अशी पाखरे येती -१

Submitted by नंबर१वाचक on 7 October, 2021 - 13:36

#अशी पाखरे येती-१
@योगीताकिरण
लॉकडाऊन लांबत चालला होता. शाळासुद्धा ऑनलाईनच सुरु होत्या. नियमित सुरु असणाऱ्या विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद झालेल्या. या कोरोनाची दहशत पूर्ण जगात पसरलेली. मी आणि मुलं भारतात तर नवरा दुबईमध्ये कामाला असल्यामुळे सगळेच एकमेकांची काळजी करत असायचो. पण साधारण दिवाळीच्या दरम्यान 2020 मध्ये थोडे निर्बंध शिथिल केले आणि ती संधी साधून आम्ही दुबई गाठलं. लांबून काळजी करत बसण्यापेक्षा सोबत राहीलो तर सगळ्यांना एकत्र छान वेळ घालवता येईल असा विचार केला. जुलै-ऑगस्ट म्हणजे उन्हाळा..सर्वोच्च तापमानाचा ऋतू तर सप्टेंबरपासून दुबईमधले हवामान जरा थंड होत जाते. आम्ही साधारण नोव्हेंबरच्या शेवटी इकडे आलो, तेव्हा कमालीची थंडी सुरु होती. आम्ही राहतो तो भागसुद्धा भरपूर झाडे पक्ष्यांनी समृद्ध होता. साळुंख्या, बुलबुल, चिमण्या, चिड्या, कबुतरं, होले, सुतारपक्षी, कावळे आणि भरपूर पोपट..सगळ्यांची आमच्या खिडकीत हजेरी असायची. त्यांना खायला आम्ही तांदूळ किंवा राळे वगैरे टाकायचो आणि खिडकीतून मस्त त्यांची लगबग बघत बसायचो. कधीतरी मांजरसुद्धा यायची खिडकीत.. पांढऱ्या अंगावर काळे ठिपके आणि हिरवे डोळे असलेली.. काळी पांढरी दिसते म्हणून आणि सापासारखे हिरवे डोळे आहेत म्हणून माझ्या पोराने तिचं नाव झबरसकट (झबरस-कट) ठेवलेले झेब्रा आणि सापासारखी कॅट.. हवा छानच होती त्यामुळे आम्ही जरा लॉकडाऊनमुळे चढलेले किलो कमी करायला सकाळी चालायला जात होतो. इतकी हिरवाई आणि इतके पक्षी बघून असं अजिबात वाटत नव्हतं की आपण वाळवंटात आहोत. पोपट बघून तर असं वाटायचं एखादा घरी न्यावा.
इथे पाऊस अजिबात पडत नाही, किंवा पडला तरी अगदी एखादा दिवस.. पण पडला तर सगळी दुबई तुंबून जाते..मधूनअधून आभाळ मात्र भरून येतं. खूप वारं सुटतं. भरपूर रेती उडते आणि प्रचंड गरम होतं. असंच एक दोन दिवस आभाळ नुसतंच भरून येत होतं. प्रचंड उकाडा आणि रेतीच वादळ(सॅण्ड स्ट्रॉम)आले होते. एकूण एक गोष्टीवर धुळीचा जाड थर बसलेला. ठिकठिकाणी असलेल्या स्विमिंग पूलच्या पाण्यावरसुद्धा रेतीचा थर साचतो. बरेच पक्षी तहान भागवण्यासाठी पूल मधलं किंवा झाडांना पाणी देण्यासाठी लावलेल्या स्प्रिंकलरमधून सांडलेले पाणी पितात. हे स्प्रिंकलरचे पाणी रिसायकल केलेले असते त्यामुळे त्याच्या जवळून गेलं तरी काहीवेळा गटारीसारखा वास येतो. अश्या दूषित पाण्याने इथले पक्षी बहुतेक जरा आजारी पडले असावेत.
मुलं खेळायला जातात त्या बागेपाशी त्यांच्या मित्र मैत्रीणीना पोपट सापडले. आता आपल्याला पण एखादा पोपट सापडावा अशी मुलांची भुणभुण सुरु झाली. सापडला तर ठीक विकत वगैरे आणणार नाही अशी तंबी दिल्यावर आम्ही शोधतो म्हणून शोध मोहीम सुरु झाली. त्या दिवशी रामनवमी होती आम्ही नेहमीसारखे सकाळी चालायला गेलो तर एका झाडाखाली एक पोपट बसला होता. वरती एक कावळा शिकारीच्या पवित्र्यात. आम्ही जवळ गेलो तर कसाबसा धडपडत मागे सरकू लागला आमच्या लक्षात आले त्याला उडता येत नव्हते. म्हणून आम्ही त्याला पकडला. तर तो त्यांच्या पोपटपंची भाषेत जोरजोरात केकाटला बहुतेक वाचवा!! वाचवा!! असं काहीतरी असावं कारण लगेच तीनचार पोपट आमच्या डोक्यावर घिरट्या घालायला लागले. घरी आलो तर पोरं खूश.. खाली ठेवला तर एका कोपऱ्यात शांत बसून राहिला काहीच खात नव्हता. मग आम्हीपण आमच्या रोजच्या कामाला लागलो. अगदी दुपारपर्यंत तो तसाच बसून होता. एकदम छोटुला, एका कोपऱ्यात.. पाणीसुद्धा पीत नव्हता. मग जरा कणभर मीठ आणि साखर घालून पाणी तयार केलं आणि ड्रॉपरने त्याला थोडं थोडं पाजलं. जरा हुशारी आली त्याला मग चालत चालत एक फेरी मारून पुन्हा कोपऱ्यात जाऊन बसला. पण खाल्लं मात्र काहीच नाही. मग खिडकीजवळ टीपॉय ठेवून त्यावर जरा दगड आणि काटक्या ठेवून त्याला तिथे बसवलं.. उदासवाण्या नजरेने खिडकीतून बाहेर बघत बसला होता. एकदा वाटलं सोडून द्यावं, पण सहज मांजर किंवा कावळ्याच्या तावडीत सापडला असता. अजिबात त्राण नव्हते त्याच्या अंगात. रात्री त्याला कुठे ठेवायचे असा प्रश्नचं पडला आम्हाला. उद्या एखाद मोठं खोकं आणून त्यात ठेवू म्हणून सोफ्यावर कापडांची चुंबळ करून त्यावर बसवला तर चढून सोफ्याच्या पाठीमागे गेला आणि तिथेच झोपून गेला.
दुसऱ्यादिवशी, सकाळी डाळिंबाचे तीनचार दाणे खाल्ले.. पण मीठसाखरेचं पाणी मात्र भरपूर पीत होता थोड्या थोड्या वेळाने. संध्याकाळी पुठ्याचं खोकं आणलं आणि त्याची एक बाजू बंद करून खिडकीसारखं घर बनवलं.. एक मोठी काठी आरपार टाकली बसायला.. पण हा काही त्यात बसेना.. सोफ्याच्या पाठीमागची जागाच त्याला आरामशीर वाटत असावी. आम्ही पण जास्त मागे लागलो नाही.. दिवसभरात पाणी पिऊन जरा हुशारी आल्यामुळे संध्याकाळी मात्र भिजवलेली डाळ आणि मक्याचे थोडे दाणे खाऊन त्याच्या जागेवर झोपून गेला. तिसऱ्या दिवसापासून मग बराच सरावला.. ठराविक वेळेला ठेवलेलं खाऊन, पाणी पिऊन, चक्कर मारून, सोफ्यावर जाऊन बसत होता.. त्यानेच ती जागा निवडल्यामुळे पूर्ण सोफ्यावर जुन्या कापडांचे तुकडे पसरवून ठेवले होते.. सारखी शी करत होता.. त्यामुळे सोफ्यावर पोपट आणि आम्ही खाली बसायचो. आता त्याचं नाव काय ठेवायचं याची चर्चा सुरु झाली.. इंग्लिश मिडीयमची माझी पोरं.. कुकी, सॉफ्टी, विंटर, समर असली नावं सांगायला लागली आणि आमच्या मराठी टाळक्यात मात्र राघू, मोरू असली नावं घोळत होती.. शेवटी ज्याच्या तोंडात जे नाव येईल त्याने त्या नावाने हाक मारायची अशी बोली ठरली. पण सहजपणे सगळ्यांच्या तोंडात ‘पोपट’चा लाडाचा शोर्टफॉर्म म्हणून पोपू हेच नाव बसलं आणि या ढगोबाला आम्ही पोपू म्हणू लागलो.. आता जरा रुळला होता पोपू. हातावर येऊन बसायचा. खाणं भरवावं किंवा पाणी पाजावं लागायचं नाही. आता या नव्या पिल्लासोबत आमची पिल्लं खुश होती. पण...
क्रमशः
@योगीताकिरण

पोपू
पोपू-1.jpgपाणवठा.jpgझबू कोलाज_0.png

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users