांत पैसे दुप्पट करुन देणारे असायचे, दोन चारशे रुपयांची जुजबी रक्कम दुप्पट झाल्यावर विश्वास संपादन केल्या जायचा आणि मग मोठ्या रकमेच्या लोभाने, मोठी गुंतवणूक आणि म्हणून मोठी फसवणूक झाल्याच्या घटना घडायच्या.

नवे डिजिटल तंत्रज्ञान आले आणि त्या पाठोपाठ नव्या कल्पना आल्या पण कमी वेळांत / श्रमांत जास्त पैसे मिळविण्याचे आकर्षण/ लोभ आजच्या डिजिटल जगांतही कायम आहे.

छान लिहीता. ह्या कथेचा शेवट चांगला आहे. नाहीतर प्रत्यक्षात अनेकवेळा लोकांना पैसे गेलेच असे अनुभव येतात.

असे डिटेक्टिव्हज आहेत का माहितीत? साधारण फीस किती आकारतात. तुमच्या कथा मला आवडतात. वाचताना खूप विचार येतात.
हे एक चांगले करीयर आहे. अशा लोकांची गरज पडणार आहे.
सायबर सेलला फेऱ्या मारून काही होत नाही. स्वानुभव आहे. ठराविक केसेस मधेच ते फेसबुक, गुगल कडे पाठपुरावा करतात.

कथा आवडली.

पण कॉलेजमधला एखादा मित्र मरण पावला हे दोन वर्ष झाली तरी कथानायिकेला कळले नव्हते हे पटले नाही. तसेच एकदा मोठे घबाड मिळाले तर ही फसवणूक करणारी माणसे परत त्या व्यक्तीशी काहीच संबंध ठेवत नाहीत. पुढे त्यांच्यासाठी ट्रॅप लावलेला असू शकतो हे त्यांना माहित असते.

योगी ९०० सहमत

असे गुन्हे दुस-याचा संगणक हॅक करून करतात त्यामुळे IP address सभ्य माणसाचा मिळतो.

सायबर चोर virtual network वापरतात... त्यामुळे त्यांचा IP एवढा सहज मिळतो का?

<< असे गुन्हे दुस-याचा संगणक हॅक करून करतात त्यामुळे IP address सभ्य माणसाचा मिळतो.
सायबर चोर virtual network वापरतात... त्यामुळे त्यांचा IP एवढा सहज मिळतो का? >>

----- तांत्रिक बाबत ( IP address, V-net) लेखांत त्रुटी असतील पण त्याकडे खूप लक्ष न देण्याबद्दल त्यांनी त्यांच्या एका बाफवर सांगितले आहे. आर्थिक वा अन्य प्रकारची फसवणूक या बद्दल लोकांना सतर्क / सावध करणे हा मुख्य उद्देश आहे.

आयपी अड्रेस इतक्या सहज मिळत नाही. त्याऐवजी फेसबुक ला पोलीस मागणी करू शकतात एखाद्या अकाउंट ची माहिती देण्याबद्दल.