चातुर्मासाच्या कथा - चतुरमा'सी'सह (कहाणी पिठोरीची- समारोप)

Submitted by Barcelona on 4 September, 2021 - 00:55

या कहाण्यांनी मला काय दिलं? इतका जमाखर्च अजून मांडला नाही. कधी फार व्रत केली नाहीत, जी एक-दोन हातून घडली त्यात श्रद्धा कितपत नि परक्या गावात ‘सोशलायझेशनार्थ’ कितपत हे ही उमगलं नाही. माझ्या टिवल्याबावल्या सोसल्याबद्दल श्रद्धेने व्रते करणाऱ्यांची मी ऋणी आहे. उतराई होण्यापेक्षा काही ऋणातच मोक्ष आहे _/\_. काहींनी अजून कथा सुचवल्या पण त्या नंतर कधी लिहीन. ह्या श्रावणातील ही शेवटची कथा…
__________________

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अवसेच्या दिवशीं बापाचं श्राद्ध असे.
(करोनापूर्व काळात अवसेच्या दिवशी यु.एस/ यु.के व्हिसा अपॉईंटमेंट्स हमखास रिकाम्या असायच्या!! सगळे श्राद्धात बिझी असतात…)

इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखूं लागे, व ब्राह्मण जेवायला बसण्याचें वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई.
(अरे ही क्रिएटीव्ह लिबर्टी की मस्करी म्हणायची …भारतीय बायांना बाळंत होताना टेबल-टेनिसचे टेबल, सुईणीऐवजी बाजीराव, बिलं भरायला गजराज राव असं काही चालतं तिथे भर लंच टाईममध्ये सगळे मोकळे असताना बाळ कसं मरत… )

असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीही असंच झालं, तेव्हा सासरा रागावला. मेलेलं पोर तिच्या ओटींत घातलं, तिला रानांत हाकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली.
(हिला श्रावणात कशाला हाकून द्यायची त्यापेक्षा वेळीच मुलाला मार्गशीर्षात यात्रेला पाठवायचं!)

तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, “बाई, बाई, तूं कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा; नाहींतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील.”तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, “तेवढ्याकरितां मी इथं आलें आहे.”
(रेल्वेखाली जीव देणे हे ऑप्शन तेव्हा नसल्याने झोटिंगाचे जेवायचे टाईम टेबल देवळात नायतर चावडीवर लावलेले असायचे काय??)

तशी झोटिंगाची बायको म्हणाली “बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार कां ?” “मी एका ब्राह्माणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई.
( दरवर्षी अचूक श्रावणी अवस म्हणजे - दिदी, तेरा देवर... अरे देवर क्या उसकी पूरी फॅमिली दिवानी लगती है...)

त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्नाण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणें माझी झाली, सातव्या खेपेलाहि असंच झालं.
(सहा मुले गेली त्यापेक्षा श्राद्ध झालं नाही ह्याच दुःख जास्त असणाऱ्यांच एकदाच श्राद्ध घालून मोकळं व्हावं…. जिवंत असलातरी.. )

तेव्हां मामंजींना राग आला. ते मला म्हणाले, “माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्षं उपाशी राहीला. तर तूं घरांतून चालती हो.” असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं, आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आलें. आतां मला जगून तरी काय करायचं आहे?” असं म्हणून ती रडूं लागली.
(जगून काय करायचं ??…. मेलेलं मूल आधी नीट क्रियाकर्म करायचं , मग वैद्याकडे जाऊन सारखे स्टीलबर्थ का होतात ह्याच्या टेस्ट/ ट्रीटमेंट करायच्या… मग एखादा अनामिकासारखा 'कहीं करता होगा वो मेरा इंतजार' असा धमाल म्युजिक अल्बम काढायचा नि मिळालेल्या पैशात सुखी जगायचं Wink )

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, “बाई, बाई, तूं भिऊं नको, घाबरूं नको. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दॄष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्रीं नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हां तूं सगळी हकीगत त्यांना सांग.”
(खीर पुरी चालते की बाळंतिणीला. बेष्ट प्लॅन!! बाकी सौ.झोटींग एकदम शराफत की तोप है टुन्ना.. ही बाई गेली देवकन्येकडे तर सौ.झोटींगला कणिक तिंबा, पराठे लाटा असा सैपाक पडेल की... )

ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली, तशा नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणूनं विचारलं. त्याबरोबर ती खालीं उतरली. ‘मी आहे’ म्हणून म्हणाली. तेव्हां सगळ्यांनीं मागं पाहिलं, त्यांचा आश्चर्य वाटलं, तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली.
(सॉंग सिच्यूएशन - किसका है यह तुमको इंतजार मैं हूं ना… )

नागकन्या देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हां आसरांनीं तीं दाखवलीं. पुढं त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली. आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रगट करायला सांगितलं; तसं तिनं विचारलं, “ह्यानं काय होतं?” असरांनी सांगितलं. “ हें व्रत केलं म्हणजे मुलंबाळ दगावत नाहींत, सुखासमाधानांत राहतात.” पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गांवांत आली.
(मुले सुखसमाधानात हवी असतील तर आया व्रतात बिझी बऱ्या नायतर फालतूच ‘अजून दप्तर भरलं नाही’, ‘कालचा डबा आज दप्तरातून काढतोस, खरकाट्याच्या वासानेच कचरागाडी येईल’ असली किरकिर करत राहतात.)

लोकांनी तिला पाहिलें. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, “भटजी, भटजी, तुमची सून घरीं येत आहे.” त्याला तें खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहूं लागला तों मुलंबाळं दृष्टीस पडूं लागलीं. पाठीमागून सुनेला पाहिलं.
(अरे बापरे सात-आठ जण असे एका आडव्या ओळीत… द्या टाकून सॉंग सिच्यूएशन “निकलेंगे मैदान मे जिस दिन हम झूम के ..”)

तसा उठला, घरांत गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली.
(क्रिकेट टीम नाही पूर्ण केली का? मग सुखीच म्हणायची)

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(#मॉडर्नचातुर्मास. कहाण्या ह्यावर्षीपुरत्या संपल्या. फिर कभी मिलेंगे सीझन टू के साथ .... _/\_ )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पण 'उतणे' ह्या क्रियापदाचा अर्थ काय?>>

पाणी, दूध तापवलं की उतू जातं. (जागा, मर्यादा सोडतं, वाया जातं)

तसंच संपत्तीची, अधिकाराची, सुबत्तेची परिस्थिती या व्रतामुळे आली तरी दुराभिमानाने, अहंभावाने उतू नकोस, मातू नकोस, मर्यादा सोडू नकोस..
आणि ज्या व्रतामुळे हे स्थान, वैभव मिळालं त्याची जाण ठेवून घेतला वसा सोडू नकोस..
असं अभिप्रेत असावं.

सत्य बोलणारे, परोपकार करणारे, अन्यायाविरुद्ध उपोषण करणारे, आंदोलनं करणारे असे अनेक लोकं त्या प्रतिमेच्या मोहात सापडतात.
स्वतःच त्या प्रतिमेमधे बंदिवान होतात. मग त्यात अहंभाव शिरतो, एका चांगल्या गोष्टीचा अतिरेक होतो..
घेतल्या वशामधे उत मात होते...
आणि मग परिणाम पहिल्यासारखा होत नाही. लोकांच्या मनात ते पहिल्यासारखे रहात नाहीत, हे आपणही पहातोच..

अर्थ सांगितल्याबद्दल आभार, अमा.

भीती घालणे आणि त्याचे दुष्परिणाम - ह्यांबद्दल तुमच्या विचारांशी सहमत. फक्त ही भीती लोकांना 'स्वतःच्या' कंट्रोलमध्ये ठेवावे म्हणून कुणी घालत असेल असे वाटत नाही. प्रायश्चित्त देणारा किंवा सोनार - हे लोक व्रतांचे उतण्या-मातण्याचे नियम लिहित नाहीत. अमुक एक गोष्ट एकाग्र चित्ताने करावी, नित्यनेमाने करावी - असं पूर्वी सांगत असावेत. पण मग पुढे पुढे लोक कंटाळा करतात असं लक्षात आल्यावर 'बागुलबुवा येईल बरं का' अशी भीती त्या गोष्टी पुढच्या पिढीकडे पास ऑन करणारेच घालत असतील. एकाने भीती घातली आणि त्यांची अपत्ये घाबरून ती व्रते नेमाने करू लागली की मग अशी पर्टिक्युलर भीती घालणे लोकप्रिय होत असावे. असे भयकारक साहित्य लिहिणारे/सांगणारे लिहून/सांगून जातात तेव्हा त्या नियमांच्या साईड इफेक्ट्सचा विचार करत नाहीत. पुढे ते साईड इफेक्ट्स मातले की मग त्या-त्या काळातले संधीसाधू लोक येतात लोकांना सोडवायला. त्यांचं मुळातल्या लेखकांशी काही साटंलोटं असेलच असं नाही.

पाणी, दूध तापवलं की उतू जातं. (जागा, मर्यादा सोडतं, वाया जातं) >> हो, उतू जाणे हे माहित आहेच. पण उतणे हे क्रियापद इथे वापरून दाखवा बरं.

दुराभिमानाने, अहंभावाने उतू नकोस >> म्हणजे इथे दुरभिमान/अहंकार उतू जाऊ देऊ नकोस अश्या अर्थाने तुम्ही म्हणताय. पण उतणे हे क्रियापद ते गुण/अवगुण ज्या व्यक्तीत आहेत, त्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहे. म्हणजे तुमच्या वाक्यामधून 'उतू जाणारी गोष्ट ज्याच्यात आहे ते उतते' असं लॉजिक निघेल. आता हेच लॉजिक वापरून खालील वाक्य पहा:

दूध तापवल्यानंतर दुधाचे भांडे उतले.

बरोबर आहे का हे?

बिब्बा उतला मध्ये सुजणे, फुलणे, फुगणे ही क्रिया असेल तर 'गर्वाने, अहंकाराने, सेल्फ सेन्टर्डनेस ने फुलू नकोस असा अर्थ असेल.

मासेस ला घाबरवून ठेवायचे कंट्रोल मध्ये ठेवायचे. त्यासाठी भंपक नियम बनवायचे. मारून मुटकून ते पाळायला लावायचे हे सर्वत्र आहे.--- यात फक्त स्त्री साठी असलेले पतिव्रता व्रत पण येत असेल का? नवरा मेला की बाई अपशकुनी पण बायको मेली तर १४ व्या दिवशी नवरा निवल्यावर उभा.

मासेस ला घाबरवून ठेवायचे कंट्रोल मध्ये ठेवायचे. त्यासाठी भंपक नियम बनवायचे. मारून मुटकून ते पाळायला लावायचे हे सर्वत्र आहे.--- यात फक्त स्त्री साठी असलेले पतिव्रता व्रत पण येत असेल का? नवरा मेला की बाई अपशकुनी पण बायको मेली तर १४ व्या दिवशी नवरा निवल्यावर उभा.>> ताई ह्या साठी वेगळा बाफ काढला पाहिजे पन दम धरा. पित्रुपक्षात तुमची क्वेरी हँडल करू आता सणाचे व बाप्पा आगमनाचे उत्साही वातावरण आहे. औचित्य साधले पाहिजे.

बिब्बा लावताना तो ज्योतीवर थोडा गरम करून मग सुई/ टाचणीने फोड तात त्यातून तेल येते . ते तेल लावतात. पण इथे वाचून प्रयोग करू नका. अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता आहे.

माझ्या सासूबाईंनी कशासाठी तरी बिब्बा असलेले काही खाल्ले, प्रमाण खूप जास्त झाले आणि त्यांचे काही दात पडले अशी दंतकथा आहे. एकदा त्यांनाच विचारून कन्फर्म करतो नक्की काय झाले ते.

बिब्बा खरेच जरा डेंजरस प्रकरण आहे. म्हणून तर कोणाच्या तरी सुखात बिब्बा घालणे असे वाक्प्रचार प्रचलित आहेत. जादू मध्ये ही बिब्बा वापरतात.

म्हणूनच मला बीबा जो महिलांचा ड्रेस चा ब्रँड आहे तो पहिल्यांदा बघितला तेव्हा चमकायला झाले होते. पण आपला बिब्बा आणी ते बीबा प़्ंजाबी

बिब्बा लावताना तो ज्योतीवर थोडा गरम करून मग सुई/ टाचणीने फोड तात त्यातून तेल येते .>>.

मला आठवतयं बर्‍याचदा वाटीत दही घेऊन त्यात असा बिबा ज्योतीवर गरम करून त्यातील तेलाचे ३-४ थेंब दह्यात टाकून ते औषध आमचे वडील घत्राता आठवत नाही नक्की कुठल्या त्रासासाठी ते पण छातीत जपिइ, पित्त इत्यादी साठी घेत असावेत. आई द्यायची बनवून सकाळीच उपाशी पोटी घ्यायचे. पायाला कुरुप झाले. (काटा पायात गेल्याने) तर त्यावर बिब्याचा चटका बर्‍याच वेळा घेतलायं.

मी अजून पाहिला नाहीय
फक्त 'अमक्याच्या घरावर बिब्ब्याच्या सुया' अश्या अंधश्रद्धा निर्मूलन मधल्या सुरुवातीच्या केस स्टडी मध्ये वाचलाय आणि आई बाबा 'चिडका बिब्बा' म्हणायचे त्यात ऐकलाय ☺️☺️

We used to play also with them paach khach along with sagargote

Pages