नरकातल्या गोष्टी - भाग ३ - निर्माता!! (मध्य)

Submitted by अज्ञातवासी on 20 October, 2021 - 20:51

आधीचा भाग!

https://www.maayboli.com/node/80363

"धर्मराज!"
"कॉल मी राज."
"येस राज. मी पृथ्वीवर जायचं म्हणतोय. आय मीन लाँग टाईम मी बघितलं नाहीये. आता जर पृथ्वीवर गेलो तर नवीन दृष्टिकोन मिळेल हिशेबासाठी, आणि कसं लोकही मॉडर्न होतायेत तर आपणही काळानुसार..."
"स्टॉप चित्रू. तू केव्हाही पृथ्वीवर जाऊ शकतोस. सोबत या दोघांना घेऊन जा."
"नाही, मला दुतांची काही गरज नाही."
"कॉल अस डूड्स." एकजण रागाने म्हणाला.
"येस. डूडस." चित्रू कसंनुस हसत म्हणाला.
"चित्रू, तुला तिथे सिक्युरिटीची गरज लागू शकते. पृथ्वी धोकेदायक जागा आहे. नाहीतर काही जाऊ नकोस."
"नाही नाही राज... जातो ना घेऊन यांना... चला... डूड्स..."
आणि सगळा लवाजमा तिथून निघाला.
एका सहा मजली इमारतीसमोर एक लेम्बोर्गिनी उभी होती.
"अरे काय भारी आहे रे ही." एकजण निरखत म्हणाला.
"हट... डूप्लिकेट माल आहे. लेम्बोर्गिनीवर बैल असतोय, आणि इथे तर रेडा दिसतोय..." दुसरा फिदिफीदी हसत म्हणाला.
"ओ साब, किधर." वाचमनने चित्रूला हटकले.
"मनिषकुमार. दोस्त है हमारे."
"पाचवी मंजिल, नववा फ्लॅट."
"पता है, थॅन्क्स." चित्रू म्हणाला. आणि डूड्ससोबत लिफ्टमध्ये चढला.
लिफ्ट पाचव्या मजल्यावर थांबली.
"मनुउउउउssss..." चित्रूने लडिवाळपणे हाक मारली.
"कोण आहे." मधून त्रासिक आवाज आला.
"मी चित्रू..."
"चित्र्या??..." मधून प्रश्नार्थक आवाज आला.
डूड्स खुदकन हसले...
चित्रू ओशाळला.
"अरे दार तर उघड."
"चित्र्या गपचूप नरकात जा. मी तुझ्याबरोबर येणार नाही. देव आहे मी. बाय डिफॉल्ट स्वर्गात बुकिंग आहे माझी."
"त्यासाठी नाही आलोय रे बाबा मी. आधी दार तर उघड."
धाडकन दरवाजा उघडला गेला.
"ये आत." मनूने सगळ्यांना आत बोलावले.
चित्रूने मनिषकुमारला सगळी कथा सांगितली.
"हममम... खरंच मामला अवघड आहे."
"मनु, तू एक काम कर ना. हे दोघे नवरा बायको आहेत ना, त्यांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष निर्माण कर. आणि नंतर माफिया व पानवालीमध्ये प्रेम. किस्सा खतम."
"वाह. मुजरा स्वीकारावा महाराज." मनु रागाने म्हणाला.
"काय झालं?"
"काय झालं? या गाठी ब्रह्मदेवाने मारल्यात, आणि मी डायरेक्ट मनात प्रेम, द्वेष इतक्या टोकाच्या भावना नाही निर्माण करू शकत. नाहीतर आज कॅसानोवाने माझी पूजा केली असती, सिंगल नसतो राहिलो."
"मग काय करू शकतो."
"मी मन मॅनीप्यूलेट करू शकतो फक्त, नवीन भावना नाही निर्माण करू शकत."
"हट, मग कशाचा मनाचा देव तू? तूच माझी शेवटची आशा होतास. चल जाऊ दे. शेवटी सटू... सटू... "
"ये गप्प." मनू इमोशनल होत म्हणाला. "काढू काहीतरी मार्ग. आधी जरा रिसर्च करू."
"म्हणजे?"
"चला..."
सगळे तिथून निघाले.
गाडी पानटपरीजवळ थांबली.
सकाळी ग्राहकांची वर्दळ नव्हती.
पानटपरीवाल्याची बायको डबा घेऊन आली.
त्याने प्रेमाने डबा घेतला.
"...आज पैसे आण बरं का मागून. सुपर स्टॉक बनवायचाय." तो तिला प्रेमाने म्हणाला.
"हो." तिने मान खाली घातली, व तिथून निघून गेली.
"मनु, पैसे?" चित्रू आश्चर्याने म्हणाला.
"काहीतरी घोळ दिसतोय चित्रू. बघुयात." मनु म्हणाला.
थोड्याच वेळात अजून एक बाई तिथे आली.
त्या दोघांची नजरानजर झाली. ती टपरीत शिरली.
टपरीचं शटर खाली गेलं.
"डूड्स. टपरीजवळ जा. त्यांचं बोलणं नीट ऐका." मनूने ऑर्डर दिली.
दोघेही टपरीजवळ थांबले.
बऱ्याच वेळाने शटर उघडल्याचा आवाज आला, आणि दोघे घाईघाईने लांब पळाले.
ती बाई पदर सावरत बाहेर पडली.
डूड्स दोघांच्या जवळ आले.
"काय ऐकलं तुम्ही?"
"लै बोगस माणूस आहे. लफड चालुये बाहेर, आणि त्या पोरीला तर डबल फसवायला निघालाय."
"म्हणजे?"
"त्या पोरीला चाळीतली खोली विकून पैसे आणायला सांगतोय."
"अणि..." चित्रू उत्सुकतेने म्हणाला.
"पळून जाणार असतील दोघं, दुसरं काय?" मनु मध्येच म्हणाला.
डूड्सने याला काही समजत नाही, अशा आविर्भावात चित्रूकडे बघितले, आणि डोक्याला हात लावला.
"चला, आधी चाळीत काय खबर आहे ते बघुयात."
मनु म्हणाला.
सर्वजण चाळीकडे निघाले.
"डूड्स, गो." चित्रू म्हणाला.
"एक मिनिट." मनू म्हणाला.
"काय?"
"आपण सगळे अदृश्य आहोत ना???"
"येस."
"मग लपून छपून जायची काय गरज आहे, डायरेक्ट जाऊयात ना…"
"गुड पॉइंट."
डूड्सने पुन्हा याला काही समजत नाही, अशा आविर्भावात चित्रूकडे बघितले, आणि डोक्याला हात लावला.
चित्रू दातओठ खात गप्प बसला.
इकडे चाळीत इमोशनल ड्रामा चालू होता.
"आई."
"बोल पुष्पा."
"पुष्पा नाव आहे तिचं, पानवाली नाही." चित्रू म्हणाला.
"ऐकलं आम्ही." मनू म्हणाला.
पुष्पा मुसमुसत होती.
"आई, किती दिवस मी कष्ट करत राहू? ते म्हणतायेत, तू जर पैसे आणलेस, तर चांगला सिगारेटचा मोठा स्टॉकिस्ट होता येईल. चांगला पैसा मिळेल. आयुष्य सुधारेन आमचं."
*पोरी, तुझ्यासाठीच तर केलंय ना सगळं? आजही करू.बोललोय मी बन्सीलाल शेठ सोबत. खोली गहाण ठेवली तर १० लाख देतोय. होतील ना पुरे?" बाबा मध्येच म्हणाले.
"हो बाबा. अणि बघा. वर्षभरात आपण खोली सोडवून आणू."
बाबा खेदाने हसले.
मनूही इकडे विषण्ण झाला.
"चला, घरी जाऊयात." तो म्हणाला.
सर्वजण घरी निघाले.
मनूच्या फ्लॅटवर शांतता होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.
"मनु, कर ना तुझ्या ताकदीचा वापर. असं तर मोठमोठ्या राक्षसांना भ्रमित केलंय तू."
"माझी शक्ती पृथ्वीवर कमजोर पडते चित्रू..."
"तरीही तू पृथ्वीवर का राहतोस कायम?
"सांगेन चित्रू. मोठी कथा आहे. सांगेन. आता आपल्या केसवर विचार करू."
"कर मनू, वेळ कमी आहे." चित्रू म्हणाला आणि त्याने बाजूचं रिमोट हातात घेतलं. अणि त्याचे बटन दाबू लागला.
"चित्रू तुला माहितीये का ते काय आहे?"
"रिमोट. माहितीये मला." चित्रू फुशारकी मारत म्हणाला. "पण हे खूप छोटं आहे रे, याचा काय उपयोग?"
"तुला काय करायचंय या रिमोटशी?"
"आपलं सहज रे."
"बरं." मनु विचारात पडला.
तेवढ्यात एका डूड्ने चित्रूच्या हातून रिमोट हिसकावून घेतलं आणि तो लक्षपूर्वक बघू लागला.
"अरे ये, तुझी हिम्मत कशी झाली माझं रिमोट घेण्याची?" चित्रू त्याच्या अंगावर धावून गेला.
"स्टॉप..." मनु ओरडला.
क्षणात सगळं पूर्ववत शांत झालं.
"मनु?" चित्रूने मनुकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. "तू आमची मने मॅनीप्यूलेट केलीस?"
"तुला कळलं तर." मनू हसत म्हणाला.
"म्हणजे?"
"उद्या सकाळी तयार राहा. वेळ चुकायला नको."
सर्वजण निवांत झाले.
सकाळी ग्राहकांची वर्दळ नव्हती.
पानटपरीवाल्याची बायको डबा घेऊन आली.
कोपऱ्यातून चारजण लक्षपूर्वक बघत होते.
"आज काम होणार नाही." मनु निराशेने म्हणाला.
"का. काय झालं?" चित्रू म्हणाला.
"घरी जाऊयात. उद्या बघू."
मनु नाराजीने तिथून निघून गेला.
असे चार दिवस गेले. दररोज मनु परत येत होता.
पाचव्या दिवशी...
सकाळी ग्राहकांची वर्दळ नव्हती.
पानटपरीवाल्याची बायको डबा घेऊन आली.
"आज पैसे देणार आहेत बाबा. ती म्हणाली."
"माझी राणी." त्याने हसून तिला फ्लायिंग किस दिला...
ती निघाली.
मनूच संपूर्ण लक्ष तिच्याकडे होतं.
"आजच." तो उत्साहाने ओरडला.
पुष्पा परत फिरली, आणि पानवाल्याकडे निघाली...
"पुष्पा आज त्याला रंगेहाथ पकडणार चित्रू..." तो हसत म्हणाला.
"काय रंगेहाथ. त्याची प्रेयसी आली आहे का आज?"
"बघत रहा."
पानवाल्याने त्याच्या प्रेयसीला फोन लावला.
पुढच्याच काही मिनिटात ती त्याच्याकडे हजर झाली.
टपरीचं शटर खाली गेलं.
पुष्पा दहा मिनिटात टपरीजवळ पोहोचली.
शटर बंद बघून तिला अचंबा वाटला, आणि जवळ जाऊन तिने शटर उघडलं.
मधलं दृश्य बघून तिची तळपायाची आग मस्तकात गेली.
"नीच..." हातात येईल ते घेऊन ती त्याला मारून फेकू लागली.
अग थांब, ये, तो ओरडू लागला.
... अणि पुढच्याच क्षणी त्याने बाजूला पडलेला सुरा घेतला.
इकडे मनुच्या मनाची घालमेल सुरू झाली.
"पुष्पा पळ." तो ओरडला...
...अणि त्याने आज्ञा दिल्यासारखी ती पळू लागली.
टपरीवाल्याने बाहेर उडी मारली, व तोही तिच्यामागे सुरा घेऊन धावू लागला.
"मनु, जीव घेईल तो तिचा."
इकडे मनुचा चेहरा काळानिळा पडत चालला होता...
इकडे अचानक पुष्पा एका गाडीसमोर येऊन धडकली, मात्र गाडीने कचकचून ब्रेक मारल्याने ती वाचली...
पानवाल्याने तिच्यावर वार केला. तो तिने शिताफीने चुकवला.
वार बोनेटवर बसला.
हे बघून गाडीतून एक व्यक्ती बाहेर उतरली...
"वीरू..." पुष्पाने चमकून त्याच्याकडे बघितले...
क्षणार्धात विरूच्या नजरेसमोर त्याच्या भूतकाळ तरळून गेला.
वीरेंद्र उर्फ वीरू सोनटक्के...
...ड्रग माफिया...
आणि त्याच क्षणी संपूर्ण काळ थांबल्यासारखा झाला...
मनु आणि चित्रू एकमेकांकडे वेड्यासारखे बघत राहिले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञात, 'लेखिका' चा फॉर्म अंत्य भागापर्यंत टिकवून राहावा..
हा ही भाग चांगला झालाय पण आधीच्या भागापेक्षा अगदीच वेगळं वाटतंय, पुलेशु!