रोज किती पाणी प्यावे ?

Submitted by कुमार१ on 10 October, 2021 - 23:33

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.

प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.

(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).

सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.

वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.

रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.

आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.

जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की उघड्यावर
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.

पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.

आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.

giphy.gif

आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.

समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.

समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.

'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.

आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.

पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.

पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………………….

मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.maayboli.com/node/64830

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुंडे सुषमा
तुम्ही सुचवलेला मूत्रविकार हा सखोल वाचनाचा विषय आहे. तूर्तास तो प्रतीक्षायादीत ठेवतो
कालांतराने पाहू

नेहमीप्रमाणेच खूप छान माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

शरीरातील विविध कार्यांसाठी जे पाणी लागते त्याचा अर्थ फक्त H2O इतकाच आहे.
RO water purifier पाण्यातले मिनरल्स काढून टाकून अतिशय शुद्ध असे फक्त H2O पाणी देऊ शकतात. याविषयी दोन मतप्रवाह आढळले

1. आपली मिनरल्स ची गरज संतुलित आहारातून पूर्ण होत असते. त्यामुळे पाणी शुद्ध H2O प्यायले तरी तोटा नाही. (पाण्याची नासाडी इत्यादी इतर मुद्दे RO न वापरण्यासाठी योग्य असले तरी या प्रश्नाच्या संदर्भात ते अवांतर आहेत)

2. अतिशय शुद्ध पाणी नैसर्गिक ऑसमॉसीस च्या प्रक्रियेने आपल्या शरीरातील मिनरल्स खेचून घेते आणि त्यामुळे मुळात आपल्याला पाण्यातून हवे ते मिनरल्स मिळत नाहीतच पण अन्नातून मिळालेले मिनरल्स पण नीट वापरले जात नाहीत

या दोन मतांमधील कोणते मत वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे?

वातानुकूलित कक्षात बसल्याने पाणी गरजेपेक्षा कमी पिले जाते अशी विधानेही ऐकली आहेत/वाचली आहेत, काही डॉक्टर्स असे म्हणतात, वातानुकुलीत कचेरी असेल तर आवर्जून पाणी प्या असे सांगतात.

पण मला स्वतःला तरी वातानुकूलित कचेरीमुळे आपण गरजेपेक्षा कमी पाणी पितोय अशी कुठलीच लक्षणे आढळली नाही. वातानुकूलित कचेरीत तपमान कमी असल्याने पाण्याची गरज कमी होत असेल त्यामुळे साहजिक कमी पाणी पिल्या जात असेल.
तसेच भर उन्हाळ्यात वातानुकूलित कक्षातुन एकदम बाहेर गेलो काही कामासाठी, तर थोड्याच वेळात तहान लागेल पाणी प्यावे लागेल ही गोष्ट वेगळी.

कारवी
१. तुमचा
ब्लॅडरच्या स्नायूंची लवचिकता हा जो प्रश्न आहे तो सामान्य ज्ञानाच्या कक्षेबाहेरचा असून त्यासाठी जरा सखोल वाचन करावे लागेल.
तसेही हा प्रश्न धाग्याच्या प्राथमिक मुद्द्याशी निगडीत नाही. त्यावर मला जी माहिती मिळेल ती मी तुम्हाला थेट विचारपूसमध्ये कळवतो. दोन-तीन दिवस विपूवर नजर ठेवून राहा.

२. स्वच्छतागृहाच्या अभावी प्रवासात स्त्री वर्गाची कुचंबणा होते. त्यातून वारंवार कमी पाणी पिणे यामुळे लघवीच्या संसर्गदाहाची शक्यता वाढते.

मी ही पुर्वी खुप कमी पाणी पित होते. कारण सगळी कडे अस्वच्छ washrooms. शाळेत ,कॉलेज ,ऑफिस मध्ये.
पण आता सध्या corona मुळे घरी असल्या मुळे जास्त पाणी पिणे होत
आहे. मी रोज 8 9 glass पाणी पिते.
जेवणच्या किती वेळ आधी पाणी प्यावे?
मला कमी पाणी पिण्याचा काही त्रास नाही झाला. फक्त ड्राई स्टूल होत होते.
ड्राई स्टूल होणे आणी पाणी कमी पिणे यांचा संबध असतो का ? ड्राई स्टूल न होण्या साठी किती पाणी पिणे आवश्यक आहे.?

व्यत्यय
मला क्रमांक १ चे मत पटते.
(1. आपली मिनरल्स ची गरज संतुलित आहारातून पूर्ण होत असते. त्यामुळे पाणी शुद्ध H2O प्यायले तरी तोटा नाही).
पिण्याच्या पाण्यातूनच विविध खनिजे मिळावीत का, हा बऱ्यापैकी वादग्रस्त प्रश्न आहे.

पिण्याच्या पाण्याचा दर्जा आणि आरोग्य :
याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यावर सावकाशीने वाचून कालांतराने स्वतंत्र लिहिण्याचा मानस आहे. तरी सर्वांनी यासंदर्भातील मुद्दे तेव्हाच्या स्वतंत्र चर्चेसाठी राखून ठेवावेत.

तूर्त आपण दैनंदिन पाणी पिण्याचे प्रमाण या मुद्याभोवती चर्चा केंद्रित ठेवू.

मानव
वातानुकूलित कक्षात बसल्याने पाणी कमी प्यायले जाते हे बरोबर.
हा मुद्दा नीट समजण्यासाठी वर मी जो पाण्याचा दैनंदिन ताळेबंद दिला आहे तो पुन्हा एकदा पहावा.

१. जेव्हा घाम जास्त येतो तेव्हा लघवीचे प्रमाण कमी होते
२. जेव्हा घाम कमी, तेव्हा लघवी जास्त.
अशा तऱ्हेने उत्सर्जनाची बाजू शरीर व्यवस्थित सांभाळते.
३. त्यानुसार तहान केंद्राला कमी किंवा जास्त संदेश जाणार. त्यानुसारच आपण कमी किंवा जास्त पाणी प्यायचे.
…..
पुन्हा एकदा:
तहानेची भावना आणि लघवीचा नॉर्मल रंग हेच दोन महत्त्वाचे निर्देशक.

नेहमीसारखाच छान धागा छान चर्चा.
दैनंदिन जीवनातील ऊपयुक्त माहीती. लेखातही आणि प्रतिसादांतही.

मला अध्येमध्ये किडनीस्टोनचा त्रास होतो आणि मला जास्त पाणी प्यायचा सल्ला मिळत राहतो. पण एकतर सकाळीच पाणी मला प्यायला होत नाही. चहा पिल्यावर पाणी आवडत नाही. ऑफिसला गेल्यावर एसीत पाणी प्यावेसे वाटत नाही. अगदी जेवल्यावरही अर्धा ग्लासच पाणी जेमतेम जाते. ऑफिसमध्ये चहा चार वेळा होत असल्याने आणि संध्याकाळच्या नाश्त्यासोबतही चहा होत असल्याने तेव्हाही पाणी फारतर एखाद घोट प्यायले जाते. नाश्त्यावर थेट पाणी प्यायलो तर जास्त जाते. पण मग पाण्यावर चहा प्यायची मजा जाते म्हणून मी नाश्त्यानंतर थेट चहा पितो. चुकीची सवय, पण आवड आहे.
मी ऑफिसला घरून पाण्याची बाटली भरून नेतो. आणि ती निम्म्यापेक्षा जास्त परत आणतो. अगदीच परतीच्या प्रवासात प्यायलो तर निम्मी होते. थोडक्यात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सात-आठला घरी परतेपर्यंत सरासरी ३०० ते ४०० मिलीलीटर पाणी पिणे होते. म्हणजे आमच्या पोराला पाण्याचेही व्यसन नाही हो असे माझी आई म्हणू शकते ईतके कमी पाणी पिणे होते.
अर्थात सध्या वर्कफ्रॉमहोममुळे पाणी पिण्याचे प्रमाण बरेच सुधारले आहे. कारण आता एसीत बसायचे टाळतो. घरीच असल्याने अध्येमध्ये काहीबाही खात राहतो. त्यामुळे पाणी पिणे होत राहते. पाणी जास्त तर उत्सर्जन जास्त. अश्याने मार्ग धुतला जात असेल आणि किडनीस्टोन आणि लघवीतल्या जळजळीचा त्रास कंट्रोलमध्ये येत असेल असे मी समजतो. गेले वर्षे दिड वर्षे हा त्रास जाणवला नाहीये तितका हे देखील खरे आहे.

अमु
शौचाला खडा होणे हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे. त्याची कारणे शरीरातील विविध पातळ्यांवर आहेत. तूर्त आपण फक्त आहार व पाण्याबद्दल बघू.

कमी पाणी पिणे आणि चोथायुक्त आहार कमी असणे हे या समस्येचे एकत्रित कारण असू शकते. आता दिवसाला अडीच लिटर पाणी ही साधारण भारतीय सरासरी म्हणून ठीक आहे. ते पाळायला हरकत नाही.

परंतु….
निव्वळ पाणी पिणे वाढवल्यामुळे खडा होण्याच्या समस्येवर उत्तर मिळेलच असे मात्र नाही. त्यासंदर्भात कधी ना कधी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.

जेवण आणि त्यानुसार पाणी पिण्याच्या वेळा हा अजून एक कुतूहलाचा आणि बहुचर्चित प्रश्न.

ज्यांची पचनसंस्थेची कुठलीही तक्रार नाही, त्यांनी जेवणापूर्वी, जेवताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्यावे किंवा पिऊ नये यासंबंधी काहीही शिफारस नाही .
मात्र,
ज्यांना जठराम्लतेचा आणि अन्न उलट्या दिशेने वर येण्याचा त्रास आहे त्यांनी जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळलेले बरे असते.

जेवणाआधी पाणी पिल्याने भुकेवर परिणाम होतो. त्यानुसार किती वेळ आधी प्यावे ते ठरवावे. हे व्यक्तिसापेक्ष आहे.

लघवीचा नॉर्मल रंग ==>
पाणी आपण जास्त घेत्ल्यास रंग खूपच नितळ असतो व कमी घेतल्यास पिवळसर अधिक वा लालसर , हे अनेकदा अनुभवले ....

तसेच
पाणी कमी घेतल्यास ==> शौचाला कडकपणा........

ह्या दोन बाबी " दैनंदिन पाणी पिण्याचे प्रमाण " योग्य की कमी ह्यचा आपल्याला इशारा देतात , अस मला वाटत....

सुंदर लेख...
प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातून बरींच अतिरिक्त माहिती मिळाली...

धन्यवाद...

छान लेख Happy
मला c sec delivery झाल्यानंतर दवाखान्यातील sister बाईंनी कमीत कमी ३ltr पाणी प्या असे सांगितले, तिसऱ्या चौथ्या दिवसापासून..
त्या म्हणाल्या भूल दिलेली असते त्या औषधाचा निचरा होतो आणि डोकं दुखत नाही.

खूप छान लेख आणि महत्त्वाचा विषय.

काही अनुभव-कम-निरीक्षणे-कम-प्रश्न -

१. मला कामावर असताना (सध्या बैठे काम आहे) बर्‍याचदा तहान लागते आणि वेळेवर पाणी प्यायले जाते. पण सुट्टीच्या दिवशी घरी असेन किंवा अन्यत्र कुठे फिरायला गेलो, तर तहान फारशी लागत नाही आणि पाणी कमी प्यायले जाते. कधी कधी ह्याचे तोटेही जाणवतात. असे का होत असावे (म्हणजे तोटे का होत असावेत असं विचारत नाहीये, पण सुट्टीच्या दिवशी तहान का लागत नसावी)?

२. फ्रीजमधल्यापेक्षा माठातले पाणी चांगले - ह्यात काही तथ्य आहे का? तपमान वेगळे असल्यामुळे काही फरक पडत असेल का?

३. उभ्याने पाणी पिऊ नये - असं का सांगतात? त्याने अन्ननलिका वाकडी होते वगैरे विधानं ऐकली आहेत. पण उभ्याने पाणी प्यायले तर अन्ननलिका सरळच राहील ना? उलट पाठीत बाक काढून बसलो तर अन्ननलिका वाकडी होईल - असा माझा भाबडा कयास आहे.

लेख छान आहे.
सकाळी उठल्यावर लिटरभर पाणी प्या असे सांगणारे काही लोक लिंबूपाणी प्या असेही सांगत असतात.
याचा कितपत उपयोग होतो?

विशिष्ट औषधे चालू असताना पाणी अधिक प्यायचे पथ्य असते. काही औषधांना मूत्रमार्गात क्रिस्टल निर्माण करण्याचा गुणधर्म असतो.

फ्रीजमधले पाणी की माठातले पाणी याबाबत व्यक्तिगत आवड आणि समाधान एवढाच मुद्दा आहे.
शरीरात एकदा पाणी शोषले गेल्यानंतर ते फक्त द्रावण म्हणूनच काम करते.

** पाणी उभ्याने न पिता बसून प्यावे >>

खाणे पिणे बसून केले असता चित्तवृत्ती स्थिर असते हा महत्वाचा मुद्दा. उभ्याने अथवा चालत्या वाहनात 'वरून ' पाणी पिल्यास ठसक्याची शक्यता वाढते. मात्र याचा शरीरातील अन्य बिघाडाशी वा आजारांची संबंध नाही.
.....

सकाळी उठल्याउठल्या लिंबूपाणी ?
>>>
लिंबामध्ये क जीवनसत्व आहे. त्याचा शरीराला कधीही पिले तर फायदा होईल. परंतु लिंबू हे आम्लधर्मी सुद्धा आहे.
सकाळी उठल्याबरोबर त्याचे पाणी पिणे याचा मला तरी काही विशेष फायदा दिसत नाही. उलट, ज्यांना जठरातील आम्लतेचा त्रास आहे त्यांनी ते रिकाम्या पोटी पिऊ नये असे माझे मत आहे.

सकाळी उठल्यानंतर साधे पाणी पिणे पुरेसे आहे.

मी पूर्वीपासूनच खूप पाणी पिते. मुद्दामून असे नाही पण तहान लागली की पाणी पिते. त्यामूळे मला बाथरूमला बर्याचदा जावे लागते. आणि मूत्र अगदी transperant असते. मला hypothyroid आणि complete heart block/ pacemaker आहे. तर मला काही बदल करावे लागतील का? आणि काय/कसे? धन्यवाद डॅाक्टर.

मोहिनी
तुमच्या हृदय समस्यांसंबंधी तुमचे तज्ञ सांगतील त्याप्रमाणेच करायचे.
पाणी पिण्याच्या तुमच्या सवयी चांगल्या आहेत. त्याचा व या समस्यांचा तसा काही संबंध नाही.

धन्यवाद डॅा.
अलीकडे बऱ्याच मॉल्समध्ये जे महागडे अल्कलाइन वॉटर मिळते त्याबद्दल जरा सांगाल का?

अल्कलाईन पाणी >>>>>

असे पाणी पिऊन आरोग्याला खरंच काही फायदे होतात का हा वादग्रस्त प्रश्न आहे.

मुळात यासंदर्भात शास्त्रशुद्ध संशोधन झालेले फारसे आढळत नाही. काही तुरळक गोष्टी वाचायला मिळतात पण त्यांची अधिकृतता संशयास्पद वाटते.
माझ्या मते सामान्य माणसांनी सामान्य पाणीच प्यावे हे उत्तम.

चार हजार रु लिटर किमतीचं पाणी आरोग्यरक्षणासाठी अनावश्यक असताना कशासाठी प्यायचे ?

Pages