आप मुझे अच्छे लगने लगे.
इसवी सन २००२.
हृतिक= रोहित, अमिषा= सपना,
किरण कुमार= ढोलकिया (सिनियर),
मुकेश तिवारी= रमन ढोलकिया (ज्युनिअर),
निशिगंधा वाड= सपनाची भाभी,
आलोकनाथ= रोहितचा बाप.
सपनाचा बाप ढोलकिया (सिनियर) हा शहरातला मोठा डॉन. रमन ऊर्फ ज्युनिअर ढोलकिया हा सपनाचा भाऊ असून तोही गॅंगस्टर किंवा तत्सम डॉन.
साधारण सुरूवात अशी की सिनीयर ढोलकिया
अंबामातेसमोर भजन करतो आहे, तेवढ्यात त्याचा एक ॲसिस्टंट येऊन सांगतो की 'प्रकाशचा मर्डर झालाss'
शहरातील कालिया नावाच्या दुसऱ्या एका गॅंगच्या सदस्यांनी प्रकाशचा मर्डर केला असावा निष्कर्ष निघतो.
कारण रमन ढोलकिया किंचाळताना दिसतो की प्रकाशचा मर्डर कालियाने केला असून त्यासंबंधीचे डिटेल्स मला
ताबडतोब द्या.
परंतु सिनियर ढोलकिया ॲसिस्टंटला म्हणतो की पोलिस कमिशनरला फोन लाव, म्हणजे प्रकाशची बॉडी आपल्याला मिळेल.
हे ऐकताच तो माठ ॲसिस्टंट, काहीतरी तांत्रिक अडचणी सांगत टोलवाटोलवी करायला लागतो की बॉडी ताब्यात घेणं ही फारच किचकट प्रोसीजर वगैरे आहे.
यावर सिनीयर ढोलकिया म्हणतो की प्रकाशशी माझं
भावनिक अंगाने फारच जवळचं नातं असल्यामुळे त्याची बॉडी ताब्यात घेणं, हे मला तरी बुवा फारच महत्त्वाचं वाटतं.
तेवढ्यात आरतीचं ताट वगैरे घेऊन सपनाची एंट्री.
सपनाचा बाप मोठा गॅंगस्टर असला तरी सपना ही गरीब गाय आहे आणि तिचे काळीजही फारच हरिणीचे आहे.
ह्या प्रकाश नामक इसमाचा खून झाल्याचं सपनाच्या
कानावर पडतं आणि ती ताट फेकून पळत सुटते आणि
शेवटी अचूकपणे निशिगंधा भाभीच्या मायाळू गळ्यात
पडून हंबरडे फोडायला लागते.
पुढचा सीन:
मग रमन ढोलकिया बदला घेण्याच्या मोहिमेवर.
अंधारात एका घरापाशी गाडी थांबवतो. खुन्याला घराबाहेर बोलावण्यासाठी रमनकडे सोपी आयडिया आहे, गाडीतली म्युझिक सिस्टिम चालू करणे. खुनी वाटच बघत असल्यामुळे लगेचच घराचा दरवाजा उघडून दारातूनच विचारतो की
कुणाची हिंमत झाली की माझ्या दारात येऊन असे लाऊड
म्युझिक लावतो वगैरे.
ह्यावर रमन ढोलकिया म्युझिकचा आवाज आणखी वाढवतो. खुन्याला संगीत सहन होत नाही. तो गाडीजवळ खिडकीतून डोके आत घालतो आणि हा मौका अचूक साधून रमन
ढोलकिया खुन्याला गाडीसोबत फरफटत नेऊन मारतो.
इथे खुन्याच्या पाचपट आवाजात रमन ढोलकियाच
किंचाळायला लागतो. इथे पाहा
ह्या रमन मनुष्याचा एक प्रॉब्लेम आहे.
त्याला साधे साधे संवादही शांतपणे म्हणता येत नाहीत.
म्हणजे कधीकधी सुरूवात शांतपणे होते पण अचानक
कुठल्यातरी अज्ञात क्षणी त्याच्याकडून किंचाळणे आणि
हातवारे आदी क्रिया आपोआपच व्हायला लागतात.
निशिगंधाभाभीला मात्र नवऱ्याच्या किंचाळण्याचा काहीच त्रास होत नाही..! सवय असणार..! दुसरं काय..!
त्यापुढचा सीन :
प्रकाशची बायको ढोलकीयाच्या घरी येऊन रडारड करते की, कुठं गेला माजा प्रकाssश? सकाळी भेटला तवा तर
चांगला होता कीss असा कसा मला सोडून गेला ओss माजा प्रकाश वगैरे वगैरे भावनांचा उद्रेक. आकांत. स्फोट. इत्यादी.
हे ऐकून सपना आणखी एकदा निशिगंधाभाभीच्या गळ्यात पडून हमसायला लागते की, 'माझे बाप-भाऊ फारच
हिंसाचारी आहेत. हे दुष्ट लोक मलाही घराबाहेर
कुठे जाऊ देत नाहीत. हे असं कधीपर्यंत चालणार?
मला तर बाई ही छळवणूक आता सहनच होत नाही.'
निशिगंधाभाभी म्हणते की 'अगं वेडे.. तुझ्या एवढंही कसं लक्षात येत नाही?... दोन वर्षे झाली तुला आता इंडस्ट्रीत येऊन..! इथं आपल्या हातात काय आहे..!
डायरेक्टरनं सांगितलं तसं करत रहायचं.. आता उगीच
रडू बिडू नको बाई.. थोड्या वेळाने तुझी सुटका
करण्यासाठी एखादा राजकुमार येईल...
तोपर्यंत कळ काढ..!'
पुढच्या सीनमध्ये राजकुमार रोहित.
रोहितचे पिळदार स्नायू वगैरे दिसावेत या एकाच उद्देशाने तब्बल पाच मिनिटे वेगवेगळ्या ॲंगल्सने दाखवली गेलेली एक फुटबॉलची मॅच.
रोहित हा कॉलेजकुमार असल्यामुळे एकटा कसा असणार? म्हणून चार मित्र.
काहीही कारण नसताना हे सगळे मिळून नाचतात.
इकडे सपना मैत्रीणीकडे निघालेली असताना दुष्मन टोळीचे सभासद तिच्या गाडीवर गोळीबार करतात.
नाचून झालेला रोहित नेमका घटनास्थळावरून जात असतो.
गोळीबार सुरू आहे. दुष्मनांची संख्या जास्त आहे. रोहितला काहीच अडचण नाही. तो त्याच्या दुचाकीची पेट्रोलची नळी खुली करतो आणि वेगाने घसरणारी दुचाकी दुष्मनांवर
सोडून देतो. घसरत जाणारी दुचाकी बॉंबमध्ये रूपांतरित
होतेय. त्यातून स्फोट होतोय. आणि मग दुष्मन उताणे
पडतायत. सगळं स्मूथ. काहीच अडचण नाही.
इथे पाहा
इकडे रोहितला प्रेमाचा दंश होतो. तो मुग्ध होतो आणि पुन्हा एकदा नाचायला लागतो.
तिकडे सपनाला प्रेमाचा दंश होतो. तिला मुग्ध वगैरे होणे
झेपणारे नाही. ती उसासे टाकायला लागते.
आनंद दु:ख संताप आश्चर्य लज्जा अशा विविध भावनांना वाट खुली करून देण्यासाठी जोरजोराने धापा टाकणे, हे एकच माध्यम सपनाकडे आहे.
रोहित घरी जातो. आलोकनाथ मिठी मारून पोराचे स्वागत करतो. आलोकनाथ टुकार जोक मारतो. रोहितला हसावं
लागतं.
रोहित जायला निघतो.
त्याची माऊली त्याला होस्टेलमध्ये खाण्यासाठी बेसनाचे लाडू, लोणचे, मध वगैरे भरून देते.
आलोकनाथ म्हणतो की मी तुझा बाप असल्यामुळे आणि मी तुला गोदमध्ये वगैरे खेळवलं असल्यामुळे तुझ्या मनात
काहीतरी प्रेमरूपी खळबळ चाललीय हे मला लगेच समजले आहे. तुला समजून घ्यायला मला शब्दांची काहीच गरज नाही. त्यामुळे तू मला सांग की त्या मुलीचे नाव काय आहे वगैरे.
रोहित लाजत मुरकत सांगतो की सपना वगैरे.
मग आलोकनाथ रोहितच्या फुग्यात आणखी हवा भरत सल्ला देतो की प्रेमात कितीही अडचणी आल्या तरीही प्रेम हे दैवी असल्यामुळे अंतिमतः तूच जिंकशील.
त्यामुळे तू प्रेमाच्या मैदानात बिनधास्त उडी मार. इथे पाहा
ह्याचा दृश्य परिणाम म्हणजे रोहित दांडीया खेळत सपनाच्या घरी. त्याच सुमारास नेमका नवरात्रीचा उत्सव आल्यामुळे हा योग जुळून आला. काहीच अडचण नाही.
ह्या सीनसाठी डायरेक्टरने खूप साऱ्या बायका आणि माणसे धरून आणले आहेत आणि त्या सर्वांना सगळीकडे हसऱ्या चेहऱ्याने वावरत फिरण्याची सूचना दिलेली आहे.. त्यांचाही काही इलाज नाही. पोटासाठी करावं लागतं.
सपना रोहितची ढोलकियाशी ओळख करून देते की ह्याने माझा जीव वाचवला वगैरे. रोहित लगेच ढोलकियाला काही टुकार जोक्स सांगून वातावरण कंटाळवाणं करतो.
तरीही ढोलकिया लगेच हसत हसत 'कमाल का लडका है' वगैरे अभिप्राय व्यक्त करू लागतो...!
आलोकनाथने असे टुकार जोक्स सांगत सांगतच रोहितला लहानाचा मोठा वगैरे केलेला असल्यामुळे रोहितकडे अशा जोक्सचा कोटा अपरंपार आहे. बापकमाई..!
इथे सपना रोहितकडे बघत लाजणे किंवा घायाळ
झाल्यासारखे बघणे प्लस उसासे टाकणे, ह्या गोष्टी तिला जमेल तशा पद्धतीने करते आहे.
रोहितच्या मित्रांचा बॅंड वगैरे असणे. त्यामुळे नवरात्रीत नऊ दिवस ढोलकियाच्या घरी रोहितचे येणे जाणे..
रोहितचे सपनाला म्हणणे की मी तुला ह्या पिंजऱ्यातून बाहेर उडायला शिकवेन वगैरे.
आणि लगेच तिला घेऊन रोहितचे स्वतःच्या घरी जाणे.
रोहितच्या आईला आणि आलोकनाथला, घरात धूर किंवा अंधार करून, मेणबत्त्या घेऊन फिरायची सवय आहे.
सपनाला बघताच रोहितची मायमाऊली आलोकनाथला
म्हणते की 'अहो ऐकलंत का.. बघा आज माझ्या घरात
कायमचा उजेड आलाय.!'
मग सपना आलोकनाथच्या पाया वगैरे पडायला लागते,
तेवढ्यात आलोकनाथ म्हणतो की, 'अगं वेडे पाया वगैरे पडू नकोस. आमच्या घरी मिठ्या मारायची पद्धत आहे.'
मग रोहितची माऊली सपनाला बांगड्या वगैरे घालते आणि म्हणते की, 'आता माझी जबाबदारी संपली गं बाई..!' इथे पाहा
सपना निशिगंधाभाभीच्याच गळ्यात शेवटी किती वेळा
पडणार..! कंटाळली असणार..! आणि आता तिला हा नवीन खांदा मिळालाय. ती चान्स सोडत नाही. लगेच भावी
सासूच्या गळ्यात पडून हंबरते की, 'आप मेरी माँ हो..!' वगैरे.
धन्य ती सासू..! साधू! साधू! साधू!
इथे आलोकनाथ आता काय करावं, कोणती रिअक्शन चेहऱ्यावर दाखवावी या कन्फ्युजनमध्ये असतानाच त्यांना जे जमतं तेच करतात..! म्हणजे गदगद व्हायला लागतात..!
बापाचं पाहून रोहितही गदगद होतो.
आपला दिवटा अजून शिकतो आहे. कामाधंद्याचा कशाचा कशाला पत्ता नाही. ही कोण मुलगी घरी घेऊन आला आहे माहित नाही. तरीही सगळे गदगद होतात. हे थोर आहे.
(आमच्या गावातले टणक म्हातारे किमान दोन-तीन
पिढ्यांचा पदर जुळतोय ह्याची खात्री करून घेतल्याशिवाय टिळा-सुपारी वगैरेसारख्या प्राथमिक गोष्टीचंही
नाव काढू देत नाहीत.
परंतु इथे हे आई-बाप एका वेगळ्याच टॅंजंटवरून दुनियेचा अनुभव घेताना दिसून येतात..!)
कालिया गॅंगला दुसरा काहीच उद्योग नसल्याने ते सपनावर आणखी एकदा हल्ला करतील, अशा एका तीव्र चिंतेने
ढोलकीया सिनीयरचा जीव पोखरतोय.
ह्यावर उपाय काय असा विचार करत असतानाच त्यास आठवते की आपला बचपनका दोस्त हसमुख हा लंडनला असतो. शिवाय त्याला एक पोरगा आहे आणि तो अजून
बिनलग्नाचा आहे, हे ओघाने आलेच.
लगेच ढोलकियाकडून ॲसिस्टंटला आदेश की माझ्या हस्सूला बोलवा.
हसमुख मित्र लगेच पोराला घेऊन ढोलकियाच्या घरी.
रोहितच्या संपर्कात आल्यामुळे ढोलकियालाही
टुकार जोक्स मारण्याची बाधा झालेली आहे.
हसमुखचा मुलगा ढोलकियाच्या पाया पडतो. इथे ढोलकिया आपण स्वतः गॅंगस्टर आहोत हे विसरलेला दिसतो. कारण तो हसमुखला म्हणतो की, 'तू उत्तम संस्कार केले आहेत मुलावर..!'
सपनाला हे कळतं. आणि कालचक्र स्तब्ध होतं..!
आता ही पोरगी हमसायला लागणार आणि आपल्या गळ्यात झेप घेणार, हे निशिगंधाभाभीला आधीच कळल्यामुळे ती पोज घेऊन तयारच असते.
ह्या सपनाला श्वसनासंबंधी काहीतरी जुनाट विकार असावा, अशी शंका सुरूवातीला येते... परंतु ह्या सीनमध्ये तिला बहुधा दम्याचा तीव्र ॲटॅक आला आहे.. एक वाक्य बोलतेय... मग खोल श्वास घेतेय.. मग दुसरं वाक्य... पुन्हा खोल श्वास..
अधूनमधून आमच्या गावातल्या काही म्हाताऱ्यांच्या अंगात येतं. त्या घुमायला लागतात. पाहणारे भाविक विनवणी
करतात की "काय चुकलं देवा.. फुडं चाला.. काय झालं देवा.. फुडं चाला... देव का कोपला.. बोला देवा.."
पण म्हातारी घुमायचं थांबत नाही. सपनाही घुमायचं थांबत नाही. इथे पाहा
काही वेळानंतर सपना निशिगंधाभाभीला बांगड्या देते आणि सांगते की,'रोहितच्या माऊलीमध्ये मला पहिल्यांदाच आईचं प्रेम मिळालं. त्यामुळे आता ह्या बांगड्या तू रोहितला नेऊन दे आणि सांग की मला विसरून जा.'
इथे भावनेच्या भरात असलेल्या सपनाच्या तोंडी एक डायलॉग आहे, "आपको पता नहीं भाभी, रोहीत ने इन दिनों में मुझे क्या क्या दिया है"
सदर डायलॉग सरळ सरळ चावटपणाकडे झुकणारा आहे, असा आमचा विनम्र खाजगी अभिप्राय आहे. पण ते एक असो.
मग निशिगंधाभाभी तडक होस्टेलवर..!
प्रसंग निर्वाणीचा आहे..!
आईच्या बांगड्या रोहितपर्यंत पोचवल्याच पाहिजेत..!
भावनेचा प्रश्न आहे..!
त्यामुळेच तर निशिगंधाभाभी पोरांच्या होस्टेलवर एवढ्या
रात्री बिनबोभाट जाऊ शकते..
उगाच ते वॉचमेन, नियम आणि रेक्टर वगैरे भानगडी कशाला...!
---------------------------***********---------------
भाग -२
'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल
दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे'
रोहित निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद.
ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची मुक्त अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..! परंतु तू तसे केलेस तर वो लोग तुला कुत्र्याप्रमाणे मारून टाकतील, हे तू समजून घ्यावंस अशी माझी विनंती आहे.'
या बिंदूवर रोहितकडे बांगड्या सोपवून भाभी पुन्हा 'वो लोगों'कडे वापस जाते.
तिकडे सपनाच्या सगाईचा सीन.
एका हॉलमध्ये धरून आणलेले पाहुणे रावळे, व-हाडीमंडळी वगैरे व्यवस्थित रांगेमध्ये उभे आहेत.
रोहितची एंट्री..! रोहितने आता बहुदा लग्न समारंभांमध्ये
नाचण्याच्या सुपाऱ्या घ्यायला सुरुवात केली आहे.
कारण घरभर मेणबत्त्या घेऊन फिरणारा आलोकनाथ ह्याला शिकायला पैसे कुठून देणार?
तो फक्त सल्ले देणार..!
आणि अधूनमधून ह्याच्या फुग्यात हवा भरून मोकळा
होणार..!
त्यामुळे नाचा, कमवा आणि शिका..!
ही योजना रोहितसारख्या होतकरू विद्यार्थ्यासाठी
अतिउपयुक्त आहे.
म्हणून मग डान्स, गाणं इत्यादी..!
बोल साधारण गाण्याचे असे आहेत की,
'हे माझे राणी, तू भिऊ नकोस. हा मौसम बदलून जाईल
आणि मग आपण दोघे प्रेमकहाणी लिहू.आपलं प्रेम
हे असं आहे. तसं आहे. इत्यादी. इत्यादी.'
अशा पद्धतीने रोहितकडून सपनाकडे आश्वासन
आणि धीर प्रवाहीत होतोय...!
हॉलमध्ये दोन-तीनशे पाहुणे उपस्थित आहेत.
परंतु त्यांना काहीही होत नाही. कारण ते नकली
आहेत... आणि त्यांना प्रेम,आश्वासन,धीर वगैरेंची काही
गरजही नाही.
फक्त सपना तेवढी स्टेजवर जागच्या जागी थरथरतेय..!
कारण ते सगळं गाणं तिच्यासाठीच आहे..!
(मंद असणे हा गुन्हा नाही. जगात तसे खूप लोक मंद
असतात. अभिनयाचे सूक्ष्म कंगोरे माहिती असणाऱ्या
अभिनेत्रींचीही काही कमतरता नाही. परंतु गल्ला
जमवण्याच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होत नाही..!
परंतु आपला मंदपणा अभिनयातून तमाम प्रेक्षकांपर्यंत
पोहोचवणे आणि त्यांना बधिर करणे, हे कौशल्य फार
दुर्मिळ..! आणि ते सपनाकडे पुरेपूर आहे..!
तिला काहीच अडचण नाही..! ती जिंदाबाद आहे..!)
आता सपना थोडा वेळ रूममध्ये जातेय आणि इथे
रोहितकडून सपनाकडे बांगड्यांचं आणखी एकदा
हस्तांतरण होतेय. ह्या बांगड्यांचा प्रवासही मोठाच
रोमहर्षक आहे.
इकडे ग्रुपफोटो वगैरे काढताना सपना स्टेजवर नाही,
हे ढोलकीयाच्या लक्षात येते आणि तो रमनला तिच्या
रूममध्ये पाठवतो.
रमनला फक्त एवढेच दिसते की खिडकीच्या काचा रूममध्ये विखरून पडलेल्या आहेत आणि सपना
गायब आहे.
एवढ्यावरून रमन ताबडतोब अंतिम निष्कर्षाप्रत
पोचतो की सपनाला कालिया दुष्मनाने पळवून नेले..!
रोहितचे नियोजन असे आहे की आपण इथेच समारंभामध्ये ढोलकियाच्या नजरेसमोर राहिलो तर आपल्यावर त्यांचा संशय येणार नाही.
शिवाय एवढा डान्स केला त्याची 'मजुरी' पण मागितली
पाहिजे, हा ही मुद्दा आहेच..!
रमन ढोलकिया ॲसिस्टंटवर किंचाळतोय की,
'कालियाच्या एकेका माणसाला मारून टाका.
संपूर्ण शहराला आग वगैरे लावा..!'
परंतु ॲसिस्टंट टोलवाटोलवी करतो की,'आपल्या घरी
एवढे पाहुणे रावळे आले आहेत. त्यामुळे आता
उगाच आगी वगैरे लावणं काही बरं नाही.'
मग सपनाला घेऊन रोहित होस्टेलमध्ये..!
दुसरीकडे कुठे जाणार?
सगळ्या शहरभर सपनाचा शोध चालू आहे ना..!
बाकी ह्या होस्टेलमधील रूम्स बघितल्या तर
ह्या फिल्मी लोकांना आपल्याकडच्या होस्टेल्सच्या
बाबतीत बिलकुल ज्ञान नाही, हे दिसून येते.
म्हणजे एका रूममध्ये फक्त दोनच विद्यार्थी. शिवाय
प्रत्येकास समजा ऐसपैस चौसोपी बेड आणि
त्यावर समजा पांढरेशुभ्र बेडशीट, शिवाय पॉलिश्ड सागवानी दरवाजा, प्रायव्हसीसाठी पडदे वगैरे..!!
हे सगळंही एकवेळ समजून घेतलं तरीही रूममध्ये
टेबललॅम्प, पाण्याच्या ग्लासवर ठेवण्यासाठी प्लेट्स,
तीनफुटी आरसा आणि स्वच्छ चकाचक भिंती वगैरे
हे आम्ही कसं पचवून घ्यावं..!!
किमान दोऱ्या बांधून सगळीकडे वाळत घातलेल्या,
पताकांसारख्या फडकणाऱ्या चड्ड्या वगैरे तरी
दाखवायला हव्या होत्या.
आम्ही सगळं माफ केलं असतं. पण असो.
रूममेटचा चष्मा काढून टाकला की त्याला सपनाच्या
अस्तित्वाबद्दल काहीच सुगावा लागणार नाही,
ही रोहितची आयडिया बाकी उत्कृष्ट आहे.
अगदीच बेस्ट. काही सवालच नाही.
मग सपनाचं अस्तित्व जाहीर होतंय.
कारण ती होस्टेलभर पळत सुटतेय.
त्यासंबंधी होस्टेलमध्ये मुलांनी मिटींग वगैरे बोलावलीय.
तिथे भाषण ठोकण्याच्या हेतूने प्रॉपर स्टेज,
पोडीयम तसेच माईक वगैरे साग्रसंगीत नियोजन आहे.
रोहित भाषण करतोय..आर्त साद घालतोय..!
पोरांवर काही परिणाम होत नाहीये.
मग ज्या ज्या मुलावर कॅमेरा जातोय तो तो मुलगा
आळीपाळीने एका ओळीचा डायलॉग मारतोय.
विरोधी सूर उमटतायत..!
सारांश असा की ही मुलगी 'मुसीबत' आहे. तिला इथं
ठेवणं धोक्याचं आहे. आणि शिवाय महत्वाचा मुद्दा
म्हणजे तू एकटाच ऐश करणार,आणि त्यासाठी
आम्ही मार खायचा ही गोष्ट आम्हाला रूचत नाही.
'मुसीबत' हा शब्द ऐकताच सपनाच्या आत काहीतरी
हलतंय. टोचतंय. हुळहुळतंय. डहुळतंय.
मग ते सगळं बाहेर येतंय..!
सपना माईक ताब्यात घेतेय. स्वतःच्या एकूणच
हाल-अपेष्टांबद्दल मुक्त चिंतन करतेय.
इथे पाहा सपनाचे विचार मूळातूनच ऐकण्यासारखे आहेत.!
ते नुसते ऐकून भागणार नाही तर ते मुळातूनच समजून घेतले पाहिजेत..! किंवा त्या विचारांचा व्यवस्थित बसून अभ्यासच केला पाहिजे..!
मार्टिन ल्युथर किंग, मंडेला, आंग स्यान स्यू की, चावेझ
इत्यादी गांधीवादी मंडळींनी अशाच पद्धतीने लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत..!
इथेही होस्टेलमधील निबर, थोराड पोरांच्या
ह्रदयाला तस्साच हात घातला गेला आहे.
एक छोटीशी क्रांतीच इथे घडून आलेली आहे..!
आणि त्यापाठीमागे सपनाच्या विचारांची ताकद आहे,
हे आपल्याला विसरून चालणार नाही..!
मग रोहितचा जयजयकार. सपनाचा जयजयकार.
शिवाय प्रेम ह्या भावनेचाही जयजयकार.
ह्यानंतर सपना होस्टेलमधील पोरांच्या भावविश्वाशी,
जीवनाशी कशी एकरूप झालीय, रमलीय, हे सगळं
एका गाण्याच्या माध्यमातून आपल्याला लगेचच
कळून यावं, अशी अपेक्षा आहे..!
नाही कळून आलं तरी काही हरकत नाही.
आम्ही काही तुम्हाला पिक्चर बघायला बोलावलं नव्हतं.
थेटरात न येण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकांना असतंच..!
तिकडे ज्युनिअर ढोलकिया सपनाला शोधण्याच्या
नादात शहरभर गोळीबार इत्यादी करण्याच्या
माध्यमातून, बराच वेळ दाबून धरलेली किंचाळण्याची
तलफ भागवून घेतोय.
एका अज्ञात स्थळी, ढोलकिया-कालिया मिटिंग.!
हे ढोलकिया बापलेक आपल्या गॅंगस्टरीच्या धंद्याचा बेस
विस्तारण्यासाठी वगैरे काही हालचाली करण्याच्या
भानगडीत कधीच पडत नाहीत..!
त्यामुळे मिटींगचा अजेंडा एकच.
सपनाचा शोध..!
निष्कर्ष:- कालिया किंवा अंडरवर्ल्डमधील इतर
कोणत्याही टोळीने सपनाला पळवलेले नाही.
मिटींग खलास.
नंतर घरातील टेलिफोनच्या डिटेल्स वरून
ढोलकियाच्या लगेच लक्षात येते की सदर कांड
रोहितने केलेय.
ढोलकिया पितापुत्र आणि सगळे ॲसिस्टंट्स वगैरे
सुसाट होस्टेलवर..!
कर्कश रमन रोहितला विचारत राहतोय..
'बोल मेरी बेहेन कहां हैं?'
हा प्रश्न चार वेळा विचारून झाल्यावर कदाचित
रोहितला प्रश्न कळलेला नाही, असे वाटल्याने
प्रश्न बदलून, 'सपना कहा हैं?' असंही विचारतोय.
इथे रोहितचा एक काळजावर कोरून ठेवण्यासारखा
डायलॉग येतो की,"तुझ्या बंदुकीच्या गोळ्या संपतील
पण गोळ्या झेलणाऱ्या आमच्या छात्या
संपणार नाहीत.!"
भले बहाद्दर!!
ह्या सीनच्या आधीच होस्टेलमधल्या सगळ्या
मुलांना एकाच प्रकारच्या स्टंप्स, हॉकी स्टीक्स वगैरे
शस्त्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे काहीच अडचण नाही.
स्टंप्स वगैरे उगारून संतप्त चेहऱ्याने सगळे जण
उभे आहेत.
हा सगळा सपनाच्या भाषणाचा परिणाम..!
क्रांती अशीच होत असते..!
पारडे फिरतेय हे पाहून सिनियर ढोलकिया सूत्रे हातात
घेतोय. सर्वांना शांत होण्याचे आवाहन करतोय.
सपनाला पाहताच त्याच्यातला बाप मध्येच उसळी
मारून वर येतोय.
तो सपनाचे लग्न रोहितशी लावून देण्याची घोषणा
करतोय.
जावईबापू रोहितला उद्देशून ढोलकिया म्हणतोय की,
'डोली, कन्यादान वगैरे गोष्टी माझ्या घरी मोठ्या
धुमधडाक्यात व्हाव्यात, अशी माझी तुला
विनंती आहे.'
सासरा चतुर आहे. चतुरलिंगम आहे.
सासरा शब्दांचे मायाजाळ गुंफतोय.
जावई पाघळतोय.
सासऱ्याने आता हात जोडलेले आहेत.
आता जावई पाघळून वितळून पाणी पाणी
झालेला आहे.
जावई रोहित हा गुणी बाळ आहे. सुसंस्कारी आहे.
शिवाय नीतीमूल्यं वगैरे गोष्टीही असतातच.
आणि रोहित हा तर साक्षात आलोकनाथांचा मुलगा
असल्यामुळे हे सगळं रक्तामधून किंवा तत्सम
गुणसूत्रांमधून वगैरे त्यांच्यापर्यंत वाहत आलेलं आहे.
काहीच प्रश्न नाही. शेवटी प्रत्येकजण आपापलं नशीब
सोबतच घेऊन येत असतो..!
परंतु हे काय! ओह् माय् माय्..!
हा सगळा ट्रॅप होता तर..!
जीझस् क्राईस्ट!
पण आता कळून काय उपेग?
चिडिया चुग गई खेत!
इकडे रोहितची कणीक मजबूत तिंबली जातेय..!
तिकडे सपना ढोलकिया पितापुत्रांपुढे विलाप करतेय..!
ढोलकिया ॲंड सन्स मग्रूर आहेत. ते ऐकत नाहीयेत.
तिथे गफूरचाचा नामक ॲसिस्टंटही संतप्त चेहऱ्याने
बसले आहेत. म्हणून जाताजाता त्यांच्यापुढेही विलाप
उरकावा लागतो..!
आता हिचे बाप आणि भाऊच ऐकत नाहीत, तिथे
हे गफूरचाचा गृहस्थ काय करणार! परंतु तरीही..!
मग सपनाकडे काय उपाय उरतो अखेरीस?
टोकाची भूमिका!! झोपेच्या गोळ्या!!
अरे बापरेss!!
गोळ्यांच्या त्या पांढऱ्या डबीवर लाल अक्षरांत
'डेंजर' असे स्पष्ट लिहिलेले आहे..!
काही प्रेक्षक माठ असतात..!
त्यांना समजणार कसं? म्हणून तसं लिहावं लागतं..!
शिवाय लाल रंग म्हणजे धोका, हे एक आहेच.!
काही कलर ब्लाईंड प्रेक्षकही असतील !
त्यांचीही सोय पहावी लागते.! इलाज नाही.
सपनाचे महाप्रयाण..!
सपना महायात्रेस निघतेय..!
जीवन-विन्मुख सपना..!
आयुष्यातले सगळे रंग उडालेली सपना..!
म्हणूनच पांढरा ड्रेस..! वरती पांढरी ओढणी..!
सगळ्यांचा निरोप घेतेय..!
डोळे पैलतीराला लागलेले आहेत..!
भाषा अतिशय निरवानिरवीची..!
काय करील बिचारी..!
मरणवाट स्वीकारलीय..!
प्रेमाचं हे असंच असतं !!
परंतु सदर महाप्रयाण लांबतच चाललेय.
झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या सपनाला आता गाडीत
बसून लंडनला वगैरे निघावं लागतं आहे.
तिकडे रोहितला मज्जा यायला लागल्यामुळे
तो हाणामारी थांबवण्याची काही लक्षणं दिसत नाहीत.
सपनाच्या तोंडातून कसलातरी लाल रंगाचा द्रव उसळून
बाहेर येतोय..! हे असं होणारच..! मघाशी खाल्लेल्या
गोळ्यांची रिॲक्शन आली असणार..! दुसरं काय?
तिकडे सूनबाई निशिगंधा ढोलकिया सासऱ्यापुढे
एक तडाखेबंद भाषण सादर करतेय..!
नणंदेच्या प्रेमविषयक न्यायहक्कांसाठी सासऱ्याला
खडसावणारी निशिगंधाभावजय..!
परंतु हे काय!!
मध्येच ही भावजय ट्रॅक सोडून एकूणच जीवनासंबंधीही
चिंतन प्रकट करायला लागली आहे.!
बाकी सासरा गॅंगस्टर असला म्हणून काय झालं?
शेवटी माणूसच आहे..!
किती बोलावं बिचाऱ्याला..!
परंतु सौ. निशिगंधासूनबाईंचा सात्विक क्रोध..!
भेदक डोळे..!
शब्दांचा लोळ..! ठिणग्या..!
जोडीला पूरक म्युझिकचा दणदणाट.!
आणि कॅमेऱ्यांच्या हालचाली..!
आणखी काय लागतं??
परिणाम अचूक..!
ढोलकिया पश्चात्तापदग्ध..!
वाल्याचा वाल्मिकी होतो तिथे, हा ढोलकिया
काय चीज??
मग शेवटी आलोकनाथसकट दोन्ही फॅमिलींचा सगळा
बारदाना हॉस्पिटलमध्ये..! अंत भला तो सब भला..!
(किती रडतेस सपना. मेकअप खराब होतो मग.
तुला समजा काही अडचण नाही कारण तुझ्यासाठी मेकअप आर्टिस्टची फौज हजर आहे..!
निशिगंधाभाभीही स्वतःच्या मेकअपच्या
व्यवस्थेबद्दल तक्रार करणार नाहीत...!
कारण त्या स्वतः डॉक्टरेट आहेत..!
पण त्या रोहितच्या आईचा तरी विचार कर..!
तिला बिचारीला स्टूलवर बसून मेकअप करून
घ्यावा लागतो..! आणि त्यात तू तिच्या बांगड्याही
घेतल्यास..! हे बरं नाही.)
नायिकेला शिकवायला घरी आलेला
नायिकेला शिकवायला घरी आलेला प्रोफेसर तिला चक्क E = MC2 शिकवत असतो ! नायिकाही नुकतीच ब्यूटी पार्लर मधून आल्यासारखी दिसत असते, हाय हील्स सकट ! अरे गाढवांनो, पायथॅगोरस, depreciation , अल्कली आणी अॅसिड्स असलं साधं सोपं काही नाहीच, थेट आईन्सटाईन !
या सिनेमाच्या निमित्ताने काही
या सिनेमाच्या निमित्ताने काही अप्रतिम विदिओ पाहिले गेले. त्यातला हा एक
https://youtu.be/GmGh6riDSl4
टवणे सरांनी रेकमेंड केलेले
टवणे सरांनी रेकमेंड केलेले व्हिडीओ भारी,त्याहून त्या खालच्या कमेंट भारी...
एक केस तिने दिगर्शकावर टाकायला हवी तर एक केस दम्याचा त्रास असलेल्यांनी तिच्यावर टाकायला हवी>>>
मी आर्या, तेजो, सस्मित पुढचे
मी आर्या, तेजो, सस्मित
पुढचे लिहा की... वाट बघतोय>>
@ ऋन्मेष,
पुढचा मजकूर वरती भाग-२ मध्ये टाकला आहे.
@अनिश्का,
तुम्ही उल्लेख केलेले मॅक डी मधले आणि काचेवर तोंडाने वाफ काढण्याचे सीन अशक्य टुकार आहेत... म्हणून त्यांना अनुल्लेखाने मारणेच योग्य आहे असे धोरण ठेवले... _/\_
पायस, चीकू, मंदार, श्रद्धा, वीरु, वावे, mrunali.samad >>
आवर्जून दिलेल्या अभिप्रायाबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.
_/\_
दुसरा भागही खतरनाक जमलाय! मजा
दुसरा भागही खतरनाक जमलाय! मजा आली!!
पार्ट 2 वाचला.
पार्ट 2 वाचला.
बॉयज हॉस्टेलमध्ये सपनाचं भाषण डेन्जर.
अजिबात बघणार नाही हा सिनेमा
लाजवाब !!
लाजवाब !!
हाहाहा. मस्त जमलंय, लिहीत रहा
हाहाहा. मस्त जमलंय, लिहीत रहा. हाही एक मै प्रेम कि.... टाईप्स भयाण कॅटेगिरीतला मूव्ही होता. आणि ती बया मुठभर गोळ्या खाते वर एकही घोट पाणी न पिता, हा महान सीनही यातच आहे. कचाकचा चावल्या का काय , जेम्सच्या असतील मग . हीरवीण पुरेपूर ओव्हर ॲक्टिंग आहे यात.
दुसरा भागही त्याच फ्लो मध्ये
दुसरा भागही त्याच फ्लो मध्ये जमला आहे
सपनाचे ते भाषण आणि हॉस्टेलहृदयपरिवर्तन हाच या चित्रपटाचा पीक आहे. गेल्यावेळी अर्धेच लिहिलेत तेव्हा हेच मिस केलेले
आज त्या लिंकवर टिचकी मारून मी ते बघणार नाही.. उगाच या लेखामुळे मनात जे हास्यतरंग उठलेयत त्यामुळे त्या दृश्यातील भावनांचीही टिंगल उडवली जाईल. त्यापेक्षा उद्या फ्रेश मूडमध्ये पाहिले तर त्या भावनांशी एकरूप होता येईल..तिच्या हॉस्टेलप्रवेशापासूनच बघावे लागेल. तरच ते भाषण पोहोचेल.
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय
हा सिनेमा बघण्याचा मुहूर्त अजून लागला नाही.एकदा बघायला हवा
हा चित्रपट मी फर्स्ट डे
हा चित्रपट मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता... अत्यंत रटाळ चित्रपट पण तेंव्हा पैसा वसूल वाटलेला...
फार धमाल लिहिलं आहे.
फार धमाल लिहिलं आहे.
अमिषा पटेल पी एच डी आहे असं कुठेतरी ऐकल्यासारखं आठवतंय. सर्वांना विनंती की जपून लिवा; उगीच 'संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर' वरती सापडायची ती!
मस्तच लिहिले आहे. अजून येउ
मस्तच लिहिले आहे. अजून येउ द्या. अमीषा पटे ल चे कास्टिन्ग हा एक क्लेव्हर प्लॉय आहे. ती सर्व प्रकारे इतकी हिरॉइन टाइप आहे पण इसेन्शिअ ली ब्लँड व्यक्तिमत्व. कोणीही मुलगी तिला इरेज करून तिच्याजागी स्वतःला कल्पू शकते. अमिशाला स्वतःचे असे काहीच व्यक्तिमत्व
स्ट्रें ग्थ नाही. सॉल्व्हंट कॅटेगरी पात्र.
दुसरा पार्ट पण भारी
दुसरा पार्ट पण भारी
शिवाय महत्वाचा मुद्दा
म्हणजे तू एकटाच ऐश करणार,आणि त्यासाठी
आम्ही मार खायचा ही गोष्ट आम्हाला रूचत नाही. >>>>
टवणे सर - विडीओ कमाल आहे
मस्तच लिहिले आहे. अजून येउ
मस्तच लिहिले आहे. अजून येउ द्या. अमीषा पटे ल चे कास्टिन्ग हा एक क्लेव्हर प्लॉय आहे. ती सर्व प्रकारे इतकी हिरॉइन टाइप आहे पण इसेन्शिअ ली ब्लँड व्यक्तिमत्व. कोणीही मुलगी तिला इरेज करून तिच्याजागी स्वतःला कल्पू शकते. अमिशाला स्वतःचे असे काहीच व्यक्तिमत्व
स्ट्रें ग्थ नाही. सॉल्व्हंट कॅटेगरी पात्र.>> +११११
कहो ना प्यार है मधे अमिशा ह्रुतिकच्या बरोबरीने आवडली होती. नंतर गदर मधेही ती फिट बसली होती. गदर मधल्या शोकप्रसंगात तिने अतिशय संयत अभिनय केला होता, वयाने बर्याच मोठ्या सनी देओलबरोबरही शोभून दिसली होती. त्यामुळे या चित्रपटातील तिचे रडणे, उसासे बघून शॉकच बसला होता! या चित्रपटानंतर तिच्या करीयरचा आलेख खालीच घसरत गेला.
हे काहीच्या काही जबरदस्त आहे
हे काहीच्या काही जबरदस्त आहे
अजून येऊदे...
Pages