शशक पूर्ण करा - भयाण - निरु

Submitted by अ'निरु'द्ध on 12 September, 2021 - 14:30

शशक पूर्ण करा - भयाण - निरु

"काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....."

दरवाजातून त्याच्याकडे येणाऱ्या, दात विचकणाऱ्या भेसूर मानवी कवट्या..

आपोआपच पेटलेल्या मेणबत्त्यांच्या उजेडात दिसणारी खोलीभर जळमटं..

पाच फुटावर बसलेलं, रोखून पहाणारं लालभडक डोळ्यांचं काळंकुळकुळीत रानमांजर..

खर्रर्र.. खट्ट.. कोपऱ्यातल्या कपाटाचा दरवाजा उघडतोय. स्वतःहून..

त्यातून खुळखुळत बाहेर आलेला सांगाडा त्याच्याकडेच येतोय.. खुरडत..

टप टप टप… कपाळावरुन टपकणारे घर्मबिंदू..

अचानक खांद्यावर तुटक्या अस्थिपंजाच्या तर्जनीची टकटक..

चलायचं नां..? विचारणारी कवटी

क्षणभर थांबल्यासारखे वाटणारे त्याच्या ह्रदयाचे ठोके, भयंकर घाबरलेला विदीर्ण चेहेरा..

काळीज चिरत जाणारी एक आर्त किंकाळी..

कट्… परफेक्ट शाॅट..
दोघां शामसे बंधूचे उद्गार..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच

छान!